Wednesday, July 3, 2019

न्यू एज्युकेशन सोसायटी,लांजे संचलित, 

' न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा.'
🖊🖊📚📚📖📖🖊🖊

लांजा :-
         निसर्गाच्या सानिध्यात वसलेले व मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे लांजा.तालुक्याचे केंद्र असलेल्या लांज्यातील शैक्षणिक सुविधांची गैरसोयीचे लक्षात घेऊन लांजा पंचक्रोशीतील ध्येयवेड्या शिक्षणप्रेमींनी सन १९४५ साली न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा या संस्थेची स्थापना करुन न्यू इंग्लिश स्कूल ,लांजा या प्रशालेची  निर्मिती केली.प्रशालेच्या स्थापनेपासून आजतागायत गेली ७२ वर्षांहून अधिक काळ बोर्ड परीक्षांच्या उत्तम निकालाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिलेल्या प्राधान्यामुळेच न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय ,लांजा ही रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीची प्रशाला बनली आहे.

 
   

         लांजा एस.टी.स्टॅण्डच्या जवळ व भॊगोलिक दृष्ट्या १६.७५ अंशावर स्थित असलेली ही प्रशाला लांजा तालुक्याच्या शिरपेचात कायमस्वरूपी कला,क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांत मानाचा तुरा रोवत उत्तम ,अत्याधुनिक सोयी- सुविधांनी व शिक्षणाची उज्वल परंपरा राखत डॊलाने उभी आहे.आजघडिला या प्रशालेच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक ( इयत्ता ०५ वी ते १२ वी) या तीन विभागात ४५ वर्ग असून त्यामध्ये अनुदानित २७ व विनाअनुदानित १८ तुकड्या असुन सन २०१८ - १९ या शैक्षणिक वर्षात २८७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यांचेकरिता कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री गणपत शिर्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली ७७ तज्ञ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचारी अविरत कार्यरत आहेत.
          जागतिकिकरणाच्या युगात भविष्यकालीन आव्हांनांना समर्थपणे तोंड देणारा विद्यार्थी तयार करणे हि एकविसाव्या शतकाची गरज ओळखून प्रशालेने प्रचलित शिक्षणाबरोबरच विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरतांना संगणक क्षेत्रांतही विद्यार्थ्यांने आवश्यक ते कॊशल्य प्राप्त करावे या हेतूने आय.सी.टी., ई- लर्निंग, कार्यानुभव अंतर्गत संगणक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे.त्याचबरोबर इयत्ता ०५ वी पासूनच सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्गही सुरु केले आहेत.विज्ञान विषयासाठी सुसज्ज अशा ०३ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून तज्ञ मार्गदर्शकांच्या निरीक्षणाखाली विद्यार्थी विज्ञानातील विविध प्रयोग हाताळीत विज्ञानकर्मी बनत आहेत.सुसज्ज कॅन्टीन, ग्रंथालय, रंगमंच,सुसज्ज मैदान,हि प्रशालेची वैशिष्ट्ये असुन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध शाळा - बाह्य उपक्रमांचे आयोजन करतानाच रंगतरंग सांस्कृतिक महोत्सव, एन.एम.एम.एस.,एन.टी .एस. सारख्या स्पर्धा परिक्षा ,चित्रकला ग्रेड परिक्षा, राज्यस्तरिय वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्य, करिअर मार्गदर्शन मेळावे,विज्ञान मेळावे,
क्रीडा स्पर्धा आदि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पुरक उपक्रम सातत्याने राबविले जातात.गतवर्षी प्रशालेच्या कु.तनुजा प्रभुदेसाई या विद्यार्थीनीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरिय अभिवादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविताना रोख रुपये २५,०००/- चे पारितोषिक प्राप्त केले,तर कु.आशुतोष पिसे या  विद्यार्थ्याने  एन.टी.एस्. परीक्षेत १०६ वा क्रमांक मिळवून शाळेच्या नावलॊकिकात भर टाकली आहे.
            शैक्षणिक विकासाचा विधायक दृष्टिकोन असलेले संचालक मंडळ, आदर्शवत शिक्षक- पालक संघ,भरिव सहकार्य करणा-या माजी विद्यार्थ्यांची मोठी संख्या, विद्यार्थी विकासासाठी तत्पर असलेल्या तज्ञ शिक्षक वर्ग यामुळे प्रशालेच्या प्रगतीचा आलेख उंचावत जात असुन न्यू इंग्लिश स्कूल लांजा या प्रशालेत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.प्रशालेने स्वत:चा ' विद्यार्थी अपघात सहाय्यता निधी' उभारला असुन गतवर्षी २१,००० एवढी वैद्यकीय मदत गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आली.दरवर्षी क्रीडा क्षेत्रात लांजा हायस्कूलचे क्रीडापटू खो- खो सह विविध मैदानी खेळात राज्यस्तरिय स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करित आहेत .
           न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय,लांजा या  प्रशालेने  गत ७२ वर्षे तालुक्यातील जनतेच्या दर्जेदार, गुणवत्तापुर्ण ,नावीन्यपूर्ण, प्रयोगशील शिक्षणाच्या अपेक्षा पूर्ण केल्यानेच आज या प्रशालेचा वटवृक्ष झाला आहे. बदलत्या काळात लांजा तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक गरजांचा परिघ विस्तारत असतांना विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक अत्याधुनिक सुविधा पुरवितानाच इयत्ता अकरावी व बारावी च्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याध्यापक गणपत शिर्के सर यांनी दै.सागरच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

     विजय हटकर
       लांजा.

No comments:

Post a Comment