Tuesday, March 19, 2024

व्रतस्थ अध्यापकाची सेवानिवृत्ती...

 व्रतस्थ अध्यापकाची सेवानिवृत्ती...





         कोकणात १९८०-९० च्या दशकात गावाच्या विकासाची दुरदृष्टी असलेल्या शैक्षणिक समाजधुरीणांनी उद्याच्या निपुण पिढीसाठी गावागावात माध्यमिक विद्यालयांची मुहूर्तमेढ रोवली. पाच -सहा गावांमध्ये असलेल्या एखाद्या मोठ्या गावात दहावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था झाल्याने त्या -त्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची निदान दहावी -बारावी पर्यंतची व्यवस्था झाली. या काळात पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार चांगला झाला असल्याने तिथले उच्चशिक्षण घेतलेले तरुण कोकणातील शिक्षणसंस्थामध्ये प्रतिकुल परिस्थितितही शिक्षक म्हणुन सेवा बजावु लागले. कोकणातील खडतर परिस्थितीत  कसरत करित शिक्षण घेतलेले काही शिक्षित तरुणही शिक्षक म्हणु शिक्षण क्षेत्रात पदार्पण करण्याचा तो काळ होता.नुकतेच १९८६ चे शैक्षणिक धोरण जाहिर झाल्याने सर्व शिक्षण स्तरांची पुनर्रचना,मुलींच्या शिक्षणावर भर,खडु-फळा मोहिम,शिक्षणाची समान संधी ,सक्तिचे प्राथमिक शिक्षण या गोष्टिंवर भर देण्यात आला. याचा लाभ कोकणातील माध्यमिक विद्यालयांना झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मुंबई गाठणा-या तरुणाईला आवश्यक असलेली किमान  कौशल्ये शिकविणा-या या शाळा महत्वपूर्ण ठरु लागल्या.याच काळात संगमेश्र्वर तालुक्यातील निसर्गरम्य सोनवडे गावातील विज्ञान विषयातील पदवीधर अभ्यासु तरुण प्रभाकर तुकाराम सनगरे सर ०७ जुलै १९९२ ला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय ,तळवडे, ता.लांजा येथे विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणुन रूजू झाले


     साधारण पाच फूट उंची,निमगोरा वर्ण,चेह-यावर सदोदित हास्याची झालर ,प्रसन्न व सकारात्मक देहबोलीतील सनगरे सर 'मूर्ती लहान पण किर्ती महान ' या उक्तिला अनुसरुन अध्यापन करु लागले.जीव ओतून ते शिकवित असल्याने त्यांच्या विज्ञानाच्या तासांची,प्रयोगांची मुलांना ओढ लागत असे.छोटी-छोटी विज्ञानविषयक पुस्तके मुलांना देऊन त्यांनी वाचायला प्रोत्साहन दिले.यातून विज्ञानाचे विरहस्यीकरण त्यांनी केले.त्यामुळेच तालुका,जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पेडणेकर प्रशालेच्या प्रतिकृती झळकु लागल्या.या प्रतिकृतींचे सादरीकरण विद्यार्थी मोठ्या उत्साहात करु लागले.विज्ञान सोपं करून रंजकरित्या शिकविण्याच्या कल्पक अध्यापन पध्दतीमुळे सनगरे सर अल्पावधीतच 'विद्यार्थीप्रिय शिक्षक' म्हणून शाळेतच नव्हे तर तळवडे,कणगवली,आडवली, कुरचुंब,घाटिवळे या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले.गत तीन दशके 

गुरुसेवेचे पावित्र्य राखुन काम करणा-या सनगरे सरांसारख्या एका निष्ठावान विज्ञान शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा समारंभही राष्ट्रीय विज्ञान दिनाच्य निमित्ताने व्हावा,हा दूर्मिळ सुवर्णयोगही व्रतस्थ सेवेमुळेच त्यांच्या वाट्याला आला हे मान्य करावे लागेल.



          सोनवी घडघडी शिक्षण प्रसारित मंडळ                          सोनवडे,ता.संगमेश्र्वर या संस्थेची समर्थ धुरा                    सांभाळताना.


     सनगरे सरांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत. शैक्षणिक क्षेत्रात एकतीस वर्षे निस्पृहपणे काम करणाऱ्या सनगरे सरांनी घडवलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात आज उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.आत्मभान,समाजभान,राष्ट्रभान जपत निरपेक्षपणे केलेल्या कामात कोणताही अट्टहास वा मोह त्यांनी मनाशी बाळगलं नाही.त्यामुळे आदर्श शिक्षक या व्याख्येत ते परिपूर्ण बसतात. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची वृत्ती, कणखर नेतृत्वशैली,शिस्तप्रियता, उत्कृष्ट अध्यापन शैली, सरळ मार्गी स्वभाव इत्यादी गुणविशेषांमुळे अनेकांचे आदर्श ठरलेल्या सनगरे सरांनी  आपल्या कार्यातून मोठा लोकसंपर्क जमा केला आहे.


     सनगरे सर ज्या प्रशालेत अध्यापन करतात त्याच ज.गं. पेडणेकर प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची परंपरा मागील दशकांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते.गेली अनेक वर्षे राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण बोर्डाचाच लागलेला पाहायला मिळतो.खरंतर मुंबई,पुणे,छत्रपती संभाजीनगर,लातूर,नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये उत्तम शिक्षण मिळते असा सार्वत्रिक समज आहे. कारण या शहरांमध्ये मोठमोठ्या क्लासेसचे प्रस्थ आहे. परंतु कोकण पॅटर्नने त्याला छेद दिला आहे.कोकण बोर्ड ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्या रत्नागिरी सिंधुदुर्गात वारेमाप पैसे भरून नामवंत क्लास संस्कृतीची परंपरा नाही,तरिही इथली मुलं सर्वाधिक गुणवत्तेने पुढे येतात,यामागे शाळा व सनगरे सरांसारख्या विद्यार्थी विकासाचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांची मेहनत असते. सनगरे सरांची जगन्नाथ गंगाराम पेडणेकर प्रशाला अभ्यासप्रिय शिक्षण, मुलांना असलेली शिस्त, अत्याधुनिक मोबाईल संस्कृतीपासून मुलांना दूर ठेवण्यात आलेला यश,क्रीडासंस्कृतीची रुजवणूक व सहशालेय उपक्रम या वैशिष्ट्यांमुळे आज तालुक्यातील 'आनंददायी शाळा' म्हणून पुढे आली आहे.या यशात 'गुरुवर्य' प्रभाकर सनगरे सरांचे योगदान अधोरेखित करावे लागेल



        सनगरे सर,निरंतर अध्ययनशील असल्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करताना त्यांची जाणती वृत्ती अधिक व्यापक झाली.

अंतरात्म्याचा आवाज त्यांनी ओळखला म्हणुन त्यांचा वर्तमान निर्भय अाहे वर्तमानाच्या नव्या जाणिवा ते सहजपणे स्वीकारतात.यामुळेच अाजवरचे जीवन ते उत्कटपणे ,कृतार्थपणे जगले असल्याचा प्रत्यय त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर येतो.खरं तर,रोप लावण्याहून त्याचे संगोपन महत्वाचं. सनगरे सर संगोपनाला महत्व देतात.विद्यार्थ्यांना विज्ञान पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम केवळ न शिकविता त्याचा व्यवहारी जीवनात ते कसा उपयोग करतील याकडे त्यांचा कटाक्ष असतो.म्हणुनच ज्ञानामृतांनी शिंपलेलं त्यांचं एकही विद्यार्थीरुपी झाड मला मरगळलेले दिसलेले नाही. 'जगा आणि जगू द्या ' हा सुविचार शाळेतील भिंतीवर लिहिणं सोपं पण आयुष्यात जगणं कठीण.ते सनगरे सरांनी करुन दाखविले.पडद्यामागे राहून अनेक माणसांचं जगणं सुसह्य कसं होईल यासाठी ते नेहमीच झटत राहिले आहेत.दुस-याचं आयुष्य आनंददायी व्हावं यासाठीच ते आजवर झटत आले आहेत.


ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवतालात शैक्षणिक सकारात्मक वातावरण नसते हे जाणून भविष्याविषयी गोंधळलेल्या किशोरवयीन मुलांना सनगरे सरांसह तत्कालीन जाधव सरांच्या टीममधील सर्वांनीच शिस्त लावली.आपणच अापल्या जीवनाचे शिल्पकार असतो,आपणच सृजनक्षम होऊन व्यवहारिक जीवनात उतरायचे आणि आपल्यातील कसदार गुण दाखवून या जगात आपली मुद्रा उमठवायची असते हे विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांनी बिंबविल्याने जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आज दखलपात्र काम करताना पहायला मिळतात.


सनगरे सरांनी स्वेच्छेने शिक्षकी पेशा स्वीकारला.त्यानुसार संतांच्या उपदेशानुसारही '' विठ्ठलमाया घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी " हे सूत्र आहे.स्वत:च्या मनाला तसे खुणावून ,बजावून,मुरडून त्यानुसारच वागण्याचा,राखण्याचा निर्बंध पाळून सेवानिवृत्तीच्या क्षणापर्यंत सदैव राहिलेले आदर्श

शिक्षक 'गुरुवर्य' प्रभाकर सनगरे संगमेश्र्वर तालुक्यातील सोनवडे नामक सुग्रामात जन्मलेले मात्र लांजा तालुक्यातील तळवडे गावाला कर्मभूमी मानुन लांज्यात स्थिरावलेले विज्ञाननिष्ठ आहेत.अनेकांच्या मार्गदर्शनार्थ कष्टकरी, सामाजिक कार्यात अग्रेसर,समरसतेच्या कार्यातला पथदीप,स्वकर्तृत्वाने सोनवी -घडघडी शिक्षण प्रसारक मंडळाचा संचालक ते अध्यक्षपद सांभाळणारे निष्कलंक साधक,वेळोवेळी शैक्षणिक उपक्रमात घेतलेल्या दायित्वाचे काटेकोरपणे नियोजन करणारा साक्षेपी योजक,कुटुंबालाही विधायक दिशा देउन यशस्वतीकडे नेणारा समर्थ पालक अशा सहृदयाच्या गौरवांकाचे संपादनाचे भाग्य हर्चेकर सरांसह मला लाभले ही परमदयाळू ईश्वराची सत्कृपाच असल्याचे मला मनोमन पटते.या कामी ज्यांचं ज्यांचं सहकार्य-सहाय्य मिळालं त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो.


अमेरिकेतले प्राध्यापक रे क्रिस्ट विविध क्षेत्रात काम करीत १०४ व्या वर्षी हॅरीसबर्ग जवळच्या मसिहा कॉलेजमधून निवृत्त झाले.'सर्वाधिक काळ काम करणारा कर्मचारी' या बिरुदावलीने ते सन्मानित आहेत. निवृत्त होणे म्हणजे कार्यमुक्त होणे असा अर्थ खरंतर अभिप्रेत नसतो. उद्यमी माणसं कार्यातून निवृत्त कधीच होत नसतात.या प्रमाणेच सनगरे सर इथल्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या मूळ गावी असलेल्या सोनवडे गावातील सोनवी-घडघडी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष असल्याने शिक्षण क्षेत्रातील कार्य चालूच ठेवणार आहेत, त्यांची कार्यनिष्ठा पाहता पुढिल तीन दशके तरी ते कार्यमग्न राहतील हा विश्वास वाटतो,कारण त्यांच्या मनातच हे कार्य रुजलेलं आहे.'कार्य हाच परमेश्वर', 'कार्यमग्नता हीच पूजा' मानणारे सनगरे सर या कार्यानंदातून आपल्या आजवरच्या समृद्ध अनुभवातून ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपुर्ण अनुकरणीय प्रयोग करतील व राष्ट्र प्रथम म्हणु पाहणारी पिढी घडवतील याचा त्यांचा माजी विद्यार्थी म्हणुन विश्वास वाटतो.या ब्रम्हानंद कार्यासाठी सनगरे सरांना निरामयी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!


विजय हटकर- लांजा

लेखक।संपादक।पत्रकार।



No comments:

Post a Comment