Wednesday, December 20, 2023

शैक्षणिक सहलीतून उलगडला समृद्ध खिद्रापुरचा इतिहास.

शैक्षणिक सहलीतून उलगडला  समृद्ध खिद्रापुरचा इतिहास.

        

          लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीदरम्यान कोल्हापुर जिल्ह्यातील सहकार, निसर्ग,कला,संस्कृती व  ऎतिहासिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या शिरोळ तालुक्याला भेट देत शिल्पकलेच्या इतिहासातील "सुवर्णपान' म्हणून ओळखल्या जाणा-या  ऎतिहासिक खिद्रापूर गावातील शिल्पसमृद्ध कोपेश्र्वर मंदिराला भेट देत या वैभवशाली मंदिराचा इतिहास जाणून घेतला.

         शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्वांत आवडीचा विषय म्हणजे स्कूल ट्रीप होय.शैक्षणिक सहलीला खूप महत्त्व आहे कारण ते केवळ आपला दृष्टीकोनच विस्तृत करत नाही  तर आपले ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात वाढवते. म्हणूनच, विद्यार्थीवर्ग या अनमोल क्षणाची अधीरतेने वाट पाहत असतो.प्रत्यक्ष अनूभूतीतून मिळालेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या अध्यनशील विकासाला आधारभूत ठरते हे जाणून शालेय प्रशासनाने एकदिवसीय सहलीला सन २०२३ -२४ या वर्षात महत्व दिल्यानेच यंदा न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक १६ डिसेंबर रोजी समृद्ध पश्चिम महाराष्ट्रातील रांगड्या कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात आयोजित केली होती. या सहलीत ११५ विद्यार्थ्यांसह ११ शिक्षक सहभागी झाले होते.



         शिरोळ तालुका हा पूर्वीपासूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सहकाराने समृद्ध आणि निसर्गसंपन्न आणि प्रेरणादायी असा हा  तालुका आहे. याचबरोबर शेतीबरोबरच सहकार, पर्यटन सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठान लाभलेला  सुजलाम-सुफलाम समृद्ध असा आहे. याचे महत्वाचे वैशिष्टे म्हणजे शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त शासनाला विविध प्रकारचा महसूल देतो.या तालुक्यातील सहकारसमृद्धी,ऎतिहासिक मंदिरांचे वैभव,तालुक्याची जीवनदायीनी कृष्णा नदीतीरावर बांधलेले नयनरम्य जुने वैशिष्ट्यपुर्ण घाट ,टेक्सटाईल काॅलेज,घोरपडे व पटवर्धन संस्थानकालीन राजवाडे यांची विद्यार्थ्यांना माहिती प्रत्यक्ष अनूभूती मिळावी या हेतुने या सहलीचे आयोजन सहलप्रमुख एन.बी.यमगर यांनी केले होते.या एकदिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम भारतातील दत्तसंप्रदायाची राजधानी ओळखल्या जाणा-या श्री क्षेत्र नृसिंहवाडीस भेट देत सकाळच्या रम्य वातावरणात अौंदुंबरवृक्षाखाली स्थापित मनोहर पादुकांचे दर्शन घेत नृसिंहवाडीक्षेत्री कृष्णा -पंचगंगा नदी संगम पाहून पुर्व किना-यावरील गुरुचरित्राच्या १८ व्या अध्यायात वर्णिलेले अमरापूर येथील ६४ योगिनीस्थान व अमरेश्र्वर मंदिराला भेट देत या ठिकाणचे धार्मिक,पर्यटनीय महत्व समजून घेतले.

यानंतर कुरुंदवाड या गावातील इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी महाराष्ट्रात कुठेही असा भव्य घाट नाही असा कौतुकोद्गार काढलेला नयनरम्य एखाद्या किल्यासारखा भासणारा कृष्णा घाट पाहिला.घाटावरील स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांच्या पराक्रमाची गाथा समजुन घेतली.कृष्णा घाटावर असलेली हेमांडपंती मंदिरे ,प्राचीन  ऎतिहासिक वारसा जपणा-या दहा खोल्या,स्फटिक गणपती मंदिर पाहिले.कृष्णा घाटावर अनेक चित्रपट,मालिकांचे चित्रिकरण झालेले असल्याने देश विदेशात पोहचलेल्या या कृष्णाघाटाचे महत्व विद्यार्थ्यांना समजुन घेता आले.



      नृसिंहवाडी-कुरूंदवाडचा वैशिष्ट्यपूर्ण परिसर पाहून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे खजुराहो म्हणुन ओळखल्या जाणा-या  चंद्रकोर आकारासारखे वळण लाभलेल्या कृष्णा नदीच्या तीरावरिल खिद्रापूर येथील कोपेश्र्वर मंदिराला भेट दिली.यावेळी विजय हटकर  विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की,हत्तींनी आपल्या पाठीवर मंदिर पेलल्यासारखी अद्भुत रचना या मंदिराची असून ९२ गजांवर आरुढ देवदेवतांचा अखंड पट्टा अर्थात गजपट्ट इथे पहायला मिळतो.यासह खगोलशास्त्र व स्थापत्याच्या सखोल अभ्यास करुन  ४८ खांबावर उभारलेला कोपेश्र्वरचा स्वर्गमंडप, पौर्णिमाकाळात इथे येणारी चंद्रप्रकाश योजना, खांबावरिल विविध अष्टकोनी,चौकोनी,षटकोनी,वर्तुळाकृती नक्षीकाम ,शैव व व वैष्णव पंथींयांसाठी श्रद्धास्थान असलेल्या इथल्या कोपेश्र्वर- धोपेश्र्वराची कथा,नंदी नसलेला सभामंडप,अश्र्व, बोकड, वराह,व्याल,मकर,मेष,महिष यांची शिल्पे,आंबा काजू आदि फळांची शिल्पे,कीर्तिमुखांची समृद्धता,अरब हबशी प्रवासी ,दिगंबर अवस्थेतील श्रावक ,रामायण महाभारतासह, विष्णुअवतार, शिवलिलामृतातील कथा सांगाणारा शिल्पपटासह जैन व बौद्धमूर्तीशिल्पासह असंख्य अद्भुत सर्वांगसुंदर शिल्पे इथे पहायला मिळतात.साधारण दिड हजार वर्षापुर्वीचे आपल्या देशातील समाज जीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब कोपेश्र्वर देवालयाच्या माध्यमातून पहायला मिळत असुन कोल्हापुरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरु पाहणारे हे ऎतिहासिक व जागतिक दर्जाचे संचित जपणे आवश्यक असल्याचे मत विजय हटकर यांनी व्यक्त केले.

    खिद्रापूरचा ऎतिहासिक वारसा उलगडल्यावर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मॅचेस्टर'इचलकरंजी' शहराला भेट देत येथील घोरपडे संस्थानाचा भव्य राजवाडा व सद्यस्थितीत या राजवाड्यात भरणारे आशियातील सर्वात मोठे डिकेटी टेक्सटाईल्स इंजिनिअरिंग काॅलेजला भेट देत कापड बनण्याची प्रक्रिया समजून घेत टेक्सटाईल्स इंडस्ट्रीतील भविष्यातील संधी समजून घेतली.स्वायत्तता लाभलेल्या या काॅलेजमधील पायाभुत सुविधा पाहून एका दर्जेदार महाविद्यालयाची ओळख करुन करवीर नगरीतील शक्तिपीठ महालक्ष्मीचे दर्शन व खरेदी करित या सहलीचा समारोप करण्यात आला.या शैक्षणिक सहलीत सहलप्रमुख एन.बी.यमगर, नंदकुमार झांबरे, एम. आर. जाधव,विजय हटकर,अक्षय साखळकर,नितीन गोडबोले, एल. आर. भिंगे,दिक्षा गोरे, शिल्पा परब,मधुश्री पाध्ये, एस.एस.शिंदे आदी शिक्षक सहभागी झाले होते.सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विद्या आठवले ,उपमुख्याध्यापक सुनिल जाधव ,पर्यवेक्षक भैरु सोनवलकर,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सुनिल पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच इचलकरंजीचे रोहित पट्टेकरी,भानुदास प्रतिष्ठान नृसिंहवाडी,कुमार गावडे,रोहित पाटील, स्वरूप गावडे,लगाटे सर,तसेच आमचे सारथी समीर हर्डीकर,संदेश वालकर,मंगेश खानविलकर यांचे सहकार्याने ही डोळस भटकंती करता आली.

छायाचित्रे :


नरसोबावाडी येथील भानुदास प्रतिष्ठानेचे व्यवस्थापक पेडणेकर यांना विजय हटकर लिखित जनसेवक सुधाभाऊ पुस्तकाची प्रत भेट देताना सहलप्रमुख नामदेव यमगर व सहभागी शिक्षक वृंद.

--------------------------------------


कृष्णाघाटाचे महत्व उलगडवताना...


सहकारी शिक्षक 



समृद्ध कोपेश्र्वर मंदिरात आमची टिम




०८ फूट उंचीचा भग्न द्वारपाल 




नारीशक्ती



डिकेटी काॅलेेेेजचा भव्य परिसर


देखणा अद्वितीय स्वर्गमंडप..

नंदीवर शिवपार्वती बाजूला द्वारपाल व गजारुढ ब्रम्हा विष्णू ( मंदिराची उत्तर बाजू)



अस्मादिक






दै.सकाळ.


दै.प्रहार.


No comments:

Post a Comment