Thursday, February 24, 2022

मुचकुंदीच्या काठी : ग्रामीण साहित्य संस्कृती ची सप्तपदी.

 मुचकुंदीच्या काठी : ग्रामीण साहित्य संस्कृती ची सप्तपदी.

🌸📚📚📚📚🌸



राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई तर्फे प्रभानवल्ली -खोरनिनको येथे साहित्यसंमेलनाचे यशस्वी   आयोजन.

🚩🚩🚩🚩


लांजा :-

     "बिनखुर्चीच्या व्यासपीठाचे साहित्य संमेलन " हे वेगळेपण जपत महाराष्ट्राच्या साहित्य संमेलन परंपरेत आपली मुद्रा उमटवीत ग्रामीण साहित्य,संस्कृतीचे प्रतिबिंब अधोरेखित करणारे संमेलन म्हणजे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलन. यंदा संघ आणि प्रभानवल्ली -खोरंनिनको गावाच्या संयुक्त विद्यमाने सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ,ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या प्रभानवल्ली-  खोरंनिनको गावातील समीक्षक वि.शं.चौघुले साहित्यनगरीत उत्साहात संपन्न झाले.सुप्रसिद्ध कवी व सर्जनशील लेखक अशोक लोटणकर यांच्या संमेलनाध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात पद्मश्री परशुराम गंगावणे यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.

   


 

साहित्य मनाला एक विशेष प्रकारचे समाधान देते.ग्रामीण साहित्य ग्रामीण समाजाचे प्रतिबिंब आहे. या समाजातील भाषा, संस्कृती, भौगोलिकता यानुसार साहित्यात काही वैशिष्ट्ये येत असतात. या वैशिष्टांना जोपासण्याचे काम करणा-या संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातून करण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या हस्ते संघाच्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर मुख्य मंडपात शिव छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दीपज्वलन झाल्यावर संमेलनाचे कार्यक्रम सुरू झाले.. अध्यक्षीय भाषणात अशोक लोटणकर यांनी ग्राम संस्कृतीची जपणूक, ग्रामीण बोली/मराठी भाषा संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन  या साठी ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज असल्याचे विशद केले, आणि वर्तमानातल्या ग्रामीण साहित्याच्या आशयाचा आढावा घेत भविष्यात साहित्या कडून असणाऱ्या अपेक्षां बद्दल भाष्य केले. बदलत्या परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात पडणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. त्याच बरोबर नव्या पिढीला पुस्तक वाचण्याची गोडी लावणे, इंटरनेट तंत्र ज्ञानाचा विधायक उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजे असे ते म्हणाले.समेलनाध्यक्ष लोटणकर यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांची आवश्यकता स्पष्ट करणारी ठरली.

      या संमेलनाच्या पहिल्या सत्रात लोकप्रिय निवेदिका व साहित्यिका दिपाली केळकर यांचा ' स्त्रीधन ', इतिहास अभ्यासक भगवान चिले यांच्या प्रभानवल्लीचा ईतिहास या परिसंवादाने रंगत आणली. सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध कवी -गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या कविता, चटकदार किस्से आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांचा मेळ असणाऱ्या ‘आनंदयात्रा’ या कार्यक्रमाच्या प्रयोगाला साहित्यसिकांनी गर्दी केली.या तासभर चाललेल्या कार्यक्रमात रसिक चिंब झाले.विठ्ठल कुसाळेंच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कवीसंमेलनात दिलीप चव्हाण यांची ' लाडसाहेब ' ,विराज चव्हाण यांची - चल रे दोस्ता आपल्या गावाला जाऊया,  विजय हटकर यांची - ती आहे इथेच ,अमोल रेडिज यांची रत्नागिरी  या कवितांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. बॅक आॅफ इंडिया रत्नागिरी जिल्हा उप आँचलिक प्रबंधक के.आर.कंदी या साहित्यप्रेमी अधिका-याची उपस्थिती कोकणच्या माणसांबद्दलची असलेली आपुलकी व कोकणी तरुणांच्या विवाहसमस्येवरती उपाय शोधणा-या उपक्रमात दाखविलेली बांधिलकी त्यांचे मोठेपण सिद्ध करुन गेली.


तसेच उद्घाटक माजी प्राचार्य दत्ता पवार यांनी कोकणच्या विकासात अडथळा ठरणारी कोकणी मानसिकता यावर सडेतोड भाष्य केले.



 

    रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या राजापूर- लांजा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 1953 मध्ये स्थापन झाल्यानंतर गेली 68 वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गेल्या दशकभरात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती ,कला ,क्रीडा ,आरोग्य, कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. दुस-या दिवशी संघाने विविध क्षेत्रात क्रियाशील असलेल्या पुरस्कार प्राप्त विजेत्या २५ मान्यवरांचा  हृदयस्थ सन्मान करित त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. कोकणातील या २५ सत्कारमूर्तींना आगमी काळात अधिकचे काम करण्याचे बळ  देणारा हा पुरस्कार सोहळा म्हणूनच महत्वाचा ठरतो.



     गेल्या ५० वर्षात साहित्यात प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. शिक्षणाच्या प्रचाराने ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या हाती लेखणी आली. आत्मभान जागृत झालेल्या नव्या अंकुराने मग मनात निर्माण झालेले प्रश्न ,कल्पनांचे प्रकटीकरण पुस्तकांच्या माध्यमातून केले.यातून महाराष्ट्रात नवसाहित्य ,दलित साहित्य, आदिवासी साहित्य ,मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य असे विविधांगी प्रवाह निर्माण झाले. व्यक्त होणाऱ्या या नव्या सारस्वत पुत्रांना व्यासपीठ मिळावे म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात छोट्या -छोट्या साहित्य संमेलनांची आवश्यकता भासू लागली. यातूनच मध्य महाराष्ट्र ,विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात विविध प्रारूपात साहित्य संमेलने यशस्वी संपन्न होत असताना 'बुद्धिजीवी लोकांचा प्रदेश' अशी ओळख मिरवणाऱ्या कोकणात मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था अशी संमेलने आयोजित करीत असतात.यात कोमसापचे नाव अग्रक्रमाने येत असले तरी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लेखक व कवींना आपले हक्काचे वाटावे अशा संमेलनाची तीव्र आवश्यकता होती ,ही जाणीव व साहित्यिकांचा अक्षरोत्सव समाजात परिवर्तन घडू शकतो हे लक्षात घेऊन माय मराठीवर नि:स्सीम प्रेम करणार्‍या श्री सुभाष लाड यांनी राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने सन 2015 मध्ये ग्रामीण साहित्य संमेलनाचे पहिले पुष्प तळवडे, ता.लांजा येथे गुंफले. यंदा संघाचे सातवे संमेलन 'आदर्श  विद्यामंदिर प्रभानवल्ली- खोरनिनकोच्या ' प्रांगणात ज्येष्ठ समीक्षक वि.शं.चौघुले साहित्यनगरीत संपन्न झाले .या संमेलनातून ग्रामीण साहित्य संस्कृतीच्या अभिसरणासोबत ग्रामीण भागातील प्रतिभाशक्तीला ,सर्जनशीलतेला मोठा वाव मिळाला आहे.प्रभानवल्ली सारख्या दुर्गम खेड्यातील २५ मुलींनी  लिहिलेल्या ५० कवितांचे सौ.प्रिया मांडवकर यांनी संपादित  केलेल्या काव्यांकुर कवितासंग्रहाच्या प्रकाशन हा क्षण या मुलीना कवयित्री झाल्याचा आनंद देणारा ठरला.शालेय वयातच या मुलांचे पुस्तक प्रकाशित झाल्याने त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस प्रोत्साहन मिळणार असून यातून उद्याचे साहित्यिक घडणार आहेत.याचे श्रेय संघाच्या या उपक्रमाला द्यावेच लागेल. याचबरोबर बाबू घाडीगावकर या मालवणी लेखकाच्या ' वणवा ' , विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या ' अशी घडली राजस्विता ' या पुस्तकांच्या प्रकाशनाने संघाचे हे संमेलन नवोदितांना व्यासपीठ देणारे आहे हे सिद्ध करणारे ठरले.

        स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या पर्यटन समृद्ध प्रभानवल्ली- खोरनिनको परिसराच्या पर्यटनात्मक वृद्धीसाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने यातून विशेष प्रयत्न केले गेले. आठव्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या प्रभानवल्ली खोरनिनको गावांच्या पर्यटनासाठी संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी शब्दबद्ध केलेले माझे प्रभानवल्ली गाव  माध्यमांवर प्रसारित झाल्याने या गाण्यातून या गावांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. या गाण्याला सुनिल जाधव यांनी संगीतबद्ध केले असून प्रभानवल्लीची सुकन्या कु.भैरवी जाधव हिने सुमधुर आवाजात गायिलेल्या या गाण्याला लोकांच्या उदंड प्रतिसाद मिळत आहे.साहित्यासोबत गावातील पर्यटनस्थळांची जाहिरातबाजी करुन ग्रामीण रोजगारासाठी प्रयत्न करणारे हे संमेलन म्हणुनच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.


   अलीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी घोषणा या खात्याच्या मंत्री महोदयांनी केली. एकीकडे माय मराठी अभिजात भाषा होत असताना दुसरीकडे आपण मात्र आपल्या मुलाला मातृभाषेपासून तोडून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवू लागलो आहोत. ग्रामीण भागात हे लोण आता पसरू लागले आहे. इंग्रजी ही भाषा अत्यावश्यक असली तरी पण तिचे अनाठाई आकर्षण टाळायला हवे.इंग्रजी आवश्यक म्हणून मराठी माणसाने आपल्या घरातील वातावरण इंग्रजाळून टाकावे का? मराठी मातृभाषा म्हणून अधिक अभिमानाने आज वर्गावर्गात शिकवली गेली पाहिजे. या दृष्टीने मराठी अध्यापन करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांवरील दायित्व वाढले पाहिजे. आज-काल मराठीचे प्राध्यापकांचे वाचन कमी झाले आहे असा दुर्दैवी सूर ऐकू येत असल्याने मराठीच्या भरणपोषणासाठी मराठीच्या  अध्यापनकर्त्यांनी  अभ्यासक्रमाच्या कक्षेत स्वतःला कोंडून न घेता तिच्या बाहेर पडून साहित्याच्या क्षेत्रावरही दृष्टिक्षेप केला पाहिजे. मराठी भाषा व साहित्याशी जिव्हाळ्याचा संबंध त्यांनी निर्माण करायला हवा.आपण मराठी संस्कृती चे वाहक आहोत हे त्यांनी जाणायला हवे. आज विज्ञानशिक्षण संपूर्णपणे इंग्रजीवर अवलंबून ठेवलेले असल्यामुळे बुद्धिमान मराठी विद्यार्थी पूर्वप्राथमिक वर्गापासूनच मातृभाषेपासून संपूर्णपणे तुटून पडला आहे .वस्तुतः भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनाचे काम ज्यांच्या हातून घडायचे त्यांच्या मनातील मातृभाषेबद्दल ची श्रद्धा व प्रेम यांचे खच्चीकरण होत आहे. यासाठी मराठी पालकांचे प्रबोधन करायची वेळ आली आहे.सोबतच मराठी शाळांनीही आपली गुणवत्ता सिद्ध करुन पालकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करायला हवी.

   

       "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

          जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी."


---  या दृष्टीने मातृभाषेची संपन्नता व समृद्धता प्रयत्नपूर्वक टिकवण्यासाठी संघाच्या ग्रामीण संमेलनाला एक वेगळे महत्त्व आहे.यासाठी लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली धडपडणारे गणेश चव्हाण,स्नेहल आयरे ,आशा तेलंगे,  गणपत शिर्के ,महेंद्र साळवी,विजय हटकर, दिपक नागवेकर ,प्रकाश हर्चेकर,विराज चव्हाण, प्रमोद मेस्त्री, मंगेश चव्हाण,विनोद बेनकर  या टिमचा उत्साह लाजवाब होता. संघाची मुंबई समितीचे पदाधिकारी ,स्थानिक शाखांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. एकुणच संमेलनात क्रांतीज्योत फेरी, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन ,शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, कोकणचा निसर्ग मांडणारे छायाचित्र प्रदर्शन, दगडी शिल्प प्रदर्शन ,आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले अमूर्त चित्र प्रदर्शन ,काव्यसंमेलन, नामवंत साहित्यिकांचा परिसंवाद ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुस्तक प्रकाशन, कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान सोहळा,कोकणात स्थायिक झालेल्या तरुणांशी विवाह करणाऱ्यां वधूंचा सत्कार ,लोककला व मनोरंजन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाले.या कार्यक्रमातून मुचकुंदि नदीच्या काठी साहित्य संस्कृतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोकणच्या लाल मातीत साहित्याचे बीजारोपण करणारा हा मराठी भाषेचा  सोहळा भविष्यातील साहित्यिक घडविणारा साहित्यिक मंच ठरेल याचा दृढ विश्वास आहे.या दृष्टीने साहित्य संस्कृती चे हे सोहळे निकोप समाजनिर्मितीसाठी अत्यावश्यक ठरतात.


✒️✒️✒️✒️

विजय हटकर.












Saturday, February 12, 2022

अशोक पालांडे -गाथा मराठी उद्योजकाची -

 अशोक राजाराम पालांडे



'जी माणसे पायाने चालतात ,ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चित ध्येय गाठतात' हे विधान अशोक पालांडे  या कोकणी उद्योजकाला तंतोतंत लागू पडतं याची प्रचीती आणणारी अशोक पांडे यांची यशोगाथा


        कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील स्वर्गीय सुंदर प्रभानवल्ली हे अशोक पालांडे यांचे मूळ गाव. मुचकुंदी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेल्या या समृद्ध गावात १३ फेब्रुवारी १९५८  रोजी अशोकरावांचा जन्म झाला. गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला मामाकडे त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांचे मामा श्री घाग हे मूळचे लांजा तालुक्यातील सालप्याचे. स्वकष्टातून त्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी १९८० च्या दशकात जनरल स्टोअर्स आणि लॉटरीचे काहीच स्टाॅल उभारून व्यवसायात जम बसवला होता .मामाकडे राहणारा छोटा अशोक दिवसभर मामाचे लॉटरी दुकान सांभाळायचा तर सायंकाळी ६:४५ ते ९:४५ या वेळेत रात्रशाळेत जाऊन अभ्यासासोबत भविष्याचे स्वप्न रंगवायला. बघता बघता विटी मध्ये तीन वर्ष सरून गेली. नववीपर्यंत शिक्षण घेऊन अशोकरावांनी रात्रशाळेत जाणे बंद केले व १९७५ मध्ये विटी स्टेशन ला स्वतःचा लॉटरी स्टॉल सुरू केला. लॉटरी हा  नशिबाचा खेळ .लॉटरी बद्दल अनेकांना कुतूहल व उत्साह असतो कारण लॉटरीच्या एका तिकीटाने  अनेकांना लखपती बनवले आहे .मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःचे नशीब वाजवायला आलेले अनेक तरुण लॉटरीचे तिकीट काढतात व लखपती होण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे अशोक चा लॉटरी चा व्यवसाय उत्तम चालला होता. १९७५ ला दिवसाला शंभर रुपये एवढा फायदा त्याला व्हायचा. यादरम्यान त्यांचे वडील गावाकडे परत आले .आपल्या मागे  मुंबईसारख्या ठिकाणी आपला मुलगा वाईट संगतीला लागेल याची त्यांना भीती होती. योगायोगाने त्याच वेळी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या वापी या  औद्योगिक शहरात अशोकरावांच्या भाओजींची  झेंडू फार्मासिटीकल सर्व्हिस कंपनीत बदली झाली. अशोकरावांच्या  वडिलांनी आपल्या मुलाला वापीला पाठवण्याचा निर्णय घेतला. १९७६ ला मुंबईत लॉटरी व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा मार्गावर असलेल्या अशोक पालांडे यांना वडिलांच्या रेट्यामुळे मुंबई सोडून वापी ला जावे लागले . आयुष्यात आलेले काही योगायोग विलक्षण असतात . वडिलांनी केलेल्या सूचनेप्रमाणे वापीला जाण्याचा अशोकरावांचा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.


     गुजरात मधील वापी शहर १९७६  ला फार विकसित झाले नव्हते. फार मोजक्या कंपन्या येथील गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीच्या आरक्षित जागेत बस्तान बसवित होत्या. यातीलच एका कंपनीत माहे शंभर रुपयांच्या पगारावर अशोक पालांडे यांना नोकरी मिळाली. मुंबईत दिवसाला शंभर तर येथे महिन्याला शंभर रुपये मिळणार असल्याने सुरुवातीला अशोकरावांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली,मात्र वडिलांना दिलेला शब्द पाळायचा ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या अशोक पालांडे यांनी त्याही स्थितीत वापीला काम करण्याचे ठरवले 

     १९७९-८० मध्ये त्यांनी फार्मासिटिकल व केमिकल कंपन्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या मशिनरी बनवणार्‍या एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. या कंपनीने खऱ्या अर्थाने अशोकरावांच्या जीवनाला दिशा मिळाली. प्रचंड कष्ट ,सतत नवीन शिकण्याची तयारी यामुळे या कंपनीत पाच वर्षाच्या काळात केमिकल कंपन्यांसाठी मशिनरी तयार करण्याचे तंत्रज्ञान अशोकरावांनी आत्मसात केले. त्यामुळे मोठं काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. याच वेळी वापी शहरात बंद पडलेली 'स्टार इंडस्ट्रियल सिस्टम' ही कंपनी चालवायला द्यायची आहे ही बातमी त्यांच्या कानावर आली .त्यांनी ही संधी साधायची ठरवली आणि एका भांडवलदार मित्राने अर्थसहाय्य करण्याचा शब्द दिल्यावर  ही कंपनी चालवायला घेतली. या कंपनीच्या माध्यमातून लहान-मोठ्या ऑर्डर घेत वापीच्या औद्योगिक वसाहतीत अशोक पालांडे यांनी आपला चांगलाच जम बसवला.


       हे करीत असतानाच फॅब्रिकेशन चे स्वमालकीच्या वर्कशॉप सुरू करण्यासाठी पालांडे यांनी गुजरात सरकारकडे या औद्योगिक वसाहतीत जागा मागितली. साधारण पाच वर्षांनी १९९० च्या दरम्यान त्यांना ही जागा मिळाली आणि पुन्हा अशोकरावांनी नव्याने सुरुवात केली. मेहनत, कष्ट आणि विश्वासाच्या जोरावर नववी शिकलेला अशोक पालांडे या मराठी युवकाने गुजराती लोकांच्या राज्यात "क्रोनीकेम फेब " नावाच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. आज २०२२ मध्ये मागे वळून पाहताना काही कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या या कंपनीने आपल्या गुणवत्तापूर्ण कामाने अभियांत्रिकी क्षेत्रात मानदंड निर्माण केले आहेत. देशात कधीकाळी अशक्यप्राय मानलेला कोकण रेल्वे प्रकल्प २६जानेवारी१९९८ ला कार्यान्वित झाला .या शतकातील भारतीय चमत्कार असे या  रेल्वेचे वर्णन करावे लागेल. या कोकण रेल्वेच्या उभारणीत 'क्रोनीकेम फॅब ' चे  लक्षणीय योगदान आहे. कोकण रेल्वे मार्गावर  तब्बल ५९२ लहान मोठे बोगदे आहेत. त्या बोगद्याचे सबकाॅन्ट्र‌क्ट अशोक पालांडे यांच्या कंपनीला मिळाले .बोगदा खोदकाम करताना बोगदा कोसळू नये तसेच कायम स्वरूपाची सुरक्षितता मिळवून देण्यासाठी बोगद्यात  अर्धवर्तुळाकृती सिमेंट - काँक्रीटचे बांधकाम करावे लागते. त्यासाठी वैशिष्टपूर्ण मशनरी बनवावी लागते. त्याचे उत्पादन पालांडे यांनी  सक्षमपणे केले. आज क्रोनीकेम फॅब  देशभरात विविध राज्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सज्ज झाली आहे.



उद्योग क्षेत्रात जिद्द आणि अविरत संघर्षाचा जोरावर उत्तुंग झेप घेणाऱ्या अशोक पांडे यांनी सामाजिक भान जपत विविध समाजोपयोगी उपक्रमात सढळ  हस्ताने मदत केली आहे.आज वापी शहरात लाखाच्या आसपास मराठी भाषिक लोक स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र मित्र मंडळ संस्थेच्या माध्यमातून ' केळकर वझे मराठी शाळा' वापी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन एकर जागेत उभारण्यात आली आहे. या संस्थेचे पालांडे संचालक आहेत. चिपळूणमध्ये वाशिष्टी च्या महापुराने प्रलय आल्यावर पालांडे यांनी तब्बल नऊ लाखाचे जीवनावश्यक सामान भरून दोन ट्रक तात्काळ पाठवत समाजभान जपले.तसेच   कोरोना काळातही त्यांनी मौलिक कामगिरी केली आहे.


          मराठी माणूस व्यवसायात यशस्वी होत नाही, व्यवसाय करावा तो गुजराती-मारवाडी यांनीच.असे म्हटले जात असताना कोकणच्या या  कर्तुत्ववान सुपुत्राने गुजरात मधील वापी शहरात यशस्वी उद्योजक म्हणून आदराचे स्थान मिळवले आहे. प्रभानवल्लीचा कर्तुत्वान सुपुत्र अशोक पालांडे यांचा  म्हणूनच संघाला अभिमान वाटतो .आता त्यांचे चिरंजीव विनोद पालांडे हे मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा व्यवसाय विस्तारू पाहत आहेत . या पिता-पुत्रांना संघाच्या ग्रामीण मराठी  साहित्य संमेलनानिमित्ताने मनस्वी दंडवत !

विजय हटकर.

८८०६६३५०१७

13'frb20202

Thursday, February 10, 2022

प्रभानवल्लीचे राजघराणे : सावंत प्रभावळकर

 प्रभानवल्लीचे राजघराणे : सावंत प्रभावळकर व कुडाळचा प्रभावळकर वाडा.

   प्रभानवल्लीच्या राजाचा झेंडा कुडाळपर्यंत


  

मुचकुंद ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रभानवल्लीला जसा महाभारतकालीन इतिहास आहे तसा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मातीत  तोलामोलाची साथ देत पराक्रम गाजवून इतिहासात अजरामर झालेल्या पण कालौघात दुर्लक्षित राहिलेल्या एका निष्ठावंत राजघराण्याचा इतिहास आहे. हे कर्तृत्ववान राजघराणे म्हणजेच सावंत प्रभावळकर घराणे होय . या घराण्याचा इतिहास म्हणजे स्वराज्यातील एक पेटती मशालच आहे!

      या सावंत प्रभावळकर घराण्याचे मूळ पुरुष राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  इ. स. १६६० च्या कोकण मोहिमेत सहभागी झाले होते. या राजे प्रभामवल्लीकरांची राजधानी प्रचितगडावर होती. विशाळगडाच्या शेजारी यांचे प्रभानवल्ली (प्रभावळी) हे छोटे राज्य होते . विजापूरच्या दरबारात राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर हे पहिल्या दर्जाचे मानकरी सरदार होते.  २९ एप्रिल १६५१  रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभानवल्लीवर हल्ला चढवला आणि प्रभानवल्ली चे राज्य जिंकून घेतले. मात्र प्रभावळकरांचा कल पाहून त्यांना आपले सहकारी बनवले व प्रभावळकरांचा स्वराज्य स्थापनेत योग्य तो उपयोग करून घेतला.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेत राजे सुर्यराव सहभागी झाले होते. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडकर राजे लखमसावंत,विजापूरचा सरदार खवासखान यांच्यात झालेल्या लढाईत नेताजी पालकर, तानाजी मालसुरे यांच्या समवेत राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर यांनी फार मोठा पराक्रम गाजवला. या लढाईत खवासखानाच्या मदतीला मुधोळचा  सरदार बाजी घोरपडे दीड हजार घोडदळासह  फोंडा घाट उतरून येत होता. छत्रपती शिवाजी राजांनी सूर्यराव प्रभानवल्लीकरांच्या सैन्याला बाजीवर चाल  करून जाण्यास सांगितले. सूर्यरावांनी बाजीच्या सैन्याला फोंडा घाट उतरतानाच हरकुळ खुर्द येथे गाठले.या लढाईत बाजी घोरपडे मारले गेले व शिवरायांनी मुधोळ काढून त्यावर कब्जा मिळवला. पुढे बाजी चा मुलगा मालोजीरावला मु्धोळची जहागिरी त्यांनी दिली.

  मुधोळच्या घोरपडे घराण्यात सुर्यरावांची कन्या कमला होका दिलेली होती.कुडाळ ला झालेल्या युद्धात छत्रपती शिवरायांना दिलेला शब्द पाळत सुर्यराव प्रभानवल्लीकरांनी मुधोळच्या घोरपड्यांच्या विरोधात लढाई केली.त्यांचा पराभव करित राजनिष्ठा जोपासली.


       या लढाई सह वेंगुर्ले येथील डच वखार आणि मालवण बंदर लुटीच्या मोहिमेत शिवरायांबरोबर सर्जेराव जेधे ,नेताजी पालकर, तानाजी मालसुरे, राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर व पिलाजी निळकंठ हे सरदार सामील झाले होते .एकूणच कोकण विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राजे  सूर्यराव प्रभानवल्लीकरांवर दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज खुश होते .कुडाळच्या विजयाची निशाणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा सूर्यराव प्रभानवल्लीकरांना  कुडाळभुईकोट नजीक आणि नेरूळ येथील जमीन बक्षीस म्हणून दिली.कुडाळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्याच्या खंदकाच्या आतील मोक्याची जमीन त्यांनी  सुर्याजीरावांना  बहाल केली. या ठिकाणी प्रभानवल्लीकर घराणे स्थायिक झाले. नंतर याच ठिकाणी सूर्यरावांचे पराक्रमी नातू  कान्होजीराजे यांनी आपल्या भावांसह १७५७ मध्ये भव्य चौसोपी वाड्याची उभारणी केली .१७५७ च्या  गुढीपाडव्याला या वाड्यात प्रभावळकरांनी गृहप्रवेश केला .आज तब्बल २६५ वर्षानंतर प्रभानवल्लीकरांच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक म्हणून हा ऐतिहासिक वाडा कुडाळ एसटी बस स्थानकामागे दिमाखात उभा आहे . साधारण चार फूट उंच व भक्कम जोत्यावर बांधलेला हा  वाडा पाहून प्रभानवल्लीकरांच्या सामर्थ्याची कल्पना येते.

२६५ वर्षाचा वाडा.


पानिपतच्या लढाईत प्रभानवल्लीकरांचा पराक्रम :- 

      १७५७ मध्ये कान्होजी राजांनी कुडाळमध्ये वाडा बांधल्यानंतर गृह प्रवेशाचे होमहवन, ब्राह्मणभोजन, गाव भोजन वगैरे कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भवानी चा गोंधळ घातला .या नंतर दुसऱ्या दिवशी पेशव्यांकडून जासुस त्यांना भेटावयास आला. पॆशवे सदाशिवरावांनी उत्तरेकडे मोहीम काढली असल्याने त्यांना लढाईसाठी बोलावणे धाडले होते. कान्होजी राजे आपल्या भावांसह कोल्हापूर मार्गे पुण्याला पोहोचले व पेशव्यांस सोबत उत्तर मोहिमेत सामील झाले. पानिपतच्या लढाईत कान्होजीराजे प्रभानवल्लीकर व त्यांचा भाऊंनी फार मोठा पराक्रम केला . त्यांची तुकडी अब्दालीच्या निशाणा पर्यंत पोहोचली होती परंतु नंतर परत मराठ्यांचा  पाडाव होऊ लागला व कान्होजी राजे व त्यांचे दोन भाऊ या ऐतिहासिक लढाईत धारातीर्थी पडले. अशा पद्धतीने पानिपतच्या लढाईत प्रभावळकरांची तरुण उगवती पिढी कामी  आल्याने पेशवाई नंतर मात्र या प्रभावळकर घराण्यातील वंशजांना फार हालाखीचे जीवन जगावे लागले. या घराण्यातील लोक आज मध्यमवर्गीयांप्रमाणे पांढरपेशे जीवन जगत आहेत . कुडाळ येथील ऐतिहासिक वाड्यात त्यांचे सध्या वास्तव्य आहे.


प्रभावळकर घराण्यातील पराक्रमी पुरुष व विशेष बाबी :--

१) रामचंद्र उर्फ राम प्रभावळकर  हे तामिळनाडूतील चेन्नई येथील उद्योगजगतात प्रसिद्ध उद्योजक व मराठी साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत.

२)१९३९ साली या घराण्यातील दादासाहेब प्रभावळकरांनी इंग्रजी मधले जेकब प्राईझ मिळवले. ते त्यावेळची कठिण मॅट्रिक परिक्षा पास झाले होते.दादासाहेब अकाउंटंट जनरल आॅफिसमध्ये सुपरिटेंडंट होते.

३) विजयनगरचा राजा कृष्णदेवरायाच्या राज्याभिषेकावेळी  प्रभावळीचा राजा जातीने उपस्थित होता. कृष्णदेवरायासोबत त्यांचे जवळचे संबंध होते.

४) १६५१ मध्ये कोकणात दळव्यांकडून दाभोळ छत्रपती शिवरायांनी ताब्यात घेतले.शिवाजी महाराजांच्या चढाईचा धसका घेऊन पालवणीचा राजा जसवंत याने प्रभानवल्लीचा राजा सुर्यरावाकडे आश्रय घेतला.यावरून प्रभानवल्लीच्या सामर्थ्याची कल्पना येते.

५) प्रभावळकरांची राजधानी प्रचितगडावर होती.सुमारे २५००० पायदळ, १०००० घोडदळ व १०० हत्ती ,उंट तोफा असे प्रभावळीचे सैन्य होते. प्रभावळित अर्थात आजच्या प्रभानवल्ली येथे महत्वाची गढी (छोटा किल्ला) होता.कोकणातील ते महत्वाचे व्यापारी ठाणे होते.परंतु शत्रुंपासून संरक्षणाच्या दृष्टीकोनातून उंच अघड असलेल्या प्रचितगडावर प्रभावळकरांनी राजधानी थाटली होती.येथेच हत्तीशाळा, अश्वशाळा,शस्त्रागार,श्री भवानीचे देऊळ इ.महत्वपूर्ण गजबजलेली  स्थळे होती.हा किल्ला वर्षभर लढविता येईल इतकी रसद किल्ल्यावर होती.अशा प्रकारे प्रभावळी भरभराटीला आलेले कोकणातील छोटे राज्य होते.


५) मुंबईच्या महापौरांनी मध्यंतरी कुडाळला भेट दिली त्यावेळी कुडाळातील इतिहासप्रसिद्ध वास्तू म्हणून प्रभावळकरांचा ऎतिहासिक चौसोपी वाडा दाखविण्यात आला.


६)प्रथेप्रमाणे प्रभावळकरांच्या वाड्यात न चुकता आई भवानीचा गोंधळ संपन्न होतो.वाड्यातील देवघर शिवकाळाची साक्ष देते.


देवघरातील श्री देवी भवानीची मूर्ती

७) मालवणचा किल्लेदार सकपाळांची कन्या शांता फार धाडसी होती.समुद्रातील लाटांशी खेळणारी धाडसी मुलगी प्रभावळकरांची सुन झाली.तिचे नाव पुढे सरस्वती ठेवण्यात आले.

८) प्रजाभिमूख राजे म्हणून प्रभावळकर प्रसिद्ध होते.

एकूणच इतिहासात ज्ञात असलेल्या पण समान्य लोकांना अज्ञात असलेल्या या पराक्रमी राजघराण्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठीच हा लेखनप्रपंच.


विजय हटकर.

८८०६६३५०१७


वाड्यातील देवघर. 

कुुुुुुडाळ येथील वाड्याचा दरवाजाा.




Wednesday, February 2, 2022

चित्रमय आयुष्याला शब्दमय श्रद्धांजली

 मुखपृष्ठकार बाळ ठाकूरांना वाहिली मायभूमीत मान्यवरांनी आदरांजली.

🌸🌸🌸🌼🌸🌸🌸

 बाळ ठाकूर  ऋषितुल्य व्यक्तिमत्व - माजी प्राचार्य दत्ता पवार

🌷🌷🌷🌷🌷🌷

 बाळ ठाकूर मायभूमीचा खराखुरा नायक - सुभाष लाड.



लांजा :--

    ऋषीतुल्य माणसं आपल्यापर्यंत येत नाहीत खरं तर अापण त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं. कारण हि माणसं आपल्या ध्येयात्मक वाटचालीत कार्यमग्न असतात,असेच साहित्य क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व.बाळ ठाकूर होय असे मत माजी प्राचार्य दत्ता पवार यांनी व्यक्त केले.

सुप्रसिद्ध मुखपृष्ठकार बाळ ठाकुर यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई च्या व ग्रामपंचायत भांबेड यांच्या वतीने शनिवार दि.२२ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी प्राचार्य दत्ता पवार यांसह अनेक मान्यवरांनी बाळ ठाकूर

यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी रत्नागिरी, राजापूर, देवरुख, लांजा येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.

          मराठी साहित्य व चित्रजगतातील सुप्रसिद्ध चित्रकार मुखपृष्ठकार लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सपूत्र बाळ ठाकुर यांचे नुकतेच ८ जानेवारी २०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी ते ९२ वर्षाचे होते.त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील साहित्य व चित्रजगत खरोखरच हळहळलेले पाहायला मिळाले.मराठी साहित्यातील भल्या भल्या प्रस्थापित लेखकांची पुस्तके, दर्जेदार मासिकांचे मुखपृष्ठ चितारुन मराठी साहित्य जगतात आपल्या अभिजात कलेची मुद्रा उमठविणा-या  आपल्या मायभूमीतील स्व.बाळ ठाकूर या दिग्गज सूपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या व ग्रामपंचायत भांबेड यांच्या संयुक्त विद्यमाने भांबेड ग्रामपंचायतीच्या कै.शिवरामभाऊ ठकुरदेसाई सभागृहात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी प्राचार्य दत्ता पवार, साहित्यिक अशोक लोटणकर,सुभाष लाड, साहित्यिक दिपक नागवेकर, शिल्पकार संदीप सावंत, आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश करंबेळे, पाचल ग्रामपंचायतीचे सरपंचा अपेक्षा मासये,  उपसरपंच किशोर नारकर, अॅड.गांगण, गणपत शिर्के सर, अभिनेते - नाटककार अमोल रेडिज , भांबेडच्या सरपंच उज्वला मढवी , जयराज मांडवकर , दिगंबर शिंदे ,महेंद्र साळवी ,विजय हटकर ,पोवार गुरुजी, श्रीकांत ठाकुरदेसाई,गणेश इंदुलकर आदि मान्यवर उपस्थित होते.

     


       प्रार्थना सभेच्या सुरवातीला सोहम संगीत विद्यालय ,बदलापूरच्या वतीने सुनिल जाधव यांनी  सांगितिक कार्यक्रम सादर करुन शब्दसुमनांजली वाहिली.यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते स्वर्गीय बाळ ठाकूर यांच्या प्रतिमेल पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री सुभाष लाड यांनी संपादित केलेल्या रंग रेषांचा किमयागार - बाळ ठाकूर या अर्पणपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य दत्ता पवार म्हणाले की ,मुंबई मध्ये बाळ ठाकूरांचे महात्म्य अनेकांना माहित आहे.देवरुख मधील प्राध्यापक शे.पु.भागवत यांच्याशी त्यांचे  घनिष्ठ संबंध होते.यांच्या भेटीमुळेच बाळ ठाकुरांच्या जीवनाला दिशा मिळाली. गिरगांव मध्ये मौज कार्यालयातून सत्यकथा व मौज ही मराठी साहित्यातील दर्जेदार मासिके प्रकाशित होत.ख-या अर्थाने हि दोन्ही मासिके मराठी साहित्याची गंगोत्री आहे.या दोन्ही मासिकांना सजविण्याचे काम बाळ ठाकूर यांनी केले.आपल्या पुस्तकावर बाळ ठाकूरांचे मुखपृष्ठ असावे असे प्रत्येक साहित्यकाराप्रमाणे मलाही वाटायचे. माझीही आजवर सात पुस्तके निघाली.मात्र ती संधी मला मिळाली नाही.बाळ ठाकूरांसारख्या कोकणच्या सुपुत्राचा ठेवा आपण कपातला हवा असे सांगताना मुंबईच्या साहित्यविश्र्वात  बाळ ठाकुरांची आदरयुक्त दहशत होती. मुंबईतील प्रख्यात चित्रकार  त्याच्याजवळ जाण्याचे प्रयत्न करायचे मात्र हा कलोपासक आपल्या रंग रेषांच्या दुनियेत निष्ठेने काम करित आत्मानंद मिळवित राहिले.



     सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक लोटणकर यांनी कलाकार हा  तपस्वी असतो, कलाकाराचे हात कलेने भरलेले होते. भारलेले असतात. बाळ ठाकूरांना प्रसिद्धीचा हव्यास नव्हता. 

कारण -"तुका म्हणे झरा आहे प्रवाही खरा." 

- या उक्तिप्रमाणे ते चित्रकला क्षेत्रातील अस्सल सोनं होते.खरेखुरे राजे होते.त्यामुळे त्यांना प्रसिध्दि मिळविण्याची गरज नव्हती.असे सांगत  गिरगावात लेखक म्हणून मि अनेकांना भेटलो पण बाळ ठाकूरांना मी भेटलो नाही.अशी मोठी रत्न बाहेरची मंडळी शोधून काढतात आपल्याल ते कळत नसत ही खंत व्यक्त करित लोटणकर यांनी बाळ ठाकूर यांच्या जीवनाचा परामर्श आपल्या मनोगतातुन मांडला.


लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी गेल्या वर्षी बाळ ठाकूरांना भेट दिल्याच्या आठवणीला उजाळा देत या हृदयस्थ भेटीत राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मायेची शाल पांघारण्याचे सौभाग्य मला मिळाल्याने मि भाग्यवान ठरल्याचे मत व्यक्त केले.



       राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बालपणापासूनच मला आवड होती.बनगरवाडी हे माझं बालपणीतलं आवडतं पुस्तक होतं.या पुस्तकाचे बाळ ठाकुरांनी चितारलेले  मुखपृष्ठ व आतील चित्र मला खुप भावायची,यातूनच मि बाळ ठाकूरांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले त्यावेळी इतक्या मोठा उंचीचा चित्रकार भांबेडमधील माझ्या मायभूमीतील आहे याची कल्पना मला नव्हती. यामागे कोकणीस्वभाव कारणीभूत ठरल्याचे मत मांडत बाळ ठाकूरांसारख्या माझ्या मायभूमीतील कलोपासकाची मला फार उशीरा माहिती मिळाली असे सांगत यंदाच्या प्रभानवल्ली येथे होणा-या नियोजीत सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याविषयीची कल्पना देण्यासाठी मि  त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस भांबेड येथील निवासस्थानी गेलो होतो.त्यावेळी त्यांनी मंद स्मित हास्य करित मी -' फार काही केले नाही ' असे सांगत आपल्या विचारांची उंची आपल्या आचारातून आमच्यासमोर ठेवत एका जीवनमूल्याची शिकवण आम्हाला दिली असल्याचे सांगितले. या पुढेही बाळ ठाकूरांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे कलादालन ठाकूरदेसाई कुटुंबाच्या सहकार्याने लांजा तालुक्यात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त करित आपल्या मायभूमीतील या अद्वितीय कलोपासकाला शब्दसुमनांजली अर्पण केली.

 

    याचबरोबर भांबेड गावचे सुपुत्र सिने नाट्य अभिनेते श्री अमोल रेडीज यांनी स्वर्गीय बाळ ठाकुर या कीर्तिवंत माणसाला आपण मुकलोय अशी भावना व्यक्त केली. अॅड.सदानंद गांगण यांनी "एवढा प्रसिद्ध रेषांचा किमयागार, पण आम्ही इथल्या गावचे असूनही त्यांना ओळखू शकलो नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पण त्यांच्या कला दालनासाठी सगळे मिळून जे ठरवतील त्यासाठी आम्ही झटून त्यांना पाठिंबा देऊ" असे सांगितले.  पाचलचे उपसरपंच किशोर नारकर  यांनी -ठाकुर सरांचा अभिमान सर्वांनाच आहे, तो पुढे कसा तेजत राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे सांगितले.त्याचबरोबर अजय देसाई, महेंद्र कांबळे,भांबेडचे उपसरपंच राजेंद्र गांधी,आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आपण एका कीर्तिवंत माणसाला मुकलो असल्याची भावना व्यक्त करित भांबेड पंचक्रोशीला बाळ ठाकूरांसारख्या सुपुत्राचा यथायोग्य गौरव करता असला नसल्याची खंत व्यक्त करित महाराष्ट्रात मोठंपणाचं श्रेष्ठत्व मिळवायला मरायला लागतं हे ठाकूरांना ही लागू होतं असे मत व्यक्त केले.


     या प्रार्थना सभेला उपस्थित बाळ ठाकूर यांचे सुपुत्र श्रीकांत ठाकूरदेसाई यांनी आमच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई व ग्रामपंचायत भांबेड यांनी पुढाकार घेत प्रार्थना सभा आयोजित करण्यासोबतच अर्पणपुस्तिकेच्या माध्यमातून बाबांचे कार्य भावी पिढीला कळावे यासाठी केलेल्या प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगत दोन्ही संस्थाचे आभार मानले.

     


५०० च्यावर इलेस्ट्रेशन,७०० च्यावर मराठी व इंग्रजी पुस्तकांना मुखपृष्ठ व रेखाटने,भारतातील नामवंतांची व्यक्तिचित्रे आपल्या सिद्धहस्त कुंचल्याने साकारणा-या वडिलांचा जीवनपट उलगडविताना श्रीकांत ठाकूर यांच्या डोळ्यात पाणी भरुन आले. बाबा बालपणी शिक्षणासाठी राजापुरात असताना  तालीमखान्यात  जायचे.यावेळी व्यायाम व योगाचे संस्कार त्यांच्यावर झाल्याचे सांगत बाबा शेवटपर्यंत योगासने करित असल्याने दीर्घायुषी जीवनाचा आनंद घेऊ शकल्याचे गुपित सांगत  ते जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव असला तरी प्रकाशन व साहित्य विश्र्वाच्या  बाहेर ही बाळ ठाकूरांचे हिंदुत्ववादी ,साम्यवादी , डावे ,काॅग्रेसी विचारधारा असलेल्या अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगत त्यांच्या कलाकृतींच्या दस्त ऎवजीकरणाचे काम आम्ही कुटुंब करित असल्याचे सांगत आगामी काळात वडिलांच्या स्मृती चिरंतन जॊपासण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.


   या प्रार्थना सभेचे प्रास्ताविक जयराज मांडवकर सर यांनी तर निवदन विजय हटकर यांनी केले.या प्रार्थना सभेसाठी महेंद्र साळवी ,विनोद बेनकर, अभिजित वाघदरे, दीपक नागवेकर, सौरभ साळवी, राजेंद्र गांधी यांनी मेहनत घेतली .

🙏🙏🙏