अनंताच्या वारीला मार्गस्थ अनंतराव…
जीवनाच्या प्रवासात काही व्यक्ती आपल्या कार्यामुळे मोठ्या ठरतात, तर काही आपल्या माणुसकीमुळे. लांजा शहरातील ज्येष्ठ उद्योजक, समाजसेवक आणि साळवी इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा अनंतराव (अनंतशेठ) साळवी हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने लांजा शहराने केवळ एक यशस्वी उद्योजक गमावलेला नाही, तर एक प्रेमळ, दिलखुलास, मनमिळाऊ आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
बुधवारी सकाळी त्यांच निधन झालं आणि अचानक त्यांच्या आठवणी, त्यांच व्यक्तिमत्व, त्यांनी शून्यातून उभ केलेल त्यांच साम्राज्य सर्व डोळ्यासमोर उभ राहील.. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं व्यक्तिमत्व सफेद पॅन्ट, सफेद हाफ शर्ट, शर्टच वरच बटन उघड, झुपकेदार मिशी, निळ्या कलरची जीप आणि दिलखुलास हसणं अशी त्यांची ओळख.. लहान, तरुण, वयस्कर अशा सर्वांसोबत त्यांची मैत्री आणि तसंच त्यांच्यासोबत कोणतंही बंधन न ठेवता वागणं असा त्यांचा स्वभाव सर्वांनांच हवा हवासा वाटायचा.पू.ल.देशपांडे यांनी शेठच्या सानिध्यात जर चार दिवस
अनंतरावांनी आपल्या कष्टाच्या बळावर लांज्यात वेल्डिंग व्यवसाय सुरू केला. त्या काळात कमी खर्चात आणि दर्जेदार कामाची सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी अनेकांच्या विश्वासास पात्र ठरले. व्यवसाय हा केवळ नफा कमावण्याचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम असू शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.आजही लांजा आणि लांजा तालुक्यातील ७० ते ८० टक्के घरात साळवी इंजिनिअर यांनी केलेली कामे केलेली दिसून येतील. नवीन नवीन डिजाईन असतील किंवा कमी खर्चात एखाद्याच काम करायच असेल तर त्यांनी करून दिलेलं आहे प्रसंगी एखाद्या गरीबाचे पैसे न घेता पण काम करून दिलेलं आहे.अनेक शाळा, सभागृहे, मंदिरांमधील कामे त्यांनी कोणतेही मानधन न घेता करून दिली. समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. लांजा तालुक्यातील रिंगणे गावातील हनुमान मंदिराच्या मागे नावेरी नदीच्या दुसऱ्या काठावरील सुतार वाडीत जाण्यासाठी अनंतशेठ यांनी नदीवर उभारलेल्या लोखंडी पुलाला (साकवाला ) आज ४० वर्षे होऊन गेली. तरीही तो पूल मजबूत अवस्थेत उभा आहे. अशी त्यांनी उभारलेली असंख्य दर्जेदार बांधकामे त्यांचे प्रतिक म्हणून ठिकठिकाणी डौलाने उभी आहेत.
लांजा शहराच्या जडणघडणीत अनंतरावांचा मोलाचा वाटा होता. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये ते सक्रियपणे कार्यरत होते. लांजा तालुक्यातील कुंभार समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी यश संपादन केले; परंतु त्या यशाचा गर्व त्यांच्या स्वभावाला कधीच स्पर्श करू शकला नाही. साधेपणा, विनम्रता आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागण्याची त्यांची शैली प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून गेली. भगवंताने दृष्टी ही सृष्टी पहायला दिली आहे असे त्यांचे ठाम मत असल्याने लांज्यातील विविध ग्रुपसोबतीने देशभरातील असंख्य पर्यटनस्थळांची भटकंती त्यांनी केली. लांजा हायस्कूल समोरील बाळशेठ चव्हाणांचे दुकान म्हणजे कै.काका डोर्ले मंडळातील सदस्यांची हक्काची जागा. अनंतशेठ बाजारपेठेत आले की बाळशेठ चव्हाण यांच्या दुकानात त्यांची मित्रमंडळीं समवेत
मैफिल रंगायची. अनंतशेठ यांच्या मुखातून अनेक किस्से ऐकायला मजा यायची. त्यांचे दुसरे ठिकाण म्हणजे संजय बुटाला यांचा छाया फोटो स्टुडिओ.या स्टुडिओ च्या लाकडी जिन्याने चढून वर गेल्यावर तास दिडतास त्यांची गप्पांची बैठक रंगायची. कै.संजय बुटाला यांचे चिरंजीव विनय याच्याशी देखील त्यांची खास मैत्री. विनयच्या मुखातून अनंतशेठ यांच्या शिकारीच्या प्रेमाचे अनेक किस्से मी ऐकले आहेत. शिकारीच्या छंदामुळे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील विविध संस्थानांच्या राजा महाराजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध.
अनंतशेठ म्हणजे तरुणांसाठी प्रेरणास्थान. त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा आणि प्रेमळ स्वभावाचा लाभ अनेकांना झाला. ते स्पष्टवक्ते होते, परंतु त्यांच्या स्पष्टवक्तेपणामागे नितळ प्रामाणिकपणा आणि मायेचा ओलावा होता. वरून फणसासारखे कठोर वाटणारे, पण आतून गोड गऱ्यासारखे प्रेमळ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भावत असे. त्यांनी आयुष्यभर माणसे जोडली, नाती जपली आणि आनंद वाटत राहिले.घालवले असते तर नक्कीच त्यांच्या व्यक्ति आणि वल्ली मध्ये अनंतशेठ बद्दल, त्यांच्या पाहुणचार, आदरातिथ्याबद्दल, शेठच्या व्यक्तिमत्वाबद्दल हमखास एखादा लेख लिहिला असता यात शंकाच नाही.
त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर हा त्यांच्या लोकप्रियतेचा आणि समाजाशी असलेल्या अतूट नात्याचा जिवंत पुरावा होता. समाजातील प्रत्येक स्तरातील लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. हे दृश्य त्यांच्या आयुष्यभराच्या निस्वार्थ सेवेला मिळालेली खरी मानवंदना होती.अनंतरावांच्या जाण्याने लांजा तालुक्याच्या सामाजिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी केलेले कार्य, जपलेली माणुसकी आणि दिलेला प्रेमाचा वारसा कायम स्मरणात राहील.आज त्यांच्या अंतयात्रेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना,अनेक जणांनी आज अनंतराव अनंताच्या वारीला मार्गस्थ झाले असले, तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांचा माणुसकीचा सुगंध लांजाच्या प्रत्येक मनात सदैव दरवळत राहील. असे विचार व्यक्त करित त्यांना शब्द सुमनांजली वाहिली. आज लांजावासीयांचा काळीजकोपरा व्यापणारे, आनंदाच्या साखर क्षणांची पेरणी करणारा अनंतरावांसारखा भला पांथस्थ अनंताच्या वारीला आनंदात निघून गेला मात्र लांजावासीयांच्या हृदयात कायमचे विराजमान होऊन!
*अनंतशेठ साळवी आपल्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!भावपूर्ण श्रद्धांजली!*
*“जोडलीत माणसं, जपलात माणुसकीचा धर्म,
तुमच्या स्मृतींचा सुगंध राहील कायम सर्वांच्या मनामनांत.
विठ्ठल चरणी तुम्हाला सद्गती लाभो,
हीच भावपूर्ण प्रार्थना.”*
💐💐💐💐💐💐
विजय हटकर.

No comments:
Post a Comment