Saturday, February 10, 2024

येळवणचे शिक्षणमहर्षी चंदुभाई देशपांडे.


श्री चंद्रकांत शांता केशव देशपांडे -येळवण,राजापुर



 राजापूर तालुक्यातील येळवण गावचे सुपुत्र शिक्षण तज्ञ गोरगरिबांचे आधारवड , ८२ च्या उंबरठ्यावर असलेले व्रतस्थ  व्यक्तिमत्व श्री चंद्रकांत शांता केशव उर्फ चंदुभाई देशपांडे यांना दक्षिण रत्नागिरितील  अमृत महोत्सवी वर्षपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा..


      स्वर्गीय सुंदर अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी पाचल,रायपटण, तळवडे, सौंदळ,येळवण ही ऐतिहासिक भूमी वसली आहे.यातीलच  येळवण या छोट्याश्या गावी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वटपौर्णिमेच्या शुभ दिनी अर्थात १७ जून १९४३ रोजी शांता केशव दांपत्याच्या पोटी चंद्रकांत देशपांडे यांचा जन्म झाला.कुटुंब सुसंस्कारित असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना ज्ञात होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाला वेळेत शाळेत दाखल केले. येळवण गावातच पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाचवी ,सहावीचे     रायपटण ,सातवी राजापूर ,आठवी-नववी सरस्वती विद्या मंदिर पाचल, दहावी- अकरावी मुंबई तर पदवीचे शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे त्यांनी पूर्ण केले. तसेच डिप्लोमा इन टीचिंग(शिक्षक पात्रता ) पुणे विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह राज्यात प्रथम प्राप्त करून त्यांनी शिक्षकी पेशात पदार्पण केले. चंदुभाईंना स्वतःला दुर्गम खडतर परिस्थितीत झगडत शिक्षण घ्यावे लागले होते. ग्रामीण भागाचा विकास शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय होणार नाही याचे आत्मभान त्यांना त्यातून आले,त्यामुळेच ग्रामीण विकासासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.


        शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यात प्रथम आल्याने चंदूभाईंना रत्नागिरीतील सुप्रसिद्ध रा.भा. शिर्के प्रशालेत १९६३ साली नोकरी मिळाली.शिक्षक म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. मात्र चंदूभाईंचा पिंड नोकरी करून घर- संसारात रममाण होण्याचा नसल्याने,सामाजिक कार्यकर्त्याचा असल्याने साधारण १९६७ पर्यंत चार वर्षे रत्नागिरीत नोकरी करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी 'ग्रामीण समाज प्रबोधनीच्या' माध्यमातून शाळा स्थापनेची मालिकाच त्यांनी सुरू केली. त्यांनी त्यांच्या तरुण्यातील सारी शक्ती शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीच खर्च केली. या शाळा स्थापनेची सुरुवात त्यांनी १९६४ ला मुंबई-गोवा महामार्गावरील 'ओणी' या गावापासून सुरू केली. त्यानंतर संगमेश्र्वर तालुक्यातील खाडिपट्ट्यात फुणगूस, येळवण, सौंदळ या ठिकाणीही माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तर मिळंद, तुळसवडे,ओझर या शाळांच्या उभारणीसाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.शाळा सुरू केल्यानंतर त्या प्रशालेची घडी बसवण्यासाठी चंदूभाई स्वत: पत्नीसह त्या त्या ठिकाणी अध्यापकीय सेवा करीत असत. शाळा उघडणं ,चालवणं म्हणजे तारेवरची कसरत.स्वतः उपासमार करून हॉस्टेलच्या मुलांची जेवणे करणे, भाकऱ्या थापने यासारखी काम करणारे चंदूभाई त्या त्या शाळेतील मुलांचे आईसारखे संगोपन करायचे.शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचवण्याचे महान कार्य त्यांचे हातून घडलेले आहे आणि म्हणूनच दक्षिण रत्नागिरीतील खेड्यापाड्यातील जनतेसाठी ते शिक्षण महर्षी झाले.


     चंदूभाई एक सच्च्या शिक्षकासोबत सर्जनशील कवी, लेखक, संपादक, पत्रकार, स्तंभ लेखकही आहेत. रत्नागिरीत काम करत असताना त्यांनी स्थानिक 'साद'नामक साप्ताहिक सुरू केले आणि लेखन करायला सुरुवात केली.संपादक- पत्रकार या नात्याने लेखन करताना अन्यायाची चीड, गोरगरिबांचे प्रश्न राजकीय नेतृत्वासमोर त्यांनी वस्तुनिष्ठपणे मांडले.यासाठी रत्नदुर्ग, नव कोकण, समानता,आरसा, रत्नागिरी टाइम्स यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीच्या माध्यमांमधून त्यांनी विपुल लेखन केले. शैक्षणिक, सामाजिक प्रश्न, व्यसनमुक्ती,साने गुरुजींचे शैक्षणिक सामाजिक विचार, कोकण रेल्वे यासारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले.राज्याच्या विधानभवनालाही त्यांच्या लेखनाची दखल घ्यावी लागली.



          दै.सागर चे संंपादक निशिकांत जोशींसमवेत.

        चंदूभाई ना बालपणापासूनच अनेक स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार आठल्ये गुरुजी,स्वा.आबा नारकर,नाना वायकुळ बॅ.नाथ पै आदी समाजसेवकांचा सहवास लाभल्याने सामाजिक विधायक विकासासाठी आपण जगले पाहिजे ही सामाजिक समरसतेची भावना त्यांच्यात निर्माण झाली, वाढीस लागली. यामुळे स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी आपले आजवरचे सारे जीवन समाजकार्यासाठी वाहिलेले दिसून येते. समता, बंधुता, मानवता मूल्याने त्यांचे जीवन भारलेले आहे.


    समाजवादी विचारांचा प्रभाव असणरे चंदूभाई देशपांडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.शैक्षणिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात देखील त्यानी उल्लेखनीय काम केले आहे गावांसाठी किंवा परिसरांसाठी,शेतकऱ्यांसाठी मदत व्हावी म्हणून विविध कार्यकारी संस्था, साहित्य- कला प्रवर्तक सहकारी संस्था, फलोत्पादन व फळ प्रक्रिया संस्था, विद्यार्थी ग्राहक भांडार ,युवक मंडळे ,साने गुरुजी कथामाला,  समाज क्रांती दल अशा विविध सामाजिक कामातही चंदूभाईंनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे.असा हा चतुरास्त्र माणूस आपल्या पक्षात यावा अशी अनेक मान्यवरांची नेत्यांची इच्छा त्य काळात असे. साने गुरुजी कथामाला या उपक्रमात अनेक पक्षातील बडीबडी मंडळी चंदूभाई सहभागी करून घेत असत.समाजवादी,काँग्रेस,शिवसेना अशा पक्षांबरोबर काम करण्याची संधी त्यांना लाभली.यातुन अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांची मैत्री झाली. या मैत्रीतून अनेक सामाजिक,शैक्षणिक कामे ही झाली हे नाकारून चालणार नाही.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील आपले हक्काचे असे जवळचे रेल्वे स्टेशन मिळावे यासाठी सौंदळ येथे रेल्वे स्थानक व्हावे याचे आग्रही भूमिका सर्वप्रथम चंदूभाई देशपांडे यांनीच मांडली व त्याचा पाठपुरावा केला. प्रसंगी सन्माननीय तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहेब यांची त्यांनी ग्रामस्थांसह भेट घेतली आणि सौंदळ रेल्वेस्थानकाची आवश्यकता पटवून दिली. रेल्वेमंत्री नाम.प्रभुंनी देखील चंदुभाईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे सौंदळ रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लावला.चीन भारत युद्ध असो व भारत पाकिस्तान युद्ध.प्रत्येकवेळी चंदुभाईंनी आपापल्या परीने ग्रामीण भागात शाहिरी व नवभारत कलापथकाच्या माध्यमातून  देशभक्तिचा प्रचार केला तसेच शहिद सैनिकांसाठी निधी संकलनही केले.कला क्षेत्रातही ते पुढेच होते.एक उत्कृष्ठ ढोलकीपटु म्हणून सा-या रत्नागिरीला त्यांची ओळख होती,तशीच साहित्यिक म्हणुनही ओळख होती.तिरके कवडसे,सहवास दादा कोंडकेंचा ,नानाई कवितासंग्रह ,समतेची गीते हि त्यांची पुस्तके विशेष गाजली.एकुणच जवळपास सहा दशकांहुन अधिक काळ चंदुभाई रत्नागिरीच नव्हे तर कोकणातील ग्रामीण विकासासाठी निरपेक्षपणे कार्यरत राहिले आहेत.

------------------

त्यांच्या या योगदानामुळेच ते सर्वासाठी दिपस्तंभ ठरतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन संघाचा यंदाचा 'जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवनगौरव पुरस्कार२०२४' देऊन त्यांना सन्मानित करण्याचे वृत्त प्रसिद्ध होताच चंदुभाईंवर प्रेम करणा-या असंख्य मंडळीनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

--------------

     शिक्षणक्षेत्रासह कोकणातील ग्रामीण विकासासाठी कार्यमग्न असलेले चंदुभाई देशपांडे वयोमानानुसर आता थोडे थकले आहेत.मात्र आजवरच्या वाटचालीत सेवा परमो धर्म मानत लौकिक लाभात न गुंतता आत्मसमाधानात धन्यता मानणा-या चंदुभाईंसारख्या ज्येष्ठांकडे पाहिल्यानंतर आयुष्याचा खरा अर्थ उलगडायला मदत होते.दुस-याला समृद्ध करित कसे जगावे याचा परिपाठ देणा-या चंदुभाईंसारख्या व्रतस्थ व्यक्तिमत्वांकडुन समाजाने हेच शिकायला हवे!


विजय हटकर-लांजा

पत्रकार।संपादक.


https://www.facebook.com/share/v/MPtj75yGQnb4QF8R/?mibextid=2JQ9oc


समधुर ढोलकीवादन करताना चंदुभाईंच्या विडिओची वरिल लिंक


            हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसमवेत


सौंदळ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर...


चंदुभाईंचा सुखी परिवार.

प्रतिभावान शाहीर : मधुकर खामकर.

 प्रतिभावान शाहीर : मधुकर खामकर.


          महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती,लोकपरंपरेतील महत्त्वाचा घटक म्हणजे शाहीर.डफावर थाप मारून ताठ मानेनं आणि उंच ताणेनं लोकांच्या मनातील भावना आपल्या कथनातून दमदारपणे शाहीर मांडतो. 'पेटून उठतो तो शाहीर.'शाहीराने समाजाला संस्कार दिले,संस्कृती जपली.म्हणून जनमाणसाला शाहिराची ओढ लागली.शाहीर त्यांना आपलाच वाटू लागला. अनेक कविंनी या शाहिरांचं महत्त्व आपल्या कवणातून व्यक्त केलं आहे.

        भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा,

        शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा।।

           थोर कवी गोविंदाग्रज यांनी 'मंगल देशा पवित्र देशा' या महाराष्ट्र गीतातील वरील दोन ओळीतून शाहिरांचा गौरव केला आहे. महाराष्ट्रात शाहीरांचे उच्च स्थान आहे,हे ही यातून स्पष्ट होते. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहिरांचे योगदान मोलाचे आहे.१९४७  मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आक्रमणे काही थांबली नव्हती. आजच्यासारखी विपुल मनोरंजनाची साधने त्यावेळी नव्हती. संपर्क साधण्यासाठी आकाशवाणी हेच फक्त माध्यम होते.एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना दुसरीकडे सावधगिरीही तेवढी महत्त्वाची होती. चौका-चौकातल्या जाहीर सभा बरेच काही सांगून जात असल्या तरी 'जिथे मनोरंजन तिथे गर्दी'अशी आजची वृत्ती त्याकाळी ही होती.त्यामुळेच अशा प्रचारासाठी स्वतंत्र भारताला शाहीर महत्त्वाचे वाटत होते. एकीकडे भारताच्या संरक्षणाचे पोवाडे गायले जायचे तर दुसरीकडे संवाद साधून तिच्या रक्षणाचे दाखले दिले जायचे.एकंदरीत काय तर ही जनजागृती या शाहीरंकडून होत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही पहिल्या फळीत हेच शाहीर होते.त्यावेळी शाहीर आत्माराम पाटील ,शाहीर साबळे,शाहीर अमर शेख यांचे रसिक मनावर गारुड होते.


        त्यावेळी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन शाहीर शंकरराव खामकर यांचा उदय झाला.रत्नभूमीतील लांजा तालुक्यातील शिपोशी या गावचे शंकरराव सुपुत्र.शाहीर कलेची कोणतीही परंपरा नसलेल्या कोकणात नमन,शक्ती-तुरा सामना, दशावतार यांचीच परंपरा.शंकरराव खामकर हे शक्ती तुऱ्यातील शाहीर. त्यांनी गावातील होतकरू कलाकारांना एकत्र करून गावातच तमाशाचा फडही उभारला होता. पुढे कोकणातील कला जपण्याचा ध्यास घेतलेल्या शंकररावानी मुंबईत दाखल झाल्यावर लोककलांपेक्षा शाहीरी कला ही मुंबईकरांचीच नव्हे तर अख्या महाराष्ट्राची गरज असल्याचे लक्षात येतात शाहिरी कलेतून रसिकांची सेवा करण्याचे निश्चित केले. भायखळ्यातील मफतलाल मिल नंबर-०३ मध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या शंकररावानी अल्पावधीतच मुंबईत शाहीर म्हणून नावलौकिक कमावला. पुढे गिरण्या बंद झाल्यानंतर  शंकररावांनी 'शाहीर खामकर आणि मंडळी' या संचाची उभारणी केली.आपल्या मुलांनीही याच क्षेत्रात काम करावं आणि नाव कमवावं अशी शंकररावांची इच्छा होती.त्याप्रमाणे थोरले चिरंजीव राजाभाऊ त्यांच्याकडुन गायन कलेचा वारसा घेऊन त्यांच्यासोबतीने काम करु लागले.राजाभाऊंनी शाहीर क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले.राजाभाऊं पाठोपाठ शाहिरी क्षेत्रात उतरलेल्या मधुकर खामकर यांनीही पुढे शाहिरी क्षेत्रातच कार्यरत रहात वडिल स्व.शंकरराव खामकर व बंधू  स्वर्गीय राजाभाऊंच्या कलेचा वारसा जपत नावलौकीक प्राप्त केला आहे.

              स्वर्गीय शाहीर राजाभाऊ खामकर.

       शाहीर मधुकर खामकर यांचा जन्म घोडपदेव मध्ये झाला. महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या सोबत सांस्कृतिक चळवळ त्यांनी जवळून पाहिली होती. अनुभवली होती. पुढे पठाणवाला नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेताना त्यांनी वडिलांच्या या कला क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णय घेतला. बालपणी त्यांनी 'शंभूराजे', 'महाराष्ट्राचा राजा' अशा नाटकांमधून त्यांनी भूमिकाही केल्या होत्या.१९७० पासून म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी ज्येष्ठ भाऊ राजाभाऊ सोबत त्यांनी शाहीर क्षेत्रात सहकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. या दोन्ही बंधूंनी वडिलांची शाहीरी कारकीर्द थोड्या काळासाठी पाहिली होती. वडिलांच्या निधनानंतर राजाभाऊ आणि मधू यांनी हा वारसा पुढे चालवला. झंजावती दौरे केले.खणखणीत आवाज त्याला स्वतःच्या शब्दांची साथ अविष्काराचे सांगड मिळत गेली.त्यांचा झंझावात महाराष्ट्र व्यापून होता. सांस्कृतिक चळवळीत योगदान देण्यासाठी ज्या महत्त्वाच्या शाहिरांची नावे घेतली जात होती त्यात खामकर बंधू आघाडीवर होते. खामकर बंधूंचा हा झंजावात सुरू असताना शाहीर राजाभाऊंचे निधन झाल्याने ही 'शाहीर खामकर आणि मंडळी'  या पथकाची सारी जबाबदारी शाहीर मधुकर खामकर यांच्यावर येऊन पडली.


   राजाभाऊंच्या निधनाने फड बंद होतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. शाहिरी कार्यक्रम लोकरंजन करू शकत होते मात्र स्वतःचा आणि साथीदारांचा कुटुंबप्रपंच चालवू शकत नव्हते. त्यामुळे ही खामकरांची शाहीरी परंपरा सुरू राहते की नाही यावर शंका निर्माण झाली. राजाभाऊंचा लोकसंपर्क दांडगा होता. शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भरडकर यांना राजाभाऊ विषयी अास्था आणि प्रेम होते. त्यांनी राजाभाऊंचे नाव एखाद्या चौकाला देऊन अथवा त्यांचा पुतळा उभारून त्यांचे स्मारक उभारण्याऐवजी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण ठेवावे असा सल्ला शाहीर मधुकर खामकर यांना दिला.त्यानुसार मधु खामकर यांनी संचाची सारी जबाबदारी आपल्या शीरावर घेतली. वडिलांची परंपरा राजाभाऊंनी सुरू ठेवली होती आता भावाची परंपरा शाहिर मधुकर पुढे चालवीत आहेत.


      कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी शाहीरी कार्यक्रम पुरेसे नव्हते त्यामुळे मधु खामकर यांनी बेस्टमध्ये नोकरी धरली. पण तिथेही त्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवली.बेस्टच्या कला विभागाचे ते चार वेळा मानद सचिव होते. 'बेस्ट कलारजनी' हा अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. आकाशवाणी, दूरदर्शन, लोकसंगीत, कामगार विश्व आदी विभागात लोकनाट्य व लोककलेचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यावेळी पूर्ण वेळ शाहीरी कार्यक्रम करावेत असेही त्यांच्या मनात आले पण वडिलांची गिरणी बंद झाल्यावर काय स्थिती झाली होती हे त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.

       

         शाहीर मधुकर खामकर यांनी आजवर लोकनाट्याचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.निर्माता,दिग्दर्शक, लेखक, गायक या साऱ्याच भूमिका त्यांनी यशस्वी पार पाडल्या आहेत.' हितच हाय पण दिसत नाय', 'कसा चोरून बघतोय मेला', 'केलम म्हणून झालं', 'तुझं तूच बघ', 'वाचला जीव लाखाचा' , 'आयेचा कोप', 'कुंभकर्ण जागा झाला'  ही काही त्यांच्या  महत्त्वाच्या लोकनाट्यांची नावे. 'कस्तुरीमृग' ,  'मराठमोळ सोनं', 'महाराष्ट्र दर्शन',  'रानपाखरा आणि मराठी लोकधारा' इत्यादी पारंपारिक लोकनृत्य व विनोदाचे झालर असलेले कार्यक्रम सादर करून महाराष्ट्राच्या लोककलांचे मनोज्ञ दर्शन शाहीर मधुकर खामकर यांनी समाजाला घडवलं. 'केलं म्हणून झालं' व 'आईचा कोप' या लोकनाट्यांचे लेखन त्यांचेच. याशिवाय 'कस्तुरीमृग' , 'रानपाखरा' ,  'मराठमोळं  सोनं, 'मैफल' , 'चोर चोर' आणि 'सौभाग्यच दान' ही त्यांची लिखित साहित्य रचना.

     प्रसिद्ध अभिनेता बेस्टमधील सहकारी शरद पोंक्षेसह

                शाहीर मधुकर खामकर यांनी आपली शाहिरी व लोककलेची परंपरा दिल्लीपर्यंत फडकावली आहे.१९९४ साली इंडियन नॅशनल थिएटर तर्फे नवी दिल्लीत व्यापारी प्रदर्शनात त्यांनी लोकनाट्य सादर केले. पुढे दोन वर्षांनी १९९६ साली सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे दिल्ली येथे व्यापारी प्रदर्शनात त्यांनी महाराष्ट्राची लोककला सादर केली. त्याच्यात पुढच्या वर्षी म्हणजे १९९७ मध्ये दिल्ली येथे सांस्कृतिक संचालनालयातर्फे "फुलोरोंकी की सैर" या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक त्यांनी मिळवून दिला. याशिवाय गुजरात,कर्नाटक येथेही त्यांनी कार्यक्रम सादर केले.


          शाहीरी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी सध्या ते 'शाहिरी फुलोरा' हा कार्यक्रम सादर करतात. पाच-सहा शाहीरांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात त्यांचे बंधू शशिकांत खामकर, मुलगा राजन खामकर, राजाभाऊंचा चिरंजीव संजय खामकर यांचाही समावेश आहे.बेस्ट मधील नोकरीच्या निवृत्तीनंतर शाहीर मधु खामकर यांनी सामाजिक,सांस्कृतिक चळवळीत स्वतःला गुंतवून घेतले, सांस्कृतिक कार्य संचलनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शाहिरी व नाट्य प्रशिक्षण शिबिरात त्यांनी व्याख्याता व मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली आहे. अखिल भारतीय मराठी शाहीरी परिषद, घोडपदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,जनजागृती व्यायामशाळा, बालविकास मंडळ अशा विविध संस्थांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे व आजही सांभाळत आहेत. त्यांच्या आजवरच्या वाटचालीची दखल घेउन अनेक संस्थांनी त्यांना सन्माइत केले आहे. लेंगा ,सदरा,डोळ्यावर जाड काचेचा चष्मा हा कलेचा वारकरी अजुनही कलेचा पताका घेऊन मिरविताना दिसतो.

सोंगाड्या दादा कोंडके कलागौरव पुरस्कार स्वीकारताना शाहीर मधु खामकर

आज पंच्चाहत्तरीचा अमृतटप्पा यशस्वीपाणे पार करण्याच्या उंबरठ्यावर असलेले शाहीर मधुकर खामकर सक्रियपणे काम करीत आहेत.सोबत इतर उपक्रमातही तेवढ्या सक्षमतेने वावरत आहेत. बदलत्या काळाप्रमाणे नवीन विषय घेऊन ते रसिकांसमोर आजही जात असतात.मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात आज जी शाहिरी टिकून आहे ती शाहीर मधू खामकरांसारख्या धडपड्या शाहीरांमुळेच.एखाद्या विषयाचा  ध्यास घेऊन त्यातल्या व्यासंगासाठी ,प्रसारासाठी आयुष्य वाहून घेण्याची जुनी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात 'शाहीर खामकर आणि मंडळी ' या संचाच्या माध्यमातून शाहिरी लोककलेसाठी अख्खं आयुष्य समर्पित करणा-या, महाराष्ट्रधर्माचा निष्ठेने प्रसार करणा-या शाहीर मधुकर शंकरराव खामकर यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा रजनी गोपाळ पांचाळ जीवनगौरव पुरस्कार २०२४ जाहिर झाल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन! शाहीर मधुकर खामकर त्यांच्या कार्यमग्न जीवनातुन शतकोत्तराचे प्रवासी व्हावेत हीच सदिच्छा!

💐💐💐

विजय हटकर

लेखक।संपादक।पत्रकार.

-------------------

https://www.facebook.com/share/p/2HgGEkS7eC8UJVB8/?mibextid=2JQ9oc

शाहीर खामकर यांच्याकार्याची दखल


निवडक क्षणचित्रे :-

आनंदयात्री कार्यक्रमात एका वृद्धेसह शाहीर मधु खामकर.

                               प्रसन्न मुद्रेत.

                बेस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमात


    आराध्य दैवत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त अभिवादन करताना एक सच्चा शिवसैनिक.


          शाहिर खामकर आणि मंडळी चेे जुने पोस्टर्स



शाहिरी लोकरंग कार्यक्रमाचे पोस्टर्स.

मान्यवरांसह हृद्य आठवणी


सहचारिणी व बच्चे कंपनीसह शाहीर मधु खामकर.

Thursday, February 1, 2024

सूत्रधारांच्या श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव.

  श्रद्धातीर्थाचा रौप्यमहोत्सव...

श्री विराट विश्र्वकर्मा मंदिर ,रिंगणे सुतार वाडीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने...

मानवी इतिहासात लागलेला क्रांतिकारी शोध म्हणजे चाकाचा. मानवी जीवनात क्रांती घडवणारी घटना म्हणून इतिहासाने या शोधाची नोंद केली आहे.चाकाच्या शोधाने आद्य बैलगाडींचा जन्म झाला व कृषी संस्कृतीत आरी असलेली चाके बनवणाऱ्या कुशल कारागिरांना महत्त्व प्राप्त झाले. काष्ट अर्थात लाकडापासून चाकांसह विविधांगी वस्तू, हिंदू संस्कृतींची गावागावात असलेली आध्यात्मिक केंद्रे अर्थात मंदिरांची उभारणी होऊ लागली. सभामंडपातील कोरीव शिल्पांकित स्तंभ अर्थात खांब, दारे खिडक्या बनविणे, गृहपयोगी पात्रे तसेच रोजच्या जीवनातील विविध लाकडी वस्तू बनवणे ,समुद्रप्रवासासाठी नौका बनविणे या गरजेपोटी  काष्टकाम करणाऱ्या कारागिरांची भरभराट झाली. प्रभू विश्वकर्माला आपलं आराध्य दैवत समजणारा इसवी सन पूर्व दहा हजार वर्षांपूर्वीच्या काष्ट युगातील हा वर्ग म्हणजेच पांचाळ सुतार समाज होय. सिंधू संस्कृतीत तर भारतातील सुतार कामाने कळस गाठल्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आलेल्या वैदिक, ऋग्वेद काळातही भरभराटीला आलेल्या या व्यवसायामुळे पांचाळ सुतार समाज संपूर्ण भारतभर पसरला. यातुनच एक ज्ञाती म्हणून सुतार ज्ञातीचा उगम हा दहाव्या शतकात झाला.

प्रभू परशुरामाने निर्माण केलेल्या अपरांत भूमीत म्हणजेच स्वर्गीय सुंदर कोकणातही गावा-गावात बारा बलुतेदारांमधील प्रमुख समाज म्हणून पांचाळ सुतार समाज मोठ्या संख्येने स्थिरावला व त्या त्या गावाला समृद्ध करण्यात हातभार उचलला.मयंपांचाळ समाजाची अशीच एक वस्ती  लांजा तालुक्यातील पूर्व भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या रिंगणे गावामधून वाहणाऱ्या जीवनदायीनी 'नावेरी' नदीच्या काठावर अनेक शतके वसलेली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात साधारण साठच्या दशकात आपल्या स्वप्नांना ,आकांक्षाना विधायक दिशा देण्यासाठी मुंबई महानगरात स्थिरावलेल्या इथल्या चाकरमानी मंडळींनी सन १९५७ ला श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडीची मूहूर्तमेढ रोवली व सामाजिक विकासाला ख-या अर्थाने सुरवात झाली.पुढिल चार दशके म्हणजेच १९९० पर्यंत छोटे मोठे उपक्रम घेऊन तत्कालीन समाजबांधवांनी संस्था सक्रिय ठेवली होती,मात्र चाकरमान्यांसह रिंगणे सुतारवाडीतील ग्रामस्थांना एक सल बोचत होती,ती म्हणजे आपल्या आराध्य दैवताचे एक छानसे मंदिर न उभारले गेल्याची.या स्वप्नाला दिशा मिळाली ती सन १९९९ मध्ये.एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेले हे वर्ष ख-या अर्थाने रिंगणे सुतारवाडी च्या इतिहासातील सुवर्णपान ठरले. जिल्ह्यातील इतर गावा-गावात डौलाने उभ्या असलेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या मंदिरांप्रमाणे रिंगणे सुतारवाडितही श्री देव विश्र्वकर्मा चे मंदिर उभारुन उत्सव साजरा करण्याचा संकल्प श्री नामदेव धोंडू पांचाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या गावक-यांच्या सभेत एकमुखाने करण्यात आला.या संकल्पाला अनुसरुन १४ फेब्रुवारी १९९९ रोजी नामदेव पांचाळ यांच्या निवासस्थानी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विश्र्वकर्मा प्रभूंचे प्रतिमापुजन करुन रिंगणे गावी श्री विश्र्वकर्मा जयंती उत्सवाची सुरवात करण्यात आली.

   

     गावक-यांनी केलेल्या संकल्पाला मुंबईकर चाकरमान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.व १९ नोव्हेंबर १९९९ ला ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या सभेत श्री विश्र्वकर्मा प्रभूचे मंदिर बांधण्याच्या नियोजनाला ख-या अर्थाने दिशा देण्यात आली.जागेचा प्रश्न तुकाराम धोंडू पांचाळ या दात्याने सोडविल्याने मंदिराचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. स्थापत्यशास्त्रीय ज्ञान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी २०×३५ फूट लांबी असलेल्या पायावर नियोजित मंदिराची सुरेख प्रतिकृती तयार केली व २४ नोव्हेंबरला नियोजित मापात चरी खोदून २७ नोव्हेंबर १९९९ ला नारायण सदाशिव पांचाळ यांच्या शुभहस्ते कोनशीला समारंभ करण्यात आला.अशा प्रकारे समाज बांधवांच्या अथक मेहनतीतून त्याच ठिकाणी काही दिवसातच मंदिराच्या पायाच्या पायाचे काम पूर्णत्वास गेल्याने तेथेच दुसऱ्या वर्षीचा उत्सव प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमापूजन व सत्यनारायणाच्या महापूजेने उत्साहात साजरा करण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे समाजाकडे काहीही शिल्लक नसताना दैवतांच्या आशीर्वादाने असंख्य ज्ञात-अज्ञातांचे सात्विक हात पुढे आल्याने  सन २००१ मध्ये विश्वकर्माच्या संगमरवरी मूर्तीसहित मंदिराचे काम पूर्णत्वास गेले.हे समस्त सुतार समाज बांधवांच्या एकीचे यश होते. 


       मंदिराच्या शोभेत वाढ  होण्यासाठी समोर सुंदर असे प्रांगण अत्यावश्यक असल्याचे लक्षात येतात विष्णू शिवराम पांचाळ व गणपत वासुदेव पांचाळ यांनी मंदिरासमोरील जागा दिल्याने तोही प्रश्न मिटला आणि रिंगणे गावात मंदिर बांधण्याचे समाजबांधवांचे स्वप्न पूर्ण झाले.देवाशी अखंड भक्तिचे नाते ठेवले की संकल्प पूर्णत्वास जातात,याची सुखद अनुभूती सर्व समाजबांधवांना यानिमित्ताने आली. सर्वांचेच या निमित्ताने धार्मिक सामाजिक अभिसरण होण्यास मदत झाली. स्वतःच्या वाडीत हक्काचे श्रद्धातीर्थ असल्याचा आनंद वेगळाच असतो. या देवभूमीच्या प्रांगणात देवाला पालखीत बसवून पालखी नृत्याचा आनंद जुन्या नव्या पिढीला आज घेता येतो आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमा निमित्ताने समाजातील मुलांचे अंगीभुत कौशल्य व सांस्कृतिक गुणांचे उन्नयन होत आहे .संघटन असेल तर प्रत्यक्ष काय करता येते याचा मूर्तीमंत दाखला मंदिर निर्मितीने दिल्याने समाज बांधवांची वाढलेली 'एकी' आज लक्षवेधी ठरते आहे.मंदिराच्या रौप्य महोत्सवी वाटचालीतील  साक्षीदार असलेल्या समाजबांधवांच्या चेह-यावरिल अवघे मन तृप्त झाल्याचा झळकणारा आनंद  आपल्याला त्यांचे जीवन कृतार्थ झाल्याचा सुखद प्रत्यय करुन देतो अाहे.


    सुतार समाजाच्या दृष्टिने भूषण ठरलेल्या या ऎतिहासिक घटनेला यंदा २५ वर्षे पुर्ण होत आहेत. श्री विश्र्वकर्मा मंदिराचे हे  रौप्यमहोत्सवी वर्ष सर्व समाजबांधव उत्साहात साजरे करीत आहेत. प्रसन्न मुद्रेने स्थानापन्न झालेल्या प्रभू विश्र्वकर्माच्या आशीर्वादाने या रौप्य महोत्सवी वाटचालीत रिंगणे  सुतार वाडीतील कर्तृत्ववान पिढीने मुंबई पुण्यासारख्या महानगरांत विविध शासकीय तसेच खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्या,बँकामध्ये तसेच उद्योजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमठविली आहे. खरं तर प्रभू विश्र्वकर्माने सुतार समाजाला भरभरुन दिले आहे.आज मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मागील दोन तपांत श्री जयभवानी मयंपांचाळ उत्कर्ष मंडळ,रिंगणे सुतार वाडिने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही नाविन्यपुर्ण उपक्रम राबवल्याचे अभिमानाने सांगावेसे वाटते.

     

        आजच्या श्री प्रभु विश्र्वकर्मा मंदिर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याला उपस्थित मान्यवर ,पाहुणे,ग्रामस्थ, ज्ञातीबांधव या सर्वांनाच रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाच मानवाच्या विकासाचा सुत्रधार राहिलेल्या या समाजाचे, याच समाजातील देखण्या ,कल्पक हातांनी निर्मिलेले प्रभू विश्र्वकर्माचे हे पवित्र श्रद्धातीर्थ रौप्य महोत्सवानंतरही असेच निरंतर आनंदसाधनेचे केंद्र बनुन कलासक्त मानवाच्या विकासासाठी असे सुवर्ण,अमृत,शताब्दी महोत्सव साजरे करो ही सदिच्छा!!


💐💐💐💐💐


विजय अरविंद हटकर-लांजा

लेखक।पत्रकार।संपादक.

चलभाष -८८०६६३६०१७