लांजा तालुक्यातील नाटककारांची समृद्ध परंपरा.
कोकणी माणसाचे नाट्यप्रेम सर्वश्रूत आहे.कोकणी माणूस स्वभावत:च उत्सवप्रेमी.गावातील ग्रामदैवतांच्या जत्रेत ,वाडी-वस्तीतील सार्वजनिक उत्सवानिमित्त पारावरच्या रंगभूमीवर नमन ,दशावतार खेळांच्या सादरीकरणातूनच कोकणात नाट्यचळवळीचा विकास झाला.पुढे नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबईसारख्या महानगरात गेलेल्या चाकरमान्यांना तिथल्या कामगार व प्रायोगिक रंगभूमीने आपल्यातील कला सादर करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.परिणामी कोकणी नाट्यप्रेमी कलावंतानी आपल्यातील नाट्यप्रेम जिवंत ठेवत अनेक दर्जेदार, आशयप्रधान नाट्यसंहितांची भेट रसिकांना दिली.रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात रिंगणे,आरगांव ,वाकेड ,तळवडे, करंबेळेवाडी- वाडीलिंबू आदी शतकोत्तरी नाट्यपरंपरा लाभलेली समृद्ध गावे असून लांज्याच्या सुपूत्रांनी मराठी नाट्यसृष्टीत नाटककार ,कलाकार,रंगकर्मी म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे.यापैकीच प्रातिनिधिक नाटककारांचा वेध घेणारा लेख ...
१) नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे :-
मराठी कामगार रंगभूमीचे " शेक्सपिअर" ,गिरणगावच्या रंगभूमीचे " मुकूटमणी " आणि ' ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालू ठेवणारी पहिली व्यक्ती ' असे आचार्य प्र.के. अत्रे यांनी गौरविलेले कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार म्हणजे श्री लाडकोजीराव कृष्णाजी आयरे होय.२१ मे १९१८ मध्ये वाटूळ ता.राजापूर येथे जन्मलेल्या लाडकोजी कृष्णाजी आयरे यांचे लांजा तालुक्यातील रिंगणे हे मूळ गाव.
मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कामगार रंगभूमीवर एक अग्रेसर आणि लोकप्रिय नाटककार म्हणून १९३९ ते १९६२ या दोन दशकात आपली नाटके सादर करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरेंसारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ दिवंगत दिग्गजाचे कार्य चिरंजीव व्हावे, वर्तमान पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ला.कृ.आयरे यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी व हितचिंतकांनी स्व.आत्माराम हांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ' नाटककार ला.कृ.आयरे स्मृति ट्रस्ट' ची स्थापना २३ जुलै १९८९ रोजी केली.नाटककार ला.कृ. आयरेंच्या आठवणी सदैव ताज्या ठेवण्यासाठि प्रयत्नशील असणाऱ्या या ट्रस्टने गत तीन दशकात एकांकिका स्पर्धा , एकांकिका लेखन, नाट्यस्पर्धा,नाटयलेखन, एकपात्री स्पर्धा आदि विविध उपक्रम राबवून मराठी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली आहे. सन २०१८-१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.
ला.कृ.आयरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्थेने वर्षभर विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.याचाच एक भाग म्हणून या ट्रस्टने सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड सरांच्या सुचनेमुळे आयरेंवर एक छोटी पुस्तिका लिहिण्याची संधी मला दिली.व मुलुंड येथील अद्ययावत मराठी मंडळात १९ मे २०१९ ला मान्यवरांच्या शुभहस्ते सुभाष लाडांच्या मार्गदर्शनाखाली मि संपादित केलेली "नाटककार ला.कृ.आयरे - गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी" ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेच्या लेखनामुळे माझ्या मातीतल्या एक सशक्त नाटककाराला जाणून घेता आले.संगीत नाटकांचा सुवर्णकाळ सुरु असताना कोकणातील सामाजिक समस्या,शेतक-यांचे प्रश्न त्यांनी आपल्या नाटकातून प्रभावीपणे मांडत ख-या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्याची भुमिका निभावली.
मुंबईच्या लालबाग,परळ, नागपाडा,लोअरपरळ, काळाचॊकी,शिवडी,सातरस्ता, वरळी,आगारबझार अशा विस्तृत मध्य मुंबईतल्या भागावर विस्तारलेल्या कापड गिरण्यांनी रंगभूमीला दिलेली देणगी म्हणजे कामगार रंगभूमी.२० व्या शतकात अडीच लाख कामगारांना या कापड गिरण्या रोजगार पुरवित होत्या.मुंबईच्या व्यापारात या गिरणी कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे.या गिरणीत मास्तर,मुकादम,जाॅबर इ.पदावर कोकणातील चाकरमानी लोक राहू लागले.या कोकणी कामगारांच्या वस्तीने चाळ संस्कृती निर्माण झाली आणि मग कोकणातील तरुणांमध्ये उपजत असलले नाट्यवेड गिरणगावात रूजू लागले.चाळी- चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात, शिवजयंती, गोकुळाष्टमी, सत्यनारायण इ.प्रसंगी नाटके सादर होऊ लागली.गिरणगावात सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून कोकणच्या ग्रामीण जीवनाचा, बोलीचा,मनोवृत्तीचा परिचय महानगरातील लोकांना होऊ लागला.यामध्ये नाटककार आबासाहेब आचरेकर, टी.एस्.कावले,वसंत दुधवडकर, वसंत जाधव,आत्माराम सावंत, मु.गो.शिवलकर,कृ.गो.सुर्यवंशी,बाबुराव मराठे,ना.ल.मोरे,दत्ता साठम,प्रेमानंद तोडणकर, ना.रा. जोशी,इ.नाटककारांसोबत मामासाहेब वरेरकर, मो.ग.रांगणेकर ,आचार्य अत्रे अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर होऊ लागली.या सर्वामध्ये अग्रभागी होते ते कोकणातील नाटककार ला.कृ.आयरे .म्हणूनच त्यांना 'गिरणगावच्या रंगभूमीचा मुकुटमणी ' असे संबोधले जाते.
नाट्यमहर्षी मामा वरेरकर व नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांना गुरूस्थानी मानणाऱ्या ला.कृ.आयरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी कोर्ट - कचे-यांचे दुष्परिणाम या विषयावर ' फिर्याद ' हे नाटक लिहिल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाहि.१९४९ मध्ये त्यांनी ' जुलूम' हे नाटक रंगभूमीवर अाणले.या नाटकाचे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन हजारो प्रयोग होऊन संबंध महाराष्ट्रात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे १९४५ ते १९५७ या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी आपल्या ' स्वस्तिक नाट्य मंदिर' या संस्थेतर्फे स्वत:ची १५ नवी नाटके रंगभूमीवर आणून चैतन्य निर्माण केले.बुद्धीभेद,शेतकरी दादा, मायमाऊली,कुल कलंक, ईर्षा, अमरत्याग, कसोटी,मायेचा संसार,स्वराज्यरवि,निर्धार, आदि २३ नाटके, ०४ लोकनाट्ये,०६ एकांकिका व ३०० श्रृतिकांचे त्यांनी लेखन केले.
कथानकातील विविधता, प्रभावी व्यक्तिमत्त्वे, सुंदर चैतन्यपूर्ण स्वभावरेखाटन,वेधक प्रसंग योजना,वातावरण निर्मिती, खटकेबाज- चटकदार संवाद,उच्च प्रतीची संवाद रचना,आंतरिक संघर्ष, मानवी मनोवृत्तीची विविध रूपे,श्रृंगारप्रचार,विनोदात्मकता,आकर्षक शेवट,कलात्मक दृष्टी,कोकणच्या बोलीवर विविधांगी दर्शन, आदि लेखन वैशिष्ट्यामुळे नाटककार ला.कृ.आयरे यांची नाटके त्या काळी महाराष्ट्र, गुजरात,म्हैसूर राजस्थान, आसाम ,मद्रास पर्यंत तेथील मराठी भाषिकांनी केली.
प्रा.ना.सी.फडके यांच्या मतानुसार संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो.या संघर्षात गुंतलेल्या व्यक्ती या तुल्यबळ असायला हव्यात आणि नाटककाराने त्यांची स्वभावचित्रे निरपेक्षपातीपणे रंगवायला हवीत.तरच ते नाटक स्वाभाविक उंची गाठते.नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाटकांचा तर संघर्ष हा स्थायीभाव आहे.हा संघर्ष प्रस्थापित खोत,जमीनदार, सावकार विरोधात श्रमजीवी शेतकरी वर्गाचा होता. अन्यायाविरोधात न्यायाचा आहे.आयरेंनी नाट्यलेखनाव्दारे शोषित,वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी,श्रमजीवी वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्याचे कार्य केले आहे.त्यामुळेच समाज प्रबोधनाचे दर्शन घडविणारे श्रेष्ठ नाटककार म्हणून ते प्रसिद्धीस पावले.
नाट्यलेखना शिवाय ' मराठा सेवक'या मासिकाचे संपादन करताना आयरेंनी आनंदवन ,रसरंग,कोकण दर्शन, ललित, किर्लोस्कर, मनोहर, नवशिक्षण आदि मासिकं व साप्ताहिकातुन अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले. 'बायोग्राफी इंडिया १९८०', ' लीडर्स आॅफ इंडिया',साहित्य अकादमी -नवी दिल्ली या ख्यातनाम पुस्तकातुन त्यांच्या दखलपात्र साहित्यिक कार्याचा गॊरव करण्यात आला आहे . त्यांच्या अनेक नाटकांनी विविध पारितोषिके पटकाविली.महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनासाठी ' राज्यस्तरिय पुरस्कारासोबत ' अखिल भारतीय नाट्य परिषद,भारत सरकार,कामगार कल्याण मंडळ, आंतरगिरणी कामगार स्पर्धा,नटवर्य चिं.कोल्हटकर नाट्यस्पर्धा, भारतीय साहित्य सभा -पुणे या विविध स्पर्धेत आयरेंच्या नाटकांनी समीक्षकांच्या,प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत अनेक पुरस्कार प्राप्त केले.आयरे एक प्रतिभाशाली नाटककार होतेच पण त्याबरोबर एक उत्कृष्ट नट,दिग्दर्शक, निर्माता,प्रकाशक,कथाकारही होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते.त्यांनी त्यांच्या मुळ गावी रिंगणे येथे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाची स्थापना केली.कोकणात दुर्लक्षित राहिलेल्या राजापूर -लांजा तालुक्यातील २२८ गावांच्या विकासासाठी त्यांनी ' राजापूर -लांजा तालुका नागरिक संघा 'ची स्थापना केली.आज या संस्था उल्लेखनीय कार्य करित आहेत.साहित्य संघ मंदिर,शिवाजी मंदिर मुंबई, मराठी ग्रंथ संग्रहालय, साने गुरुजी कथामाला आदि अनेक संस्थांमध्ये त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले.
१६ डिसेंबर १९५१ रोजी झालेल्या दक्षिण कोकण नाट्य संमेलनाचे आयरे स्वागताध्यक्ष होते.त्यावेळी त्यांनी स्वागताक्षीय भाषणातून मांडलेले मराठी रंगभूमी व नाट्यचळवळीच्या उर्जितावस्थेसाठीचे अभ्यासपूर्ण विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात.आपल्या नाट्यलेखनाचे कोणतेच मानधन न घेणारे आयरे त्या काळात संप्रेषणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रेमाखातर व नाट्यचळवळीच्या प्रचारार्थ स्वखर्चाने नागपूर,चंद्रपूर,म्हैसूर आदि ठिकाणी आपुलकीने पोहचत असत.साहित्य, समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या नाटककार आयरे यांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन वर्तमान पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.एकूणच मराठी नाटक थिटे नसावे ते उंच व्हावे,त्याची मान जगात ताठ रहावी, जागतिक नाट्य साहित्याशी तुलना करताना आपले मराठी साहित्यहि दर्जेदार असावे यासाठी ला.कृ.आयरे अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.
२) नाटककार दशरथ राणे :-
(महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात नाटककार गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करताना शशिकांत मोरे व नाटककार दशरथ राणे)
नाटककार व सामाजिक कार्यकर्ते दशरथ राणे ही वल्ली म्हणजे शांत, तसेच सरळ व साधी राहणी. आपण सर्वजण समाजाचे देणं लागतो आणि म्हणूनच त्यासाठी सतत काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. राहत्या ठिकाणीही अनेक सामाजिक संस्था आणि उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग असतो. उदाहरणादाखल सांगावयाचे झाल्यास 'राष्ट्र सेवादल', 'सानेगुरुजी कथामाला', 'गंमत जंमत मंडळ' अशा अनेक उपक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.
समाजात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्तरावर अनेकजण आपल्या उपजिवीकेसाठी चार पैसे कसे मिळवता येतील या एकाच विचाराने पछाडलेले असतात. व्यवहारिकपणे त्यात काही चुकीचे आहे असे कुणाला वाटत नाही. परंतु या विचारला काही माणसं अपवाद असतात. ती आपल्या उपजिवीकेचा विचार करता करता त्याला समाजसेवेची जोड देतात. प्रत्येक क्षेत्रातल्या प्रस्थापितांना अशा सेवाभावी वृत्तीने समाजप्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या गोतावळ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. प्रत्येकजण पैशाला पैसा जोडून आपल्या आर्थिक सुबत्तेत वाढ कशी होईल याचा विचार करीत असतो. पैशानं समाजातील ठराविक माणसं श्रीमंत होत असतील परंतु त्या श्रीमंतीने समाजातील सुख-समाधान वाढते का? नीट विचार केला असता त्याचे उत्तर नाही असेच येईल. समाजात सुख, शांती, समाधान नांदायला हवे असेल तर सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील श्रीमंतीच ते देऊ शकेल. म्हणूनच समाजात अशी श्रीमंती वाढविण्यासाठी काही माणसं सातत्याने धडपड करत असतात. मात्र प्रसिद्धीच्या माध्यमापासून ही माणसं फार दूर असतात अशातीलच एक म्हणजे नाटककार दशरथ राणे.
इतर अनेक क्षेत्राप्रमाणेच मराठी रंगभूमी हे एक क्षेत्र. या क्षेत्रातील एक सेवाभावींचा गोतावळा म्हणजे हौशी रंगभूमी. मग तो कामगार रंगभूमी असेल अथवा गावोगावची रंगभूमी असेल. व्यावसायिक रंगभूमी आणि हौशी रंगभूमीचे कार्य एकच फरक इतकाच की हौशी रंगभूमीवर वावरणारे रंगकर्मी मोबदल्याची अपेक्षा न बाळगता वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशात हात घालून रंगभूमीच्या भरभराटीसाठी कार्यरत असतात. अशा रंगभूमीसाठी दर्जेदार नाट्यलेखन करून अनेकांनी यश मिळवले. अनेकांनी प्रस्थापित नाटककारांच्या पंगतीत बसण्याइतपत मराठी रंगभूमीच्या दरबारात आपली पत निर्माण केली. रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या अशा यशस्वी नाटककारांच्या नाटकांची जाहिरात नसल्यामुळे ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले. अशा या हौशी रंगभूमीसाठी सातत्याने लिहिणाऱ्या नाटककारांमध्ये अग्रक्रमाने उल्लेख करावा असं नाव म्हणजे नाटककार दशरथ राणे.
नाटककार दशरथ राणे यांचा जन्म ०७ फेब्रुवारी १९४७ रोजी लांजा तालुक्यातील बोरथडे या गावी झाला.शिक्षण पूर्ण केल्यानंतर राणे यांना चुलते कै.सिताराम राणे यांनी मुंबईला नेले. मुंबईसारख्या महानगरात दिवसा काम करून व रात्रीच्या शाळेत ग्रँड रोड, नाना चौक येथील सोशल नाईट हायस्कूल मध्ये त्यांनी अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील कॉ. आर.डी.चव्हाण यांनी राणेंमधील कार्यकर्त्याचे गुण, नेतृत्व क्षमता ओळखून त्यांना मुंबईत पोस्टमन संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करीत खऱ्या अर्थाने व्यासपीठ म्हणून दिले. त्यांचा विश्वास सार्थक करीत महाराष्ट्र -गोवा राज्यातील पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी निरपेक्ष भावनेने कार्य केले,त्याचे फलित म्हणजे मुंबई पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सलग अठरा वर्षे संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना मुंबईतल्या कामगार रंगभूमीवरील कलावंतांचे नाटक- मेळे बघतांना आपणही काही लिहावे ही इच्छा त्यांच्या मनी जागृत झाली व पुढे १९६३ साली 'गुराखी' या एकांकिकेपासून त्यांचा सुरू झालेला अक्षरसृजनाचा प्रवास नाटक व एकांकिकेची ६५ हून अधिक पुस्तके प्रकाशित केल्यावरही सुरूच आहे.
(इथे थांबली जीवनगंगा चा नाट्यक्षण, अभिनेत्याच्या भूमिकेत नाटककार श्री दशरथ राणे)
'इथे थांबती जीवनगंगा'या त्यांच्या पहिल्या नाटकाचा शुभारंभ १ फेब्रुवारी १९६६ साली डाॅ.शिरोडकर हाॅल मुंबई येथे यशस्वीपणे संपन्न झाल्यावर महाराष्ट्रासह विविध मराठी बहुल भागात त्यांच्या समाजप्रबोधन व मनोरंजन करणा-या नाटकांचे हाऊसफुल प्रयोग झाले.त्या काळी पुस्तक निर्मितीतून आर्थिक लाभ होत नव्हता,मात्र छंदीष्ट माणसे आर्थिक झीज सोसुनही अभिव्यक्तिचा छंद निष्ठेने जपतात.राणेंनीही तो जपल्यानेच नाट्यलेखनाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल ते करु शकले. या काळात दिल्लीच्या महाराष्ट्र रंगायतन या संस्थेच्या नाट्यमहोत्सवात त्यांच्या अनेक नाटकांना पारितोषिके मिळाली.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ,राष्ट्रीय कलागुण प्रतिष्ठान पुणे ,मराठी नाटककार संघ मुंबई ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अशा ५० हून अधिक संस्थांनी त्यांच्या नाट्यलेखनाचा सन्मान केला आहे. 'लग्न शांतूच्या मेहुणीचं', 'यंदा कर्तव्य आहे', ' कथा गावोगावची', 'कावेबाज', 'अग्निपरिक्षा', 'माहेरची पुण्याई', 'घरासारखं घर हवं', 'भाग्यविधाता' या सारख्या आशयसंपन्न नाटकांतून मानवी जीवनातील प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.मराठी कामगार रंगभूमीवरील एक प्रथितयश नाटककार म्हणून कोकणच्या या सुपूत्राने अथक संघर्षातून मिळविलेले यश आजच्या नव्या पिढीसमोर आदर्शवत आहे. ला.कृ.आयरे व दशरथ राणे या दोन्ही नाटककारांनी दक्षिण रत्नागिरीतील राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई या महत्वाच्या समाजिक संस्थेत कार्यकारीणी सदस्य म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे.गत पाच -सहा वर्ष संघात काम करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य मी समजतो.
लांजा तालुक्यातील ला.कृ.आयरे, दशरथ राणे यांसारख्या नाट्य चळवळ जगविणाऱ्या दिग्गज नाटककारांचा वारसा नव्या पिढीतील निनाद शेट्ये, अमोल रेडीज, राजेश गोसावी ,मनोज भागवत हे लेखक समर्थपणे पुढे नेत आहेत.चाळ नावाची खट्याळ वस्ती, अग्रेसिव्ह , चालबाज या यशस्वी व्यवसायिक नाट्यनिर्मितीने वाकेडचे निनाद शेट्ये मराठी रंगभूमीवर सशक्त लेखक म्हणुन पुढे येत आहेत.अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रातही ते चांगलेच स्थिरस्थावर झालेले आहेत. सोबतच शाश्वत फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम ते आस्थेने करीत असतात.मराठी झी गौरव पुरस्कार विजेते भांबेडचे नाट्यलेखक-अभिनेते अमोल रेडीज यांना द गेम आॅफ डेस्टिनी व जिहाद या उत्तम नाट्यकलाकृतींनी देशभरात ओळख करुन दिली आहे. जिहादचा हिंदी भाषेत अनुवाद झाला असून हैद्राबाद येथे त्याचे यशस्वी सादरीकरण झाले आहे.वाॅटर इस लाईफ,स्नेहबंध ,वशीकरण,लमाण्याचं प्वाॅर सारख्या त्यांच्या शार्ट फिल्म विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मुद्रा उमठवित आहेत.ही गोष्ट लांजावासीयांसाठी भूषणावह आहे.तळवड्याचे मनोहर रामचंद्र पाटोळे यांनीही जगावेगळी भाऊबीज व वेताळबंगला या नाटकांचे लेखन केले.मात्र ते नभोनाट्य लेखन प्रकारातच पुढे जास्तव रुळले.त्यांच्या नाटकाला राष्ट्र सेवादलाचे सर्वोत्कृष्ट नाट्यलेखनाचे पारितोषिक मिळाले आहे.अभिनय लेखक दिग्दर्शक म्हणून कोकणच्या रंगभूमीवर नावारूपाला आलेल्या राजेश गोसावी या क्रियाशील प्राथमिक शिक्षकाने लिहिलेल्या माझ्या अंगणी नाचते दुस-याची बायको ,गर्लफ्रेंड बाबांची,यही तो लाईफ है बाॅस या नाटकांनी प्रयोगांची नुकतीच शताब्दी पुर्ण केली असून त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने सेन्साॅर मंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली आहे. आज एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रस्फोटीकरणामुळे,ओटीटी सारख्या नव्या प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे युवा पिढी नाटकापासून दुर जाऊ लागली आहे.नाट्य चळवळीतही असंख्य समस्या आज पहायला मिळतात. कोकणातील तालुक्याच्या पातळीवरील नाट्यगृहे समस्यांच्या गर्दीत अडकलेली पाहायला मिळतात.लांजा तालुक्याचा विचार करीता सुसज्ज नाट्यगृहाची निर्मितीच इथे झालेली नाही.सांस्कृतिकदृष्ट्या असलेल्या राजकीय उदासिनतेने इथल्या कलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. एखादी नाट्यसंस्था स्थापन करून नाट्य चळवळ जिवंत ठेवणे हे पदराला खार लावणारे आहे, मात्र तरी देखील नाटककार, कलाकार, रंगकर्मी पुढे येत असून आपल्या परीने आपल्या वर्तुळात गावातील जत्रा-उत्सवांत, व्यावसायिक नाट्यलेखन स्पर्धेच्या निमित्ताने नाट्यचळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कसोशीने करीत आहेत. कोकणातील या नाट्य चळवळींना शासनाने थोडे सहाय्य केले तर नाट्य चळवळीचे सुखद चित्र उभे राहायला वेळ लागणार नाही.
-विजय हटकर ,लांजा
संदर्भ -
सुभाष लाड/ विजय हटकर - नाटककार ला.कृ.आयरे -गिरणगावच्या रंगभूमीचा मुकूटमणी.
http://www.dasharathrane.in
प्रा.विजय तापस-'कस्तुरीगंध:मंगलदिव्य' मराठा विधवांची दु:खगाथा. - दै.लोकसत्ता ०४/०९/२०२२
दुर्गेश आखाडे - ठसा- पारावरच्या रंगभूमीचा अष्टपैलू कलाकार. - दै.सामना०५/११/२०२२
No comments:
Post a Comment