छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल
🎥📹🎞️🎞️📸📷📱
२२ डिसेंबर!हाच तो दिवस. साधारण चौतीस वर्षांपूर्वी सन १९८६ साली याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजा वासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले. आज३४ वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाही लांजा बाजारपेठेतील मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेला छाया फोटो स्टुडिओ आपला पारंपरिक बाज टिकवून आहे. या स्टुडिओत जाण्यासाठी चढाव्या लागणारे जिने सोबतीने घ्यावा लागणारा दोरखंडाचा आधार सारं फार भारी मजेशीर आहे. पण एकदा का स्टुडिओत प्रवेश केला की त्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण छायाचित्रणाने आपले समाधान होते. ग्राहकांच्या समाधानाला महत्त्व दिल्याने हा स्टुडिओ आज चौतिसावा वर्धापन दिन यशस्वी साजरा करीत आहे.
तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”
तो काळ छायाचित्रकारांसाठी तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या. छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.
भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. व्यवसाया सोबतच सामाजिक भान जपत कार्यरत असलेला विनय बुटाला आज लांजा वासियांचा लाडका छायाचित्रकार बनला आहे.कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर केलेला हा अवलीया एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांनाच परिचित आहे.आणि म्हणूनच फोटो तेथे विनय बुटाला हे समीकरणच झाले आहे.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी कॅमेर्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा... डिजिटल कॅमेरा... ते मोबाईल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहता हाताळता येऊ लागले. तथापि या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. त्यामुळेच फोटोग्राफीत नवे नवे ट्रेण्ड येतच राहिले लोकांनीही त्या स्वीकारल्याने फोटोग्राफी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी निर्माण झाल्या. भाई बुटालांप्रमाणेच विनयनेही त्या संधीचे सोने केले.
असं म्हणतात छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं.. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. विनय बुटाला यासंदर्भात परिपूर्ण म्हणायला हवा.
आज लग्नाला इव्हेंटचे स्वरूप आले आहे लग्न करण्यासोबत ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरा-नवरी इतकाच महत्त्वाचा असतो तो छायाचित्रकार. लग्नाच्या छायाचित्र व्यवसायाला त्यामुळेच प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सोबत उत्तम पॅकेजही मिळत असल्याने लग्न समारंभातील क्षेत्रात नवीन ट्रेंडना भरते आले आहे. त्यामुळे अनेक परिवार आज "लग्नसोहळा" यादगार करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट,एरियल फोटोशूट ते रिसेप्शन पर्यंतचे फोटोशूट अशा अनेक प्रकारचे फोटोशूट करून घेत असतात. याचा अभ्यास करीत या क्षेत्रात *विनयने आपल्या सहकाऱ्यांची एक " आॅफबीट टीम" बनविली आहे.आज लांज्याची वेस ओलांडत देशभरात विविध ठिकाणी छायाचित्रणासाठी विनयचा प्रवास सुरू असतो. तो जिथे जिथे जातो तिथे "छाया फोटो स्टुडिओ" च्या नावासोबतच लांज्याचे नावही पोहोचत असल्याने त्याच्या विषयीचा 'स्नेहभाव' अधिक दृढ होतो आहे. आज लांजा बाहेरील ग्राहकांना मनपसंत सेवा देतानाच ,लांजावासीयांच्या सेवेत छाया फोटो स्टुडिओ कडून कोणत्याही खंड पडलेला नाही कारण विनयच्या मागे गजानन अर्थात आपल्या सर्वांचा लाडका "गजा" सर्वांना उत्तम छायाचित्रकार म्हणून सेवा पुरवीत असतो.
एकूणच गेली ३४ वर्षे लांजा बाजारपेठेत छायाचित्रणाची निरंतर सेवा देत "छाया फोटो स्टुडिओ" यशाकडे वाटचाल करीत आहे. या स्टुडिओत जिन्याने जात असताना घ्यावा लागणारा दोरीचा आधार कोणालाही क्लेशदायक न वाटता सुखदायी वाटतो यातच या स्टुडिओच्या यशाचे गमक आहे.आगामी काळातही छाया फोटो स्टुडिओ आपल्या दर्जेदार, सर्जनशील,नावीन्यपूर्ण सेवेने यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच प्रार्थना धनी केदारलिंग चरणी करतानाच भाई बुटाला -विनय बुटाला या पिता-पुत्रांसोबतच छाया फोटो स्टुडिओच्या यशस्वी वाटचालीत हातभार लावणाऱ्या सार्यांनाच आभाळभर सदिच्छा.
💐💐💐💐💐💐💐
आपलाच
विजय हटकर.
No comments:
Post a Comment