येणा-या दशकात लवेबल लांजा रत्नागिरिच्या पर्यटन केंद्रस्थानी.
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील "द लँड आॅफ लेक"(तलांवाची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरीतील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर 'लवेबल लांजा 'म्हणून आपली नवी ओळख करु पाहतो आहे. समुद्रकिनारा नसलेला तालुका, मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेले लांजा शहरातून मुंबई -गोवा महामार्ग जात असल्याने महामार्गावरची मुख्य बाजारपेठ म्हणून लांजा शहर विकसित झाले मात्र गेल्या काही वर्षात कोकणपर्यटनाचे वारे जोरात वाहत असताना लांजा तालुक्यात पर्यटनस्थळांचे वैविध्य असतानाही जिल्हा अथवा कोकणच्या पर्यटन नकाशावर लांजा तालुका त्या मानाने झळकला नाही.मात्र कोकणात जलपर्यटन बहरत असताना लांजा तालुक्यात असणारी १३ धरणे ही लांजा पर्यटनाच्या विकासाला पोषक ठरणार असून त्याचबरोबर काही वर्षात लांजा तालुक्यात प्रकाशात आलेली आदिमसंस्कृतीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे ही येणाऱ्या काळात लांजा तालुक्यात पर्यटन बहरणार असल्याचे निर्देशक असल्याचे मत पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला लांजा तालुका हा समृद्ध निसर्ग,मंदिरे,गढी,लेणी, वाडे या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या लांज्याला विकासाची सर्वाधिक संधी अाहे . याचे कारण लांजा शहराच्या भोवती वसलेल्या २०- २५ कि.मी.परिसरात तालुक्यातील १३ धरणे निसर्गरम्य परिसरात जलाशयांनी समृद्ध असून या जलाशयांचा उपयोग करुन धरण क्षेत्रात असलेल्या गावात काही वर्षात कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी होऊ लागली आहे.कृषीपर्यटन केंद्राची ही संख्या नियोजनपूर्वक वाढविता आली तर 'ग्रामीण पर्यटन' या संकल्पनेवर आधारित पर्यटन बहरायला वेळ लागणार नाही.लांजा तालुक्यात कोकण रेल्वेची निवसर , आडवली, वेरवली ,विलवडे ही सर्वाधिक ४ रेल्वेस्थानके असून याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी उठवायला हवा.त्याचबरोबर मुंबई- गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती वसलेले लांजा हे गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सातारा पासून दोन ते चार तासांच्या अंतरावर असल्याने लांजा तालुका कृषी पर्यटन तालुका म्हणून विकसित झाल्यास मोठ्या संख्येने पर्यटक इकडे वळतील.या दृष्टिने खोरनिनको धरण परिसर वर्षा पर्यटनाचा नवा पर्याय म्हणून वेगाने विकसित होत असून या धरणाच्या चारही बाजूने लिंक रोडची निर्मिती झाल्यास पर्यटकांना सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले स्वर्गसुख अनुभवता येईल.हा रोचक अनूभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आणता येण्यासारखी समृद्धता या खो-यात आहे. अशाच पद्धतीने बेनी-खेरवसे धरण , महामार्गालगतचे पन्हळे धरण ,कोंडये धरण ,गवाणे व व्हेळ धरणांचा विकास व्हायला हवा.यासोबतच लांजा तालुक्यातील विविध गावात संरक्षित असलेल्या देवराया ही अभ्यासकांच्या दृष्टीने महत्वाच्या ठरत असून दूर्मीळ व वनौषधी वृक्षांचा ठेवा जतन करणाऱ्या या देवरायांच्या अभ्यासासाठी प्राध्यापकांसह विज्ञानशाखेचा अभ्यास करणारा विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने येत आहे.
जलपर्यटन व कृषी पर्यटनासोबतच हर्दखळे प्रभानवल्ली परिसरातील सातरांजण धबधबे ,ऎतिहासिक डोलारखिंड, चौबेखिंड, प्रभानवल्ली गावातील गढी ,बल्लाळगणेश, तसेच तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ गाव येथील मुचकुंद ऋषींची गुहा,माचाळच्या पायथ्याशी वसलेले भारतातील पहिला बाॅम्ब बनविणारे क्रांतिकारक जी.अण्णा आठल्ये यांचे शिपोशी गाव ,या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात असलेली चंड देवतेची दुर्मिळ मूर्ती , मठ गावातील प्रति नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्धिस आलेले 'अवधूतवन' हे श्रीदत्तक्षेत्र , विसाव्या शतकातील प्रेमाचे प्रतीक म्हणुन पुढे येण्याची क्षमता असलेले निवसर गावातील राघो - जाखाय चे स्मृतीमंदिर , वेरळ गावातील भवानी शंकर पाध्ये यांचा ३६५ वर्षापूर्वीचा चौसोफी वाडा, जावडे कातळवाडी येथील शैव व वैष्णव पंथीय लेणी, एकखांबी गणेश, कुव्याचा स्वयंभू गणपती ,साठवली गावातील मुचकुंदि नदिच्या तीरावर वसलेला साठवली किल्ला ,खानविलकर घराण्याची बेनी गावातील वैशिष्टयपूर्ण सदर आदि वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांचा कासवगतीने होणा-या विकासाकडे लक्ष देऊन तो जलदगतीने केल्यास लांजा तालुका 'लवेबल लांजा' च्या नव्या रुपात रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्री केंद्रस्थानी राहू शकेल.
यासोबतच नुकतीच झाशीच्या राणीचे सासर म्हणुन अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव व देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड ,आबा सुर्वे ,पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी प्रकाशात अाणला.कोट गावाच्या पूर्वेकडे असलेला कातळसड्याला ग्रामस्थ माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातून कोट कडे जाताना लागणा-या सड्यावर पाष्टे कुटुंबियांच्या एकत्रीत जमीनी असून यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात.या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबियांनी शेतघरे बांधली असून पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे काम इथे केले जाते.ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी शेतघरे बांधून भात झोडायला सुरवात केली आहे.त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृतीरुपी कातळशिल्पांचा अमूल्य खजिना असून गावक-यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज करुन घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काही कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन वारा पावसाचे तडाखे खाल्याने झीज झाली आहे,तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.या ठिकाणी राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ आयताकृती असलेल्या लोकप्रिय कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गू ढ भौमितिक रचना ,वाघाचे चित्र,पंजा तसेच विविध पक्षी, प्राणी,मासे यांच्या प्रतिकृती असून साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे.पुरातत्वीय दृष्ट्या खूप महत्वाची आणि या भागातील आदिम मानवी समूह व त्यांची वस्तीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कोट सह लांजा तालुक्यातील वाघ्रट ,लिंबूचीवाडी ,भडे ,हर्चे , लावगण,जावडे ,पुनस या गावातील सड्यांवरही कातळशिल्पे आहेत. मात्र, त्यांचे तज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटन दृष्ट्याही ही स्थळे विकसित केल्यास लांज्यासह जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल.
विजय हटकर
पर्यटन अभ्यासक-
लांजा.
छान माहिती
ReplyDeleteEkadam Chhan mahiti dili aahet Kharach khupach chhan
ReplyDelete