मुचकुंदीच्या काठी : ग्रामीण साहित्य संस्कृती ची सप्तपदी.
🌸📚📚📚📚🌸
राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई तर्फे प्रभानवल्ली -खोरनिनको येथे साहित्यसंमेलनाचे यशस्वी आयोजन.
🚩🚩🚩🚩
लांजा :-
"बिनखुर्चीच्या व्यासपीठाचे साहित्य संमेलन " हे वेगळेपण जपत महाराष्ट्राच्या साहित्य संमेलन परंपरेत आपली मुद्रा उमटवीत ग्रामीण साहित्य,संस्कृतीचे प्रतिबिंब अधोरेखित करणारे संमेलन म्हणजे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलन. यंदा संघ आणि प्रभानवल्ली -खोरंनिनको गावाच्या संयुक्त विद्यमाने सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ,ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या प्रभानवल्ली- खोरंनिनको गावातील समीक्षक वि.शं.चौघुले साहित्यनगरीत उत्साहात संपन्न झाले.सुप्रसिद्ध कवी व सर्जनशील लेखक अशोक लोटणकर यांच्या संमेलनाध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात पद्मश्री परशुराम गंगावणे यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.
साहित्य मनाला एक विशेष प्रकारचे समाधान देते.ग्रामीण साहित्य ग्रामीण समाजाचे प्रतिबिंब आहे. या समाजातील भाषा, संस्कृती, भौगोलिकता यानुसार साहित्यात काही वैशिष्ट्ये येत असतात. या वैशिष्टांना जोपासण्याचे काम करणा-या संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातून करण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या हस्ते संघाच्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर मुख्य मंडपात शिव छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दीपज्वलन झाल्यावर संमेलनाचे कार्यक्रम सुरू झाले.. अध्यक्षीय भाषणात अशोक लोटणकर यांनी ग्राम संस्कृतीची जपणूक, ग्रामीण बोली/मराठी भाषा संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या साठी ग्रामीण साहित्य संमेलनाची गरज असल्याचे विशद केले, आणि वर्तमानातल्या ग्रामीण साहित्याच्या आशयाचा आढावा घेत भविष्यात साहित्या कडून असणाऱ्या अपेक्षां बद्दल भाष्य केले. बदलत्या परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात पडणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. त्याच बरोबर नव्या पिढीला पुस्तक वाचण्याची गोडी लावणे, इंटरनेट तंत्र ज्ञानाचा विधायक उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले पाहिजे असे ते म्हणाले.समेलनाध्यक्ष लोटणकर यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांची आवश्यकता स्पष्ट करणारी ठरली.
या संमेलनाच्या पहिल्या सत्रात लोकप्रिय निवेदिका व साहित्यिका दिपाली केळकर यांचा ' स्त्रीधन ', इतिहास अभ्यासक भगवान चिले यांच्या प्रभानवल्लीचा ईतिहास या परिसंवादाने रंगत आणली. सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध कवी -गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या कविता, चटकदार किस्से आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांचा मेळ असणाऱ्या ‘आनंदयात्रा’ या कार्यक्रमाच्या प्रयोगाला साहित्यसिकांनी गर्दी केली.या तासभर चाललेल्या कार्यक्रमात रसिक चिंब झाले.विठ्ठल कुसाळेंच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कवीसंमेलनात दिलीप चव्हाण यांची ' लाडसाहेब ' ,विराज चव्हाण यांची - चल रे दोस्ता आपल्या गावाला जाऊया, विजय हटकर यांची - ती आहे इथेच ,अमोल रेडिज यांची रत्नागिरी या कवितांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. बॅक आॅफ इंडिया रत्नागिरी जिल्हा उप आँचलिक प्रबंधक के.आर.कंदी या साहित्यप्रेमी अधिका-याची उपस्थिती कोकणच्या माणसांबद्दलची असलेली आपुलकी व कोकणी तरुणांच्या विवाहसमस्येवरती उपाय शोधणा-या उपक्रमात दाखविलेली बांधिलकी त्यांचे मोठेपण सिद्ध करुन गेली.
तसेच उद्घाटक माजी प्राचार्य दत्ता पवार यांनी कोकणच्या विकासात अडथळा ठरणारी कोकणी मानसिकता यावर सडेतोड भाष्य केले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या राजापूर- लांजा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 1953 मध्ये स्थापन झाल्यानंतर गेली 68 वर्षे दोन्ही तालुक्यांमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या या संस्थेने गेल्या दशकभरात आपल्या कामाचे स्वरूप बदलत साहित्य, शिक्षण, संस्कृती ,कला ,क्रीडा ,आरोग्य, कृषी पर्यटन व पर्यावरण क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत या दोन तालुक्यातील समाजभान जपणारी लोकाभिमुख संस्था म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. दुस-या दिवशी संघाने विविध क्षेत्रात क्रियाशील असलेल्या पुरस्कार प्राप्त विजेत्या २५ मान्यवरांचा हृदयस्थ सन्मान करित त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. कोकणातील या २५ सत्कारमूर्तींना आगमी काळात अधिकचे काम करण्याचे बळ देणारा हा पुरस्कार सोहळा म्हणूनच महत्वाचा ठरतो.
गेल्या ५० वर्षात साहित्यात प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. शिक्षणाच्या प्रचाराने ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या हाती लेखणी आली. आत्मभान जागृत झालेल्या नव्या अंकुराने मग मनात निर्माण झालेले प्रश्न ,कल्पनांचे प्रकटीकरण पुस्तकांच्या माध्यमातून केले.यातून महाराष्ट्रात नवसाहित्य ,दलित साहित्य, आदिवासी साहित्य ,मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य असे विविधांगी प्रवाह निर्माण झाले. व्यक्त होणाऱ्या या नव्या सारस्वत पुत्रांना व्यासपीठ मिळावे म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात छोट्या -छोट्या साहित्य संमेलनांची आवश्यकता भासू लागली. यातूनच मध्य महाराष्ट्र ,विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात विविध प्रारूपात साहित्य संमेलने यशस्वी संपन्न होत असताना 'बुद्धिजीवी लोकांचा प्रदेश' अशी ओळख मिरवणाऱ्या कोकणात मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था अशी संमेलने आयोजित करीत असतात.यात कोमसापचे नाव अग्रक्रमाने येत असले तरी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लेखक व कवींना आपले हक्काचे वाटावे अशा संमेलनाची तीव्र आवश्यकता होती ,ही जाणीव व साहित्यिकांचा अक्षरोत्सव समाजात परिवर्तन घडू शकतो हे लक्षात घेऊन माय मराठीवर नि:स्सीम प्रेम करणार्या श्री सुभाष लाड यांनी राजापूर -लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने सन 2015 मध्ये ग्रामीण साहित्य संमेलनाचे पहिले पुष्प तळवडे, ता.लांजा येथे गुंफले. यंदा संघाचे सातवे संमेलन 'आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्ली- खोरनिनकोच्या ' प्रांगणात ज्येष्ठ समीक्षक वि.शं.चौघुले साहित्यनगरीत संपन्न झाले .या संमेलनातून ग्रामीण साहित्य संस्कृतीच्या अभिसरणासोबत ग्रामीण भागातील प्रतिभाशक्तीला ,सर्जनशीलतेला मोठा वाव मिळाला आहे.प्रभानवल्ली सारख्या दुर्गम खेड्यातील २५ मुलींनी लिहिलेल्या ५० कवितांचे सौ.प्रिया मांडवकर यांनी संपादित केलेल्या काव्यांकुर कवितासंग्रहाच्या प्रकाशन हा क्षण या मुलीना कवयित्री झाल्याचा आनंद देणारा ठरला.शालेय वयातच या मुलांचे पुस्तक प्रकाशित झाल्याने त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस प्रोत्साहन मिळणार असून यातून उद्याचे साहित्यिक घडणार आहेत.याचे श्रेय संघाच्या या उपक्रमाला द्यावेच लागेल. याचबरोबर बाबू घाडीगावकर या मालवणी लेखकाच्या ' वणवा ' , विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या ' अशी घडली राजस्विता ' या पुस्तकांच्या प्रकाशनाने संघाचे हे संमेलन नवोदितांना व्यासपीठ देणारे आहे हे सिद्ध करणारे ठरले.
स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या पर्यटन समृद्ध प्रभानवल्ली- खोरनिनको परिसराच्या पर्यटनात्मक वृद्धीसाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने यातून विशेष प्रयत्न केले गेले. आठव्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या प्रभानवल्ली खोरनिनको गावांच्या पर्यटनासाठी संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी शब्दबद्ध केलेले माझे प्रभानवल्ली गाव माध्यमांवर प्रसारित झाल्याने या गाण्यातून या गावांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. या गाण्याला सुनिल जाधव यांनी संगीतबद्ध केले असून प्रभानवल्लीची सुकन्या कु.भैरवी जाधव हिने सुमधुर आवाजात गायिलेल्या या गाण्याला लोकांच्या उदंड प्रतिसाद मिळत आहे.साहित्यासोबत गावातील पर्यटनस्थळांची जाहिरातबाजी करुन ग्रामीण रोजगारासाठी प्रयत्न करणारे हे संमेलन म्हणुनच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
अलीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी घोषणा या खात्याच्या मंत्री महोदयांनी केली. एकीकडे माय मराठी अभिजात भाषा होत असताना दुसरीकडे आपण मात्र आपल्या मुलाला मातृभाषेपासून तोडून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवू लागलो आहोत. ग्रामीण भागात हे लोण आता पसरू लागले आहे. इंग्रजी ही भाषा अत्यावश्यक असली तरी पण तिचे अनाठाई आकर्षण टाळायला हवे.इंग्रजी आवश्यक म्हणून मराठी माणसाने आपल्या घरातील वातावरण इंग्रजाळून टाकावे का? मराठी मातृभाषा म्हणून अधिक अभिमानाने आज वर्गावर्गात शिकवली गेली पाहिजे. या दृष्टीने मराठी अध्यापन करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांवरील दायित्व वाढले पाहिजे. आज-काल मराठीचे प्राध्यापकांचे वाचन कमी झाले आहे असा दुर्दैवी सूर ऐकू येत असल्याने मराठीच्या भरणपोषणासाठी मराठीच्या अध्यापनकर्त्यांनी अभ्यासक्रमाच्या कक्षेत स्वतःला कोंडून न घेता तिच्या बाहेर पडून साहित्याच्या क्षेत्रावरही दृष्टिक्षेप केला पाहिजे. मराठी भाषा व साहित्याशी जिव्हाळ्याचा संबंध त्यांनी निर्माण करायला हवा.आपण मराठी संस्कृती चे वाहक आहोत हे त्यांनी जाणायला हवे. आज विज्ञानशिक्षण संपूर्णपणे इंग्रजीवर अवलंबून ठेवलेले असल्यामुळे बुद्धिमान मराठी विद्यार्थी पूर्वप्राथमिक वर्गापासूनच मातृभाषेपासून संपूर्णपणे तुटून पडला आहे .वस्तुतः भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनाचे काम ज्यांच्या हातून घडायचे त्यांच्या मनातील मातृभाषेबद्दल ची श्रद्धा व प्रेम यांचे खच्चीकरण होत आहे. यासाठी मराठी पालकांचे प्रबोधन करायची वेळ आली आहे.सोबतच मराठी शाळांनीही आपली गुणवत्ता सिद्ध करुन पालकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करायला हवी.
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी."
--- या दृष्टीने मातृभाषेची संपन्नता व समृद्धता प्रयत्नपूर्वक टिकवण्यासाठी संघाच्या ग्रामीण संमेलनाला एक वेगळे महत्त्व आहे.यासाठी लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली धडपडणारे गणेश चव्हाण,स्नेहल आयरे ,आशा तेलंगे, गणपत शिर्के ,महेंद्र साळवी,विजय हटकर, दिपक नागवेकर ,प्रकाश हर्चेकर,विराज चव्हाण, प्रमोद मेस्त्री, मंगेश चव्हाण,विनोद बेनकर या टिमचा उत्साह लाजवाब होता. संघाची मुंबई समितीचे पदाधिकारी ,स्थानिक शाखांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. एकुणच संमेलनात क्रांतीज्योत फेरी, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन ,शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, कोकणचा निसर्ग मांडणारे छायाचित्र प्रदर्शन, दगडी शिल्प प्रदर्शन ,आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले अमूर्त चित्र प्रदर्शन ,काव्यसंमेलन, नामवंत साहित्यिकांचा परिसंवाद ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुस्तक प्रकाशन, कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान सोहळा,कोकणात स्थायिक झालेल्या तरुणांशी विवाह करणाऱ्यां वधूंचा सत्कार ,लोककला व मनोरंजन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाले.या कार्यक्रमातून मुचकुंदि नदीच्या काठी साहित्य संस्कृतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोकणच्या लाल मातीत साहित्याचे बीजारोपण करणारा हा मराठी भाषेचा सोहळा भविष्यातील साहित्यिक घडविणारा साहित्यिक मंच ठरेल याचा दृढ विश्वास आहे.या दृष्टीने साहित्य संस्कृती चे हे सोहळे निकोप समाजनिर्मितीसाठी अत्यावश्यक ठरतात.
✒️✒️✒️✒️
विजय हटकर.
No comments:
Post a Comment