Sunday, April 21, 2024

धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.

 धार्मिक ,सांस्कृतिक एकतेचे प्रतिक -कारदग्याचे ग्रामदैवत श्री बंगाली बाबा.



 एखाद्या गावाचे ग्रामदैवत एखादी पीर बाबाची दरगाह आहे असे सांगितल्यास आपला विश्र्वास बसणार नाही.मात्र महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील चिक्कोडी तालुक्यातील कारदगा गावात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला एक दर्गा असुन या दर्ग्यातील पीर श्री बंगाली बाबा हे करदगा गावक-यांचे मुख्य ग्रामदैवत आहे. वाटले ना आश्चर्य ? मला देखील काल कोल्हापुर हुन बेडकीहाळ ला जाताना वाटेत लागणा-या कारदगा गावात प्रवेश करताच एका वळणावर असलेल्या या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरील पाटिवरील मोठ्या अक्षरातील नाव वाचताच असेच आश्चर्य वाटले. 

       इतिहासाची आवड असल्याने अधिक माहिती घेण्यासाठी सारथ्य करणा-या प्रणवला लगेच गाडी कारदगा गावच्या या ग्रामदैवत बंगाली बाबाच्या दर्गा परिसरात घेण्यास सांगितले. दोन दिवसापुर्वीच उरुस झाल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झालेल्या खुणा दर्गा परिसरात जागोजागी जाणवत होत्या. उरुस झाल्यानंतरही थांबलेले काही व्यापारी आपल्या मालाची आवरआवर करीत होते. या परिसरातील जीवनदायिनी दुधगंगेच्या काठावर वसलेल्या ग्रामदैवत श्री बंगाली बाबाच्या या दर्ग्याची बाहेरिल तटबंदी एखाद्या छोटेखानी किल्लासारखी लांबुन भासत होती. प्रवेशद्वारापाशी आसलेल्या सहा-सात पाय-या पार करुन आत जाताच मध्यभागी असलेली पीर श्री बंगाली बाबाची मोठी कबर लक्ष वेधुन घेत होती.कबरी वरिल भगव्या रंगाची स्वस्तिक चिन्ह असलेली चादर (शाल) मनात असंख्य प्रश्नांची मालिका तयार करीत होती.ते प्रश्न तात्पुरते बाजूला ठेवत मनोभावे बंगाली बाबाचे लहानग्या विधीसह दर्शन घेतले.कबरीपाशी बसलेला मुजावराला बोलते करताच करदगा परिसरात आपल्या गूढ विद्यने लोकांना आपलेसे करणा-या बंगाली बाबाच्या मौखिक कथांविषयी तो मुजावर भरभरुन बोलु लागला.



कबरीच्या उजव्या बाजुला मशिदीला ज्याप्रमाणे मिनार असतात त्याप्रमाणे तीन मिनार असणारी सफेद रंगाची आकर्षक इदगाह ( भिंत) आहे.या भिंतीला पाच अंतर्वक्र महिराब आहेत. मुस्लिम बांधव ईदची नमाज ज्या ठिकाणी पढतात त्या नियोजित जागेला ईदगाह असे म्हणतात अशी ईदगाहची साधी सोपी व्याख्या करता येईल.पीर बंगाली बाबाच्या कबरीजवळील हि ईदगाह खुपच सुरेख आहे.



याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबाच्या कबरीच्या बरोबर पाठीमागे मध्यभागी निरंतर तेवणारा एक नंदादीप असुन याची रचना आयताकृती सहा सात फूट उंच एखाद्या दिपमाळेसारखी अाहे.याला गणपतीचे चित्र असलेली एक फरशी असुन इथे येणारे हिंदू-मुस्लिम भाविक या दगडी  नंदादिपात तेल ओततात.हा नंदादीप अखंड तेवत असतो.बंगाली बाबाच्या कबरीजवळ असणारी ईदगाह व नंदादिप हि प्रतिके इथल्या हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक आहेत. मनाला आत्मिक समाधान देणा-या या पवित्र जागेवर आजची वाढलेली सामाजिक,धार्मिक द्वेषाची दरी कमी होऊ देत आणि भारतीयत्वाची भावना प्रबळ हॊऊ देत हि मनोभावे प्रार्थना केली.


खरं तर कोल्हापुर पासुन जवळ कर्नाटकातील करदगा हे एक निसर्गरम्य छोटेसे गाव.दुधगंगा नदीच्या खो-यामुळे इथे समृद्धता आली आहे.इथला सारा परिसर ऊस,मका,शाळू, तंबाखुच्या पिकांनी हिरवागार दिसतो.गावातील वस्ती जवळपास पाच सहा हजारापेक्षा जास्त असुन विविध धर्माची लोक गुणागोविंदाने नांदत असलेल्या या गावात कधीकाळी बंगाली बाबांचे वास्तव्य होते. शेकडो वर्षापुर्वी इथे वास्तव्याला असणा-या बंगाली बाबा या सुफी पीरबाबाने अापल्या यौगिक शक्तिने इथल्या लोकांचे दु:खाचे निराकरण केले.लोकांना भक्तिमार्ग दाखविला.येणा-या संकटातून मार्ग कसा काढायचा याची शिकवण दिली.व्याधीग्रस्त लोकांना अंगारा,ऊदी देऊन व्याधिमुक्त केले.सहीष्णुतेची,मानवता धर्माची शिकवण देणा-या या बंगाली बाबाच्या महानिर्वाणानंतर गावक-यांनि दुधगंगेच्या काठावरच त्यांचा दफनविधि केला.बंगाली बाबाच्या महात्म्यामुळेच गावकरी तेव्हापासुन या पवित्र कबरीपाशी बाबांचा ऊरूस साजरा करित आहेत. करदग्यातील या ग्रामदैवताचे अर्थात बंगाली बाबाच्या दर्ग्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंगाली बाबांची कबर वरुन मोकळी (उघडी) असून या ठिकाणी कोणतेही बांधकाम नाही.


    


         दर्ग्याच्या पाठिमागे असलेल्या दुधगंगा नदीवर काळ्या पत्थरांचा घाट बांधला असुन या घाटावर उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या संख्येने गावातील.मुले युवा मंडळी आंघोळ करतात.आम्हि जेव्हा या ठिकाणी गेलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते व घाटावर जवळपास तीस-चाळीस मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत होती.ते दृश्य आम्हाला आमच्या सुखद बालपणाची आठवण करून देत होते.

कारदगा गावात एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध सत्पुरुष सद्गुरु श्री जंगली महाराज यांचे चार -पाच वर्षे वास्तव्य होते. सद्गुरू श्री जंगली महाराज यांचा जन्म साधारणपणे १८१० सालचा मानला जातो. ते बालपणापासून एकपाठी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. पुढील काळात त्यांनी पर्शियन, उर्दू, कानडी, संस्कृत, मराठी या भाषा आणि सर्व धर्मांतल्या ग्रंथांचा अभ्यास केला. विविध गुरूंचे मार्गदर्शन घेऊन मल्लविद्या, मंत्रशास्त्र, नाथपंथीय साधना, हठयोग, राजयोग यांतही ते प्रवीण झाले. यामुळे समोर कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा माणूस आला, तरी ते त्याच्या धर्मग्रंथातील वचनांचा आधार देऊन त्याला सन्मार्गाचा उपदेश करीत, उपासना सांगत व संकटमुक्तही करीत. सिद्धीच्या बळावर त्यांनी अनेक चमत्कारही करून दाखवले. पुढे सर्वसंगपरित्याग करून महाराज जनकल्याणार्थ बाहेर पडले. भिक्षाटन करताना महाराजांनी सर्व धर्मांच्या लोकांना सन्मार्गाचा उपदेश, दु:खनिवारण, तेथील मंदिरे, मशिदी वा देवस्थाने यांचा जीर्णोद्धार करणे ही कार्ये सुरू केली. यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली.दक्षिणेच्या रूपात समोर आलेल्या सर्व गोष्टी ते गरजूंना वाटून, मोठा भंडारा घालून पुढील गावी जात. या फिरस्तीत महाराजांनी जमखिंडीजवळील कुडची या गावच्या माँसाहेब दर्ग्याच्या परिसरातील सर्व देवळे, समाध्या, वृंदावने यांचा कायापालट केला. दर्शनास आलेल्या जमखिंडी व मिरज येथील संस्थानिकांस कृपांकित करून महाराजांनी शिष्य परिवारासह नरसोबाच्या वाडीस प्रयाण केले. नंतर त्यांनी आपला मुक्काम हुपरीजवळच्या कारदगा या गावी हलवला. महाराजांच्या वास्तव्याच्या ४-५ वर्षांच्या काळात इथल्या ग्रामदैवत श्री ‘बंगालीबाबा’ समाधीचे नूतनीकरण त्यांनी केले तसेच दूधगंगा नदीवरील प्रशस्त घाट व मठाचे बांधकाम यांबरोबरच जवळपासच्या छोट्या-मोठ्या देवस्थानांचा जीर्णोद्धारही केला.

कारदगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या साहित्य विकास मंडळातर्फे सातत्यपुर्वक आयोजित केले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होय.दरवर्षी जानेवारी,फेब्रुवारी ,मार्च महिन्यात बेळगाव सीमावर्ती भागात मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते.बेळगाव तालुक्यात कडोली, उचगाव ,बेळगुंदी,निलजी कुद्रेमनी व सांबरा या गावांमध्ये त्याचप्रमाणे माचीगड(ता.खानापुर), शेट्टीहळ्ळी(ता.चिकोडी) आणि कारदगा (ता.हुक्केरी) याठिकाणी गेल्या चार दशकांपासुन मराठी साहित्य समेलनांचे आयोजन करण्यात येते.कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचा प्राबल्य असलेला बेळगाव जिल्हा आज जरी कर्नाटकात असला तरिहि इथली मराठि संस्कृती व महाराष्ट्राशी असलेली नाळ कायम ठेवण्याचे काम ही साहित्य संमेलन करतात.कारदगा येथे होणा-या या अक्षरसोहळ्यात मराठी भाषेतील दिग्गज साहित्यकांची उपस्थिती लाभली आहे.संजय आवटे,रा.रं.बोराडे,डाॅ.श्रीपाद सबनीस,राजन खान,डाॅ.आ.ह.साळुंखे,विठ्ठल वाघ,वामन होवाळ,डाॅ.राजेंद्र कुंभार,मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर साहित्यिक कारदगा संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणुन लाभले आहेत.या संमेलनाचे आणखी एक विशेष म्हणजे मराठीसह कन्नड आणि उर्दू भाषिक लोकही यात सहभागी होतात.


   कारदगा गावातील सुपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला असून कारदग्याचे स्वातंत्र्यसैनिक अनंत भगवंत कुलकर्णी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान महत्वपुर्ण असुन गावात त्यांच्याविषयी आदरभाव आजही कायम आहे.लोकसेवा अायोगाच्या परिक्षेत ९० वी रॅक मिळवुन सध्या पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकारी असणारे प्रसिद्ध आय.ए.एस.अधिकारी अभिजित शेवाळे कारदगा गावचे सुपुत्र. साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय,सामाजिक क्षेत्रात या गावातील अनेक सुपुत्र या सकस भूमीचे नाव आपल्या कर्तृत्वाने आज उंचावत आहेत.


    महाराष्ट्र -कर्नाटकच्या सीमावर्ती भागात करदगा सारख्या अजुन काही गावात असेच काही सुफी साधु वा बाबा आले व त्यांनी त्या -त्या भागात भरिव असे कार्य केल्याने त्यांना ग्रामदैवतांचा दर्जा मिळालेला दिसतो.यामध्ये सदलगा येथे शमनामीर बाबा व चाँद शिरदवाड गावातील चाँदशहा बाबा या बाबानांही त्या त्या गावात ग्रामदेवतेचा दर्जा मिळालेला पहायला मिळतो.बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावात धार्मिक सलोख्याची परंपरा जपणारी ही सुफी संत वा बाबांची स्थाने या परिसराची एक महत्वपूर्ण ओळख असून इथल्या जनमानसात त्यांचा दिसणारा प्रभाव हजारो वर्षापासुन या भूमीत विविध धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदल्याचा प्रत्यय देणारा अाहे.सीमावर्ती भागातील या अनोख्या धार्मिक सलोखा जपणा-या बाबांविषयी अधिक सखोल अध्ययन झाले तर इथली अनेक वर्षापासुन दडलेली वैशिष्ट्ये उलगडण्यास मदत करतील.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

विजय हटकर.

पत्रकार।लेखक।संपादक


क्षणचित्रे :-


ग्रामदैवत बंंगाली बाबाचे प्रवेशद्वार.


छोट्या किल्ल्यासारखी दिसणारी तटबंदी.



संदर्भ :- 
 1) https://maharashtranayak.in/jangalai-mahaaraaja

2) बंगाली बाबा पीराचे मुजावर यांची मुलाखत

3) https://iyemarathichiyenagari.com/karadga-gramin-marathi-sahitya-samhelan-on-26-november/







No comments:

Post a Comment