Tuesday, March 1, 2022

गजाभाऊ वाघदरे - कोकणातील कणखर बाण्याचा पत्रकार

     गजाभाऊ वाघदरे - कोकणातील कणखर बाण्याचा पत्रकार



लांजा तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंदोलन तुमचे आमचे या साप्ताहिकाचे संपादक गजानन शंकर उर्फ गजाभाऊ वाघदरे मंगळवार दि.१ मार्च २०२२ रोजी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत .त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाप्रती कृतज्ञता म्हणुन रविवार दि. २७ फेब्रुवारी २००२ रोजी लांजा येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्ताने त्यांच्या व्रतस्थ जीवनाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .आयुष्यभर गोरगरिबांच्या उन्नतीसाठी झटणारे ,त्यांच्यासाठी आपल्या घराचा दरवाजा सदैव उघडा ठेवणारे गजानन वाघदरे दैनंदिन जीवनातही सार्वजनिक वावरल्याने ते सार्वजनिक गजाभाऊ  म्हणून  ओळखले जाऊ लागले.त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा व्रतस्थ जीवनपट ..

       खरेपणाबरोबर साधन शुचितेची तमा पूर्णपणे संपलेली नाही, याची ग्वाही देणारा साने गुरुजींचा एक शिष्योत्तम लांज्यात आहे ते म्हणजे गजाभाऊ. गजाभाऊ व्यवसायाने मुद्रण व्यवसायिक आहेत.लांजा शहरातील पोस्ट गल्लीत असलेल्या त्यांच्या स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस ने यंदा यशस्वीतेचे अर्धशतक पूर्ण केले. मुद्रण व्यवसायातील या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत कोकणातील अनेक नव्या गुणवान लेखकांशी गजाभाऊंचा संबंध आला. या नव्या दमाच्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाऊंनी 'आंदोलन प्रकाशन' ची निर्मिती केली. या प्रकाशनाच्या माध्यमातून अनेकांच्या लेखणीला पुस्तकरुपी आकार दिला.

    १९६० च्या दशकात कोकणात शिक्षणाच्या सोयीसुविधा आजसारख्या विकसित झाल्या नव्हत्या.अशा काळात गजाभाऊंनी खोरंनिनको, प्रभानवल्ली आणि वेरवली येथे अनट्रेन्ड प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत तेथील बालमनाला दिशा देण्याचे प्रयत्न केले.पुढे तालुक्याच्या ठिकाणी अर्थात लांजा शहरात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये लिपिक म्हणून नोकरी केली.यावेळी लांजा हायस्कूलला त्यांचे मित्र आदम माफारी चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिवाय रखांगी सर व नाटेकरसर ही गुरूवर्य मंडळी असल्याने या लिपिक पदाच्या काळात त्यांना कोकणात नव्याने उभारलेल्या शिक्षण संस्थांच्या समोरील समस्या लक्षात आल्या.पुढे त्यांनी लिपिक पदाचा राजीनामा देत मुद्रण व्यवसायात स्वत:ला गुंतविले असले तरी लांजा हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी रखांगी सर व आदम मापारी या मित्रासोबत खेड्यापाड्यात फिरून शैक्षणिक उठाव करित हायस्कूल चालविण्याच्या कामी सहकार्य केले आहे.या साठी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करित हायस्कूलच्या मदतीसाठी रिंगणे गावचे नाटककार मराठी रंगभूमीचे शेक्सपिअर ला.कृ.आयरे यांचे स्वराज्यरवि या ऎतिहासिक  नाटकाचा प्रयोग त्यांनी केला होता.या नाटकात शशिकांत पुरोहित आणि प्रभाकर देसाई यांनी स्त्री पात्राची भूमिका साकारली होती.हेच नाटक पहिल्या महाराष्ट्र दिनानिमित्तही गजाभाऊंनी शासनाच्या वतीने १ मे १९६० रोजी केले होते.या नाटकासाठी आदम मापारी, बापू शेट्ये सुरेश वाघदरे ,रामसिंग सर  यांनी सहकार्य केल्याने यातून हायस्कूलच्या विकासासाठी काही फंड उभा राहिला.एकूणच हायस्कुलच्या माध्यमातून गरीबीनं गांजलेली अन् मागास समाजातील मुलं शिकून पुढं यायला हवीत या साठीच त्यांची धडपड सुरु होती.

          लांजा तालुक्यातील वाचनालय चळवळ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे कार्यदेखील दखलपात्र असेच आहे .शहरातील वर्धिष्णू संस्था लोकमान्य वाचनालय मध्यंतरीच्या काळात बंद पडलेली असताना तिला उभारी देण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच खावडी येथील वाचनालयही श्रीरामभाऊ देसाई यांच्या सहकार्याने पुन्हा सुरू केलेत. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या दक्षिण रत्नागिरीतील सर्वात जुन्या संस्थेने पत्रकारिता ,साहित्य क्षेत्रातील आपल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना  राणी लक्ष्मीबाई चे मूळ गाव कोट ,तालुका लांजा येथे संपन्न झालेल्या पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान  दिला .यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण हे लांज्याच्या साहित्य चळवळीचा दस्तऐवज ठरावा इतके अभ्यासपूर्ण होते.या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित केले जाते. या चांगल्या कार्यक्रमाचे कौतुक करीत भाऊंनी आपले सन्मित्र व नामवंत कवी सुभाष लाड यांच्या प्रेमापोटी नाटे , ता. राजापूर येथे संपन्न झालेल्या सहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनापासून साहित्य , पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी अक्षर मित्र पुरस्कार देण्याची घोषणा करीत त्याचा प्रायोजकत्व स्वीकारले. नामवंत अभिनेते व साहित्यिक नारायण जाधव यांना या पुरस्काराच्या पहिल्या वर्षी सन्मानित केल्याने या पुरस्काराचे प्रतिष्ठा वाढली आहे.



      सहकार क्षेत्रातही भाऊंनी  मार्गदर्शक भाई नारकर, बाळासाहेब पाटील, बबन मयेकर या सहकाऱ्यांच्या साथीने सह्याद्री गृहतारण सहकारी संस्था लांजा या संस्थेची उभारणी करीत तालुक्यात सत्तावीस सदनिका बांधल्या. व या २७ कुटुंबियांचे घराचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावला.  जनता सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या सहकारी संस्थेच्या स्थापनेत भाऊंचे मोलाचे योगदान आहे. या पतसंस्थेच्या सुरुवातीच्या काळात या संस्थेसाठी भाऊंनी  बाजारात फिरून पिग्मी गोळा केली. मात्र त्यांनी मार्गदर्शक  भाई नारकरांप्रमाणेच  संचालक पदाचा अट्टाहास कधीच धरला नाही.

       गत पन्नास वर्षात वेगवेगळ्या कामांचा अनुभवाने माणसे ओळखण्यात आलेली परिपक्वता, सामाजिक - साहित्यिक क्षेत्रातील क्रियाशील समृद्धता  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रौढता प्राप्त करून देते. वयाच्या ८४व्या वर्षात देखील गजाभाऊंचा उरक आणि उत्साह अशक्य कोटीतला आहे. या वयातही त्यांनी त्यांचे  सन्मित्र आणि मुंबई येथील सुप्रसिद्ध हॉटेल आस्वाद चे मालक श्रीकृष्ण सरजोशी यांच्या  हस्तलिखिताचे  रुपांतर दिवस-रात्र एक करीत मुद्रितशोधन करीत पुस्तकात केले.या वयातही लेखन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. म्हणूनच ८१ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'मळवाट' या कथेवर दिवाकर मोहितेंसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने नुकताच कोकणात 'मनफितुर ' या चित्रपटाचे चित्रिकरण केले.लवकरच तो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.८०व्या  वर्षानंतर लेखन केलेल्या कथेचे चित्रपट तयार होणं ही गोष्टच भाऊंच्या प्रतिभाशली लेखणीचे सामर्थ्य अधोरेखित करणारी आहे.लांजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात भाऊंना पथदर्शक आणि दीपस्तंभ मानणारे सर्व क्षेत्रात वयोगटात आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

          बॅ.नाथ पै ,प्राध्यापक मधु दंडवते यांचा सहवास त्यांचे  व्यक्तिमत्व व विचारांची बैठक पक्की करण्यास कारणीभूत ठरला. गजाभाऊ यांचा  पिंड सच्च्या पत्रकाराचा. सत्यम शिवम् सुंदरम् यावर आढळ निष्ठा असणा-या भाऊंना असत्याविषयी प्रचंड चीड आहे आणि म्हणूनच साप्ताहिक 'आंदोलन तुमचे आमचे ' च्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या अन्यायकारक घटना, भ्रष्ट व्यवस्था व सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढा-यांवर ते आपल्या खास शैलीत अासूड ओढतात. साप्ताहिक आंदोलनाच्या माध्यमातून भाऊंनी  विशुद्ध पत्रकारितेचा ध्वज अधिक उंच उंच फडकवण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे.एकूणच लांजा हायस्कूल, ज्युनियर काॅलेज, सिनियर काॅलेज, विविध सेवाभावी सहकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी केलेला पाणीपुरवठा व्यवस्थेचा पाठपुरावा व त्यात मिळालेले यश हे त्यांच्या कार्याचे दीपस्तंभ आहेत.नुकतेच त्यांचे 'झाकोळ' हे आत्मकथन प्रकाशित झाले. हे पुस्तक 'दुरितांचे तिमिर जावो मधील दुरितांना ' त्यांनी अर्पण केले आहे.आपल्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेवरून दुरिंतांविषयी आस्था दाखविणारे गजाभाऊ म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.व आमच्यासारख्या क्रियाशील वावरणाऱ्यांना ते आदर्श वाटतात.  आज ८४ व्या वर्षात ते पदार्पण करीत आहेत.येणाऱ्या काळात त्यांनी शतायुषी आनंददायी जीवन जगावे,त्यांच्या हातून अधिकचे सत्कार्य घडावे हीच शुभकामना!  गजाभाऊंमधल्या व्रतस्थ माणसाला हार्दिक दंडवत!


विजय हटकर

लांजा 

           

       


    ५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात नाटककार दशरथ राणेंसोबत


 
'गजाभाऊ' गौरवांकाच्या प्रकाशनावेळी.

 गजाभाऊ वाघदरे यांच्या गौरव सोहळ्यानिमित्ताने बोलताना श्री सुभाष लाड.

झाकोळ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी मान्यवर..