अशोक राजाराम पालांडे
'जी माणसे पायाने चालतात ,ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चित ध्येय गाठतात' हे विधान अशोक पालांडे या कोकणी उद्योजकाला तंतोतंत लागू पडतं याची प्रचीती आणणारी अशोक पांडे यांची यशोगाथा
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील स्वर्गीय सुंदर प्रभानवल्ली हे अशोक पालांडे यांचे मूळ गाव. मुचकुंदी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेल्या या समृद्ध गावात १३ फेब्रुवारी १९५८ रोजी अशोकरावांचा जन्म झाला. गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला मामाकडे त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांचे मामा श्री घाग हे मूळचे लांजा तालुक्यातील सालप्याचे. स्वकष्टातून त्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी १९८० च्या दशकात जनरल स्टोअर्स आणि लॉटरीचे काहीच स्टाॅल उभारून व्यवसायात जम बसवला होता .मामाकडे राहणारा छोटा अशोक दिवसभर मामाचे लॉटरी दुकान सांभाळायचा तर सायंकाळी ६:४५ ते ९:४५ या वेळेत रात्रशाळेत जाऊन अभ्यासासोबत भविष्याचे स्वप्न रंगवायला. बघता बघता विटी मध्ये तीन वर्ष सरून गेली. नववीपर्यंत शिक्षण घेऊन अशोकरावांनी रात्रशाळेत जाणे बंद केले व १९७५ मध्ये विटी स्टेशन ला स्वतःचा लॉटरी स्टॉल सुरू केला. लॉटरी हा नशिबाचा खेळ .लॉटरी बद्दल अनेकांना कुतूहल व उत्साह असतो कारण लॉटरीच्या एका तिकीटाने अनेकांना लखपती बनवले आहे .मुंबईसारख्या मायानगरीत स्वतःचे नशीब वाजवायला आलेले अनेक तरुण लॉटरीचे तिकीट काढतात व लखपती होण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे अशोक चा लॉटरी चा व्यवसाय उत्तम चालला होता. १९७५ ला दिवसाला शंभर रुपये एवढा फायदा त्याला व्हायचा. यादरम्यान त्यांचे वडील गावाकडे परत आले .आपल्या मागे मुंबईसारख्या ठिकाणी आपला मुलगा वाईट संगतीला लागेल याची त्यांना भीती होती. योगायोगाने त्याच वेळी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या वापी या औद्योगिक शहरात अशोकरावांच्या भाओजींची झेंडू फार्मासिटीकल सर्व्हिस कंपनीत बदली झाली. अशोकरावांच्या वडिलांनी आपल्या मुलाला वापीला पाठवण्याचा निर्णय घेतला. १९७६ ला मुंबईत लॉटरी व्यवसायात स्थिरस्थावर होण्याचा मार्गावर असलेल्या अशोक पालांडे यांना वडिलांच्या रेट्यामुळे मुंबई सोडून वापी ला जावे लागले . आयुष्यात आलेले काही योगायोग विलक्षण असतात . वडिलांनी केलेल्या सूचनेप्रमाणे वापीला जाण्याचा अशोकरावांचा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
गुजरात मधील वापी शहर १९७६ ला फार विकसित झाले नव्हते. फार मोजक्या कंपन्या येथील गुजरात औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीच्या आरक्षित जागेत बस्तान बसवित होत्या. यातीलच एका कंपनीत माहे शंभर रुपयांच्या पगारावर अशोक पालांडे यांना नोकरी मिळाली. मुंबईत दिवसाला शंभर तर येथे महिन्याला शंभर रुपये मिळणार असल्याने सुरुवातीला अशोकरावांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली,मात्र वडिलांना दिलेला शब्द पाळायचा ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या अशोक पालांडे यांनी त्याही स्थितीत वापीला काम करण्याचे ठरवले
१९७९-८० मध्ये त्यांनी फार्मासिटिकल व केमिकल कंपन्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या मशिनरी बनवणार्या एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. या कंपनीने खऱ्या अर्थाने अशोकरावांच्या जीवनाला दिशा मिळाली. प्रचंड कष्ट ,सतत नवीन शिकण्याची तयारी यामुळे या कंपनीत पाच वर्षाच्या काळात केमिकल कंपन्यांसाठी मशिनरी तयार करण्याचे तंत्रज्ञान अशोकरावांनी आत्मसात केले. त्यामुळे मोठं काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. याच वेळी वापी शहरात बंद पडलेली 'स्टार इंडस्ट्रियल सिस्टम' ही कंपनी चालवायला द्यायची आहे ही बातमी त्यांच्या कानावर आली .त्यांनी ही संधी साधायची ठरवली आणि एका भांडवलदार मित्राने अर्थसहाय्य करण्याचा शब्द दिल्यावर ही कंपनी चालवायला घेतली. या कंपनीच्या माध्यमातून लहान-मोठ्या ऑर्डर घेत वापीच्या औद्योगिक वसाहतीत अशोक पालांडे यांनी आपला चांगलाच जम बसवला.
हे करीत असतानाच फॅब्रिकेशन चे स्वमालकीच्या वर्कशॉप सुरू करण्यासाठी पालांडे यांनी गुजरात सरकारकडे या औद्योगिक वसाहतीत जागा मागितली. साधारण पाच वर्षांनी १९९० च्या दरम्यान त्यांना ही जागा मिळाली आणि पुन्हा अशोकरावांनी नव्याने सुरुवात केली. मेहनत, कष्ट आणि विश्वासाच्या जोरावर नववी शिकलेला अशोक पालांडे या मराठी युवकाने गुजराती लोकांच्या राज्यात "क्रोनीकेम फेब " नावाच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. आज २०२२ मध्ये मागे वळून पाहताना काही कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या या कंपनीने आपल्या गुणवत्तापूर्ण कामाने अभियांत्रिकी क्षेत्रात मानदंड निर्माण केले आहेत. देशात कधीकाळी अशक्यप्राय मानलेला कोकण रेल्वे प्रकल्प २६जानेवारी१९९८ ला कार्यान्वित झाला .या शतकातील भारतीय चमत्कार असे या रेल्वेचे वर्णन करावे लागेल. या कोकण रेल्वेच्या उभारणीत 'क्रोनीकेम फॅब ' चे लक्षणीय योगदान आहे. कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ५९२ लहान मोठे बोगदे आहेत. त्या बोगद्याचे सबकाॅन्ट्रक्ट अशोक पालांडे यांच्या कंपनीला मिळाले .बोगदा खोदकाम करताना बोगदा कोसळू नये तसेच कायम स्वरूपाची सुरक्षितता मिळवून देण्यासाठी बोगद्यात अर्धवर्तुळाकृती सिमेंट - काँक्रीटचे बांधकाम करावे लागते. त्यासाठी वैशिष्टपूर्ण मशनरी बनवावी लागते. त्याचे उत्पादन पालांडे यांनी सक्षमपणे केले. आज क्रोनीकेम फॅब देशभरात विविध राज्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सज्ज झाली आहे.
उद्योग क्षेत्रात जिद्द आणि अविरत संघर्षाचा जोरावर उत्तुंग झेप घेणाऱ्या अशोक पांडे यांनी सामाजिक भान जपत विविध समाजोपयोगी उपक्रमात सढळ हस्ताने मदत केली आहे.आज वापी शहरात लाखाच्या आसपास मराठी भाषिक लोक स्थायिक झाले आहेत. त्यांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र मित्र मंडळ संस्थेच्या माध्यमातून ' केळकर वझे मराठी शाळा' वापी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन एकर जागेत उभारण्यात आली आहे. या संस्थेचे पालांडे संचालक आहेत. चिपळूणमध्ये वाशिष्टी च्या महापुराने प्रलय आल्यावर पालांडे यांनी तब्बल नऊ लाखाचे जीवनावश्यक सामान भरून दोन ट्रक तात्काळ पाठवत समाजभान जपले.तसेच कोरोना काळातही त्यांनी मौलिक कामगिरी केली आहे.
मराठी माणूस व्यवसायात यशस्वी होत नाही, व्यवसाय करावा तो गुजराती-मारवाडी यांनीच.असे म्हटले जात असताना कोकणच्या या कर्तुत्ववान सुपुत्राने गुजरात मधील वापी शहरात यशस्वी उद्योजक म्हणून आदराचे स्थान मिळवले आहे. प्रभानवल्लीचा कर्तुत्वान सुपुत्र अशोक पालांडे यांचा म्हणूनच संघाला अभिमान वाटतो .आता त्यांचे चिरंजीव विनोद पालांडे हे मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा व्यवसाय विस्तारू पाहत आहेत . या पिता-पुत्रांना संघाच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने मनस्वी दंडवत !
विजय हटकर.
८८०६६३५०१७
13'frb20202
हॅट्स ऑफ हिम proud of u ahokji
ReplyDeleteहे वाचून खूप आनंद आणि अभिमान वाटला. महाराष्ट्राबाहेर जाऊन कर्तबगारी करणाऱ्या मराठी माणसांच्या माहितीची मी जमवाजमव करत आहे, त्यासाठी हा लेख उपयुक्त वाटतो.
ReplyDeleteखूप छान लेख लिहिला आहे
Deleteसर धन्यवाद 🙏।। आपल्या लेखनातून पप्पांचा जीवनपट सुंदर शब्दात मांडलात
ReplyDeleteखूप छान शब्दात मांडला प्रवास
ReplyDelete