Friday, November 26, 2021

लांज्यातील कोट गावात कोरीव कातळशिल्पांचा समूह.

 झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या सासरी आदिमानवाच्या पाऊलखुणा,लांज्यातील कोट गावात कोरीव कातळशिल्पांचा समूह.

---------------------------------------

सुभाष लाड,विजय हटकर आबा सुर्वे यांच्या शोधमोहिमेला यश

--------------------------------------



       झाशीच्या राणीचे सासर म्हणुन अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव व देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच प्रकाशात अाल्याने राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून पुढे येणाऱ्या कोट गावाच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

        नुकतेच कोट गावचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी कोट गावात कोलधे -कोट गावच्या सीमेलगत असलेल्या "माचपठार" नामक कातळसड्यांवर पांडवकालीन आकृत्या असल्याची बाब राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, पर्यटन अभ्यासक विजय हटकर, महेंद्र साळवी यांच्या निदर्शनास आणुन दिली.हि बातमी समजताच सदर आकृत्या पांडवकालीन नसून कातळशिल्पांचा महत्वाचा ठेवा असावा हा प्राथमिक अंदाज काढून सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड, विजय हटकर कोट गावातील माचपठार या भागाला भेट दिली.यावेळी कोट गावचे सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे, प्रणव वाघाटे उपस्थित होते.सदर पठारावरील आकृत्या पाहताच क्षणी हि पांडवकालीन शिल्पे नसून नवाश्मयुगात या ठिकाणी नांदत असलेल्या आदिमसंस्कृतीच्या या पाऊलखुणा अर्थात कातळशिल्पांचा समृद्ध  समूह असल्याचे सुभाष लाड व विजय हटकर यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणुन देत या ऎतिहासिक ठेव्याचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले.

        कोट गावाच्या पूर्वेकडे असलेला कातळसड्याला ग्रामस्थ  माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातुन कोट कडे जाताना लागणा-या सड्यावर पाष्टे कुटुंबियांच्या एकत्रित जमीनी असुन यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात.या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबियांनी शेतघरे बांधली असुन पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे    काम इथे केले जाते.ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी शेतघरे बांधून भात झोडायला सुरवात केली आहे.त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृतीरुपी कातळशिल्पांचा अमूल्य खजिना  असून गावक-यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज  करुन घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काहि कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन वारा पाऊसाचे तडाखे खाल्याने झिज झाली आहे,तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी राजापूर तालुक्यातील  देविहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या लोकप्रिय कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गुढ भोमितिक रचना ,वाघाचे चित्र,पंजा  तसेच विविध पक्षी, प्राणी,मासे यांच्या प्रतिकृती असुन साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे.

          पुरातत्वीय दृष्ट्या खुप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समुह व त्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकतील, अशी कोट सह लांजा तालुक्यातील भडे,हर्चे,लावगण, जावडे  सारख्या  अनेक ठिकाणी कातळशिल्पे आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडुन वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटनदृष्ट्याही हे स्थळ विकसित केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल. असे मत यावेळी पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी व्यक्त केले. 

          राणी लक्ष्मीबाईचे सासर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऎतिहासिक कोट गावात राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमाला साजेसे राष्टीय पातळीचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या  रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अधयक्ष सुभाष लाड यांनी कोटमधील कातळशिल्पे पाहिल्यावर आनंद व्यक्त केला तसेच कातळशिल्पांच्या शोधमोहिमेमुळे कोट गावाच्या  ऎतिहासिक महत्वात वाढ झाली असुन कोट गावच्या पर्यटनविकासाठी या नवाश्मयुगातील अप्रतिम कातळशिल्पसमुहाची जपणूक  स्थानिक ग्रामपंचायतीने लोकसहभागातुन केली पाहिजे,असे मत सुभाष लाड यांनी व्यक्त केले.

          

या कातळशिल्प अभ्यासमोहिमेवेळी उपस्थित कोट गावचे सरपंच संजय पाष्टे, माजी सरपंच आबा सुर्वे यांनी या ठिकाणी असलेली शेतघरे व पिकझोडणीसाठी तयार केलेले खळे हटवून याची साफसफाई करुन कातळखोद अभ्यासकांना या कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी पाचारण करणार असल्याचे सांगितले. सदर जागा रवींद्र सुरेश पाष्टे व पाष्टेबंधूंची असून या शोध मोहिमेमध्ये कोट गावचे रहिवासी आबा सुर्वे, संजय पाष्टे,रवींद्र सुरेश पाष्टे ,अरविंद मांडवकर,  यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे श्री. सुभाष लाड यांनी नमूद केले.






https://kokanmedia.in/2021/11/30/petroglyphsinkot/




साद -प्रतिसाद 

भाग -२

प्रतिसादाला उस्फुर्त कृतीची जोड ---

उक्ती आणि कृती यातील फरक 

लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उस्फुर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आणण्याचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला.

23 फूट लांब व 10 फूट उंच गवा रेडा, 18 फूट उंच व 6 फूट रुंद पक्षी आपण कधी पाहिला आहे का? आम्ही पाहिला कोट गावात असलेल्या कातळशिल्पांच्या रुपात. आणि हे शक्य झाले ते निव्वळ प्रतिसादाला कृतीची जोड देत कोट गावातील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोट गावात जाणे झाले. हे गाव झाशीची राणी लक्ष्मी बाई यांच्या सासरकडचे मूळ गाव म्हणून सर्व ज्ञात आहे. या गावात कातळशिल्प सारखे काहीतरी आहे ही बाब गावचे ज्येष्ठ व्यक्ती शांताराम उर्फ आबा सुर्वे,अरविंद मांडवकर  यांनी निदर्शनास आणली. आणि मग सुरू झाली ती मोहीम. 

ठरल्या वेळेपेक्षा जरा अधिकच उशिरा या गावात पोहचलो. तरीदेखील गावाचे सरपंच श्री संजय पाष्टये आणि काही गावकरी वाट बघत थांबले होते. त्यांचे बरोबर गावच्या जवळच्या भल्या थोरल्या सड्यावरील कातळशिल्प परिसरात पोहचलो. हा परिसर शेतीचे दळे, मांगर, भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, लाकडाच्या मोळ्या अशा गोष्टीने व्यापलेला. मध्येच असलेल्या मोकळ्या  जागेवर शेतीच्या कामासाठी सारवण घालेलेले होते. या सर्वांमधून कातळशिल्प आपले अस्तिव दाखवत होती. खूप मोठ्या प्रमाणात आणि कित्येक वर्ष मानवी हस्तक्षेप या परिसरात होता. या सर्वांतून कातळशिल्प शोधून ती संरक्षित करणे म्हणजे खूपच मोठे आव्हान होते. पण गावाचे सरपंच आणि गावकऱ्यांनी आमच्या हाकेला प्रतिसाद दिला.

जिथे गवताची एक काडी देखील एकडची तिकडे करायची झाली तर रामायण महाभारत घडते तिथे गावकऱ्यांनी स्वत:हून परिसरातील गोष्टी बाजूला करण्याचे ठरविले ही बाब निश्चितच आनंदाची होती.


सर्वांच्या सोयीचा दिवस ठरवून कातळशिल्प साफसफाई मोहीम ठरली. मी, धनंजय मराठे, केदार लेले, मकरंद केसरकर, अजिंक्य प्रभुदेसाई, श्री विजय हटकर आणि योगायोग म्हणजे आमच्या कातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन या विषयावर शॉर्ट फिल्म करण्याची इच्छा असलेले सायली खेडेकर, राहुल नरवणे आणि त्यांची टीम देखील आम्हाला सामील झाली. ठरल्याप्रमाणे गावात पोहचलो. आम्ही पोचायच्या अगोदरच गावातील आबालवृद्ध, महिला यांची 50 /52 जणांची टीम ठिकाणी हजर होती. खरे तर आम्हाला हा धक्काच होता. 

काय काय करावे लागणार आहे याचा अंदाज होता. जागेवर पोहचल्यावर सर्व गावकऱ्यांशी एकत्र संवाद झाला. कामाची रूपरेषा, काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबाबत माहिती दिली. त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि मग आम्ही सर्वजण कामाला सुरवात केली. भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, भराभर बाजूला होऊ लागल्या, परिसरात पसरलेली माती आणि अन्य बाबी बघता बघता बाजूला झाल्या. एकावेळी 100 पेक्षा अधिक हात काम करत होते. दिलेल्या सूचनांचे पालन करत सर्व गावकरी खूपच सफाईने काम करत होते. त्यांचे काम खरोखरच थक्क करणारे होते. 

एक एक करत कातळशिल्प आपले अस्तित्व दाखून लागल्या. पहिल्या टप्यातील परिसराची साफसफाई आटपल्यावर मग सुरू झाली कातळशिल्पांची प्राथमिक टप्यातील साफसफाई आणि मग कातळशिल्प बोलू लागली. 

2.5 फूट लांबीपासून 7 फूट लांबीपर्यंतचे विविध प्रजातीतील मासे, 6 फूट लांबीची घोरपडी सदृश्य आकृती, विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय तसेच लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचनांचा समूह. 

या समूहातील वैशिष्टयपूर्ण रचना म्हणजे 3 फूट लांबी पासून 18 फूट लांबी पर्यंतच्या शिकारी पक्षांच्या रचना लक्षवेधक आहेत. पक्षाच्या डोक्यावरील आकर्षक तुरा, मजबूत पाय, 6 इंच लांबीच्या नख्या यावरून या पक्षाची भव्यता जाणवते. त्याच बरोबर तब्बल 23 फूट लांब व 10 फूट उंचीच्या गवा रेड्याची चित्ररचना एका नजरेत मावत नाही.  या गवा रेड्याची 2 फूट लांबीची वक्राकार शिंगे पाहिल्यानंतर नंतर त्याच्या ताकदीची कल्पना आपण करू शकतो. या सर्वांसोबत असलेली 12 फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद भौमितिक रचना आपले लक्ष वेधून घेते.

आमच्या कातळशिल्प संशोधनातील काही ठोकताळे, नवीन विचारधारा या दृष्टीने कोट गावातील कातळशिल्प  निश्चितच महत्वपूर्ण आहेत. 


गावकऱ्यांना काहीतरी आहे याची कल्पना होती. पांडव कालीन काहीतरी असावे असा त्यांचा याविषयी समज. सर्व चित्र रचना जेव्हा आम्ही त्यांना समजून सांगितल्या तेव्हा ही मंडळी चकित झाली. ' सर आपण सांगाल त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू, आमचे संपूर्ण सहकार्य आपल्याला असेल ' सर्व गावकऱ्यांनी एका सुरात सांगितले. 

खरे म्हणजे या परिसरात आणखीही चित्र रचना असाव्यात याची खात्री, त्याबद्दल गावकऱ्यांना अधिक सूचना दिल्या. परिसरात अधिक सर्वेक्षण करणे गरजेचे आहे टप्याटप्याने त्या गोष्टी पूर्ण होतीलच.

अनेकांकडून मिळणाऱ्या कोरड्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर कोट गावातील सरपंच श्री संजय पाष्ट्ये आणि गावकऱ्यांनी प्रतिसादाला कृतीची जोड देत दाखवलेला विश्वास लाख मोलाचा आहे.


त्याबरोबर एकंदरच कोंकणातील कातळशिल्प विषयावर नानाविध कामे, अधिक संशोधनात्मक काम यांची नितांत गरज आहे. त्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. शासन प्रशासन स्तरावरून अद्यापपर्यंत निराशाच आहे. अशा वेळी स्वतःहून पुढे येऊन आमच्या कामावर आधारित शॉर्ट फिल्म करण्यासाठी पुढे आलेली सायली खेडेकर, श्री राहूल नरवणे आणि त्यांच्या टीमचे मन:पूर्वक आभार.


कोट गावाचे सरपंच श्री संजय पाष्ट्ये आणि गावकरी यांचे अप्रतिम सहकार्य आणि आदरातिथ्य यासाठी आभार मानावेत तेवढे थोडेच. 


कोट गावातील कातळशिल्प परिसरातील भूभाग त्यावरील गावकऱ्यांचे शेतीभातीचे काम हे त्यांच्या मूलभूत जिविकेचे साधन. या सर्वांमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांच्याच मदतीने हे कसे जपता येईल, येथील मांगर आणि अन्य वास्तू यांचा वापर करून येथील कातळशिल्प रचनांचे कसे संरक्षण करता येईल, यातून गावातील गावकऱ्यांना उपजीविकेचे साधन कसे निर्माण करता येईल या विचारांनी आणि चर्चेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. 


वि.सू. येथे कोणाला जायचे असल्यास आम्हाला अथवा या गावाचे सरपंच यांना संपर्क करा.


सुधीर ( भाई) रिसबूड 

निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी









Wednesday, November 3, 2021

बेडकीहाळचा दसरोत्सव

 बेडकीहाळचा दसरोत्सव



   म्हैसुरचा दसरोत्सव माहित नाही असा माणुस भारतात सापडणार नाही ,पण याच कर्नाटक राज्यातील दुस-या क्रमांकाचा शाही दसरोत्सव बेडकीहाळ या एका ऎतिहासिक वारसा लाभलेल्या गावात साजरा होतो हे माहित असणारे मात्र फार कमी लोक कर्नाटकाबाहेर मिळतील.बेडकिहाळच्या याच वैशिष्ट्यपूर्ण शाही दस-याचा आढावा...


 बेडकीहाळ,

      कर्नाटकातील दुस-या क्रमांकाचा शाही दसरा जल्लोषात आयोजित करणारे दुधगंगा नदीच्या काठावर वसलेले निसर्गरम्य गाव! बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथे आश्विन महिन्यात दस-याच्या दुस-या दिवशी भरणारी  सिद्धेश्वर यात्रा प्रसिद्ध अाहे.या यात्रेच्या निमित्ताने  बेडकिहाळला संपन्न होणारा संस्थानिक वारसा लाभलेला ऎतिहासिक दसरोत्सव म्हैसुर पाठोपाठ कर्नाटकातील दुस-या क्रमांकाचा दसरा मानला जात असल्याने बेडकीहाळचा दसरामहोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक बेळगाव कोल्हापूर भागातुन येथे येत असतात.बेळगावातील चिकोडी ,निपाणी या ऎतिहासिक शहरांपासुन केवळ २०-२२ कि.मी.अंतरावर आणि कोल्हापुरपासुन ४५ कि.मी.अंतरावर बेडकीहाळ वसले आहे.हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमालगत भागात असल्याने येथे असलेल्या सिद्धेश्वराचा दसरोत्सव हा या भागातील एक महत्त्वाचा मेळा असून बेडकिहाळच्या सिद्धेश्वर यात्रेला हजारो भाविक येतात. बेडकिहाळ सिद्धेश्वर यात्रा अश्विन शुक्ल पक्ष एकादशी तिथीला किंवा कर्नाटकात पारंपारिक हिंदू चांद्र दिनदर्शिकेनुसार अश्विन महिन्यात चंद्राच्या वॅक्सिंग टप्प्यात अकराव्या दिवशी आयोजित केली जाते.या दसरोत्सवाच्या निमित्ताने गावात विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन केले जाते.विशेषकरून बेडकीहाळात भरवल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेत देशविदेशातील नामांकित पैलवान सहभागी होत असल्याने या उत्सवाला आता ग्लॅमर येऊ लागले आहे.इथल्या काळ्या कसदार मातीतील कुस्तीच्या स्पर्धेला कार्तिक काटे, बाला रफीक शैक, नितीन मदने, माऊली जमदाडे आणि अनेक भारतीय पैलवान सहभागी झाले आहेत. बेडकिहाळ कुस्तीच्या वैभवात भर घालण्यासाठी गेल्या वर्षी दोन रशियन पैलवानांनीही बेडकिहाल कुस्तीमध्ये भाग घेतला होता.तसेच सिध्देश्वर कुस्ती मैदानावर कबड्डी, मॅरेथॉन, व्हॉली बॉल, रांगोळी अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल दरवर्षी असते.यामुळेच इथला दसरोत्सव यात्रेकरुंसाठी आनंददायी पर्वणीच असते.

            

       


   घटस्थापना सुरु होताच संपूर्ण बेडकीहाळ गाव सुंदर दिव्यांनी सजवले जाते,गावातील सगळ्या रस्त्यांवर लावलेले पताक्यांची तोरणे इथे येणा-या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेतात.गावाचे रात्रीचे दृश्य सुंदर दिसते. दस-याच्या दुस-या दिवशी होणाऱा बेडकीहाळचा दस-याला ऎतिहासिक महत्व असुन कर्नाटकातील म्हैसूर च्या दस-यानंतर बेडकिहाळ च्या सिद्धेश्र्वराचा दसरा हा द्वितीय क्रमांकाचा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे.दसरोत्सवाच्या निमित्ताने या दिवशी सिद्धेश्र्वर महाराज की जय ..हर हरच्या जयघोषात, सनई चौघडा करंडोलच्या गजरात क्षेत्र बेडकीहाळ नगरीचे ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्र्वर पालखीत विराजमान होऊन मानकरी, सेवेकरी व हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत गाव फिरायला बाहेर पडतो. आहे.सोबत अंबारीने सजलेला गजराज लक्षवेधुन  घेतो.मंदिरातून पालखी बाहेर पडल्यावर जुना बस स्थानक चौकात येते.या ठिकाणी  भाविक आपल्या लहान चिमुकल्यांना हत्तीच्या सोंडेला  नमन करायला लावतात.श्री सिद्धेश्र्वराचा तो आशीर्वाद मानला जातो.पुढे  पालखी आंघोळीसाठी नदीवेस मार्गे दुधगंगा नदीकडे रवाना होते.यावेळी काळ्याभोर सकस मातीतून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली ऊसाची शेती मनमोहक दिसते.बेडकीहाळची जीवनदायिनी दुधगंगा नदीच्या काठावर ग्रामदैवतांसाठी दोन कट्टे उभारण्यात आले आहेत. कठ्ठ्यावर श्री सिद्धेश्र्वर आणि  श्री देव विठ्ठल बिरोबाचे आगमन होताच परंपराप्रमाणे दोन्ही ग्रामदेवतांना  भक्तीभावाने आंघोळ घातली जाते व  नैवद्य दाखवून श्रीच्या पालखींचे पूजन करण्यात येते.यावेळी पालखी मानक-यांकडुन सोनं लुटण्याचा सार्वजनिक कार्यक्रम संपन्न होतो.दुधगंगेच्या काठावरिल हा रंगतदार सोहळा आवर्जून पहावा असाच आहे. नदिच्या पलीकडे चाँदपीर नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध दर्गा आहे .आपल्या कोकणात देव बाहेर पडल्यावर घराघरात जाऊन दर्शन देतो मात्र कर्नाटकातील बेडकीहाळ गावात एक वेगळीच प्रथा दिसते.इथे प्रत्येक वाडिवस्तीत उभारलेल्या दगडी भक्कम  कट्ट्यावर यावेळी पालखी स्थानापन्न केली जाते.म्हणजेच श्री देव सिद्धेश्र्वर विराजमान होऊन भक्तगणांना आशीर्वाद देतो.यावेळी ठिकठिकाणचे कट्टे झेंडूच्या लाल -पिवळ्या फुलांनी भक्तिभावाने सजविले जातात.ते पाहून कर्नाटकातील श्रद्धेय जीवनशैलीची अनूभूती येते. नदीवरील कार्यक्रम आटोपल्यानंतर पालखी बेडकीहाळ - बोरगांव मार्गावरून मुख्य सर्कल येथील कट्टा,कुस्ती मैदान कट्टामार्गे डवरी कट्ट्याकडे रवाना होते.या दसरोत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे बेडकिहाळच्या कोरवी समाजाचा सिद्धेश्र्वर बॅन्ड बाजा ! हे पथक कर्नाटकात प्रसिद्ध असुन तालबद्धता, पारंपारिक बाज यामुळे ते ऎकणे श्रवणीय ठरते.


डवरी कट्ट्यावरील पूजन :-

         


 नाथपंथीय समाजाची गावात थोडीफार वस्ती असुन डवरि या नावाने ती ओळखली जाते.काही वर्षााापूर्वी इथे मोठ्या संख्येने रहात असलेला नाथपंथीय समाज व्यवसायानिमित्त इथून कोल्हापुर,इस्लामपूर आदि पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित
झाला. गावातील डवरी काॅलनीतील कट्ट्यावर सिद्धेश्वराची पालखी वाजत गाजत येऊन स्थानापन्न होते.यावेळी पालखीचा कट्टा गोंड्याच्या लाल पिवळ्या फुलांनी इतका सुंदर सजविला जातो की तो पाहुन क्षणभर देहभान हरपायला होते.दस-याला  पश्चिम महाराष्ट्रातील गोसावी समाज मोठ्या संख्येने  श्री देव सिद्धेश्र्वराच्या दर्शनाला येतो.बेडकीहाळ येथील बाळू डवरी यांच्या घरी काळंबादेवीचे स्थान असुन सिद्धेश्र्वराच्या दर्शनासोबत आई कळंबादेवीची भक्तभावाने पूजाअर्चा करतात.बाळू डवरी यांच्या प्रेमळ अगत्यशील स्वभावाचे या यात्रेनिमित्ताने अनुभव घेता आला.

        

   ईनामदारांच्या वाड्यात श्रींचे पूजन :--

                  यानंतर रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक रेणुका मंदिर मार्गे दसरा चौकातील विजयराव इनामदार सरकार यांच्या वाड्यात विराजमान होते.कोल्हापूर संस्थानाशी संबंधित असलेल्या या जगदाळे नामक सरदार घराण्याकडे आसपासची ३२ गावे इनाम देण्यात आली होती. जगदाळे सरदारांची ही गढी  गावात 'इनामदारांचा वाडा' म्हणून ओळखली जाते. गढीच्या उत्तर भागात बांधीव तलाव असून या तलावा कडून गढीत जाण्याचा मार्ग आहे. चौकोनी आकाराची ही गढी साधारण १.५ एकरवर पसरलेली असून गढीच्या चार टोकाला मोठे बुरुज आहेत. याच्या बुरुजात व तटबंदित संरक्षणाची कोणतीही सोय दिसून येत नाही. तटाची उंची साधारण १५ फुट असून बुरुजाची उंची २५ फूट आहे. गढीच्या मध्यभागी इनामदारांचा सुस्थितीतील चौसोपी वाडा आहे.वाड्याच्या बाजूला त्यांच्या वंशजांची घरे आहेत. रात्री दहा वाजता विजयराव इनामदार सरकार व बाळासाहेब इनामदार यांच्या परिवाराकडुन पूजा करण्यात येते.तर रात्री बारा वाजता शेजारच्या लहान वाड्यात इनामदार व    कुलकर्णींकडून पालखी पूजन व महाआरती केल्यानंतर पालखी मिरवणूक वाड्यातून बाहेर पडते.

     

दारूगोळा व रावणदहन कार्यक्रम :-

           पालखी इनामदारांच्या वाड्यातुन बाहेर पडल्यावर  गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौकोनी तलावापाशी सुरु होतो दारूगोळा व रावणदहनाचा कार्यक्रम ! खरंतर हा कार्यक्रम म्हणजे बेडकीहाळ दसरोत्सवचा लोकप्रिय उत्तरार्ध. सर्वसाधारण दिवाळीला फटाक्यांची आतिशबाजी  सगळीकडे केली जाते,इथे मात्र  सिद्धेश्र्वर  देवस्थान समितीच्या वतीने  दसरोत्सवानिमित्ताने तलावापाशी फटाक्यांच्या अतिषबाजीचा मोठा  जाहीर कार्यक्रम रंगतो.हा दारुगोळा उत्सव  याची देही याची डोळा पहायला अलोट गर्दी जमते.मुंगी शिरायलाही जागा नसते यावेळी.हिंदू धर्मग्रंथानुसार यादिवशी भगवान श्री रामानं रावणावर विजय मिळवून लंकेवर विजय मिळविला.प्रभू श्री रामाच्या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ' विजयादशमी ' असे संबोधतात.दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.याचे प्रतिक म्हणून दारूगोळा कार्यक्रम संपल्यानंतर रावणदहनाचा कार्यक्रम संपन्न होतो.यासाठी तलावाच्या एका काठावर भला मोठा रावणाचा पुतळा तर दुस-या काठावर  रामाचा पुतळा उभारून गावातील तंत्रज्ञ कुशल मंडळीच्या कल्पकतेमुळे साक्षात प्रभू रामचंद्रच रावणाला बाण मारून त्याचे दहन करत असल्याचा काहीवेळ भास होतो.या नयनरम्य कार्यक्रमाच्या सांगतेनंतर मात्र विविध ठिकाणांहून आलेला यात्रेकरू परत माघारी वळायला लागतो.या दरम्यान श्रींची पालखी मिरवणुक पंत मदिर परिसराला भेट देते बरोबर पहाटे ५ वाजता तुळजा कट्ट्यावर येऊन स्थानापन्न होते.यानंतर मात्र गावचावडीमार्गे श्रींची पालखी मंदिरात आल्यावर प्रदक्षिणा कार्यक्रम संपन्न होतो.यावेळी उपस्थित मानक-यांना श्रीफळ व साखर वाटली जाते.आणि अकरा दिवस उत्साहात चाललेल्या बेडकीहाळच्या शाही दसरोत्सवाची सांगता होते.

           

       गेल्या दोन दशकात बेडकीहाळ गावानेही शहरीकरणाचा वेग पकडल्याने छोटेखानी बाजारपेठ असलेल्या या गावात महाविद्यालय, मेडिकल काॅलेज, जलशुद्धीकरण प्रकल्प, व्यंकटेश साखर कारखाना इ.उभे राहिले असून दुधगंगा नदीचा म्हैसुर गव्हरमेंटने बांधलेला जुना दगडी वैशिष्टयपूर्ण पुल,श्रीसिद्धेश्र्वर अर्थात आजोबा च्या देवस्थानाजवळ असलेले मारुती व लक्ष्मीचे एकत्रित छोटेस्वरुपाचे मंदिर,पंत मंदिर, बिरोबा मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर,गणपती मंदिर, इनामदारांची गढी,तलाव, ऊसासोबतच तंबाखु ची शेती आदि ठिकाणे पाहण्यासारखी असून बेडकीहाळच्या दसरोत्सवात सहभागी होऊन सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेताना गावातील ऎतिहासिक ठिकाणांना भेट देत इथले लोकजीवन अनुभवल्यास मराठी संस्कृती, परंपरा जपत  असलेला, मराठी भाषेचे वर्चस्व असलेला हा मराठा मुलुख भाषावर प्रांतरचना करताना कर्नाटकात गेला असला तरी मनाने मात्र महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो.

     वि।ज।य।ह।ट।क।र

8806635017

बेडकीहाळ गावातील क्षणचित्रे -


श्री सिद्धेश्र्वर देवस्थानाचे आकर्षक प्रवेशद्वार.


बेडकीहाळ उत्सवात सहभागी ब्लाॅगर विजयधन यांचे डवरी कट्ट्याजवळचे छायाचित्र.


बेडकीहाळ दसरोत्सवाला उपस्थित भक्तसमुदाय.


डवरीकट्ट्याजवळील एका झाडावरील श्री गणेश.


बेडकीहाळ सर्कलवरील भव्य लक्षवेधी प्रवेशद्वार.



आजोबाची पालखी.


म्हैसुर संस्थानाने बांधलेला दुधगंगा नदीवरील भक्कम पुल.


नदिपुलावरिल म्हैसुर संस्थानचा राजचिन्ह असलेला स्तंभ


दुुुधगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र.



गावातील मुख्य शिक्षणकेंद्र.


दुधगंगा नदीच्या काठावरील श्रींचा कट्टा.


श्री सिद्धेश्र्वर कुस्ती मैदान.


गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला तलाव.इथेच दसरोत्सवाचा सांगता समारंभ अर्थात रावणदहनाचा कार्यक्रम संपन्न होतो.