अक्षरमित्र जेडी पराडकर
कोकणचे निसर्गदत्त सौंदर्य जसे जगाला भुलवत आले आहे, तसे मराठी साहित्य विश्वात कोकणातील साहित्यिकांचे साहित्य देखील तितक्या सामर्थ्याने खुलून आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील जीवनाची आणि निसर्गाची पखरण करीत हे साहित्य देशात आणि जगात बहुमान मिळवित आहेत.कोकणात लेखकांची समृद्ध परंपरा आहे. हि समृद्ध परंपरा एकविसाव्या शतकात पुढे नेण्याचे कार्य करणारे, कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दातून मांडणारे सर्वश्रुत लेखक म्हणजेच संगमेश्वर चे सुपूत्र श्री. जे. डी. पराडकर !
लेखक, पत्रकार जे.डी.पराडकर यांना लोक प्रेमाने 'जेडीं म्हणतात. जेडी एक वेगळंच रसायन आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे ब्रीद त्यांच्या बाबतीत चपखल लागू पडते. संगमेश्वर येथे कलाशिक्षक म्हणून ३६ वर्षे निरपेक्ष भावनेने सेवाकार्य करताना जेडींनी पत्रकारीता व साहित्यिक क्षेत्रात देखील सहज मुसाफिर केली आहे. महाराष्ट्रातील आघाडीच्या वृतपत्र समुहात काम करताना ग्रामीण सक्षमीकरणाचे विधायक कार्य त्यांनी केले आहे.ऐतिहासिक संगमेश्वरातील कर्णेश्वर हे जेडींचं श्रद्धास्थान! गत बत्तीस वर्षे जेडी विविधांगी विषयावरील लेखन करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकणातील पर्यटन, पर्यावरण, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे,पुरातन मंदिरे,व्यक्तिमत्वे यांचा समावेश आहे. संगमेश्वरातील पैसाफंड हायस्कूल मध्ये त्यांनी उभारलेले 'कलादालन'त्यांच्यातील कलासक्त माणसाची ओळख करून देतो.
वास्तव जगातील बारकावे बारकाईने टिपणं, हे पराडकरांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.मुळात ते हाडाचे पत्रकार असल्याने हे सारे नेमकेपणानं कसं मांडायचं याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. कोकणचा निसर्ग,कोकणी माणूस, त्याच्या भावभावना गाव मातीचे अनोखे गंधसंवेदन यास अतिशय ताकदीने शब्दबद्ध करून जेडीनी वाचकांपर्यंत पोहोचविलं,या साहित्यकृतींचं वाचकांनीही भरभरून स्वागत केलं.आपल्या ३२ वर्षाच्या लेखन प्रवासात जेडीनी कोकणची नाळ कधीही तुटू दिलेली नाही. एका शब्दातून विस्तृत लेख लिहिण्याची जेडी यांची हातोटी ही त्यांना ईश्वरी देणगीच आहे. दर रविवारी त्यांच्या लेखन वैशिष्ट्यांचा आनंद मराठी वाचकांना सातत्याने अनुभवास मिळतो आहे. रसाळ, लालत्यपूर्ण, ओघवती शैली या संचिताच्या जोरावर पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रातील त्यांचा सहज वावर त्यांच्यातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.
कोकणचे स्वर्गीय सौंदर्य सातत्याने मांडणाऱ्या जेडींच्या सिद्धहस्त लेखनेचे कौतुक साक्षात कालनिर्णयचे जयंत साळगांवकर, अभिनेते प्रशांत दामले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य व शुभेच्छा पत्रांचे सौदागर कवी प्रसाद कुलकर्णी यांनीही केल्याने जेडीना प्रेरणा मिळाली. चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी जयंत साळगांवकर यांच्या सूचनेप्रमाणे जे.डी.पराडकर यांच्या लेखणीतील वाचकांना अभिप्रेत असणारा गोषवारा ओळखून विषयावरची त्यांची एका पाठोपाठ एक अशी तब्बल आठ पुस्तके प्रकाशित केली.या वैशिष्ट्यपूर्ण त्रिसुत्रीच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन जेडींना प्रमाणपत्र व मेडल देऊन नुकतेच गौरविले आहे. 'कवडसा ', ' बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा', 'असं जगावं कधीतरी ', ' कसबा डायरी',' अधरयात्रा ','साद निसर्गाची','प्राजक्ताचे सडे', 'ऋतुरंग',' वेध अंतर्मनाचा ',' हळवा कोपरा' या त्यांच्या साहित्यकृतींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.एका वर्षात सलग ११९२ पाने लिहिण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. यापाठीमागे एक लेखक या नात्याने त्यांच्यातील सातत्य,निष्ठा,सत्य शिव सौंदर्याची उपासना ही शाश्वत जीवनमूल्ये सहाय्यभूत ठरली आहेत.
अतिशय निर्गवी, ऋजू आणि निर्मळ मनाच्या जेडींवर सरस्वती प्रसन्न आहे. श्री शारदा कृपेने त्यांचा हात सतत लिहिता राहो यासाठीच लेखक,पत्रकार श्री. जितेंद्र दत्तात्रय उर्फ जे.डी. पराडकर यांना अक्षरमित्र पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करताना संघाला अत्यंत आनंद होतो आहे.
विजय हटकर.
०८.०१.२०२५
No comments:
Post a Comment