लेट पोस्ट -
अक्षरांच्या वारीतील अनोखा प्रवास.
रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी धामणवणे या चिपळूण तालुक्यातील छोट्याशा खेडेगावामध्ये मराठी साहित्यातील एक आगळं वेगळं असं 'बांधावरचे साहित्य संमेलन' साजरे झाले. या अनोख्या साहित्य संमेलनात दुपार सत्रात होणाऱ्या काव्य संमेलनात निमंत्रित कवि म्हणून निमंत्रित केल्याने सकाळी वाटूळचे कवि मित्र विराज चव्हाण व रत्नागिरी च्या सामाजिक कार्यकर्त्या- लेखिका श्रद्धा कळंबटे यांच्यासह साधारण ११:०० च्या दरम्यान धामणवणे गावातील साद मयुराची कृषी पर्यटन केंद्र या संमेलन स्थळी आम्ही पोहचलो.
पारंपारिक संमेलनांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्य सहवास अनुभवण्यासाठी साधारण २०० आस्थावान साहित्य रसिक या ठिकाणी उपस्थित होते. खरंतर एक . वेगळं वैशिष्ट्यपूर्ण संमेलन म्हणून माध्यमात आयोजकांनी या संमेलनाची जाहिरात केल्याने या साहित्य संमेलनाची उत्सुकता मनात अगोदरपासूनच होती. त्यात संमेलनाचे संयोजक संतोष गोनबरे यांनी माती,नाती आणि माणूस या विषयावर कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केल्याने माझ्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले होते. आम्ही कामथे - टेरव मार्गे ८ कि. मी. अंतरावर डोंगर माथ्यावरील धामणवणे गावात पोहचताना डोंगर माथ्यावरून पायथ्याशी वसलेल्या चिपळूण खेर्डीतील नागरीकरण गाडीतून पहात असताना बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराने लक्ष वेधून घेतले. या कमानीवर निमंत्रित कवी म्हणून माझा फोटो झळकत होता. हे पाहून खरं तर मी मनातुन सुखावलो पण त्यामुळे थोड़े दडपणही आले.
संमेलन स्थळी काजुच्या बागेत अनोखे असे बांधावर च्या संमेलनात निसर्गातील वस्तूंचा वापर करून दगड, पाने फुले यांनी नैसर्गिक सजावट करून एक वातावरण तयार करण्यात आयोजक यशस्वी झाले होते. हे लगेच लक्षात आले. प्रवेशव्दारापाशी संमेलनाच्या आयोजन समितीतील शिलेदारांचा बॅनर झळकत होता. तसेच बांधावरच्या संमेलनाच्या लोगोची आकर्षक सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती.काजूच्या झाडांच्या वनामध्ये बांधलेला दगड मातीचा बांधारा (व्यासपीठ), शेणामातीने सारवलेला परिसर... विविध ठिकाणी पाने, निसर्गातील वस्तूंवर कविता रेखाटून जागोजागी झाडांवर टांगलेल्या कविता...झाडाच्या फांदीला लाकडी पट्टी लाऊन आणि माईक बांधून छान बनविलेला लक्षवेधी पोडिअम...व जमलेले सर्व साहित्य रसिक शांत रमणीय वातावरण साहित्याचा आस्वाद घेत होते. हे सारचित्र एक मराठी माणूस म्हणून मनाला सुखावणारेच होते.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून चिपळूणचे प्रसिद्ध लेखक प्राध्या. सुहास बारटक्के यांची निवड करण्यात आली होती. संघाच्या दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वाटूळ येथे बारटक्के सरांना आम्ही अक्षररत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तेव्हापासून बारटक्के सरांशी स्नेहबंध जुळला होता. या निमित्ताने प्राध्या.बारटक्के सरांना ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली.आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले हे संमेलन अनोखे असून अनुकरणीय असून जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत. 'या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा,' असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक सुहास बारटक्के यांनी केले.श्री. बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे ते म्हणाले. बारटक्के सरांचे हे विचार मनोमन पटले.
डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या शुभ हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.आपल्या उद् घाटनीय भाषणात, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन करून नव्या रूपात त्याची बांधणी व्हायला हवी, कारण आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत व्यक्त करतानाच पटवर्धन यांनी चिपळूण एक सांस्कृतिक झाडीवरचे स्पंदन बनले आहे. इथल्या माणसाला साहित्य, कला, नाटक, संगीत या विषयाची नुसता रस नाही तर खोल आस्था आहे. ही आस्था त्यांच्या जगण्यामध्ये मिसळली आहे. असा हा सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये कुठून आला असेल हा प्रश्न पडतो तेव्हा लक्षात येते की वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून, व महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून हा डीएनए येतो. आपल्या चिपळूणकरांना सांस्कृतिक वारशाचे एक अदृश्य वरदान मिळाले आहे ते टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया असे आवाहन डॉ. पटवर्धन यांनी केले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात डोंबिवली चे प्रसिद्ध कवी विजय जोशी सर यांची कविता तंत्र आणि मंत्र या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजय जोशी यांनी काव्य निर्मितीवर सुंदर मार्गदर्शन केले. ज्या कवितेमधे काव्यगुण, आशय गुण नादलय गुण आहे अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कवीता लिहिल्या बरोबर फेसबक व्हॉटस् अप वर शेअर करण्याची घाई करतात हे चुकीचे आहे.जसे लोणचे मुरल्या नंतर चविष्ठ होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने झालेली कविता छान होते मग ती पोस्ट करा.कविता व्याकरण दृष्टया, आशय दृष्ट्या योग्य आहे का तपासा. यासाठी मो. रा. वाळांबे यांचे
सुलभ मराठी व्याकरण हे पुस्तक वापरावे.कविता जखमेलन, वेदनूतून निर्माण होते. विजो यांनी कविता निर्मिती वेळी मात्रांचे महत्व समजावून सांगितले. यानंतर झालेल्या भोजन सत्रात बांधावरच्या खाद्य संस्कृतीची झलक होती. झुणका भाकर (ज्वारी/बाजरी / तांदूळ/ नाचणी यांची भाकरी), खारातील मिरची, तांदुळाची खीर, वरण-भात... तर नास्त्याला केळीच्या पानात घावने-चटणी(शाकाहारी)... असा तिथला ग्रामीण बेत होता. बांधावरचा या भोजनाचा सर्वांनीच आस्वाद घेतला.
दुपारी भोजनानंतर काही स्थानिक साहित्यिकांनी तिथल्या बोलीभाषेत सादर केलेल्या कविता, गाणी, गीते यांचा आस्वाद घेता आला.त्यानंतर ज्येष्ठ लेखक, कथाकार, प्रकाशक, व्याख्याते श्री.सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली 'कथाकथन' हे सत्र संपन्न झाले. यानंतर सायंकाळी ज्येष्ठ कवी श्री.अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निमंत्रित कवींचे 'कविसंमेलनाची घोषणा होताच इतर निमंत्रित करून सोबत मी देखील टेबल खूर्ची यांना फाटा देऊन तयार केलेल्या मंचावर जाऊन बसलो.बांधावरच्या या मंचावर गाद्या टाकलेल्या होत्या. मध्यभागी सुप्रसिद्ध कवि अरुण म्हात्रे बसले होते. या सत्राचे सुरेख सूत्रसंचालन दापोली येथील गझलकार श्री.कैलास गांधी यांनी केले. मला वाटले की सर्वजण माती नाती अन माणूस या विषयावरच कविता सादर करतील पण काहींनी आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कविता सादर केल्या. मी मात्र माती, नाती अन माणूस या विषयावर मला सुचलेली स्फुरलेली कविता सादर केली. अनेकांनी कवितेचे कौतुकही केले.र समोर काजूच्या झाडांच्या सावलीत बसलेले रसिक प्रत्येक कवितेला दाद देत होते.म्हात्रे आणि गांधी यांची काव्य 'नोकझोक' यामुळे काव्यसंमेलनाची रंगत अधिक वाढली.माझ्यासह मुझफ्फर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेघा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी सर्वांच्याच ग्रामीण, शहरी व प्रेम कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासून कौतुक केले. यावेळी डॉ. चोरगे म्हणाले, 'बांधावरचे साहित्य संमेलन ही संकल्पनाच अत्यंत उत्कृष्ट आहे. शेतकऱ्याच्या शेतावर जायचे, तिथल्या वातावरणात साहित्यिकांनी रमायचं, तिथली पीकं पाहायची, तिथल्या मातीचा सुगंध अनुभवून ती कपाळाला लावून भूमातेचा आशीर्वाद घ्यायचा, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ वाणी यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या संबंधित साहित्यावर भाष्य करायचे. शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यावर चर्चा करायची. शेतकरी कसा राहातो? काम कसे करतो? बोलतो कसा? ते अनुभवायचे. शेतकऱ्याच्या बांधावरून शेती पाहताना पीकं डोलताना, पाहताना, बांधावरून एखादी नदी अगर नाला जवळून पाहताना स्वर्ग सुख अनुभवल्याचा भास होतो. हे शेतावर गेल्यावरच कळते.' असे चोरगे यांनी सांगितले. सुभाष लाड म्हणाले, 'धामणवणे गावातील 'साद मयुराची' या शिवारात आयोजित केलेले बांधावरचे साहित्य संमेलन हे अभिनव आहेच पण ते आवश्यकही आहे. या बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. माझे अर्ध आयुष्य बांधावरच गेलं आहे त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याची संधी मला इथे मिळाली.'
'संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या 'शाकाहारी मोंगा-पोपटीचा' आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाचे संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः प्राची जोशी, धीरज वाटेकर, सोनाली खर्चे, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे, संध्या आठल्ये, विनायक ओक, स्नेहिल जोशी, स्नेहल कुलकर्णी, संध्या साठे, अभिजीत देशमाने, आदी समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना बारटक्के कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे हे संमेलन सुंदर सुनियोजित सुफल संपन्न झाले.केले.संपूर्ण दिवसभर एक कार्यकर्ता सर्व उपस्थितांना बसल्याजागी थंडगार पाणी देण्याचे काम न थकता करीत होता, याचे विशेष कौतुक करावेसे वाटते. संमेलनाचे नाव छापलेल्या तागाच्या मजबूत पिशव्या उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आल्या.त्यामुळे अगदी घरगुती ग्रामीण, कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने दिवसभर संपन्न झालेला हा साहित्य सोहळा म माझ्यासह उपस्थितांच्या मनात भरून राहिला.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
विजय अरविंद हटकर.
लांजा - रत्नागिरी.
चलभाष क्रमांक - 8806635917
( लेखक कोकणातील साहित्य,ग्रंथालय, शिक्षण, पत्रकारीता, पर्यावरण क्षेत्रात गत दोन दशके कार्यरत आहेत.)















No comments:
Post a Comment