Tuesday, April 25, 2023

विनयशील श्रीमती विनया चव्हाण

 सेवाव्रती श्रीमती विनया विलास चव्हाण सेवापूर्ती विशेष..



       विद्या विकास मंडळ,मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर वाटूळ,ता.राजापूर या प्रशालेच्या आदर्श कर्मचारी श्रीमती विनया विलास चव्हाण या २३ वर्षांची निरपेक्ष,प्रामणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरांनी संघर्षपूर्ण जीवन जगत असताना आपल्या मुलांना उच्चशिक्षित करताना प्रामाणिकपणा व निष्ठेने सेवा बजावून अडिच दशकाच्या शैक्षणिक वाटचालीतून सेवाव्रती शब्दाचा अर्थ उलगडवून सेवानिवृत्त होणाऱ्या श्रीमती विनया विलास चव्हाण अर्थात विनयाकाकूंच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा...


            लक्ष्मीपल्लीनाथाच्या कृपा़छत्राखाली कोकणातील एक सुंदर गाव म्हणून नावारुपाला आलेल्या मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या पाली या गावी १ मे १९६३ साली श्रीमती विनयाकाकूंचा जन्म झाला.त्यांचे माहेरचे नाव जयश्री शांताराम सावंतदेसाई. वडिल शांताराम जयराम सावंतदेसाई हे राजधानी मुंबईत पोलिस खात्यात जमादार या पदावर कार्यरत होते.एक कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलिस म्हणून त्यांचा लौकिक होता.शांताराम सावंतदेसाई यांना सहा मुली व दोन मुलगे अशी आठ अपत्ये होती.या सर्वांनाच त्यांनी सुसंस्कारित केले.जयश्री चे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले.पुढचे शिक्षण मात्र गावातील शाळेत झाले.अभ्यासात हुशार असणा-या व मनमिळाऊ स्वभावाच्या जयश्रीने बघता बघता मॅट्रिकचे शिक्षण यशस्वी पूर्ण केले.

             त्यावेळच्या रितीरिवाजाप्रमाणे योग्य वर पहायला सुरवात झाली व राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील महादेववाडी येथील वारकरी संप्रदायातील कै. विठ्ठल रामचंद्र चव्हाण यांचे पुत्र विलास यांच्याशी जयश्री सावंत देसाई यांचा १९८९ मध्ये शुभविवाह झाला आणि त्या विनया विलास चव्हाण झाल्या. कै.विलास ( बापू ) वि. चव्हाण यांचे घराणे वाटुळात 'बांबरकरी घराणे ' या नावाने प्रसिद्ध आहे.याचे कारण चव्हाण यांच्या घरासमोर पोफळीच्या बागा,फुल- झाडांच्या बागा,आंब्याची झाडे अशी सर्व समृद्ध वनश्री आणि भरपूर पाणी होतं. शेजारीच त्यांचं एक भातशेत असून तिथेही भरपूर पाणी. प्रत्येक मळीत पाण्याचा झरा. बांबर या शब्दाचा अर्थ पाणी.पाण्याच्या विपुलतेमुळे महादेव वाडीतील या चव्हाणांना बांबरकरी संबोधले जातं. तर अशा समृद्ध संपन्न एकत्र कुटुंब पद्धती जोपासणाऱ्या बांबरकरी घराण्यात विनयाकाकू प्रेमळ सासू-सासर्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पती विलास यांच्या जोडीने संसाराचा मळा फुलवू पाहत होत्या. या गोकुळासम घरात विनयाकाकू चांगल्याच रमल्या होत्या. घरात गुरे-ढोरे भरपूर होती त्यामुळे दह्या- दुधाची सुबत्ता होती. विनायकाकू घरातल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या कामासह गुराढोरांची देखभाल करायच्या. त्यांच्या संसारवेलीवर विराजरुपी सुंदर फुल फुलल्याने विलास काका व विनया काकू हे दोघेही आनंदीत होते. 

       


      विनायकाकू यांच्या लग्नाला आता जवळपास साडेतीन वर्ष पूर्ण झाली होती आणि आठ महिन्याच्या गर्भवती  असलेल्या विनयाकाकू पती विलास चव्हाण यांच्यासोबतीने आपल्या दुसऱ्या अपत्याच्या आगमनाची उत्कंठतेने प्रतीक्षा करीत होत्या. सुखी संसाराचे रंगबेरंगी इंद्रधनु त्या पहात होत्या,मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एखादा क्षण जीवनात असा येतो की तो साऱ्या जीवनाला अमुलाग्र बदलवून टाकतो एखादी वीज चमकावी तसा तो चमकतो अन्ं सारं आयुष्य एक तर उजळवून टाकतो वा उधळवून टाकतो. २३ नोव्हेंबर१९९२  हा तोच अति दुःखदायक क्लेशदायक ठरलेला दिवस! विनयाकाकूंचे पती श्री विलास विठ्ठल चव्हाण यांना दुपारच्या वेळी गुरे आणायला गेलेले असताना एका बैलांने अचानक जोरदार मुसंडी देत पाठीमागून उडवले. ही धडक इतकी जोरदार होती की या आकस्मिक झालेल्या अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

जीवनात आलेल्या या धक्क्याने विनयाकाकु पूर्णपणे हादरून गेल्या. पदरी दोन मुले सोडून अर्ध्यावरच साथ सोडून गेलेल्या प्रेमळ जोडीदारामुळे त्या पू-या कोसळल्या.मात्र यावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी अर्थात सासू  कै.रूक्मिणी (ताई) विठ्ठल चव्हाण, सासरे कै.विठ्ठल (अण्णा)  रामचंद्र चव्हाण ,सासुबाईंची बहिण श्रीमती सुनंदा श्रीधर चव्हाण (मावशी) , भाऊ कृष्णकुमार शां. देसाई तसेच भावाप्रमाणे धाकटा दीर संजय वि. चव्हाण, मोठ्या नणंदा व मोठे दीर आणि मोठी जाऊ यांनी त्यांना भक्कम आधार दिला.तसेच संकटाकडे पहायची दृष्टी वेळीच निरोगी आणि सक्षम केली.


      पतीवियोगातून आपण सावरायला हवे व पोटच्या दोन लेकरांसाठी आपणच आता बाप बनायला हवे याची जाणीव झाल्यावर साधारण १९९३ ला जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वाटूळ नंबर १ मधील बालवाडीत शिक्षिका म्हणून काम करायला त्यांनी सुरवात केली. बालवाडी शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करताना बालवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. या वेळी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती साळवी बाई व सौ. बंडगर बाई यांची विनया काकूंना मोलाची साथ लाभली. एक आदर्श बालवाडी शिक्षिका म्हणून सहा वर्षातच गावात त्यांनी नावलौकिक मिळविला. दरम्यानच्या काळात वाटूळ पंचक्रोशीतील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या विद्या विकास मंडळ,मुंबई संचलित आदर्श विद्यामंदिर वाटूळ,ता.राजापूर या प्रशालेतील एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त असलेल्या जागेवर गावच्या शिक्षणधुरीणींनी विनयाकाकूंच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती सन १९९९ मध्ये केली. या कामी श्री मुरलीधर गो.चव्हाण, श्री विजय श्रीधर चव्हाण, कै. जनार्दन भूर्के व विनयाकाकूंचे मोठे दीर वै. सुभाष ( दादा ) विठ्ठल चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे विनयाकाकू आजही कृतज्ञतापूर्वक सांगतात. त्यांच्या भरतीवेळी एक महिला चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून योग्य पद्धतीने काम करेल का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला मात्र विनयशील स्वभावाच्या विनयाकाकूंनी आपल्या २३ वर्षाच्या वाटचालीतून त्यांना चोख उत्तर दिले.


    विनया चव्हाण शिपाई म्हणू शाळेत रूजू झाल्या त्यावेळी आदर्श विद्यामंदिर वाटूळ या प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी सुप्रसिद्ध लेखक-कवी -संपादक व अभ्यासू प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेले सुरेश खटावकर सर कार्यरत होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श कर्मचारी म्हणून कसे काम केले पाहिजे याचे मार्गदर्शन विनयाकाकूंना मिळाले. विनयाकाकूंचे महादेव वाडीतील बांबरकरी निवास ते आदर्श विद्यामंदिर वाटूळ हे अंतर साधारण पाच किलोमीटर इतके असेल. विनयाकाकू इतके अंतर पायी चालत जायच्या. यावेळी सोबतीला असलेला विराज व लहानगी वर्षाही सोबत असायची. मुलांना कडेवर घेत इतके अंतर चालताना काकूंची दमछाक होत असे. तसेच संध्याकाळी एवढे अंतर कापत घरी गेल्यावर घरातील कामात गुंतून जाऊन घरातल्यांना सहकार्य करावे लागत होते.मात्र विनयाकाकूंनी याविषयी कधीच कुरबुर केली नाही.सुट्टीच्या दिवशी विनया काकू शेती-भातीच्या कामात स्वतः ला गुंतवून घ्यायच्या. प्रसंगी लहानग्या विरुला डालाखाली ठेवून त्या जात असत.गुराढोरांचे शेण काढणे असो व दूध काढणे असो ही कामेही त्यांनी आनंदाने केली. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन सुसंस्कारित करायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही याची जाणीव त्यांना होती.यासाठी घरातील सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच त्याही समर्पित भावनेने आजवर बांबरकरी निवासात झिजत राहिल्या.

    

     महादेव वाडीतील त्यांचे घर शाळेपासून दूर असल्याने पुढे मुलांच्या शिक्षणासाठी विनया काकू शाळेजवळच म्हणजे वाटूळ तिठ्यावर काही वर्ष राहिल्या.मात्र बांबरकरी निवासातील एकत्र कुटुंबपद्धतीलाही त्यांनी मनोमन जपले.मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या महादेव वाडीतील घरी परतल्या. आज एकत्र कुटुंबपद्धती कालबाह्य ठरू लागली आहे.पूर्वी कुटुंबियांबद्दल वाटणाऱ्या उत्कट जिव्हाळ्याची जागा आता एका थंड तटस्थतेने घेतली आहे. दोन पिढ्यांमधील अंतरही झपाट्याने वाढत चाललेले आहे आणि आर्थिक गरजांना सार्वभौम महत्त्व प्राप्त झाल्यामुळे पूर्वीच्या नातेसंबंधातला गोडवा,अार्तता नाहीशी होण्याच्या बेतात आहे. मात्र वाटुळचे बांबरकरी चव्हाण कुटुंबीय त्याला अपवाद ठरले आहे.आजही एका स्नेहबंधाच्या धाग्याने हे कुटुंब घट्ट विणलेले असून चरितार्थासाठी महानगरात गेलेले चाकरमानी गणेशोत्सव,होळी वा इतर घरगुती कार्यक्रम व मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत वाटुळात येतात तेव्हा ४०-५० माणसांनी बांबरकरी निवास फुलून जाते. घरी आलेल्या या सर्वांचे एकत्रित जेवण आजही केले जाते.आणि या कामात पुढाकार घेतात त्या अन्नपूर्णा असलेल्या विनया चव्हाण काकू. विनायकाकू एक कुशल गृहिणी आहेत.सर्वांच्या आवडीचे गोड-धोड जेवण करून सर्वांनी त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला की चव्हाण काकूंना एक विलक्षण समाधान लाभते.खरंतर वाटुळ मधील बांबरकरी निवास एक संपन्न निवास आहे. त्यामुळे सतत येणाऱ्या पाहुण्या-रावण्यांची वर्दळ माणसांचा राबता या घरात असतो. या सर्वांचे विनयाकाकू आनंदाने स्वागत करतात. त्यांनी दिलेल्या चहामध्ये वात्सल्याचा विलक्षण गोडवा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि म्हणूनच विनया काकू सर्वांच्या हृदयात आईनंतर सर्वात जवळच्या वाटणाऱ्या 'काकू' ची जागा मिळवतात..


   आदर्श विद्यामंदिर वाटूळ या प्रशालेत २३ वर्षे सेवा बजाविताना एक प्रेमळ सहकार्यशील सहकारी म्हणून सहका-यांमध्ये त्यांनी आपुलकीचे स्थान मिळविले. या काळात मुख्याध्यापक म्हणून भांदिगीरे सर, शिंदे सर,पाटील सर व आता कार्यरत असलेल्या खरात सरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी त्यांना लाभली. कुटुंबातील काही सदस्य संस्थेवर कार्यरत आहेत याचा अभिमान त्यांना निश्चितच होता पण त्यांच्या पदाचा दुरूपयोग त्यांनी कधीच केला नाही वा कामात कामचुकारपणाही केला नाही.शाळेतील दस्तऐवज जतन करणे, त्यांची निगराणी करणे याबाबत लिपिकासोबत त्याही दक्ष असायच्या.शाळेचे जनरल रजिस्टर , आवक-जावक ,हजेरीपत्रक, डेडस्टाॅक रजिस्टर आदी सर्वांची त्यांना योग्य माहिती असायची.त्यामुळेच मुख्याध्यापकही अगदी सुट्टीच्या दिवशीही त्यांना फोन करुन एखादे रजिस्टर नेमके कोणत्या कपाटात मिळेल याची विचारणा त्यांना विश्वासाने करायचे.विनयाकाकूही त्यांना योग्य ती माहिती द्यायच्या.



     शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याशी एखाद्या आईप्रमाणे वात्सल्यपूर्ण भावनेने त्या आजवर वागल्या. कायम हसतमुख असणाऱ्या विनयाकाकूंना मुलांवर रागावताना व चिडतांना कधीच कुणीही पाहिलेले नाही.सर्व मुलांमध्ये त्या 'चव्हाण काकू' म्हणून प्रसिद्ध.होता होईल तेवढी मदत सर्वांना करायची, प्रत्येक काम आत्मीयतेने करायचे अशी त्यांची भूमिका असायची त्यामुळेच त्यांचा शब्द सहसा कुणी डावलत नसे. विनया काकू यांचं शाळा म्हणजे जणू दुसरं घरंच होतं.शालेय परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्या कामी नेहमीच त्या पुढाकार घ्यायच्या.शालेय स्वच्छता म्हणजे शाळेचा आरसा हे त्या जाणून होत्या.त्यामुळेच शाळा स्वच्छ ,सुंदर कशी राहिल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. गत २३ वर्षाच्या वाटचालीतून एक आदर्श चतुर्थ कर्मचारी कसा असावा याचा वास्तुपाठच त्यांनी इतरांना घालून दिला आहे.


विनयाकाकूंच्या मातृवत्सल स्वभावाची ओळख करून देणारा एक प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो.एकदा त्या शाळेत गेलेल्या असताना त्यांची मुलगी वर्षा शेजारच्या दीपा सह लगतच्या अोणी गावी गेली होती. दीपाचा  मामा अोणीला रहायचा.लगेच जाऊन परत यायचे असल्याने घरी असलेल्या आजोबांना सांगून वर्षा निघून गेली.मात्र घरी आलेल्या सुनबाईला नात वर्षा ओणीला गेल्याचे सांगायला ते विसरले. घरी वर्षा नसल्याचे पाहून काकूंनी तिला वाडीत सर्वत्र शोधले.पण ती न भेटल्याने त्या रडकुंडीला आल्या. तेवढ्यात वर्षा घरी परतली.तिला पाहताच काकूंनी वर्षाला काठीने चांगलेच बदडले व इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कुठेही जायचे नाही याची समज तिला दिली. वर्षाही परत अशी कधीच वागली नाही. मात्र या छोट्याशा प्रसंगातून आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम करणारी विनायाकाकूतील 'हळव्या आईचे' दर्शन घरातील सर्वांनाच झाले.आवश्यक त्या ठिकाणी काकू हातचं काही न राखता मुलांचं कौतुक करतात ; पण वावगं वाटलं तर फटकारायला मागे-पुढे पहायच्या नाहीत.या शिस्तबद्धतेचा त्यांना मुलांच्या जीवनाला दिशा देताना खुप उपयोग झाला.


           समोरच्याला पटकन आपलसं करणारा, मदतीसाठी कायम तत्पर असणारा बोलघेवडा असा काकूंचा स्वभाव आहे.कोणत्याही समारंभात त्या गेल्या की ओळखीच्या सगळ्यांशी वेळात वेळ काढून त्या बोलतात.काकूंचा हा सहजसाध्य स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीतला उत्साह अनुसरण्यासारखा आहे. त्यांची कन्या वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण रिंगण्याला झाले.इथल्या दोन वर्षाच्या शैक्षणिक काळातील तिच्या मैत्रिणी वर्षापेक्षा अधिक विनयाकाकूशी समरस झाल्या अाहेत.वर्षाच्या मैत्रिणी काकूंची आठवण आल्यावर तिला आवर्जून भेटायला येतात वा फोनवरून त्यांची विचारपूस करतात.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आपल्या मुलींच्या सखींनाही आपल्याकडे आकर्षित करणारी काकू तिच्या या स्वभावविशेषामुळे मनाला अधिक भावते.खरं तर बांबरकरी निवासात तिच भरून राहिलेलं आश्वासक सानिध्य, माणसांपासून ते गोठ्याच्या गाईवासरांपर्यंत पसरत गेलेला तिचा स्नेहभाव,एकत्र कुटुंब पद्धतीत पतीनिधनानंतर मुलांचा सांभाळ करताना कर्ता बनलेली तिच्यातील कणखर 'स्त्री' -

       "आई घरातल्यांपैकी कुणाचीही जागा घेऊ शकते,

       पण आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही."

या प्रसिद्ध विचारवंत कार्डियलच्या विचारांचा प्रत्यय करून देतात.




        असं म्हणतात,दु:खाचा प्रवाह बंद झाला की सुखाची जाणीव होते.दु:खापाठोपाठ सुखही सावलीप्रमाणे येते.आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या विनयाकाकूंच्या आयुष्यात आता कुठे सुखाचे दोन क्षण आले आहेत.विनयाकाकूंचा मुलगा विराज अर्थात माझा जिगरीदोस्त विरू आज कृषी क्षेत्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेऊन मुंबईसारख्या महानगरात बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करतो आहे. नोकरी सोबतच राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ,माजी विद्यार्थी संघ वाटूळ ,कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवली या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक भान जपतो आहे. एक उत्तम नवोदित कवी- कथाकार- संपादक म्हणून तो नावारूपाला आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्याचा लोकसंग्रह हेवा वाटावा असाच आहे.मोडीदर्पण या दिवाळी अंकातील कवितेचा विभाग त्याच्या या  साहित्यातील प्रतिभावान लोकसंग्रहामुळेच नेहमीच दर्जेदार बनतो.त्यांची  स्नुषा निहाली अँग्रीकल्चर इंजिनिअर असून मुंबईत चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.कन्या वर्षा एम.ए.बी.एड. झाली असून एक आदर्श शिक्षिका म्हणून वाटचाल करते आहे तर जावई भूषण ट्रॅव्हल्स व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहे. विनयाकाकूंचे मुलासमान असलेला पुतण्या सुयशवर प्रचंड जीव आहे.आज सुयश देखील गावातच युवा उद्योजक म्हणून कार्यरत आहे. वास्तववादी जीवनात सुखदुःखांच्या लहरी एकापाठोपाठ एक येत असतात. मुलांच्या जीवनातील स्थिरतेसोबतच नात दूर्वी व नातू विहान काकूंच्या जीवनात सुखाच्या लहरी घेऊन आला आहे. 'तुमच्या दोन्ही मुलांना तुम्ही उत्कृष्ट घडवले आहात' -असे उद्गार जेव्हा सभोवतालची चांगली माणसे काकूंसमोर काढतात तेव्हा सारे जग जिंकल्याचा आनंद त्यांना होतो. आई म्हणून आजवर केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर झळकते.


 गेल्या तीन दशकांच्या विनयाकाकूंच्या संघर्षपूर्ण वाटचालीकडे पाहताना मला ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या काव्यपंक्ती आठवतात.


 भिंत होऊन ,छप्पर होऊन

गुपितं राखली, छिद्र झाकली

पणती,वात,तेल होऊन

कोनेकोपरे उजळून टाकले. 


      - एक गृहिणी म्हणून प्रपंचात आपले स्थान राखताना स्त्रीला फक्त शारिरिक श्रमांचा बोजा उचलावा लागतो असे नाही तर त्याच्या पलीकडची वेगळ्या अधिक सूक्ष्म पातळीवरची अनेक कर्तव्यही पार पाडावी लागतात.ती गृहच्छिद्रे झाकते.घराचा गौरव सांभाळते.भिंत होऊन सा-यांभोवतीच मातेचे, वात्सल्यतेचे संरक्षक आवार उभे करते.इतकेच नाही तर घरात जेव्हा दु:खाचा काळोख पसरतो तेव्हा पणती, तेल, वात होऊन स्वतः जळत ती घराला प्रकाश पुरविते. विनयाकाकूंनीही अशाच प्रकारे  पतीनिधना नंतर संघर्षपूर्ण वाटचाल करीत नोकरीसोबतच घराला सांभाळत सेवाधर्म पाळत बांबरकरी घराण्याचा आत्मगौरव वाढविताना आपल्या मुलांच्या आयुष्याचे कानेकोपरे उजळून टाकले आहेत.


      परिस्थितीने नामोहरम होणारी माणसे भोवताली इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत असताना आशावादी प्रयत्नांच्या तेवणा-या ज्योतीचा उजेड नजरेत भरतो. विनयाकाकूंची आजवरची वाटचाल ही अशीच प्रेरणा देणारी आहे. आदर्श पत्नी,सून,आई,सासू सोबतच एक उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या निरपेक्ष कामाची मुद्रा उमटविली आहे.२३ वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर आज त्या सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांच्यातील चांगुलपणा त्यांना स्वस्थ बसू देणार नाही याचा विश्वास मला आहे. विनयाकाकू, यापुढील काळातही आपल्याला निरोगी आयुष्य लाभो तसेच आपले जीवन दीर्घ आनंदाने भरलेले राहो,याच  सेवानिवृत्तीच्या सदिच्छा.

💐💐💐💐

 विजय हटकर-

 लांजा

 ८८०६६३५०१७


क्षणचित्रे -