Monday, August 17, 2020

वेरवलीचा धबधबा

 समृद्ध निसर्गाचा अविष्कार

'वेरवलीचा धबधबा'


🏝️🍃🌊🌊🌊🌊🍃🏝️


वेरवली हे मध्य कोकणातील विहंगम तालुका म्हणून ख्याती असलेल्या लांजा तालुक्यातील महत्वाचे गाव. चारही बाजुंनी डोगरद-यांनी वेढलेले निसर्गसमृद्ध वेरवली बुद्रुक हे गाव  बेर्डेवाडी धरणावरील मानवनिर्मित धबधब्याने कोकणच्या पर्यटन नकाशावर चर्चेत आले आहे.या बैठ्या  धबधब्याने पर्यटकांवर मोहिनी घातली असून या धबधब्याचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही.

            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या लांजा - कोर्ले रस्त्यालगत दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वेरवली बुद्रुक हे गाव वसलेले आहे.लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाचे व मोठ्या लोकसंख्येचे हे गाव अलीकडेच कोकण रेल्वेचे स्थानक झाल्याने रेल्वेच्या नकाशावर आले.या गावात आकारास आलेल्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाने सिंचन, शेती व पर्यटनाला चालना मिळाली आहे.धरणाच्या भिंतीमधुन पाण्याचा विसर्ग होण्यासाठी कालव्या सारखा मार्ग तयार करण्यात आला असून यातुन २५ फुटावरुन कोसळणारा मानवनिर्मित धबधबा पाहून मन प्रफुल्लित होते.

            लांजा शहरातुन अर्ध्या तासात वेरवली धबधब्यावर पोहचता येते.वेरवली गावात प्रवेश केल्यानंतर राम मंदिर स्टाॅप लागतो. या स्टाॅपजवळच असणारा कोकण रेल्वेचा बोगदा आपले स्वागत करतो. हा बोगदा पार केल्यानंतर लगेचच डाव्या हाताला वळलेला रस्त्याने साधारण एक कि.मी.गेल्यावर वेरवलीच्या धबधब्यापाशी पोहचता येते. भोवतालचा हिरवागार परिसर व  समोरच्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पावर असलेल्या मानवनिर्मित धबधब्याचा पांढ-या शुभ्र जलधारा डोळ्यांचे पारणे फेडतात.धबधबा ह्या शब्दातच केवढा फोर्स आहे हे येथे आल्यावर मनोमन पडते. हा धबधबा बैठा स्वरूपाचा असून उंची २५ फुट असली तरी वेगाने कोसळणाऱ्या जलधारांनी धबधब्याखाली डोह तयार केला आहे.हा डोह उथळ नसल्याने थेट धारेखाली भिजताना काळजी घ्यावी.डोहाच्या पुढे काही अंतरावरील भागात मात्र चिंब भिजण्याचा ,एकमेकांवर जलतुषार उडवण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. हा धबधबा लांजा शहरापासून हाकेच्या अंतरावर अासल्यामुळे मोठ्या संख्येने लोक येथे वर्षा सहलीसाठी येत आहेत.भर उन्हाळ्यातही हा धबधबा प्रवाहित असल्याने जुन व जुलै हे मुसळधार पावसाचे पहिले दोन महिने सोडून आॅगस्ट ते मे दरम्यानचा काळ येथे येण्यासाठी उत्तम ठरतो.वेगवेगळ्या ऋतुत निसर्गशिल्पाचे विविधांगी रुप न्याहळण्यासाठी येथे जरुर आले पाहिजे.



 कसे जाल ?🛣️

 धबधब्यापर्यंत रस्ता जात असल्याने खाजगी दुचाकी चारचाकी वाहनाने थेट धबधबा गाठावायचे.लांजा बस स्टॅण्ड वरुन वेरवली जाणाऱ्या एस्.टी.ठराविक अंतराच्या फरकाने उपलब्ध आहेत.

लांजा - केळंबे - वेरवली

अंतर ११ कि.मी.

साखरपा - कोर्ले - वेरवली

अंतर- २५

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

🚆 वेरवली रोड.

दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन  वेरवली रोड येथे थांबते.अन्य ट्रेन थांबत नाहीत.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :- 🥘

    गावात आगाऊ सुचना दिल्यास ग्रामस्थ आॅर्डरप्रमाणे जेवणाची व्यवस्था करतात.तसेच लांजा शहर अर्ध्या तासावर असून तेथे हाॅटेल्स व खानावळीची व्यवस्था आहे.गणेश करळकर व दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधल्यास नाश्ता व भोजनाची व्यवस्था गावातही होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :- 🛕🛕

       निसर्गरम्य वेरवलीत पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.येथील ठिकांणांचा योग्य पद्धतीने विकास केल्यास येथे पर्यटन बहरु शकते. ग्रामदैवत केदारलिंग ,गौरीशंकर, रामपंचायतन या धार्मिक स्थळांसह वायटीएस-यामाहा ट्रेनिंग स्कूल ही पाहण्यासारखे आहे.

       

१) ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर- 🛕

              लांजा कोर्ले मार्गावर १२ कि.मी.अंतरावर निसर्गरम्य देवराईत ग्रामदैवत केदारलिंगाचे नुकतेच जीर्णोद्धार झालेले देखणे मंदिर आहे.मंदिराच्या सभोवताली जांभा दगडाची तटबंदी असुन तटबंदीतच सतिशीळा स्थापित करण्यात आल्या आहेत.


२) श्री रामपंचायतन

              वेरवली रेल्वे पुलाच्या उजव्या हाताला कोकणभर प्रसिद्ध पावलेले श्रीरामाचे अतिशय देखणे मंदिर आहे.मंदिरातील श्रीराम लक्ष्मण व सीतामाईच्या साडेतीन फुट उंचीच्या संगमरवरी मूर्ती व दासमारुतीची मुर्ती पाहून नकळत हात जोडले जातात.व जय श्रीराम हे शब्द मुखातून अलगद बाहेर पडतात.


३) गौरीशंकर मंदिर - 

           येथील रामपंचायतनाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर रेल्वे पटरिच्या बाजूने धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा कि.मी.अंतरावर श्री गौरीशंकर देवस्थान आहे.गाभाऱ्यावर शिखर नसलेल्या या मंदिरात वैशिष्ट्यपुर्ण द्वीरंग शिवपिंडी आहे.या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडी उंच असून अर्धा भाग लाल व अर्धा भाग सफेद आहे.महाराष्ट्रात अशा प्रकारची दुसरी पिंडी अजिंठा वेरुळ जवळील श्री कृष्णेश्र्वर मंदिरात आढळते.गर्भगृह बाहेरील कोनाड्यात श्री लक्ष्मीविष्णू व सूर्यनारायणाची आकर्षक  मुर्ती आहे.श्री विष्णूच्या हातातील कमळचा आकर वेगळा आहे.लक्ष्मीच्या डोक्यावर शिवपिंडी व नाग असून मूर्ती सुंदर व सुस्पष्ट आहे.तर दुस-या कोनाडात सारथी अरुणासहित असलेली सूर्यनारायणाची ०७ अश्र्वाच्या रथात बसलेली मुर्ती आहे.सूर्यनारायणाच्या कमरेखाली तुळा आहे.गर्भगृहाच्या द्वाराच्या खालच्या बाजूस मुंगूस व नागाच्या लढाईचे आकर्षक शिल्प कोरलेले आहे.एकूणच बाहेरून साधे भासणारे हे मंदिर मूर्तीवैभवाची सफर घडविणारे आहे.


४) वायटीएस- यमाहा ट्रेनिंग स्कूल :- 🔩⚙️🛠️

                गेल्या दोन वर्षात मुंबई दिल्ली कोलकात्ता आणि चेन्नई या महानगरांबरोबरच महाराष्ट्रातील अौरंगाबादसारख्या १६ शहरांमध्ये तंत्रशिक्षण शाळा  सुरु करण्यात आल्या.अशाच प्रकारची  कोकणातील ग्रामीण भागात सुरु झालेली एकमेव वायटीएस - यमाहा ट्रेनिंग स्कूल ही यामाहा या जापानी कंपनीने स्वारस्य घेऊन ग्रामीण भागातील अल्पशिक्षितांना  हमखास रोजगार देणारी शाळा वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाने सुरु केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा दुचाकी तंत्रज्ञ प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणारी  वैशिष्ट्यपुर्ण शाळा ही आवर्जुन पाहण्यासारखी आहे.                      

         एकूणच पावसाळ्यातील वर्षा सहलीसह एकदिवसाच्या परिपूर्ण सहलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वेरवली गावाला भेट द्यायलाच हवी!

🍀🍀🍀🍀🍀 🏝️🌊🌊🌊🌊🌊🏝️     

      श्री विजय हटकर.                   

     मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।               

      मोबा.८८०६६३५०१७.      

            

 लेख आवडल्यास नावासह शेअर करावा.                        🌼🌼🌼🌸🌸🌼🌼🌼

Sunday, August 16, 2020

रत्नागिरीचा भूशी डॅम- खोरनिनको धबधबा.

 रत्नागिरीचा भूशी डॅम -

       "खोरनिनको धबधबा."

🏝️🌈🌊🌊🌊🌈🏝️

     

 

    निसर्गाची विविधता भरभरुन लाभलेल्या कोकणात एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या खळखळत्या जलधारांनी तुमचे स्वागत करायला उत्सुक असतात. आंबोली, सावडाव , सवतकडा,निवळी, सवतसडा, मार्लेश्र्वरचा धारेश्र्वर,शिवथरघळ, आदि प्रमुख जलप्रपातांवर न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वर्षा सहलींचे आयोजन केले जात आहे.असाच लक्षवेधी पर्यटन क्षमता असलेला व रत्नागिरिचा "भुशी डॅम" म्हणून नावारूपाला आलेला लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित मुचकुंदि धरणावरिल धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरला असून त्याखाली चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी नवे उच्चांक प्रस्थापित करित असताना यंदा कोरानामुळे मात्र येथील पर्यटन थंडावले आहे.

         मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून अंदाजे २६ कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत ऎतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरलेल्या प्रभानवल्ली गावानंतर खोरनिनको गाव लागते.' निनको ' देवीच्या सानिध्यामुळे या जैवसमृद्ध खो-याला खोरंनिनको हे नाव पडले.  खोरनिनको गावात प्रवेश करताच समोरच आपल्या स्वागताला उभे असलेले मनमोहक खोरनिनको धरण आपले लक्ष वेधून घेते.पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागतं अाणि टप्प्या- टप्प्यामध्ये पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित धबधबा भान हरपून टाकतो. या धरणाच्या जलाशयाचा 'मुचकुंदि लेक'चा सांडवा तयार करताना कल्पकतेने अशी रचना केली आहे की झक्कास धबधबा तयार झाला आहे.एका मोठ्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पाय-यांवरुन ओव्हरप्लो होऊन वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करुन ज्यांनी कोणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सृष्टी सौंदर्याची दाद द्यायलाच हवी.

         साखरपा -राजापूर रस्त्यालगत भांबेड हे गाव लागते.या गावापसून १२ कि.मी. अंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाने हे मातीचे धरण बांधले आहे.सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला असलेल्या धरणाला दरवाजे नाहीत.त्यामुळे धरण भरल्यानंतर ओव्हरप्लो होणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी एका बाजूने सांडव्याची निर्मिती करण्यात आली आहे.पावसाळ्यात या सांडव्यांवरुन एका संथ लयीत पडणाऱ्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही न विसरता येणारा अनुभव आहे.

         सांडव्याच्या कडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहचलं की समोर दिसणारं मनमोहक दृश्य स्मितीत करतं.धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या समृद्ध निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.स्वच्छ वातावराणात हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पुल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरुन सहज दिसतो.धरणाच्या माथ्यावर तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर उभे राहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या पर्वतातून जलाशयात गोळा झालेले निळेशार पाणी, त्याचा तो विस्तार आणि धरणाच्या एका बाजूने तयार केलेल्या सांडव्यातून मार्ग काढत अनेक पाय-यांवरुन आदळत फेसाळत जाणारे पाणी मन प्रफुल्लित करते.या धरणाचा विस्तार भला मोठा असल्याने ऎसपैस डुबण्याचा आनंद येथे घेता येतो.थंडगार जलधारांमध्ये भिजल्यानंतर जवळच्या टपरींवर गरमागरम चहा व कांदाभजी खाण्याचे सुख अनुभवता येते.इथूनच प्रभानवल्ली गावातील स्वयंभू  बल्लाळगणेश देवस्थान जवळच असल्याने धबधब्याखालील मजामस्ती बरोबरच विघ्नहर्ता बाप्पाच्या  दर्शनाचे पुण्यही पदरात पाडून घेता येते.

       

 

 कसे जाल

धबधब्यापर्यंत पक्का रस्ता असल्याने स्वतः च्या वाहनाने घेऊन ही थेट धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते.

 लांजा - कोर्ले - प्रभानवल्ली - खोरनिनको 

 अंतर - २६ कि.मि.

 रत्नागिरी - लांजा - खोरनिनको

 अंतर -८० कि.मी.

 कोल्हापूर -साखरपा - शिपोशी - कोर्ले - खोरंनिनको

 अंतर -११४ कि.मी.

        

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

     कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली रोड हे २० कि.मी.अंतरावर असलेले जवळचे स्टेशन आहे तर 

  रत्नागिरी  रेल्वेस्टेशन ८० कि.मी.अंतरावर आहे.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :-

  खोरंनिनको येथे वर्षा पर्यटनाचा विकास झाल्याने दोन -चार खनावळी येथे असून आॅर्डरप्रमाणे भोजनाची व्यवस्था केली जाते.शिवाय गावकऱ्यांशी संपर्क साधल्यास स्थानिक घरामध्येही कपडे बदलण्याची सोय होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :-

    शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा राजापूर प्रभानवल्ली या सुभ्यातील प्रभानवल्ली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खोरनिनको धबधबा परिसरासोबतच  प्रभानवल्लीतील भक्तांच्या हाकेला पावणारा गणेशखोरीचा बल्लाळ गणेश, शिवकालीन मारुती, ऎतिहासिक गढी, नदिपात्रालगत असलेल्या गुहेच्या प्रवेशाद्वारावर असणारे शिलालेख ,पुरातन केदारलिंग, पाच पालख्यांचा एकत्रित भेटीचा कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव जिच्या प्रांगणात संपन्न होतो ते आदिष्टी मातेचे मंदिर, गिरिभ्रमण करणाऱ्या साहसी वीरांना आव्हान देणारा भैरवखोरं विशाळगड ट्रेक आदि समृद्ध परिसर पर्यटनाचं नंदनवन असून तिथल्या स्वर्गाहून सुंदर परिसरात येऊन निसर्ग शक्तीशी तादात्म्य पावण्याचा अनुभव घेण्यासाठी ऎतिहासिक पाऊलखुणांनी समृद्ध असलेल्या या परिसराला एकदा तरि भेट द्यायलाच हवी.                     

🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️          

 ।वि।ज।य।ह।ट।क।र .   

मोबा ८८०६६३५०१७


धबधब्याची क्षणचित्रे :-

Sunday, August 2, 2020

हर्दखळ्याचा सातरांजण धबधबा

वर्षा सहलीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..

हर्दखळयाचा सतरांजण धबधबा.


            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून ३० कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेलं            'हर्दखळे' गाव आपल्या कुशीत सह्याद्रीचा अमूल्य खजिना घेऊन वसले आहे.निसर्गातील अद्भुत चमत्काराने लांजा तालुक्यातील हर्दखळे गावाच्या सीमेवर सह्यपर्वतात माथ्यावर निर्माण झालेला साहसी, वर्षापर्यटनाचा अनोखा अविष्कार म्हणजे सातरांजण धबधबा परिसर हर्दखळे होय.
       घाटमाथ्यावरिल मलकापूर तालुक्यातील गावडिचे  धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यावर वाहणारे पाणी सह्य पर्वतावरून फेसाळत रौद्र जलप्रपातरुपी सात टप्प्यात कोसळते.याच्या जलाघाताने प्रत्येक टप्प्यावर रंजणासारखे खोलगट डोह तयार झाले आहेत.यावरून या धबधब्याला "सात रांजण धबधबा परिसर " संबोधतात. धबधब्याचा विस्तारही मोठा व उंचीही.त्यामुळे आकाशातून दुधाचा वर्षाव होत असल्याचा भास होतो.उंचीवरून प्रचंड वेगाने येणारे तुषार अंगावर झेलणे हा एक सुखद अनुभव असतो.हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध काळ्या कातळातून बारमाही कोसळणाऱ्या सातरांजण धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे.
        जैववैविध्याने समृद्ध असलेल्या या परिसरात जाण्यासाठी लांजा शहरापासून १८ किमी.अंतरावर असलेले पेठदेव भांबेड हे गाव गाठावे.व तेथून डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने ०६ कि.मी.पुढे गेल्यावर ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१ लागते.कोकणातील या आनंददायी शाळेची अनुभूती घेऊन उजव्या हाताला असलेल्या रस्त्याने तीन ते चार कि.मी.अंतर पुढे गेल्यावर सह्याद्रीतील निसर्गनवल सातरांजण धबधबा परिसरात पोहचता येते.
           हर्दखळे गावातील हा स्वर्गाहून सुंदर परिसर आजपर्यंत स्थानिक वाटाडे सोडून शहरी वस्तूपासून अज्ञातवासात होता.परंतु पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना हा डोंगरमाथ्यावरिल सातरांजण परिसर प्रकाशझोतात आला.कंपनीने धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मातीचा चांगला रस्ता तयार केला आहे.त्यामुळे दुचाकी फोरव्हिलच्या महिंद्रा बुलोरो ,जीप सारख्या मजबूत वाहनाने वळणावळणाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत थेट पोहचता येते.अन्य वाहने मात्र याठिकाणी उपयुक्त नाहीत.
      सात टप्प्यात जरी हा धबधबा कोसळत असला तरी आपण स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने जास्तीत जास्त दोन रांजणापर्यंत पोहचू शकतो.धबधबा परिसरात रबर लागवडीच्या कामाला असलेले आसामी तरुण अगदी सहजपणे स्थानिक भूमीपुत्र असल्याप्रमाणे दुस-या रांजणात उडी मारतात.हे थ्रील पाहणेही रोमांचक!पावसाळ्यात मात्र जून, जुलै महिन्यात पावसाचा ओढा जास्त असल्याने आॅगस्ट पासून जानेवारी दरम्यानचा कालावधी या ठिकाणी येण्यास सर्वात उत्तम.परिसरात पाच कि.मी.क्षेत्रात कोणतेही हाॅटेल नसल्याने बिस्किट पुडा, ग्लुकोज पावडर अथवा पोळी -भाजी सोबत घेतलेली उत्तम.मोठ्या धबधब्याच्या आजुबाजुला छोटे छोटे असंख्य धबधबे असल्याने यात चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
या सोबतच हर्दखळे धरण परिसर, तोरणमाळच्या गर्द देव
राईतील प्राचीन महादेव मंदिर ,ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर हि ठिकाणेही भेट देण्याजोगी आहेत.
       पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व धबधब्यात चिंब भिजण्यासाठी भान हरवून जाण्यासाठी सातरांजण धबधबा परिसराला भेट द्यायलाच हवी.वर्षा सहलीचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी हा परिसर आपल्याला साद घालतोय...तो म्हणतोय...इथं या..पांढऱ्या शूभ्र तुषारांत चिंब भिजा ...धबधब्याखाली न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवा...व आपली वर्षासहल या परफेक्ट डेस्टिनेशनला आणून सार्थकी लावा.


कसे जाल?

लांजा - पेठदेव भांबेड - हर्दखळे 
३० कि.मी.

राजापूर -वाटूळ -वाघणगाव - हर्दखळे

रत्नागिरी -पाली - दाभोळे - भांबेड - हर्दखळे 


जवळचे रेल्वेस्टेशन - वेरवली.

🌲🌲🌲🌲🌲🌊
    श्री विजय हटकर.
मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।





      
           
      

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा.

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व

 हवलीचा कडा धबधबा.

---------------------------------

 🌳🌈 श्रावणातील नवे डेस्टिनेशन 🌈🌳


ऋतुंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण.
श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न.
श्रावण म्हणजे निसर्गाचा समृद्ध संकल्प.
सृजनाला आवाहन करणारा, कवींना भूरळ घालणारा आनंदधन म्हणजे श्रावण.
           कोकणात आषाढात मुसळधार पावसाने अनावर झालेले नदी -नाले श्रावणात पोटापुरते म्हणजे पात्रापुरते जगत असतात.आणि म्हणूनच पावसाळी पर्यटनाला  ख-या अर्थाने सुरवात होते ती श्रावणात.श्रावणी सोमवार म्हणजे तर शिवभक्तांसाठी पर्वणी असलेला दिवस.अशा या श्रावणी सोमवारी फिरायला बाहेर पडायचंय...तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचंय...सोबत धबधब्याखाली मनमुराद भिजायचंय तर लांजा तालुक्यातील निसर्गरम्य इंदवटी गावातील श्री लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर मंदिर व हवलीचा कडा धबधबा आपल्या मनातील कल्पित एकदिवसीय सहल नक्कीच पूर्ण करु शकतो.
     कोकणातील देवस्थानांचे विशेष म्हणजे ती निसर्गरम्य परिसरात वसलेली आहेत.त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्ग सॊंदर्याचाही आनंद घेता येतो.देवस्थानाजवळ धबधबा असेल तर डबल धमाकाच.रत्नागिरी जिल्ह्यातील मारळचा मार्लेश्र्वर व राजापूरचा धूतपापेश्र्वर ,चाफवलीचा चाफनाथ ही अशीच आध्यात्मिक व निसर्गानूभूती देणारी लोकप्रिय ठिकाणे.पावसाळ्यात व विशेष करुन श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.अशाच प्रकारे लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी  गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर  व हवलीचा कडा धबधबा हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
      लांजा शहरापासून १० कि.मी.अंतरावर मुचकुंदि नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावात जाण्यासाठी पर्यटकांना कोंडये -निओशी -इंदवटी हा पर्याय उत्तम ठरु शकतो.कारण निओशी गाव सुरु होताच एका बाजूला हिरव्यादाट डोंगररांगा व संथ वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे विहंगम दृश्य आपल्याला आकर्षित करते.हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पुर्णत्वास गेला अाहे.गावातील जलसिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प असून इंदवटी गावातील भगते वाडी परिसरात या धरणाचा सांडवा बांधलेला असून या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो.पावसाळी पर्यटकांसाठी हे ठिकाण देखील लोकप्रिय ठरत आहे.रस्त्यालगत असणाऱ्या भातांच्या हिरव्यागार  खेच-यांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे

 श्री देव लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वर :-

                इंदवटी गावातील सुतारवाडी पर्यंत डांबरी रस्त्याने जाता येते.येथून पुढे कच्चा रस्ता गोळवशी गावाकडे जातो.या रस्त्याने पुढे जाताच बाईत वाडी स्टाॅप आहे.येथे आपली वाहने थांबवून बाईतवाडी कडे जाणाऱ्या पाखाडीने आपण थेट श्री देव लक्ष्मीकांत व श्री देव ठाणेश्र्वराच्या पवित्र मंदिर परिसरात पोहचतो. गर्भगृह व छॊटेखानी सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. बाईतवाडीतील श्रीदेव लक्ष्मीकांत इंदवटी, गोळवशी ,खावडी व अर्धा निओशी या  साडे तीन गावांचा  मानकरी आहे.लक्ष्मीकांत हे विष्णूचे उपनाम.हजार ते बाराशे वर्षापूर्वीची शिलाहार राजवटीतील हे देवस्थान असावे असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. सुलतानी आक्रमणापासून तेव्हा देवतेच्या मूर्ती वाचवण्यात आल्या त्यातीलच हे एक देवस्थान असावे. काळ्या दगडातील शंख,चक्र, गदा,पद्मधारी  घडीव श्री विष्णूची (लक्ष्मीकांत) मूर्ती आहे.मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजुला जय -विजय हे द्वारपाल असून मूर्तीच्या खालच्या बाजूला गरुड हात जोडून उभा आहे. तसेच त्याच काळातील गणपती शिल्प सुद्धा अजून सुस्थितीत आहे.श्री देव लक्ष्मीकांत या नावाने हे देवस्थान प्रसिद्ध आहे.

               

 मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव ठाणेश्र्वराचे  घुमटीवजा देऊळ असून आतील मनमोहक शिवपिंड पाहून आपले दोन्ही कर नकळत जोडले जातात.व मुखात हर हर महादेवचा जयघोष सुरु होतो.मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचा कुंडस्वरूप झरा आहे.मंदिरामागील छोटेखानी धबधबा आकर्षित करतो.याचा गाज वातावरणात वेगळाच रंग भरतो.नितांत सुंदर व गर्द झाडिमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळावर  श्रावणी सोमवारी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी  पहायला मिळते.महाशिवरात्र व नवरात्रीला येथे उत्सव भरतो. इंदवटी,गोळवशी,खावडी व अर्धा निओशी यासाडे तीन गावातील कोणतेही शुभ कार्य श्री लक्ष्मीकांताची आज्ञा घेतल्याशिवाय संपन्न होत नाहि.अशा पावित्र्याने भारलेल्या वातावरणात आपण लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वराच्या चरणी लीन होतो.


 हवलीचा कडा धबधबा :- 

        देव श्री लक्ष्मीकांत या प्राचीन मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा हवलीचा कडा या नावाने स्थानिकांमध्ये परिचित आहे. बाईत वाडितील स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीनेच हवलीचा कडा गाठावा.  धबधब्याकडे जाताना भोवताली असलेली गर्द जंगलराई, भाताची हिरवीगार खाचरे, नारळी पोफळीच्या बागा लक्ष वेधून घेतात. डोंगर उतारावरील हि भाताची हिरवीगार खाचरे  केरळमधील चहाच्या मळ्यांची आठवण करुन देतात.देहभान हरवत यातून मार्ग काढत आपण धबधब्याजवळ पोहचतो.हा पांढराशूभ्र फेसाळणारा धबधबा पाहिला की,अंगातला क्षीण क्षणार्धात निघून जातो.   
              २५ फुटावरुन हवलीचा कडा धबधबा कोसळताना होणारा नाद एकीकडे धडकी भरवणारा असतो तर दुसरीकडे खडकावर आपटुन उडणा-या पाण्याच्या तुषारातुन तो तुम्हाला परमोच्च सुखाच्या आनंदाने न्हाऊ घालतो.पाण्यात उतरताना पुरेशी काळजी घेतली की, धबधब्याखाली यथेच्छ भिजण्याचा मनमुराद आनंद घेता येतो.धबधब्याच्या वरती अनेक गोलाकार रांजण खळगे पाहण्यासारखे आहेत उन्हाळ्यात या कुंडांमध्ये अंघोळीची मज्जा काही औरच असते.हा ओसंडून वाहणारा शुभ्रधवल धबधबा पाहून मुखातून या काव्यपंक्ती आपसुक बाहेर येतात.

        आले भरुन गगन 
        पावसाचे हे स्पंदन
        हर्ष वाहे ओसांडून
        झरे नसानसातून..
     आला श्रावण ,श्रावण।। 


एकूणच या  दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा ऋतु सर्वोत्तम कालावधी असुन श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन व धबधब्याखाली चिंब भिजून निसर्गाचे संगीत तना -मनात भरुन उत्साहाने परतता येते.वर्षासहलीचा व श्रावणाचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी लक्ष्मीकांत- ठाणेश्र्वर मंदिर परिसर व हवलीचा कडा धबधबा परिसर इंदवटी ला एकदा तरि भेट द्यायलाच हवी. 

कसे जाल ? 🚍🛵

🛣️लांजा - कोंडये - निओशी -इंदवटी

🛣️ लांजा -कुवे- वनगुळे -इंदवटी 

 🛣️लांजा - कोंडये- गोळवशी - इंदवटी.

🌳⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️🌳  

     श्री विजय हटकर.

   मुक्त पत्रकार, ब्लाॅगर.

 🍃🍃🍃🍃🍃🍃
 विशेष सहाय्य ;
 किरण भालेकर,अनिकेत भगते ,साहील बाईत.