Thursday, February 19, 2026

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट -

अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास.

▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳



 रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी धामणवणे या चिपळूण तालुक्यातील छोट्याशा खेडेगावामध्ये मराठी साहित्यातील एक  आगळं‌ वेगळं असं 'बांधावरचे साहित्य संमेलन' साजरे झाले. या अनोख्या साहित्य संमेलनात दुपार सत्रात होणाऱ्या काव्य संमेलनात निमंत्रित कवि म्हणून निमंत्रित केल्याने सकाळी वाटूळचे कवि मित्र विराज चव्हाण व रत्नागिरी च्या सामाजिक कार्यकर्त्या- लेखिका श्रद्धा कळंबटे यांच्यासह साधारण ११:०० च्या दरम्यान धामणवणे गावातील साद मयुराची कृषी पर्यटन केंद्र  या संमेलन स्थळी आम्ही पोहचलो.

              पारंपारिक संमेलनांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्य सहवास अनुभवण्यासाठी साधारण  २०० आस्थावान साहित्य रसिक या ठिकाणी उपस्थित होते. खरंतर एक . वेगळं वैशिष्ट्यपूर्ण संमेलन म्हणून माध्यमात आयोजकांनी या संमेलनाची जाहिरात केल्याने या साहित्य संमेलनाची उत्सुकता मनात अगोदरपासूनच होती. त्यात संमेलनाचे संयोजक संतोष गोनबरे यांनी माती,नाती आणि माणूस या विषयावर कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केल्याने माझ्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले होते. आम्ही कामथे  - टेरव मार्गे  ८ कि. मी. अंतरावर डोंगर माथ्यावरील धामणवणे गावात पोहचताना डोंगर माथ्यावरून पायथ्याशी वसलेल्या चिपळूण खेर्डीतील नागरीकरण गाडीतून पहात असताना  बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराने लक्ष वेधून घेतले. या कमानीवर निमंत्रित कवी म्हणून माझा फोटो झळकत होता. हे पाहून खरं तर मी मनातुन सुखावलो पण त्यामुळे थोड़े दडपणही आले. 




संमेलन स्थळी काजुच्या बागेत अनोखे असे बांधावर च्या संमेलनात निसर्गातील वस्तूंचा वापर करून दगड, पाने फुले यांनी नैसर्गिक सजावट करून एक वातावरण तयार करण्यात आयोजक यशस्वी झाले होते. हे लगेच लक्षात आले. प्रवेशव्दारापाशी संमेलनाच्या आयोजन समितीतील शिलेदारांचा बॅनर झळकत होता. तसेच बांधावरच्या संमेलनाच्या लोगोची आकर्षक सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती.काजूच्या झाडांच्या वनामध्ये बांधलेला दगड मातीचा बांधारा (व्यासपीठ), शेणामातीने सारवलेला परिसर... विविध ठिकाणी पाने, निसर्गातील वस्तूंवर कविता रेखाटून जागोजागी झाडांवर टांगलेल्या कविता...झाडाच्या फांदीला लाकडी पट्टी लाऊन आणि माईक बांधून छान बनविलेला लक्षवेधी पोडिअम...व जमलेले सर्व साहित्य रसिक शांत रमणीय वातावरण साहित्याचा आस्वाद घेत होते. हे सारचित्र एक मराठी माणूस म्हणून मनाला सुखावणारेच होते.




संमेलनाच्या सुरवातीला शेतामध्ये वारूळ पूज करण्यात आले. संत तुकारामांच्या स्पर्शाने पावन झालेला दगडी दिवा याचे दीपप्रज्वलन, देवाचे केलेलं स्थानिक बोलीतील गाऱ्हाणे (प्रार्थना)...तिथल्या बोलीभाषेत लिहिलेलं संमेलन स्वागत गीत... स्थानिक वाद्य संबळ याचे वादन यामुळे उदघाटन सत्र भलतेच  रंगले. उपस्थित  मान्यवरांचा घोगडी, मोरपीस, सन्मानचिन्ह देऊन केलेला स्वागत सन्मान मनाला भावणारा होता.




   या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून चिपळूणचे प्रसिद्ध लेखक प्राध्या. सुहास बारटक्के यांची निवड करण्यात आली होती. संघाच्या दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वाटूळ येथे बारटक्के सरांना आम्ही अक्षररत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तेव्हापासून बारटक्के सरांशी स्नेहबंध जुळला होता. या निमित्ताने प्राध्या.बारटक्के सरांना ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली.आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत  बांधावर आयोजित केलेले हे संमेलन अनोखे असून अनुकरणीय असून जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत. 'या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा,' असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक सुहास बारटक्के यांनी केले.श्री. बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे ते म्हणाले. बारटक्के सरांचे हे विचार मनोमन पटले.


    डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या शुभ हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.आपल्या उद् घाटनीय भाषणात, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन करून नव्या रूपात त्याची बांधणी व्हायला हवी, कारण आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत व्यक्त करतानाच पटवर्धन यांनी चिपळूण एक सांस्कृतिक झाडीवरचे स्पंदन बनले आहे. इथल्या माणसाला साहित्य, कला, नाटक, संगीत या विषयाची नुसता रस नाही तर खोल आस्था आहे. ही आस्था त्यांच्या जगण्यामध्ये मिसळली आहे. असा हा सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये कुठून आला असेल हा प्रश्न पडतो तेव्हा लक्षात येते की वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून, व महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून हा डीएनए येतो. आपल्या चिपळूणकरांना सांस्कृतिक वारशाचे एक अदृश्य वरदान मिळाले आहे ते टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया असे आवाहन डॉ. पटवर्धन यांनी केले.

    संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात डोंबिवली चे प्रसिद्ध कवी विजय जोशी सर यांची कविता तंत्र आणि मंत्र या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजय जोशी यांनी काव्य निर्मितीवर सुंदर मार्गदर्शन केले. ज्या कवितेमधे काव्यगुण, आशय गुण नादलय गुण आहे अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कवीता लिहिल्या बरोबर फेसबक व्हॉटस् अप वर शेअर करण्याची घाई करतात हे चुकीचे आहे.जसे लोणचे मुरल्या नंतर चविष्ठ होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने  झालेली कविता छान होते मग ती पोस्ट करा.कविता व्याकरण दृष्टया, आशय दृष्ट्या योग्य आहे का तपासा. यासाठी मो. रा. वाळांबे यांचे 

सुलभ मराठी व्याकरण हे पुस्तक वापरावे.कविता जखमेलन, वेदनूतून निर्माण होते. विजो यांनी कविता निर्मिती वेळी मात्रांचे महत्व समजावून सांगितले. यानंतर झालेल्या भोजन सत्रात बांधावरच्या खाद्य संस्कृतीची झलक होती.  झुणका भाकर (ज्वारी/बाजरी / तांदूळ/ नाचणी यांची भाकरी), खारातील मिरची, तांदुळाची खीर, वरण-भात... तर नास्त्याला केळीच्या पानात घावने-चटणी(शाकाहारी)... असा तिथला ग्रामीण बेत होता. बांधावरचा या भोजनाचा सर्वांनीच आस्वाद घेतला.




       दुपारी भोजनानंतर काही स्थानिक साहित्यिकांनी तिथल्या बोलीभाषेत सादर केलेल्या कविता, गाणी, गीते यांचा आस्वाद घेता आला.त्यानंतर ज्येष्ठ लेखक, कथाकार, प्रकाशक, व्याख्याते श्री.सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली 'कथाकथन' हे सत्र संपन्न झाले. यानंतर सायंकाळी ज्येष्ठ कवी श्री.अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निमंत्रित कवींचे 'कविसंमेलनाची घोषणा होताच इतर निमंत्रित करून सोबत मी देखील टेबल खूर्ची यांना फाटा देऊन तयार केलेल्या मंचावर जाऊन बसलो.बांधावरच्या या मंचावर गाद्या टाकलेल्या होत्या. मध्यभागी सुप्रसिद्ध कवि अरुण म्हात्रे बसले होते. या सत्राचे सुरेख सूत्रसंचालन दापोली येथील गझलकार श्री.कैलास गांधी यांनी केले. मला वाटले की सर्वजण माती नाती अन माणूस या विषयावरच कविता सादर करतील पण काहींनी आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कविता सादर केल्या. मी मात्र माती, नाती अन माणूस या विषयावर मला सुचलेली स्फुरलेली कविता सादर केली. अनेकांनी कवितेचे कौतुकही केले.र समोर काजूच्या झाडांच्या सावलीत बसलेले रसिक प्रत्येक कवितेला दाद देत होते.म्हात्रे आणि गांधी यांची काव्य 'नोकझोक' यामुळे काव्यसंमेलनाची रंगत अधिक वाढली.माझ्यासह मुझफ्फर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेघा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी सर्वांच्याच ग्रामीण, शहरी व प्रेम कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.​



      संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासून कौतुक केले. यावेळी डॉ. चोरगे म्हणाले, 'बांधावरचे साहित्य संमेलन ही संकल्पनाच अत्यंत उत्कृष्ट आहे. शेतकऱ्याच्या शेतावर जायचे, तिथल्या वातावरणात साहित्यिकांनी रमायचं, तिथली पीकं पाहायची, तिथल्या मातीचा सुगंध अनुभवून ती कपाळाला लावून भूमातेचा आशीर्वाद घ्यायचा, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ वाणी यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या संबंधित साहित्यावर भाष्य करायचे. शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यावर चर्चा करायची. शेतकरी कसा राहातो? काम कसे करतो? बोलतो कसा? ते अनुभवायचे. शेतकऱ्याच्या बांधावरून शेती पाहताना पीकं डोलताना, पाहताना, बांधावरून एखादी नदी अगर नाला जवळून पाहताना स्वर्ग सुख अनुभवल्याचा भास होतो. हे शेतावर गेल्यावरच कळते.' असे चोरगे यांनी सांगितले. सुभाष लाड म्हणाले, 'धामणवणे गावातील 'साद मयुराची' या शिवारात आयोजित केलेले बांधावरचे साहित्य संमेलन हे अभिनव आहेच पण ते आवश्यकही आहे. या बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. माझे अर्ध आयुष्य बांधावरच गेलं आहे त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याची संधी मला इथे मिळाली.'



         '​संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या 'शाकाहारी मोंगा-पोपटीचा' आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाचे संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः प्राची जोशी, धीरज वाटेकर, सोनाली खर्चे, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे, संध्या आठल्ये, विनायक ओक, स्नेहिल जोशी, स्नेहल कुलकर्णी, संध्या साठे, अभिजीत देशमाने, आदी समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना बारटक्के कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे हे संमेलन सुंदर सुनियोजित सुफल संपन्न झाले.केले.संपूर्ण दिवसभर एक कार्यकर्ता सर्व उपस्थितांना बसल्याजागी थंडगार पाणी देण्याचे काम न थकता करीत होता, याचे विशेष कौतुक करावेसे वाटते. संमेलनाचे नाव छापलेल्या तागाच्या मजबूत पिशव्या उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आल्या.त्यामुळे अगदी घरगुती ग्रामीण, कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने दिवसभर संपन्न झालेला हा साहित्य सोहळा म माझ्यासह उपस्थितांच्या मनात भरून राहिला.



🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


विजय अरविंद हटकर.

लांजा - रत्नागिरी.

चलभाष क्रमांक - 8806635917

( लेखक कोकणातील साहित्य,ग्रंथालय, शिक्षण, पत्रकारीता, पर्यावरण क्षेत्रात गत दोन दशके कार्यरत आहेत.)




















पं. अजित कडकडेंची भेट

 पं. अजित कडकडेंची भेट.


शास्त्रीय आणि सुगम संगीताचे सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांचा रिंगणे, ता. लांजा येथील श्री देव गांगो मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त शास्त्रीय आणि सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमचे सन्मित्र अजय आयरे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. आपल्या लांज्याच्या भूमीत एवढ्या मोठ्या कलावंताचे पाय लागलेत हे कळताच सावर्डे जवळील मांडकी पालवण मधील ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन आटपून थेट रिंगणे गाव गाठले. सोबत आदरणीय सुभाष लाड सर, सौ. पौर्णिमा व कन्या विधी ही होती. पंडित अजितजी कडकडे सरांसोबतचा हा संस्मरणीय क्षण कॅमेर्‍यात टिपून घेतला. कडकडे सरांच्या सहवासातील या अर्ध्या तासात स्वयंशिस्त, स्वावलंबीपणा, प्रेम म्हणजे ईश्वर, आनंद म्हणजेच ईश्वर हे भक्तिचे अनुकरण्यास साधेसोपे तत्वज्ञान आणि साधना म्हणजे प्रचंड मेहनत व सातत्यपूर्वक सराव आदी जीवनाला दिशा देणाऱ्या काही मूलभूत गोष्टी शिकता आल्या.

Saturday, February 14, 2026

 ग्रामीण साहित्यातले कोकण.



  

    ​ज्या प्रभू परशुरामांनी कोकणभूमीची निर्मिती केली त्या प्रभू परशुरामांचा अधिवास असलेल्या महेंद्रगिरी पर्वताच्या सानिध्यात, जीवनदायिनी वाशिष्टीमाईच्या परिसरात,कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत आणि कोकणभूमीला राष्ट्रदेवीचे नंदनवन म्हणून गौरविणाऱ्या कवी माधवाच्या कर्मभूमी चिपळूण मधील मांडकी, पालवण येथे नुकतेच कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेने राज्यातील पहिले ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन आयोजित केले. या निमित्ताने ग्रामीण साहित्यातील कोकण या परिसंवादा निमित्ताने...


        ​उत्तुंग अशा सह्याद्री या जिवलग सख्याची सोबत घेऊन उभा असलेला अखंड कोकण दुसरीकडे अथांग सिंधू सागराला मिळाला आहे. निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या देवभूमीने साऱ्यांनाच भुरळ घातली. कोकण म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं सुंदर स्वप्नच! माडांच्या राया, आंबे सुपारी केळीच्या बागा, फणस काजू कोकमाची झाडे, डोंगर उतारावरील भातशेती, कौलारू घरे, शेणाने सारवलेले अंगण, इथल्या पर्वत रांगांमधून वाहणारे धबधबे, सह्याद्रीचे अदभूत कडे, इथल्या गावागावातील अप्रतिम देवालये, दशावतार, भजन, कीर्तन, खेळे, नमन, अगम्य गूढ परंपरा अशा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणच्या सुंदर भूमीने अनेक लेखकांना व कवींना लिहितं केलं, याचे श्रेय जसे लेखक आणि कवी यांच्या प्रतिभेला आहे तसे ते कोकणच्या सौंदर्याला देखील द्यावे लागेल.​कोकणातील विविध व्यक्तिमत्त्वांवर, गावांवर, चालीरितींवर कथा, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. कोकणची खोडसाळ व इरसाल माणसं मात्र फणसासारखी गोड स्वभावाची माणसं ग्रामीण साहित्यातून अजरामर झाली.


   गेल्या ५० वर्षांत साहित्यात प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. शिक्षणाच्या प्रचाराने ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या हाती लेखणी आली. आत्मभान जागृत झालेल्या नव्या अंकुराने मग मनात निर्माण झालेले प्रश्न, अस्वस्थता, कल्पनांचे प्रकटीकरण पुस्तकांच्या माध्यमातून केले. यातून महाराष्ट्रात नवसाहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य असे विविधांगी प्रवाह निर्माण झाले.​कोकणातील ग्रामीण साहित्याचा विचार करता इथले साहित्य फक्त शब्दांचा खेळ नसून इथल्या कष्टकरी समाजाचे सह्यगिरीशी, निसर्गाशी, समुद्राशी एकारलेले एक अद्वैत आहे. कोकणातील ग्रामीण साहित्यात निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही तर पात्र म्हणून सुख-दुखात सोबती म्हणून येतो. इथल्या मालवणी, संगमेश्वरी, चितपावनी आणि कोळी बोलीतील सौंदर्य हे ग्रामीण साहित्याचे सर्वांत मोठे बलस्थान ठरले आहे.

    कोकणात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. त्यातीलच एक म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळ. इथल्या साहित्य चळवळीचा इतिहास महत्त्वपूर्ण असून त्याला नानाविध साहित्य प्रकारांची व थोर साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. नमन, जाखडी, ओव्या, भारुडे, लोकगीते, लोककथा, दशावतार यातून इथले मौखिक साहित्य तेव्हा प्रचलित होते व आजही जपले जात आहे. लिखित साहित्याचा विचार करताना अनेक थोर साहित्यिक डोळ्यासमोर उभे राहतात. कोकण भूमीने मराठी साहित्याला अनेक दिग्गज साहित्यिक दिले आहेत. ​यातील पहिले नाव म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले अर्थात 'केशवसुत' होय. त्यांनी आपल्या कवितेतून मानवतावादी, पुरोगामी, वैश्विक विचार मांडल्याने त्यांचा कमी-अधिक प्रभाव आजही आपल्याला जाणवतो.


साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर म्हणजे कोकणचा अभिमान. सिंधुदुर्गातील आरवली, शिरोडा इथल्या कर्मभूमीतून त्यांनी १६ कादंबऱ्या लिहिल्या. 'ययाती'कारांनी, आपल्या साहित्यातून आर्थिक विपन्नता, ध्येयवादी व्यक्तींचे वैफल्य, दलितांवर होणारे अन्याय, दांभिकता, दाखवून साहित्यात सामा-आशय आणला.कोकणचे प्रादेशिक समृद्ध जीवन, इथली ग्रामसंस्कृती, समुद्रकिनारा अन निसर्ग खऱ्या अर्थाने मांडला तो श्री. ना. पेंडसे यांनी. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'गारंबीची राधा', 'रथचक्र', 'तुंबाडचे खोत' यात कोकणातील मानवी जीवनाचे मर्म दिसते.


​ कोकण कवि माधव काटकर गुहागरने, त्यांच्या निसर्ग कवितेने समृद्ध कोकणची अनुभूती येते. कोकणचे गीत म्हणून नावारूपाला आलेली -

    ​सह्याद्रीच्या तळी शोभते, हिरवे गर कोकण

    राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन ॥

    - ​अशी हिरवीगार कविता लिहून कोकणचे स्वर्गीय सौंदर्य मांडून ते अजरामर केले. खरे तर 'सरखेल सबळ आंग्रे' या दीर्घकाव्यासाठी माधवांनी ४१ कडव्यांचे मंगलाचरण लिहिले होते, मात्र त्यातील अर्थ-सौष्ठवपूर्ण वेधक शब्दयोजनेने 'समृद्ध कोकण' सशक्त मांडले गेले.

विनोदी लेखन शैलीने अजरामर झालेल्या पु. ल. देशपांडे यांनी रत्नागिरीतील 'अंतु बर्वा' मोकळ्या मनाचा, फटकळ तोंडाचा व तितकाच प्रेमळ अंतु बर्वा मांडताना कोकणातील ग्रामीण भागातील माणसाचे चित्र रेखाटताना इथली सभ्यता, संस्कृती व आर्थिक विपन्नता ही दाखविली. अंतु बर्वाच्या रूपाने कोकणी माणूस प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिला.

 मराठी साहित्यातील कलंदर गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनिदांच्या 'पडघवली', 'शितू' या कादंबरीत १९५० च्या दशकातील निसर्गाने मुक्त हस्ताने वैभव उधळलेल्या क कोकणातील एका गावाच्या उदयाचे ते ऱ्हासाचे चित्रण आपल्याला दिसते. आजचा पिढीने कधीही न पाहिलेल्या कोकणचे चित्रण यात पाहायला मिळते. 'पडघवली'ची नायिका 'अंबा वहिनी'  व कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील समृद्ध गाव आजही 'पडघवली' वाचणाऱ्यांच्या मनात आहे. कोकणातील निसर्ग व माणूस यांमधील एकरूपता उलगडून दाखविणाऱ्‍या या कादंबरीत कोकणचे ग्रामीण जीवनाचे सशक्त चित्रण केले आहे.


    अस्सल मराठी मातीतील शेतकरी कादंबरीकार र. वा. अर्थात रघुनाथ वामन दिघे यांच्या कादंबरीत आपल्याला ग्रामीण कोकणाचे दर्शन होते. त्यांनी शेतकऱ्यांचे जीवन त्यांच्या व्यथा, वेदना प्रभावीपणे मांडल्या. 'पाणकळा', 'पड रे पाण्या', 'हिरवा सण', 'सराई', 'आई आहे शेतात', या कादंबऱ्यांतून दिघेंनी कोकणातील समस्या मांडताना रसिकांना विचारशक्तीही दिली. लोकसंस्कृती, लोकजीवन, गाणी, चालीरीती, दैवते, बोलीभाषा यांच्या कादंबरीतून ग्रामीण जीवनाचे प्रत्ययपूर्ण चित्रण आले आहे.

 चिपळूणचे लेखक, राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व देणारे हमीद दलवाई यांच्या 'लाट' कथासंग्रहात कोकण खाडीवरील राहणाऱ्या मुस्लिम समाजाचे, त्यांच्या जनजीवनाचे चित्रण पाहायला मिळते. मुस्लिम समाजाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली त्यांची 'इंधन' ही कादंबरी बहुजनाभिमुख व वास्तववादी आहे. बहुसांस्कृतिकवादाची, एकतेची त्यांची भूमिका आजही दिशादर्शक आहे.


​ राजापूरचे लेखक माधव कोंडविलकर यांच्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' मधून कोकणातील उपेक्षित ग्रामीण जनजीवनाचा परिचय महाराष्ट्राला झाला.प्रख्यात लेखक रविंद्र पिंगे यांनी लिहिलेल्या २०० लेख व ३०० व्यक्तिचित्रातूनही आपल्याला कोकणचे प्रतिबिंब पाहायला मिळते. मराठी रंगभूमीला परदेशात जाऊन आपण प्रयोग करू शकतो हा विश्वास देणाऱ्या गंगाराम गवाणकर यांच्या 'वस्त्रहरण' या नाटकाने कोकणातील मालवणी बोलीला सातासमुद्रापार पोहोचविले. 'वस्त्रहरण' हा देशी फार्स कोकणातील ग्रामीण जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. यानंतर मालवणी नाटकांची लाट रंगभूमीवर आली. 'चाकरमानी', 'केला तुका झाला माका', 'येवा कोकण आपलोच असा', 'पांडगो इलो रे बा' या ग्रामीण कोकणचे सांस्कृतिक वैभव घडविणाऱ्या नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल्ल झाले.


​ मराठी रंगभूमीवरचे शेक्सपिअर समजल्या जाणाऱ्या लांज्याचे सूपूत्र नाटककार ला. कृ. आयरे यांच्याही समाजप्रबोधन करणाऱ्या नाटकात ग्रामीण जीवनाचे चित्रण आढळते. कोकणातील भाऊबंदकी दाखविणारे 'फिर्याद', 'कसोटी', 'मायेचा संसार', 'अमरत्याग', 'शेतकरी दादा', 'कुलकलंक', 'ईर्षा' या  त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर चैतन्य आणले.कोकणच्या गावखेड्यांचे, तिथल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे  उपेक्षित जीवन यात प्रामुख्याने दिसते.


         ठेव जिला घरची आठव रे

      पाच रुपये तरी रुपये पाठव रे ॥


    - ​अशी कविता लिहून चाकरमानी व त्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहणारे गावकरी यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारे मालवणी कवी वि. कृ. नेरुरकर यांच्या साहित्यात कोकणातील अज्ञाताच्या भीतीचे चित्रण आहे.आरती प्रभू अर्थात खानोलकरांनी कोकणातील अगम्य गूढता व दंतकथा यांचा सुरेख उपयोग आपल्या कथा कादंबरीतून केला. 'कोंडुरा' ही त्यांची कादंबरी यावरच बेतलेली असून या कादंबरीने कोकणातील कोंडुरा या समुद्र किनाऱ्यावरील गावाने मराठीजनाना मोहिनी घातली. लांज्यातील लेखक ॲड. विलास कुवळेकर यांच्या ' भवताल ' काव्यसंग्रहात आपल्याला 'हिरवे कोकण' या शीर्षकाची दीर्घ कविता वाचायला मिळते.कवी माधवांच्या हिरव्या तळकोकणात  ९० च्या दशकात झालेले बदल कुवेळकरानी ४४  कडव्यांच्या  कवितेतून केले आहेत. त्यामध्ये कोकणातील लाल पायवाटा, लोककला, आरापट्या सारखे पारंपारिक खेळ, निसर्ग, शेती, सण, उत्सवाचे सध्या काय झाले आहे याचे मनोज्ञ चित्रण  आहे. वस्तुस्थितीशी सुसंगत असा शेवट यामध्ये कवी कुवळेकरांनी केला आहे.

 त्यातील एका कडव्यात,

     आंबा पिकतो, रसही गळतो

      पल्प परंतु दलाल खातो ।

      गीतातील कोकणचा राजा

      झिम्मा नशीबा सवे खेळतो॥

    या पंक्तीतून  कोकणचा राजा हापूस आंब्याची श्रीमंती दलाल उपभोगत आहेत तर आंबे व्यवसायिक शेतकर्‍याला मात्र त्यातून  लाभाऐवजी नुकसान सहन करावे लागते हे अधोरेखित केले आहे. त्यांच्या 'हरवलेले बालपण ' या १०४ कडव्यांच्या दीर्घ कवितेत कोकणात वर्षभरात ऋतुचक्रामुळे होणाऱ्या  बदलांचे  चित्रण पहायला मिळते.बाळकृष्ण प्रभूदेसाई यांच्या 'गंधर्व', जहाज या दोन्ही कथासंग्रहात ग्रामीण कोकण, व्यक्ती व प्रवृत्तींचे मार्मिक वर्णन पहायला मिळते. हे साहित्य वाचायला हवे.




​ जवळपास १२०० कथा व ५० कादंबऱ्या लिहिणारे शब्दप्रभू श्रीपाद काळे, आद्य मालवणी कवी विठ्ठल नेरुरकर, कवी वसंत रामकृष्ण वैद्य, अस्तित्ववादी कवी गुरुनाथ धुरी यांच्या साहित्यात कोकणातील ग्रामीण जनजीवनाचे मार्मिक वर्णन पाहायला मिळते.कोकण मराठी साहित्य परिषदेची मुहूर्तमेढ रोवून कोकणातील साहित्य संमेलनाचे आयोजन करून अनेक नवे लेखक कवी घडविणाऱ्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांनी  कथा, कादंबरी, ललितगद्य या वाड्मय प्रकारात विपुल साहित्यनिर्मिती केली. यातून कोकणच्या समृद्ध आपलेपणासह वैविध्यतेचा मधुघट रसिकांसमोर रिता केला. कातळ, कोकणी वस्ती, पारधी, तोरण, भुईचाफा, कॅलिफोर्नियात कोकण, गावाकडच्या गजाली, गावरान, मुलूख, सोबत, मातीचा वास यांसारखी एकापेक्षा एक सरस साहित्य कलाकृती निर्माण करून कोकणची सृजनात्मक ऊर्जा रसिकांना प्रदान केली आहे.


​ 'शेलूक', 'मैत्र', 'वेडा आंबा' या कथासंग्रहातून कोकणातील माणसे, समुद्र, लोकजीवन, मालवणी बोली व मानवी जीवनाचा अनुबंध मांडणारे मालवण कोळंबमधील आबाजी नारायण पेडणेकर, तसेच

    ​उगवाईचा कळस दाटला, ढग झाले रंगाने

   सह्याद्रीला कुणी फासले भस्म नवे शैवाजी

   सारणीच्या पाण्यात रंगली जलस्वप्नांची राणी

  ही सृष्टीची हिरवी बोकण भरली कटीखांद्यांनी

- म्हणताना, कोकणचे सृष्टीसौंदर्य अलगद टिपणारे महाराष्ट्र कवी भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. वसंत सावंत यांच्या साहित्यात प्रत्येक वेळी कोकणातील ग्रामीण जीवनाची व निसर्गाची नव्याने भेट होते.


​मातृह्ददयी साने गुरुजी यांच्या हृदयस्पर्शी लेखनाला कोकणच्या मातीनेच सामर्थ्य दिले. माडखोलकर, जयवंत दळवी, बा. भ. बोरकर, शंकर सखाराम, मनोहर कदम, मालवणी एकांकिका लिहिणारे डॉ. विद्याधर करंदीकर, कोकणातील स्त्रियांच्या भावनिक व्यथांचे चित्रण 'कळ्यांचे नि:श्वास' मध्ये करणाऱ्या विभावरी शिरुरकर, नाटककार मामा वरेकर, प्र. ल. मयेकर, वामन तावडे, दशरथ राणे, रमेश पवार,अशोक बागवे, विजय कुवळेकर, प्रसाद कुलकर्णी, अजय कांडर या सर्वच दिग्गज जुन्या नव्या लेखकांच्या साहित्यात कोकणातील समृद्ध ग्रामीण जीवनाचे विविध सप्तरंगी कोलाज पाहायला मिळतात.


​कोकणातील ग्रामीण जीवनाचं हेच सौंदर्य, बाज, त्याचा वारसा जपण्याचे काम २१ व्या शतकातही काही नव्या दमाचे लेखक-कवी आस्थेने करीत आहेत. यामध्ये बाबू घाडीगावकर, श्रीकृष्ण जोशी, कोकणात सलग अकरा ग्रामीण साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करणारे सुभाष लाड, सोनारकर, दीपक नागवेकर, ' द गेम ऑफ डेस्टिनी' या नाटकातून कोकणातील धनगरवाड्यावरची रंजक प्रेमकथा व संघर्ष मांडणारे अमोल रेडीज, वैभव साटम, मालवणी कवी दादा मडकईकर, मधुसूदन नानिवडेकर, विजय जोशी, गजाभाऊ वाघधरे, अरुण इंगवले, सुनील कदम, प्रिया मांडवकर, मुग्धा व संजय कुळये दांम्पत्य आदींचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. ​या सर्वच लेखकांनी - कवींनी  ग्रामीण कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर डिजिटल युगात कोकणचा ग्रामीण बाज दाखविणाऱ्या अनेक मालिका वाहिन्यांवर आल्या. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. यामध्ये 'रात्रीस खेळ चाले', 'गाव गाता गजाली', 'मालवणी डेज', 'कोकण डायरीज' यांचा उल्लेख करावा लागेल. या गाजलेल्या मालिका असोत किंवा प्रसाद गावडे,स्वानंदी सरदेसाई यांसारखी नवी पिढी कोकणची ग्रामीण शाश्वत संस्कृती दाखविणारे जे रील्स, व्लॉग बनविते त्यातील मुख्य आशय ग्रामीण कोकणचा आहे. म्हणून या डिजीटल लेखकांचाही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल.


​💠ग्रामीण साहित्यातील अपेक्षा व वास्तव


​समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानक घडत असते. लेखकाने ती टिपून लेखकीय साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःसह समाजालाही दिशा द्यायची असते.इथल्या अस्सल तांबड्या मातीत रंगलेल्या कथा, नाटके आगामी काळात ग्रामीण कोकणच्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या साहित्यिकांनी लिहायला हव्यात.ग्रामीण साहित्यातील कोकणच्या प्रतिबिंबांमुळे कोकणी माणूस पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीशी, इथल्या बोलीभाषेशी, इथल्या संस्कृतीशी जोडला जाईल.आज राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य नाही. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या साहित्याची बेटे असलेल्या शहरांमध्येच या चळवळी पाहायला मिळतात. राज्य मराठी विकास संस्था, मराठी अभ्यास परिषद, मसाप सारख्या संस्थानी गावखेड्यात पोहोचायला हवे. तसेच ग्रामीण क्षेत्राती काम करण्यास साहित्य संस्थांशी समन्वय साधायला हवा. शासनाचे अनुदान योग्य आणि खऱ्या अर्थाने संवर्धन करणाऱ्या संस्थांना मिळायला हवे याचा शोध शासनाने घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागात विधायक काम करणाऱ्या ग्रामीण संस्थांच्या व्यासपीठावरून उद्याचे दर्जेदार ग्रामीण कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक निर्माण होतील.


    पद्मश्री ​मधुभाईंची 'कर्णिका'ची जैतापूरची बत्ती मध्ये इथला समृद्ध समुद्र निसर्ग, मासेमारी दिसते. पण हे पुस्तक अणुऊर्जा प्रकल्प कसा योग्य आहे याचे समर्थन करते.यातून एका अर्थाने सरकारची भूमिका मधुभाईंनी मांडली. पण अणुऊर्जेमुळे होणारे दुष्परिणाम यात दिसत नाहीत. तर अभिजित हेगशेट्ये यांच्या ' रानवीचा माळ ' यात एन्रॉनमुळे झालेल्या वाताहतीचे, पर्यावरण नाशाचे चित्रण आहे. मात्र एन्रॉन मुळे श्रृंगारतळी गुहागर चा झालेला विकास, पर्यटन वृद्धी, थांबलेले स्थलांतर याविषयी यात माहिती मिळत नाही जरी दोन्ही लेखकांच्या, व साहित्याच्या दृष्टीने ही दोन्ही पुस्तके योग्य वाटत असलली तरी देखील ही दोन्ही पुस्तके एका बाजुचे वर्णन करत असल्यामुळे त्या कलाकृती एकांगी वाटतात.यात कोकणचे सम्यक दर्शन होत नाही. त्या समन्वय मांडणाऱ्या असत्या तर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरल्या असत्या.


​इथल्या ग्रामीण साहित्यात कोकण दिसावे यासाठी ग्रामीण कृषी संमेलने हवीत. या मंचावरून ग्रामीण भागातील नव्या पिढीला, शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना विशिष्ट प्रोत्साहन देता येईल. विचारपेरणी करता येईल 

 ​कोकणात २१ व्या शतकातील २ दशके संपून ३ रे संपायला आले आहे. गेल्या २५ वर्षात इथल्या समस्या बदलल्या आहेत. कोकण बदलतोय, त्याचे प्रतिबिंब नव्या ग्रामीण साहित्यात दिसायला हवा.​इंटरनेट मोबाईलने ग्रामीण भागातील जीवन व्यापून टाकले आहे. इंग्रजी शाळांचे लोण ग्रामीण भागात पसरले आहे. परवाच १२ वीच्या मराठी पेपरला पर्यवेक्षण करताना एका मुलीने 'आषाढातला पाऊस' म्हणजे नेमके काय लिहायचे? व एका मुलाने 'अनिष्ट रुढी'चा अर्थ काय? असे विचारले. यावरून आजच्या मुलांच्या मायबोलीविषयी ज्ञानाचे आकलन आपल्याला होईल.येत्या काळात कोकणातले अस्सल ग्रामीणपण हरवून जाणार आहे. कोकणच निमशहरीकरण होऊ लागल्याने 'ग्रामीण निमशहरी साहित्य' उदयाला येणार व येऊ घातले आहे, त्या दृष्टीनेही विचार करून लेखकाने कोकणचे कोकणपण टिकविण्याच्या दृष्टीने ग्रामीण साहित्याची मांडणी करायला हवी.​आज कोकण  तेवढे दुर्गम राहिले नसून मोठ्या प्रमाणात  सुगम झाले आहे. या सुगगमतेचा व्यावहारिक जीवनात कसा फायदा होईल या दृष्टीने लेखन ग्रामीण साहित्यात दिसून येत नाही. ​केशवसुत 'तुतारी' लिहिताना - उद्याविषयी विश्वासाने सांगतात, 

      "प्राप्तकाळ हा विशाल भूधर 

        सुंदर लेणी त्यात खोदा"

 -  केशवसुत प्राप्तकाळ म्हणजे आजची स्थिती जी आहे ती सुंदर आहे असे समजून पुढे जायला हवे असे सांगतात. ते दिवस रव्हले नाय, ते दिवस वेगळे होते असे म्हणणारे कोकणी लेखक ग्रामीण साहित्यात दिसतात. कोकणचे नकारात्मक पैलू मांडण्याऐवजी सकारात्मक, सुलभ, नावीन्याचे पैलू नव्या ग्रामीण साहित्यात दिसायला हवेत. आज मुंबई गोवा महामार्ग तयार झालाय त्याचा कोकणी माणसाने काय उपयोग करून घेतला? कसे व्यावहारिक बदल झाले यावर सुंदर कथानक फुललेले पहायला मिळत नाही.

कोकण रेल्वे झाल्यामुळे काय बदल झाले यावर कथा, लघुकथा कादंबरी, कविता होऊ शकते. रेल्वे येण्यापूर्वी रेल्वे विकासाची वाहिनी होईल असे म्हणत होतो. मग रेल्वेमुळे झालेले विस्थापन असेल किंवा सकारात्मक पैलू असतील ते साहित्यात मांडायला हवेत.


       ​शेतीच्या बाबतीत कोकणात वानर व माकडांचा उपद्रव आहे. वानर काही शिल्लक ठेवत नाहीत अशी  ओरड ऐकायला येते. यातून शेती सोडून फळे व भाज्यांसाठी आपण पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहू लागलोय. मात्र यातून काही मार्ग काढणारेही आहेत.लांजा तालुक्यातील मठ गावचे श्रीकृष्ण गुणे नामक शेतकऱ्याच्या नारळाच्या बागेत माकडाचा उपद्रव होऊ लागला. माकड नारळावर चढून ती शहाळी नष्ट करायची. यावर त्यांनी माशांच्या कुटीचा उपाय वापरला. माकडे १००% शाकाहारी आहेत, त्यांना माशांच्या कुटीचा वास जराही चालत नाही, सहन होत नाही म्हणून किनारपट्टीवर वानर माकडे फार दिसत नाहीत. मग हा प्रयोग कादंबरी, कथेचा विषय होऊ शकेल. ही कथा कोकणातील लढणाऱ्या शेतकऱ्याची कथा म्हणून पुढे येईल. कोकणचा साज संगमेश्वरी बाज - हि संहिता सध्या रंगभूमीवर गाजतेय. लेखकाचे रेशन दुकान होते. तेथे भरदिवसा दुकानावर येणारी माणसे व गावकरीचे निरीक्षण करून त्यातूनही संहिता काळे नामक लेखकाने लिहिली.  यामुळे आज किमान ३५ जणांना रोजगाराची संधी मिळाल्याने ते गावात थांबाले. ग्रामीण साहित्यातून आलेल्या कलाकृतीचा असा व्यावहारिक उपयोग व्हायला  हवा. तसेच ​मराठी संस्कृतीचे वाहक असलेल्या भाषा शिक्षकांनी साहित्याचा व्यासंग व साहित्यातून मांडल्या गेलेल्या भूमिकेचा गाभा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवा. तरच प्रभावी साहित्य लिहिले जाईल धन्य व उपयोगात येईल.


    सध्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि भ्रामक आर्थिक कल्पनांमुळे कोकणातील तरुण पिढी शहरांकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेते आहे. त्यामुळे दापोलीचे गझलकार बदीऊज्जमान खावर म्हणतात,


     बंद का झाली घरे ही, माणसे गेली कुठे ?

    गाव हा सोडून इथली, माणसे गेली कुठे ?


            मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण पोकळ अभिमान बाळगून काहीही उपयोग नाही. त्यासाठी भाषा, साहित्य आणि अशी भरवली जाणारी साहित्य संमेलने ही खऱ्या अर्थाने समाजभिमुख असली पाहिजेत, कारण या सर्वांचा प्रधान हेतू खावर यांच्या शब्दात सांगायचा झाला,

​तर असं म्हणावं लागेल,-


   ही अचानक माणसांची, माकडे झाली कशी

    माणसांच्या चेहऱ्यांची, माणसे गेली कुठे?


त्यामुळे हा सर्व साहित्यव्यवहार माणूस घडविणारा झाला पाहिजे.


🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱


विजय अरविंद हटकर.

लांजा - रत्नागिरी.

चलभाष क्रमांक - 8806635917

( लेखक कोकणातील साहित्य,ग्रंथालय, शिक्षण, पत्रकारीता, पर्यावरण क्षेत्रात गत दोन दशके कार्यरत आहेत.)






Saturday, September 6, 2025

आनंदाला भरती आणणारा उत्सव



      श्री गणपती ही देवताच ज्ञानाची, सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षीही परंपरेप्रमाणे आमच्या घरी तिचे उत्साहात आगमन झाले. सर्व कुटुंबियांचा उपस्थितीत बाप्पाची मोठ्या प्रेमाने, आस्थेने ,भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली.


     कोकणातील संस्कृतीचे भूषण असलेल्या भाद्रपद महिन्यातील घरगुती गणेशोत्सवाचे इथल्या जनमानसात  एक आगळे स्थान आहे.कोकणातील प्रत्येक माणूस या काळात एका वेगळ्याच धुंदित जगत असतो. आज बाप्पाच्या आगमनाने खरं तर लहानग्या विधी, देवसह घरातील सारे अबालवृद्ध आनंदित झाले.गावी बाप्पाला आवडणाऱ्या दूर्वा काढण्यासाठी आम्हा भावंडात क्रम लागायचे. गावी अर्थात तळवड्या ला दूर्वा भरपूर मिळायच्या. यंदा मात्र प्रथमच लांज्यासारख्या कोकणातील शहरातही दूर्वा विकत घ्याव्या लागल्या.मूळ गाव तळवडे येथे आजोबांनी सुरु केलेला परंपरागत गौरी विसर्जनापर्यंत स्थानापन्न होणारा बाप्पा लांज्यात मात्र दिड दिवसाचा झाला अाहे.मात्र त्यातील उत्साह, आनंद कमी झालेला नाही.लहानपणी गणपतीची मूर्ती आम्ही भावंडं निरखून -पारखून पहायचो व तेजस्वी, मनोहारी बाप्पाच्या दर्शनातून " पाहता श्रीमुख सुखावले सुख" असे प्रसन्न वाटायचे.आज कन्या कु.विधी जेव्हा बाप्पाकडे तशी पाहते तेव्हा गावातील कळीजकोपरा व्यापलेले ते  हृदयस्थ दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.



खरं तर गणेशोत्सवाच्या आठवणी निघाल्या की साहजिकच तळवडयाचे नाव येते. लांजा तालुक्यातील निसर्गरम्य तळवडे या गावातील मूळ घरी साधारण २००९ पर्यंत आम्ही गणेशोत्सव साजरा करायचो. त्यानंतर तिथले मातीचे कौलारू जुने घर कोसळल्याने मग लांज्याला आम्ही हा बाप्पाचा उत्सव सुरु केला. तळवडेचे मूळ घर क्षेत्रफळाच्या दृष्टीने फारच लहान होते. सुरवातीला पडवी, व आत तीन खोल्यांच्या या घरात प्रसंगी वीस - पंचवीस माणसे ही सहज राहत असत. तेव्हा पडवीत पावसाच्या पाण्याने जमिनीला ओल येऊ नये म्हणून करवंदीची सलटी लावलेली असत. भाद्रपद जवळ येऊ लागला की घराची साफसफाई करून मातीच्या भिंतीवर गावी राहणारी बेबी आत्या सुंदर नक्षीकाम करायची. देवघर पताक्यांच्या सुंदर नक्ष्यांनी सजविले जायचे. गणपती बसवायचे जुने आयताकृती टेबल रंगीबिरंगी कागदानी सजविले जायचे. दरवर्षी पेटीत जपून ठेवलेले कापडी छत, व पडदे लावून छान आरास केली जायची.बापाच्या आरती व पुजेसाठी लागणारी भांडी चौकवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर असणाऱ्या तळीवर आम्ही भावंडो धुवायला नेत असू. तळीकाठी रिंगाचे झाड असल्याने खाली पडलेल्या रिंगा गोळा करताना फार मजा यायची. या रिंगा व राखाडीने पुजेची तांब्या पितळेची भांडी लख्ख उजळून जायची. तेव्हा पितांबरी पावडर बाजारात आलेली नव्हती. एका बाजुला कातळसडा व दुसऱ्या बाजुला भाताची हिरवीगार शेतं यातल्या थोड्या खोलगट भागात असलेले हे तळे साती आसरांचे ( सप्त मातृकांचे ) जागृत स्थान होते. तळाच्या पहिल्या पायरीजवळूनच छोटासा पावसाळी ओढा व्हायचा. या पाण्यातच भांडी व कपडे धुतले जात असत. तर तळ्यातील गोड पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. तळ्याच्या एका बाजुला असणारे कातळ आषाढ श्रावणात बरसलेल्या जलधारांमुळे सतरंगी इंद्रधनु प्रमाणे भासायचे. सोनसळी च्या नाजूक पिवळ्या फुलांनी तर गालिछा पसरलेला भास व्हायचा. त्यात छोटी - छोटी गोंडस लालसर मजेदार उमलणारी तेरड्याची फुले,रानकेवडा, रान गुलाब, भुईचाफा, कापसी, सुरंगी, तपकी, आर्किड,सडसडी आदी विविध रानफुले बहरून येत असत.रानफुलांचा हा रंगबिरंगी पुष्पोत्सव आम्हाला खूप आवडायचा. तेव्हा कोकणातल्या प्रत्येक गावातला सडा हा आजच्या कास पठारा एवढाच श्रीमंत होता. लाडक्या बाप्पाच्या उत्सवात मांडवीच्या सजावटीसाठी याच फुलांचा आम्ही उपयोग करायचो.गौरीपुजनाच्या दिवशी आमचे शेजारी मजवुले (जाधव ) व सावंतांच्या घरातील महिलामंडळ याच तळ्यावरून तेरड्याच्या गौरी पारंपारीक गाणी म्हणत घरी घेऊन जात असत. गणेशत्सवात आम्हा भावंडांना मायेची ओढ लावणारं हे  तळं व तळ्याकाठचा परिसर मनाच्या हळव्या कोपऱ्यात आजही तसाच ताजा आहे.


       भाद्रपद चतुर्थीच्या आदल्या दिवशी तयारी पूर्ण झाली की, बाळ्या बाबा ( धाकटे चुलते ), भाऊ दादा व आप्पांसह लांज्याला सुभाष शेटे सरांच्या चित्रशाळेतून गणपती आणायला जाण्यासाठी आम्ही बालमंडळी हट्ट धरायचो, पण ही मोठी मंडळी सुरुवातीला आम्हाला घेऊन जात नसत. मग आम्ही हिरमुखायचो. तळवड्यातील आमचं घर मुख्य हमरस्त्यालाच असल्याने लांज्यावरून तळवड्या सह शेजारच्या गावात डोक्यावरून चालत गणपती घेऊन येणारे गावकरी तळवडे फाट्यावरील अश्वत्थ वृक्षाच्या (पिंपळ ) छायेखाली थोडा वेळ विसावत असत. त्यामुळे अनेकांच्या घरातील बाप्पाचे दर्शन आम्हाला मात्र अगोदरच व्हायचे. गावातील काही प्रतिष्ठीत रावमंडळी ढोल - ताशांच्या गजरात बाप्पाला वाजत- गाजत घेऊन यायचे तेव्हा मी, दीपू, बापू, पिंकी या भावंडांसह धावत धावत रस्त्यावर जाऊन गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करायचो. खुप उत्साह आम्हा बालगोपाळात संचारलेला असायचा.यातच ज्येष्ठ मंडळी बाप्पाची पार्थिव मूर्ती घरी घेऊन आले की सगळ्यांचीच लगबग वाढायची. आई, काकी बाप्पाच्या आगमनाने आनंदून त्याची मनोभावे पुजा करायच्या. मग मोठ्या गजरात बाप्पाचे घरात आगमन व्हायचे. रात्रभर आम्ही बाप्पा उद्या मखरात विराजमान होणार या उत्कंठेने पेट्रोमॅक्सचा प्रकाशावर मखर सजावटीत काही राहिले नाही ना याकडे लक्ष द्यायचो.


      यातच गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस यायचा. घरातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या देखरेखी खाली बाप्पा मखरात विराजमान व्हायचा. परसवातील जास्वंदाच्या फुलांचा हार बनविणे, दूर्वा व गणेशवेल आणने यात आम्ही गुंतून जायचो.बाळा बाबा बाप्पांची भक्तिभावाने पुजा करायचे. मखरात बाप्पांच्या दोन्ही बाजूंना मांडलेल्या समय रात्रंदिवस तेवत राहून प्रकाश देत असायच्या.समईतील तेलाकडे आमचे लक्ष असायचे. गौरी विसर्जनापर्यंत असलेल्या आमच्या बाप्पाला मग सहा-सात दिवस वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जायचा. त्या काळी घरी वीज नसल्याने पेट्रोमॅक्स बत्ती च्या उजेडात होणाऱ्या त्या काळच्या  उत्सवाला एक वेगळीच मजा वाटायची. चतुर्थीला पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना झाल्यावर दुपारच्या उकडीच्या मोदकासहित झालेल्या भोजनाने सुस्ती यायची.


तळवडे फाट्यावर 'तेव्हा सहा सात घरे होती. पण ती सगळी एकमेकांपासून लांब असल्याने सायंकाळ झाल्यावर शेवटची एसटी लांज्याला माघारी वळल्यावर घरोघरी आरतीला जाण्यासाठी सावंताच्या घरी आम्ही सर्व एकत्र यायचो. यात प्रामुखाने शांताराम काका पाटोळे,विजय व प्रकाश कोलापटे, मुंबईकर जाधव काका, सावंतबंधू व दीपू बापुसह मी आघाडीवर असायचो. बालपणी माझ्या सगळ्या आरत्या पाठ असल्याने सर्वच मंडळी माझं कौतुक करायचे.त्याने भारावून जाऊन मी अधिक उत्साहाने आरत्या म्हणायचो.

प्रसादाला साखर फुटाणे, पेढे,मोदक, सफरचंद, किंवा कापलेल्या  केळ्यांचा प्रसाद मिळायचा. तसेच परसवात पिकलेल्या काकड्या व चिबुड ही मनसोक्त खायला मिळायचे. टाळ मृदुंगासहित  होणाऱ्या या आरत्यांनी घरे दणाणून जायची. गणपतीला रात्री घरी जागरण व्हायला पाहिजे म्हणून वर्षातून फक्त सणाचे पाच- सहा दिवस मेंडीकोट हा पत्त्यांचा डाव रंगायचा. त्यात ताई आत्तेवर जर कोट झाला तर ती खुप चिढायची ते बघण्या सारखे असायचे. या खेळात बापुसुद्धा चिडायचा. आज या साऱ्या आठवणी आठवल्या तरी देखील हसायला येतं. खरं तर तेव्हाची परिस्थिती हालाखीची होती मात्र त्याही परिस्थितीत हसत मुखानं साजरा होणारा गणेशोत्सव मनाला उभारी द्यायचा.


     या पाच - सहा दिवसात बेबी आत्तेच्या हाथची कुरडू व टाकळा या रानभाज्यांची चव चाखायला मिळायची. भाद्रपद सप्तमी किंवा अष्टमीला ज्येष्ठा गौरीच्या आगमन सोनपावलाने झाले की घरी तिला नैवेद्य म्हणून मांसाहारी नैवेद्य दाखवला जायचा. गौरीच्या निमित्ताने आम्ही सर्व भावंड  एकत्र त्यादिवशी मांसाहारी पदार्थांवर ताव मारायचो. अशा उत्सवात गौरी विसर्जननापर्यंतचे सहा सात दिवस कसे भराभर जायचे हे कळायचे नाही. आणि गौरी विसर्जनाचा तो दिवस उगवायचा. तेव्हा आज सारखी अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती ठेवण्याची पद्धत गावात फारशी नव्हती. सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान ठरल्याप्रमाणे सवाद्य गौरीसह गणपतीची मिरवणूक निघायची. कोकण रेल्वेचा मार्ग झाल्याने गावातून नदीकडे जाणारा पारंपारीक विसर्जनाना मार्ग अडचणीचा वाटू लागल्याने गावकरीही तळवडे फाट्यावरूनच नदीकडे विसर्जनाला येत असत. त्यामुळे फाट्यावरची आम्ही सर्व मंडळी गावकऱ्यांच्या गणपतींची वाट पाहत असायचो. गावातील बहुसंख्य मराठ्यांसह कष्टकरी कुणबी समाजाचे गणपतीही एकत्र विसर्जनाला निघायचे. गावातील बाप्पाच्या मूर्तींची उंची त्याकाळी दोन-अडीच फुटापेक्षा अधिक नसायची. त्याकाळी मोठ्या मूर्ती आणण्याची स्पर्धा नव्हती. दिखाऊपणाला महत्त्वही नव्हते. महत्त्व होते ते श्रद्धेला. गावातील मानकऱ्यांसह गावकऱ्यांची वाजत गाजत विसर्जनाची मिरवणूक फाट्यावरती आली की आम्ही सर्वजण त्यात सहभागी व्हायचो आणि पक्क्या डांबरी सडकेने एका मागोमाग एक नदीवरील जितोरा ( जिवंत झरा ) या कोंडीकडे मार्गस्थ व्हायचो. प्रत्येक घरातील तरुण मंडळी डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन नदी घाटावर चालत जात असत. विसर्जनाच्या मिरवणुकीत श्री गणेशाची पारंपारीक गाणी गायली जायची. नदीवरील विसर्जन घाटावर गणपती बाप्पा आले की एका रांगेत सर्व मुर्त्या बसविल्या जायच्या. घरातील महिला मंडळी मुर्त्यांच्या मागे गौराईसह उभ्या रहायच्या.तर पुढील बाजुस पुरुषमंडळी असायची.सर्वांनी आणलेला प्रसाद वाटण्यासाठी एकत्र केला जायचा. प्रसाद व्यवस्था पूर्ण झाल्यावर मंगलमूर्ती मोरयाचा ध्वनी, गुलालाचा धुमाकूळ, मानकरी, गावकरी व गुरुवांचे जोरदार पारंपारिक नवस, बुटक्या ढेपेची लक्षवेधी गाणी व घोषणा व सरतेशेवटी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित केलेल्या आरत्या यामुळे विसर्जन घाट परिसर दणाणून जायचा. पुढे प्रत्येक घरातील पुरुष मंडळीनी बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात नेली की काठावर उभी असलेली सर्व मंडळी बाप्पाला साश्रुनयनाने भावपूर्ण निरोप देत असताना दुःखाची झालर सर्वांच्या नजरेवर दिसायची. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या... अशी बाप्पाला आळवणी करत घराकडे परतण्याच्या मार्गावर पावले पडत असताना श्रींचे विसर्जन सुखरूपपणे पार पडल्याचे अपूर्व समाधान ज्येष्ठांच्या चेह -यावर दिसायचे. नोकरी-धंद्यासाठी मुंबईत राहणारे कोकणवासी एकमेकांच्या भेटी घेऊन आता शिमग्याला भेटू असे म्हणत घरी परतायचे. पावित्र्य व मांगल्य जपत साजरा केल्या जाणा-या तळवडेतील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची साठवण ख-या अर्थाने आजही मनात परसवातल्या फुललेल्या लालसर जास्वंदासारखीच ताजी आहे.


    'सुखकर्ता' श्रीगणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो, ही शुभेच्छा.


श्री.विजय हटकर

२७/०८/२०२५



गणेशोत्सव २०२५



गणेशोत्सव २०२५




अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास..

 लेट पोस्ट - अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास. ▪️बांधावरचे साहित्य संमेलन २०२६ धामणवणे चिपळूण 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳  रविवार दि.८ फेब्रुवारी...