लग्नपत्रिका - "विवाहाचे लिखित साधन."
'ही आहे, माझ्या आई- बाबांच्या लग्नाची पत्रिका.' विवाह हा मानवी जीवनातील महत्वाचा संस्कार, त्याचे लिखित साधन म्हणजे लग्नपत्रिका. कोरोना विषाणूने उद्भवलेल्या सध्याच्या लाॅकडाउन काळात वेळ हाती असल्याने आज जुनी कागदपत्रे पुन्हा एकदा हाताळताना हि पत्रिका नकळत माझ्या हाती लागली आणि आई- बाबांचे लग्न,तेव्हाचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती पत्रिकेच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभी राहिली.
मी बाबांना 'पप्पा' म्हणायचो.पप्पांची आणि माझी तशी जीवाभावाची मैत्री होती.आमचं नातं बाप - मुलाच्या पलीकडचं होतं.१९५० -६० या दशकात जुनी सातवीपर्यत इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेले पप्पा मोडिलिपीचे जाणकार होतेच पण त्यांचे हस्ताक्षर ही सुंदर होते.त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून लहानपणी मला आपलेही अक्षर असे मोत्याच्या दाण्यासारखे असावे असे वाटायचे. मुंबईतील भायखळ्यात त्यांचे बालपण गेले. बाबा त्याकाळातील प्रसिद्ध लक्ष्मी व्यायामशाळा ,भायखळ्याचे उभरते व्यायामपटु होते.लाठी -काठी खेळण्याचे कौशल्य ही त्यांनी हस्तगत केले होते.पुढे घरगुती कारणास्तव पप्पांना मुंबई सोडावी लागली. बाबांप्रमाणेच आयुष्यभर परिस्थितीशी संघर्ष करित आम्हाला स्वतःच्या पायावर उभी करणारी आमची आई ही मुळची सिंधूदुर्गातल्या सुंदरवाडिची.अहो, म्हणजे स्वर्गीय सोंदर्य लाभलेल्या,लाकडी खेळण्यांच्या मार्केटमुळे जगप्रसिद्ध झालेल्या सावंतवाडीची. आईचे बाबा स्वर्गीय लक्ष्मण पाटील तेव्हाचे सावंतवाडीच्या बाजारपेठेतील नामांकित व्यक्तिमत्व.लहानपणीच आई सोडून गेल्याने भावंडाना मोठे करुन त्यांना त्यांच्या प्रपंचात आईने स्थिरस्थावर केले.मगच लग्नाच्या मांडवात स्वत: उभी राहिली आणि १२ डिसेंबर १९७६ ला आई - बाबांचे उत्साहात लग्न संपन्न झाले.
आई- बाबांच्या लग्नाअगोदर एक काळ असा होता की विवाहाची तारीख निश्चित झाली की पंधरा दिवस अगोदर घरोघरी जाऊन अक्षता दिल्या जायच्या.हळद - कुंकू मध्ये तांदुळ रंगविले जायचे.घरोघरी जाऊन अक्षतावाटप केले जायचे.कालांतराने विज्ञानातील प्रगतीने अक्षतांची जागा लग्नपत्रिकेने घेतली.लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानेवाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपति. आत्तासारखे designer गणपति कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने आर्टपेपरवर छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाहि फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हातकागदाच्या, designer, तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंति बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. दुसर्या युद्धापासूनतरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृति मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरहि टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने fill in the blanks मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाहि त्या काळी असायच्या. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.
आज काळ बदलला.एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात मार्केटमध्ये लग्नपत्रिकेच्या असंख्य व्हरायटीज आहेत. लहान - मोठ्या आकारातील पत्रिका, वैविध्यपूर्ण डिझाईनच्या कलात्मक, साहित्यिक टच लाभलेल्या लग्नपत्रिका लग्न एक इव्हेंट ( उत्सव) झालेल्या आजच्या जमान्यात विवाहाची शोभा अाणखीनच वाढवित आहेत.एक रुपयापासून पाचशे रुपयापर्तंत पत्रिका आज बाजारात उपलब्ध असताना भारतातील लोकप्रिय उद्योगसमुहाचे मालक अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील लग्नपत्रिका ही चक्क दोन लाखाची होती हे वाचनात आल्यानंतर व झी मराठी वरील " तुला पाहते रे" मलिकेतील ईशा व विक्रांतच्या लग्नाची महागडी लग्नपत्रिका पाहून महागात महाग पत्रिका बनवुन घेऊन त्या वाटणे हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याचे मनोमन पटले.मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एक लग्न , लग्नपत्रिकेमुळे चर्चेत आले होते.हि लग्नपत्रिका तब्बल ४४ पानांची होती. या ४४ पानी लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा व विचार, प्रबोधनात्मक लेखमाला यासह अन्य वैचारिक विचारपुष्षांना स्थान दिले होते.पंचफुला प्रकाशन, ऒरंगाबाद यांनी बनविलेल्या या पत्रिकेचे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी कौतुक केले होते.हि पुस्तकरुपी पत्रिका माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारली गेली होती. अशा एक ना अनेक कल्पक लग्नपत्रिकांनी आज लग्नपत्रिकेची प्रतिष्ठा मात्र वाढविली आहे.आज लग्नपत्रिकेचे स्वरूप जरी बदलले असले तरी तिचे काम मात्र तेच आहे आणि कायम राहणार हे मात्र नक्की.
---------------------------------- --------
श्री विजय हटकर
८८०६६३५०७.
खूप छान माहिती दिली आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण
ReplyDeletemarathibatmya.in
ह्या वेबसाईटला आवश्य भेट द्या
अतिशय उत्तम लेख
ReplyDeleteMast
ReplyDelete