Wednesday, April 24, 2024

लेकीचा वाचनध्यास

लेकीचा वाचनध्यास...



२४ एप्रिल हा दिवस सर्व भारतीयांना लक्षात राहतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस म्हणुन.सचिन माझा सर्वात आवडता खेळाडु.त्याची प्रत्येक मॅच मि पहात असे. सांगायचं काय तर, माझ्या आयुष्याला दिशा देणा-या माझ्या प्रिय बाबांचाही २४ एप्रिल हाच जन्मदिवस. आज याच शुभदिनाचे अौचित्य साधत इयत्ता तिसरीत शिकणारी माझी लेक कु.विधीची लोकमान्य वाचनालय लांजा या ठिकाणी बालवाचक म्हणुन नोंदणी केली.


        मुंबई -गोवा महामार्गावर वसलेल्या छोटेखानी लांजा शहरातील बाजारपेठेत माझ्या बाबांची 'पानगादी 'होती.बाबांच्या या छोट्याश्या पानगादी वर रोज सकाळी अनेक जण खास ' नवाकाळ' हे त्या काळातील कृष्णाजी खाडीलकर यांच्या अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी येत असत.पेपर वाचणारा मग बाबांनी बनविलेले चविष्ट पानही खायचा.यातून बाबांचा पानपट्टी चा धंदा ही तेजीत असायचा.४ थी -५वी ला असताना मी माझ्या बहिणीसह खाऊ साठी पैसे मागायला बाबांच्या दुकानात जायचो.तेव्हा बाबा मला ' नवाकाळ ' पेपरमधील अग्रलेख मोठ्याने वाचायला सांगायचे.मी ही खाऊसाठी पैसे मिळणार या अपेक्षेने खाडिलकरांचा अग्रलेख दणक्यात वाचायचो. अग्रलेख वाचल्यावर बाबा खुश होऊन आम्हा भावंडांच्या हातावर रुपयाचे एक नाणे ठेवत - जा पोरांनो, खाऊ खा असे म्हणत पाठीवर शाबासकी द्यायचे. नित्यनियमाच्या या कार्यक्रमातूनच मी वाचनाकडे कायमचाच ओढलो गेलो.

          लहानपणी दर रविवारी बाबा,आम्हा भावंडांसाठी पुस्तकाच्या दुकानातून चांदोबा, चंपक,वेताळ - विक्रम, आनंद ,गोकुळ, राजा-राणी च्या रंजक गोष्टींची छान छान पुस्तके आणून द्यायचे.ही पुस्तके वाचण्याची मग आम्हां भावंडात एक स्पर्धाच लागायची.त्यातच आमच्या सुदैवाने आम्ही शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळच शहरातील वाचकांची तृष्णा भागविणारे वर्धिष्णू केंद्र अर्थात लोकमान्य वाचनालयाची इमारत असल्याने शाळा सुटल्यानंतर आमची पाऊले तिकडे वळायची. तिथल्या ग्रंथपाल मॅडमच्या सहकार्याने मग वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचायला सुरवात झाली.खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचल्यानंतर आपली एक अंतर्दृष्टी तयार होते.त्यातून आपल्यातील निवड करणाऱ्याला योग्य - अयोग्य कळायला लागतं.या सर्व गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात.माझ्या बालपणी घरी फार पुस्तके नव्हती मात्र मला पुस्तकाची आवड असल्याने आज घरी २००० हून अधिक पुस्तकांचा माझा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आहे.या माझ्या ग्रंथालयात जाणीवपूर्वक छान छान गोष्टी,बडबडगीतांची पुस्तके मी आणली आहेत.विधी ही ती आवडीने वाचत असल्याने तिला पहिल्या इयत्तेपासुनच

वाचनसंस्कार करण्यात मि यशस्वी झालो आहे.

तिचा वाचनध्यास पाहून मि तिच्यासाठी तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार नवी नवी पुस्तके आणत असतो.मि घरी नसल्यावर विधी माझ्या अभ्यासखोलीत जाऊन छान टेबलवर अभ्यास करीत बसते.बाबांप्रमाणे आपणही पुस्तकांच्या गराड्यात बसून अभ्यास करतो यात तिला वेगळाच आनंद मिळतो हे मलाही लक्षात आले.

गेल्या दहा -पंधरा दिवसापासुन कु.विधीही न चुकता लोकमान्य वाचनालयात जाऊन पुस्तके आणायला लागली.ती पटपट वाचून नवे पुस्तक वाचण्याची तिची उत्सुकता पाहुन तिला बालवाचक म्हणुन सभासद करण्याचा निर्णय घेतला आणि आज बाबांच्या जन्मदिवसाचे अौचित्य साधत तिची नोंदणी केली.


खरं तर बालवयातच मुलांमध्ये बालसाहित्याचे बीज रोवायला हवे.वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.विचारांची निश्चित बैठक तयार होते.जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.पुस्तकाचे बोट धरुन जास्तीत जास्त जग समजून घेता येते.वयाच्या तिस-या-चौथ्या वयापासुन मोबाईल,इंटरनेट वापरायला शिकणा-या आजच्या लहान मुलांना व्हर्च्युअल जगातून वास्तवतेत आणण्यासाठी केवळ पालकच्या मुख्य भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांनी चौफेर वाचन करावं यासाठी मुलांचे निरिक्षण करुन त्यांच्या वाचनसंसस्काराला सुयोग्य दिशा देऊ शकतात.वाचनाचे संस्कार आपोआप होत नसतात याचे भान ठेऊन मला वाचनाची गोडी लावून माझ्या जगण्याला अर्थ देणा-या बाबांच्या जन्मदिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस विधीची बालवाचक सभासद म्हणून नोंदणी करण्यासाठि योग्य असू शकतो? त्यातच २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन असल्याने या पुस्तकांशी जोडणा-या शुभ काळात विधीची बालवाचक म्हणुन नोंदणी केल्याने मनालाही समाधान मिळाले. आगामी काळात वाचनाची अभिरुची विकसित होऊन माझ्या लाडक्या लेकीच्या जीवनाला विधायक दिशा मिळेल,याचा विश्वास वाटतो.


             ग्रंथपाल सौ.उपशेट्ये मॅडमसह कु.विधी.



वाचनालयात दीपप्रज्वलन करताना सतिशकाकासह कु.विधी...


No comments:

Post a Comment