Tuesday, October 15, 2019

       माझे वाचनविश्व.


            शिक्षण प्रांतात असल्यामुळं नव्हे तर मला मुळातच वाचनाची आवड आहे.दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला नियोजनबद्ध कसं वाचावं हे कुणी शिकविलं नाही. त्यामुळे मि मिळेल ते वाचत गेलो.माझ्या जन्मगावी अर्थात मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास      ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर
यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.
          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.
            माझा प्रयत्न असतो की पंधरवडयातून निदान एक तरी चांगलं पुस्तक वाचावं.आता 'चांगलं ' म्हणजे काय, हा अवघड प्रश्न आहे.स्वतः पुरती माझी व्याख्या सोपी आहे- ज्या पुस्तकांमध्ये मन रमतं,रूची वाटते, ती पुस्तके चांगली.अर्थात काही चांगली पुस्तके वाचायला ' मेहनत' करायला लागते.विचारवंत जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणाऱ्या संदीप वासेलकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडविणारे  ' एका दिशेचा शोध ' या पुस्तकामध्ये तर मला खुप प्रभावित केलं. व.पु.काळे हे माझे आवडते लेखक.त्यांच्या पार्टनर,सखी,दोस्त,वपूर्झा, गुलमोहर,भूलभूलैय्या आदि पुस्तकातून सतरंगी मनाचा ठाव घेता येतो.बाबा आमटे  यांच्या ' ज्वाला आणि फुले ' या पुस्तकातून शब्दांचे सामर्थ्य अनुभवता येते.शिक्षण क्षेत्रात असल्याने  गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक काही पुस्तके वाचली.हेरंब कुलकर्णी यांचे 'बखर शिक्षणाची' तात्तोचान हे जापनीज पुस्तक,लीलाताई पाटील यांचे ' सृजनानंद', ' माझी काटेमुंढराची शाळा ' नरेंद्र लांजेवार यांचे ' एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा ' ही त्यातील महत्वपूर्ण पुस्तके. मला वाटतं, ही पुस्तके प्रत्येक शिक्षकांनी वाचली पाहिजेत. ही शिक्षकांचा व्यवसाय समृद्ध करणारी पुस्तके आहेत.

         
             काही विशेष लेखक मला फार आकर्षित करतात. त्यात गोनिदा,रणजित देसाई,अण्णाभाऊ साठ्ये , श्री.ना.पेंडसे ,अच्युत गोडबोले, गिरिश कुबेर,व हिंदी साहित्यातील महादेवी वर्मा , हरिवंशराय बच्चन ,फणीश्र्वरनाथ रेणू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या प्रत्येकाची आपापली एक स्वतंत्र शैली आहे.त्यामुळे त्यांच्या वाचनातून समृद्ध झाल्यासारखे वाटते.साहित्य - इतिहास - पर्यावरण - पर्यटन -आंतरराष्ट्रीय राजकारण - अर्थकारण - विज्ञान - कायदा -अध्यात्म - तत्वज्ञान असे विविधांगी प्रकारचे वाचन केल्यानेच व्यक्तिमत्त्वाला सूज्ञता येते.परिस्थिती सुखाची असो वा दु:खाची .पुस्तकं कधीही आपली सोबत सोडत नाहीत.मनाच्या विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ बांधणीसाठी वाचन आवश्यक आहे. ' पोटासाठी अन्न ' ही जशी अपरिहार्य गरज आहे तसं बॊद्धिक विकासासाठी वाचलंच पाहिजे, असे प्रत्येकाला वाटायला हवं. ' एक होता कार्व्हर ' , ' इडली आर्कीड आणि मी '  , ' माती पंख आकाश' , 'अग्निपंख ' या सारखी पुस्तके मुलांना संस्कारक्षम वयातच जाणीवपूर्वक द्यायला हवीत. कारण एक चांगलं पुस्तक त्यांचं आयुष्य बदलवु शकते.
             आजच्या वाचन संस्कृतीचा विचार करता एक मुख्य गोष्ट लक्षात येते की, वाचक आणि वाचन,  लेखक आणि प्रकाशक,  साहित्यसंस्था आणि सरकार, शिक्षक आणि त्यांचे चालक यांच्यात सध्या मेळ दिसत नाही. तो मेळ घालायचं काम कोण करणार? केरळ, तामिळनाडू, प.बंगाल सारख्या राज्यातला वाचनसंस्कृतीचा  अभ्यास केला तर महाराष्ट्र किती पाण्यात आहे याचा अंदाज येतो.मराठी पुस्तकाची दीड ते दोन हजार प्रतीची एक आवृत्ती संपायला तीन वर्षे लागतात तर केरळमध्ये ४० हजार प्रतींची एक आवृत्ती केवळ एकाच वर्षात संपून जाते. आपल्याकडे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लागायची आहे.ग्रंथालयातल्या वाचकांची संख्या देखील मर्यादित आहे.
              खरं तर, वाचन एक संस्कृतीचा भाग आहे.पुस्तक वाचल्याने अनेक माणसं भेटतात.आणि शब्द जगण्याचा विश्वास देतात.टी.व्ही.,चॅनल्स, संगणक, इंटरनेट, सोशल मिडिया, मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकलेल्या विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया , नवनिर्मितीची क्षमता काहीशी गोठल्या सारखी झाली आहे.नवे विचार, आकलन ,सादरीकरण, प्रकटीकरण ,लेखन या अंगभूत गोष्टी विद्यार्थी विसरत चालला आहे.वाचावं, वाचलेलं, चिंतनातून मनात आणावं त्यातून संस्कारित व्हावं असं आता अभावानेच आढळतं.
              वाचन संस्काराअभावी चुकलेल्या मुलांना, विद्यार्थ्यांना वेळीच सावरलं पाहिजे. पुस्तकांचं बोट धरून जाणिवांच्या लख्ख प्रदेशात केलेला प्रवास आनंददायी असतो हे त्याला समजावं लागेल.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी पुस्तकाचा आस्वाद घेता यावा ,सृजनशीलता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. यातून वाचनसंस्कृती ला बळ प्राप्त होईल.
              वाचन एक सर्जनशील कृती आहे.ज्ञानाच्या क्षेत्रात अहंकार असता कामा नये.यास्तव वाचकाने नम्रपणे पुस्तकाच्या कुशीत शिरलं पाहिजे.तुम्ही कोणत्याही पुस्तकात पूर्णपणे गुंतून जात नाही तोपर्यंत तुम्ही सच्चे वाचक होत नाही. ' अमृता प्रीतम ' या सुप्रसिद्ध लेखिका म्हणतात " वाचता वाचता मीच पुस्तक झाले."काहीवेळा पुस्तक मनात कायमपणे मुक्कामाला येतात आणि घर करतात.

               प्रत्येक मोठा लेखक आपल्या वाचकाला समृद्ध करत असतो.आणि त्याचं लेखकात रुपांतर करत असतो.कोणतेही लेखन जीवनाची बाजू घेत जीवनावर प्रेम करायला शिकवितं.पुस्तकाच्या जन्मासाठी जसा लेखक आवश्यक असतो तसा किंबहुना जरा अधिक वाचक आवश्यक असतो. वाचन हा अात्मशोधाचा प्रवास आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक निकोप, सुंदर, उदार व सर्वसमावेशक होण्यासाठी ,वाचनसंस्कृती साठी पुन्हा नव्याने चळवळ उभी करावी लागेल.
               वाचनाची सवय ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग असली पाहिजे.ज्यांना वाचनाचे व्यसन आहे त्यांना हे म्हणणे पटेल.पुस्तकांचा  आदर केला तर ती आपल्याला आदरयोग्य बनवितात.विविध संशोधनाने सांगितले आहे की जगातील राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च नेते हे वर्षाला किमान ७० पुस्तके वाचतात.आपण किमान २० पासून तरी सुरवात करू शकतो.- गरज आहे ती फक्त निश्चय करण्याची आणि व्यसन लागण्याची.
     या प्रवासासाठी शुभेच्छा !


        श्री विजय हटकर.
          संचालक -
       लोकमान्य वाचनालय लांजा.
        ता.लांजा ,जि.रत्नागिरी.
         मोबा- ८८०६६३५०१७