“धामापूर तलाव” -
महाराष्ट्रातील एकमेव जागतिक सिंचन वारसा स्थळ.
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत सन २०२२ मध्ये समावेश झाला. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर लंडन, सिंगापूर, इस्तंबूल सह मानाने झळकत आहे. स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला,तारकर्ली ,देवबाग,थंड हवेचे ठिकाण असलेले आंबोली, स्कुबा ड्रायव्हिंग व समुद्र दर्शनाची झालेली सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तराचे चिपी विमानतळ यासारख्या असंख्य गोष्टी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढवित आहेत. सिंधुदुर्गच्या याच यूएसपीत 'जागतिक सिंचन वारसा स्थळ ' हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवित दाखल झालेला महाराष्ट्रातील पहिला हेरिटेज तलाव म्हणजे धामापूर होय.
मालवण तालुक्यात वसलेले निसर्गसौदर्याने भरभरुन उधळण केलेले टुमदार गाव म्हणजे धामापूर! कुडाळहुन मालवणला जाताना १२ किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. याच धामापुर गावात वसलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा व जिल्ह्यासह देशाचा मानबिंदू असलेला ‘धामापूरचा तलाव’! मालवण हे तालुक्याचे ठिकाण धामापूरपासून १८ कि.मी. अंतरावर आहे.
® भगवती मंदिर :-
धामापूर गावात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम भगवती मंदिराकडे जाणारी कमान आपले लक्ष वेधून घेते.प्रवेशद्वारातून आत शिरून दगडी पाखाडीने चढताना श्री भगवती देवीचे मंदिर दिसते.एैसपैस कौलारू बांधणीचे आई भगवतीचे हे मंदिर पाहुन प्रसन्न वाटते. मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. दु:खितांचे दु:ख दूर करणारी, भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करुन जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणा-या, भगवतीमातेचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. धामापुर तलावाच्या बंधा-यावरच धामापुरचे ग्रामदैवत असलेल्या भगवतीचे देवालय दगड,चुना,गूळ अशा वस्तुंपासून सुमारे १५३० साली उभारण्यात आले. मंदिरामधील कोरीव कलाकुसरीमुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. १६ व्या शतकातील हे मंदिर अजूनही आपले प्राचीन वैभव आणि धार्मिक महत्त्व टिकवून आहे. या मंदिराचा सभामंडप शके १८२७ मध्ये बांधला गेल्याचे उल्लेख आढळतात, ज्यामुळे मंदिराच्या संरचनेचा विस्तार आणि जीर्णोद्धार काळानुसार होत राहिला आहे.
मंदिराच्या गर्भगृहात भगवती देवीची सुमारे चार फूट उंचीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे, जी अतिशय देखणी आणि कलात्मक आहे. देवी भगवतीला महिषासुरमर्दिनीच्या रूपात पाहिले जाते. मूर्तीचे शिव आणि शक्तीचे मिश्रण तिच्या हातातील आयुधांमधून स्पष्टपणे दिसते. एका हातात शंकराची आयुधे असून दुसऱ्या हातात शक्तीचे आयुधे आहेत. या चतुर्भुज मूर्तीचे सौंदर्य तिच्या विविध आभूषणांमधून आणि देखण्या रूपातून प्रकट होते. मंदिराचा गाभारा दगडी असून, सुरेख रंगरंगोटी केलेल्या लाकडी घडणीच्या मंदिरावरचे कौलारु छप्पर पारंपरिक सौंदर्यात भर घालते.या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कळस गर्भगृहावर नसून सभागृहावर आहे.पूर्वी हिंदू मंदिरे हि केवळ प्रार्थनास्थळे नव्हती तर त्या त्या गावातील प्रमुख न्यायव्यवस्थेचे केंद्र होती.धामापुरातील न्यायनिवाडे याच आई भगवतीच्या सभागृहात सोडवले जात असत.न्यायनिवाडा करताना सकारात्मक उर्जा सभागृहात आली पाहिजे या हेतूने मंदिराचा कळस सभागृहावर बांधण्यात आला असावा.मंदिरात दांडेकर देवता,रवळनाथ, जैनब्राम्हण,पावणाई(राजसत्ता), बाराचा पूर्व (पूर्वसत्ता) , घाडीवंश देवता हे बारापाच गावकरी-मानकरी ग्रामव्यवस्थेतील अवसारी खांब ही दिसून येतात.
® सातेरी देवी मंदिर :-
देवी भगवतीच्या शेजारी सातेरी देवीचे अजून एक पवित्र स्थान आहे.सिंधुदूर्गात सातेरी देवीची वारूळ रूपात अनेक मंदिरे आहेत.त्यातीलच धामापूरातील हे एक अप्रतिम मंदिर.हि सातेरी देवी गावातील गावडे समाजाची कुलदैवत आहे.सातेरी देवीसोबतच तलावपरिसरात श्री देव नारायणाचे पवित्र स्थान असून दुस-याच बाजूला डोंगरात छोटेसे गणेशमंदिरही आहे.
® धामापूर तलावाचा इतिहास :-
कुडाळ देशकर समग्र इतिहासात धामापुर तलावाच्या बांधकामाचा उल्लेख आहे.कुडाळ देशकरांची आद्य वसाहत असलेली कोकणातील जी मूळ १४ गावे कुडाळ प्रांतात आहेत ज्याला मूळ भुंकेचे' असे संबोधले जाते त्या १४ गावात धामापुरचा समावेश आहे. धामापुरचा तलाव विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी सोळाव्या शतकात बांधल्याची माहिती यात मिळते. तलावाच्या एका बाजुला धामापूरचे ५७.४७ हेक्टरचे जंगल तर दुस-या बाजुला काळसे गावाचे ४० हेक्टरचे जंगल असुन या दोन्ही जंगलांनी वेढलेल्या निसर्गरम्य भागात ६१ हेक्टरहून अधिक क्षेत्रात पसरलेला हा तलाव तत्कालिन देशमुख नागेश देसाई यांनी दूरदृष्टिने बांधल्याचे लक्षात येते. तलावाच्या बांधकामात दोन्ही गावातील ग्रामस्थांचे नागेश देसाई यांना सहकार्य लाभले.
आता ज्या ठिकाणी तलावाचा विस्तीर्ण जलाशय आहे त्याच्या मध्यभागी पुर्वी मंदिर होते.मंदिराच्या बाजुला असलेल्या वहाळाचे पाणी कर्ली नदीला जाऊन मिळत असे.दोन्ही बाजूनी डोंगर असल्याने कालांतराने कर्ली नदीला मिळणारा हा जलस्त्रोत अडवण्याच्या दृष्टीने तिस-या बाजूला मातीचा बंधारा बांधला.यावेळी भगवतीचे हे मंदिर पाण्याखाली जाणार होते.त्यावेळी तत्कालिन राज्यकर्ते व ग्रामस्थ यांनी धामापूर तलावाच्या बंधा-यावरच रक्षणकर्ती भगवती देवीचे मंदिर उभारुन स्थापना केली.आज या तलावाला जवळपास ५०० वर्षे झाली आहेत.गावापासून थोड्या उंचावर असलेल्या या तलावाचे पाणी पुर्वी चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत हरण (छोटे कालवे) काढुन धामापूर व काळसे गावात शेती व बागायतींसाठी सोडण्यात येई.या तलावामुळे मोठ्या प्रमाणात इथला परिसर सिंचनाखाली आला आहे.हिरव्यागार वनश्रीने नटला आहे.पाण्यातील भुजलपातळीत वाढ झाल्याने इथल्या विहिरींना पुर्वी मुबलक पाणी असायचे.एकविसाव्या शतकात हरणांची जागा पाईपलाईनने घेतली असुन धामापुरचा हा स्वच्छ जलस्त्रोत धामापुर काळसेसह मालवण शहराची सुद्धा तहान भागवतो आहे.
® तलावाशी निगडित दंतकथा :-
तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव अशी रंजक दंतकथा धामापुर तलावाशी संबधित आहे.असं म्हणतात की ,देवी भगवती ही इथल्या गावक-यांच्या सा-या गरजा पुरविते. धामापुरच्या तलावाविषयी दोन रंजक आख्यायिका सांगितल्या जातात. एक - पुर्वीच्या काळी एखाद्याला लग्नसमारंभासारख्या कार्यासाठी दागिने हवे असल्यास त्या गृहस्थाने या तलावाच्या काठी फुलांची एक परडी घेवुन यावे व फुलांनी भरलेली परडी पाण्यात सोडून द्यावी. ती परडी तलावाच्या मध्यभागी जावुन लुप्त होत असे व दुस-या दिवशी त्या व्यक्तीने मागितलेले दागिने घेऊन परडी काठावर येत असे. ते दागिने घेताना नमस्कार करून ते परत केव्हा करणार हे देवीला सांगावे लागत असे. दुसरी अख्यायिका अशी सांगितली जाते की,ज्याला दागिने पाहिजेत त्या गृहस्थाने मंदिरात यायचे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या दागिन्यां एवढी फुले मदिराच्या पुजा-याकडे देऊन तेवढे दागिने घेऊन जायचे आणि आपला कार्यक्रम पार पडला की ते दागिने परत पुन्हा मंदिरात जमा करायचे. मात्र एका परटाने मोहात पडून घेतलेले दागिने परत केलेच नाही. तेव्हापासुन देवीचा कोप झाला आणि दागिने मिळणेच बंद झाले.असेही म्हटले जाते की,ज्यांनी लोभापायी हे गैरकृत्य केले त्यांचे वंशजही गावात टिकले नाहीत.१८८८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीश गॅझेटियरमध्येही या आख्यायिकेचा उल्लेख आहे.तलावाच्या तळाशी भगवतीचे सोन्याचे मंदिर आहे असं मानतात.
खरं तर त्या काळी मंदिर गावचं धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय केंद्रबिंदू असल्याने सोने मंदिरात ठेवले जात असावे.गरज लागली कि सोनं घ्यायचे व गरज संपल्यावर मंदिरात जमा करायचर.आजच्या काळी बॅकेच्या लाॅकरला जसे आपण सोने ठेवतो तसेच! मात्र देवाची भिती न बाळगता सोनं परत न करण्याचे वाईट कृत्य केल्याने पुन्हा असे चुकिचे कृत्य गावात होऊ नये,मानवी श्रद्धेला कुठेही ठेच पोहचु नये म्हणुन लग्नकार्यात सोनं देण्याची ही प्रथा बंद झाली असावी. या आख्यायिकेचा आजच्या वैज्ञानिक युगात असाही अर्थ लावला जाऊ शकतो की,सोनं हे धामापुर तलावापाशी विपुल कृषीधन,पशुधन व निसर्गसंपदा असल्याचे प्रतिक असावे.इथल्या समृद्धतेमुळे गावक-यांना कुठे दूर जाण्याची कधी गरज भासली नसावी. त्यावेळचे धामापुर गाव स्वयंपुर्ण होते.
© तलावाची वैशिष्ट्ये :-
' उरलं सुरलं धामापुरच्या तळ्यात ' ही म्हण तळकोकणात फार प्रसिद्ध आहे.याचा अर्थ असा आहे की १५३० साली हे तलाव बांधल्यापासून आजतागायत २०२४ पर्यंत कधीच सुकलेले (आटलेले) नाही.महाराष्ट्रात १९६५-६७ च्या दरम्यान मोठा दुष्काळ पडल्याची नोंद आहे.त्यावेळीही महाराष्ट्रात फक्त धामापुर व काळसे ही दोन गावे अशी होती की जिथे त्यावेळीही मुबलक प्रमाणात शेती झाली.इतके मुबलक पाणी या तलावात होते.म्हणुनच इतर कुठेही पाणी मिळाले नाही तरी धामापुरच्या तलावात तुम्हाला नक्की पाणी मिळेल हे सांगणारी ही म्हण तळकोकणात प्रचलित झाली.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीनंतर हिंदवी स्वराज्याचे आरमार बळकट व्हावे यासाठी उच्च प्रतीच्या जहाजबांधणीकडे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी लक्ष दिले.जहाजबांधणीसाठी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच उत्तम प्रतीचे लाकुड मिळावे यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी धामापूर तलाव परिसरातील जंगल संरक्षित केले.या जंगलात जहाज बांधणीला उपयुक्त असलेली टिंबर ट्रीची लागवड जाणीवपूर्वक त्यांनी केली.त्याचा वापर पुढे स्वराज्याच्या आरमाराला होऊ शकला.
अलीकडे नवीनच बांधलेली अनेक धरणे,जलाशये काही वर्षातच कोसळली गेल्याचे, त्यांचे बंधारे खचल्याचे , त्याला भेगा गेल्याचे दृश्य पहायला मिळते.मात्र ५०० वर्षे जुने असलेल्या या मातीच्या तलाव आजपर्यंत कधीच कोसळला नाही.यामागे रक्षणकर्ती भगवतीची कृपा असल्याची गावक-यांची श्रद्धा आहे.या गोड्या तलावाच्या रक्षणासाठी, तलावाच्या काठावरती तिवर या झाडांची लागवड जुन्या काळात लोकांनी केली. तिवराची झाडे मातीची धूप रोखतात. या गोड्या तलावाच्या काठावर तिव-यासारख्या वनस्पतींची लागवड करताना धामापुरातील पर्यावरणाचे या जलस्त्रोताचे रक्षण करण्यात तिवर किती महत्वाची भूमिका बजावेल याचा सखोल सांगोपांग विचार करणा-या, दूरदृष्टी असलेल्या पूर्वजांना मानावेच लागेल. तिवर या वनस्पतींसोबतच तलावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरांवरील समृद्ध वनश्रीमुळे पक्षी व वन्यप्राणी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.तलावात मरळ, टोळ, रोहू, शिंगाडा, मळई , काळुंदर ,चेर असे मासे आढळतात तर भवतालात ससे,सांबर,भेकड,बिबट्याचा इथे वावर आहे.तर महाधनेश, खंड्या(odkf) भारद्वाज, कोतवाल, हळद्या, गायबगळा, इंडियन पिटा,युरेशियन मार्श,क्लिपर सारखे दूर्मिळ फुलपाखरु यासारखे असंख्य पक्षी धामापुरच्या मुसाफिरीत सहज दर्शन देऊन जातात.१२५ प्रजातीच्या पक्षांची व १९३ प्रजातींच्या वनस्पतींची तज्ञांकडून या परिसरात नोंद करण्यात आली आहे.
® धामापूर तलावाच्या शाश्वत विकासासाठी स्यमंतक संस्थेचे कार्य :-
'चुकला -माकला ढोर धामापूरच्या तळ्यात' ही तळकोकणातली प्रसिद्ध म्हण सर्वांनाच माहिती आहे. विपुल निसर्ग -संपदा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाने आजवर अनेक जीवांना आपल्या कुशीत आसरा दिला आहे आणि कित्येक शतकांपासून कोकणात मानाचा दर्जा मिळवला आहे. जुन्या -जाणत्या माणसांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून आज धामापूर तलावाच्या रचनेकडे बघितले जाते.
धामापुर गाव तलावासह कातळशिल्पे,खाजन जमीन, नदी, डोंगर, जुनी मंदिरे,जंगल अशा अनेक गोष्टीनी समृद्ध असल्याने इथल्या भवतालाच्या शाश्वत विकासासाठी व कोकणातील शाश्वत ,शांत,आनंदी जीवनशैलीच्या प्रसारासाठी गावातील सचिन देसाई यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातुन जीवन शिक्षण विद्यापीठाची स्थापना केली. याच संस्थेच्या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दस्तऐवजीकरणासाठी देसाई प्रयत्नशील आहेत.
याच काळात २०१४ मध्ये ४३.८० हेक्टर विस्तारलेल्या धामापूर तलाव क्षेत्रात १६०० काँक्रीट खांबाचा स्कायवाॅक बांधण्यात सुरुवात झाल्याने ५०० वर्ष जुन्या मानवनिर्मित जैवविविधतेने समृद्ध असलेल्या धामापूर तलावाच्या सौंदर्यात बाधा येईल हे सचिन देसाई यांच्या लक्षात आले.त्यांनी स्यमंतक संस्थेच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग प्रशासनाची वर्षभर लढा दिला.पुढे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पर्यावरण याचिका दाखल केली. त्याला यश आल्याने स्यमंतक संस्थेने धामापूर तलावासह सिंधुदुर्गातील पाणथळ जागांच्या संवर्धनाची मोहीम ' सिंधुदुर्ग वेटलँड'या पायलट प्रकल्पातून घेतली. यातूनच धामापूर तलावाचा तपशीलवार अभ्यास करून संपूर्ण अहवाल आय. सी.आय.डी ला सादर करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने धामापूर तलावाची पाणथळ जागा म्हणून नोंद देशाच्या पाणथळ नकाशावर प्रसिद्ध केली. धामापूरातील शाश्वत पर्यावरणीय समृद्ध खजिन्याचे महत्त्व देशाच्या लक्षात आल्याने पुढे धामापूरला हेरिटेज इरिगेशन साईट म्हणून मान्यता मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू झाले आणि यातूनच २०२० साली धामापूर तलावाला 'जागतिक वारसा सिंचन स्थळ' म्हणून मान्यता मिळाली.या गौरवामुळे धामापुर तलावाच्या जतन संवर्धन मोहिमेला मोठे पाठबळ मिळाले. स्यमंतक संस्थेचा युवा कार्यकर्ता महंमद शेख हा आज धामापुर गावात येणा-या देश विदेशातील पर्यटकांना धामापूर तलाव किनारी सापडलेल्या दुर्मिळ सजीवांचा अधिवास, तलाव व मंदिराचा मौखिक आणि लिखित इतिहास, गावसमाज व मंदिराचा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेला अभ्यास, जुन्या काळातील सिंचन पद्धती अशा अनेक विषयांची सखोल माहिती आपल्या अथक अभ्यासाच्या जोरावर विशद करतो तेव्हा आवाक व्हायला होते. 'पर्यटन आणि शांतता' ही यंदाची २०२४ ची जागतिक पर्यटनाची थीम आहे. आज सा-या जगाला आजच्या वेगवान, धावपळीच्या, तणावयुक्त काळात शांततेची गरज आहे.यादृष्टिने महाराष्ट्रात शांततेसह शाश्वत पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कोकण व कोकणातील धामापुरसारखी समृद्ध गावे सर्वोत्तम पर्याय ठरणार आहेत.
खरं तर ,धामापूर तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून ५०० वर्षांपासून हस्तांतरित करण्यात आलेला जिवंत वारसा आहे,हे स्यमंतक संस्थेच्या लक्षात येताच या जिवंत वारशाचे अस्तित्व अबाधित राहावे आणि धामापूर तलाव रचनेतून दृग्गोचर होणारी कोकणातील जुन्या जाणत्या माणसाची अलौकिक दूरदृष्टी जगासमोर यावी या उद्देशाने "मी धामापूर तलाव बोलतोय " या लघुपटाची निर्मिती करण्यात आली.पुणे,मुंबई सह गोवा व कोकणातील ग्रामीण भागात या लघुपटातून धामापूर तलावाप्रमाणेच आपापल्या गावातील जलस्त्रोतांचे संवर्धन कसे करायचे याचा उलगडा अनेकांना येऊन अनेक गावात आज जलस्त्रोतांच्या संवर्धनाचे काम सुरु झाले आहे.सचिन देसाईंसारख्या कार्यकर्त्यांच्या रचनात्मक कामाचे हे यश म्हणावे लागेल.
® कातळशिल्पांचा शोध :-
अलीकडेच धामापुरच्या सड्यावर कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरीझमचे नवे दालन खुले होणार आहे.धामापूर गावच्या गोड्याचीवाडी हद्दीत चार चित्रकृत्या नुकत्याच प्रकाशात आल्या आहेत.कोकणात रत्नागिरी,सिंधुदुर्गसह गोव्यातल्या कातळ सड्यांवर गेल्या दोन दशकात अनेक ठिकाणी नवाश्मयुगातील कातळ शिल्पे सापडल्याने कोकणातील प्राचीन मानवी वस्तीचा एक दुवा सापडला आहे.धामापूरच्या सड्यावर सापडलेली कातळशिल्पे धामापूरचा इतिहास शिलाहार काळापासून चक्क नवाश्मयुगापर्यंत मागे नेऊ शकतात. सिंधुदुर्गात कुडोपी,हिवाळे,वानिवडे,आरे, किर्लोस,विर्डी या गावात यापूर्वीच कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कोकणातील आठ कातळ शिल्प स्थळांना जागतिक वारसा स्थळ यादीत नुकतेच नामांकन मिळाले आहे,त्यामुळे आदीमानवाच्या या पुरातन पाऊलखुणा पाहण्यासाठी जगभरातील पुरातत्वीय अभ्यासक,इतिहासप्रेमी पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. या पर्यटकांनाही आता धामापूरकडे वळवता येईल.
धामापुरच्या 'पोय' मधील सफारी :-
मे महिन्यात दरवर्षी प्रमुख शेतकरी हा मातीचा बांध फोडायचा ठरवतात.त्यासाठी दवंडी पिटली जाते. बांध फोडताना धामापूर,काळसे गावातील लोक एकत्रित येतात.काळसे गावातील लोक पुर्वी हा बांध बांधायला येताना वाजत गाजत मडक्यातुन दहिभात घेऊन यायचे.या मातीच्या बांधाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांध घालतानाबांधवसाला (स्थानिक देवता) गावकरी गा-हाणे घालायचे.बांध कोवळ व मातीच्या मिश्रणातुन घातला जायचा.कोवळे फायबरसारखेच काम करीत असल्याने बांध टणक बनायचा.या बांधातील पाणी भेडला माडाचा उपयोग पाईप म्हणुन करुन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी केला जायचा.गावकरी दहिभातावे मडके वर्षभरासाठी त्या बांधात ठेऊन जायचे.पुढील वर्षी बांध फोडल्यावर मडक्यातील दहीभात गावक-यांना प्रसाद म्हणून वाटला जात असे.बांधायला ठेवलेल्या मडक्यातील दहीभात वर्षभर टिकायचा हेच इथल्या इकाॅलाॅजीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले.सुनिताबाईंच्या आयुष्यावर प्रभाव होता तो त्यांच्या धामापूरच्या आजीचा.घरच्यांच्या मनाविरूद्ध पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या लग्नात तीच पाठीशी उभी राहिली. 'आहे मनोहर तरी ' या आत्मकथनात आजीचे अतुलनीय मानसिक धैर्य,खंबीरपणा आणि निष्ठा विशद करताना सुनीताबाई जिव्हाळ्याने भरून जातात.सुनीताबाईंनी एक माहेरवाशीण म्हणून धामापूरच्या तलावाचं वर्णन करताना या मालवणी मुलखाचे दर्शन घडविले आहे. सोयरा सकळमध्ये त्यांनी तर " यक्षाचे तळे" असं धामापूरच्या तलावाला म्हटले आहे.
आज धामापूर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित आहे.तलावामध्ये नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे.तलावाकाठी पर्यटकांसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे पर्यटक निवास अाहे.गावात खाजगी होमस्टेसह हाॅटेल्स,लाॅजही उपलब्ध आहेत.तलावाच्या बाजूने जंगलसफारी, व पक्षी अभ्यासासाठी जंगलातुन जाणा-या पक्क्या पाखाड्या बांधण्यात आलेल्या आहेत.तलावाच्या काठी एकदा आपण बसलो की मंदिरातील घंटानाद,सुगंधी अगरबत्तीचा सुवास,पक्ष्यांचे आवाज,हिरवीगार वनश्री,वाहणारा थंडगार वारा आपल्या पंचेन्द्रियांना तृप्त करतात.खरं तर 'स्व' त्वाची सर्वोत्तम अनूभूती ही कोलाहलापासून, गजबजाटापासून दुर अशा निरव शांततेच्या सानिध्यात अनूभवता येते. शुद्ध,स्वच्छ प्रदुषणरहित हवेने ताजे -टवटवीत होता येते.तिथल्या निसर्गोत्सवातील चिरकाल आठवणी जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. यासाठीच आयुष्यात एकदा तरी धामापूर तलावाला भेट द्यायलाच हवी!
विजय हटकर,
लांजा -रत्नागिरी.
संदर्भ :-
गुं.फ.आजगांवकर :- कुडाळदेशकर गौड ब्राम्हणांचा संक्षिप्त इतिहास
मनोहर आजगांवकर - धामापूर तलाव सिंधूदूर्गाचा मानबिंदू ,कोकण मीडिया दिवाळी विशेषांक २०१८
प्रशांत हिंदळेकर - धामापूर तलावाला जागतिक सन्मान,दै.सकाळ,३० नोव्हेंबर २०२०
महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी सापडला कातळशिल्पांचा खजिना - दै.महाराष्ट्र टाईम्स,०२ आॅगस्ट २०२३
गोष्ट धामापुर तलावाची - कोकणी रानमाणूस व्लाॅग
-----------------------------------
लेखक परिचय :-
लेखक विजय हटकर कोकणात गेली १७ वर्षाहून अधिक काळ शिक्षण, पत्रकारिता,ग्रंथालय,पर्यटन चळवळीत कार्यरत असून लवेबल लांजा, रत्नसिंधू टुरिझम व लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थांचे संचालक आहेत. रत्नागिरीतील थंड हवेचे ठिकाण माचाळ याविषयी 'माझे माचाळ ' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले असून २० हुन अधिक विशेषांकाचे संपादन, विविध माध्यमसमुहात त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत.कोकणातील लांजा तालुक्यात ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी, कातळशिल्प संवर्धनासाठी ते कार्यरत आहेत.
संपर्क :- ८८०६६३५०१७
--------------------------------------
छायाचित्रण सहाय्य - स्यमंतक संस्था धामापूर.
No comments:
Post a Comment