Tuesday, July 30, 2019


वात्सल्यमुर्ती शिरवटकर आजी तुला त्रिवार नमन.


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

      दि.३० जुलै २०१९
आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान संदिप दादाचा फोन आाला.मि काॅलेजमध्ये नेहमीच्याच कामात व्यस्त असताना दादाने शिरवटकर माऊशी गेल्या हे सांगताच धक्काच बसला. श्रीमती इंदिरा शिरवटकर अर्थात लांजा जुन्या बाजारपेठेत शिरवटकर माऊशी म्हणून लोकप्रिय असलेली माझी लाडकी शिरवटकर आजी आज देवाघरी निघून गेली.
    ममता,वात्सल्य ,स्नेह ,करुणा याचं मुर्तीमत प्रतिक होतीस तु आजी.जन्माला आल्यापासुन पाजवीला पुसलेला संघर्ष लग्नानंतरही काहि कमी झाला नाही उलट तो आणखी तीव्र झाला पण तु आयुष्यभर त्याचा हसत हसतच सामना केलास. आजी तुझे यजमान तुझ्या हवाली सहा लेकरांना आश्वस्त सोडून गेल्यावरही तु घाबरली नाहीस.
    लांज्यासारख्या छोटेखानी गावात जुन्या बाजारपेठेत या मुलांना भाकर मिळावी म्हणून पडेल ते काम केलेस. मुलांना मोठे केलेस. त्यांनीही तु दिलेल्या संस्कार रुपी शिकवणीच्या जोरावर मुंबापरित जाऊन संघर्ष केला. व आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवले.तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठी होताच. दिवस चांगले आल्यावरहि तु मात्र जुने दिवस विसरली नाहीस.सतत काम करत राहण्याचा तुझा स्वभाव मात्र बदलला नाहि.
         तशी आजी तुझी न माझी भेट झाली ती सन २०१५ च्या माघी गणेशोत्सवानंतर.तुझा उत्तरार्ध सुरु झालेला तर माझ्या प्रापंचिक संघर्षाला सुरवात झालेली.मी भाड्याने रहात असलेल्या स्वरुपानंद वसाहतीतील माझ्या घरमालकाने मला घराच्या नुतनीकरणाचे कारण सांगून रुम खाली करण्यास सांगितल्यवर मला खरं तर टेन्शनच आले होते.पंधरा दिवस खोली पहात होतो.पण हवी तशी मिळत नव्हती.त्यातच सॊभाग्यवतीनॆ लांजा शहराच्या महामार्गाच्या पश्चिमेस खोली बघुया हा आग्रह धरलेला.त्यामुळे महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या चांगल्या खोल्या पण सोडल्या होत्या.त्यातच माघी गणेशोत्सव सुरु असल्याने मी सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन येत असताना माझा मित्र राकेश पोटफोडेच्या आईला मला खोली हवी आहे, तुम्हि बाजारपेठ कुठे असल्यास कळवा म्हणून सांगताच
   पोटफोडे काकु म्हणाल्या अरे तुझी समस्या संपली म्हणून समज.आमच्या शेजारच्या शिरवटकरांच्या ईमारतीत दोन खोल्या खालीच आहेत.तु त्या संदीप राणे कडून त्यांच्याशी संपर्क साध.मी लगेचच वैशाली आॅप्टिशियनचे मालक संदीप राणे यांच्याकडून शिरवटकर दादांना फोनवर संपर्क केला. खोली पाहिली .मला बाजारपेठेतील मोक्याच्या जागेवर असलेली हि" गोपीकुंज" ईमारतीतील खोली पसंत पडल्याने व संदीप दादाने ही माझ्याविषयी घरमालकांना सकारात्मक माहिती दिल्याने शिरवटकर दादांनी मला भाडेतत्वावर  खोली देण्यास होकार दिला.व मि शिरवटकर कुटुंबियाच्या "गोपिकुंज " इमारतीत रहायला आलो.काहि दिवसांनी आमच्या घरमालकांच्या आई शिरवटकर आजी  मुंबई हुन गावी आल्या आणि आपली पहिली भेट झाली.या पहिल्या भेटितच आजी तु मला तुझा नातु करुन टाकलास .तुझ्या प्रेमळ स्वभावाने मला एक आजी मिळाल्याचा स्वर्गीय आनंद झाला होता तो शब्दात व्यक्त करणे कठिण.कारण माझ्या लहानपणीच माझी आजी  निर्वतल्याने मला आजीचे प्रेम तसे मिळालेच नव्हते.पण ते आता मिळणार होते.त्यामुळे मीही आनंदित होतो.
         आजी,गत पाच वर्षात तुझी अनेक रूपे मी जवळून पाहिली आहेत. आमच्या या ईमारतीत येणाऱ्या प्रत्येक भाडेकरुचं भलंच झालं आहे,तेव्हा बाळा तुझेहि भलेच होईल हे वाक्य आजही माझ्या कानी घुमते आहे.
         आजी, तसा तुझा स्वभाव खुप धार्मिक. हिंदू धर्मातील सर्व व्रत वैकल्य,सण-उत्सव तु नित्य नियमाने व आनंदाने अगदी कसोशीने करायचीस.कोणत्याही सणाच्या वेळी तुझी चाललेली लगबग इतरांनाही प्रेरणा द्यायची.मग आम्हिच म्हणायचो,अगं मावशी किती करशील, जरा विश्रांती घे .पण तु आपली तो सण साजरा होईपर्यंत झटायचीस.  श्रावणात नागपंचमीला तु केलेल्या पातोळ्या तर काही ऒरच लागायच्या.दहिहंडिला तुझ्या हातच्या दहिकाला हि चवीष्टच लागायची.गुढिपाडवा तुळशीविवाह हे सण साजरे करताना ते नियमातच साजरे झाले पाहिजेत यासाठी तुझा अट्टहास असायचा.तुळशीविवाहाच्या आदल्या रात्री तुळस रंगवली कि तुला अानंद व्हायचा.व तु समाधानाने झोपायचीस.
         गणेशोत्सव जवळ आला की तु महिनाभर अगोदरच तयारीला लागायचीस.मुंबईकर मुले-नातवंडे येणार असल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर अोसंडुन वहायचा.या गणपतीच्या सात दिवसात तु घराबाहेर कोणालाच दिसायची नाहीस कारण विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चा,नैवद्य,मुलांबाळांना ,पाहुण्यांना नाश्ता जेवण यात तु पूर्ण रमुन जायचीस.हे सात आठ दिवस तुझी होणारी धावपळ मी जवळून पाहिली आहे.या धावपळितहि तु केलेले मोदक मला न विसरता आणुन द्यायचीस.आजी हेच तुझं निराळंपण तुझा मोठेपणा सिद्ध करण्यास पुरेसं आहे.गणपती सणानंतर घरातील सर्व चाकरमानी परत निघून गेले कि तुझी अवस्था पाखरं सोडून गेलेल्या त्या अस्वस्थ चिमणीसारखी व्हायची.
         बाजारपेठेतील हनुमान जयंतीच्या वेळीही तु खुप उत्साहाने महाप्रसादाच्या कामात हातभार लावायचीस.तर शुक्रवारच्या संतोषी मातेच्या चणेवाल्यांच्या महाप्रसादावेळिहि तु खुप काम करायचीस.वय झालं तरिहि तू कधीही शांत बसलेली मि तुला कधीच पाहिलेली नाहि.या दोन्ही उत्सवावेळि तु तुझ्यापरिनं मार्गदर्शन करायचीस. तेव्हाच तुला समाधान वाटायचे.तुझं सगळं आयुष्य कुणाचं न कुणाचं करण्यातच गेलं.तुझ्या या कामाळू स्वभावामुळे तु अनेकांना आपलंसं केलेस.
          आजी,तुझा दैनंदिन कार्यक्रम ही ठरलेला.त्यात कधीही फरक पडायचा नाहि.घड्याळाचे काटे जसे वेळेप्रमाणे चालतात तसाच तुझा दिनक्रमहि .सकाळी लवकर उठून देवाला फुले आणने व एक किमी तरि चालणे,देवपूजा करणे, चहापान, दुपारी एकच्या आसपास भोजन ,चार वाजता पुन्हा चालायला जाणे, रात्री आठला भोजन व विश्रांती या काळात तुझी डायबिटिसच्या डोसची इंजेक्शन तु स्वतः च नियमित पणे घ्यायचीस.मि आजारि पडल्यावर डाॅक्टराच्या हातचे इंजेक्शन घ्यायला आजहि घाबरतो मात्र तु रोजच्या रोज अशी इंजेक्शन घ्यायचीस .खरच यावेळी मला तुझी कमालच वाटायची.  तु वेळ जावा म्हणून गोधड्या (वाकळ)  शिवायचीस. त्यात तुझी मायेची ऊब असायची.वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरहि तु गोधड्या शिवायचीस प्रसंगी तुझी दमछाकपण व्हायची पण तरीही तु ते काम कधीच थांबविले नाहीस.तुझे वात्सल्य त्या गोधड्यांमधुन अाज अनेक नातवंडाना मायेची उब देत आहे हे नक्कीच.
   

 नाती रक्ताची असो वा मानलेली,त्यात मायेचा ओलावा असेल तरच ती ऊन पावसात घट्ट टिकून राहतात व वाढतात.आपलेहि नाते असेच होते.माझ्या सॊभाग्यवतीच्या सातुंगुळावेळि, मुलीच्या अर्थात कु.विधीच्या पहिल्या वाढदिवसावेळि तु मला केलेली मदत विसरता येणं शक्य नाहि. आजी ,तुझ्याकडं काय नसायचं? - अगदी डोकं दुखतंय,थांब सुंठ उगळुन देते,म्हणणाऱ्या तुझ्याकडे प्रत्येक छोट्या मोठ्या आजारावर हमखास रामबाण उपाय असायचा.थोडक्यात तू तर घरातली रात्री अपरात्री धावून येणारी डाॅक्टरच होतीस.
      " फूल काही देत नाही,
        फूल काही घेत नाही;
         फूल फक्त फुलत असतं!
या पंक्तिप्रमाणे तु आयुष्यभर फुलतच राहिलीस.व इतरांनाही तुझ्या स्नेहसुगंधीत फुलरुपी व्यक्तिमत्वाने फुलण्याची प्रेरणा दिलीस.आजी ,झाडांवर पाखरे नसतील तर ' झाड'पण राहणार नाही.व घरात तुझ्यासारखी प्रेमळ बुजूर्ग व्यक्तिमत्त्वे नसतील तर 'घर' पण ही राहणार नाही.हे खरेच आहे. तुझी उणीव सर्वांनाच सतत जाणवत राहील.पण माझ्या आयुष्यातही तुझ्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.मि एका प्रेमळ आजीला कायमचा मुकलॊ आहे. आजी ,तुझा स्पषवक्तेपणा,वेळ व्यवस्थापन,कामाप्रती असलेली निष्ठा,प्रेमळ ,वात्सल्यपुर्ण स्वभाव, धार्मिक परंपरा साजरा करण्याचा आग्रह ,नियमित पायी  चालण्याचा संदेश नेहमीच प्रेरणा देत राहतील.
          मुळात "आजी "हे रसायनच वेगळं असतं. 'क्षणाक्षणाला, कणाकणाला इतरांचं जीवन प्रकाशित करणारी,संस्काराचा ऎवज आमच्या स्वाधीन करणारी माऊली म्हणजे आजी.' या आजीच्या परिभाषेत परफेक्ट बसणा-या  तुझ्यासारख्या मातृहृदयी आजीचा सहवास मला लाभला हे माझे भाग्यच.आज न सांगताच तु या जगाचा निरोप घेतलास.आम्ही मात्र पोरके झालो. या भावूक क्षणी देवाकडे एकच मागणे, माझ्या आजीच्या आत्म्याला चिरशांती लाभो.
          शिरवटकर आजी ,तुझ्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
   @@@@@@@@@@@@@@@@@@@
       
       श्री विजय हटकर
       लांजा.

Wednesday, July 3, 2019

ऐतिहासिक साठवली गढीवर दुर्गवीर व शिवगंध प्रतिष्ठनच्या वतीने संवर्धन मोहिम संपन्न.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
     *लांजा*- छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र  म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे.लांजा तालुक्यातील ऎतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या गढिचे संवर्धन व्हावे व वर्तमान पिढीला तालुक्याचा समृद्ध वारसा ज्ञात व्हावा या दृष्टिने दुर्गवीर प्रतिष्ठान,शिवगंध प्रतिष्ठान, लांजा व साठवली, रुण  गावातील स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला  स्थानिकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दाखविला.


     
 रत्नागिरि जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पश्चिम भागात व मुचकुंदि नदिकिनारि वसलेले साटवली हे गाव ऐतिहासिक काळात नावाजलेले बंदर होते. मुचकुंदी नदीचे उगमस्थान माचाळ येथे असून, ती खोरंनिनको प्रभानवल्ली, दसुरकोंडमार्गे साटवलीमध्ये येते.      छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साटवली येथे माल उतरवण्यासाठी गढी म्हणजे एक छोटासा किल्ला होता.सदर गढि फाजल खान या सरदाराने बांधली असे इतिहासकार सांगतात.फार पूर्वी पासून सदर मुचकुंदी खाडीतुन व्यापार चालत असे.बाहेर ठिकाणाहून म्हणजेच कारवार,गोवा,मद्रास,मुंबई वैगेर ठिकाणाहून व्यापारी मालाची ये जा चालू होती.मोठमोठे पाडाव,मचवे मुचकुंदिच्या कुशीतुन रांगत असत,विसावा घेत असत. जवळच असलेल्या  पुर्णगड किल्ल्यातून  पाडावातून आणलेला माल साठवली येथे बांधण्यात आलेल्या धक्क्यावर  उतरवून साठवला जाई. समुद्रमार्गे आलेला हा माल मग लांजा तालुक्यातील अनेक गावात व प्रभानवल्लीमार्गे घाटावर विशालगड येथे बैलगाडिमार्फत नेला जात असे.  त्यामुळे साटवली बंदराला विशेष महत्त्व होते.

         साटवली या ठिकाणी व्यापारीही आपला माल उतरवत असत. माल उतरवण्याची व साठविण्याची व्यवस्था या ठिकाणी असल्याने या ठिकाणाला त्या काळी ‘बंदरसाठा’ या नावानेही संबोधिले जाई. माल साठवणीची जागा असलेलं हे गाव पुढं अपभ्रंश होऊन साटवली या नावाने ओळखले जाऊ लागले.

          शिवरायांच्या काळात व्यापाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असणा-या व त्या काळात एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आलेल्या या साटवली गढीची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. किल्ल्याला पाच बुरुज तसेच आतमध्ये विहीर, सदरेचे अवशेष दिसतात. पुर्वी  किल्यात असणारी तोफ आज गावातील विठ्ठल मंदिरात ठेवलेली पहायला मिळते.  सध्या या भग्नावस्थेतील गढीला झाडा-झुडपांनी आच्छादले आहे. पडझड झालेले गढीचे प्रवेशद्वार, पशुपक्ष्यांचा वावर याच गोष्टी सध्या या ठिकाणी दृष्टीस पडतात. शिवाय ग्रामपंचायतीतर्फे भरणारा साप्ताहिक मासळी- कांदा बटाटा -भाजीपाला बाजार तेथेच भरतो.ग्रामपंचायत कराच्या रुपाने पैसा गोळा करते.मात्र यातून आतील साफसफाईच्या नावा..ने बोंबाबोंब आहे.एकेकाळी ऎतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या साठवली सुभ्याचा कारभार याच गढितून चालायचा.आज मात्र पुरातत्त्व खात्याच्या व स्थानिक नेतृत्वाच्या उदासिनतेमुळे हि ऎतिहासिक  गढि शेवटची घटका मोजते आहे.
त्यामुळे संवर्धनात सातत्य आणून हा किल्ला ( गढि)  जगासमोर  आणायला हवा.या हेतूने लांजा तालुक्यातील ऎतिहासिक वारसास्थाने जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु जाधव यांनी महाराष्ट्रातील दूर्ग संवर्धन चळवळित अग्रेसर असलेल्या दूर्गवीर प्रतिष्ठान शी संपर्क साधून साठवली गढी संवर्धन  मोहिमेचे आयोजन केले होते.या मोहिमेसाठी दूर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष हसुरकर, सागर टक्के,प्रशांत डिंगणकर,अल्पेश पाटील,अमित शिंदे,मंगेश पडवळे,एकनाथ असवले, सुरेश उदरे,सुरक्षित कोकितकर,तेजस्वी रेवणे, रोहित बालडे,ओंकार डिंगणकर, प्रणीत बोले आदि शिलेदार साठवली गावी उपस्थित होते.
      यासोबत शिवगंध प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजु जाधव, प्रल्हाद साळुंखे,जयु सुर्वे,अंकिता जाधव, अनुष्का जाधव,गुणवंत जाधव, विशाल कांबळे, अमेय कांबळे, अजय सावंत,साई जेधे, दत्तप्रसाद कदम,अमेय चव्हाण,महेश सावंत,पप्पू मुळे,संदीप सावंत ,मानसिक कुरूप,निकिता कुरूप आदि शिलेदारांनीहि उस्फुर्तपणे या मोहिमेत सहभाग घेऊन साठवली गढी स्वच्छ करण्यात पुढाकार घेतला.

       दुर्गवीर व शिवगंध प्रतिष्ठानचे शिलेदार साठवली गढीच्या संवर्धन मोहिमेसाठी गावात दाखल झाल्याचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ रमेश भालेकर,उदय चाळके, घन:श्याम संसारे,विवेक  संसारे, आनंद शेरे ,संदीप चव्हाण,राजेश शेरे,समीर नारकर,प्रकाश शेलार,राहुल माने,सचिन तरळ,सचिन कस्तुर,शिवप्रसाद नारकर, निनाद शेरे ,गंगाराम चाळले,मेस्त्री सर,सदानंद किल्लेकर, अविनाश पावसकर,महेश जाधव,मधूकर जाधव,राजु बाणे, अनिल तरळ, ओंकार गांगण,गॊरव पराडकर, गुड्डु पराडकर,संकेत पराडकर, इमाज देरवेश,समीर लांबे, शिवाजी पराडकर,असलाम बोबलाई, मुबीन दरवेश, हासनेन माफारि या ग्रामस्थानीही साठवली गढि ठिकाणी धाव घेतली. व सक्रियपणे गढीच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
      दूर्गवीरचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांनी या गढिचे ऎतिहासिक महत्व व पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना मिळणारा रोजगार याचे महत्व विशद करित स्थानिक ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. साठवलीतील साठवली गढि,खानवलीतील खानविलकरांची शिवकालीन सदर,नदिपलीकडिल देवीहसोळचे आर्यादुर्गा मंदिर ,व कातळशिल्पे, जावडे येथील शैव- वैष्णव कालीन लेणी आदि ठिकाणे एकमेकांपासून जवळच्या अंतरावर असल्याने या सर्व स्थळांचा  नियोजनबद्ध विकास झाल्यास एकदिवसीय सहलीसाठी साठवली परिसर नवे डेस्टिनेशन म्हणून पुढे येऊ  शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . या पुढेही साठवली गढीच्या स्वच्छता ,संवर्धन  व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन स्थानिक ग्रामस्थांनी दूर्गवीर प्रतिष्ठानला दिले.या कामी शिवगंध प्रतिष्ठान ने हि ग्रामस्थांना गढिच्या संवर्धनासाठी लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द दिल्याने लवकरच शिवकालीन इतिहासाची साक्षीदार असलेली साठवली गढी पुन्हा एकदा उभारी घेईल हे नक्की.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    विजय हटकर
       लांजा

न्यू एज्युकेशन सोसायटी,लांजे संचलित, 

' न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा.'
🖊🖊📚📚📖📖🖊🖊

लांजा :-
         निसर्गाच्या सानिध्यात वसलेले व मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे लांजा.तालुक्याचे केंद्र असलेल्या लांज्यातील शैक्षणिक सुविधांची गैरसोयीचे लक्षात घेऊन लांजा पंचक्रोशीतील ध्येयवेड्या शिक्षणप्रेमींनी सन १९४५ साली न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा या संस्थेची स्थापना करुन न्यू इंग्लिश स्कूल ,लांजा या प्रशालेची  निर्मिती केली.प्रशालेच्या स्थापनेपासून आजतागायत गेली ७२ वर्षांहून अधिक काळ बोर्ड परीक्षांच्या उत्तम निकालाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिलेल्या प्राधान्यामुळेच न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय ,लांजा ही रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीची प्रशाला बनली आहे.

 
   

         लांजा एस.टी.स्टॅण्डच्या जवळ व भॊगोलिक दृष्ट्या १६.७५ अंशावर स्थित असलेली ही प्रशाला लांजा तालुक्याच्या शिरपेचात कायमस्वरूपी कला,क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांत मानाचा तुरा रोवत उत्तम ,अत्याधुनिक सोयी- सुविधांनी व शिक्षणाची उज्वल परंपरा राखत डॊलाने उभी आहे.आजघडिला या प्रशालेच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक ( इयत्ता ०५ वी ते १२ वी) या तीन विभागात ४५ वर्ग असून त्यामध्ये अनुदानित २७ व विनाअनुदानित १८ तुकड्या असुन सन २०१८ - १९ या शैक्षणिक वर्षात २८७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यांचेकरिता कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली ७७ तज्ञ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचारी अविरत कार्यरत आहेत.
          जागतिकिकरणाच्या युगात भविष्यकालीन आव्हांनांना समर्थपणे तोंड देणारा विद्यार्थी तयार करणे हि एकविसाव्या शतकाची गरज ओळखून प्रशालेने प्रचलित शिक्षणाबरोबरच विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरतांना संगणक क्षेत्रांतही विद्यार्थ्यांने आवश्यक ते कॊशल्य प्राप्त करावे या हेतूने आय.सी.टी., ई- लर्निंग, कार्यानुभव अंतर्गत संगणक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे.त्याचबरोबर इयत्ता ०५ वी पासूनच सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्गही सुरु केले आहेत.विज्ञान विषयासाठी सुसज्ज अशा ०३ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून तज्ञ मार्गदर्शकांच्या निरीक्षणाखाली विद्यार्थी विज्ञानातील विविध प्रयोग हाताळीत विज्ञानकर्मी बनत आहेत.सुसज्ज कॅन्टीन, ग्रंथालय, रंगमंच,सुसज्ज मैदान,हि प्रशालेची वैशिष्ट्ये असुन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध शाळा - बाह्य उपक्रमांचे आयोजन करतानाच रंगतरंग सांस्कृतिक महोत्सव, एन.एम.एम.एस.,एन.टी .एस. सारख्या स्पर्धा परिक्षा ,चित्रकला ग्रेड परिक्षा, राज्यस्तरिय वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्य, करिअर मार्गदर्शन मेळावे,विज्ञान मेळावे,
क्रीडा स्पर्धा आदि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पुरक उपक्रम सातत्याने राबविले जातात.गतवर्षी प्रशालेच्या कु.तनुजा प्रभुदेसाई या विद्यार्थीनीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरिय अभिवादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविताना रोख रुपये २५,०००/- चे पारितोषिक प्राप्त केले,तर कु.आशुतोष पिसे या  विद्यार्थ्याने  एन.टी.एस्. परीक्षेत १०६ वा क्रमांक मिळवून शाळेच्या नावलॊकिकात भर टाकली आहे.
            शैक्षणिक विकासाचा विधायक दृष्टिकोन असलेले संचालक मंडळ, आदर्शवत शिक्षक- पालक संघ,भरिव सहकार्य करणा-या माजी विद्यार्थ्यांची मोठी संख्या, विद्यार्थी विकासासाठी तत्पर असलेल्या तज्ञ शिक्षक वर्ग यामुळे प्रशालेच्या प्रगतीचा आलेख उंचावत जात असुन न्यू इंग्लिश स्कूल लांजा या प्रशालेत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.प्रशालेने स्वत:चा ' विद्यार्थी अपघात सहाय्यता निधी' उभारला असुन गतवर्षी २१,००० एवढी वैद्यकीय मदत गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आली.दरवर्षी क्रीडा क्षेत्रात लांजा हायस्कूलचे क्रीडापटू खो- खो सह विविध मैदानी खेळात राज्यस्तरिय स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करित आहेत .
           न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा या  प्रशालेने  गत ७२ वर्षे तालुक्यातील जनतेच्या दर्जेदार, गुणवत्तापुर्ण ,नावीन्यपूर्ण, प्रयोगशील शिक्षणाच्या अपेक्षा पूर्ण केल्यानेच आज या प्रशालेचा वटवृक्ष झाला आहे. बदलत्या काळात लांजा तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक गरजांचा परिघ विस्तारत असतांना विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक अत्याधुनिक सुविधा पुरवितानाच इयत्ता अकरावी व बारावी च्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याध्यापक गणपत शिर्के सर यांनी दै.सागरच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

     विजय हटकर
       लांजा.