Monday, January 24, 2022

येणा-या दशकात लवेबल लांजा रत्नागिरिच्या पर्यटन केंद्रस्थानी.

 येणा-या दशकात लवेबल लांजा रत्नागिरिच्या पर्यटन केंद्रस्थानी. 



हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील "द लँड आॅफ लेक"(तलांवाची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरीतील  निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर 'लवेबल लांजा 'म्हणून आपली नवी ओळख करु पाहतो आहे. समुद्रकिनारा नसलेला तालुका, मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेले लांजा शहरातून मुंबई -गोवा महामार्ग जात असल्याने महामार्गावरची मुख्य बाजारपेठ म्हणून लांजा शहर विकसित झाले मात्र गेल्या काही वर्षात कोकणपर्यटनाचे वारे जोरात वाहत असताना लांजा तालुक्यात पर्यटनस्थळांचे वैविध्य असतानाही  जिल्हा अथवा कोकणच्या पर्यटन नकाशावर लांजा तालुका त्या मानाने झळकला नाही.मात्र कोकणात जलपर्यटन  बहरत असताना लांजा तालुक्यात असणारी १३ धरणे ही लांजा पर्यटनाच्या विकासाला पोषक ठरणार असून त्याचबरोबर काही वर्षात लांजा तालुक्यात  प्रकाशात आलेली आदिमसंस्कृतीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे ही येणाऱ्या काळात  लांजा तालुक्यात पर्यटन बहरणार असल्याचे निर्देशक असल्याचे मत पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.



      सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला लांजा तालुका हा  समृद्ध निसर्ग,मंदिरे,गढी,लेणी, वाडे या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या लांज्याला विकासाची सर्वाधिक संधी अाहे . याचे कारण लांजा शहराच्या भोवती वसलेल्या २०- २५ कि.मी.परिसरात तालुक्यातील १३ धरणे निसर्गरम्य परिसरात जलाशयांनी समृद्ध असून या जलाशयांचा उपयोग करुन धरण क्षेत्रात असलेल्या गावात काही वर्षात कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी होऊ लागली आहे.कृषीपर्यटन केंद्राची ही संख्या नियोजनपूर्वक वाढविता आली तर 'ग्रामीण पर्यटन' या संकल्पनेवर आधारित पर्यटन बहरायला वेळ लागणार नाही.लांजा तालुक्यात कोकण रेल्वेची निवसर , आडवली, वेरवली ,विलवडे ही सर्वाधिक ४ रेल्वेस्थानके असून याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी उठवायला हवा.त्याचबरोबर मुंबई- गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती वसलेले लांजा हे गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सातारा पासून दोन ते चार तासांच्या अंतरावर असल्याने लांजा तालुका कृषी पर्यटन तालुका म्हणून विकसित झाल्यास मोठ्या संख्येने पर्यटक इकडे वळतील.या दृष्टिने खोरनिनको धरण परिसर वर्षा पर्यटनाचा नवा पर्याय म्हणून वेगाने विकसित होत असून या धरणाच्या चारही बाजूने लिंक रोडची निर्मिती झाल्यास पर्यटकांना सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले स्वर्गसुख अनुभवता येईल.हा  रोचक अनूभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आणता येण्यासारखी समृद्धता या खो-यात आहे. अशाच पद्धतीने बेनी-खेरवसे धरण , महामार्गालगतचे पन्हळे धरण ,कोंडये धरण ,गवाणे व व्हेळ धरणांचा विकास व्हायला हवा.यासोबतच लांजा तालुक्यातील विविध गावात संरक्षित असलेल्या देवराया ही अभ्यासकांच्या दृष्टीने महत्वाच्या ठरत असून दूर्मीळ व वनौषधी वृक्षांचा ठेवा जतन करणाऱ्या या देवरायांच्या अभ्यासासाठी प्राध्यापकांसह विज्ञानशाखेचा अभ्यास करणारा  विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने येत आहे.



     जलपर्यटन व कृषी पर्यटनासोबतच हर्दखळे प्रभानवल्ली परिसरातील सातरांजण धबधबे ,ऎतिहासिक डोलारखिंड, चौबेखिंड, प्रभानवल्ली गावातील गढी ,बल्लाळगणेश, तसेच तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण  माचाळ गाव येथील मुचकुंद ऋषींची गुहा,माचाळच्या पायथ्याशी वसलेले भारतातील पहिला बाॅम्ब बनविणारे क्रांतिकारक जी.अण्णा आठल्ये यांचे शिपोशी गाव ,या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात असलेली चंड देवतेची दुर्मिळ मूर्ती , मठ गावातील प्रति नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्धिस आलेले 'अवधूतवन' हे श्रीदत्तक्षेत्र , विसाव्या शतकातील प्रेमाचे प्रतीक म्हणुन पुढे येण्याची क्षमता असलेले निवसर गावातील राघो - जाखाय चे स्मृतीमंदिर , वेरळ गावातील भवानी शंकर पाध्ये यांचा ३६५ वर्षापूर्वीचा चौसोफी वाडा, जावडे कातळवाडी येथील शैव व वैष्णव पंथीय लेणी,  एकखांबी गणेश, कुव्याचा स्वयंभू गणपती ,साठवली गावातील मुचकुंदि नदिच्या तीरावर वसलेला साठवली किल्ला ,खानविलकर घराण्याची बेनी गावातील वैशिष्टयपूर्ण सदर  आदि वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांचा कासवगतीने होणा-या  विकासाकडे लक्ष देऊन तो जलदगतीने केल्यास लांजा तालुका 'लवेबल लांजा'  च्या नव्या रुपात रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्री केंद्रस्थानी राहू शकेल.


       यासोबतच नुकतीच झाशीच्या राणीचे सासर म्हणुन अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव व देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड ,आबा सुर्वे ,पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी प्रकाशात अाणला.कोट गावाच्या पूर्वेकडे असलेला कातळसड्याला ग्रामस्थ  माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातून कोट कडे जाताना लागणा-या सड्यावर पाष्टे कुटुंबियांच्या एकत्रीत जमीनी असून यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात.या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबियांनी शेतघरे बांधली असून पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे   काम इथे केले जाते.ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी शेतघरे बांधून भात झोडायला सुरवात केली आहे.त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृतीरुपी कातळशिल्पांचा अमूल्य खजिना  असून गावक-यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज  करुन घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काही कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन वारा पावसाचे तडाखे खाल्याने झीज झाली आहे,तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी राजापूर तालुक्यातील  देवीहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या लोकप्रिय कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गू ढ भौमितिक रचना ,वाघाचे चित्र,पंजा  तसेच विविध पक्षी, प्राणी,मासे यांच्या प्रतिकृती असून साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे.पुरातत्वीय दृष्ट्या खूप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समूह व त्यांची वस्तीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कोट सह लांजा तालुक्यातील वाघ्रट ,लिंबूचीवाडी ,भडे ,हर्चे , लावगण,जावडे ,पुनस या गावातील सड्यांवरही कातळशिल्पे आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटन दृष्ट्याही ही स्थळे विकसित केल्यास लांज्यासह जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल.

          

विजय हटकर

पर्यटन अभ्यासक- 

लांजा.









     


        


        









Friday, January 21, 2022

कलोपासक बाळ ठाकूर

 कलोपासक बाळ ठाकूर



        शनिवार, दि.०८ जानेवारी २०२२ रोजी माझ्या मोबाईलवर मार्गदर्शक सुभाष लाड सर यांचा मॅसेज आला आणि मला धक्काच बसला .काही काळासाठी मन सुन्न झाले.विश्वास बसेना म्हणुन मी या घटनेची  खात्री करण्यासाठी त्यांना फोन केला तर ,मराठी साहित्यातील प्रज्ञावंत चित्रकार कलोपासक बाळ ठाकूर यांचे निधन झाल्याचे वृत्त खरे असल्याचे त्यांनी सांगितले आणि मनात त्यांच्या भेटीच्या ताज्या आठवणी दाटून आल्या. आयुष्याची संध्याकाळ सूखसमाधानाने भांबेड गावातील आपल्या मूळ निवासस्थानी जगणारे  बाळ ठाकुर हे खुप काही करूनही प्रसिद्धीपासून दूर राहिले.

   बाळ ठाकूर चित्रकार म्हणून  दिग्गज किंवा मोठे होतेच पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ होते.म्हणूनच त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील साहित्य व चित्रजगत खरोखरच हळहळलेले पाहायला मिळाले. त्यासाठी एक महत्त्वाचे कारण होते ,त्यातील प्रत्येकाला आपल्या घरातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख झाले होते . लोकसत्ता ,महाराष्ट्र टाईम्स किंवा  सामना या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमांत सुहास बहुलकर,श्रीनिवास कुलकर्णी,अभिजित ताम्हणे, प्रा.मं.गो.राजाध्यक्ष, पुरूषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेल्या लेखांत त्याचेच प्रतिबिंब पाहायला मिळाले.


      २५ एप्रिल १९३० रोजी  कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड या गावी बाळ ठाकूर यांचा जन्म झाला.भालचंद्र शिवराम ठाकूर हे त्यांचे मूळ नाव. पण साहित्य व जाहिरात क्षेत्रात ते बाळ ठाकुर या नावानेच प्रसिद्ध होते.त्यांचे वडिल शिवरामभाऊ हे लांजा तालुक्यातील प्रख्यात व्यक्तिमत्व. लांजा तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठं काम केले आहे. लांजा शहरात न्यू इंग्लिश स्कूल या  प्रशालेची मूहूर्तमेढ रोवणाऱ्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापकीय सदस्य होते.त्यांच्याच कर्तृत्वाचा वारसा बाळ ठाकूर यांच्यात उतरला होता.१९४७ मध्ये मॅट्रिक परिक्षा ते  उत्तीर्ण झाले.शालेय वयात कधीतरी कोल्हापुरला गेल्यावर तेथील दवाखान्यात लावलेली निसर्गदृश्ये पाहून चित्रकार होण्याची उर्मी त्यांच्यात जागी झाली.पुढे मुंबईतील जे.जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये मध्ये कमर्शियल आर्ट या अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश मिळाला.जे.जे.स्कुलने अनेक कलाकारांना कलादृष्टी व प्रयोगशील कलावृत्ती बहाल केली.उत्तमोत्तम चित्रकर्मी घडविणा-या या महाविद्यालयात बाळ ठाकूरांच्या आतील चित्रकाराला ख-या अर्थाने प्लॅटफॉर्म मिळाला.त्यातच मुंबईला फणसवाडीतील  वा.रा.ढवळे यांच्या घरी ते मुक्कामाला होते.ढवळे हे मराठी प्रकाशन विश्र्वातील एक मोठे नाव.यामुळे वाड:मय, कला यासंबंधी एक व्यापक अवकाशाची अनुभूती त्यांना मुंबईतील सुरवातीच्या काळातच मिळाली.

    

    मुंबईत सुरवातीला जे थाॅमसन ,उल्का ,ऎय्यर्स अशा संस्थांमधून इलेस्ट्रेटर म्हणून कामाला सुरवात केली. जाहिरात संस्थांबरोबरच प्रकाशन क्षेत्रातही त्यांची कामे सुरु होती.जाहिरात विश्र्वापेक्षा ते पुस्तकांची मुखपृष्ठ व रेखाटन करण्यात जास्त रमल्याने मुखपृष्ठकार म्हणून साहित्यविश्वात अजरामर झाले.मराठीतील नामवंत लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ व रेखाटने त्यांनी केली आहेत.जयंत दळवींचे 'चक्र', भालजी पेंढारकरांचे ' साधा माणूस ' , कमल पाध्ये यांचे ' बंध-अनुबंध ' , अनंत मनोहरांचे 'अरण्यकांड ' , कुसुमाग्रजांचे 'मुक्तायन ' , पु.ल.देशपांडे यांचे ' मैत्र ' अशा कित्येक दिग्गज लेखकांची पुस्तके बाळ ठाकुरांच्या सशक्त मुखपृष्ठ व रेखाटनांमुळे  अधिक गाजली.भिन्न प्रकारच्या लेखकांसाठी त्यांनी तितक्याच भिन्नतेने रेखाटनांचा अविष्कार साकारला.

     लक्ष्मीबाई टिळकांपासून बालकवी, मर्ढेकर, बा.भ.बोरकर अशा अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रे त्यांनी साकारली. रहस्य रंजन  , मौज , सत्यकथा, विवेक, सामना,वसुधा  अशा प्रकाशन संस्थांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.एकूणच मासिके व पुस्तकांच्या निर्मितीत ठाकूरांचे मुखपृष्ठ व आतील कथानकाला सशक्त बनविणारी रेखाटणे असणे म्हणजे पुस्तक दर्जेदार होणं हा विचार साहित्यविश्र्वात दृढ झाला होता.


    स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील कलाक्षेत्रात विविध कलाप्रकार बहरले .नारायण केंद्रे , मकबुल फिदा हुसेन, कृष्णाजी आरा,  दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर सुधीर पटवर्धन ,रवी परांजपे, सुहास बहुलकर, रवींद्र मिस्त्री वासुदेव कामत ,जी कांबळे ,वासुदेव गायतोंडे अशी एक ना अनेक कलावंतांनी महाराष्ट्राचे चित्रपरंपरा ही वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुषी बनवली आहे. या वटवृक्षीकरणात  बाळ ठाकूर यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. अनेक कलाकार वय उतरणीला लागले की, आता पूर्वीसारखे काम जमत नाही, शरिर थकले आहे असे सांगतात.मात्र बाळ ठाकूरांची  नव्वदीतही पेन्सिल व ब्रशवरील पकड पाहून थक्क व्हायला व्हायचे. फक्त पेन्सिलच्या रेखाटनातून मानवी स्वभावाच्या भावना ,छटा त्यांनी सहजसुंदरतेने दर्शविल्या.विविध व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, स्थळचित्रे साकरताना कोणत्याही रंगांचा वापर न करता फक्त रेखाटनाचा कलात्मक वापर करून प्रतिभेच्या जोरावर ती कलाकृती उत्कृष्ट चितारण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. ठाकूर सर प्रकृतीने मृदू व स्वभावाने शांत ,मितभाषी असले तरी त्यांच्या चित्रांचा परिणाम हा कॅनव्हाॅसवर अतिशय ठळक व ठसठशीत असायचा.



      मोडीदर्पण दिवाळी  अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून या अंक निर्मितीची जबाबदारी माझे मार्गदर्शक सुभाष लाड सर यांनी माझ्यावर सन २०२०मध्ये सोपवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोडीदर्पण  दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर या अंकाविषयी साहित्य विश्वातून कौतुकाच्या प्रतिक्रिया आल्या. मराठा वृत्तपत्र संघ दादर -मुंबई ने या अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार  देऊन सन्मानित केल्याने अधिकची प्रेरणा मिळाली.मोडीदर्पणचा हा दिवाळी अंक बाळ ठाकूरांना भेट देण्यासाठी मी आणि लाड सर भांबेड या त्यांच्या मूळ गावी गेलो होतो.त्यावेळी अंगणातील झोपाळ्यावर एका व्रतस्थाप्रमाणे  बसलेल्या स्थितप्रज्ञ बाळ ठाकूरांना त्यांचा नातू अमरेश याने आमची ओळख करून दिली.त्यांच्याशी झालेल्या छोट्या संवादाने ९१ व्या वर्षातही त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याचे जाणवले. मोडी सारख्या ऐतिहासिक वैभवशाली झाकोळलेल्या लिपीला आपण प्रकाशात आणत आहात याविषयी त्यांनी आमचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आमच्या मातीतील थोर सुपुत्र विषयी अभिमान म्हणून लाड सरांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले   यावेळी -- "मी कोणी मोठा नाहीए ,मी फार काही कार्य केले नाही " हे त्यांचे उद्गार त्यांच्या विचारांची उंची अधोरेखित करणारे होते.


  खरं तर यंदाच्या प्रभानवल्ली येथे होणाऱ्या  ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन लांजावासीयांना आपल्या मायभूमीतील या कलोपासाकाचा गौरव करण्याचा आनंद मिळणार होता.ही बातमी त्यांना जेव्हा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष लाड सर यांनी भांबेड येथे सांगितली तेव्हा त्यांनी फक्त मंद स्मित हास्य केले. आज ते आपल्यात नाहीत तेव्हा त्यांना गौरवण्याची, व आपल्या मातृभूमीला स्वकार्यातून मोठं करणाऱ्या कलावंतांचा यथोचित सन्मान आता करायचा राहून गेला याची खंत आयुष्यभर लागून राहणार आहे.मात्र सन २०१७ साली डोंबिवली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात थोर विज्ञानकर्मी डाॅ.जयंत नारळीकर यांच्यासह ठाकूर सरांना  जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले होते, याचा आनंद मात्र आयुष्यभर समाधान देत राहील.


      कोकणचे सुपुत्र म्हणून कोकणी माणसाला खरोखरच बाळ ठाकूरांविषयी मनातून अभिमान वाटत असेल, तर त्यांच्या लांजा तालुक्यातील निसर्गरम्य भांबेड या मूळगावी आयुष्यभर कलेची साधना करणाऱ्या कलोपासक बाळ ठाकूर यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे कला दालन उभे राहायला हवे . तीच बाळ ठाकूर सरांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.


विजय हटकर.

आठवणीतील क्षणचित्रे :-



Monday, January 17, 2022

सार्थकी आयुष्य जगलेले व्यक्तीमत्व काशिनाथ लांजेकर..

 सार्थकी आयुष्य जगलेले व्यक्तीमत्व काशिनाथ लांजेकर.. 

🌼🌼🌼🌸🌼🌼🌼



     आपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण त्यांच्या मधले संपूर्ण आयुष्य हे आपल्याला जगायचे असते. हे आयुष्य जगताना सत्य, सचोटी, सरळमार्गी तत्त्वांच्या पाऊलवाटेवर चालत समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक संस्थांमध्ये  आदर्शवत काम करून " सार्थकी आयुष्य" जगण्याचे भाग्य लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे काशिनाथ लांजेकर!

        लोकमान्य वाचनालय लांजा या लांजा शहरातील वर्धिष्णू संस्थेत गेली पंचवीस वर्षे अर्थात आपल्या कारकिर्दीची रौप्यमहोत्सवी वर्षे कार्यरत राहत लोकमान्य वाचनालयाला दिशा देणारे कार्यवाहक काशिनाथ लांजेकर यांनी मंगळवारी ११ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता त्यांच्या बाजारपेठेतील निवासस्थानी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. यशाची अमृतमहोत्सवी वर्षे यशस्वी साजरी करणाऱ्या काशिनाथ लांजेकर यांच्या अशा अकाली जाण्याने लांजातील अनेकांना धक्का बसला. याचे कारण काशिनाथ लांजेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन लांजा या मूळ गावी आल्यानंतर गेली पंचवीस वर्षे त्यांच्या परीने केलेला सत्कार्य !


      काशिनाथ लांजेकर यांचा जन्म १ जून १९४५ रोजी झाला.प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.शेजारिच वास्तव्यास असलेले त्यावेळचे लांज्यातील सामाजिक कार्यकर्ते कै. ग.रा.तथा भाई नारकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. त्यांच्या प्रभावामुळे ते जनता दल या राजकिय पक्षाकडे आकर्षिले गेले ते कायमचे! त्याकाळातील आमदार आठले गुरुजी, बॅ.नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या आदर्श राजकीय नेतृत्वांचा सहवास त्यांना लाभल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या  विकासासाठी ते पोषक ठरले. आयुष्यात भेटलेल्या या मोठ्या व्यक्तींच्या  संस्कारांनी ते समृद्ध झाले. चुकीच्या गोष्टींवर रोखठोक भूमिका घेणे , प्रहार करणे, सत्य तेच बोलणे, प्रामणिकपणा, कोणतेही काम निष्ठेने करणे या गुणांची त्यांनी आयुष्यभर जोपासना केली.


       त्या काळात शिक्षण घेतलेल्या, गुणवत्ताधारक युवकांना शासकीय सेवेत लगेचच संधी मिळत असे, तशीच संधी काशिनाथ लांजेकर यांना चालून आली.व ते ग्रामसेवक म्हणून खेड तालुक्यात रूजू झाले.१९७०-८० च्या दशकात कोकणातील दूर्गम भागात ग्रामसेवक भाऊ म्हणून काम करणे तसे म्हटले तर आव्हानच होते.परंतू खंबीरमनाच्या काशिनाथ लांजेकर यांनी रत्नागिरिच्या उत्तर सीमेवर वसलेल्या खेड तालुक्यातील विविध गावात ग्रामसेवकभाऊ म्हणून आपल्या कार्यपद्धतीची छाप सोडली.पुढे ८०-९० च्या दशकात राजापूर तालुक्यात काम करित १९९५ आपल्या ' लांजा '  या मुळ गावी राहण्यासाठी व कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी आनंदाने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.व लांजा शहरातील लोकमान्य वाचनालय, पेन्शनर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थांमध्ये स्वत:ला वाहून घेतले.

       

       मला वाटतं , कोणत्याही संस्थेच्या वाटचालीत २५ वर्षे निस्वार्थीपणे आपल्या परीने योगदान देणे हे त्या व्यक्तीचे समाजातील महत्व अधोरेखित करते. ग्रामसेवक या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन लांज्यात परतलेल्या काशिनाथ लांजेकर यांची १९९६ मध्ये लोकमान्य वाचनालयाच्या कार्यकारिणीत वर्णी लागली.त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवाचा संस्थेला लाभ व्हावा या हेतूने कार्यवाह ही जबाबदारी सोपाविण्यात आली.ही जबाबदारी त्यांनी २५ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडत वाचनालयाच्या विकासासाठी ते प्रयत्नरत राहिले.सुरवातीला मनोहर उर्फ आबा शेट्ये व आता विजय नारकर या दोन्ही अध्यक्षांच्या कार्यकाळात लोकमान्य वाचनालयाच्य विकासासाठी कार्यवाह म्हणून काशिनाथ लांजेकर यांनी पालक -विश्र्वस्ताच्या भूमिकेतून काम केले.वाचनालयाने त्यांच्या कार्यकाळातच "अ" वर्ग दर्जा प्राप्त केला.जुन्या इमारतीतून नव्या टुमदार देखण्या इमारतीत प्रवेश केला.वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या कथाकथन, कथालेखन, पोस्टकार्ड, वक्तृत्त्व, निबंध लेखन स्पर्धा या उपक्रमात विजय बेर्डे सरांसह त्यांचा सक्रिय सहभाग असे.नव्या पिढीने वाचनलयाचा उपयोग करुन आपले व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे, वाचनालयातील स्पर्धा परीक्षा विषयीची मार्गदर्शन पर पुस्तके, संदर्भ ग्रंथ वाचून लांज्यातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत चमकायला हवे अशी त्यांची इच्छा होती.पण लांज्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाचनालयातील स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेल्या पुस्तकांचा वापर करायला नवी पिढी वाचनालयात त्यामानाने कमी येते याची खंत ते नेहमीच व्यक्त करित.

       

       मधल्या काळात  रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे  ३२ वे वार्षिक अधिवेशन १४ नोव्हेंबर २००८ रोजी वक्रतुंड मंगल कार्यालय, लांजा बाजारपेठ येथे संपन्न झाले. हे  अधिवेशन यशस्वी करण्यात वाचनालयाचे कार्यवाह काशिनाथ लांजेकर यांचा सहभाग मोठा होता.याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल.आणखी एक आठवण म्हणजे कोरोना वैश्र्विक संकटकाळात रत्नागिरीतील ग्रंथस्नेह ग्रंथवितरणचे संचालक श्री श्रीकृष्ण साबणे यांच्या रत्नागिरीतील पुस्तकांच्या दुकानात वाचनालयासाठि पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचनालयाचे लिपिक रामचंद्र लांजेकरांसह मी गेलो होतो.त्यावेळी श्रीकृष्ण साबणेंसारख्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय जगतात दखलपात्र वावर असाणा-या बूजू्र्ग व्यक्तिमत्वाने काशिनाथ लांजेकर यांच्या चांगुलपणा व प्रामणिकपणाचा आवर्जून उल्लेख आमच्यासमोर केला.त्यावेळी अशा निष्ठावंत माणसांसोबत काम करायला मिळाले याचा आनंद मला झाला.वाचनालयात अनेक प्रकाशक, पुस्तक विक्रेते पुस्तकविक्रीसाठी येत त्यावेळी काशिनाथ लांजेकर दर्जेदार पुस्तके वाचनालयासाठी आणत चला असा सल्ला त्यांना द्यायचेच पण सोबत जास्तीत जास्त पुस्तके घेण्याचा आग्रह आम्हाला करायचे.काही प्रकाशक व पुस्तक विक्रेते आपल्याच प्रकाशन संस्थेची पुस्तके खरेदी करावीत यासाठी आर्थिक प्रलोभनही द्यायचे मात्र काशिनाथ लांजेकर त्याला कधीच बळी पडले नाहीत.उलट संस्थेचा एक एक पैसा संस्थेच्या विकासासाठी कसा खर्च करता येईल याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा. पारदर्शकता हा त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा पैलू होता.

       

       काशिनाथ लांजेकर यांनी तेली समाज सेवा संघ, लांजा या त्यांच्या समाजाच्या संस्थेतही  उपाध्यक्ष, अध्यक्ष पदे भुषवित समाजाच्या विकासासाठी योगदान दिले.सकाळच्या वेळेत वाचनालाययात एखादा फेरफटका मारणे व  बाजारपेठेतील त्यांच्या घरापासून जवळपास ३ की.मी.अंतरावर असलेल्या शेतात रोज दुपारी ४:०० नंतर चालत जाणे व शेतकीची कामे करणे ही जणू त्यांची दैनंदिनी झाली होती.या कृतीतून जमेल तेवढे या मातीवर त्यांनी प्रेम केले.मात्र गेल्या काही महिन्यांपासून वार्धक्यामुळे त्यांच्या या दैनंदिनीत खंड पडला तो कायमाच... कारण ११ जानेवारी  रोजी त्यांचा प्रवास अखेर थांबला... मृत्यू शाश्वत आहे आणि जगणं ही संधी आहे हे जाणणाऱ्या काशिनाथ लांजेकर यांना एकूणच आपल्या ७६ वर्षाच्या जीवनप्रवासात  सदाचार आणि सद्वर्तनाच्या वाटेवर चालत सार्थकी अायुष्य जगण्याचे भाग्य लाभले. त्यांचा हा नि:स्पृह सेवेचा वारसा त्यांच्या पुढील पिढीतही प्रवाहित राहील हा विश्र्वास वाटतो.

  कै.काशिनाथ लांजेकर यांना भावपूर्ण श्रद्दांजली।

🙏🙏🙏🙏🙏

 श्री विजय हटकर.

 लोकमान्य वाचनालय लांजा.