Thursday, January 2, 2020

नववर्षाची प्रसन्न सुरवात


   
उत्साह, उमंग,घेऊन आलेल्या २०२० या नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल सायंकाळी रुण ता.लांजा या निसर्गरम्य गावी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सहभागी झालो. सरत्या वर्षाचा लक्षणीय व आठवणीत राहिल असा शेवट करण्यासाठी यंदा रुण गावातील एन.एस.एस.शिबीर व तेथील प्राथमिक शाळेत असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भाग होण्याचे ठरविले होते.
      आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो.पाच वेळा नववर्ष साजरा करणारा भारत हा कदाचित जगातील एकमेव देश असावा. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा आंग्ल नववर्षदिन हा ही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते.मागील चांगल-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन रविउदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत.असे समजून आपल्या कामाप्रती निष्ठा ठेऊन क्रियाशील असणाऱ्यांची संख्या आपल्या आजुबाजुला कमी नाही.त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाहि असेच काम करण्याची प्रेरणा मिळते.आणि या हेतूनेच मी रुण गावी जाण्याचे ठरविले .
      राष्ट्रनिर्माणासाठी सळसळत्या तरुणाई मध्ये चेतना निर्माण करु पाहणाऱ्या या शिबीरामध्ये कालच्या सायंकाळी राजापूर येथील प्रसिद्ध वक्ते सुप्रसिद्ध विधीज्ञ श्री अभिजित अभ्यंकर यांचे वाचक...मी,चिंतक ...मी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. सायंकाळी लांजा येथील महामार्गावरील खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोत्रे हाॅटेल येथे विधीज्ञ राजेश गुरव व अभ्यंकर वकीलांसोबत फक्कड चहा घेऊन त्यांच्याच गाडीने आम्ही रुणला निघालो. यापूर्वी आमच्या लोकमान्य वाचनालयात ॲड.अभ्यंकरांचे व्याख्यान आम्हि आयोजित केले होते.त्या व्याख्यानाने ॲड.अभ्यंकरांचे भाषाप्रभुत्व ,व विद्वत्तेचा परिचय झाल्याने त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला होता. विचारांची नाळ जुळल्याने गाडीत गप्पांची मैफिल जमली.व रुण गावात कधी पोहचली ते कळलेच नाहि.शिबीरस्थळी एन.एस.एस चे जिल्हा समन्वयक डाॅ.मराठे सर यांनी आमचे स्वागग केले.हे शिबीर प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत या ठिकाणी भरविण्यात आले होते.परंतु शाळेमध्ये असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या डिजेच्या आवाजामुळे अभ्यंकर सरांवर व्याख्यान शाळेपासून एक किमी अंतरावरील कोसुंब वाडिच्या समाजमंदिरात आयोजित करण्यात आले होते. डाॅ.मराठे सरांनी आम्हाला कोसुंब वाडि येथील समाजमंदिरात नेले. आमच्या येण्याच्या अगोदर सर्व मुले तिथे पोहचली होती.व गोलाकार रचनेत शांतपणे पाहुण्यांची वाट पहात बसली होती.सकाळपासून गावात केलेल्या श्रमदानाचा थकवा त्यांच्य चेह-यावर कुठेच दिसत नव्हता उलट आता काहि नवे शिकायला मिळणार या अपेक्षेने बसलेल्या त्या मुलांनी आम्हालाही भूतकाळातील आम्हि सहभागी झालेल्या एन.एस.एस.कॅम्पच्या आठवणीत  डोकावण्यास प्रवृत्त केले.त्यावेळी डाॅ.मराठे सरांसारखी प्रेरक व्यक्तित्व महाविद्यालयीन जीवनात आल्यानेच आज आयुष्याला एक दिशा मिळाली.मराठे सर व एन.एस.एस.हे एक घट्ट नाते आहे.एन.एस.एस्.च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात समाजभान निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
           व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरवातीला पणती प्रज्वलित करण्यात आली .व " पणती जपून ठेवा ,अंधार फार झाला " ही प्रार्थना सर्वांनी एका सुरात म्हटली. मनामनातील, वातावरणातील अंधकाररूपी दु:ख, काळजी, उद्वेग दूर करुन सौख्याचा, भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणारी पणती ही खरं तर मांगल्याचे प्रतीक.सारं काही उजळवून टाकण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी 'पणती' हवीच. मंद, शांत ठेवणार्‍या पणतीच्या प्रकाशाने जी तृप्तता जाणवते, ती लाईटच्या माळांच्या लखलखाटात जाणवत नाही, हे नक्की म्हणूनच एन.एस.एस.मधील ही दीपप्रज्वलनाची पारंपारिक  पद्धत खुप आवडली.पण या प्रार्थनेसोबतच विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशात विघातक वाईट शक्तिंनी  वाढलेल्या अंधाराला दूर करण्यासाठी पणती ज्याप्रमाणे आपला आजुबाजुचा परिसर उजळवून टाकते त्याप्रमाणेच आपणही आपल्या आजुबाजुचा अंधार आपल्या परिने दूर करुया ही चेतना देणारी ही प्रार्थना सर्व शिबिरार्थींच्या मनात नक्कीच घर करून राहिली असेल.
            यानंतर ॲड.अभ्यंकर सरांच्या वाचक...मी, चिंतक ...मी या व्याख्यानाने वाचन व चिंतन प्रक्रियेसोबतच काय वाचणे अपेक्षित आहे हे नव्याने कळले. खरं तर प्रत्येक माणसाला वाचनाचे व्यसन लागलं पाहिजे. सुरवातीच्या काळात वाचनाचा कंटाळा येईल पण,पंधरा दिवस टेक लावून वाचा  मग वाचनाची सवय जडेल. व नंतर दिवसभरात वाचन झाले नाहि तर अस्वस्थ व्हाल याची अनुभुती आपण घ्याल असे सांगत समजून घेउन वाचणं व समजून न घेता वाचन.(गवतगुळी वाचन) या वाचनाच्या दोन प्रकारातील अंतर कारलं व टीका पनीर या उदाहरणाने सांगून त्यांनी व्याख्यानात रंगत आली.

        रुण गावातील जि.प.प्राथमिक शाळेत माझे मोठे बंधू श्री मंगेश हटकर हे शिक्षक म्हणून सेवेत असल्याने व्याख्यानाचा आनंद घेऊन मी जि.प.प्राथमिक शाळा नं.१ चे पटांगण गाठले. या शाळेत रुजू झाल्यानंतर रुण शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम स्थानिक सरंपच मधुकर जाधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने आमचे बंधु मंगेश हटकर व त्यांच्या शिक्षक सहका-यांनी केले.दादाची शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा मला नेहमीच स्फूर्ती देते.पटांगणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.सर्व जण सांस्कृतिक कार्यक्रम पहायला उत्सुक होते.पटांगणासमोरिल भव्य रंगमंच गावातील शिक्षणप्रेमी दातृत्व असलेल्या दात्यांची परंपरा दर्शवित होता.मंचकावर निवेदन करणाऱ्या आमच्या बंधूंनी रंगमंचावर बोलवून मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला.काहि क्षणात कार्यक्रमाला सुरवात झाली.भारतीय परंपरेचे दर्शन घडविण्याचे सूत्र पकडत सादर झालेल्या विविधांगी कार्यक्रमाने प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवले होते.मध्यंतरात बारा वाजल्यानंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वांनी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.लहानग्यांनी सादर केलेले हे कार्यक्रम महानगरातील एखाद्या आधुनिक शाळेच्या मुलांच्या दर्जाचे होते.ते पाहुन ग्रामीण भागातील मुलांमधील गुणवत्ता पाहून यांना जर योग्य संधी व प्रक्षिक्षण मिळाले तर नक्कीच त्यांना उज्वल भवितव्य अाहे हे मनोमन पटले.रात्री दिड वाजता कार्यक्रम संपल्यानंतर एन.एस.एस्.मधील शिबिरार्थी व प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या पाखरांतील ती उर्जा घेउन लांज्याकडे दादासह प्रयाण केले.रुण मधून लांज्याकडे येताना नववर्षाच्या प्रसन्न सुरवातीने नव्या वर्षातील आव्हानांना सामोरे जाण्यचे बळ व विधायक कार्याला प्रेरणा मिळाली. हे निश्चित।
       
      विजय हटकर.
      लांजा