Thursday, December 24, 2020

समर्थ नेतृत्व - ' महंमदशेठ रखांगी '

 समर्थ नेतृत्व - ' महंमदशेठ रखांगी '

🔮💎💎💎💎🔮



        महंमद रखांगी! लांजा तालुक्याच्या सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक ,सहकार, साहित्य ,कृषी आदी सर्वच क्षेत्रात सहज वावर असणारे प्रज्ञावंत ,सुसंस्कृत आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्व! लांजा तालुक्याच्या विकासासाठी गत चार दशके शतप्रतिशत कार्यरत असलेले महंमद शेठ रखांगी 25 डिसेंबर 2023 रोजी वयाच्या 65व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा असून नव्या पिढीला प्रेरणादायी असाच आहे .राजकारण- समाजकारण असा भेद ते मानत नाहीत. किंबहुना समाजकारणाला पूर्णपणे वाहून घेऊन त्यांनी राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    

         “ फुलाला सुगंध मातीचा.” अशी एक उक्ती आहे परंतु मातीचं नातं केवळ फुलांशीच असतं असं नाही, तर ते माणसांशीही असतं. माती जसं झाडांचे, फुलांचे पोषण करते. त्यांना रंग - गंध देते तसंच माणसालाही घडवते, त्यांचे पोषण करते. जी माणसं मातीचं हे  ऋण मानतात, मातीशी नातं जपतात, मातीशी इमान राखतात, त्यांना  मातीचा सुगंध मिळतो. त्या गंधाने इतरांची मनं दरवळतात. असा मातीचा सुगंध लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे महंमद रखांगी.

       मला आजही आठवते ती सन 2003 ची गोष्ट.मी  वरिष्ठ महाविद्यालय लांजा येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असताना न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे  तत्कालीन उपाध्यक्ष महंमद शेठ रखांगी  यांचे एका शैक्षणिक कार्यक्रमाकरिता महाविद्यालयात येणे झालेलं... यावेळी निरस,रटाळपणे चाललेला तो कार्यक्रम कधी  एकदाचा संपतो आहे ,अशा विचारात आम्ही सारे विद्यार्थी डुबलेलो... त्याच वेळी महंमदशेठ मार्गदर्शनासाठी उभे राहिले, आणि पुढील पंधरा मिनिटांच्या आपल्या अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी, आटोपशीर वक्तृत्वाने त्यांनी आम्हा साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले.  त्यांच्या या प्रभावी वक्तृत्वाने भारावून मी माझा मित्र अभिजीत राजेशिर्के सह त्यांना जाऊन भेटलो आणि साहेब 'आपल्या सोबत आम्हाला काम करायचे आहे' असे सांगितले. त्यावर या वयात सर्वप्रथम अभ्यासाकडे लक्ष द्या असे सांगत त्यांनी आम्हाला विद्यार्थी म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. व पुढे आम्हा दोघांनाही आपल्या "स्नेहवर्तुळात " सामावून घेतलं आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करीत आमच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देण्याचे काम केले. आज या घटनेला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु ही घटना माझ्या आयुष्यातील 'अनमोल ठेवा' आहे असेच मी मानतो.

       

           महंमद राखांगी यांचे उच्चशिक्षण मुंबईतील रूपारेल कॉलेजमध्ये झाले. मुंबईसारख्या महानगरातील या सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये धनिकांची व राजकीय पुढाऱ्यांची मुले शिक्षण घेत होती. पण या साऱ्यांवर मात करीत ते रुपारेल कॉलेजमध्ये सलग दोन वर्षे जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्यातील नेतृत्वगुणांना झळाळी प्राप्त झाली. पुढील उच्च शिक्षण पूर्ण करून ते मायभूमी लांजा येथे परतले. तरुण वयातच त्यांनी लोकनेते, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर निष्ठा ठेवून आपल्या सहका-यांच्या जोडीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्यातील गुणवत्ता आणि ध्येयनिष्ठा पाहून पवार साहेबांनी 1995 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. समोर रवींद्र मानेंसारखा तुल्यबळ उमेदवार असताना त्यांनी  माघार घेतली नाही व प्रचाराचा झंझावात सुरूच ठेवला, परंतु दुर्दैवाने त्यांना  पराभव पत्करावा लागल्यानंतरही ते खचून गेले नाहीत उलट मोठ्या जिद्दीने ,आत्मविश्‍वासाने त्यांनी आपले राजकीय व सामाजिक कार्य सुरूच ठेवत विधायक कार्यद्वारे आपली बांधिलकी कायम ठेवली.

    सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजपरिवर्तनासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याची परंपरा गुणाकाराने वाढवत नेणाऱ्या महंमद राखांगी  यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही लक्ष घातले. लांजा तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च व दर्जेदार शिक्षणाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांची सदैव तळमळ असते, न्यू इंग्लिश स्कूल ही प्रशाला तर सीनियर कॉलेज लांजा या शिक्षण संकुलात शिक्षणाच्या सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये यादृष्टीने महंमदशेठ यांचा कटाक्ष असतो. याच दृष्टिकोनातून आपल्या सर्वदूर असलेल्या लोक संपर्काचा उपयोग करीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक निधीचा ओघ लांज्यातील ज्ञानमंदिराच्या उभारणीसाठी वळावा यासाठी विशेष  प्रयत्न केले आहेत.यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असे त्यांचे मित्रवर्य श्री अयुब काझी व आजरा काझी  या दाम्पत्याने रखांगींवरच्या प्रेमा पोटी 25 लाख रुपयांची देणगी टप्प्याटप्प्याने न्यू एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला दिली आहे.

          लांजा तालुक्यात इयत्ता सातवीनंतर असलेली उर्दू शिक्षणाची कमतरता लक्षात घेऊन पैगंबरवासी अजित पन्हळेकर यांच्या साथीने त्यांनी अल अमिन उर्दू हायस्कूल ची स्थापना केली. ज्ञान यज्ञाची ही सुंदर शैक्षणिक संकुले पाहिल्यावर महंमदभाईंच्या कल्पकतेची व शिक्षणप्रेमाची साक्ष पटते.

        समाजात धनिक श्रीमंतांची वणवा नाही.अन्ं नुसत्या कोरड्या सहानुभूतीच्या शब्दांचे बुडबुडे नक्राश्रू ढाळून पोकळ आश्वासनांची खैरात करून स्वस्वार्थाच्या कारणाशिवाय खिशातून दिडकीही बाहेर न काढणाऱ्या राजकीय नेत्यांचीही कमी नाही. परंतु गोरगरिबांना, रंजल्या गांजलेल्यांना, दुखी -पीडितांना ,आकस्मिक आपत्तीचा डोंगर कोसळलेल्या हुशार होतकरू मुलांना कर्तव्य भावनेतून लागेल ती सर्वतोपरी मदत करणारे महंमदशेठ रखांगींसारखे दातृत्व व नेतृत्व आजकाल दुर्मिळच आहे.त्यांच्या  सोबत वावरताना नेहमीच याचा प्रत्यय येतो. अनेक वेळा विविध गरीब रुग्णांना मोठ्या महानगरातील खाजगी रुग्णालयांचे आवाढव्य शुल्क भरणे ही अवघड असते तेव्हा महंमद शेठ त्यांच्यासाठी देवासारखे धावून जातात. या रुग्णांना विविध एनजीओ च्या माध्यमातुन मदतीचा हात मिळावा यासाठी आवश्यक ती त्यांची कागदपत्रे बनवण्याच्या कामी ते स्वतः लक्ष घालून त्या रुग्णांना मदत मिळवुन देताना मी त्यांना जवळून पाहिले आहे .अशा प्रसंगी त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिकच दृढ होतो. त्यांचे दातृत्व व निस्वार्थी भावनेतून व्यक्त होणारा माणुसकीचा गहिवर निश्चितच फार मोठा दुर्मिळ आहे. 

       

           लांजा तालुक्यातील सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. स्वर्गीय डॉक्टर य.दा. लिमये, डॉक्टर अनील पत्की, वालाजीभाई भन्सारी, रवीभाई पटेल, कुमार बेंडखळे , शिवाजी शेठ कोत्रे यांच्या सहकार्याने त्यांनी लांजा नागरी सहकारी पतसंस्थेचे उभारणी केली त्याचप्रमाणे परवेज घारे, हेमंत शेटये ,मंगेश चव्हाण ,अश्रफ रखांगी या सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या दोन्ही संस्था आज  उत्तम रीतीने कार्य करीत आहेत.

           

       त्यांचे खेळाविषयीचे प्रेम सर्वश्रुत आहे. 1990 च्या दशकात लांजा शहरातील "नॅशनल इलेव्हन" क्रिकेट संघाची उभारणी त्यांनी केली होती त्या काळातील नावाजलेल्या संघांपैकी हा एक महत्त्वाचा संघ  होता. युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ,व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी लांजा तालुका कबड्डी असोसिएशन व तालुका हॉलीबॉल असोसिएशनची स्थापना करीत क्रीडा चळवळीला ही दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 


     कोकणात शेती  उत्पन्नाकडे उद्योजकीय मानसिकतेतून पाहिले जात नाही हे लक्षात घेऊन रखांगी यांनी 'स्वयंरोजगार संस्थेच्या' माध्यमातून जरबेरा फुलशेतीचा प्रकल्प मोठ्या हिमतीने उभारत कृषी क्षेत्रात युवकांना वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

     

   यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, युवक मंडळ लांजा व्यापारी संघटना, माजी विद्यार्थी संघ, लायन्स क्लब ,माजी विद्यार्थी असोसिएशन इत्यादी ठिकाणी ही त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा ठसा उमटवलेला आहे ,महंमदशेठ यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे त्यांची चौफेर वक्तृत्वशैली! त्यामागे त्यांचे प्रचंड वाचन, अभ्यास, मनन चिंतन आहे, विषय कोणताही असो ,उपस्थित जनसमुदायाला प्रभावित करण्याची त्यांची वक्तृत्वाची हातोटी विलक्षण आहे.        

    

  दुर्दम्य आशावाद अखंड जिद्द यांचं दुसरं नाव महंमद रखांगी आहे असेच म्हणावे लागेल.एखादी गोष्ट मनावर घेतली की ती कशी यशस्वी होईल याचा ध्यास त्यांना लागतो आणि भराभर चक्र फिरू लागतात.कोण व्यक्ती कोणत्या कामाला योग्य आहे याची जंत्री डोक्यात नेहमीच असते त्यामुळे कामाला वेग येतो आणि हा हा म्हणता अनेक लहान-मोठे(बरेचदा मोठेच ) उपक्रम पारही पडून जातात. या उपक्रमांवेळी ते एखाद्या नेत्यापेक्षा  कार्यकर्ता म्हणून अधिक तळमळीने कार्य करतात त्या वेळी त्यांच्यातील " यशस्वी कार्यकर्ता " मनाला भावतो. समाजाच्या प्रत्येक स्तरातील ,सामान्यातील सामान्य माणसाशी आपुलकीने बोलत त्यांचे प्रश्न हाताळणे असो वा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेदाचा कधीच बाऊ न करता विरोधकांसोबत एकत्र येणे असो या त्यांच्या स्वभावामुळे महंमदशेठ अजातशत्रू व शोधक व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 


   एकुणच राजकारण, समाजकारण या बरोबरच शिक्षण,साहित्य ,कला ,क्रीडा , संस्कृती जोपासण्यासाठी सदैव पुढाकार घेणारे महंमदशेठ रखांगी आज वयाची एकसष्टी पूर्ण करित आहेत हा एक विशेष आनंदाचा क्षण आहे.या क्षणांमध्ये मी ही सहभागी आहे त्यात मला सन्मान वाटतो आणि आनंदही!आम्हा सार्‍या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या महंमदशेठ रखांगी यांना वाढदिवसा निमित्त मनापासून आभाळभर शुभेच्छा आणि त्यांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायू वाटचालीसाठी त्यांना आवश्यक ते सर्व बळ देण्याची परमेश्वराकडे विनम्र प्रार्थना।

💐💐💐💐💐

 श्री विजय हटकर.

   लांजा.



Tuesday, December 22, 2020

छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

 छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

🎥📹🎞️🎞️📸📷📱

                 २२ डिसेंबर!हाच तो दिवस. साधारण चौतीस वर्षांपूर्वी सन १९८६ साली याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजा वासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले. आज३४ वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाही लांजा बाजारपेठेतील मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेला छाया फोटो स्टुडिओ आपला पारंपरिक बाज टिकवून आहे. या स्टुडिओत जाण्यासाठी चढाव्या लागणारे जिने सोबतीने घ्यावा लागणारा दोरखंडाचा आधार सारं फार भारी मजेशीर आहे. पण एकदा का स्टुडिओत प्रवेश केला की त्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण छायाचित्रणाने आपले समाधान होते. ग्राहकांच्या समाधानाला महत्त्व दिल्याने हा स्टुडिओ आज चौतिसावा वर्धापन दिन यशस्वी साजरा करीत आहे.

           तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले  की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

          तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.

     


भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. व्यवसाया सोबतच सामाजिक भान जपत कार्यरत असलेला विनय बुटाला आज लांजा वासियांचा लाडका छायाचित्रकार बनला आहे.कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर केलेला हा  अवलीया एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांनाच परिचित आहे.आणि म्हणूनच फोटो तेथे विनय बुटाला हे समीकरणच झाले आहे.

       पंधरा-वीस वर्षांपूर्वी कॅमेर्‍यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन्  छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा... डिजिटल कॅमेरा... ते मोबाईल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहता हाताळता येऊ लागले. तथापि या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. त्यामुळेच फोटोग्राफीत नवे नवे ट्रेण्ड येतच राहिले लोकांनीही त्या स्वीकारल्याने फोटोग्राफी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी निर्माण झाल्या. भाई बुटालांप्रमाणेच विनयनेही त्या संधीचे सोने केले.  

       असं म्हणतात छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं.. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. विनय बुटाला यासंदर्भात परिपूर्ण म्हणायला हवा.

         आज लग्नाला इव्हेंटचे स्वरूप आले आहे लग्न करण्यासोबत ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरा-नवरी इतकाच महत्त्वाचा असतो तो छायाचित्रकार. लग्नाच्या छायाचित्र व्यवसायाला त्यामुळेच प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सोबत उत्तम पॅकेजही मिळत असल्याने लग्न समारंभातील क्षेत्रात नवीन ट्रेंडना भरते आले आहे. त्यामुळे अनेक परिवार आज "लग्नसोहळा" यादगार करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट,एरियल फोटोशूट ते रिसेप्शन पर्यंतचे फोटोशूट अशा अनेक प्रकारचे फोटोशूट करून घेत असतात. याचा अभ्यास करीत या क्षेत्रात *विनयने आपल्या सहकाऱ्यांची एक " आॅफबीट टीम" बनविली आहे.आज लांज्याची वेस ओलांडत देशभरात  विविध ठिकाणी  छायाचित्रणासाठी विनयचा प्रवास सुरू असतो. तो जिथे जिथे जातो तिथे "छाया फोटो स्टुडिओ" च्या नावासोबतच लांज्याचे नावही पोहोचत असल्याने त्याच्या विषयीचा 'स्नेहभाव' अधिक दृढ होतो आहे. आज लांजा बाहेरील ग्राहकांना मनपसंत सेवा देतानाच ,लांजावासीयांच्या सेवेत छाया फोटो स्टुडिओ कडून कोणत्याही खंड पडलेला नाही कारण विनयच्या मागे गजानन अर्थात आपल्या सर्वांचा लाडका "गजा" सर्वांना उत्तम छायाचित्रकार म्हणून सेवा पुरवीत असतो.

        एकूणच गेली ३४ वर्षे लांजा बाजारपेठेत छायाचित्रणाची निरंतर सेवा देत "छाया फोटो स्टुडिओ" यशाकडे वाटचाल करीत आहे. या स्टुडिओत जिन्याने जात असताना घ्यावा लागणारा दोरीचा आधार कोणालाही क्लेशदायक न वाटता सुखदायी वाटतो यातच या स्टुडिओच्या यशाचे गमक आहे.आगामी काळातही छाया फोटो स्टुडिओ आपल्या दर्जेदार, सर्जनशील,नावीन्यपूर्ण  सेवेने यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच प्रार्थना धनी केदारलिंग चरणी करतानाच भाई बुटाला -विनय बुटाला या पिता-पुत्रांसोबतच छाया फोटो स्टुडिओच्या यशस्वी वाटचालीत हातभार लावणाऱ्या  सार्‍यांनाच आभाळभर सदिच्छा.

     💐💐💐💐💐💐💐

             आपलाच

          विजय हटकर.

Wednesday, September 9, 2020

लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

 


लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."

       'ही आहे, माझ्या आई- बाबांच्या लग्नाची पत्रिका.' विवाह हा मानवी जीवनातील महत्वाचा संस्कार, त्याचे लिखित साधन म्हणजे लग्नपत्रिका. कोरोना विषाणूने उद्भवलेल्या सध्याच्या  लाॅकडाउन काळात वेळ हाती असल्याने आज जुनी कागदपत्रे पुन्हा एकदा हाताळताना हि पत्रिका  नकळत माझ्या हाती लागली आणि आई- बाबांचे लग्न,तेव्हाचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती पत्रिकेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभी राहिली.
       मी बाबांना 'पप्पा' म्हणायचो.पप्पांची आणि माझी तशी जीवाभावाची मैत्री होती.आमचं नातं बाप - मुलाच्या पलीकडचं होतं.१९५० -६० या दशकात जुनी सातवीपर्यत इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेले पप्पा मोडिलिपीचे जाणकार होतेच पण त्यांचे हस्ताक्षर ही सुंदर होते.त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून लहानपणी मला आपलेही अक्षर असे मोत्याच्या दाण्यासारखे असावे असे वाटायचे. मुंबईतील भायखळ्यात त्यांचे बालपण गेले. बाबा त्याकाळातील प्रसिद्ध लक्ष्मी व्यायामशाळा ,भायखळ्याचे उभरते व्यायामपटु होते.लाठी -काठी खेळण्याचे कौशल्य ही त्यांनी हस्तगत केले होते.पुढे घरगुती कारणास्तव पप्पांना मुंबई सोडावी लागली. बाबांप्रमाणेच आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करित आम्हाला स्वतःच्या पायावर उभी करणारी आमची आई ही मुळची सिंधूदुर्गातल्या सुंदरवाडिची.अहो, म्हणजे स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या,लाकडी खेळण्यांच्या मार्केटमुळे जगप्रसिद्ध झालेल्या सावंतवाडीची. आईचे बाबा स्वर्गीय लक्ष्मण पाटील  तेव्हाचे सावंतवाडीच्या बाजारपेठेतील नामांकित व्यक्तिमत्व.लहानपणीच आई सोडून गेल्याने भावंडाना मोठे करुन त्यांना त्यांच्या प्रपंचात आईने स्थिरस्थावर केले.मगच लग्नाच्या मांडवात स्वत: उभी राहिली आणि १२ डिसेंबर १९७६ ला आई - बाबांचे उत्साहात लग्न संपन्न झाले.



      तर, आई - बाबांच्या लग्नाची ही पत्रिका मला सर्वप्रथम १० डिसेंबर २०१२ ला बाबांच्या जुना दस्तऐवज पाहताना मिळाली आणि आई-बाबांचे लग्नाची तारीख मला  समजली.हि पत्रिका मिळाल्याने माझ्या आनंदाला भरते आले,कारण दोनच दिवसांनी आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस येऊन ठेपला होता. त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी माझ्यासमोर आयतीच चालून आली होती.ते वर्ष ही २०१२ असल्याने १२ /१२/२०१२ हा वेगळाच योगायोग ही अचूक साधता आला.आई बाबांचा तो वाढदिवस आम्ही भावंडानी उत्साहात साजरा केला होता.मला आठवतंय ,त्या दिवशी बाबा खुप आनंदी होते.वार्धक्यामुळे थकलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते.हा वाढदिवस साजरा केल्यानंतर बरोबर ७० दिवसांनी बाबा आम्हाला कायमचेच सोडून गेले.त्यावेळी बाबांचा लग्नाचा वाढदिवस एकदा का असेना साजरा करुन आम्हि भावंडे त्यांना आनंद देऊ शकलो याचे फार समाधान वाटले.
       आई- बाबांच्या लग्नाअगोदर एक काळ असा होता की विवाहाची तारीख निश्चित झाली की पंधरा दिवस अगोदर घरोघरी जाऊन अक्षता दिल्या जायच्या.हळद - कुंकू मध्ये तांदुळ रंगविले जायचे.घरोघरी जाऊन अक्षतावाटप केले जायचे.कालांतराने विज्ञानातील प्रगतीने अक्षतांची जागा लग्नपत्रिकेने घेतली.लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्‍या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि त्या काळी असायच्या. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.
       आज काळ बदलला.एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात मार्केटमध्ये लग्नपत्रिकेच्या असंख्य व्हरायटीज आहेत. लहान - मोठ्या आकारातील पत्रिका, वैविध्यपूर्ण डिझाईनच्या कलात्मक, साहित्यिक टच लाभलेल्या लग्नपत्रिका लग्न एक इव्हेंट ( उत्सव) झालेल्या आजच्या जमान्यात विवाहाची शोभा अाणखीनच वाढवित आहेत.एक रुपयापासून पाचशे रुपयापर्तंत पत्रिका आज बाजारात उपलब्ध असताना भारतातील लोकप्रिय उद्योगसमुहाचे मालक अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील  लग्नपत्रिका ही चक्क दोन लाखाची होती हे वाचनात आल्यानंतर व झी मराठी वरील " तुला पाहते रे" मलिकेतील ईशा व विक्रांतच्या लग्नाची महागडी लग्नपत्रिका पाहून महागात महाग पत्रिका बनवुन घेऊन त्या वाटणे हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे मनोमन पटले.मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एक लग्न , लग्नपत्रिकेमुळे चर्चेत आले होते.हि लग्नपत्रिका तब्बल ४४ पानांची होती. या ४४ पानी लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा व विचार, प्रबोधनात्मक लेखमाला यासह अन्य वैचारिक विचारपुष्षांना स्थान दिले होते.पंचफुला प्रकाशन,  ऒरंगाबाद यांनी बनविलेल्या या पत्रिकेचे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी कौतुक केले होते.हि पुस्तकरुपी पत्रिका माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली होती. अशा एक ना अनेक कल्पक लग्नपत्रिकांनी आज लग्नपत्रिकेची प्रतिष्ठा मात्र वाढविली आहे.आज लग्नपत्रिकेचे  स्वरूप जरी बदलले असले तरी तिचे काम मात्र तेच आहे आणि कायम राहणार हे मात्र नक्की.
    ----------------------------------   --------
श्री विजय हटकर
८८०६६३५०७.

Sunday, September 6, 2020

लांज्याचे आधारवड - श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे.

 'लांज्याचे आधारवड '

    -  श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे 

स्वातंत्र्योत्तर कालखंडात कोकणच्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक विकासाला दिशा देण्यामध्ये लांजा तालुक्यातील नररत्नांचा सिंहाचा वाटा आहे.यामध्ये शिवाजीराव सावंत, नाना वंजारे, जानकीबाई तेंडुलकर,शिवरामभाऊ ठाकुरदेसाई ,ग.रा.नारकर, आठल्ये गुरुजी यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.यांच्यानंतरच्या पिढीत निस्वार्थी सामाजिक कार्याचा हा वारसा जपत आपल्या कार्यकुशलतेने रत्नागिरी जिल्ह्यात समाजमान्य ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे होय.काही माणसे जन्मतःच मोठेपण घेऊन येतात.तर काही आपल्या स्वकर्तृत्वाने आदर्शवत काम करुन मोठेपण प्राप्त करतात.अशाच स्वकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण करणारे, लांजा परिसरातील सर्वमान्य नेतृत्व, निष्कलंक चारित्र्य व नि:स्वार्थी समाजसेवेमुळे जनसामान्यांचा आधारवड ठरलेल्या श्री.श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांच्याविषयीचा आढावा..

जन्म :-

     श्री श्रीराम उर्फ भाऊ वंजारे यांचा जन्म स्वातंत्र्यसैनिक व लांज्याचे थोर समाजसेवक कै.सदाशिव उर्फ नाना वंजारे व त्यांच्या पत्नी कै.कुसुमताई वंजारे या थोर दांपत्याच्या पोटी झाला.कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे त्यांचा सन १९४१ मध्ये जन्म झाला.श्रमप्रतिष्टेचे ,देशभक्ती, समाजसेवेचे, स्वावलंबनाचे धडे व प्रत्येक काम श्रेष्ट असते हे संस्कार रुजविणा-या गोपुरी आश्रमात आदर्शव नि:स्वार्थी समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले.

शिक्षण व नोकरी :-

      शालेय शिक्षण पूर्ण करुन चरितार्थासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाची निवड करुन ते सन १९६४ साली  लांज्यातील पहिले सिव्हिल इंजिनियर बनले.व शासकिय  बी.एन्ड.सी विभाग व जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी निस्वार्थी भावनेने जनहिताची कामे केली. नोकरिच्या काळात एक उत्तम प्रशासक म्हणून अापली छाप त्यांनी पाडली.प्रसन्न व्यक्तिमत्त्व व उत्तम प्रशासन कौशल्याच्या बळावर काम करित असताना भाऊंचा जनसंपर्क वाढत गेला.पुढे कौंटुंबिक कारणास्तव त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व आदरणीय नाना वंजारे  अर्थात वडिलांचे कार्य पुढे नेण्याचे ठरविले.राजकीय पुढाऱ्याचा मुलगा पुढारी, डाॅक्टराचा मुलगा डाॅक्टर, इंजिनियर चा मुलगा इंजिनयर झाल्याचे अनेक दाखले समाजात सापडतील पण समाजसुधारकाचा मुलगा समाजसेवक झाल्याचे उदाहरण दुर्मिळच!या दूर्मीळातच भाऊंचा समावेश होतो.


सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्य :-


    स्वर्गीय नानांच्या विचाराप्रमाणे त्यांनी लांजा तालुक्यात ठप्प झालेल्या व बंद पडत आलेल्या संस्थांच्या पुनरूज्जीवनाचे काम सर्व नवीन सहका-यांना सोबत घेऊन केले.यामध्ये स्वर्गीय शिवाजीराव सावंत सहकारी कुक्कुटपालन या संस्थेला त्यांनी पुन्हा रूळावर आणले.

 स्वर्गीय नाना व नानींनी सुरु केलेल्या कुळकर्णी -काळे छात्रालयाची प्रगती मध्यंतरीच्या काळात मंदावली.हे लक्षात येताच भाऊ छात्रालयाबाबत क्रियाशील झाले.व छात्रालयाची घडी बसविण्याच्या कामाला गती असली.

लांजेकर शहरतील वर्धिष्णू संस्था असलेली लोकमान्य वाचनालयाचर पुनरूज्जीवन करुन स्वतः च्या तीनमजली वास्तूत ते वाचनालय जाईल इतकी त्याची प्रगती करण्याचे श्रेय भाऊंचेच!त्यांच्या क्रियाशील व रचनात्मक कार्यपद्धतीमुळे व्यापारी  संघटना लांजा, महिलाश्रम लांजा, दुग्ध सहकारी संस्था आदि संस्था आज सन्मानाने उभ्या असून आदर्शवत काम करित आहेत.

      

शैक्षणिक कार्य :-

      भाऊसाहेब वंजारे यांची सर्वात भरिव कामगिरी म्हणजे लांज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या सर्वात जुन्या अशा न्यू एज्युकेशन सोसायटी लांजेची त्यांनी पुनर्बांधणी केली.व त्याद्वारे न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाकडे लक्ष दिले.तेथील  विद्यार्थ्यांची वाढती संख्या व  अपुरे पडणारे वर्ग व भौतिक सुविधा लक्षात घेऊन कोणताही विद्यामंदिर शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भाऊंनी आपल्या सहका-यांच्या साथीने प्रशालेच्या नव्या दोन इमारतींचे बांधकाम केले.

लांजा तालुक्यात पदवी शिक्षण देणारे वरिष्ठ महाविद्यालय नसल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते.हि गैरसोय टाळण्यासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजाच्या उभारणी साठी भाऊंनी आई स्वर्गीय नानींच्या इच्छेप्रमाणे पाच एकर जागा विनामोबदला देणगीदाखल दिली.व पुढे महाविद्यालयाच्या निर्मितीत जातीने लक्ष दिले.आपल्या बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा वापर त्याठिकाणी उपयोगात आणला.म्हणूनच आज या जागेत मुंबई विद्यापीठातील "उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय " दिमाखदारपणे उभे आहे.व हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व सुसंस्कृत बनले आहेत.



छंदोपासक भाऊ :- 

       सामाजिक व शैक्षणिक कामात सतत व्यस्त असणाऱ्या भाऊंनी आयुष्यभर अनेक छंद जोपासले.ऎंशीच्या उंबरठ्यावर असलेले भाऊ आजही सकाळी आपली बागकामेची आवड घराभोवती फळफुलांची झाडे लावून पुरवतात व त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष देतात.म्हणूनच भाऊंच्या परसबागेचे सौंदर्य पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते.ऎंशीच्या उंबरठ्यावर हि इतकं काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या परसबागेतील फुलांचा सुगंध देत असावा असेही मनोमन न राहून वाटते.आमराईत उभारलेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण व सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमातही भाऊ उत्साहाने सहभाग घेतात.

       दिसामाजी काही तरी लिहावे।

       प्रसंगी अखंडित वाचत जावे।।

  या उक्तीनुसार आजच्या धकाधक्कीच्या जीवनातही भाऊ नियमितपणे वाचन व लेखन हा छंद जोपासतात.जीवनाला समृद्ध करण्यासाठी नियमितपणे वाचन केले पाहिजे असे भाऊ महाविद्यालयीन तरूणांना आवर्जून सांगतात तेव्हा त्यामागची तळमळ दिसून येते.

     बदलत्या काळाबरोबर समाजासमोर नवे नवे प्रश्न उभे राहतात.आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे.आयुष्यभर कुटुंब व समाजासाठी झिजल्यानंतरही वार्धक्यात वृद्धाश्रमाची वाट धराव्या लागणाऱ्यांची संख्या आज वाढत आहे.अशा वृद्धांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सुखा -समाधानाने जगावे यासाठी भाऊंनी लांजा शहरात सुखसुविंधानी युक्त असलेले  नाना -नानी शांतीनिवासाची स्थापना केली आहे.

       मानव जातीवर उदात्त श्रद्धा असलेल्या व्रतस्थ भाऊंचे निराळेपण त्यांच्या अशा निस्वार्थी, निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन नव्या पिढिसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.आज वयाच्या ७९ व्या वर्षीही कामाचा जबरदस्त उरक असलेल्या भाऊंनी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर आपली कुशाग्र बुद्धिमत्ता, तत्वनिष्ठा,सदाचारी सात्विक जीवनाची मुद्रा उमटवली आहे.त्यामुळेच त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून भाऊंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस लांजावासीयांनी मोठ्या उत्साहात सन २०१६ मध्ये साजरा केला होता.भाऊंच्या कार्याविषयी आदर व कृतज्ञता बाळगणाऱ्या आम्हा सर्वांच्या भावनेचा तो आदर होता.

       एकूणच आपल्या निरपेक्ष कार्याने लांजा नगरीचे आधारवड ठरलेल्या ,जनांच्या आनंदात रमलेल्या श्रीराम सदाशिव उर्फ भाऊसाहेब वंजारे यांना दीर्घायुष्य लाभो व पुढील आयुष्य आनंददायी निरामयी जावो, हिच शुभकाना!


   श्री विजय हटकर,

       लांजा.

8806635017


      

Monday, August 17, 2020

वेरवलीचा धबधबा

 समृद्ध निसर्गाचा अविष्कार

'वेरवलीचा धबधबा'


🏝️🍃🌊🌊🌊🌊🍃🏝️


वेरवली हे मध्य कोकणातील विहंगम तालुका म्हणून ख्याती असलेल्या लांजा तालुक्यातील महत्वाचे गाव. चारही बाजुंनी डोगरद-यांनी वेढलेले निसर्गसमृद्ध वेरवली बुद्रुक हे गाव  बेर्डेवाडी धरणावरील मानवनिर्मित धबधब्याने कोकणच्या पर्यटन नकाशावर चर्चेत आले आहे.या बैठ्या  धबधब्याने पर्यटकांवर मोहिनी घातली असून या धबधब्याचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही.

            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या लांजा - कोर्ले रस्त्यालगत दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वेरवली बुद्रुक हे गाव वसलेले आहे.लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाचे व मोठ्या लोकसंख्येचे हे गाव अलीकडेच कोकण रेल्वेचे स्थानक झाल्याने रेल्वेच्या नकाशावर आले.या गावात आकारास आलेल्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाने सिंचन, शेती व पर्यटनाला चालना मिळाली आहे.धरणाच्या भिंतीमधुन पाण्याचा विसर्ग होण्यासाठी कालव्या सारखा मार्ग तयार करण्यात आला असून यातुन २५ फुटावरुन कोसळणारा मानवनिर्मित धबधबा पाहून मन प्रफुल्लित होते.

            लांजा शहरातुन अर्ध्या तासात वेरवली धबधब्यावर पोहचता येते.वेरवली गावात प्रवेश केल्यानंतर राम मंदिर स्टाॅप लागतो. या स्टाॅपजवळच असणारा कोकण रेल्वेचा बोगदा आपले स्वागत करतो. हा बोगदा पार केल्यानंतर लगेचच डाव्या हाताला वळलेला रस्त्याने साधारण एक कि.मी.गेल्यावर वेरवलीच्या धबधब्यापाशी पोहचता येते. भोवतालचा हिरवागार परिसर व  समोरच्या बेर्डेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पावर असलेल्या मानवनिर्मित धबधब्याचा पांढ-या शुभ्र जलधारा डोळ्यांचे पारणे फेडतात.धबधबा ह्या शब्दातच केवढा फोर्स आहे हे येथे आल्यावर मनोमन पडते. हा धबधबा बैठा स्वरूपाचा असून उंची २५ फुट असली तरी वेगाने कोसळणाऱ्या जलधारांनी धबधब्याखाली डोह तयार केला आहे.हा डोह उथळ नसल्याने थेट धारेखाली भिजताना काळजी घ्यावी.डोहाच्या पुढे काही अंतरावरील भागात मात्र चिंब भिजण्याचा ,एकमेकांवर जलतुषार उडवण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. हा धबधबा लांजा शहरापासून हाकेच्या अंतरावर अासल्यामुळे मोठ्या संख्येने लोक येथे वर्षा सहलीसाठी येत आहेत.भर उन्हाळ्यातही हा धबधबा प्रवाहित असल्याने जुन व जुलै हे मुसळधार पावसाचे पहिले दोन महिने सोडून आॅगस्ट ते मे दरम्यानचा काळ येथे येण्यासाठी उत्तम ठरतो.वेगवेगळ्या ऋतुत निसर्गशिल्पाचे विविधांगी रुप न्याहळण्यासाठी येथे जरुर आले पाहिजे.



 कसे जाल ?🛣️

 धबधब्यापर्यंत रस्ता जात असल्याने खाजगी दुचाकी चारचाकी वाहनाने थेट धबधबा गाठावायचे.लांजा बस स्टॅण्ड वरुन वेरवली जाणाऱ्या एस्.टी.ठराविक अंतराच्या फरकाने उपलब्ध आहेत.

लांजा - केळंबे - वेरवली

अंतर ११ कि.मी.

साखरपा - कोर्ले - वेरवली

अंतर- २५

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

🚆 वेरवली रोड.

दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन  वेरवली रोड येथे थांबते.अन्य ट्रेन थांबत नाहीत.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :- 🥘

    गावात आगाऊ सुचना दिल्यास ग्रामस्थ आॅर्डरप्रमाणे जेवणाची व्यवस्था करतात.तसेच लांजा शहर अर्ध्या तासावर असून तेथे हाॅटेल्स व खानावळीची व्यवस्था आहे.गणेश करळकर व दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधल्यास नाश्ता व भोजनाची व्यवस्था गावातही होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :- 🛕🛕

       निसर्गरम्य वेरवलीत पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे.येथील ठिकांणांचा योग्य पद्धतीने विकास केल्यास येथे पर्यटन बहरु शकते. ग्रामदैवत केदारलिंग ,गौरीशंकर, रामपंचायतन या धार्मिक स्थळांसह वायटीएस-यामाहा ट्रेनिंग स्कूल ही पाहण्यासारखे आहे.

       

१) ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर- 🛕

              लांजा कोर्ले मार्गावर १२ कि.मी.अंतरावर निसर्गरम्य देवराईत ग्रामदैवत केदारलिंगाचे नुकतेच जीर्णोद्धार झालेले देखणे मंदिर आहे.मंदिराच्या सभोवताली जांभा दगडाची तटबंदी असुन तटबंदीतच सतिशीळा स्थापित करण्यात आल्या आहेत.


२) श्री रामपंचायतन

              वेरवली रेल्वे पुलाच्या उजव्या हाताला कोकणभर प्रसिद्ध पावलेले श्रीरामाचे अतिशय देखणे मंदिर आहे.मंदिरातील श्रीराम लक्ष्मण व सीतामाईच्या साडेतीन फुट उंचीच्या संगमरवरी मूर्ती व दासमारुतीची मुर्ती पाहून नकळत हात जोडले जातात.व जय श्रीराम हे शब्द मुखातून अलगद बाहेर पडतात.


३) गौरीशंकर मंदिर - 

           येथील रामपंचायतनाचे दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर रेल्वे पटरिच्या बाजूने धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा कि.मी.अंतरावर श्री गौरीशंकर देवस्थान आहे.गाभाऱ्यावर शिखर नसलेल्या या मंदिरात वैशिष्ट्यपुर्ण द्वीरंग शिवपिंडी आहे.या पिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडी उंच असून अर्धा भाग लाल व अर्धा भाग सफेद आहे.महाराष्ट्रात अशा प्रकारची दुसरी पिंडी अजिंठा वेरुळ जवळील श्री कृष्णेश्र्वर मंदिरात आढळते.गर्भगृह बाहेरील कोनाड्यात श्री लक्ष्मीविष्णू व सूर्यनारायणाची आकर्षक  मुर्ती आहे.श्री विष्णूच्या हातातील कमळचा आकर वेगळा आहे.लक्ष्मीच्या डोक्यावर शिवपिंडी व नाग असून मूर्ती सुंदर व सुस्पष्ट आहे.तर दुस-या कोनाडात सारथी अरुणासहित असलेली सूर्यनारायणाची ०७ अश्र्वाच्या रथात बसलेली मुर्ती आहे.सूर्यनारायणाच्या कमरेखाली तुळा आहे.गर्भगृहाच्या द्वाराच्या खालच्या बाजूस मुंगूस व नागाच्या लढाईचे आकर्षक शिल्प कोरलेले आहे.एकूणच बाहेरून साधे भासणारे हे मंदिर मूर्तीवैभवाची सफर घडविणारे आहे.


४) वायटीएस- यमाहा ट्रेनिंग स्कूल :- 🔩⚙️🛠️

                गेल्या दोन वर्षात मुंबई दिल्ली कोलकात्ता आणि चेन्नई या महानगरांबरोबरच महाराष्ट्रातील अौरंगाबादसारख्या १६ शहरांमध्ये तंत्रशिक्षण शाळा  सुरु करण्यात आल्या.अशाच प्रकारची  कोकणातील ग्रामीण भागात सुरु झालेली एकमेव वायटीएस - यमाहा ट्रेनिंग स्कूल ही यामाहा या जापानी कंपनीने स्वारस्य घेऊन ग्रामीण भागातील अल्पशिक्षितांना  हमखास रोजगार देणारी शाळा वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाने सुरु केली आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचा दुचाकी तंत्रज्ञ प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणारी  वैशिष्ट्यपुर्ण शाळा ही आवर्जुन पाहण्यासारखी आहे.                      

         एकूणच पावसाळ्यातील वर्षा सहलीसह एकदिवसाच्या परिपूर्ण सहलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वेरवली गावाला भेट द्यायलाच हवी!

🍀🍀🍀🍀🍀 🏝️🌊🌊🌊🌊🌊🏝️     

      श्री विजय हटकर.                   

     मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।               

      मोबा.८८०६६३५०१७.      

            

 लेख आवडल्यास नावासह शेअर करावा.                        🌼🌼🌼🌸🌸🌼🌼🌼

Sunday, August 16, 2020

रत्नागिरीचा भूशी डॅम- खोरनिनको धबधबा.

 रत्नागिरीचा भूशी डॅम -

       "खोरनिनको धबधबा."

🏝️🌈🌊🌊🌊🌈🏝️

     

 

    निसर्गाची विविधता भरभरुन लाभलेल्या कोकणात एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या खळखळत्या जलधारांनी तुमचे स्वागत करायला उत्सुक असतात. आंबोली, सावडाव , सवतकडा,निवळी, सवतसडा, मार्लेश्र्वरचा धारेश्र्वर,शिवथरघळ, आदि प्रमुख जलप्रपातांवर न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वर्षा सहलींचे आयोजन केले जात आहे.असाच लक्षवेधी पर्यटन क्षमता असलेला व रत्नागिरिचा "भुशी डॅम" म्हणून नावारूपाला आलेला लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित मुचकुंदि धरणावरिल धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरला असून त्याखाली चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी नवे उच्चांक प्रस्थापित करित असताना यंदा कोरानामुळे मात्र येथील पर्यटन थंडावले आहे.

         मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून अंदाजे २६ कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत ऎतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरलेल्या प्रभानवल्ली गावानंतर खोरनिनको गाव लागते.' निनको ' देवीच्या सानिध्यामुळे या जैवसमृद्ध खो-याला खोरंनिनको हे नाव पडले.  खोरनिनको गावात प्रवेश करताच समोरच आपल्या स्वागताला उभे असलेले मनमोहक खोरनिनको धरण आपले लक्ष वेधून घेते.पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागतं अाणि टप्प्या- टप्प्यामध्ये पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित धबधबा भान हरपून टाकतो. या धरणाच्या जलाशयाचा 'मुचकुंदि लेक'चा सांडवा तयार करताना कल्पकतेने अशी रचना केली आहे की झक्कास धबधबा तयार झाला आहे.एका मोठ्या डोंगरात कोरलेल्या सांडव्याच्या पाय-यांवरुन ओव्हरप्लो होऊन वाहणारे पाणी किती सुंदर दिसेल अशी कल्पना करुन ज्यांनी कोणी हा सांडवा इथे बांधला त्याच्या सृष्टी सौंदर्याची दाद द्यायलाच हवी.

         साखरपा -राजापूर रस्त्यालगत भांबेड हे गाव लागते.या गावापसून १२ कि.मी. अंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाने हे मातीचे धरण बांधले आहे.सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला असलेल्या धरणाला दरवाजे नाहीत.त्यामुळे धरण भरल्यानंतर ओव्हरप्लो होणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी एका बाजूने सांडव्याची निर्मिती करण्यात आली आहे.पावसाळ्यात या सांडव्यांवरुन एका संथ लयीत पडणाऱ्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही न विसरता येणारा अनुभव आहे.

         सांडव्याच्या कडेने वर धरणाच्या भिंतीवर पोहचलं की समोर दिसणारं मनमोहक दृश्य स्मितीत करतं.धुक्याने वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्याने ओथंबलेल्या इथल्या समृद्ध निसर्गाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.स्वच्छ वातावराणात हवेत धुकं नसलं की विशाळगडाच्या पायथ्याशी असलेला लोखंडी पुल खोरनिनको धरणाच्या भिंतीवरुन सहज दिसतो.धरणाच्या माथ्यावर तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर उभे राहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या पर्वतातून जलाशयात गोळा झालेले निळेशार पाणी, त्याचा तो विस्तार आणि धरणाच्या एका बाजूने तयार केलेल्या सांडव्यातून मार्ग काढत अनेक पाय-यांवरुन आदळत फेसाळत जाणारे पाणी मन प्रफुल्लित करते.या धरणाचा विस्तार भला मोठा असल्याने ऎसपैस डुबण्याचा आनंद येथे घेता येतो.थंडगार जलधारांमध्ये भिजल्यानंतर जवळच्या टपरींवर गरमागरम चहा व कांदाभजी खाण्याचे सुख अनुभवता येते.इथूनच प्रभानवल्ली गावातील स्वयंभू  बल्लाळगणेश देवस्थान जवळच असल्याने धबधब्याखालील मजामस्ती बरोबरच विघ्नहर्ता बाप्पाच्या  दर्शनाचे पुण्यही पदरात पाडून घेता येते.

       

 

 कसे जाल

धबधब्यापर्यंत पक्का रस्ता असल्याने स्वतः च्या वाहनाने घेऊन ही थेट धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते.

 लांजा - कोर्ले - प्रभानवल्ली - खोरनिनको 

 अंतर - २६ कि.मि.

 रत्नागिरी - लांजा - खोरनिनको

 अंतर -८० कि.मी.

 कोल्हापूर -साखरपा - शिपोशी - कोर्ले - खोरंनिनको

 अंतर -११४ कि.मी.

        

 जवळचे रेल्वेस्टेशन :-

     कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली रोड हे २० कि.मी.अंतरावर असलेले जवळचे स्टेशन आहे तर 

  रत्नागिरी  रेल्वेस्टेशन ८० कि.मी.अंतरावर आहे.


 घरगुती कोकणी जेवणाची व्यवस्था :-

  खोरंनिनको येथे वर्षा पर्यटनाचा विकास झाल्याने दोन -चार खनावळी येथे असून आॅर्डरप्रमाणे भोजनाची व्यवस्था केली जाते.शिवाय गावकऱ्यांशी संपर्क साधल्यास स्थानिक घरामध्येही कपडे बदलण्याची सोय होऊ शकते.


 परिसरातील पर्यटन स्थळे :-

    शिवकाळात सर्वाधिक महसूल देणारा राजापूर प्रभानवल्ली या सुभ्यातील प्रभानवल्ली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खोरनिनको धबधबा परिसरासोबतच  प्रभानवल्लीतील भक्तांच्या हाकेला पावणारा गणेशखोरीचा बल्लाळ गणेश, शिवकालीन मारुती, ऎतिहासिक गढी, नदिपात्रालगत असलेल्या गुहेच्या प्रवेशाद्वारावर असणारे शिलालेख ,पुरातन केदारलिंग, पाच पालख्यांचा एकत्रित भेटीचा कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव जिच्या प्रांगणात संपन्न होतो ते आदिष्टी मातेचे मंदिर, गिरिभ्रमण करणाऱ्या साहसी वीरांना आव्हान देणारा भैरवखोरं विशाळगड ट्रेक आदि समृद्ध परिसर पर्यटनाचं नंदनवन असून तिथल्या स्वर्गाहून सुंदर परिसरात येऊन निसर्ग शक्तीशी तादात्म्य पावण्याचा अनुभव घेण्यासाठी ऎतिहासिक पाऊलखुणांनी समृद्ध असलेल्या या परिसराला एकदा तरि भेट द्यायलाच हवी.                     

🏝️🏝️🏝️🏝️🏝️🏝️          

 ।वि।ज।य।ह।ट।क।र .   

मोबा ८८०६६३५०१७


धबधब्याची क्षणचित्रे :-

Sunday, August 2, 2020

हर्दखळ्याचा सातरांजण धबधबा

वर्षा सहलीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन..

हर्दखळयाचा सतरांजण धबधबा.


            मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून ३० कि.मी.अंतरावर तालुक्याच्या पूर्व टोकास सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गसौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेलं            'हर्दखळे' गाव आपल्या कुशीत सह्याद्रीचा अमूल्य खजिना घेऊन वसले आहे.निसर्गातील अद्भुत चमत्काराने लांजा तालुक्यातील हर्दखळे गावाच्या सीमेवर सह्यपर्वतात माथ्यावर निर्माण झालेला साहसी, वर्षापर्यटनाचा अनोखा अविष्कार म्हणजे सातरांजण धबधबा परिसर हर्दखळे होय.
       घाटमाथ्यावरिल मलकापूर तालुक्यातील गावडिचे  धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यावर वाहणारे पाणी सह्य पर्वतावरून फेसाळत रौद्र जलप्रपातरुपी सात टप्प्यात कोसळते.याच्या जलाघाताने प्रत्येक टप्प्यावर रंजणासारखे खोलगट डोह तयार झाले आहेत.यावरून या धबधब्याला "सात रांजण धबधबा परिसर " संबोधतात. धबधब्याचा विस्तारही मोठा व उंचीही.त्यामुळे आकाशातून दुधाचा वर्षाव होत असल्याचा भास होतो.उंचीवरून प्रचंड वेगाने येणारे तुषार अंगावर झेलणे हा एक सुखद अनुभव असतो.हिरव्यागार निसर्गाच्या मधोमध काळ्या कातळातून बारमाही कोसळणाऱ्या सातरांजण धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे.
        जैववैविध्याने समृद्ध असलेल्या या परिसरात जाण्यासाठी लांजा शहरापासून १८ किमी.अंतरावर असलेले पेठदेव भांबेड हे गाव गाठावे.व तेथून डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने ०६ कि.मी.पुढे गेल्यावर ISO मानंकित जि.प.पु.प्राथमिक शाळा हर्दखळे नंबर ०१ लागते.कोकणातील या आनंददायी शाळेची अनुभूती घेऊन उजव्या हाताला असलेल्या रस्त्याने तीन ते चार कि.मी.अंतर पुढे गेल्यावर सह्याद्रीतील निसर्गनवल सातरांजण धबधबा परिसरात पोहचता येते.
           हर्दखळे गावातील हा स्वर्गाहून सुंदर परिसर आजपर्यंत स्थानिक वाटाडे सोडून शहरी वस्तूपासून अज्ञातवासात होता.परंतु पुण्याच्या एका खाजगी कृषी कंपनीने येथील पोषक हवामानाचा अभ्यास करून १२०० एकर जागा रबर लागवडीसाठी घेतली.व रबराची लागवड करताना हा डोंगरमाथ्यावरिल सातरांजण परिसर प्रकाशझोतात आला.कंपनीने धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मातीचा चांगला रस्ता तयार केला आहे.त्यामुळे दुचाकी फोरव्हिलच्या महिंद्रा बुलोरो ,जीप सारख्या मजबूत वाहनाने वळणावळणाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत थेट पोहचता येते.अन्य वाहने मात्र याठिकाणी उपयुक्त नाहीत.
      सात टप्प्यात जरी हा धबधबा कोसळत असला तरी आपण स्थानिक वाटाड्यांच्या मदतीने जास्तीत जास्त दोन रांजणापर्यंत पोहचू शकतो.धबधबा परिसरात रबर लागवडीच्या कामाला असलेले आसामी तरुण अगदी सहजपणे स्थानिक भूमीपुत्र असल्याप्रमाणे दुस-या रांजणात उडी मारतात.हे थ्रील पाहणेही रोमांचक!पावसाळ्यात मात्र जून, जुलै महिन्यात पावसाचा ओढा जास्त असल्याने आॅगस्ट पासून जानेवारी दरम्यानचा कालावधी या ठिकाणी येण्यास सर्वात उत्तम.परिसरात पाच कि.मी.क्षेत्रात कोणतेही हाॅटेल नसल्याने बिस्किट पुडा, ग्लुकोज पावडर अथवा पोळी -भाजी सोबत घेतलेली उत्तम.मोठ्या धबधब्याच्या आजुबाजुला छोटे छोटे असंख्य धबधबे असल्याने यात चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो.
या सोबतच हर्दखळे धरण परिसर, तोरणमाळच्या गर्द देव
राईतील प्राचीन महादेव मंदिर ,ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर हि ठिकाणेही भेट देण्याजोगी आहेत.
       पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व धबधब्यात चिंब भिजण्यासाठी भान हरवून जाण्यासाठी सातरांजण धबधबा परिसराला भेट द्यायलाच हवी.वर्षा सहलीचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी हा परिसर आपल्याला साद घालतोय...तो म्हणतोय...इथं या..पांढऱ्या शूभ्र तुषारांत चिंब भिजा ...धबधब्याखाली न्हाऊन निघण्याचं थ्रील अनुभवा...व आपली वर्षासहल या परफेक्ट डेस्टिनेशनला आणून सार्थकी लावा.


कसे जाल?

लांजा - पेठदेव भांबेड - हर्दखळे 
३० कि.मी.

राजापूर -वाटूळ -वाघणगाव - हर्दखळे

रत्नागिरी -पाली - दाभोळे - भांबेड - हर्दखळे 


जवळचे रेल्वेस्टेशन - वेरवली.

🌲🌲🌲🌲🌲🌊
    श्री विजय हटकर.
मुक्त पत्रकार। ब्लाॅगर।





      
           
      

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व हवलीचा कडा धबधबा.

इंदवटीचा लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर व

 हवलीचा कडा धबधबा.

---------------------------------

 🌳🌈 श्रावणातील नवे डेस्टिनेशन 🌈🌳


ऋतुंचा राजा वसंत तर महिन्यांचा राजा श्रावण.
श्रावण म्हणजे निसर्गाला पडलेलं सोनेरी स्वप्न.
श्रावण म्हणजे निसर्गाचा समृद्ध संकल्प.
सृजनाला आवाहन करणारा, कवींना भूरळ घालणारा आनंदधन म्हणजे श्रावण.
           कोकणात आषाढात मुसळधार पावसाने अनावर झालेले नदी -नाले श्रावणात पोटापुरते म्हणजे पात्रापुरते जगत असतात.आणि म्हणूनच पावसाळी पर्यटनाला  ख-या अर्थाने सुरवात होते ती श्रावणात.श्रावणी सोमवार म्हणजे तर शिवभक्तांसाठी पर्वणी असलेला दिवस.अशा या श्रावणी सोमवारी फिरायला बाहेर पडायचंय...तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला जायचंय...सोबत धबधब्याखाली मनमुराद भिजायचंय तर लांजा तालुक्यातील निसर्गरम्य इंदवटी गावातील श्री लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर मंदिर व हवलीचा कडा धबधबा आपल्या मनातील कल्पित एकदिवसीय सहल नक्कीच पूर्ण करु शकतो.
     कोकणातील देवस्थानांचे विशेष म्हणजे ती निसर्गरम्य परिसरात वसलेली आहेत.त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्ग सॊंदर्याचाही आनंद घेता येतो.देवस्थानाजवळ धबधबा असेल तर डबल धमाकाच.रत्नागिरी जिल्ह्यातील मारळचा मार्लेश्र्वर व राजापूरचा धूतपापेश्र्वर ,चाफवलीचा चाफनाथ ही अशीच आध्यात्मिक व निसर्गानूभूती देणारी लोकप्रिय ठिकाणे.पावसाळ्यात व विशेष करुन श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते.अशाच प्रकारे लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी  गावातील श्रीदेव लक्ष्मीकांत -ठाणेश्र्वर  व हवलीचा कडा धबधबा हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
      लांजा शहरापासून १० कि.मी.अंतरावर मुचकुंदि नदिच्या काठावर वसलेल्या निसर्गरम्य इंदवटी गावात जाण्यासाठी पर्यटकांना कोंडये -निओशी -इंदवटी हा पर्याय उत्तम ठरु शकतो.कारण निओशी गाव सुरु होताच एका बाजूला हिरव्यादाट डोंगररांगा व संथ वाहणाऱ्या मुचकुंदी नदीचे विहंगम दृश्य आपल्याला आकर्षित करते.हा सुंदर परिसर न्याहाळत आपण इंदवटी गावात कधी पोहचतो ते लक्षातच येत नाही. मुचकुंदी नदीवर लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पुर्णत्वास गेला अाहे.गावातील जलसिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प असून इंदवटी गावातील भगते वाडी परिसरात या धरणाचा सांडवा बांधलेला असून या सांडव्यावरून धरणाचा नयनरम्य परिसर पाहता येतो.पावसाळी पर्यटकांसाठी हे ठिकाण देखील लोकप्रिय ठरत आहे.रस्त्यालगत असणाऱ्या भातांच्या हिरव्यागार  खेच-यांमध्ये श्री धावबाचे मंदिर सुंदर आहे

 श्री देव लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वर :-

                इंदवटी गावातील सुतारवाडी पर्यंत डांबरी रस्त्याने जाता येते.येथून पुढे कच्चा रस्ता गोळवशी गावाकडे जातो.या रस्त्याने पुढे जाताच बाईत वाडी स्टाॅप आहे.येथे आपली वाहने थांबवून बाईतवाडी कडे जाणाऱ्या पाखाडीने आपण थेट श्री देव लक्ष्मीकांत व श्री देव ठाणेश्र्वराच्या पवित्र मंदिर परिसरात पोहचतो. गर्भगृह व छॊटेखानी सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. बाईतवाडीतील श्रीदेव लक्ष्मीकांत इंदवटी, गोळवशी ,खावडी व अर्धा निओशी या  साडे तीन गावांचा  मानकरी आहे.लक्ष्मीकांत हे विष्णूचे उपनाम.हजार ते बाराशे वर्षापूर्वीची शिलाहार राजवटीतील हे देवस्थान असावे असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. सुलतानी आक्रमणापासून तेव्हा देवतेच्या मूर्ती वाचवण्यात आल्या त्यातीलच हे एक देवस्थान असावे. काळ्या दगडातील शंख,चक्र, गदा,पद्मधारी  घडीव श्री विष्णूची (लक्ष्मीकांत) मूर्ती आहे.मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजुला जय -विजय हे द्वारपाल असून मूर्तीच्या खालच्या बाजूला गरुड हात जोडून उभा आहे. तसेच त्याच काळातील गणपती शिल्प सुद्धा अजून सुस्थितीत आहे.श्री देव लक्ष्मीकांत या नावाने हे देवस्थान प्रसिद्ध आहे.

               

 मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव ठाणेश्र्वराचे  घुमटीवजा देऊळ असून आतील मनमोहक शिवपिंड पाहून आपले दोन्ही कर नकळत जोडले जातात.व मुखात हर हर महादेवचा जयघोष सुरु होतो.मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचा कुंडस्वरूप झरा आहे.मंदिरामागील छोटेखानी धबधबा आकर्षित करतो.याचा गाज वातावरणात वेगळाच रंग भरतो.नितांत सुंदर व गर्द झाडिमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळावर  श्रावणी सोमवारी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी  पहायला मिळते.महाशिवरात्र व नवरात्रीला येथे उत्सव भरतो. इंदवटी,गोळवशी,खावडी व अर्धा निओशी यासाडे तीन गावातील कोणतेही शुभ कार्य श्री लक्ष्मीकांताची आज्ञा घेतल्याशिवाय संपन्न होत नाहि.अशा पावित्र्याने भारलेल्या वातावरणात आपण लक्ष्मीकांत व ठाणेश्र्वराच्या चरणी लीन होतो.


 हवलीचा कडा धबधबा :- 

        देव श्री लक्ष्मीकांत या प्राचीन मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला हा धबधबा हवलीचा कडा या नावाने स्थानिकांमध्ये परिचित आहे. बाईत वाडितील स्थानिक मार्गदर्शकाच्या मदतीनेच हवलीचा कडा गाठावा.  धबधब्याकडे जाताना भोवताली असलेली गर्द जंगलराई, भाताची हिरवीगार खाचरे, नारळी पोफळीच्या बागा लक्ष वेधून घेतात. डोंगर उतारावरील हि भाताची हिरवीगार खाचरे  केरळमधील चहाच्या मळ्यांची आठवण करुन देतात.देहभान हरवत यातून मार्ग काढत आपण धबधब्याजवळ पोहचतो.हा पांढराशूभ्र फेसाळणारा धबधबा पाहिला की,अंगातला क्षीण क्षणार्धात निघून जातो.   
              २५ फुटावरुन हवलीचा कडा धबधबा कोसळताना होणारा नाद एकीकडे धडकी भरवणारा असतो तर दुसरीकडे खडकावर आपटुन उडणा-या पाण्याच्या तुषारातुन तो तुम्हाला परमोच्च सुखाच्या आनंदाने न्हाऊ घालतो.पाण्यात उतरताना पुरेशी काळजी घेतली की, धबधब्याखाली यथेच्छ भिजण्याचा मनमुराद आनंद घेता येतो.धबधब्याच्या वरती अनेक गोलाकार रांजण खळगे पाहण्यासारखे आहेत उन्हाळ्यात या कुंडांमध्ये अंघोळीची मज्जा काही औरच असते.हा ओसंडून वाहणारा शुभ्रधवल धबधबा पाहून मुखातून या काव्यपंक्ती आपसुक बाहेर येतात.

        आले भरुन गगन 
        पावसाचे हे स्पंदन
        हर्ष वाहे ओसांडून
        झरे नसानसातून..
     आला श्रावण ,श्रावण।। 


एकूणच या  दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा ऋतु सर्वोत्तम कालावधी असुन श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन व धबधब्याखाली चिंब भिजून निसर्गाचे संगीत तना -मनात भरुन उत्साहाने परतता येते.वर्षासहलीचा व श्रावणाचा सर्वार्थाने आनंद उपभोगण्यासाठी लक्ष्मीकांत- ठाणेश्र्वर मंदिर परिसर व हवलीचा कडा धबधबा परिसर इंदवटी ला एकदा तरि भेट द्यायलाच हवी. 

कसे जाल ? 🚍🛵

🛣️लांजा - कोंडये - निओशी -इंदवटी

🛣️ लांजा -कुवे- वनगुळे -इंदवटी 

 🛣️लांजा - कोंडये- गोळवशी - इंदवटी.

🌳⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️🌳  

     श्री विजय हटकर.

   मुक्त पत्रकार, ब्लाॅगर.

 🍃🍃🍃🍃🍃🍃
 विशेष सहाय्य ;
 किरण भालेकर,अनिकेत भगते ,साहील बाईत.

Saturday, July 4, 2020


                    साने गुरूजींचा वारसा जपणारे
                   "गुरूवर्य गणपत शिर्के सर."
                   🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
                    
                       "विद्वत्ता दक्षता शीलं,
                        संस्कारान्तिरनुशीलम्।
                       शिक्षकस्य गुणा : सप्त् ,
                         सचेतस्व प्रसन्नता।।"

       
      - शिक्षकाच्या अंगी असलेले सात गुण या सूक्तात सांगितले आहेत.विद्वत्ता, दक्षता,चारित्र्य (शील) संस्कार करण्याची क्षमता, दयाळूपणा,चैतन्य,आणि प्रसन्नता.या सूक्ताप्रमाणेच शीलवान,संस्कारक्षम, चारित्र्यसंपन्न शिक्षक म्हणजेच लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षणक्षेत्रातील ज्ञानतपस्वी,साने गुरुजींच्या विचाराचे पाईक, माझे मार्गदर्शक, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री गणपत शिर्के सर .सन २०१८ मध्ये लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर शिर्के सरांनी आपल्या रचनात्मक कार्यशैलीने अल्पावधीतच प्रशालेला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे.भावी पिढिला प्रेरणादायी असणाऱ्या शिर्के सरांच्या  खडतर ,संघर्षात्मक वाटचालीचा खास गुरुपोर्णिमेनिमित्त हा आढावा.
          सह्याद्रीच्या पायथ्याशी व काजळी नदीच्या काठावर वसलेल्या, स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या साखरपा-भडकंबा ता.संगमेश्वर या गावी कै.मारुती शिर्के व कै.सत्यवती शिर्के या दांपत्याच्या पोटी ०३ डिसेंबर १९६३ रोजी गणपत शिर्के यांचा जन्म झाला.लहानपणीच कमवित्या वडिलांचे छत्र हरविल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.तरीही त्यांच्या पाठी भक्कमपणे उभी राहणाऱ्या आईने मोलमजुरी करुन त्यांना दहावीपर्यंत शिक्षण दिले.त्यांची बहिण तारामती हिने सातवीतून तर दुसरी बहिण कमल हिने चॊथीतून भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडून इतरांच्या घरी धुणी -भांडी व घरकाम केले. शिकण्याची त्यांची जिद्द व स्वाभिमानी असलेल्या आई ,बहिणीच्या पाठिंब्यावर त्यांनी पुढे शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.अकरावी करिता त्यांनी साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला.तेथील त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री आनंदराव कचरे सर यांनी गणपत शिर्के यांच्या परिस्थितीचा विचार करुन व त्यांच्यातील प्रतिभा हेरून अकरावी - बारावीची दोन वर्षे शाळेची फी माफ केली.पुस्तके व इतर शैक्षणिक खर्च विद्यालयाने उचलला. १९८२ मध्ये ते ७६ टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण झाले.रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांध्ये इयत्ता बारावी कला शाखेत महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान त्यांनी मिळविला. मुख्याध्यापक श्री आनंदराव कचरे सर यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयीन शिक्षणाकरिता कोल्हापूरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज काॅलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 'कमवा व शिका ' या योजनेतून पडेल ते काम करुन इंग्रजी विषयात बी.ए.(प्रथम श्रेणी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर तेथीलच महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयातून त्यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
          पुढे कोकणातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेत जून १९८७ मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले व आपल्या आयुष्यातील ३३ वर्षे त्यांनी या प्रशालेत समर्पित भावनेने सेवा करित आहेत.त्या काळी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण असे.इंग्रजी विषय हा ग्रामीण भागातील मुलांना डोईजड जात असे.पण शिर्के सर आपल्या प्रभावी अध्यापन कॊशल्यामुळे इंग्रजी विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरले.एक जरठ शिक्षक वर्गात येऊन बॊद्धिक घेतो असे कधी झाले नाही. रानात गेलेल्या आईची मुलांनी उंबऱ्यावर बसून वाट पहावी तसे विद्यार्थी त्यांची वाट पहात असतात.त्यांचे वर्गात येणे वीरनायकासारखे रुबाबदार असते.आवाज हळुहळू चढत गेला की वातावरण बदलून जातं.ब्रम्हकमळाच्या फुलासारखा क्षणकाल उमलणारा निखळ वर्तमान असा काहीसा अध्ययन -अध्यापनाचा तो आनंदोत्सव असतो.यामुळेच तर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ९८ टक्क्यापर्यंत गुण मिळविण्यात यश मिळाले. त्यांनी इंग्रजी विषयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याचा सतत प्रयत्न केला. तीन दशकाहून अधिकच्या या शैक्षणिक सेवेत त्यांनी ०९ मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केले.प्रशालेच्या सर्व विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सोने करित त्यांनी प्रामाणिकपणे हे विभाग चालविले. शाळेतील कोणत्याही स्पर्धा असो वा सांस्कृतिक कार्यक्रम, शिर्के सर त्याचे उत्तम संयोजन करुन ते यशस्वीरित्या पार पाडत,त्यामुळे आपल्या सहकारी व विद्यार्थी वर्गात ते विशेष लोकप्रिय ठरले आहेत.
---------------------------------------🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
       श्री गणपत शिर्के सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान:-
१) इंग्रजी विषयाचा अध्यापक म्हणून ३३ वर्षे उत्कृष्ट काम.
२) दहावी परीक्षेचा इंग्रजी विषयाचा सतत१००% निकाल.
३) इयत्ता दहावी परीक्षेसाठी परीक्षक म्हणून १२ वर्षे काम.व सन मार्च २०१८ पासून इंग्रजी विषयाचा प्रमुख नियामक.
४) कोकण विभागीय मंडळामार्फत आयोजित इयत्ता दहावी इंग्रजी विषयासाठी विभागीय प्रशिक्षणार्थि व दि.१ व २ जुलै २०१३ रोजी रत्नागिरी येथे Awareness raising programme साठी तज्ञ मार्गदर्शक.
५) एस्.एस्.सी परीक्षा मार्च २०१९ साठी व मार्च २०२० साठी पेपर सेटर म्हणून नाशिक व लातूर येथे विभागीय मंडळात काम.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      
            सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक या पदावर आदर्शवत काम करुन सर सन २०१८ मध्ये मुख्याध्यापक पदी विराजमान झाले.साने गुरुजींच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या शिर्के सरांनी तालुक्यातील ग्रामीण भागात हजारो "श्याम " घडविले आहेत. गावोगाव, देश,परदेशात त्यांचे हे हजारो 'श्याम ' विखुरले आहेत. सरांच्या प्रेरणेने तेही समाजभान जपत घॊडदॊड करित आहेत.शिर्के सर मुख्याध्यापक झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यावेळी एक सहकारी शिक्षक म्हणून आमचाही ऊर भरुन आला.शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर गुरुचा सर्वकालीक ठसा उमटावा लागतो,तो उमटविण्यात शिर्के सर कमालीचे यशस्वी ठरले.
           लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी प्राप्त झाली.त्यांच्या कारकीर्दीत विविध शालाबाह्य स्पर्धांमध्ये प्रशालेने अभूतपूर्व यश मिळविले.पाचवी व आठवी शिष्यवृत्ती , एन्.एन्.एम्.एस्.परीक्षेत आजपर्यंतचे सर्वाधिक विद्यार्थी,एन्.टी.एस्.या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येऊन विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश मिळविले.क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारात राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी मजल मारली.सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या 'ऎलान 'युवामहोत्सवाचे अजिंक्यपद सलग दोन वर्षे प्रशालेने पटकाविले.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुरक असलेल्या विविध उपक्रमांचा धडाका त्यांनी गत दोन वर्षात लावला.शून्यातून विश्र्व निर्माण करणाऱ्या सरांनी प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता 'सुभद्राबाई शिक्षण निधी ' या संस्थेशी संपर्क साधून प्रशालेच्या ३३ गरिब विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५००/- रूपयाची शिष्यवृत्ती मिळवून दिली.
           नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत,परंतु गत दोन वर्षात अनेक संकटांनी मानवासमोर नवी आव्हाने उभी केली.या पडत्या काळात शिर्के सरांमधील " माणुसकीने ओतप्रोत भरलेला प्रगल्भ माणूस "आम्हा सहका-यांना पहायला मिळाला.केरळ पूरग्रस्तांसाठी प्रशालेमध्ये तब्बल दिड लाखाचा निधी उभारून तो १५ डिसेंबर २०१८ रोजी केरळ सचिवालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाकडे त्यांनी सुपूर्द केला.या कामी त्यांचे मित्र सुभाष लाड यांनी मोलाची मदत केली. त्यांच्यामुळे जीवनात पहिल्यांदाच विमान प्रवास करता आल्याचे सांगत त्याचे श्रेय शिर्के सरांनी लाड सरांना दिले.पुलवामा हल्ल्यानंतरही एक लाख पंचवीस हजारांचा निधी त्यांनी सैनिक कुटुंबासाठी उभा केला.तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दोन लाख एक्कावन्न हजारांचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी जिल्ह्याच्या दॊ-यावर आले असताना सुपूर्द केला.चिपळून तीवरे धरण फुटीमुळे जीव गमविलेल्या कुटुंबियांसाठी त्यांनी तीस हजाराचा निधी उभारला व चिपळूनच्या तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन तो निधी सुपूर्द केला.कारण मेलेल्यांच्या टाळूवरिल लोणी खाण्याची प्रवृत्ती वाढत असताना हे सर्व निधी गोळा केल्यानंतर योग्य व्यक्तीच्या हाती तो देण्याची त्यांची तळमळ महत्वाची वाटते.
              आज सा-या जगाला कवेत घेणा-या कोरोना च्या संकटकाळातही त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न करित  विविध सामाजिक संस्थामध्ये वैयक्तिक स्तरावर  ४०हजाराची देणगी दिली आहे.आपल्या आचरणातून समाजभान कसे जपावे याचा आदर्श त्यांनी आपल्या सहका-यांसमोर उभा केला आहे. मुख्याध्यापकांंच्या आदर्श कार्यामुळे शाळा नावारूपाला येतात.लांजा हायस्कूलची ओळख स्वर्गीय पोवार सरांची शाळा म्हणून आजही जिल्हाभरात आहे.करडी शिस्त व प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या पोवार सरांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही.तरीही त्यांचे अनुकरणीय व्यक्तिमत्व सहकारी शिक्षकांकडून नव्याने दाखल झालेल्या शिर्के सरांना ऎकायला मिळाले. शिर्के सरांनी त्यांचा वारसा ख-या अर्थाने जोपासला आहे आणि म्हणूनच आपल्या कार्यशैलीने शिर्के सरांची शाळा म्हणून लांजा हायस्कूल आज आपली नवी ओळख बनविते आहे. हा शेरा सन २०१९ मध्ये  लांजा हायस्कुलची अचानक तपासणी करुन उत्कृष्ट शाळा असा प्रशंसापर शेरा मारणा-या दस्तुरखुद्द रत्नागिरिचे  उपशिक्षणाधिकारी गावंड साहेब यांनी २ फेब्रुवारि २०२० च्या रत्नागिरी येथील जिल्हा  मुख्याध्यापक सभेमध्ये दिला.या सभेत जिल्ह्यातील अन्य मुख्याध्यापकांसमोर त्यांनी   लांज्याच्या शिर्के सरांच्या शाळेत गेलो असता हि शाळा  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारि एक अभिनव प्रयोगशाळा असल्याचे व तेथील प्रशासन उत्कृष्ट असल्याचे नमूद केले.तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक शिर्के सर ,सर्वच्या सर्व तास घेतातच शिवाय उत्कृष्ट निकालाबरोबरच त्यांच्या अध्यापनात गुणवत्ता दिसल्याचे सांगितले.तसेच सर्व मुख्याध्यापकांनी त्यांचे अनुकरण करावे असे आग्रहाने सांगितले.
---------------------------------------------------------------
          आजवर मिळालेले पुरस्कार :-
             🏆🏆🏆🏆🏆🏆
१) न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचा सन २००३-०४ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.
२) साने गुरुजी कथामाला रत्नागिरिचा सन २००९ चा जिल्हास्तरिय कथामाला पुरस्कार.
३) अ.आ.देसाई गॊरवनिधी ट्रस्टचा सन २०१२-१३ चा जिल्हास्तरिय गुरूवर्य पुरस्कार.
४) राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचा ,बॅरिस्टर नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार.
५) विश्र्व समता कलामंच संगमेश्वर यांचा राज्यस्तरिय विश्र्वसमता विशेष पुरस्कार.
६) प्राचार्य एम.पी.पिल्लई आदर्श शिक्षक पुरस्काराने  सन २०१७ मध्ये केरळ येथे सन्मानित.
७) लांजा तालुका पत्रकार संघाचा पै.एस्. वाय.रखांगी आदर्श शिक्षक पुरस्कार.
८) फ्रेंड्स रत्न पुरस्कार सन २०१८
९) संस्कृती फाऊंडेशनचा संस्कृती सन्मान पुरस्कार सन.   २०१८-१९
१०) न्यू एज्युकेशन सोसायटीचा कै.श्रीकृष्ण पर्शराम शेट्ये स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१८-१९
११)  संदीप स्मृती मंडळाकडून विशेष सन्मान सन २०१९
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
   
          शिर्के सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत.त्यांचा स्वभाव मुळातच कार्यकर्त्याचा असल्यामुळे ते नेहमीच विविध कामात व्यस्त असल्याचे पहावयास मिळते.साखरपा या गावातील थोर समाजसेवक कै.आत्माराम शिंदे यांच्या सहवास व प्रेरणेतून  त्यांच्यामध्ये समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो ही भावना प्रबळ झाली व ते समाजहितासाठी वेळ खर्च करु लागले.साने गुरुजी सेवा मंडळ भडकंबा , साने गुरुजी कथामाला, कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समिती साखरपा, श्री देव केदारलिंग, विठलाई मानाई  नवलाई व श्री देव सोंबा देवस्थान, अपना बाजार, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ -मुंबई, माझी मायभूमी प्रतिष्ठान , लांजा तालुका कलाध्यापक संघ,आदी विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.प.पूज्य साने गुरुजींचे विचार मुलांपर्यंत पोहचावेत व त्यांच्यावर योग्य संस्कार होऊन सदृढ पिढी निर्माण करण्याच्या भावनेतून ते गेली ३३ वर्षे कार्यरत आहेत.खरं तर त्यांचे आयुष्य म्हणजे एक सप्तरंगी कोलाजच आहे.त्यातल्या अनेक तुकड्यांवर स्वतंत्रपणे लिहिता येईल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमीच भावले आहे.कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास,अभ्यासपूर्ण मुद्दयांची मांडणी, खणखणीतपणा यांचे परिपाक असलेले त्यांचे वक्तृत्व, कणखर करारी नेतृत्वशैली, सर्वसामान्यांमध्ये सहजपणे मिसळण्याची वृत्ती, सरळमार्गी स्वभाव  त्यांच्याविषयी  मनात आदरभाव निर्माण करतो.
       शिक्षकांच्या सुख -दु:खात सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन बळ देणाऱ्या शिर्के सरांनी शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) च्या माध्यामातून अनेक अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. शिक्षकांच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी सहकारी आत्माराम मेस्त्री सरांसोबत शिर्के सरांनीही विचारांच्या तत्वांसाठी संघर्षमय जीवन जगल्याचे सा-यांनाच ज्ञात आहे.
       नवीन पिढीने राष्ट्र उभारणी साठी सर्वस्व वेचले पाहिजे या विचारांवर ठाम असलेल्या शिर्के सरांनी माझ्यासारख्या अनेक नवोदित काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांना आपल्या विविध संस्थांमध्ये सहभागी करुन त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.गत सहा वर्षे राजापुर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई च्या वतीने ग्रामीण भागातील नवोदित कवी लेखकांना व्यासपीठ मिळावे,ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी या हेतूने लांजा व राजापूर तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजन करते आहे.हा उपक्रम आज कोकणासह महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला आहे.या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वेसर्वा सुभाष लाड यांच्या बरोबरीने शिर्के सरांचेही महत्वपूर्ण योगदान आहे.

         गेली ३३ वर्षे आत्मभान ,समाजभान व राष्ट्रभान जपत समाजवादी विचारसरणीचे पाईक राहून निरपेक्षपणे केलेल्या कामात त्यांनी कोणताही अट्टहास धरला नाही वा मोहही मनाशी बाळगला नाही. त्यामुळेच ते आदर्श शिक्षक या व्याख्येत परिपूर्ण बसतात.त्यांच्या या आजवरच्या शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन आजवर  विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.आपल्या या यशात आईचे आणि दोन्ही बहिणींचे योगदान ते महत्त्वाचे मानतात.बहिणींनी त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्यागामुळे बहिणींच्या अडीअडचणीत ते धावून जातात.त्यांची पत्नी सॊ.रोहिणी या शिक्षिका असून नोकरी व घर या दोन्ही आघाड्या संभाळत त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले आहे.त्यामुळेच मृण्मयी व समीक्षा या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना साकार करु पाहत आहेत.तर मुलगा दूर्वेश ही त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवतॊ आहे.अनेक संस्थांमध्ये कार्यरत असल्यामुळे घराकडे फार वेळ देता येत नाही याची उणीव सॊ.रोहिणी शिर्के यांनी कधीही जाणवू दिली नाही.पत्नीच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच आपण सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वेळ देऊ शकलो असे ते आवर्जून सांगतात.
       आजच्या बदललेल्या शिक्षक -विद्यार्थी नातेसंबंधातहि  विद्यार्थ्यांचा ओघ  प्रशालेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशालेकडे येत आहे.त्याचे प्रमुख कारण म्हणजे निकोप व समृद्ध विद्यार्थी घडविणारी शिर्के सरांसारखी आदर्श व्यक्तीमत्वे. मला आजही आठवितो तो ,लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा हाती घेतल्यानंतरचा  सरांचा पहिला वाढदिवस.त्या दिवशी सकाळपासून सरांना आदर्श मानणा-या विद्यार्थी,व हितचिंतकांची प्रशालेत गर्दी होती.समाजाच्या जडण -घडणीत शिक्षकाचे स्थान ती गर्दी अधोरेखित करत होती.
         आजच्या ऎहिक जगात आयुष्याचा खरा मार्ग सापडलेले आणि खरे मार्गदर्शन करणारे सच्चे गुरु विरळच। कोणतीही अपेक्षा न करता सर्वसामान्यांना मार्गदर्शन करणारे शिर्के सरांसारखे गुरु मिळणे तर अशक्यच.असे गुरु मिळणे खरोखरंच भाग्याचं.हे भाग्य माझ्या सारख्या अनेकांना मिळाले हे आमचे सुदैवच.आई जन्म देते पण शिक्षकच आपल्याला जगणं शिकवितो.आपल्यामध्ये योग्य आदर्श संस्कार ,नितिमूल्ये आपला नैतिक, मानसिक, चारित्र्यात्मक विकास घडवून आणतो. असेच आपणा सर्वांच्या जीवनातील अंधकार नष्ट करणारे व तेजोमयी विचारांकडे नेणारे लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिर्के सर यांना गुरूपोर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा।
------------------------------------------------------------
    विजय हटकर,
    सहाय्यक शिक्षक
न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा
मोबा.  :-   ८८०६६३५०१७

----------------------------------------------------------------
     दिनांक ०५ जुलै २०२० रोजी सकाळ माध्यमसमुहाने रत्नागिरी आवृत्तीत शिर्के सरांच्या वाटचालीचा आढावा घेतला.


Thursday, May 21, 2020

डिजीटल मार्केटिंगमधील 'अतुनीय म‌ॅस्काॅट'.


डिजिटल मार्केटिंगमधील 'अतुलनीय मॅस्काॅट'


मराठी माणसाच्या व्यवसायाला नावारूपाला आणणारी डिजिटल कंपनी :- 
       मॅस्काॅट क्रिएशन्स, पुणे.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
         क्षेत्र कोणतेही असो, अंगभूत योग्यता, मेहनत आणि नीतिमूल्यांच्या जपणुकीतून कोणीही शून्यातून विश्र्व निर्माण करु शकतो." या उक्तीचा प्रत्यय 'मॅस्काॅट क्रिएशन' या महाराष्ट्रातील आघाडिच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संस्थापक श्री अतुल गुरव यांच्याकडे पाहिले असता येतो.* पाच वर्षापूर्वी पुण्यासारख्या महानगरातील  स्थिरता प्रदान करणारी गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून "ग्लोबल जगाची " गरज ओळखून एका डिजिटल मार्केटिंग कंपनीची स्थापना त्यांनी केली आणि या घडीला  *मराठी माणसाच्या व्यवसायाला, उद्योगाला नावारुपास आणणारी कंपनी अशी ओळख अभिमानाने मिरविणा-या " मॅस्काॅट क्रिएशन " चा जन्म झाला.
     कोकणात वाणिज्य शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अतुल ने सरकारी नोकरी करावी असे वडिल श्री अरुण गुरव यांना मनोमन वाटत होते, परंतु बंडखोर स्वभावाच्या अतुलने थेट पुणे गाठले व 'ग्राफिक्स व वेब डिझायनर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. कोकणातल्या ग्रामीण भागातून पुण्यात आल्यानंतर सुरवातीला आत्मविश्वासाची कमरता, न्यूनगंड, प्रभावहिन संवादकॊशल्य यामुळे नवे मित्रही जोडणे अतुल गुरव यांना कठिण जात होते परंतु काहीतरी वेगळं करण्याची उमेद मात्र होती.पुढे शनिवार पेठेत प्रिटिंगचे पेपर उचलण्यापासून त्यांच्या करिअरची सुरवात झाली.सुरवातीच्या याकाळात पडेल ती कामे करित त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला.या  प्रतिकूल काळात त्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी त्यांना संभाळून घेतले.हळूहळू नोकरी सुरु झाली व अल्पावधीतच पुण्यातील नामवंत आय.टी.कंपनीत चांगल्या हुद्द्याच्या नोकरीपर्यंत त्यांनी मजल मारली.पण अंगभूत व्यवसाय करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसु नव्हती. आय.टी.क्षेत्रातील नोकरितही वरिष्ठांची मर्जी सांभाळताना मनासारखे काम न करता येत असल्याने त्यांची घुसमट होत होती.अखेर आपल्यातील कल्पकता व सर्जकतेला अधिक वाव देण्यासाठी त्यांनी काळाची पाऊले ओळखून डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु करण्याचा निर्धार केला.
       सध्याचे युग हे इंटरनेटचे असल्याने आॅनलाईन राहण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.अशा परिस्थितीत आॅनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल व्यवसाय करणे फायद्याचे आहे हे ओळखून जगभरातील मोठ्या उद्योजकांनी भारतात हातपाय पसरले.अॅमेझाॅन, प्लिपकार्ड, अलिबाबा या सारख्या स्मार्ट व वेगवान ई -काॅमर्स व्यवसायिकांनी अल्पावधीतच यशाचे नवे आयाम स्थापित केले.या पार्श्र्वभूमीवर भारतीय व्यवसायिकांनीही आपल्या पारंपारिक व्यवसायाच्या चॊकटी मोडून आपल्या व्यवसायाची डिजिटल जाहिरात केली तरच ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचतील व त्यांच्या व्यवसायात वृद्धी होऊ शकेल हे अतुल गुरव यांनी ओळखले व महाराष्ट्रातील व्यवसायिकांच्या गुणवत्तापुर्ण उत्पादनांचे, सेवांची डिजिटल मार्केटिंग करुन त्यांचा व्यवसाय अधिकाधिक विस्तारित करण्याच्या हेतूने ११ मे २०१६ रोजी पुणे येथे "मॅस्काॅट क्रिएशन " ची स्थापना केली.  दोन ग्राहकांपासून सुरु झालेला हा प्रवास २०२० मध्ये १५६ नियमीत ग्राहकांपर्यंत पोहचला आहे.या ग्राहकांमध्ये महाराष्ट्रातील आघाडिचे बांधकाम व्यवसायिक, हाॅटेल व्यवसायिक, आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायिक ,खाजगी शिक्षण संस्था, लोकप्रिय मासिके, कृषीव्यवसायिक, छोटे मोठे अनेक व्यवसायिकांचा समावेश आहे. या  सर्व व्यवसायिक ग्राहक मित्रांना फक्त सेवा देणे एवढा हेतू न ठेवता त्यांच्या कल्पने पलिकडे सेवा कशी देता येईल याचा विचार मॅस्काॅट क्रिएशनने नेहमीच केला.

       मॅस्काॅट क्रिएशनच्या माध्यमातून श्री गुरव यांनी अनेक व्यवसायिकांना  सर्वप्रथम मानसिक कणखर बनविले*व्यवसाय लोकल असला तरि मानसिकता ग्लोबल हवी हे तत्व त्यांच्या अंगी रुजविले.परिणामी अनेक व्यवसायिकांनी आपल्या कंपनीची वा उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी मॅस्काॅट क्रिएशनवर विश्वास दाखवित वार्षिक, पंचवार्षिक करारहि केले.म‌ॅस्काॅटनेही मग ग्राहकांच्या व्यवसायाचे, उत्पादनांचे व सेवांचे योग्य ब्रॅन्डींग केले.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करित अल्पावधीत त्यांना घराघरात पोहचविले व " प्राॅडक्ट तुमचे मार्केटिंग आमचे" हे ब्रीद सार्थपणे जोपासले. याचाच परिणाम म्हणून पुणे, मुंबई सह कोकण, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यवसायिक आज आपल्या व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी मॅस्काॅट क्रिएशन्स शी जोडले गेले आहेत. या वाटचालीत प्रामाणिक व  कल्पक डिझायनरांची साथ हि सर्वात जमेची बाजू ठरल्याचे श्री गुरव आवर्जुन सांगतात. सहकारी वर्गाला आदर्श वाटावी अशी वागणूक, आपल्या फर्मवर असलेले प्रचंड प्रेम, ग्राहकांशी सेवाभिमुख दृष्टिकोन, गुणवत्तेत तडजोड न करण्याचे तत्व व आपल्या ग्राहकांचा व्यवसाय यशस्वी पणे पुढे नेण्याची क्षमता ,भविष्यातील दूरदृष्टी यामुळे अल्पावधीतच श्री अतुल गुरव यांची मॅस्काॅट क्रिएशन महाराष्ट्रातील डिजिटल मार्केटिंग करणारी महत्वाची कंपनी बनली आहे.
       कुठलही वलय नसताना किंवा कसलीही पार्श्र्वभूमी नसताना अतुल गुरव यांनी मॅस्काॅट क्रिएशनच्या माध्ममातून आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे. व्यवसायाच्या नव्या वाटेवरुन चालताना स्वत:बरोबर इतरांच्या व्यवसायालाही पुढे आणण्याचे मार्ग शोधणा-या मॅस्काॅट क्रिएशन ची ही झेप ,झिरोपासून हिरो होण्यापर्यंतचा हा प्रवास अनेक क्रियाशील तरुणांच्या आयुष्यात नव्या वाटेवरून चालण्याचे प्रोत्साहन देईल हे मात्र निश्तित!
           मॅस्काॅट क्रिएशन चा  डिजिटल विश्र्वातील प्रवास उत्तमाकडुन सर्वोत्तमाकडे होवो या सदिच्छांसह!
💐💐💐💐💐💐
       ।वि।ज।य।ह।ट।क।र।
       ब्लाॅगर। मुक्त पत्रकार.


दै.महासागर- ठाणे पालघर आवृत्ती
दि.१ जुन २०२०




Tuesday, May 19, 2020




विगर्स'चा सूर्यपक्षी व कोरोनातील शहाणपण.
🌳🌳🕊️🕊️🕊️🕊️🌳🌳

        लांज्यातील प्रसिद्ध भगवती शिशुविहारच्या संचालिका जेधेबाईंच्या घरामागील टेकडीवर असलेले ग्रामदैवत श्री देव पॊलस्तेश्र्वराचे मूळ स्थान पाहण्याचा आम्ही बेत आखलेला.यानिमित्ताने जेधेबाईंच्या घरि सहकुटुंब जाणं झालेले.अंगणातील झोपाळ्यावर बसून परसवातील बहर आलेल्या रंगीबेरंगी फुलांना न्याहळत असताना जेधेआक्कानी फक्कड चहा दिला.या गरमागरम चहाचा घोट पित असतानाच जेधे आक्कानी अंगणात सुगरणीनं बांधलेल्या नजाकतदार घरात महिनाभर वास्तव्यास असलेल्या पक्षाची माहिती चिमुरड्या विधीला दिली.तीची उत्सुकता न ताणताना तिला घरट्यात असलेला पक्षी दाखवल्यावर विधीने ,पप्पा या पक्षाचे नाव काय? हा प्रश्न विचारताच पक्षी जगाताविषयी असलेले माझे अज्ञान उघड्यावर पडलेले.मलाही हा पक्षी नवीनच वाटला.त्यामुळे मी चटकन कॅमेराला डोळा लावला. शांत पाऊलांनी घरट्याखाली उभे राहून मी लेन्स हळूच त्याच्याकडे वळवली आणि पटापट फोटो टिपायला सुरवात केली. चिमणी सारखा लहान असल्याने सर्वजणांनी  ती थोड्या वेगळ्या प्रकारची  चिमणीच असल्याचा आडाखा बांधलेला. 
         सायंकाळी घरी आल्यानंतर मात्र त्या पक्ष्याचे नाव कळावे म्हणून पक्षीमित्र सदाफ शी संपर्क साधल्यावर त्याने याला सह्याद्री सूर्यपक्षी संबोधतात असे सांगितले.आणि एका नवीन पक्षाची माहिती मिळाल्याने मनाला समाधान मिळाले.मि लगेच जेधेबाईंना ही आपल्या अंगणातील घरट्यात विसावलेली चिमणी नसून तो सह्याद्री सूर्यपक्षी असल्याचे सांगताच त्यांना त्याचे भारी नवल वाटले.या सह्याद्री सुर्यपक्षीला इंग्रजीत vigor's sunbird संबोधतात.बदलत्या ऋतुप्रमाणे स्थलांतर करणारा हा "विगर्सचा सनबर्ड " चिमणी एवढ्या लहान आकाराचा पक्षी आहे.कोकणात आपल्या घराजवळच्या परसबागेत काटेसावर, फणस ,गुलमोहर, पळसासारखी झाडे असली आणि वर्दळ कमी असली तर हे पक्षी अगदी जवळून पहायला मिळण्याची शक्यता असते.लांब आणि टोकेरी चोचीच्या सहाय्याने पळस, जास्वंद, चाफा, रुईची फुलं,सोनटक्का यांसारख्या फुलांमधील रस पिणं व आसपासचे कीटक, बारीक आळ्या हे यांचं आवडतं खाणं.इतर निवासी पक्ष्याप्रमाणे मार्च ते जून हा याही पक्ष्यांचा विणीचा हंगाम.लाल रंगाच्या पळस पांगा-याच्या पार्श्र्वभूमीवर काळे तपकिरी -लाल तजेलदार रंगाचे हे देखणे पक्षी प्रकर्षाने लक्षात येतात.
        फुलांमधील मधुरस चोखतात म्हणुन बहुधा त्याचे            ' शक्करखोरा ' हे नामकरण झाले असावे.या कार्यासाठीच ईश्वराने त्यांना शरिरापेक्षा लांब बाकदार चोच दिली असावी.हा लहानगा सनबर्ड आरामात एखाद्या फुलाच्या पाकळिवर बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार चोचीनं फुलातला रस खातो.फुलांवरिल रस चुखताना त्याला पाहणं मनाला आनंद प्रदान करतं.
बदलत्या ऋतुप्रमाणे स्थलांतर करीत  विणीच्या हंगामासाठी भारतात आलेला विगर्सचा सूर्यपक्षी vigo'rs sunbird  गेले महिनाभर लांजा मुक्कामी आहे. सुकन्या कु.विधी च्या बाई श्रीमती प्रियवंदा जेधे यांच्या अंगणातील एका घरठ्यात  विसावला आहे. जेधे बाईंच्या परसबागेतल्या पळस, जास्वंद, चाफा या फुलांमधील रस पिणं ही त्याची  गत तीन महिन्यातली  दैनंदिनी.
      आज कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजविला आहे.विकसित देशांसोबत विकसनशील राष्ट्रे ही त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करित आहेत.वेळीच सावध होऊन भारताने देशभरात लाॅकडाऊन जाहिर केला.एकापाठोपाठ चार वेळा लाॅकडाऊनचा निर्णय घेतला.कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठि लाॅकडाऊन हा चांगला निर्णय आहे. मान्य आहे ,कोंडून घेण्याची ,राहण्याची आपली संस्कृती नाही.पण या अशा जबरदस्तीच्या कोंडून घेण्याने आपण सुरक्षित राहणार असु ,हा व्हायरस अटोक्यात येऊन विश्र्वावरिल अरिष्ट संपणार असेल तर कोंडून घेण्यातच, सर्वांचं भलं आहे.पण सरकारने घेतलेल्या निर्णयांचे पालन करेल तो माणुस कसला? सुरवातीच्या लाॅकडाऊन नंतर मात्र देशातील अनेक शहरात विनाकारण फिरणा- या युवकांचे, व्यक्तींचे त्यांना प्रतिबंध करणाऱ्या ,न ऎकल्यावर काठीचा  प्रसाद अथवा विविध शिक्षा करणाऱ्या पोलिसांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले.या सगळ्याचा परिणाम म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने लाखाच्या घरात गेली.हे पाहून मन विषण्ण झाले. कोरोना लाॅकडाऊन च्या काळात  घरट्यात निमूटपणे राहणे या छोट्याशा विगर्स सनबर्ड या पक्ष्याने जाणले  पण  बाजारात विनाकारण गर्दी करुन कोरोनाचा प्रसार करणाऱ्या माणसाला हे शहाणपण कधी येणार ? 
☘️☘️🦅🦅🦅☘️☘️

   *श्री विजय हटकर* 

         *लांजा* .

Saturday, March 14, 2020

सन्मान कर्तृत्ववान माऊलीचा.
💐💐💐💐

      नरपंचायत लांजा, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला बालकल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला २०२० म्हणून माझी  आई श्रीमती अरूणा अरविंद हटकर यांना  सन्मानित करण्यात आले.
    गणेश मंगल कार्यालय लांजा येथे संपन्न झालेल्या या महिला मेळाव्याला उपनगराध्यक्षा सॊ.यामिनीताई जोईल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुषारजी बाबर,महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सोनाली गुरव, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डाॅ.कल्पना मेहता, अॅड.धनश्री सुतार, प्राध्यापिका डाॅ.सुवर्णा  देऊसकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी डाॅ.कल्पना मेहता यांच्या शुभहस्ते आईला सन्मानित करण्यात आले.माझ्या सॊभाग्याने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने आईच्या नावाची घोषणा करताना मन भरुन आले.आजवर तिने गाळलेल्या घामाचे,वेचलेल्या कष्टाचे असे सार्वजनिक कॊतुक प्रथमच झाल्याने खुप समाधान झाले.
    लांजा नगरपंचायतीच्या वतीने यावेळी नगरपंचायत हद्दितील १३ कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.यामध्ये श्रीम. अनुराधा राणे,प्राध्यापिका माधुरी गवळी,अॅड.लिना जेधे ,श्रीमती शलाका कापडी, श्रीम. सुहासिनी  सार्दळ, श्रीमती ऋचा  वेद्रे, श्रीम.विजयालक्ष्मी देवगोजी, श्रीमती अमिताभ कुडकर, श्रीम. सुप्रिया बापट, श्रीम.मनीषा घाटे ,श्रीम .शुभांगी वारेशी, श्रीम.मिनल सावंत यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
    ️आयुष्यभर संघर्ष करित, दारिद्याच्या छाताडावर बसून आईने आम्हा मुलांना नव्या विचारांची आव्हाने पेलण्याची ताकद दिली.वयाच्या सत्तरीनंतरही आजही ती घरी न बसता बांगडी व्यवसाय करते.प्रत्येक माणसाने स्वावलंबी असले पाहिजे हा आपल्या कृतीतून संदेश देणारी माझी आई म्हणूनच माझी आयकाॅन आहे.

       डोक्यावर बांगडी चा हारा घेऊन गावागावात महिलांना  बांगड्या भरून आईने आम्हा मुलांना  उच्चशिक्षण दिले.
 म्हणुनच आज मी ज्युनिअर काॅलेज लांजा येथे एम.एड.पर्यंत शिक्षण घेऊन सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर बहिण सॊ.देवता पदवीधर असून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, भरणे - ता.खेड येथे अधिक्षिका म्हणून कार्यरत आहे.कोणतेही शिक्षण नसतानाही विचारांनी सुशिक्षित असणा-या आईने निरपेक्षपणे अनेकांना प्रेम दिले.घरची मीठ - भाकरी प्रेमाने दिली. मधल्या काळात मोठ्या भावाचे  ( दादाचे) झालेले अपघाती निधन व बाबा ही कायमचे सोडून गेल्यावरही ती डगमगली नाही. हा काळ तसा आम्हा कुटुंबाचा पडता काळ होता.नियती रोज नवी परिक्षा घेत होती.पण आईने आम्हा सर्वांना सावरले.आम्हा भावंडाना ही भक्कम आधार दिला.यावेळि
-        " आई नसे शब्द दोन अक्षरांचा,
         आधार फाटल्या आभाळ पाखरांचा."                              या विचाराचा आम्हाला प्रत्यय आला.
     आई म्हणजे त्यागाचे आणि मायेचे महाकाव्य आहे. आई संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरू असते.असे म्हटले तरि वावगे ठरणार नाही. तिने केलेल्या कष्टामुळेच आपण घडतो.आज जागतिक महिला दिनानिमित्ताने तिला अर्थात  माझ्या मुळ प्रेरणास्थानाला  पहिल्यांदाच  सन्मानित करण्यात आले.त्यामुळे हा दिवस ख-या अर्थाने संस्मरणीय ठरला.

          श्री विजय हटकर.