Monday, December 25, 2023

सुभाष उर्फ बापू शेट्ये :- एका सत्वशील माणसाची गोष्ट

 सुभाष उर्फ बापू शेट्ये :- एका सत्वशील माणसाची गोष्ट

🌱🌱🌱🌱🌱



       बापू गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या गर्दीत शेजारी उभ्या असलेल्या घोळक्यातील एक अनोळखी बुजुर्ग व्यक्ती सोबतच्या लोकांना सांगत होता,"लोक मृत्यूनंतर स्वर्गात जातात पण बापू तर स्वर्गातून आले होते." त्यांच्या जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हृदयी कमालीची सहिष्णुता आणि सर्वांविषयी स्नेह या सदगुणांच्या जोरावर त्यांनी समस्त लांजावासीयांच्या हृदयात घर केले होते याचा प्रत्यय कानात घुमलेल्या त्या आवाजाने मला त्या क्षणी आला.

मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या निसर्गरम्य व शांतताप्रिय लांजा शहरातील शेट्ये घराणे म्हणजे लांजा गावचे प्रमुख मानकरी. याच घराण्यात सुभाष वसंत उर्फ बापू शेट्ये यांचा जन्म ०६ मे १९३८ रोजी झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. तितल्या बांधखिंडीत त्यांचे घर होते. मूळ गावाच्या अांतरिक ओढिने इयत्ता दहावीला असताना बापूंनी न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे प्रवेश घेतला. सुभाष उर्फ बापू शेट्ये यांच्या वडिलोपार्जित वैयक्तिक जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते.१९५५ नंतर कुळ कायद्यातील सुधारणांमुळे त्यांच्या अनेक जागा कुळात गेल्या मात्र आपल्या जागा कुळात गेल्याचे लक्षात येताच सायकलहून प्रवास करीत बापू लांजाला आले व कुळ लागलेल्या व्यक्तींशी सुसंवाद साधत काही जणांना पैसे देऊन तडजोड करीत महत्त्वाच्या काही जागा त्यांनी पुन्हा आपल्या नावावर केल्या.पुढे बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेत आपण भाडेतत्त्वावर दुकान गाळे उभारले तर आपल्या संघर्षपूर्ण जीवनाला स्थिरता प्राप्त होईल हा विचार त्यांनी वडील वसंत उर्फ भाऊ शेट्ये यांना सांगितले. भाऊंच्या सहकार्याने त्यांनी व्यापारी गाळ्यांची उभारणी केली. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बापूंनी सर्व संसार चालवला.स्वत:चे कौलारु घर उभे केले. उद्यमशीलता हा बापूंचा स्थायीभाव होता. यातूनच त्यांनी लाकूड व्यवसाय सुरू केला.या व्यवसायात जम बसवल्यावर १९६८ ला बापूंनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले. मेहनत आणि नियत या दोन गुणांच्या भक्कम पायावर बापूंनी आपला व्यवसाय फुलविला.  ज्या जागेवर बापूंनी व्यापारी गाळ्यांची उभारणी केली होती आज त्या ठिकाणी एखाद्या महानगरात असते ,तसे प्रशस्त अत्याधुनिक व्यापारी संकुल बापूंच्या मुलांनी म्हणजेच प्रसन्ना आणि हेमंत शेट्ये यांनी उभारले आहे,जे शहराच्या गौरवात भर टाकत आहे. मात्र याचे श्रेय आपल्या मुलांमध्ये उद्यमशीलतेचे बीजारोपण करणाऱ्या बापूंनाच द्यावे लागेल.


       बापू उत्तम क्रिकेट व कबड्डी खेळायचे पण यापेक्षाही नाटकांमधून उत्तम उठावदार अभिनय करायचे.खरं तर, 'बापू म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे बापू.' असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. लांजा गावातील नाट्य संस्कृतीला बळ देण्याचे कार्य त्यांनी झोकून देऊन केले. बापूंचे नाट्यप्रेम लांज्यात सर्वश्रुत होते.त्यांच्या काळात गावातील हनुमान नाट्य मंडळाचे नाव सर्वत्र झाले होते.लांजा शहराच्या जुन्या बाजारपेठेत थोर मारुतीभक्त नारायण वाघदरे यांनी श्री मारुतीचे मंदिर १८८० ते १९०० च्या दरम्यान उभारले.आणि तेव्हापासून आजतागायत समस्त लांजावासीय मोठ्या भक्तिभावाने  शक्तिचे प्रतिक असलेल्या मारुतीची उपासना करु लागले.दरवर्षी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.या उत्सवात स्थानिक मंडळीच दोन तीन महिने मेहनत घेऊन नाटकाचे दर्जेदार सादरिकरण करायचे. मारुतीरायाचे निस्सिम भक्त असलेले बापु हनुमान जन्मोत्सव जवळ आला की बाजारपेठेतील सहका-यांना घेऊन उत्साहात नवी कलाकृती लोकांसमोर सादर करण्यासाठी कामाला लागायचे.रामाच्या मंदिरात मग रात्रीच्या तालमी रंगायच्या.आदम मापारी, सुरेश वाघदरे,गजाभाऊ या सहकाऱ्यांमध्येही नाट्यवेड त्यांनी रुजवले. विजयदुर्ग येथे ' गुरुदक्षिणा' या नाटकातून नाट्य क्षेत्रात पदार्पण केले. 'तुझं आहे तुजपाशी' या नाटकात, पु.लं.चा शाम साकारला. बाळ कोल्हटकर यांच्या 'एखाद्याचं नशीब', 'अश्रूंची झाली फुले' या नाटकात त्यांनी काम केले. लांज्याला 'करीन ती पूर्व', 'फुलाला सुगंध मातीचा','मुंबईची माणसं', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'माझे लग्न 'आग्र्याहून सुटका', 'देव नाही देव्हाऱ्यात', 'मत्स्यगंधा', 'लग्नाची बेडी, 'देवयानी', 'वेगळं व्हायचंय मला' अशा नाटकातून त्यांनी अप्रतिम भूमिका केल्या. त्यांचे दिग्दर्शनही केले. त्याकाळी कमल बेडेकर,शालिनी लोंढे या  तारका स्त्रीपात्र वठवण्यासाठी कोल्हापूरहून खास लांजाला यायच्या. बापूंचे नाटक बघायला वाकेडचे शेट्ये,देवरुखहुन ज्ञाती ब्राह्मण,रत्नागिरीहून वैश्य समाजाचे वणजू ,मुलुष्टे, शेट्ये,दळी,बेडेकर आधी असंख्य मंडळी येत असत. १९६० रोजी लांजा हायस्कूलच्या मदतीसाठी रिंगणे गावचे सुपूत्र 'गिरणगावच्या रंगभूमीचे मुकूटमणी' म्हणून प्रसिद्ध असलेले नाटककार ला.कृ. आयरे यांचे 'स्वराज्य रवि' हे नाटक आदम मापारी, बापू व गजाभाऊ यांनी त्यावेळी आयोजित केले होते. यातील पात्रेही त्यांनी स्वतःच वठविली होती. बापूंच्या नाट्यप्रेमात त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी ही तोला मोलाची साथ दिली. विजय व दादा वाघदरे त्यावेळी साध्या कागदी विंग्स उभ्या करून कल्पकतेने नेपथ्य करीत, जणू स्टेजवर साक्षात स्वर्गच उभा राहिलाय असं वाटायचा. 'एखाद्याचं नशीब' हे नाटक करताना मापारी सरांच्या तात्याच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे केले होते. पुढे नव्या पिढीला मार्गदर्शन करताना गाढवाचं लग्न यासारखे अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. महेश बामणे, हेमंत शेट्ये, मंदार भिंगार्डे ,जयु कुरतडकर, प्रसन्न शेट्ये, प्रशांत बेर्डे, मनोज रेडीज,संतोष उर्फ बाबू शेट्ये, बाळू बामणे, या सर्वांनाच त्यांनी मार्गदर्शन केले. बापूंसारख्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचा सहवास या सर्वांना लाभला.बापू शेट्ये या कलासक्त व्यक्तिमत्त्वामुळेच हनुमान नाट्य मंडळ आज यशस्वी वाटचाल करीत आहे.


   बापूंचे आपल्या लांजा गावावर  प्रचंड प्रेम होते. लांजाच्या परिसरातच त्यांचे व्यक्तिमत्व आकाराला आले. या गावातील माणूस सुखी राहावा म्हणून आपल्या परीने त्यांनी प्रयत्न केले.मध्ये तेवीस वर्षे लांजा गावचे दोन भाग पडले होते, तेव्हा बापूंनी सर्व मानक-यांना एकत्र करून सर्वांची मानधरणी करून गावाच्या विकासासाठी दोन्ही गटांनी एक एक पाऊल मागे या असे गोडी गुलाबीने समजावून सांगितले व सर्वांना एकत्र केले.यामुळे गावातील हेवेदावे संपून सर्व गावकरी- मानकरी एकत्र आले व पूर्वापार मानपानाने गावातील सण उत्सव आनंदी वातावरणात सुरू झाले. बापू राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लांजा तालुकाध्यक्ष असताना त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व ठळक बनले. एका राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष असतानाही ते सर्वांना आपुलकीने आपलेसे करीत. त्यांच्यासोबत काम केलेले राष्ट्रीय काँग्रेस, जनता दल, शिवसेना, भाजपातील अनेक जुने कार्यकर्ते भेटले की आवर्जून सांगतात, 'बापूंसारखा काँग्रेस तालुकाध्यक्ष पुन्हा होणे नाही.' सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून वागणारे अगदी जमिनीवर राहणारे बापू अनाचार, आजच्या द्वेषी, विकृत गलिच्छ राजकारणांपासून शेकडो मैल दूर होते कारण त्यांचे चारित्र्यबल उच्च कोटीचे होते.


लांजा तालुका विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था अर्थात विकास सोसायटीचे संचालक, उपाध्यक्ष ,अध्यक्ष या नात्याने ब अनेक वर्ष त्यांनी काम पाहिले.मात्र आपल्या कार्यकाळात सोसायटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना व संचालकांना ते कधी बरे वाईट बोलले नाहीत. संस्थेच्या विकासासाठी कर्मचारी व संचालक मंडळातील अंतरक्रिया निकोप कशी राहील यावर भर देत सामंजस्याच्या भूमिकेतूम सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध होऊन वित्तीय नुकसान कसे टाळता येईल यासाठी नेहमीच त्यांनी पुढाकार घेतला.


        बापू शिक्षण क्षेत्राविषयी संवेदनशील होते. मुलांचे विचार विश्व अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी गावातील एज्युकेशन सोसायटी लांजा या शिक्षण संस्थेने प्रयत्न करायला हवेत असे त्यांचे प्रामाणिक मत होते. आईच्या निधनानंतर देवरुखात मलेरिया विभागात असलेली नोकरी सोडून त्यांनी लांजा हायस्कूलला काम करायला सुरुवात केली.आदम मापारी यांच्या जोडिने हायस्कूलमध्ये कृतिशीलतेवर भर देणारे अध्ययन अनुभव त्यांनी मुलांना दिले. त्याच वर्षीची एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते, मंडणगड पासून सावंतवाडी पर्यंतच्या माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा रत्नागिरीत पार पडल्या होत्या.लांजा हायस्कुलच्या मुलींच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले होते.आदम मापारी सर या विजयी संघासह लांजा बस स्टैंड वर उतरले तेव्हा सर्वांनीच या गुणवान मुलींच्या संघाचा जयजयकार केला. त्याच वेळी तिथल्या गर्दीतल्या एकाने मुलींकडे पाहून टारगटपणा केला. काही अपशब्द वापरले. मुलींची छेड काढण्याचाच प्रकार होता तो.  या जोडगोळीने हे ऐकल्यावर त्या व्यक्तीला चांगलाच बदडून फैलावर घेतले. स्त्रियांचा सन्मान करणारे बापू म्हणूनच आदरार्थी ठरतात.


      न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा चे कार्यवाह म्हणूनही बापू शेट्ये यांनी दखलपात्र काम केले आहे.त्याकाळी हायस्कूलमध्ये भौतिक सुविधांची कमतरता होती. म्हणून बापूंनी वर्गखोल्या उभारणे व विद्यार्थ्यांसाठी बँच तयार करणे या कामी पुढाकार घेतला. बापूंचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने बँच तयार करण्यासाठी आवश्यक असलेले लाकूड स्वतः बापूनी त्यावेळी पुरविले. हायस्कूलमध्ये बीएड पदवीधर शिक्षकाची गरज निर्माण झाल्यावर गावातलाच हुशार मात्र मुंबईत असलेल्या तरुणाला गावी बोलून त्यांनी शिक्षक म्हणून नेमणूक त्यांनी केली.त्यावेळी शिक्षण क्षेत्रात पवार सर यांची 'शालेय शिस्तीचा महामेरू' अशी ओळख होती.पवार सरांसारखे आदर्श ध्येयनिष्ठ शिक्षक लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले तर प्रशालाची गुणवत्ता वाढेल या हेतूने बापू स्वतः राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे या पवार सरांच्या गावी गेले. आपण लांजाला येऊन मुख्याध्यापक पद स्वीकारावे अशी आर्जवपूर्वक विनंती बापूंनी त्यांना केली. बापूंच्या विनंतीचा मान राखून पवार सर लांज्याला आले.या निर्णयामुळेच पुढे प्रशालेची यशस्वी घोडदोड झाली, एक शिस्तबद्ध प्रशाला म्हणून लांजा हायस्कूल लौकिक प्राप्त केला हा इतिहास सर्वमान्य आहे.


        बापू मित्रांसाठी एक आदर्श मित्र होते आपला मित्र प्रिंटिंग व्यवसाय सुरू करणार आहे कळताच महाराष्ट्र बँकेत त्यांनी कर्ज काढायचे ठरवल्यावर बापू स्वतःच त्याला म्हणाले की मी जामीनदार राहतो, काळजी करू नकोस. त्यांच्या अशा वागण्यातून फक्त मी पुढे जाण्यापेक्षा माझ्यासोबतचे सहकारीही स्थिरस्थावर झाले पाहिजेत ही निरपेक्ष भूमिका होती.


              श्री भगवती देवी मंदिराचे बापू संस्थापक अध्यक्ष होते. गेली अनेक वर्ष श्री भगवती देवी नवरात्र उत्सव शेट्येवाडी येथे दिमाखदारपणे सुरू आहे.त्याचे सारे श्रेय कै.बापू आणि कै. विष्णूभाई शेट्ये यांच्या उत्तम नियोजनात आहे. अखिल वैश्य समाजाचे गुरु, हळदीपूर मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजी हे बापूंचे श्रद्धास्थान. श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचा चातुर्मास बापूंच्या आग्रहाच्या निमंत्रणाने बापूंच्या वक्रतुंड मंगल कार्यालय, लांजा येथे संपन्न झाला आणि लांजाच्या वैश्य समाजाची स्थितीच पालटली. स्वामींचे दोन महिन्याचे सानिध्य लांजावासीयांना लाभले. दहा-पंधरा वर्षाची मुले अर्धा अर्धा तास अध्यात्मिकतेवर प्रवचन करू लागली.श्रवण करु लागली.मोबाईल मध्ये रमाणारी  तरुण पिढी उत्तम मार्गाला लागली.जणु लांजावासियांचे भाग्य उजळले.परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी लांजात येतात तेव्हा त्यांच्या निवासाची व्यवस्था बापूंकडेच असते, हे तर बापूंच्या घराण्याचे व आम्हा लांजेकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. 


       परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींनी केरळ ते काशी पदयात्रा सुरू केली. त्यावेळी काही दिवस बापूंची तब्येत नरम गरम असे. बापूंची स्वामीवर निष्ठा होती. ते म्हणत, जोपर्यंत  महास्वामीजी काशीला पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी मरणार नाही. आणि तसेच झाले. महास्वामीजींची पदयात्रा तेवीस एप्रिलला काशीला पोचली त्यानंतर दहा मे रोजी बापूंनी देह ठेवला.


       बापू शेट्ये यांच्या विषयी अबालवृद्धांच्यात आदराची भावना होती व आहे.आयुष्यभर बापू सद् भाव, चांगुलपणा, नैतिकतेच्या वाटेवर चालले.बापूंच्या जाण्याने एका प्रेमळ व्यक्तीला,मार्गदर्शकाला लांजावासीय मुकले आहेत."आपण नेहमी आनंदी रहावे व इतरांनाही आनंद वाटावा", असे साधे सरळ तत्वज्ञान सांगणारे बापू मला लांज्याचे खरे आयकाॅन वाटतात.

बापूंना विनम्र अभिवादन!!


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


विजय हटकर

लेखक- पत्रकार-संपादक

लांजा

८८०६६३५०१७

Wednesday, December 20, 2023

शैक्षणिक सहलीतून उलगडला समृद्ध खिद्रापुरचा इतिहास.

शैक्षणिक सहलीतून उलगडला  समृद्ध खिद्रापुरचा इतिहास.

        

          लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीदरम्यान कोल्हापुर जिल्ह्यातील सहकार, निसर्ग,कला,संस्कृती व  ऎतिहासिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शिरोळ तालुक्याला भेट देत शिल्पकलेच्या इतिहासातील "सुवर्णपान' म्हणून ओळखल्या जाणा-या  ऎतिहासिक खिद्रापूर गावातील शिल्पसमृद्ध कोपेश्र्वर मंदिराला भेट देत या वैभवशाली मंदिराचा इतिहास जाणून घेतला.

         शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्वांत आवडीचा विषय म्हणजे स्कूल ट्रीप होय.शैक्षणिक सहलीला खूप महत्त्व आहे कारण ते केवळ आपला दृष्टीकोनच विस्तृत करत नाही  तर आपले ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात वाढवते. म्हणूनच, विद्यार्थीवर्ग या अनमोल क्षणाची अधीरतेने वाट पाहत असतो.प्रत्यक्ष अनूभूतीतून मिळालेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या अध्यनशील विकासाला आधारभूत ठरते हे जाणून शालेय प्रशासनाने एकदिवसीय सहलीला सन २०२३ -२४ या वर्षात महत्व दिल्यानेच यंदा न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक १६ डिसेंबर रोजी समृद्ध पश्चिम महाराष्ट्रातील रांगड्या कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात आयोजित केली होती. या सहलीत ११५ विद्यार्थ्यांसह ११ शिक्षक सहभागी झाले होते.



         शिरोळ तालुका हा पूर्वीपासूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सहकाराने समृद्ध आणि निसर्गसंपन्न आणि प्रेरणादायी असा हा  तालुका आहे. याचबरोबर शेतीबरोबरच सहकार, पर्यटन सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठान लाभलेला  सुजलाम-सुफलाम समृद्ध असा आहे. याचे महत्वाचे वैशिष्टे म्हणजे शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त शासनाला विविध प्रकारचा महसूल देतो.या तालुक्यातील सहकारसमृद्धी,ऎतिहासिक मंदिरांचे वैभव,तालुक्याची जीवनदायीनी कृष्णा नदीतीरावर बांधलेले नयनरम्य जुने वैशिष्ट्यपुर्ण घाट ,टेक्सटाईल काॅलेज,घोरपडे व पटवर्धन संस्थानकालीन राजवाडे यांची विद्यार्थ्यांना माहिती प्रत्यक्ष अनूभूती मिळावी या हेतुने या सहलीचे आयोजन सहलप्रमुख एन.बी.यमगर यांनी केले होते.या एकदिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम भारतातील दत्तसंप्रदायाची राजधानी ओळखल्या जाणा-या श्री क्षेत्र नृसिंहवाडीस भेट देत सकाळच्या रम्य वातावरणात अौंदुंबरवृक्षाखाली स्थापित मनोहर पादुकांचे दर्शन घेत नृसिंहवाडीक्षेत्री कृष्णा -पंचगंगा नदी संगम पाहून पुर्व किना-यावरील गुरुचरित्राच्या १८ व्या अध्यायात वर्णिलेले अमरापूर येथील ६४ योगिनीस्थान व अमरेश्र्वर मंदिराला भेट देत या ठिकाणचे धार्मिक,पर्यटनीय महत्व समजून घेतले.

यानंतर कुरुंदवाड या गावातील इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी महाराष्ट्रात कुठेही असा भव्य घाट नाही असा कौतुकोद्गार काढलेला नयनरम्य एखाद्या किल्यासारखा भासणारा कृष्णा घाट पाहिला.घाटावरील स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांच्या पराक्रमाची गाथा समजुन घेतली.कृष्णा घाटावर असलेली हेमांडपंती मंदिरे ,प्राचीन  ऎतिहासिक वारसा जपणा-या दहा खोल्या,स्फटिक गणपती मंदिर पाहिले.कृष्णा घाटावर अनेक चित्रपट,मालिकांचे चित्रिकरण झालेले असल्याने देश विदेशात पोहचलेल्या या कृष्णाघाटाचे महत्व विद्यार्थ्यांना समजुन घेता आले.



      नृसिंहवाडी-कुरूंदवाडचा वैशिष्ट्यपूर्ण परिसर पाहून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे खजुराहो म्हणुन ओळखल्या जाणा-या  चंद्रकोर आकारासारखे वळण लाभलेल्या कृष्णा नदीच्या तीरावरिल खिद्रापूर येथील कोपेश्र्वर मंदिराला भेट दिली.यावेळी विजय हटकर  विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की,हत्तींनी आपल्या पाठीवर मंदिर पेलल्यासारखी अद्भुत रचना या मंदिराची असून ९२ गजांवर आरुढ देवदेवतांचा अखंड पट्टा अर्थात गजपट्ट इथे पहायला मिळतो.यासह खगोलशास्त्र व स्थापत्याच्या सखोल अभ्यास करुन  ४८ खांबावर उभारलेला कोपेश्र्वरचा स्वर्गमंडप, पौर्णिमाकाळात इथे येणारी चंद्रप्रकाश योजना, खांबावरिल विविध अष्टकोनी,चौकोनी,षटकोनी,वर्तुळाकृती नक्षीकाम ,शैव व व वैष्णव पंथींयांसाठी श्रद्धास्थान असलेल्या इथल्या कोपेश्र्वर- धोपेश्र्वराची कथा,नंदी नसलेला सभामंडप,अश्र्व, बोकड, वराह,व्याल,मकर,मेष,महिष यांची शिल्पे,आंबा काजू आदि फळांची शिल्पे,कीर्तिमुखांची समृद्धता,अरब हबशी प्रवासी ,दिगंबर अवस्थेतील श्रावक ,रामायण महाभारतासह, विष्णुअवतार, शिवलिलामृतातील कथा सांगाणारा शिल्पपटासह जैन व बौद्धमूर्तीशिल्पासह असंख्य अद्भुत सर्वांगसुंदर शिल्पे इथे पहायला मिळतात.साधारण दिड हजार वर्षापुर्वीचे आपल्या देशातील समाज जीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब कोपेश्र्वर देवालयाच्या माध्यमातून पहायला मिळत असुन कोल्हापुरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरु पाहणारे हे ऎतिहासिक व जागतिक दर्जाचे संचित जपणे आवश्यक असल्याचे मत विजय हटकर यांनी व्यक्त केले.

    खिद्रापूरचा ऎतिहासिक वारसा उलगडल्यावर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मॅचेस्टर'इचलकरंजी' शहराला भेट देत येथील घोरपडे संस्थानाचा भव्य राजवाडा व सद्यस्थितीत या राजवाड्यात भरणारे आशियातील सर्वात मोठे डिकेटी टेक्सटाईल्स इंजिनिअरिंग काॅलेजला भेट देत कापड बनण्याची प्रक्रिया समजून घेत टेक्सटाईल्स इंडस्ट्रीतील भविष्यातील संधी समजून घेतली.स्वायत्तता लाभलेल्या या काॅलेजमधील पायाभुत सुविधा पाहून एका दर्जेदार महाविद्यालयाची ओळख करुन करवीर नगरीतील शक्तिपीठ महालक्ष्मीचे दर्शन व खरेदी करित या सहलीचा समारोप करण्यात आला.या शैक्षणिक सहलीत सहलप्रमुख एन.बी.यमगर, नंदकुमार झांबरे, एम. आर. जाधव,विजय हटकर,अक्षय साखळकर,नितीन गोडबोले, एल. आर. भिंगे,दिक्षा गोरे, शिल्पा परब,मधुश्री पाध्ये, एस.एस.शिंदे आदी शिक्षक सहभागी झाले होते.सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विद्या आठवले ,उपमुख्याध्यापक सुनिल जाधव ,पर्यवेक्षक भैरु सोनवलकर,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनिल पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच इचलकरंजीचे रोहित पट्टेकरी,भानुदास प्रतिष्ठान नृसिंहवाडी,कुमार गावडे,रोहित पाटील, स्वरूप गावडे,लगाटे सर,तसेच आमचे सारथी समीर हर्डीकर,संदेश वालकर,मंगेश खानविलकर यांचे सहकार्याने ही डोळस भटकंती करता आली.

छायाचित्रे :


नरसोबावाडी येथील भानुदास प्रतिष्ठानेचे व्यवस्थापक पेडणेकर यांना विजय हटकर लिखित जनसेवक सुधाभाऊ पुस्तकाची प्रत भेट देताना सहलप्रमुख नामदेव यमगर व सहभागी शिक्षक वृंद.

--------------------------------------


कृष्णाघाटाचे महत्व उलगडवताना...


सहकारी शिक्षक 



समृद्ध कोपेश्र्वर मंदिरात आमची टिम




०८ फूट उंचीचा भग्न द्वारपाल 




नारीशक्ती



डिकेटी काॅलेेेेजचा भव्य परिसर


देखणा अद्वितीय स्वर्गमंडप..

नंदीवर शिवपार्वती बाजूला द्वारपाल व गजारुढ ब्रम्हा विष्णू ( मंदिराची उत्तर बाजू)



अस्मादिक






दै.सकाळ.


दै.प्रहार.