Friday, October 27, 2023

वैभवशाली परंपरा असलेले जव्हार संस्थान

 वैभवशाली परंपरा असलेले जव्हार संस्थान 



भारताच्या इतिहासात अनेक राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली,मात्र सर्वात जास्त काळ बहुजनांचे राज्य असलेली सलग चालत आलेली मोठी वैभवशाली परंपरा असणारे संस्थान म्हणजे राजे मुकणे यांचे जव्हार संस्थान होय.जगामध्ये जव्हार हे एकमेव संस्थान आहे की ,ज्यामध्ये सलग ६४२ वर्षे एकाच कुटुंबाकडे राजसत्ता अबधित राहिली आहे.इंग्लंड ,रशिया,जर्मनी ,फ्रान्स  किंवा कुठलीही राजसत्ता १८० वर्षापेक्षा अधिक काळ टिकलेली नाही.त्यामुळेच जगाच्या इतिहासात एकाच संस्थानाची राजसत्ता असलेल्या जव्हार संस्थानचे नाव अभूतपूर्व असेच मानावे लागेल.


ठाण्यावर शिलाहार राजांनी ४५० वर्षे राज्य केले,पण शिलाहारांचा राजवाडा वा त्याचे अवशेष कुठे पाहण्यात नाहीत.किंबहुना त्याआधी आणि त्यानंतर इथे अनेक राजवटी नांदल्या, त्यांचेही राजवाडे वा वाडे कुठे दिसत नाहीत. पण मध्ययुगात ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या उंच पठारावर एका आदिवासी राजाचे राज्य होते. हा पठारी भाग म्हणजे जव्हार होय. या जव्हारला जुना आणि नवा राजवाडा आहे. ठाणे जिल्ह्यातील राजघराण्यांपैकी हा एकुलता एक राजवाडा मोठ्या दिमाखात उभा आहे.' महिकावतीची बखर ' यामध्ये जी ग्रामनामे येतात त्यात जव्हारचा उल्लेख ' यवसाहार प्रेक्षादिगण' असा केला आहे.येथे कातकरी व डोंगर कोळी लोकांची मूळ वस्ती आहे.


जव्हार संस्थानाची स्थापना -

  जव्हार संस्थान इ.स.१३४३ मध्ये जयबा नावाच्या मूळ पुरुषाने स्थापन केले.इ.स.१२९४ ते १३०० या कालखंडात अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात 'खिरविरे' गावाजवळ 'कुंभालेणे' हे गाव आहे.या गावात जयबाचे पूर्वज जमीनदार होते.जयबाचे मूळ गाव 'पोपेर' आहे.आजही या गावात महादेव कोळी समाजाचे वास्तव्य आहे.पुढे जयबा यांनी 'कुंभालेणी' गाव सोडले.व इगतपुरी तालुक्यातील ' मुकणे या गावात ते स्थिर झाल्याने पुढे या गावाच्या नावावरुन जयबाराजे यांनी मुकणे हे आडनाव धारण केले.जयबाचे आई वडिल लहानपणीच निर्वतल्याने चुलते सुर्याजीराव यांनी मोठ्या जिव्हाळ्याने त्यांचे संगोपन व सुसंस्कार करित त्यांच्या जीवनाला दिशा दिली.पुढे उधाजीरावांची कन्या मोहना हिच्याशी त्यांचा विवाह झाला.जयबाराजांनी उत्कृष्ठ संघटन ,बुद्धिचातुर्य आणि पराक्रमाने ३१ लहान किल्ले जिंकून घेतले.सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकुन घेत त्याला जव्हारची राजधानी घोषित केले व जव्हारचे स्वतंत्र राज्य स्थापले.जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले.


   याचदरम्यान महम्मुद्दिनने इ.स.१२९४ च्या सुमारास दख्खनस्वारी केली.तेव्हा जव्हारला कातकरी,कोळीनाईक समाजाच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या.इथला आदिवासी समाज विस्कळीत होता.इ.स.१३४१ साली दिल्लीचा सुलतान 

महमद तुघलकाने जव्हार प्रांतावर आक्रमण करित जयबाराजेंचे थोरले चिरंजिव धुळबाराजांना कैद करून तुघलखाबादच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. आपल्या ज्येष्ठ बंधूची सुटका करण्यासाठी होळकररावांनी मग तुघलकाचा नाशिकचा मातब्बर सुभेदार खान सैय्यद याच्यावर जोरदार सैन्यानिशी आक्रमण करुन त्याला त्रास देण्यास सुरवात केली.होळकररावाच्या वारंवारच्या अाक्रमणाने त्रस्त होऊन सैय्यद खानाने दिल्लीच्या सुलतानाला खलिता पाठवित नाशिक जव्हार सारख्या द-या डोंगरांच्या जंगलव्याप्त प्रदेशात आपले प्रस्थ राखायचे असेल तर तत्काळ घुळबाराजांना नजरकैदेतुन मुक्त करित त्यांच्याशी मित्रत्वचा तह करुन त्यांना दिल्ली सल्तनतशी जोडायला हवे असे विचार व्यक्त केले.याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ५ जुन १३४३ रोजी सुलतान महमद तुघलक व धुळबाराजे यांच्यात एक तह झाला.या तहान्वये जव्हार संस्थानास अहमदनगर , इगतपुरी ,भिमाशंकर गड, नाशिक ,वणी,  धरमपूर, हरिश्चंद्रगड,वसई ,डहाणू ,ठाणे ,भिवंडी,वज्रेश्र्वरी,दिव दमणच्या दमणगंगा  नदीपर्यंतचा ५ हजार चौरस किमी.पर्यंतचा मूलूख व त्यात असलेल्या लहानमोठ्या २२ किल्ल्यांसह ९,००,०००/- रुपयाचा वार्षिक उत्पन्नाचा मुलूख तोडून दिला.या तहाप्रमाणे ०७ जून १३४३ रोजी दिल्लीच्या सुलतनाच्या वतीने  खानसैय्यद यांच्यामार्फत धुळबाराजांना 'शहा' हा बहुमानाचा किताब देऊन त्यांच्या राजकीय हक्कांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.अशाप्रकारे महम्मद तुघलकाने उत्तर कोकणातील मुकणे संस्थान आपल्या अधिपत्याखाली

आणले.महमद तुघलकाने धुळबाराजास दिलेला ताम्रपट हा पर्शियन भाषेत असून त्यावर महंमद तुघलकाची स्वाक्षरी असुन तो जव्हार राजघराण्याकडे आजही आहे.त्यावर 'शहा' हा किताब दिल्याचा उल्लेख आढळतो.


श्रीमंत विक्रमशहा व छत्रपती शिवाजी महाराज भेट :-

       यानंतर तीनशे वर्षांनी जव्हार संस्थानच्या इतिहासात एक महत्वाची घटना घडली.एक दिवस येथे सोनपाऊले उमटली.

 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. ५ जानेवारी इ. स. १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता त्यांना कोळवणातून म्हणजे जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या राजाची सदिच्छा भेट घेतली. जव्हारचा राजा विक्रमशहा पहिला याने या मराठा राजाचे जंगी स्वागत केले.तसेच महाराजांना सुरतेचा जवळचा मार्ग दाखवून प्रेमाचा निरोप दिला. त्यांच्या या भेटीची आठवण जव्हारपासून दीड किमी अंतरावरील मूरचूंडी गावाजवळ शिरपामाळ येथे एका कमानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे. जव्हारच्या राजाने शिवाजी राजांची भेट घेतली ही गोष्ट दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला रुचली नाही. त्याने तुम्ही दिल्लीचे मांडलिक आहात असा सज्जड दम दिला, परिणाम स्वरूप जेव्हा पुन्हा एकदा इ. स. १६७०च्या ऑक्टोबरमध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून सुरत लुटली तेव्हा मात्र जव्हारच्या राजाने मदत न करता तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे जव्हारला बगल देत आडमार्गाने शिवाजी महाराजांना स्वराज्यात यावे लागले.


श्रीमंत  राजे यशवंतराव मुकणे :-



             जव्हार संस्थानाच्या इतिहासात १८ व्या संस्थानाधिपतींच्या पश्चात त्यांचे पुत्र राजकुमार यशवंतराव यांना राजगादीवर बसविण्यात आले.त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांमुळे जव्हारवासिय त्यांना लोकराजा संबोधत. यशवंतरावांनी उच्च शिक्षण लंडन पब्लिक स्कूल मिडल टेंपल येथील 'ओल्ड ब्लुन डेट' स्कूलमधून पुर्ण केले.इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचे गुरु मिलर सरांसोबत युरोपचा अभ्यास दौरा करित तिथली प्रशासन व्यवस्था ,समाजव्यवस्था,उद्योगधंदे यांचा बारकाईने अभ्यास केला.प्रसंगी जहाजबांधणी ,कोळशाच्या खाणी ,पोलाद उद्योग यांन प्रत्यक्ष भेटि दिल्या.यामुळे आधुनिक दूरदृष्टी त्यांना प्राप्त झाली.जव्हर संस्थानातही आपण अशाच सुविधा निर्माण करुन जव्हारला भारतातील विकसित संस्थान बनविण्याचा निर्धार त्यांनी केला.

 

    भारतात परतल्यावर ब्रिटीश सरकारकडुन त्यांनी दिवाणी व गुन्हेगारी खटल्यांसंदर्भात अधिकार प्राप्त करून घेतले.ते चेंबर आॅफ प्रिन्सेस चे सदस्य होते.जव्हारमध्ये १०७ खेडी होती.यशवंतरावांनी शैक्षणिक सुधारणांसाठी मेहनत घेतल्याने त्याकाळी ३३ प्राथमिक शाळा सुरु झाल्याची नोंद आढळते. श्रीमत यशवंतरावांनी जव्हारला दी जव्हार अर्बन को- आॅपरेटिव्ह बँकेची स्थापना करित सहकारी चळवळीचीही मुहूर्तमेढ रोवली.तसेच या बँकेच्या कुडान व आशागड येथेही शाखा सुरु केल्या. दुस-या महायुद्धात श्रीमंत यशवंतराव इंग्रज सरकारच्या वैमानिक दलात अर्थात राॅयल एअरफोर्स मध्ये सामील झाले.त्यांनी या युद्धात गाजविलेल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना 'प्लाईंट लेफ्टनंट' या बहुमानाचा किताब देऊन गौरविले.ब्रिटिश सरकारला युद्धात मदत केल्याने त्यांना नियमितपणे  ९ तोफांची सलामी मान्य झाली होती. श्रीमत राजे यशवंतराव पायलट म्हणुन यशस्वि होऊन ज्यावेळी जव्हार नगरीत प्रथम ज्या ठिकाणी उतरले तिथे बांधण्यात आलेला ४०फुट उंचीचा क्लाॅक टाॅवर आजही   ' विजयस्तंभ' या नावाने त्या घटनेची साक्ष देत उभा आहे.



     यशवंतरावांच्या काळात  इ.स.१९३८ये १९४२ या काळात जव्हार येथे जयविलास पॅलेस हा नवा राजवाडा दोन एकराच्या प्रशस्त जागेत बांधण्यात आला.या बांधणीचे वैशिष्ट्य असे  की या वास्तूसाठी वापरण्यात आलेला पांढरा दगड जवळच्याच साखरे या गावच्या खाणीत सापडला.पन्नास हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा राजवाडा मुकणे संस्थानाच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक आहे.हा राजवाडा म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असुन राजवाड्यात ध्वजवंदनासाठी भव्य पटांगण ,घोडदळासाठी पागा,परिसरात दिडशे एकरात पसरलेली आंबा व काजुची बाग यामुळे राजवाड्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.हा राजवाडा  एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. जव्हारच्या एसटी स्टँडपासून रिक्षा केल्यास ती आपल्याला राजवाड्यापर्यंत घेऊन जाते. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबर, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे,तोफा,राजकुमारांची खेळणी आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवलेले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रेही काढता येतात. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. तसेच राजवाड्याच्या छतावरील घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन डोळ्याचे पारणे फेडते. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून येथे लवकरच करमणुकीचे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.

   तर जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात. 


जव्हार संस्थानातील अन्य सुधारणा :-

    श्रीमत यशवंतरावांप्रमाणेच त्यांच्या अगोदर व नंतर  गादीवर आलेल्या राजांनी जव्हारचा विकास करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.  १८७५-७६ ला जव्हार संस्थानाच्या संरक्षणासाठी पोलिस दलाची इथे निर्मिती झाली.तसेच १८७६ मध्ये नगरवासीयांसाठी इथे फिरता दवाखाना सुरु करून तज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.

१ आॅक्टोबर १९०७ मध्ये कृष्णशहा चौथा याने जव्हारात पोस्ट खाते सुरु केले.तर १९१४ ला कृष्णशहा चौथा याने स्टेट लायब्ररी सुरू करून जव्हारवासीयांना वाचनसमृद्ध करण्याच्या दृष्टिने वाचन चळवळीचा शुभारंभ केला.१सप्टेंबर१९१८ ला विक्रमशहा पाचवे यांनी जव्हार नगरपालिकेची स्थापना करुन  जव्हारच्या लोकसुधारणांना गती देण्याचा प्रयत्न केला. या संस्थानचे स्वत:चे राष्ट्रगीत होते. संस्थानचे राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांनी ते लिहिले होते.एकुणच एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जव्हार मध्ये झालेल्या लक्षणीय बदलांनी देशातील आधुनिक विकसित संस्थान म्हणून मुकणे राजे यांच्या जव्हार संस्थानचे नाव झाले. 


जव्हारचे विलिनीकरण :- 

          जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ते आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.

--------------------------------------

जव्हारची वैशिष्ट्ये :-

1) भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान

2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान

3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा

4)ब्रिटिश भारताततील एकमेव पिता-पुत्र राजांनी महायुद्धात सहभागी संस्थान-(नेटिव्ह इन्फट्री बटालियन)

महाराज मार्तंडराव मुकणे (लेफ्टनंट-पहिले महायुद्ध)

महाराज यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)

5)भारतातील पहिले देवीची लस(मोफत) देणारे संस्थान

6)भारतातील सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च करणारे संस्थान

7)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

8)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

9)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण

10)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान.

------------------------------------------------------

 - विजय हटकर.


छायाचित्रे :-






Sunday, October 15, 2023

 संगनाथेश्र्वराच्या घाटावर सर्वपित्री अमावस्येला अर्जूना नदीजलपूजन उत्साहात संपन्न.


पाचल :-




        ज्या नदीच्या काठावर आपण जन्माला आलो,जिने आपले भरण-पोषण केले,जिच्या सुपिक काठावर स्वत:चे जीवन समृद्ध करतो ,त्या नदीलाच आपण गंगा,चंद्रभागा मानून तिची मुलाप्रमाणे सेवा केली पाहिजे ,अर्जूनामाई चे संवर्धन हे प्रत्येक राजापूरवासियाचे कर्तव्य असून ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले.


      राजापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अर्जुना नदी व तिची उपनदी निवाचा नदीच्या संगमावर श्री क्षेत्र रायपटण गावातील संगनाथेश्र्वराच्या घाटावर सर्वपित्री अमावस्येच्या मूहूर्तावर रायपाटण, पाचल, तळवडे पंचक्रोशीसह लांजा राजापूर तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जूना नदीचे मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आले.यावेळी सुभाष लाड बोलत होते.ते पुढे म्हणाले आपल्या नदीला कमी लेखल्यामुळेच या नद्यांना आपण कचरा वाहिनी करून टाकली आहे.हे आता बदलायला हवंय.जेव्हा आपला वावर नदीवर होईल तेव्हाच आपल्याला नद्यांची दुरावस्था लक्षात येईल.जमलेल्या वाळुच्या  ढिगा-यांनी व कच-याच्या रांगोळ्यांनी घुसमटून गेल्याने तिला होणा-या वेदना आपल्याला जाणून घेता येतील.एकावेळी सर्रास कोणत्याही गावात बारमाही पुरूषभर उंचीचे काचेसारखे स्वच्छ दिसणारे नदीचे डोह अाता दिसेनासे झालेत.नद्यांचे होणारे हे प्रदुषण मानवी जीवनासोबत परिसंस्थेला हानिकारक असून यासाठीच प्रत्येक गावक-याने जलदूत बनायला हवे असे मत सुभाष लाड यांनी व्यक्त केले.



      यावेळी रायपाटण येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या  रेवणसिद्ध मठाचे रविशंकर शिवाचार्य महाराज, रायपाटणचे सरपंच महेंद्र गांगण,समाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी,पाचलचे सामाजिक कार्यकर्ते किशोर नारकर, तळवड्याच्या सरपंच गायत्री साळवी, पत्रकार शरद पळसुलेदेसाई ,विजय हटकर,प्रकाश हर्चेकर,महेंद्र साळवी, कल्पना काॅलेजचे संस्थापक मंगेश चव्हाण,माय राजापूरचे अध्यक्ष जगदिश पवार, मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्राध्यापक विकास पाटील,समृद्ध कोकणचे संतोष गांगण ,ओणी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक एम.आर.पाटील,चंद्रकांत खामकर,प्रगतशील शेतकरी अमर खामकर,महादेव रोडे ,माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, रायपाटणचे माजी सरपंच राजेश नलावडे, अनंत गांगण, आदर्श ग्रामसेवक सुधाकर पेडणेकर, ग्रा.स.समीक्षा चव्हाण,पोलिसपाटील महादेव नेवरेकर,पुरोहित राजेंद्र जोशी ,गजानन जोशी,संदिप गुरव, सुनिल गुरव,सचिन लाड,आदी मान्यवर उपस्थित होते.


 यावेळी नदीसंवर्धन या विषयावर बोलताना व्याख्याते विजय हटकर यांनी नद्या म्हणजे त्या त्या देशाच्या रक्तवाहिन्या असतात.त्यांच्या पात्रातून केवळ पाणीच वाहत नाही तर त्या-त्या प्रदेशाचे जीवनच वाहत असते.नद्या वाहताना आपल्या दोन्ही काठावरची भूमी सुजल संपन्न बनवितात असे सांगतानाच राज्यभरात नदीसंवर्धनाचे वैशिष्टपूर्ण प्रयोग करणा-या तसेच नदीच्या काठावर पर्यटन उद्योग ऊभारून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणा-या संस्था व कार्यकर्त्यांची माहिती देत राजापूरच्या पर्यटन व शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू असणा-या अर्जूना नदीला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच रेवणसिद्ध मठाचे रविशंकर शिवाचार्य महाराज यांनी संघाच्या या पर्यावरणपूरक व भारतीय सर्वसमावेशक संस्कृतीचे उदाहरण असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करित अर्जूना नदी संवर्धन उपक्रमात यापुढेही सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. 



      एैतिहासिक वारसा लाभलेल्या श्री क्षेत्र रायपटण गावातील अर्जूना व निवाचा नदीच्या संगमावरील संगनाथेश्र्वर मंदिराच्या घाटावर अर्जूना नदीसंवर्धनाच्या उद्देशाने आयोजिलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम अर्जूना नदीच्या पात्रातील पाण्याने भरलेल्या कलशाचे विधीवत पुजन गावकार महादेव शेट्ये यांनी सपत्निक केले.सोबतच घाटावर ठिकठिकाणी दिवे प्रज्वलित केल्याने श्री संगनाथेश्र्वर मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून गेला होता.यानंतर अर्जूना नदीवर तीनेकशे लोकांच्या उपस्थितीत सामुहिक अारती करण्यात आली.यामध्ये संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी रचलेल्या जय जय जलदाती या नदीविषयक व विजय हटकर यांनी रचलेल्या अर्जूनामाई या आरत्यांचे प्रथमच गायन सुनिलबुवा जाधव ,नागेश साळवी ,मंदार जाधव ,राजू कुलकर्णी यांनी 

केले.नदीपूजनाला उपस्थित सर्वांनीच नदी स्वच्छ ठेवण्याची सामुहिक प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक विकास पाटील यांनी केले.संघाच्या या नदीसंवर्धनांतर्गत नदीजलपूजन कार्यक्रमात या भागातील रायपटण, पाचल ,तळवडे ग्रामपंचायतींसोबत मनोहर हरी खापणे महाविद्यालय,कल्पना काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट लांजा, माय राजापूर,समृद्ध कोकण आदी संस्थांनी सहभाग घेतल्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.


क्षणचित्रे :-













माध्यमातील दखल

१) आकाशवाणी पुणे -

https://youtu.be/Xv6dnWmcOMQ?t=331













Wednesday, October 11, 2023

लांजा तालुक्यातील नाटककारांची समृद्ध परंपरा

 लांजा तालुक्यातील नाटककारांची समृद्ध परंपरा. 



         कोकणी माणसाचे नाट्यप्रेम सर्वश्रूत आहे.कोकणी माणूस स्वभावत:च उत्सवप्रेमी.गावातील ग्रामदैवतांच्या जत्रेत ,वाडी-वस्तीतील सार्वजनिक उत्सवानिमित्त पारावरच्या रंगभूमीवर नमन ,दशावतार खेळांच्या सादरीकरणातूनच कोकणात नाट्यचळवळीचा विकास झाला.पुढे नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबईसारख्या महानगरात गेलेल्या चाकरमान्यांना तिथल्या कामगार व प्रायोगिक रंगभूमीने आपल्यातील कला सादर करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.परिणामी कोकणी नाट्यप्रेमी कलावंतानी आपल्यातील नाट्यप्रेम जिवंत ठेवत अनेक दर्जेदार, आशयप्रधान नाट्यसंहितांची भेट रसिकांना दिली.रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात रिंगणे,आरगांव ,वाकेड ,तळवडे, करंबेळेवाडी- वाडीलिंबू आदी शतकोत्तरी नाट्यपरंपरा लाभलेली समृद्ध गावे असून लांज्याच्या सुपूत्रांनी मराठी नाट्यसृष्टीत नाटककार ,कलाकार,रंगकर्मी म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे.यापैकीच प्रातिनिधिक नाटककारांचा वेध घेणारा लेख ...


१) नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे :-

                     मराठी कामगार रंगभूमीचे " शेक्सपिअर" ,गिरणगावच्या रंगभूमीचे " मुकूटमणी " आणि ' ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालू ठेवणारी पहिली व्यक्ती ' असे आचार्य प्र.के. अत्रे यांनी गौरविलेले कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार म्हणजे श्री लाडकोजीराव कृष्णाजी आयरे होय.२१ मे १९१८ मध्ये वाटूळ ता.राजापूर येथे जन्मलेल्या लाडकोजी कृष्णाजी आयरे यांचे लांजा तालुक्यातील रिंगणे हे मूळ गाव.

             मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कामगार रंगभूमीवर एक अग्रेसर आणि लोकप्रिय नाटककार म्हणून १९३९ ते १९६२ या दोन दशकात आपली नाटके सादर करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरेंसारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ दिवंगत दिग्गजाचे कार्य चिरंजीव व्हावे, वर्तमान पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ला.कृ.आयरे यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी व हितचिंतकांनी स्व.आत्माराम हांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ' नाटककार ला.कृ.आयरे स्मृति ट्रस्ट' ची स्थापना २३ जुलै १९८९ रोजी केली.नाटककार ला.कृ. आयरेंच्या आठवणी सदैव ताज्या ठेवण्यासाठि प्रयत्नशील असणाऱ्या या ट्रस्टने गत तीन दशकात एकांकिका स्पर्धा , एकांकिका लेखन, नाट्यस्पर्धा,नाटयलेखन, एकपात्री स्पर्धा आदि विविध उपक्रम राबवून मराठी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली आहे. सन २०१८-१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.

            ला.कृ.आयरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्थेने वर्षभर विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.याचाच एक भाग म्हणून या ट्रस्टने सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड सरांच्या सुचनेमुळे आयरेंवर एक छोटी पुस्तिका लिहिण्याची संधी मला दिली.व मुलुंड येथील अद्ययावत मराठी मंडळात १९ मे २०१९ ला मान्यवरांच्या शुभहस्ते सुभाष लाडांच्या मार्गदर्शनाखाली मि संपादित केलेली "नाटककार ला.कृ.आयरे - गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी" ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेच्या लेखनामुळे माझ्या मातीतल्या एक सशक्त नाटककाराला जाणून घेता आले.संगीत नाटकांचा सुवर्णकाळ सुरु असताना कोकणातील सामाजिक समस्या,शेतक-यांचे प्रश्न त्यांनी आपल्या नाटकातून प्रभावीपणे मांडत ख-या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्याची भुमिका निभावली.

         मुंबईच्या लालबाग,परळ, नागपाडा,लोअरपरळ, काळाचॊकी,शिवडी,सातरस्ता, वरळी,आगारबझार अशा विस्तृत मध्य मुंबईतल्या भागावर विस्तारलेल्या कापड गिरण्यांनी रंगभूमीला दिलेली देणगी म्हणजे कामगार रंगभूमी.२० व्या शतकात अडीच लाख कामगारांना या कापड गिरण्या रोजगार पुरवित होत्या.मुंबईच्या व्यापारात या गिरणी कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे.या गिरणीत मास्तर,मुकादम,जाॅबर इ.पदावर कोकणातील चाकरमानी लोक राहू लागले.या कोकणी कामगारांच्या वस्तीने चाळ संस्कृती निर्माण झाली आणि मग कोकणातील तरुणांमध्ये उपजत असलले नाट्यवेड गिरणगावात रूजू लागले.चाळी- चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात, शिवजयंती, गोकुळाष्टमी, सत्यनारायण इ.प्रसंगी नाटके सादर होऊ लागली.गिरणगावात सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून कोकणच्या ग्रामीण जीवनाचा, बोलीचा,मनोवृत्तीचा परिचय महानगरातील लोकांना होऊ लागला.यामध्ये नाटककार आबासाहेब आचरेकर, टी.एस्.कावले,वसंत दुधवडकर, वसंत जाधव,आत्माराम सावंत, मु.गो.शिवलकर,कृ.गो.सुर्यवंशी,बाबुराव मराठे,ना.ल.मोरे,दत्ता साठम,प्रेमानंद तोडणकर, ना.रा. जोशी,इ.नाटककारांसोबत मामासाहेब वरेरकर, मो.ग.रांगणेकर ,आचार्य अत्रे अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर होऊ लागली.या सर्वामध्ये अग्रभागी होते ते कोकणातील नाटककार ला.कृ.आयरे .म्हणूनच त्यांना 'गिरणगावच्या रंगभूमीचा मुकुटमणी ' असे संबोधले जाते.

        नाट्यमहर्षी मामा वरेरकर व नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांना गुरूस्थानी मानणाऱ्या ला.कृ.आयरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी कोर्ट - कचे-यांचे दुष्परिणाम या विषयावर ' फिर्याद ' हे नाटक लिहिल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाहि.१९४९ मध्ये त्यांनी  ' जुलूम' हे नाटक रंगभूमीवर अाणले.या नाटकाचे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन हजारो प्रयोग होऊन संबंध महाराष्ट्रात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे १९४५ ते १९५७ या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी आपल्या ' स्वस्तिक नाट्य मंदिर' या संस्थेतर्फे स्वत:ची १५ नवी नाटके रंगभूमीवर आणून चैतन्य निर्माण केले.बुद्धीभेद,शेतकरी दादा, मायमाऊली,कुल कलंक, ईर्षा, अमरत्याग, कसोटी,मायेचा संसार,स्वराज्यरवि,निर्धार, आदि २३ नाटके, ०४ लोकनाट्ये,०६ एकांकिका व ३०० श्रृतिकांचे त्यांनी लेखन केले.



        कथानकातील विविधता, प्रभावी व्यक्तिमत्त्वे, सुंदर चैतन्यपूर्ण स्वभावरेखाटन,वेधक प्रसंग योजना,वातावरण निर्मिती, खटकेबाज- चटकदार संवाद,उच्च प्रतीची संवाद रचना,आंतरिक संघर्ष, मानवी मनोवृत्तीची विविध रूपे,श्रृंगारप्रचार,विनोदात्मकता,आकर्षक शेवट,कलात्मक दृष्टी,कोकणच्या बोलीवर विविधांगी दर्शन, आदि लेखन वैशिष्ट्यामुळे नाटककार ला.कृ.आयरे यांची नाटके त्या काळी महाराष्ट्र, गुजरात,म्हैसूर राजस्थान, आसाम ,मद्रास पर्यंत तेथील मराठी भाषिकांनी केली.

            प्रा.ना.सी.फडके यांच्या मतानुसार संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो.या संघर्षात गुंतलेल्या व्यक्ती या तुल्यबळ असायला हव्यात आणि नाटककाराने त्यांची स्वभावचित्रे निरपेक्षपातीपणे रंगवायला हवीत.तरच ते नाटक स्वाभाविक उंची गाठते.नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाटकांचा तर संघर्ष हा स्थायीभाव आहे.हा संघर्ष प्रस्थापित खोत,जमीनदार, सावकार विरोधात श्रमजीवी शेतकरी वर्गाचा होता. अन्यायाविरोधात न्यायाचा आहे.आयरेंनी नाट्यलेखनाव्दारे शोषित,वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी,श्रमजीवी वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्याचे कार्य केले आहे.त्यामुळेच समाज प्रबोधनाचे दर्शन घडविणारे श्रेष्ठ नाटककार म्हणून ते प्रसिद्धीस पावले.


         नाट्यलेखना शिवाय ' मराठा सेवक'या मासिकाचे संपादन करताना आयरेंनी आनंदवन ,रसरंग,कोकण दर्शन, ललित,  किर्लोस्कर, मनोहर, नवशिक्षण आदि मासिकं व साप्ताहिकातुन अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले.           'बायोग्राफी इंडिया १९८०', ' लीडर्स आॅफ इंडिया',साहित्य अकादमी -नवी दिल्ली या ख्यातनाम पुस्तकातुन त्यांच्या दखलपात्र साहित्यिक कार्याचा गॊरव करण्यात आला आहे .    त्यांच्या अनेक नाटकांनी विविध पारितोषिके पटकाविली.महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनासाठी ' राज्यस्तरिय  पुरस्कारासोबत ' अखिल भारतीय नाट्य परिषद,भारत सरकार,कामगार कल्याण मंडळ, आंतरगिरणी कामगार स्पर्धा,नटवर्य चिं.कोल्हटकर नाट्यस्पर्धा, भारतीय साहित्य सभा -पुणे या विविध स्पर्धेत आयरेंच्या नाटकांनी समीक्षकांच्या,प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत अनेक पुरस्कार प्राप्त केले.आयरे एक प्रतिभाशाली नाटककार होतेच पण त्याबरोबर एक उत्कृष्ट नट,दिग्दर्शक, निर्माता,प्रकाशक,कथाकारही होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते.त्यांनी त्यांच्या मुळ गावी रिंगणे येथे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाची स्थापना केली.कोकणात दुर्लक्षित राहिलेल्या राजापूर -लांजा तालुक्यातील २२८ गावांच्या विकासासाठी त्यांनी ' राजापूर -लांजा तालुका नागरिक संघा 'ची स्थापना केली.आज या संस्था उल्लेखनीय कार्य करित आहेत.साहित्य संघ मंदिर,शिवाजी मंदिर मुंबई, मराठी  ग्रंथ संग्रहालय, साने गुरुजी कथामाला आदि अनेक संस्थांमध्ये त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले.

            १६ डिसेंबर १९५१ रोजी झालेल्या दक्षिण कोकण नाट्य संमेलनाचे आयरे स्वागताध्यक्ष होते.त्यावेळी त्यांनी स्वागताक्षीय भाषणातून मांडलेले मराठी रंगभूमी व नाट्यचळवळीच्या उर्जितावस्थेसाठीचे अभ्यासपूर्ण विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात.आपल्या नाट्यलेखनाचे कोणतेच मानधन न घेणारे आयरे त्या काळात संप्रेषणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रेमाखातर व नाट्यचळवळीच्या प्रचारार्थ स्वखर्चाने नागपूर,चंद्रपूर,म्हैसूर आदि ठिकाणी आपुलकीने पोहचत असत.साहित्य, समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या नाटककार आयरे यांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन वर्तमान पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.एकूणच मराठी नाटक थिटे नसावे ते उंच व्हावे,त्याची मान जगात ताठ रहावी, जागतिक नाट्य साहित्याशी तुलना करताना आपले मराठी साहित्यहि दर्जेदार असावे यासाठी ला.कृ.आयरे अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.


२) नाटककार दशरथ राणे :-


(महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात नाटककार गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करताना शशिकांत मोरे व नाटककार दशरथ राणे)

                  नाटककार व सामाजिक कार्यकर्ते दशरथ राणे ही वल्ली म्हणजे शांत, तसेच सरळ व साधी राहणी. आपण सर्वजण समाजाचे देणं लागतो आणि म्हणूनच त्यासाठी सतत काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. राहत्या ठिकाणीही अनेक सामाजिक संस्था आणि उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग असतो. उदाहरणादाखल सांगावयाचे झाल्यास 'राष्ट्र सेवादल', 'सानेगुरुजी कथामाला', 'गंमत जंमत मंडळ' अशा अनेक उपक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.


         समाजात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर अनेकजण आपल्या उपजिवीकेसाठी चार पैसे कसे मिळवता येतील या एकाच विचाराने पछाडलेले असतात. व्यवहारिकपणे त्यात काही चुकीचे आहे असे कुणाला वाटत नाही. परंतु या विचारला काही माणसं अपवाद असतात. ती आपल्या उपजिवीकेचा विचार करता करता त्याला समाजसेवेची जोड देतात. प्रत्येक क्षेत्रातल्या प्रस्थापितांना अशा सेवाभावी वृत्तीने समाजप्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या गोतावळ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. प्रत्येकजण पैशाला पैसा जोडून आपल्या आर्थिक सुबत्तेत वाढ कशी होईल याचा विचार करीत असतो. पैशानं समाजातील ठराविक माणसं श्रीमंत होत असतील परंतु त्या श्रीमंतीने समाजातील सुख-समाधान वाढते का? नीट विचार केला असता त्याचे उत्तर नाही असेच येईल. समाजात सुख, शांती, समाधान नांदायला हवे असेल तर सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील श्रीमंतीच ते देऊ शकेल. म्हणूनच समाजात अशी श्रीमंती वाढविण्यासाठी काही माणसं सातत्याने धडपड करत असतात. मात्र प्रसिद्धीच्या माध्यमापासून ही माणसं फार दूर असतात अशातीलच एक म्हणजे नाटककार दशरथ राणे.

इतर अनेक क्षेत्राप्रमाणेच मराठी रंगभूमी हे एक क्षेत्र. या क्षेत्रातील एक सेवाभावींचा गोतावळा म्हणजे हौशी रंगभूमी. मग तो कामगार रंगभूमी असेल अथवा गावोगावची रंगभूमी असेल. व्यावसायिक रंगभूमी आणि हौशी रंगभूमीचे कार्य एकच फरक इतकाच की हौशी रंगभूमीवर वावरणारे रंगकर्मी मोबदल्याची अपेक्षा न बाळगता वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशात हात घालून रंगभूमीच्या भरभराटीसाठी कार्यरत असतात. अशा रंगभूमीसाठी दर्जेदार नाट्यलेखन करून अनेकांनी यश मिळवले. अनेकांनी प्रस्थापित नाटककारांच्या पंगतीत बसण्याइतपत मराठी रंगभूमीच्या दरबारात आपली पत निर्माण केली. रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या अशा यशस्वी नाटककारांच्या नाटकांची जाहिरात नसल्यामुळे ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले. अशा या हौशी रंगभूमीसाठी सातत्याने लिहिणाऱ्या नाटककारांमध्ये अग्रक्रमाने उल्लेख करावा असं नाव म्हणजे नाटककार दशरथ राणे.


 नाटककार दशरथ राणे यांचा जन्म ०७ फेब्रुवारी १९४७ रोजी लांजा तालुक्यातील बोरथडे या गावी झाला.शिक्षण पूर्ण केल्यानंतर राणे यांना चुलते कै.सिताराम राणे यांनी मुंबईला नेले. मुंबईसारख्या महानगरात दिवसा काम करून व रात्रीच्या शाळेत ग्रँड रोड, नाना चौक येथील सोशल नाईट हायस्कूल मध्ये त्यांनी अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील कॉ. आर.डी.चव्हाण यांनी राणेंमधील कार्यकर्त्याचे गुण, नेतृत्व क्षमता ओळखून त्यांना मुंबईत पोस्टमन संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करीत खऱ्या अर्थाने व्यासपीठ म्हणून दिले. त्यांचा विश्वास सार्थक करीत महाराष्ट्र -गोवा राज्यातील पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी निरपेक्ष भावनेने कार्य केले,त्याचे फलित म्हणजे मुंबई पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सलग अठरा वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना मुंबईतल्या कामगार रंगभूमीवरील कलावंतांचे नाटक- मेळे बघतांना आपणही काही लिहावे ही इच्छा त्यांच्या मनी जागृत झाली व पुढे १९६३ साली 'गुराखी' या एकांकिकेपासून त्यांचा सुरू झालेला अक्षरसृजनाचा प्रवास नाटक व एकांकिकेची ६५ हून अधिक पुस्तके प्रकाशित केल्यावरही सुरूच आहे.


(इथे थांबली जीवनगंगा चा नाट्यक्षण, अभिनेत्याच्या भूमिकेत नाटककार श्री दशरथ राणे)

   'इथे थांबती जीवनगंगा'या त्यांच्या पहिल्या नाटकाचा शुभारंभ १ फेब्रुवारी १९६६ साली डाॅ.शिरोडकर हाॅल मुंबई येथे यशस्वीपणे संपन्न झाल्यावर महाराष्ट्रासह विविध मराठी बहुल भागात त्यांच्या समाजप्रबोधन व मनोरंजन करणा-या नाटकांचे हाऊसफुल प्रयोग झाले.त्या काळी पुस्तक निर्मितीतून आर्थिक लाभ होत नव्हता,मात्र छंदीष्ट माणसे आर्थिक झीज सोसुनही अभिव्यक्तिचा छंद निष्ठेने जपतात.राणेंनीही तो जपल्यानेच नाट्यलेखनाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल ते करु शकले. या काळात दिल्लीच्या महाराष्ट्र रंगायतन या संस्थेच्या नाट्यमहोत्सवात त्यांच्या अनेक नाटकांना पारितोषिके मिळाली.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ,राष्ट्रीय कलागुण प्रतिष्ठान पुणे ,मराठी नाटककार संघ मुंबई ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अशा ५० हून अधिक संस्थांनी त्यांच्या नाट्यलेखनाचा सन्मान केला आहे. 'लग्न शांतूच्या मेहुणीचं', 'यंदा कर्तव्य आहे', ' कथा गावोगावची', 'कावेबाज', 'अग्निपरिक्षा', 'माहेरची पुण्याई', 'घरासारखं घर हवं', 'भाग्यविधाता'  या सारख्या आशयसंपन्न नाटकांतून मानवी जीवनातील प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.मराठी कामगार रंगभूमीवरील एक प्रथितयश नाटककार म्हणून कोकणच्या या सुपूत्राने अथक संघर्षातून मिळविलेले यश आजच्या नव्या पिढीसमोर आदर्शवत आहे. ला.कृ.आयरे व दशरथ राणे या दोन्ही नाटककारांनी दक्षिण रत्नागिरीतील राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई या महत्वाच्या समाजिक संस्थेत कार्यकारीणी सदस्य म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे.गत पाच -सहा वर्ष संघात काम करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य मी समजतो.



              लांजा तालुक्यातील ला.कृ.आयरे, दशरथ राणे यांसारख्या नाट्य चळवळ जगविणाऱ्या दिग्गज नाटककारांचा वारसा नव्या पिढीतील निनाद शेट्ये, अमोल रेडीज, राजेश गोसावी ,मनोज भागवत हे लेखक समर्थपणे पुढे नेत आहेत.चाळ नावाची खट्याळ वस्ती, अग्रेसिव्ह , चालबाज या यशस्वी व्यवसायिक नाट्यनिर्मितीने वाकेडचे  निनाद शेट्ये मराठी रंगभूमीवर सशक्त लेखक म्हणुन पुढे येत आहेत.अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रातही ते चांगलेच स्थिरस्थावर झालेले आहेत. सोबतच शाश्वत फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम ते आस्थेने करीत असतात.मराठी झी गौरव पुरस्कार विजेते भांबेडचे नाट्यलेखक-अभिनेते अमोल रेडीज यांना  द गेम आॅफ डेस्टिनी व जिहाद या उत्तम नाट्यकलाकृतींनी देशभरात ओळख करुन दिली आहे. जिहादचा हिंदी भाषेत अनुवाद झाला असून हैद्राबाद येथे त्याचे यशस्वी सादरीकरण झाले आहे.वाॅटर इस लाईफ,स्नेहबंध ,वशीकरण,लमाण्याचं प्वाॅर सारख्या त्यांच्या शार्ट फिल्म विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मुद्रा उमठवित आहेत.ही गोष्ट लांजावासीयांसाठी भूषणावह आहे.तळवड्याचे मनोहर रामचंद्र पाटोळे यांनीही जगावेगळी भाऊबीज व वेताळबंगला या नाटकांचे लेखन केले.मात्र ते नभोनाट्य लेखन प्रकारातच पुढे जास्तव रुळले.त्यांच्या नाटकाला राष्ट्र सेवादलाचे सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचे पारितोषिक मिळाले आहे.अभिनय लेखक दिग्दर्शक म्हणून कोकणच्या रंगभूमीवर नावारूपाला आलेल्या राजेश गोसावी या क्रियाशील प्राथमिक शिक्षकाने लिहिलेल्या माझ्या अंगणी नाचते दुस-याची बायको ,गर्लफ्रेंड बाबांची,यही तो लाईफ है बाॅस या नाटकांनी प्रयोगांची नुकतीच शताब्दी पुर्ण केली असून त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने सेन्साॅर मंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे. आज एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रस्फोटीकरणामुळे,ओटीटी सारख्या नव्या प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे युवा पिढी नाटकापासून दुर जाऊ लागली आहे.नाट्य चळवळीतही असंख्य समस्या आज पहायला मिळतात. कोकणातील तालुक्याच्या पातळीवरील नाट्यगृहे समस्यांच्या गर्दीत अडकलेली पाहायला मिळतात.लांजा तालुक्याचा विचार करीता सुसज्ज नाट्यगृहाची निर्मितीच इथे झालेली नाही.सांस्कृतिकदृष्ट्या असलेल्या राजकीय उदासिनतेने इथल्या कलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. एखादी नाट्यसंस्था स्थापन करून नाट्य चळवळ जिवंत ठेवणे हे पदराला खार लावणारे आहे, मात्र तरी देखील नाटककार, कलाकार, रंगकर्मी पुढे येत असून आपल्या परीने आपल्या वर्तुळात गावातील जत्रा-उत्सवांत, व्यावसायिक नाट्यलेखन स्पर्धेच्या निमित्ताने नाट्यचळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कसोशीने करीत आहेत. कोकणातील या नाट्य चळवळींना शासनाने थोडे सहाय्य केले तर नाट्य चळवळीचे सुखद चित्र उभे राहायला वेळ लागणार नाही. 

-विजय हटकर ,लांजा

संदर्भ

सुभाष लाड/ विजय हटकर - नाटककार ला.कृ.आयरे -गिरणगावच्या रंगभूमीचा मुकूटमणी.


http://www.dasharathrane.in


प्रा.विजय तापस-'कस्तुरीगंध:मंगलदिव्य' मराठा विधवांची दु:खगाथा. - दै.लोकसत्ता ०४/०९/२०२२


दुर्गेश  आखाडे - ठसा- पारावरच्या रंगभूमीचा अष्टपैलू कलाकार. - दै.सामना०५/११/२०२२