रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे कोकणातील मूळ घर अखेर प्रकाशात.
गोविळ गावाला ऐतिहासिक ओळख
लांजा : अपरांत न्यूझ
मराठ्यांच्या इतिहासाचे अजरामर दस्तऐवजीकरण करणारे आणि "रियासतकार" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे मूळ जन्मघर अखेर प्रकाशात आले असून, लांजा तालुक्यातील गोविळ गावातील ही ऐतिहासिक वास्तू शोधण्यात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेला यश आले आहे. त्यामुळे कोकणातील इतिहासप्रेमी आणि संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी अपरांत न्यूझ च्या प्रतिनिधीना ही माहिती दिली.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था कोकणातील अशा व्यक्तींचा शोध घेऊन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांचे चरित्र लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत असते. प्रभानवल्लीचे सुपुत्र ज्येष्ठ समीक्षक वि.शं. चौगुले असतील, प्रभानवल्लीची ऐतिहासिक गढी असेल, कोटगावची स्नुषा राणी लक्ष्मीबाई, नाटे येथील यशवंतगड, राजापूर तळवडे चे सुपुत्र पितांबरीकार रवींद्र प्रभूदेसाई, रिंगणे गावचे सुपुत्र नाटककार ला.कृ.आयरे, वाटुळ गावचे सुपुत्र सु.ग.शवडे गुरुजी, लांजा तळवडे गावचे सुपुत्र सुवर्णकार जगन्नाथ गंगाराम पेडणेकर आणि शिपोशी गावचे सुपुत्र असलेले थोर क्रांतिकारक आठल्ये, रत्नागिरीत पहिला छापखाना सुरू करणारे जनूभाऊ आठल्ये, १८८६ मध्ये कोचीनहून 'केरळ कोकीळ' मासिक काढणारे कृष्णाजी नारायण आठल्ये, न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये, यांच्याच बरोबर शिपोशीत शिक्षण घेतलेले रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर अशांचा त्या त्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात स्मृती जागर करण्यात आला. हि माती किती पवित्र आणि सकस आहे हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. यानिमित्ताने त्यांची माहिती गोळा करणे, त्यांचे मूळ निवासस्थान शोधणे,शक्य झाल्यास त्यांचे स्मारक उभारणे हा संघाचा उपक्रम आहे.
शिपोशी गावात पार पडलेल्या संमेलनात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची माहिती देण्यात आली.मात्र त्यांचा ज्या गावात जन्म झाला त्या गावातील त्यांच्या घराचा मात्र शोध संघाला घेता आला नव्हता. मात्र पुढे ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला संघ अध्यक्ष श्री लाड सर सरदेसाई यांच्या मूळ घराविषयी बोलत आले. लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य हर्दखळे या गावाचं गीत तयार करताना त्या गावातील अनेक लोकांशी लाड यांचा संपर्क झाला. शिक्षक असलेल्या महेश गुरव यांनी श्री लाड सर यांना आपल्या घरी जेवावयास बोलावले त्या वेळेला 'आपण गोविळ गावात शिक्षक आहोत' असे सांगितले तेव्हा त्यांनी रियासतकार गो.स.सरदेसाई यांच्या बद्दलची माहिती विचारली असता त्यांनी मी शोध घेऊन सांगतो असे सांगितले होते.
वाडयाचे विद्यमान मालक श्री. विलास सुर्वे.
सध्या भारताच्या जनगणनेचे काम सुरू असून स्थानिक शिक्षक ते काम करीत आहेत. महेश गुरव गुरुजींना गोविळ गावातच काम करताना मुळवाडी मध्ये वस्तीपासून थोडे दूर , डोंगरात एका बाजूला झाडांनी वेढलेले पण गावातल्या घरांपेक्षा वेगळा ठेवण्याचे चौसोपी आणि माडीचे घर बघितल्यानंतर त्याने घर मालक असलेल्या विलास सुर्वे यांना त्याबद्दलची विचारणा केली. त्यावेळी विलास सुर्वे यांनी हे घर आपल्या वडिलांनी १९४५ मध्ये सरदेसाई यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. गोविळ येथे कार्यरत असलेले शिक्षक महेश गुरव यांनी जनगणनेच्या कामादरम्यान गावातील मुळवाडी परिसरात असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण चौसोपी वाड्यासदृश वास्तू रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या मालकीची होती हे कळल्यावर तात्काळ ही माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांना दिली,त्यानंतर श्री लाड यांनी महेश गुरव, जयराज मांडवकर आणि महेंद्र साळवी या सहकाऱ्यांसह या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या ऐतिहासिक वास्तूची पाहणी केली.
रियासतकार गो. स. सरदेसाई.
सुमारे दीडशे वर्षांहून अधिक जुना असलेला हा वाडा आजही मूळ स्वरूपात उभा असून, त्यातील लाकडी बांधकाम, प्रशस्त राजांगण, माडी आणि पारंपरिक कोकणी स्थापत्यशैली इतिहासाची साक्ष देताना दिसते.१७ मे १८६५ रोजी याच वाड्यात गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म झाला होता.प्राथमिक शिक्षण शिपोशीत या गावी तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीत झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये १८८८ मध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी प्राप्त केली. १८८९ ते १९२५ या काळात बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या काळी ‘रिडर’ म्हणून आणि युवराजांचे ‘ट्यूटर’ म्हणून त्यांनी काम पाहिले. या कामासाठी वेळोवेळी काढलेल्या टिपणातून ‘रियासती’चा जन्म झाला. १८९८ मध्ये त्यांनी मुसलमानी रियासत प्रसिद्ध केली. हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, मराठी रियासत आणि ब्रिटिश रियासत असा १००० ते १८५८ पर्यंतचा सर्व इतिहास अभ्यासून लिहून काढल्यामुळे ते ‘रियासतकार सरदेसाई’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
सयाजीराव गायकवाड महाराजांबरोबर त्यांनी संपूर्ण भारत, युरोप आणि इंग्लंडचा अनेकवेळा प्रवास केला. त्यातून जगातील लोकरीती, समाज, इतिहास, स्थानिक परंपरा आणि मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास त्यांना करता आला. आधीच बुद्धिमान, शिस्तप्रिय व अचूक विचार असल्यामुळे त्यात प्रगल्भता आली. स्वभावातील चिकाटी, अथक परिश्रम करायची तयारी आणि इतिहासाच्या अभ्यासाची आवड या सर्व तपश्चर्येतून आणि इतिहासाच्या समग्र आणि साधार लेखनातून रियासती लिहिण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडले.‘न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज’, ‘मेन करंट्स ऑफ मराठा हिस्ट्री’, ‘पेशवे दप्तर’, ‘पुणा रेसिडेन्सी कॉरस्पाँडन्स’ असे संशोधित आणि संपादित एकंदर एकशेपाच ग्रंथ आणि २७५ लेख त्यांनी लिहिले आहेत. वयाच्या ९४ व्या वर्षी निधन होईपर्यंत ते सतत कार्यमग्न होते. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.भारतीय इतिहासलेखनात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
रियासतकारांच्या कोकणातील मूळ घराच्या या शोधामुळे लांजा तालुक्यातील गोविळ गावाला ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रियासतकारांचे कामशेत, पुणे येथे राहणारे पणतू श्री. जगदिश सरदेसाई यांनी या वास्तूचा शोध लागल्याचे वृत्त कळताच आनंद व्यक्त केला असून, या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.कोकणच्या सुपुत्राचा हा ऐतिहासिक ठेवा आता नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, गोविळ गावाचे नाव इतिहासाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उमटणार आहे.



No comments:
Post a Comment