Saturday, March 2, 2024

ग्रामीण भागातील आनंददायी अक्षरसोहळा.

 ग्रामीण भागातील आनंददायी अक्षरसोहळा...



         एकविसाव्या शतकाच्या या दोन दशकात आपल्या सातत्यपूर्वक, वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे कोकण प्रांतात एक आदर्श सामाजिक संस्था म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या अनुज्ञेनं यावर्षीचे नववे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान लांजा तालुक्यातील ऐतिहासिक शिपोशी गावाला मिळाला आहे. कोरोनाच्या वैश्र्विक संकटानंतर शिपोशीच्या लाल सकस मातीत संपन्न होत असलेला हा अक्षरसोहळा रत्नागिरीतील आस्थावान साहित्य रसिकांसह मुंबईकर चाकरमान्यांना सुखाविणारा आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने शिपोशी सारख्या शैक्षणिकदृष्टया पुढारलेल्या गावात अक्षरसोहळा संपन्न होत असल्याने इथल्या सकस मातीतील प्रज्ञेचा संस्कार पुन्हा नव्या पिढीत रुजणार आहे.

         

       राजापूर लांजा तालुका नागरिक संस्था,मुंबई ही संस्था दक्षिण रत्नागिरीतील अर्थात लांजा-राजापूर तालुक्याची एका अर्थाने शिखर संस्था म्हणावयास हवी.१९५३ मध्ये मूहूर्तमेढ रोवल्यानंतर गेली ७१ वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गेल्या दोन दशकात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण,संस्कृती,कला,क्रीडा, आरोग्य,कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. गेल्या काही वर्षात अखिल भारतीय मराठी संमेलने चर्चेपेक्षा वादचर्चेनेच जास्त गाजताहेत.आणि हे वादही सहित्यबाह्य चर्चेतून होत आहेत.अंमळनेरच्या साहित्य संमेलनात आपण त्याचा अनुभव घेतला अाहे.अशावेळी या वादांच्या पल्याड जाऊन महाराष्ट्राला विवेकवादाचा प्रारंभ करुन देणाऱ्या रत्नभूमीतील राजापूर - लांजा या दोन तालुक्यांची प्रातिनिधीक संस्था  परिसरातल्या साहित्यप्रेमींना एकत्रित करून साहित्याचा निखळ आस्वाद देणारी ग्रामीण सहित्य संमेलने आयोजित करते याविषयी कमालीचे कौतुक वाटणारे अनेक मान्यवर आता पुढे येत आहेत.


     'ग्रामीण साहित्य संमेलन' वगैरे शब्द ऐकायला गोड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आणणं ही सोपी गोष्ट नाही. कितीही म्हटलं तरी दोन-तीन दिवस अशा प्रकारचा मेळावा भरणं हे प्रचंड खर्चाचं काम आहे. ज्या कोंकणाला एकेकाळी 'मनिऑर्डर'चा प्रदेश म्हणून हिणवलं जात असे, त्याच कोंकणातले रसिक मनाचे लोक आज हा अक्षरांचा उत्सव शासकीय अनुदानाशिवाय, कोणत्याही बड्या उद्योगाच्या प्रायोजकत्वाशिवाय आणि कुठल्याही प्रकारचं 'प्रतिनिधी शुल्क' न घेता राजापुर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई हि संस्था पार पाडत आहेत. याचे जाहिर कौतुक राजापूर तालुक्यातील तळवडे येथे संपन्न झालेल्या आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कोकणचे बुद्धीवैभव प्रकाश देशपांडे यांंनी संमेलनाध्यक्षीय भाषणात करुन संघाच्या साहित्य संमेलनाचे महत्व अधोरेखित केले आहे. 'राजापूर- लांजा नागरिक संघा'च्या या संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही वाद-विवाद न उद्भवणं, आणि एकोप्याने सगळा उपक्रम संपन्न होणे. आज जिकडे तिकडे वैचारिक, राजकीय, सामाजिक आणि जातीय विभागणी झालेली दिसत असताना, गावागावात तट पडलेले दिसत असताना, संघाने आयोजित केलेल्या साहित्यिकच नव्हे तर इतरही साऱ्या कार्यक्रमात सर्व स्तरांतले, सर्व जातीधर्माचे आणि नाना विचारांचे लोक एकत्र येतात, एकदिलाने काम करतात, विचारांचं आदानप्रदान करतात. हे कौतुकास्पद आहे, अनुकरणीय आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे संमेलनाविषयी हे विचार संघ कार्यकर्त्यांना प्रेरक ठरले आहेत.



          संमेलनाची यंदाची सहयोगी संस्था आहे ग्रुप ग्रामपंचायत शिपोशी व गावातील अन्य महत्वाच्या काही संस्था.खरंतर शिपोशी पंचक्रोशीच्या उत्स्फूर्त सहकार्याने हा शारदेचा सोहळा संपन्न होतो आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस येणाऱ्या माचाळच्या पायथ्याशी पेशवाईपूर्व अळापासुन शिक्षण व सामाजिक दृष्टीने पुढारलेले गाव म्हणून शिपोशी प्रसिद्ध आहे. बॉम्ब निर्मितीची कला सर्वप्रथम हस्तगत करणारे क्रांतिकारक जी.जी. आठल्ये, इतिहास संशोधक भैय्यासाहेब आठल्ये, शाहीर खामकर आणि मंडळी, उद्योजक दिलीप बाईंग यांसारख्या अनेक कर्तृत्ववान लोकांचे शिपोशी हे मूळगाव.  शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या इथल्या सूज्ञ ग्रामस्थांनी १८५५ मध्ये येथे मराठी शाळा सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यातील ती सहावी मराठी शाळा ठरली, तर लांजा तालुक्यातील पहिले ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा मानही शिपोशीनेच मिळविला. गावात ग्रामदैवत गांगेश्वराचे प्रशस्त मंदिर,श्री देव हरिहरेश्वराचे नगारखानायुक्त मंदिर,येथील दूर्मिळ चंड मूर्ती, लघु पाटबंधारे विभागाचे धरण सोबतचे गणेश स्थान, क्रांतिकारक जी. अण्णांचे निवासस्थान आदी स्थळांनी परिपूर्ण असलेल्या व सामाजिक समरसता जपणाऱ्या शिपोशी गावातील पर्यटन स्थळांचा परिचय ही विशेषांकात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजुच्या हसोळ येथे जन्मलेले रियासतकार गोविंद सखाराम देसाई  शिपोशीच्या शाळेचे माजी विद्यार्थी. इतिहासात डोंगराएवढ्या कार्यामुळे इंग्रज सरकारने १९३२ मध्ये रावसाहेब ,१९३७ मध्ये रावबहादुर तर १९५७ मध्ये राष्ट्रपतींकडून पद्मभूषण तर १९३४ मध्ये साताऱ्याच्या छत्रपतींनी रियासतकारांना मानाची साडेतीन वस्त्र देऊन गौरविले. धुळ्याच्या राजवाडे मंडळाने त्यांना 'इतिहासमार्तंड' या पदवीने गबवरविले अशा अनेक कर्तुत्वान सुपुत्रांनी शिपोशी चे नाव उंचावले आहे.रियासतकारांसारख्या  शिपोशीच्या या सुपुत्रांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची ओळख व्हावी हा देखील या संमेलनाचा उद्देश आहे.


         कोकणात आता छोट्या प्रारूपातील साहित्य संमेलन घेणाऱ्या काही संस्था पुढे येत आहेत. या संमेलनांच्या निमित्ताने व्यक्त होणाऱ्या नव्या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. माय मराठीचा प्रचार प्रसारासाठीही ते पूरक ठरत असते.अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाला न जाता येणाऱ्या शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसाठी ही साहित्य जत्रा उत्साहदायी, त्यांच्या लेखन उर्मिला जागविणारी ठरते. आपल्या प्रांतातील दिग्गज साहित्यिकांविषयी आदरभाव प्रसारित होतो.भाषा समृद्धीच्या या जागरासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ संपादक,लेखक, पत्रकार विजय कुवळेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कुवळेकर सर शिपोशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.हा एक सुखद योगायोग!


      कोकणातील गावे वृद्ध होऊ पाहताना तरुणाई गावात रहायला हवी, मोकळी शेती ओलिताखाली यायला हवी. बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पुन्हा उघडायला हव्यात गाव पुन्हा गजबजायला हवे यासाठी कोकणात राहणाऱ्या तरुणांशी विवाह करुन महानगरातील सुखासीन चंदेरी दुनियाच्या स्वप्नांचा त्याग करित मायभूमीत संसार थाटून शाश्वत कोकणच्या विकासात हातभार लावणाऱ्या या नववधूंची भूमिका महत्वाची वाटते.या नववधूंचा शोध घेऊन साहित्य संमेलनाच्या मंचावर त्यांचा सन्मान केला जातो .हे संमेलनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य.सोबतच संमेलनाच्या माध्यमातून जनमानसांत नद्यांविषयी आदराची, पावित्र्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने शिपोशी पंचक्रोशी परिसरातील नद्यांच्या तीरावर ठिकठिकाणी  जल पूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मानवी जीवनात नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.मानवी संस्कृतीचा विकास नदीकाठीच झाला. मात्र या जीवनदायिन्यांकडे आपले कमालीचे दुर्लक्ष झाले.गेल्या ३०-४० वर्षांमध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायापासून माणूस दुरावला. पोटापाण्यासाठी शहराकडे वळू लागला व त्यामुळेच नदीकडे दुर्लक्ष होऊन तिच्या दूर्दशेला सुरुवात झाली. कोकणचे शाश्वत सौंदर्य टिकवण्यासाठी नद्यांचे स्थान लक्षात घेऊन संघाने जिच्या काठावर साहित्याचे भरण पोषण झाले त्या जीवनदायीनी पुन्हा एकदा 'वाहते' करण्याचीही चळवळ संमेलनाच्या सोबतीने घेतल्याने हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.


      या संमेलनासाठी अनेक नामवंतानी सहकार्य करित आहेत,तसेच अनेक साहित्यप्रेमी कार्यकर्ते,संयोजन समिती,सहयोगी संस्था,जाहिरातदार व शिपोशी परिसरातील सूज्ञ आस्थावान नागरिकांचे अमूल्य सहकार्य लाभत आहे,म्हणुनच हा शारदेचा अक्षरसोहळा सिध्दीला जात आहे.उद्याचा सशक्त सामर्थ्यवान मराठी पिढीसाठी आवश्यक असलेली ही साहित्याची दिंडी शिपोशी येथील रियासतकार गो.स.सरदेसाई  साहित्य नगरीत येणा-या मराठी सारस्वतांसाठी आनंददायी पर्वणी ठरेल..


श्री विजय अरविंद हटकर

०२ मार्च २०२४

क्षणचित्रे :-


संमेलन विशेषांक 'पत्रिका' चे प्रकाशन


  संमेलनाध्यक्ष श्री विजय कुवळेकर ,पितांबरी           उद्योगसमुहाचे श्री.रवींद्र प्रभुदेसाई ंसह .


         संमेलनाचे निवेदन करताना...


     उपस्थित जनसमुदाय.



संघाध्यक्ष सुभाष लाड सर..


               मान्यवर भाषणे.

No comments:

Post a Comment