Friday, April 19, 2019


लांज्याचा बाजारपेठतील मारुती व मारुतीचे वैशिष्टयपूर्ण सहा फुटी काष्टशिल्प.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
     
              समर्थ रामदासांच्या  बालोपासनेचे महत्त्व रुजविण्याच्या प्रेरणेतून अनेक गांवात संकटमोचक, रक्षणकर्ता मारुतीची मंदिरे उभी राहिली.हे लोण गावासह शहरातही पोहचले.कधीकाळी गावाच्या वेशीवर असलेली मारुतीची मंदिरे मग गावाच्या ,शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीहि दिसू लागली.असेच एक मंदिर १८८० ते १९०० च्या सुमारास लांजा शहरातील जुन्या बाजारपेठत मारुतीभक्त नारायण वाघदरे यांनी उभारले.आणि तेव्हापासून आजतागायत समस्त लांजावासीय मोठ्या भक्तिभावाने  शक्तिचे प्रतिक असलेल्या मारुतीची उपासना करु लागले.
      हे मंदिर लांजा शहराच्या ऎन बाजारपेठेत विराजमान असल्याने त्याला बाजारपेठेचा मारुती असे संबोधतात. मंदिर पूर्वाभिमुख आहे.श्री मारुतीचे मुख दक्षिणेकडे आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पाऊले मात्र उत्तरेला आहेत.साधारणतः मारूतीचे तोंड ज्या दिशेला असते तिकडे पाय वळलेले असतात.किंवा पाय समोर असतात.यादृष्टीने हि नेहमीपेक्षा वेगळी मूर्ती आहे.हे मंदिर रस्त्यालगत थोडे उंचावर आहे.याचे बांधकाम जांभ्या दगडात केले आहे.मंदिराचा सभामंडप दुमजली असुन प्रवेशाला कमान केली आहे.सभामंडप २० बाय २५ चा असून ८ बाय ६ चा गाभारा त्याला घुमटाकार छत आहे वर छोटे शिखर आहे.मंदिरात घुमटिच्या  छतावर एक छोटि घुमटि असून त्यात राम ,लक्ष्मण ,सीता यांच्या सिमेंटमध्ये कोरलेल्या व रंगवलेल्या आकर्षक मूर्ती आहेत.हे देऊळ खाजगी असून कै.भिकाजी सखाराम वाघदरे व त्यांचे बंधू हे याचे मालक आहेत.
       दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री हनुमानाच्या सहा फुट उंचीच्या काष्टशिल्प मूर्तीची वाजत गाजत वारकरि मंडळाच्या  नामसंकिर्तनाच्या  ठेक्यावर उत्साहात मिरवणूक काढली जाते.मारुतीरायाचे निस्सिम भक्त असलेले व गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश भिकाजी वाघदरे यांनी हि ०६ फुट उंचीची हनुमानाची आगळि वेगळी काष्टमूर्ती खास नाशिकहून बनवून आणली.हनुमानाचे हे काष्टशिल्प आवर्जून पाहण्यासारखे आहे.श्रावणात मंदिरात एक्का साजरा केला जातो.दर शनिवारी मारुतीसमोर दर्शनासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळतात.दर्शनाला आलेले भाविक या वायुपुत्राच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन सारा मानसिक शीण संपवल्याच्या आनंदात समाधानाने बाहेर पडतात.
      राम, सीता, लक्ष्मण यांच्याइतकिच रामायणात महत्वाची व्यक्तिरेखा आहे हनुमानाची.तिची तुलना महाभारतातल्या कृष्णाशीच होऊ शकते.राम आणि हनुमान ही अविभाज्य जोडी मानली जाते.आदर्श भक्त या नात्याने मारूतीच्या उपासनेचे संप्रदाय आखिल भारतवर्षातील सर्वच प्रांतातून  रूढ आहेत.रामचंद्राना जसे देवत्व प्राप्त आले आहे तसेच देवत्व त्यांच्या परिवारातील फक्त मारुतिरायांनाच लाभले आहे.हनुमानाचे चरित्र ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि अपूर्व आहे. रामायणात मारुतिरायाचे स्थान अत्यंत उच्च दर्जाचे आहे.याची साक्ष देताना अंजनीगीतात राम म्हणतात-
                 माते तुझ्या उदरीं जाण।
                 हनुमान जन्मला रत्न ।
          एवढे माझे रामायण। याचेनि योगें।

   म्हणून रामायण हे शरिर असले तर त्यातील आत्मा हनुमान होय.रामपंचायनातील एकच व्यक्ती अशी आहे की जिचे स्वतंत्र मंदिर आहे ती व्यक्ती म्हणजे हनुमान. रामाच्या मंदिरात मारुतिराय असणारच पण त्यांची स्वतंत्र उपासनाही केली जाते.त्यांचा व रामचंद्रांचा प्रत्यक्ष संबंध रामायणाच्या किष्किंधाकांडापासून दृष्टीस पडतो व उत्तरोत्तर या संबंधांतील ऋजुता वाढतच गेलेली आहे.सा-या जगाने जगद्वंद्य ब्रम्हांडनायक मानलेल्या रामचंद्राच्या अंत:करणात हनुमानाबद्दल काय भावमा होती याचे अप्रतिम वर्णन रामायणात आहे.उत्तरकांडात ऋषींजवळ हनुमंताचे वर्णन करताना प्रभु राम म्हणतात-
     शॊर्य दाक्ष्यं बलं धैर्य प्राज्ञत नयसाधनम्।
    विक्रमश्च प्रभावश्च हनुमति कृतालया:।।
    न कालस्य ना शुक्रस्य य विष्णोर्वित्तपस्य च।
   कर्माणि तापि श्रूयन्ते यानि युद्धे हनुमत:।।
- शॊर्य ,दक्षता, धैर्य ,बल प्राज्ञता,राजनितीज्ञता,पराक्रम यांनी जणू काय हनुमंताच्या शरिरात घरेच केली आहेत.कल, महेन्द्र, कुबेर ,विष्णू यांनीही युद्धात जे अचाट पराक्रम केलेले नाहीत असे पराक्रम हनुमंतानी केलेले आहेत.
      सा-या भारतभर हनुमान जन्मोत्सव साजरा होत असला तरि रामायण महाभारतात हनुमानाच्या जन्मतिथीचा उल्लेख नाहि." आनंद रामायणात" चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्रावर हनुमानाचा जन्म झाला असे म्हटले आहे.तर " अगस्थ संहितेत" कार्तिक वद्य चतुर्दशीला, मंगळवारी स्वाती नक्षत्रावर, मेष लग्नावर अंजनीच्या पोटि स्वत: शिवानेच जन्म घेतला असे म्हटले आहे.तर " सूर्य संहितेत" मात्र कार्तिक वद्यातील तिथी सांगून वार शनिवार दिला आहे. मारुतीरायाच्या जन्मतिथीबद्दल महिना,वार, तिथी, वेळ याबाबत मतभेद असल्याने भारतात निरनिराळ्या प्रांतात निरनिराळ्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.महाराष्ट्रात चैत्र पॊर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतात.
        सुदैवाने गत सहा वर्षे मी लांजा शहारतील जुन्या बाजारपेठेत मारुती मंदिराच्या परिसरात रहात असल्याने माझ्या दिवसाची सुरवात मारूतीच्या दर्शनानेच होते.आजहि सकाळी संकटमोचक,रक्षणकर्ता श्री मारूतीचे दर्शन घेऊन मि एक आध्यात्मिक उर्जा घेऊन  कोल्हापूर निपाणीकडे माझ्या कामास्तव बाहेर पडलो  सृजनहो,श्री मारुतीरायाच्या चरित्राचा अभ्यास आपण केला तर आपल्याला जाणवेल की,मारुतीने संकटांवर चालून जाताना कोटीच्या कोटी उड्डाणे केली.आपल्या पार्थ पराक्रमाने शुन्य मंडळाला भेदले.पराक्रमाच्या आधारावर वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी सुजन विचारधारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.व सज्जनांचे रक्षण केले.राक्षसांचे निर्दालन केले व स्वधर्माची प्रतिष्ठापना केली.भीमपराक्रम गाजवून आपले चरित्र फुलविले.आजच्या वर्तमान तरुणाईनेहि मारूतीच्या या आदर्श चरित्राचे अनुकरण करुन स्वत:च्या सामर्थ्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रधर्मासाठी भीमपराक्रम  गाजवून आपल्यासह राष्ट्राचे चरित्र फुलविले पाहिजे.
    श्री विजय हटकर
   दि.१९/०४/२०१९
🚩🚩🚩🚩🚩🚩