Thursday, February 10, 2022

प्रभानवल्लीचे राजघराणे : सावंत प्रभावळकर

 प्रभानवल्लीचे राजघराणे : सावंत प्रभावळकर व कुडाळचा प्रभावळकर वाडा.

   प्रभानवल्लीच्या राजाचा झेंडा कुडाळपर्यंत


  

मुचकुंद ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रभानवल्लीला जसा महाभारतकालीन इतिहास आहे तसा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मातीत  तोलामोलाची साथ देत पराक्रम गाजवून इतिहासात अजरामर झालेल्या पण कालौघात दुर्लक्षित राहिलेल्या एका निष्ठावंत राजघराण्याचा इतिहास आहे. हे कर्तृत्ववान राजघराणे म्हणजेच सावंत प्रभावळकर घराणे होय . या घराण्याचा इतिहास म्हणजे स्वराज्यातील एक पेटती मशालच आहे!

      या सावंत प्रभावळकर घराण्याचे मूळ पुरुष राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  इ. स. १६६० च्या कोकण मोहिमेत सहभागी झाले होते. या राजे प्रभामवल्लीकरांची राजधानी प्रचितगडावर होती. विशाळगडाच्या शेजारी यांचे प्रभानवल्ली (प्रभावळी) हे छोटे राज्य होते . विजापूरच्या दरबारात राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर हे पहिल्या दर्जाचे मानकरी सरदार होते.  २९ एप्रिल १६५१  रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभानवल्लीवर हल्ला चढवला आणि प्रभानवल्ली चे राज्य जिंकून घेतले. मात्र प्रभावळकरांचा कल पाहून त्यांना आपले सहकारी बनवले व प्रभावळकरांचा स्वराज्य स्थापनेत योग्य तो उपयोग करून घेतला.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेत राजे सुर्यराव सहभागी झाले होते. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडकर राजे लखमसावंत,विजापूरचा सरदार खवासखान यांच्यात झालेल्या लढाईत नेताजी पालकर, तानाजी मालसुरे यांच्या समवेत राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर यांनी फार मोठा पराक्रम गाजवला. या लढाईत खवासखानाच्या मदतीला मुधोळचा  सरदार बाजी घोरपडे दीड हजार घोडदळासह  फोंडा घाट उतरून येत होता. छत्रपती शिवाजी राजांनी सूर्यराव प्रभानवल्लीकरांच्या सैन्याला बाजीवर चाल  करून जाण्यास सांगितले. सूर्यरावांनी बाजीच्या सैन्याला फोंडा घाट उतरतानाच हरकुळ खुर्द येथे गाठले.या लढाईत बाजी घोरपडे मारले गेले व शिवरायांनी मुधोळ काढून त्यावर कब्जा मिळवला. पुढे बाजी चा मुलगा मालोजीरावला मु्धोळची जहागिरी त्यांनी दिली.

  मुधोळच्या घोरपडे घराण्यात सुर्यरावांची कन्या कमला होका दिलेली होती.कुडाळ ला झालेल्या युद्धात छत्रपती शिवरायांना दिलेला शब्द पाळत सुर्यराव प्रभानवल्लीकरांनी मुधोळच्या घोरपड्यांच्या विरोधात लढाई केली.त्यांचा पराभव करित राजनिष्ठा जोपासली.


       या लढाई सह वेंगुर्ले येथील डच वखार आणि मालवण बंदर लुटीच्या मोहिमेत शिवरायांबरोबर सर्जेराव जेधे ,नेताजी पालकर, तानाजी मालसुरे, राजा सूर्यराव प्रभानवल्लीकर व पिलाजी निळकंठ हे सरदार सामील झाले होते .एकूणच कोकण विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राजे  सूर्यराव प्रभानवल्लीकरांवर दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज खुश होते .कुडाळच्या विजयाची निशाणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा सूर्यराव प्रभानवल्लीकरांना  कुडाळभुईकोट नजीक आणि नेरूळ येथील जमीन बक्षीस म्हणून दिली.कुडाळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या किल्ल्याच्या खंदकाच्या आतील मोक्याची जमीन त्यांनी  सुर्याजीरावांना  बहाल केली. या ठिकाणी प्रभानवल्लीकर घराणे स्थायिक झाले. नंतर याच ठिकाणी सूर्यरावांचे पराक्रमी नातू  कान्होजीराजे यांनी आपल्या भावांसह १७५७ मध्ये भव्य चौसोपी वाड्याची उभारणी केली .१७५७ च्या  गुढीपाडव्याला या वाड्यात प्रभावळकरांनी गृहप्रवेश केला .आज तब्बल २६५ वर्षानंतर प्रभानवल्लीकरांच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतिक म्हणून हा ऐतिहासिक वाडा कुडाळ एसटी बस स्थानकामागे दिमाखात उभा आहे . साधारण चार फूट उंच व भक्कम जोत्यावर बांधलेला हा  वाडा पाहून प्रभानवल्लीकरांच्या सामर्थ्याची कल्पना येते.

२६५ वर्षाचा वाडा.


पानिपतच्या लढाईत प्रभानवल्लीकरांचा पराक्रम :- 

      १७५७ मध्ये कान्होजी राजांनी कुडाळमध्ये वाडा बांधल्यानंतर गृह प्रवेशाचे होमहवन, ब्राह्मणभोजन, गाव भोजन वगैरे कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भवानी चा गोंधळ घातला .या नंतर दुसऱ्या दिवशी पेशव्यांकडून जासुस त्यांना भेटावयास आला. पॆशवे सदाशिवरावांनी उत्तरेकडे मोहीम काढली असल्याने त्यांना लढाईसाठी बोलावणे धाडले होते. कान्होजी राजे आपल्या भावांसह कोल्हापूर मार्गे पुण्याला पोहोचले व पेशव्यांस सोबत उत्तर मोहिमेत सामील झाले. पानिपतच्या लढाईत कान्होजीराजे प्रभानवल्लीकर व त्यांचा भाऊंनी फार मोठा पराक्रम केला . त्यांची तुकडी अब्दालीच्या निशाणा पर्यंत पोहोचली होती परंतु नंतर परत मराठ्यांचा  पाडाव होऊ लागला व कान्होजी राजे व त्यांचे दोन भाऊ या ऐतिहासिक लढाईत धारातीर्थी पडले. अशा पद्धतीने पानिपतच्या लढाईत प्रभावळकरांची तरुण उगवती पिढी कामी  आल्याने पेशवाई नंतर मात्र या प्रभावळकर घराण्यातील वंशजांना फार हालाखीचे जीवन जगावे लागले. या घराण्यातील लोक आज मध्यमवर्गीयांप्रमाणे पांढरपेशे जीवन जगत आहेत . कुडाळ येथील ऐतिहासिक वाड्यात त्यांचे सध्या वास्तव्य आहे.


प्रभावळकर घराण्यातील पराक्रमी पुरुष व विशेष बाबी :--

१) रामचंद्र उर्फ राम प्रभावळकर  हे तामिळनाडूतील चेन्नई येथील उद्योगजगतात प्रसिद्ध उद्योजक व मराठी साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत.

२)१९३९ साली या घराण्यातील दादासाहेब प्रभावळकरांनी इंग्रजी मधले जेकब प्राईझ मिळवले. ते त्यावेळची कठिण मॅट्रिक परिक्षा पास झाले होते.दादासाहेब अकाउंटंट जनरल आॅफिसमध्ये सुपरिटेंडंट होते.

३) विजयनगरचा राजा कृष्णदेवरायाच्या राज्याभिषेकावेळी  प्रभावळीचा राजा जातीने उपस्थित होता. कृष्णदेवरायासोबत त्यांचे जवळचे संबंध होते.

४) १६५१ मध्ये कोकणात दळव्यांकडून दाभोळ छत्रपती शिवरायांनी ताब्यात घेतले.शिवाजी महाराजांच्या चढाईचा धसका घेऊन पालवणीचा राजा जसवंत याने प्रभानवल्लीचा राजा सुर्यरावाकडे आश्रय घेतला.यावरून प्रभानवल्लीच्या सामर्थ्याची कल्पना येते.

५) प्रभावळकरांची राजधानी प्रचितगडावर होती.सुमारे २५००० पायदळ, १०००० घोडदळ व १०० हत्ती ,उंट तोफा असे प्रभावळीचे सैन्य होते. प्रभावळित अर्थात आजच्या प्रभानवल्ली येथे महत्वाची गढी (छोटा किल्ला) होता.कोकणातील ते महत्वाचे व्यापारी ठाणे होते.परंतु शत्रुंपासून संरक्षणाच्या दृष्टीकोनातून उंच अघड असलेल्या प्रचितगडावर प्रभावळकरांनी राजधानी थाटली होती.येथेच हत्तीशाळा, अश्वशाळा,शस्त्रागार,श्री भवानीचे देऊळ इ.महत्वपूर्ण गजबजलेली  स्थळे होती.हा किल्ला वर्षभर लढविता येईल इतकी रसद किल्ल्यावर होती.अशा प्रकारे प्रभावळी भरभराटीला आलेले कोकणातील छोटे राज्य होते.


५) मुंबईच्या महापौरांनी मध्यंतरी कुडाळला भेट दिली त्यावेळी कुडाळातील इतिहासप्रसिद्ध वास्तू म्हणून प्रभावळकरांचा ऎतिहासिक चौसोपी वाडा दाखविण्यात आला.


६)प्रथेप्रमाणे प्रभावळकरांच्या वाड्यात न चुकता आई भवानीचा गोंधळ संपन्न होतो.वाड्यातील देवघर शिवकाळाची साक्ष देते.


देवघरातील श्री देवी भवानीची मूर्ती

७) मालवणचा किल्लेदार सकपाळांची कन्या शांता फार धाडसी होती.समुद्रातील लाटांशी खेळणारी धाडसी मुलगी प्रभावळकरांची सुन झाली.तिचे नाव पुढे सरस्वती ठेवण्यात आले.

८) प्रजाभिमूख राजे म्हणून प्रभावळकर प्रसिद्ध होते.

एकूणच इतिहासात ज्ञात असलेल्या पण समान्य लोकांना अज्ञात असलेल्या या पराक्रमी राजघराण्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठीच हा लेखनप्रपंच.


विजय हटकर.

८८०६६३५०१७


वाड्यातील देवघर. 

कुुुुुुडाळ येथील वाड्याचा दरवाजाा.




No comments:

Post a Comment