Monday, December 16, 2019

*निसर्गाकडे सजगपणे बघण्याची दृष्टी देणारा चित्रपट - महाराजा*
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭


   लांजा :-
         चंद्रप्रभा एन्टरटेन्मेंट प्राॅडक्शन प्रस्तुत आणि आपल्या प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिने सृष्टीत आगळी छाप पाडणारे राष्ट्रपती पदक विजेते दिग्दर्शक व निर्माते श्री रमेश मोरे दिग्दर्शित "महाराजा "या चित्रपटाचा प्रिमीयर शो सोमवार दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी रात्री ८:०० वाजता लांजा शहरातील आग्रे हाॅल येथे संपन्न झाला.लहान मुलांसह मोठ्यांनी आवर्जून पहावा अशा या संस्कारक्षम चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.सह्याद्री घाट परिसरात आख्खं आयुष्य जगणाऱ्या कोकणी माणसाने आवर्जून पहावा अशा या उत्कृष्ट कलाकृतीविषयी...
          या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते अनिल गवस, लांज्याचे सुपुत्र श्री अमोल रेडिज, डाॅ. श्री भगवान नारकर, बालकलाकार रिया कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.उत्तम कलाकार व त्यांचा सशक्त अभिनय, संगमेश्वर तालुक्यातील अस्सल कोकणी टच असलेले माखजन येथील लोकेशन,उत्कृष्ट पटकथा,दर्जेदार चित्रीकरण, छोटे - छोटे बोलीभाषेतील प्रभावित करणारे संवाद, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवित जाणारे प्रसंग,सुरवातीपासूनच शेवटपर्यंत कथानकाचे सूत्र पकडून ठेवणारा गंभीर आशय ,व बालकलाकार रिया अर्थात  चिमुरड्या राणीने आपल्या सवंगडयासह उभारलेली गावापुरती मर्यादित असलेली विधायक वसुंधरा रक्षणाची चळवळ तुम्हाला चित्रपट थिएटरपर्यंत जाऊन चित्रपट पाहण्यास प्रवृत्त करेल एवढंच मी आज चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ठामपणे सांगेन.
        कोकणातील एक छोटेसे खेडं म्हणजे कडवई.या गावतील राणी नावाच्या बालिकेला पहाटेच्या वेळी पडलेले एक वाईट स्वप्नाने या चित्रपटाला सुरवात होते.ते स्वप्न पूर्ण झाले तर ? हा मनात थैमान घालणारा प्रश्न तिला अस्वस्थ करतो.मन हलकं करण्यासाठी हे स्वप्न ती आपल्या सवंगडयाना सांगते.सवंगडयाकडुनहि सकाळी पडलेले स्वप्न पुरे होते असा सूर निघाल्याने ती अधिकच घाबरते.याच काळात तिच्या घरात तिच्या आसपास घडणा-या घटना तिला पडलेले स्वप्नच पूर्ण करण्यासाठि घडत असल्याचे जाणवल्याने ते वाईट स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी राणी आपल्या चिमुरडया सवंगडयासह विविध नामी शक्कल वापरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पछाडलेल्या स्वत:च्या बाबांनाच धोबीपछाड देत यशस्वी होते का हे पाहण्यासाठी उत्कंठावर्धक विषय असलेला व समाजभान जागं करणारा  "महाराजा" चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहायलाच हवा.
    आज मार्गदर्शक श्री सुभाष लाड यांसह हा चित्रपट पाहिला.व  काळजाचा ठाव घेत निसर्गाकडे सजगपणे पाहण्याची दृष्टी प्रदान करणा-या " महाराजा "चित्रपटाकडून पर्यावरण जागरूकता याबाबत काहीतरी काम आपल्या पातळी वर स्वत:पासून सुरु करायला हवे या विषयाची वादळे घेउन सर्व टिमचे व विशेषकरून हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह करणाऱ्या अमोलदादा रेडिज व महेश बामणे यांचे   अभिनंदन करुन घरी निघालो.

    - श्री विजय हटकर
      लांजा.
     मोबा.-८८०६६३५०१७

☘☘🦅🐛🐒🦜🦨🕊🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Saturday, December 14, 2019

*ह.भ.प.मनोहर भास्कर पांचाळ अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न.*
💐💐💐💐💐💐💐

 *"मनू डाॅक्टर "-हातगुण असलेल्या वैद्याची यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन* .
📚📚📚📚📚📚📚📚




लांजा :-
          माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई व आप्तस्वकियांनी आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती आनंदसोहळ्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम पंधरा-वीस गावांत गत चार दशके ' आरोग्य सेवा हिच ईश्वरसेवा ' मानून कार्यरत असणाऱ्या ह.भ.प.मनोहर भास्कर पांचाळ तथा मनू डाॅक्टर यांच्यासारख्या शाश्वत विचारांचा अविष्कार असलेल्या, गोरगरीब रूग्णांना दिलासा देणाऱ्या, साध्या,सरळ, सेवाव्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचे चरित्र समाजासमोर आले असून मनू डाॅक्टरांमधली हि सेवावृत्ती पुढील पिढीत संक्रमित होण्यासाठी असे आनंदसोहळे आवश्यक ठरतात असे मत माजी जिल्हापरिषद सभापती दत्ताजी कदम यांनी व्यक्त केले.
             भांबेड गुरववाडि येथील  'रामजपा' सदन येथे संपन्न झालेल्या या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती आनंदसोहळ्यास माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड, ज्येष्ठ रंगकर्मी अमोल रेडिज, माजी सरपंच श्रीकांत ठाकूरदेसाई ,पांचाळ - सुतार समाज लांजा तालुकाध्यक्ष डाॅ.प्रवीण सुतार, सोहम संगीत विद्यालयचे संस्थापक सुनिलबुवा जाधव,  झिंग झिंग झिंगाट फेम कु.भैरवी जाधव, "मनू डाॅक्टर" या पुस्तकेचे संपादक विजय हटकर ,भांबेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजु गांधी, जनार्दन पांचाळ सर, रामदास पांचाळ सर,प्रमोद मेस्त्री ,ह.भ.प.संतोष कुर्णेकर व अमोल मेस्त्री आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विशेष निमंत्रित असलेले नवी मुंबई चे माजी उपमहापॊर अविनाश लाड यांनी मनू डाॅक्टर यांची सोहळापूर्व भेट घेऊन त्यांच्या कार्याचा गॊरव केला.
              मान्यवरांच्या शुभहस्ते दीपपूजन गणेशपूजनाने या सोहळ्याचा शुभारंभ झाला.यानंतर सोहम संगीत विद्यालय बदलापूरच्या स्वरसंध्या या संगीत मैफिलीने कार्यक्रमाला सुरवात झाली.यावेळी झिंग झिंग झिंगाट फेम गायिका कु.भैरवी जाधव हिने एका पेक्षा एक समधुर गीतांचा नजराणा सादर करून या अमृतमहोत्सवी सोहळ्यात रंगत आणली.तर निवेदक विजय हटकर यांनी मैफिलीच्या दरम्यान मनूभाईंचा पंच्याहत्तरीपर्यंचा प्रवासातील त्यांचे अनेक किस्से सांगून त्यांचा जीवनपट श्रोत्यांसमोर उलगडविला.यानंतर उत्सवमूर्ती मनू डाॅक्टर यांचा सपत्नीक शाल ,श्रीफळ,पुष्षगुच्छ,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन ह्ददयस्थ सत्कार करण्यात आला.यावेळी मानपत्राचे वाचन विजय हटकर यांनी केले.या मानपत्राचे लेखन सुभाष लाड यांनी केले होते.  सत्कारानंतर मनूभाईंच्या कुटुंबियांनी उत्सवमूर्ती मनूभाई व त्यांच्या पत्नी सॊ.सुधा पांचाळ यांचे मंगलाष्टकांच्या उद्घोषात लग्न लावून सोहळ्यात धमाल उडवून दिली.
               सह्याद्रीच्या कडेकपारित गोरगरीब रूग्णांना दिलासा देणाऱ्या साध्या सरळ मनू भाईंच्या जीवनाचा वेध घेणा-या सुभाष लाड व विजय हटकर संपादित " मनू डाॅक्टर "- हातगुण असलेल्या वैद्याची यशोगाथा या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.यावेळी सुभाष लाड यांनी या सोहळ्यामागची भूमिका विशद केली.आयुष्यभर संघर्ष करित आपल्या मुलांना सन्मानाने उभे करणाऱ्या आई- वडिलांना वृद्धापकाळात मात्र मुलांकडून योग्य तो सन्मान मिळत नाही.आजच्या पिढीला वृद्ध आई - वडिल म्हणजे  अडगळ वाटू लागली आहे.अशा परिस्थितीत सहा मुली व एक मुलगा अशा सात मुलांना योग्य शिक्षण देऊन सक्षम करणाऱ्या व समाजाला घडविणा-या  मनूभाईंसारख्या बूजूर्गांना योग्य तो सन्मान मुलांनी व समाजाने दिला पाहिजे हा संदेश समाजात रुजविण्यासाठिच मनूभाईंसारख्या सेवाव्रतस्थ माणसाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन माझी मायभूमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असल्याचे सांगत सुभाष लाड यांनी  मनू डाॅक्टरांना शतायुष्य लाभो हि सदिच्छा व्यक्त केली.


              ज्येष्ठ रंगकर्मी अमोल रेडिज यांनी 'आमच्या गावातील कन्फ्यूजन नसलेला माणूस ' या शब्दात मनूभाईं विषयी गॊरवोद्गार काढले.आजकाल समाजात कुणाचाच कोणावर  विश्वास राहिला नाहि अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्याला दुस-या व्यक्तीचे दुर्गण सांगते.आपणहि ते ऎकून विश्वास ठेवतो.पण भांबेड गावात मनूभाईंविषयी कोणत्याही ग्रामस्थाला जर कोणी येऊन काही ही उलट सुलट सांगितले तरि कोणी विश्वास ठेवणार नाही.इतके साधे, सरळ आमचे मनुभाई असून त्यांनी आयुष्यभर कोणालाही वेठीस न धरता सामान्य माणसाचे दु:ख निवारण केल्याचे सांगत रेडिज यांनीही मनूभाईंना अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती च्या शुभेच्छा दिल्या.


              याप्रसंगी मनूभाईंच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत त्यांना सहकार्य, साथ देणाऱ्या बंधू जनार्दन पांचाळ सर, त्यांच्या सहा मुली व जावई,मित्र, या आनंदसोहळ्याचे संयोजक सुभाष लाड, मनू डाॅक्टर या पुस्तिकेचे संपादक विजय हटकर, सुनिल जाधव, भैरवी जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नाटककार रवींद्र आयरे , मनू भाईंचे जावई पुष्पकांत मेस्त्री, अनंत सुतार, दीपक पांचाळ, प्रमोद मेस्त्री, एकनाथ पांचाळ, प्रभाकर मेस्त्री, मोहन मेस्त्री, जांबुवंडेक व,भांबेड पंचक्रोशी तील अनेक मान्यवरांनी मनु भाईंना अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रामदास पांचाळ सर यांनी मानले.
           
  श्री विजय हटकर.
    लांजा.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳




Tuesday, October 15, 2019

       माझे वाचनविश्व.


            शिक्षण प्रांतात असल्यामुळं नव्हे तर मला मुळातच वाचनाची आवड आहे.दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला नियोजनबद्ध कसं वाचावं हे कुणी शिकविलं नाही. त्यामुळे मि मिळेल ते वाचत गेलो.माझ्या जन्मगावी अर्थात मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास      ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर
यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.
          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.
            माझा प्रयत्न असतो की पंधरवडयातून निदान एक तरी चांगलं पुस्तक वाचावं.आता 'चांगलं ' म्हणजे काय, हा अवघड प्रश्न आहे.स्वतः पुरती माझी व्याख्या सोपी आहे- ज्या पुस्तकांमध्ये मन रमतं,रूची वाटते, ती पुस्तके चांगली.अर्थात काही चांगली पुस्तके वाचायला ' मेहनत' करायला लागते.विचारवंत जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणाऱ्या संदीप वासेलकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडविणारे  ' एका दिशेचा शोध ' या पुस्तकामध्ये तर मला खुप प्रभावित केलं. व.पु.काळे हे माझे आवडते लेखक.त्यांच्या पार्टनर,सखी,दोस्त,वपूर्झा, गुलमोहर,भूलभूलैय्या आदि पुस्तकातून सतरंगी मनाचा ठाव घेता येतो.बाबा आमटे  यांच्या ' ज्वाला आणि फुले ' या पुस्तकातून शब्दांचे सामर्थ्य अनुभवता येते.शिक्षण क्षेत्रात असल्याने  गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक काही पुस्तके वाचली.हेरंब कुलकर्णी यांचे 'बखर शिक्षणाची' तात्तोचान हे जापनीज पुस्तक,लीलाताई पाटील यांचे ' सृजनानंद', ' माझी काटेमुंढराची शाळा ' नरेंद्र लांजेवार यांचे ' एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा ' ही त्यातील महत्वपूर्ण पुस्तके. मला वाटतं, ही पुस्तके प्रत्येक शिक्षकांनी वाचली पाहिजेत. ही शिक्षकांचा व्यवसाय समृद्ध करणारी पुस्तके आहेत.

         
             काही विशेष लेखक मला फार आकर्षित करतात. त्यात गोनिदा,रणजित देसाई,अण्णाभाऊ साठ्ये , श्री.ना.पेंडसे ,अच्युत गोडबोले, गिरिश कुबेर,व हिंदी साहित्यातील महादेवी वर्मा , हरिवंशराय बच्चन ,फणीश्र्वरनाथ रेणू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या प्रत्येकाची आपापली एक स्वतंत्र शैली आहे.त्यामुळे त्यांच्या वाचनातून समृद्ध झाल्यासारखे वाटते.साहित्य - इतिहास - पर्यावरण - पर्यटन -आंतरराष्ट्रीय राजकारण - अर्थकारण - विज्ञान - कायदा -अध्यात्म - तत्वज्ञान असे विविधांगी प्रकारचे वाचन केल्यानेच व्यक्तिमत्त्वाला सूज्ञता येते.परिस्थिती सुखाची असो वा दु:खाची .पुस्तकं कधीही आपली सोबत सोडत नाहीत.मनाच्या विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ बांधणीसाठी वाचन आवश्यक आहे. ' पोटासाठी अन्न ' ही जशी अपरिहार्य गरज आहे तसं बॊद्धिक विकासासाठी वाचलंच पाहिजे, असे प्रत्येकाला वाटायला हवं. ' एक होता कार्व्हर ' , ' इडली आर्कीड आणि मी '  , ' माती पंख आकाश' , 'अग्निपंख ' या सारखी पुस्तके मुलांना संस्कारक्षम वयातच जाणीवपूर्वक द्यायला हवीत. कारण एक चांगलं पुस्तक त्यांचं आयुष्य बदलवु शकते.
             आजच्या वाचन संस्कृतीचा विचार करता एक मुख्य गोष्ट लक्षात येते की, वाचक आणि वाचन,  लेखक आणि प्रकाशक,  साहित्यसंस्था आणि सरकार, शिक्षक आणि त्यांचे चालक यांच्यात सध्या मेळ दिसत नाही. तो मेळ घालायचं काम कोण करणार? केरळ, तामिळनाडू, प.बंगाल सारख्या राज्यातला वाचनसंस्कृतीचा  अभ्यास केला तर महाराष्ट्र किती पाण्यात आहे याचा अंदाज येतो.मराठी पुस्तकाची दीड ते दोन हजार प्रतीची एक आवृत्ती संपायला तीन वर्षे लागतात तर केरळमध्ये ४० हजार प्रतींची एक आवृत्ती केवळ एकाच वर्षात संपून जाते. आपल्याकडे पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लागायची आहे.ग्रंथालयातल्या वाचकांची संख्या देखील मर्यादित आहे.
              खरं तर, वाचन एक संस्कृतीचा भाग आहे.पुस्तक वाचल्याने अनेक माणसं भेटतात.आणि शब्द जगण्याचा विश्वास देतात.टी.व्ही.,चॅनल्स, संगणक, इंटरनेट, सोशल मिडिया, मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकलेल्या विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया , नवनिर्मितीची क्षमता काहीशी गोठल्या सारखी झाली आहे.नवे विचार, आकलन ,सादरीकरण, प्रकटीकरण ,लेखन या अंगभूत गोष्टी विद्यार्थी विसरत चालला आहे.वाचावं, वाचलेलं, चिंतनातून मनात आणावं त्यातून संस्कारित व्हावं असं आता अभावानेच आढळतं.
              वाचन संस्काराअभावी चुकलेल्या मुलांना, विद्यार्थ्यांना वेळीच सावरलं पाहिजे. पुस्तकांचं बोट धरून जाणिवांच्या लख्ख प्रदेशात केलेला प्रवास आनंददायी असतो हे त्याला समजावं लागेल.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी पुस्तकाचा आस्वाद घेता यावा ,सृजनशीलता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. यातून वाचनसंस्कृती ला बळ प्राप्त होईल.
              वाचन एक सर्जनशील कृती आहे.ज्ञानाच्या क्षेत्रात अहंकार असता कामा नये.यास्तव वाचकाने नम्रपणे पुस्तकाच्या कुशीत शिरलं पाहिजे.तुम्ही कोणत्याही पुस्तकात पूर्णपणे गुंतून जात नाही तोपर्यंत तुम्ही सच्चे वाचक होत नाही. ' अमृता प्रीतम ' या सुप्रसिद्ध लेखिका म्हणतात " वाचता वाचता मीच पुस्तक झाले."काहीवेळा पुस्तक मनात कायमपणे मुक्कामाला येतात आणि घर करतात.

               प्रत्येक मोठा लेखक आपल्या वाचकाला समृद्ध करत असतो.आणि त्याचं लेखकात रुपांतर करत असतो.कोणतेही लेखन जीवनाची बाजू घेत जीवनावर प्रेम करायला शिकवितं.पुस्तकाच्या जन्मासाठी जसा लेखक आवश्यक असतो तसा किंबहुना जरा अधिक वाचक आवश्यक असतो. वाचन हा अात्मशोधाचा प्रवास आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक निकोप, सुंदर, उदार व सर्वसमावेशक होण्यासाठी ,वाचनसंस्कृती साठी पुन्हा नव्याने चळवळ उभी करावी लागेल.
               वाचनाची सवय ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग असली पाहिजे.ज्यांना वाचनाचे व्यसन आहे त्यांना हे म्हणणे पटेल.पुस्तकांचा  आदर केला तर ती आपल्याला आदरयोग्य बनवितात.विविध संशोधनाने सांगितले आहे की जगातील राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च नेते हे वर्षाला किमान ७० पुस्तके वाचतात.आपण किमान २० पासून तरी सुरवात करू शकतो.- गरज आहे ती फक्त निश्चय करण्याची आणि व्यसन लागण्याची.
     या प्रवासासाठी शुभेच्छा !


        श्री विजय हटकर.
          संचालक -
       लोकमान्य वाचनालय लांजा.
        ता.लांजा ,जि.रत्नागिरी.
         मोबा- ८८०६६३५०१७
      

Saturday, August 24, 2019

तळवड्याचा कडा धबधबा.

"तळवडेचा कडा धबधबा"
       पर्यटन क्षमता असलेला लक्षवेधक धबधबा.

☔☔☔🌳☔☔☔☔
लांजा : --

            मुंबई- गोवा महामार्गावरील वेगाने विकसित होणारे ,तळकोकणातील निसर्गरम्य शहर म्हणजे लांजा. गत पाच वर्षात लांजा परिसरात उदयाला आलेल्या खोरनिनको येथील मानवनिर्मित धबधबा व सवतकडा धबधब्यामुळे मोठ्या संख्येने कोकण पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई पुणे येथील पर्यटकांची पाऊले वर्षा सहलीसाठी येथे वळु लागली आहेत. आंबोली सारख्या लोकप्रिय व गर्दिच्या ठिकाणी जाण्यापेक्षा एका नव्या मान्सून डेस्टिनेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांना मात्र त्यामुळे एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.त्यातच सोशल मिडियाने महाराष्ट्रासह गोवा कर्नाटकातील घराघरात पोहचलेल्या या धबधब्यांनी लांजा तालुक्याच्या पर्यटन विकासाला मात्र नक्कीच गती प्राप्त झाली आहे.
       लांजा परिसरातील या दोन लोकप्रिय धबधब्यांसोबतच डोंगर उतारांवरुन कोसळणारा,निसर्गाच्या सानिध्यात लपलेला,मनाला भूरळ पाडणारा एक जलप्रपातही आपल्याला चिंब भिजून वर्षासहलीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आमंत्रण देतोय, हा धबधबा म्हणजेच तळवड्याचा कडा धबधबा होय.
      लांजा शहरापासून १२ किमी अंतरावर लांजा- कोल्हापूर राज्य महामार्गावर तळवडे गावाकडे जाणारा फाटा लागतो.या फाट्यावरुन डावीकडे आत तळवडे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने एक किमी गेले असता सहाणेचा मांड स्टाॅप लागतो. येथून डावीकडे पाटॊळे परिवाराच्या चॊसुफीकडे जाणाऱ्या रस्त्याने या धबधब्या पर्यंत पोहचता येते. चॊसुफिकडे जाणाऱ्या रस्त्याने आठवण या बंगल्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता गेल्याने तिथपर्यत चारचाकी वा दुचाकीने जाता येते.पण तेथे  मात्र आपण आणलेले वाहन पार्किंग करुन दहा मिनिटे सरळ रानातून पायवाटेची संगत धरली की कड्यावरची ही जलदेवता आपल्याला शुभ्र तुषारकणांनी भिजवित आपले स्वागत करते.
            पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान केलेल्या डोंगरातील हा शूभ्र जलधारांनी चिंब भिजविणारा "कडा धबधबा " पर्जन्यप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.झुळुझुळु वाहणारा ओढा,निरव शांतता,आरोग्यदायक व उत्साहवर्धक वातावरण, स्वच्छंदीपणे विहरणारे विविधांगी पक्षी, चिंब भिजण्यासाठी सुरक्षित असलेला यामुळे तळवडे गावातील या धबधब्यावर येणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. धबधब्याच्या  अदमासे ४५ ते ५० फुटावरुन कोसळणा-या जलप्रपाताने    धबधब्याखाली ४ ते ५ फुटाचा वर्तुळाकृती डोह ( घळ) तयार झाली असून तीची खोली  जवळपास ०७ ते ०८ फूटापर्यंत असल्याने पर्यटकांनी पोहता येत नसेल तर डोहाच्या बाजूनेच आनंद घेतलेला सुरक्षिततेच्या दृष्टिने उत्तम ठरेल. लांजा शहरापासून १३ ते १४ किमी अंतरावर असलेल्या या धबधब्यापासून हाकेच्या अंतरापर्यन्त डांबरी रस्ता असल्याने जास्त पायपीट करावी लागत नाही.खाजगी वाहन किंवा रिक्षाने येथे सहज पोहचता येते.येथे जर बसने यायचे असेल तर तळवडे गावातील सहाणेचा मांड या स्टाॅपवर उतरून चॊसूफी रस्त्याने १५ ते २० मिनिटे पायी चालत आपण येथे पोहचू शकतो.

     जवळपास दुकान वा हाॅटेलची व्यवस्था नसल्याने धबधब्यापासुन २ किमी अंतरावर तळवडे फाटे येतये असलेल्या स्नेह हाॅटेल येथे नाश्त्यासह भोजनाची व्यवस्था होऊ शकते.अगाऊ संपर्क साधल्यास गैरसोय टाळता येईल.पर्यटकांना साद घालणा-या या धबधबा सोबतच  निसर्गरम्य तळवडे गावातील अन्य ठिकाणांच्या विकासासाठी तळवडे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्यास पावसाळी पर्यटनासाठी लांजा तालुक्यातील तळवडे गाव केंद्रबिंदू ठरेल.
----—---------------------------------------—----------------------
         श्री विजय अरविंद हटकर.
          तळवडे, ता.लांजा.




चाफवलीचा चाफनाथ धबधबा .

       

श्रावणी सोमवारी फिरायला बाहेर पडायचंय...तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचंय...सोबत धबधब्याखाली चिंब भिजायचंय...तर थोडी नेहमीची वाट सोडून रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरिल 'देवळे फाट्याने' आत शिरलात तर हिरव्यागार निसर्गरम्य चाफवलीचा चाफनाथ धबधबा आपल्या मनातील कल्पित एकदिवसीय सहल नक्कीच पूर्ण करु शकतो.
          कोकणातील देवस्थानांचे विशेष म्हणजे ती निसर्गरम्य परिसरात बसलेली आहेत.त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्ग सॊंदर्याचाही आनंद घेता येतो.देवस्थानाजवळ धबधबा असेल तर डबल धमाकाच.रत्नागिरी जिल्ह्यातील मारळचा मार्लेश्र्वर व राजापूरचा धूतपापेश्र्वर ही अशीच आध्यात्मिक व निसर्गानूभूती देणारी लोकप्रिय ठिकाणे.पावसाळ्यात व विशेष करुन श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.अशाच प्रकारे संगमेश्र्वर तालुक्यातील चाफवली गावातील श्रीदेव चाफनाथ व त्याच्या नावाने प्रसिद्ध असलेला चाफनाथ धबधबा हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
          चाफवली गावात हिरव्याकंच वनराईत श्री स्वयंभू चाफनाथाचे वैशिष्टयपूर्ण एकाश्म मंदिर आहे.अलीकडे गावकऱ्यांनी या प्राचीन एकाश्म मंदिरासमोर सभामंडप बांधला आहे.स्वयंभू चाफनाथाच्या दर्शनासाठी श्रावणी सोमवारी संगमेश्र्वर ,देवरुख,साखरपा,पाली, दाभोळे परिसरातून मोठ्या संख्येने लोकं येतात.चाफनाथाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या पाखाडीने धबधब्यापाशी जाता येते.पाखाडीने चालत जाताना धबधब्याचा घनगंभीर अावाज कानात घुमायला लागतो आणि आपली पाऊलं पटपट धबधब्याकडे वळायला लागतात की, आओण धबधब्यावर कधी पोहचतो ते कळतच नाही.हे 'जल' धारातीर्थ इतके सुंदर आहे की पाहताक्षणीच आपल्या मनाचा ठाव घेते.चाफनाथ धबधब्याचा विस्तारही चांगला असल्याने त्याखाली ऎसपैस डुंबण्याचा आनंद घेता येतो.अदमासे ५० फुट उंचीच्या कड्यावरुन कोसळणाऱ्या या धबधब्याच्या धारेखाली उभे राहून चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.या ठिकाणी पाण्याची खोली कमी असल्याने लहान मुळांपासून सा-यांनाच या जलप्रपाताखाली न्हाऊन निघण्याचं  थ्रील अनुभवता येतं.इतर धबधब्यांपेक्षा सुरक्षित असल्या कारणाने कुटुंबासह येणारे पर्यटक चाफनाथ धबधब्याला पसंती देतात.
             या परिसरात कोणतेही हाॅटेल्स व स्टाॅल्स नसल्याने येतानाच बिस्किटं, ग्लुकोज पावडर अथवा पोळी -भाजी सोबत घेतलेली उत्तम.माहितगार पर्यटक येथेच जेवण बनवून वनभोजनाचा आनंद घेतात.चाफनाथाच्या थंडगार जलधारांमध्ये भिजल्यावर माघारी परतत असताना ०२ कि.मी.अंतरावर असलेल्या देवळे या गावी येऊन श्री शिंदे काका यांच्या टपरीवरिल गरमागरम कांदाभजी व फक्कड चहा पिण्याचे सुख अनुभवता येते. महाराष्ट्र, गुजरात मध्ये दत्तसंप्रदायाचा प्रचार करणारे महान दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती यांचे शिष्य रंगावधूत महाराज यांचे मूळगाव असलेले 'देवळे' हे ऎतिहासिक गाव असून शिवकाळात सुभ्याचे ठिकाण होते. या गावतील भवानी खडगेश्र्वराचे मंदिर व जोशींचा चॊसुफी वाडा ही ठिकाणे देखील पर्यटकांनी आवर्जून पहावीत अशीच आहेत.
           एकूणच ऎतिहासिक व देवळांचे गाव म्हणून सुपरिचित असलेले देवळे , चाफवलीतील स्वयंभू चाफनाथाचे एकाश्म मंदिर व चाफनाथ धबधबा हा सारा निसर्गरम्य परिसर येथे आलेल्या प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडतो. निसर्गाशी जवळीक साधून वर्षासहलीचा रंगीबेरंगी आनंद लुटण्यासाठी चाफनाथ धबधबा परिसराला भेट द्यायलाच हवी.


    --- ------------------------------------------------------------------
       कसे जाल धबधब्याकडे...
                 रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरुन प्रवास करताना देवळे फाटा लागतो.या फाट्यावरून आत शिरलात की देवळे गाव आपले स्वागत करते.या गावातून चाफवली चा चाफनाथ व धबधबा परिसर ०२ कि.मी. अंतरावर आहे.मंदिरापर्यंत पक्का रस्ता असल्याने खाजगी वाहनाने जाता येते.येथून पाच मिनिटांची पायपीट करित धबध्ब्याजवळ पोहचता येते. हे स्थान देवरुख, साखरपा व पाली या ठिकाणाहून १७ कि.मी.अंतरावर आहे.
 -----------------------------------------------------------------
         श्री विजय हटकर.
         लांजा.
      मोबा.८८०६६३५०१७.


Monday, August 19, 2019




    कलारत्न श्री किरण बाळकृष्ण बेर्डे.

       " कला हाच आपला  श्र्वास " हे ब्रीद आयुष्यभर जोपासत रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण ,कला,साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात गत २९ वर्षे शतप्रतिशत कार्यरत राहून आपल्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर निर्माण करणारे अनुकरणीय व सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजेच ज्येष्ठ कलाशिक्षक श्री किरण बेर्डे सर.श्रीराम विद्यालय वेरवली ,ता.लांजा ह्या प्रशालेतुन बेर्डे सर २९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या मित्रमंडळींनी नुकताच त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न केला.त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दिचा हा आढावा.
              लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी, कलानगरी कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर या गावी सॊ.जयश्री व श्री .बाळकृष्ण या दाम्पत्याच्या पोटी ०३ जुलै १९६१ रोजी किरण बेर्डे यांचा जन्म झाला.इयत्ता तिसरित असताना त्यांनी कपबशीचे सुरेख चित्र साकारले.त्या कोवळ्या वयातील त्यांच्यातील रंगसंगतीची समज पाहून वर्गशिक्षिका बाईंनी त्यांना नियमित चित्र काढ,सराव कर तु उत्तम चित्रकार होशील अशी शबासकी दिली आणि त्यांच्यातील उपजत कलाकाराला प्रेरणा मिळाली.पुढे घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता दहावीमध्ये त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.पण नियतीला ते मान्य नव्हते.तब्बल दहा वर्षांनी पुन्हा जिद्दीने त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.व कलानिकेतन महाविद्याल,कोल्हापूर येथे आर्ट टिचर डिप्लोमा पूर्ण करुन ०१ जुन १९९० रोजी श्री कोठावळे सरांच्या मार्गदर्शनामुळे श्रीराम विद्यालय  व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, वेरवली,ता.लांजा येथे कलाशिक्षक म्हणुन रूजू झाले.
              कलावंताला नुसतं ज्ञान असुन चालत नाही, त्यात  आत्मविश्वास असावा लागतो.आत्मविश्वासाने भारलेला कलावंत कोणतीही कलाकृती सहज निर्माण करु शकतो. किरण बेर्डे सर असेच उच्च कोटीचे कलाकार आहेत. त्यांनी घडविलेले हजारो विद्यार्थी आज कलाक्षेत्रासह अन्य क्षेत्रातही आत्मविश्र्वासपुर्वक काम करताना दिसून येत आहेत.एक कलाशिक्षक म्हणून कलेसंबधीत विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी  उत्तम काम केले आहे.तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट सारख्या शासकीय चित्रकला स्पर्धेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन केले आहे.
                सुंदर हस्ताक्षर हा शिक्षकाचा एक अविभाज्य भाग आहे.हस्ताक्षराच्या उभ्या -आडव्या रेषांमधून त्या व्यक्तिमत्वाचा परिचय होतो.बेर्डे सरांचे हस्ताक्षर सुस्पष्ट, सुरेख आणि वाचनीय आहे.त्यांच्या अक्षरमोतींनीही अनेकांना प्रेरित केले आहे. रत्नागिरी जिल्हाच्या कलाक्षेत्रात यशस्वी रांगोळीकार शिल्पकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.व्यक्तीच्या छटा आणि रंग यांचा अचुक मेळ व्यक्तिचित्रणात साधावा लागतो.हा मेळ साधत अनेक महापुरूष, नामवंत कलाकार,राष्ट्रीय नेते,आदर्श राजकारणी यांच्या सुंदर कलाकृती त्यांनी साकारल्या.त्यांच्या प्रत्येक कलाकृतीची  रसिकांनी मुल्त कंठाने स्तुती केली आहे.पंचायत समिती लांजाच्या सभापती दालनातील छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे व अपना बाझार शाखा लांजातील स्वामी समर्थांचे त्यांनी रेखाटलेल्या तैलचित्रांनी अनेकांना भुरळ घातली आहे.मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्त्री धन, दे दणादण, तुझ्यावाचून करमेना, माझं घर माझा संसार,इजा बिजा तिजा या लोकप्रिय चित्रपटांसाठी सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.
    गेली अनेक वर्षे घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींच्या सुबक रेखाटनात त्यांनी स्वतंत्र शैली निर्माण केली आए.गणेशोत्सवांचे नावीन्यपूर्ण देखावे तयार करणे,विविध पुस्तकांची मुखपृष्ठे कल्पकतेबद्दल सजविणे,एकांकिका स्पर्धेचे नेपथ्य वेशभूषा तसेच विविध कार्यक्रमाच्या वेळी फेटे बांधणे, समाजप्रबोधन पर पोस्टर, घोषवाक्य निर्मिती, अशा बहुविध कॊशल्यातील प्राविण्यांमुळे बेर्डे सरांनी जिल्हा व राज्यस्तरिय स्पर्धामध्ये धवल यश प्राप्त केले आहे.ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतानाच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक संघटनांमधून बेर्डे सरांनी उल्लेखनीय काम केले आहे.लांजा तालुका कलाध्यापक संघ सरांच्या सर्जनशील उपक्रमामुळेच तालुक्यात नावारूपाला आला. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईच्या तळवडे, लांजा व कोट येथे संपन्न झालेल्या ग्रामीण  साहित्य संमेलनाच्या आयोजनात बेर्डे सरांनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली.यातून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळाले आहे.
       श्री किरण बेर्डे यांच्या रचनात्मक व दखलपात्र कामाची दखल घेऊन विविध संस्थानी त्यांचा सत्कार केला आहे.महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, कॅमलिन आदर्श शिक्षक ,लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, एज्युकेशन ,कल्चरल व हेरिटेज संस्था जावडेचा आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.शांत ,निगर्वी, मनमिळावू, मितभाषी, सर्जनशील किरण बेर्डे सर अनेकांसाठी आज मार्गदर्शक ठरले आहेत.
        श्री बेर्डे सर नुकतेच सेवानिवृत्त झाले.बेर्डे सरांसारख्या निस्पृह व गुणवत्तापूर्ण व्यक्तिमत्वाचा गॊरव म्हणून यावेळी लांजा तालुक्यातील त्यांच्या मित्रमंडळींनी लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली  एकत्रित येऊन त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता.हा सोहळा पाहून कृतकृत्य झाल्याची भावना श्री बेर्डे सर यांनी व्यक्त केली.
        सर,आपले सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य अत्यंत सुखाचे, आनंदाचे  आरोग्यदायी जावो व आपणाला दीर्घायुरारोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना।
               श्री विजय हटकर.







*राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्या वतीने नाटे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.*
📚📚📚📚📚📚📚
लांजा:-
      राजापूर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाटे परिसरातील विविध प्राथमिक शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने वह्या,पुस्तके, पाट्या, पेन्सिल, चित्रकलावही यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटे नंबरच्या ०१ च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे उपाध्यक्ष  सुभाष लाड,सचिव गणेश चव्हाण, नाटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुरूषोत्तम थलेश्री,विजय हटकर,शिवसंघर्ष मंडळाचे अध्यक्ष मनोज आडविलकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश लांजेकर, मुख्याध्यापिका सॊ.कथेकर मॅडम,निलिन करंजवकर,सुरेश पेडणेकर,तुकाराम चव्हाण,अशोक ब्रीद,दिवाकर मोदी, शाखाप्रमुख महेश कोठारकर,दत्तुकाका थलेश्री,नारायण ठाकूर,दिलीप लकेश्री,प्रकाश रजपूत ,संजय गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संघाचे उपाध्यक्ष सुभाष लाड यांनी सांगितले की,आम्ही लहान असताना आम्हालाही अशीच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या विविध लोंकांनी मदत केली म्हणूनच आज आम्ही शिक्षण पूर्ण करुन यशस्वी जीवन जगत आहोत .आपणही असेच मोठे होऊन यशस्वी होऊन इतरांना मदत सहकार्य करा.कारण इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यातच जीवनाची सार्थकता असते.यावेळी विजय हटकर,उपसरपंच पुरूषोत्तम थलेश्री ,रमेश लांजेकर आदि मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.




          कोकणातील दुर्गम परिसर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या राजापूर लांजा तालुक्यातील शिक्षणाची लालसा असणाऱ्या मुलांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते हे लक्षात घेऊन या दोन्ही तालुक्यातील सर्वात जुनी सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबईच्या वतीने दरवर्षी दोन्ही तालुक्यात शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन या विद्यार्थ्यांना पाठबळ दिले जाते.याही वर्षी नाटे परिसरातील आंबोळगड, कोपरी,पडवणे परिसरातील जि.परिषद नाटे नंबर ०१, प्राथमिक शाळा कोपरी, जि.प.प्राथमिक शाळा पडवणे, बांदेश्र्वर विद्यामंदिर, नाटे नगर विद्यामंदिर आदि शाळेतील इयत्ता ०१ ली ते इयत्ता ०८ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय हटकर तर निवेदन व आभार प्राथमिक शिक्षक सागर पाटील यांनी मानले.
*यशवंतगड नाटे येथे राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने वृक्षारोपण.*🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

लांजा:-
        राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई व ग्रामपंचायत नाटे च्या संयुक्त विद्यमाने नाटे ता.राजापूर येथील ऎतिहासिक यशवंतगडावर सृष्टीसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात भारतीय वृक्षांचे रोपण करण्यात आले.
          अर्जुना नदीतून होणाऱ्या जलवाहतुकीच्या देखरेखीसाठी खाडीमुखावर अर्जूना नदीचा पहारेकरी म्हणून १६ व्या शतकात विजापूरकरांनी यशवंतगड हा किल्ला बांधला.इंग्रजकालीन प्रसिद्ध राजापूर बंदर, जैतापूर बंदर व मुसाकाझी बंदराच्या संरक्षणाचे काम करणारा व समुद्रावर नजर ठेवणारा  हा किल्ला पश्चिम व दक्षिण बाजूंनी समुद्रवेष्टीत असुन याच्या पठाराकडील बाजूस १५ फुट रुंद व १५ फूट खोल खंदक आहे.१६९० साली कान्होजी आग्र्यांच्या ताब्यात आलेल्या या किल्ल्यावर एकेकाळि २४ तोफा होत्या. सात एकर परिसरात बालेकिल्ला व परकोट अशा स्वरूपात विस्तारित असलेला हा किल्ला ऎतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे.हे लक्षात घेऊन या किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी नुकतेच राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने येथे लक्ष्मणफळ व फणस या भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुभाष लाड,नाटे गावचे उपसरपंच पुरूषोत्तम थलेश्री, पोलिस उपनिरिक्षक दिलीप काळे,पोलिस उपनिरिक्षिका श्वेता पाटील,सरचिटणीस गणेश चव्हाण,विजय हटकर,शिवसंघर्ष मंडळाचे अध्यक्ष मनोज आडविलकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश लांजेकर,निलिन करंजवकर,दिवाकर मोदी नारायण ठाकूर, दिलीप लकेश्री,दत्तुकाका थलेश्री, सुधाकर पेडणेकर,अशोक ब्रीद, तुकाराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
              राजापूर लांजा तालुक्यातील  सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक,पर्यावरण क्षेत्रात सर्वात जुनी संस्था म्हणुन ओळख असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने दरवर्षी पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येते.याचाच एक भाग म्हणून यंदा नाटे येथील यशवंतगडावर ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. आगामी काळात अर्जुना नदीचा  पहारेकरी असलेल्या यशवंतगडाचे महत्व लक्षात घेऊन, इथल्या पराक्रम व संघर्षाचे प्रतीक असलेल्या  या किल्ल्यावरील स्मृती जपण्यासाठी व किल्ल्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार  असल्याची माहिती सुभाष लाड यांनी यावेळी दिली.*




Friday, August 9, 2019


कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समिती, साखरपा ता.संगमेश्र्वर या संस्थेचा २६ व्यक्ती व संस्था पुरस्कार सोहळा संपन्न.
-----------—--------—--------------------------------------
 "नानासाहेब शेट्ये साखरप्याचे लोकमान्य"
                                श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे.
------------------------------------------------------------------
श्री सुभाष लाड यांना व्यक्ती पुरस्कार व शिक्षण प्रसारक मंडळ, कीरबेट ता.संगमेश्वर या संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार प्रदान.
-----------------------------------------------------------.

साखरपा:-
       संगमेश्र्वर तालुक्यातील साखरपा गावचे जेष्ट समाजवादी नेते कै.नानासाहेब शेट्ये यांनी साखरपाच नव्हे तर संगमेश्र्वर तालुक्यातील जनतेसाठी भरिव योगदान दिले असुन समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांच्या कार्याला  लोकमान्यता मिळाली होती व त्यामुळेच ते साखरप्याचे " लोकमान्य" असल्याचे मत व्यक्त करित,नानासाहेब व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी नेमकि ०१ आॅगस्ट या एकाच दिवशी येते हे एक विधिलिखित साम्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक श्री श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे यांनी केले.
        कै. नानासाहेब शेट्ये यांच्या २६ व्या स्मृती दिनी ते बोलत होते. यावेळी कै.नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्काराचे वितरण त्यांच्या शुभहस्ते करण्यात अाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे होते. सोबत  व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब शेट्ये ,गजाभाऊ वाघदरे, प्रा.आबाजी सावंत,प्राचार्य आर.एल.पाटील,  नानांचे सुपुत्र रामाकांत  शेट्ये,युयुत्सु आर्ते,सुभाष लाड,गणपत शिर्के,अशोक जाधव,किरण बेर्ड,रमाकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी कै.नानासाहेब शेट्ये २६ वा व्यक्ती पुरस्कार राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष , मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री सुभाष लाड यांना तर २२ वा संस्था पुरस्कार शिक्षण मंडळ किरबेट,ता संगमेश्र्वर या संस्थेला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.व्यक्ती पुरस्कार प्राप्त सुभाष लाड यांनी सत्काराला उत्तर देताना रोजगार व व्यवसायाच्या संधी कोकणात उपलब्ध नसल्याने येथील तरूणांचा ओघ महानगराकडे वळला असुन गावं-खेडि ओस पडली आहेत.हि स्थिती बदलण्यासाठी गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त करित आपल्याला दिलेला हा पुरस्कार ह माझा नसून मला घडविणा- या रिंगणे गावातील सर्व  ज्ञात - अज्ञात ग्रामस्थांचा असुन या पुरस्कारासाठी माझी निवड करणाऱ्या संस्थेचे त्यांनी आभार मानले.तसेच संस्था पुरस्कार विजेत्या संस्थेच्या वतीने प्राध्यापक आबाजी सावंत यांनी पुरस्कार मिळाल्याने शिक्षण प्रसारक मंडळ ,किरबेटची जबाबदारी वाढली असुन पुढील काळात साखरपा परिसरातील विद्यार्थ्यांना  रोजगार मिळवून देणाऱ्या कॊशल्य शिक्षण देण्याचा  मानस व्यक्त केला.
     



या कार्यक्रमात पंचक्रोशीतील इयत्ता ०७ वी मधील प्रत्येक शाळेतील प्रथम,इयत्ता १० वी मधील प्रथम,इयत्ता १२ वी प्रत्येक शाखेतील प्रथम,पदवी परीक्षेतील प्रथम व स्काॅलरशिप प्राप्त सर्व  गुणवंत विद्यार्थ्यांचाहि प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. वेळी  मानपत्रांचे  वाचन व लेखन करणाऱ्या विजय हटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष केसरकर व निवेदन गणपत शिर्के यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती शिंदे, रमाकांत शिंदे,बापु शेट्ये,विरेंद्र शेट्ये,रमाकांत शेट्ये ,दीपक शेट्ये,प्रसाद कोलते,अब्दुल हमीद खतीब ,मनोहर पोतदार, सुहास कदम,मिलिंद भिंगार्डे,संतोष केसरकर यांनी विशेष मेहनत घेतली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻