Friday, May 19, 2023

मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

 

  मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा... 
                      
    

          लोकसाहित्यातील लोकवाड्मयाचे दालन अनेक बाबींनी संपन्न आहे.या दालनातील दंतकथांना भारतीय लोकजीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय सुंदर कोकण प्रांतही त्याला अपवाद नाही.उलट श्रद्धाळू व निसर्गपूजक असलेल्या कोकणातील गावागावात अनेक वैशिष्ट्यपुर्ण कथा -दंतकथा आढळतात.खरं तर दंतकथेत विविधता,वेगळेपण असते.दंतकथेचा हेतू परंपरेने कल्पना व संचित स्वरूपात चालत आलेली लोकस्मृती जागृत करण्याचा असतो.जेव्हा ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत त्यावेळी इतिहास संशोधकाला अभ्यास करण्यासाठी दंतकथाच उपयोगी पडतात.त्याद्वारे इतिहासाचे आकलन होत असते.कोकणतील देवभोळ्या श्रद्धाळू ,निसर्गपुजक मानवाने इथल्या हजारो वर्षापासून कथा-दंतकथेच्या माध्यमातून परंपरागत चालत आलेल्या प्रथा परंपरा  अाजवर श्रद्धापूर्वक जपलेल्या आपल्याला पहायला मिळतात.

    कोकणातील रत्नागिरी जिह्याच्या दक्षिणेकडे व सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील अनेक गावांत अशाच वैशिष्ट्यपूर्ण कथा-दंतकथा आपल्याला पहायला मिळतात.सह्याद्रीतील डोंगर रांगेत उगम पाऊन लांजा तालुक्याला समृद्ध करणाऱ्या नद्या म्हणजे काजळी व मुचकुंदी होय.यातील मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावात फेरफटका मारताना तिथल्या गावक-यांशी चर्चा केल्यास  रंजक,गूढ,अगम्य अशा कथा -दंतकथा आपल्या पुढे येतात.या दंतकथा आपल्याला चकीत करतात.मानवी श्रद्धेशी घट्ट जोडलेल्या या कथा विचार करायला प्रवृत्त करतात.मुचकुंदीच्या काठावर वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनावर या कथांचा प्रभाव आपल्याला जाणवतो.मुचकुंदी नदिच्या काठावरील अर्थात लांजा तालुक्यातल्या गावा-गावातील अशाच काही महत्वाच्या कथा-दंतकथांचा हा मागोवा...

माचाळची सापड लोककला :- 


                   कोकणातील थंड हवेचे रमणीय गिरीस्थान म्हणजे लांजा तालुक्यातील स्वर्गीयसुंदर माचाळ गाव! समुद्रसपाटीपासून अदमासे ३५०० फूट उंचावर वसलेले ऎतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेले गाव! कोकणात आज मातीची कौलारू कोकणी बाजाची घरे दिसत नाहीत.मात्र माचाळला ती पहायला मिळतात म्हणुनच माचाळ म्हणजे मातीच्या घरांचे गाव! मुचकुंद ऋषी व भगवान श्रीकृष्णाच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेले गाव!लांज्याची जीवनवाहिनी मुचकुंदी नदीचे उगमस्थान याच गावात! थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात गणेशोत्सवाच्या काळात सद्यस्थितीत कोकणात दूर्मीळ होत चाललेले सापड लोकनृत्य सादर केले जाते. ग्रामदेवतेला प्रसन्न करणारी सापडनृत्य परंपरा गावकऱ्यांनी आजवर जपली आहे.मात्र हे नृत्य वर्षभरात अन्य वेळी सादर केले जात नाही हे विशेष!

      पूर्वी कोकणात ८० च्या दशकापर्यंत नाचणीची शेती केली जात असे. त्याच जागेवर पुढील वर्षी वरी,त्याच्या पुढे बरग व त्यानंतर हरिकाचे पीक घेऊन ती जागा सोडली जायची.हरिकाला गोड तांदुळ म्हटले जात असे.हरिकाच्या शेतीवेळी शेत भांगलण्यासाठी अर्थात शेतातले गवत/तण काढण्यासाठी शेतीची कामं झाली की अख्या गावातली गडी माणसं एकत्र येऊन एखाद्या शेतात भांगलण करायचे.शेतात उपड्या मांड्या घालून कमरेत नाचून हातवारे करीत गाणी म्हणत ढोलताश्याच्या गजरात व अन्य वाद्यांच्या ठेक्यावर शेतातले गवत काढीत.चारी बाजूने भांगलण करीत कमी रिंगणात गर्दी होऊ लागली की एकेकाला रेटून हाताच्या कोपराने ढुशी देत गवत बाहेर काढायचे.अगदीच जवळ आले की मध्यभागी छोटा खड्डा करून नारळ ठेवत व समोरासमोर एकमेकाला मुसुंडी मारत,चकवा देत ताकदीने नारळ बाहेर काढण्याचा खेळ करीत.तो खेळ बघण्यासाठी सारा गाव त्या शेताजवळ जमत असे.एका अर्थाने तिथे जत्रेचे स्वरूप यायचे.पारंपारिक वाद्याच्या तालावर शेतातले तण काढायच्या या कलेला सापड लोककला म्हणत असत.आता हरिक शेती संपली आता सापडही लुप्त झाला.माचाळ गावात मात्र हरकाच्या शेतात नाही तर गणपतीच्या दिवसातून ही लोककला पहायला मिळते.

    


    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली माचाळ गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावातील गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. हे सापडनृत्य माचाळला फक्त गणेशोत्सवात आयोजित केले जाते.या कलेच्या सादरीकरणामुळे ग्रामदेवता प्रसन्न हॊऊन गावकऱ्यांना आशीर्वाद देते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.  अन्यवेळी सापडनृत्य साजरे केल्यास देवाचा कोप होईल अशी भोळी समजूत ग्रामस्थांची आजवर होती मात्र नुकत्याच माचाळ गावात संपन्न झालेल्या सापड लोककला महोत्सवात ही कला गावातील मांडावर गावकऱ्यांनी सादर केली.ज्ञानविज्ञानात्मक जाणीवा विकसित झालेल्या नव्या तरुणाईने  देवाचा कोप तिच्याच लेकरांवर होत नसतो याचा विश्वास गावक-यांना देत वर्षातून एकदाच सादर केल्या जाणा-या सापड नृत्यामागील आख्यायिकेला छेद दिला आहे.

वाघणगावची गावपळण :-

        सन २००५ मध्ये जरी या गावात ही परंपरा बंद पडली असली तरी दर तीन वर्षांनी होत असलेल्या गावपळणीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध पावलेले वाघणगांव हे वाटुळ -साखरपा- कोल्हापूर राज्य महामार्गावरील मुचकुंदी काठी वसलेले एक छोटेसे गाव. या गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरू असलेल्या गावपळण या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेच्या मागची दंतकथा :-
         राजापूर बंदर ते विशाळगड अशी सावकारी टपालची वाहतूक करणारे रेडीज नामक एक वैश्य विशाळगडातून घोड्यावरून राजापूर बंदराकडे येत होते.सध्या जिथे वाघणगांव वसले आहे या ठिकाणी ते आले असता या मार्गावरील लुटारूनी त्यांचा खून करून त्यांचे कलेवर घोड्यावर टांगले.पती शोधार्थ या गृहस्थाची पत्नी या वाघनगांवच्या हद्दीत आली असता तिला आपल्या पतीचे कलेवर घोड्यावर बांधलेल्या स्थितीत पहावयाला मिळाले. या धक्क्यामूळे तिने आजूबाजूला आक्रोश करून हाक मारली असता काही नागवंशीय तिच्या हाकेसरशी धावून आले.पतीचे अंत्यविधी त्या स्त्रीने स्वतःच करण्याचे ठरवले असता पाण्यासाठी तिने स्वतःच्या गुडघ्याने जमीन उरकली.त्या सात्विक स्त्रीच्या सत्वामुळेच त्या जागेवर जल निर्माण झाले व चिता पेटवून सहगमन करण्यापूर्वी तिने नागवंशीयांन गाववस्ता करून या गावाचे सर्वाधिकार दिले. पण जाताना या गावात मनुष्यवर वस्ती टिकत नसल्या कारणास्तव दर तीन वर्षांनी गावाची चतु:सीमा ओलांडून राहण्यात सांगितले. यालाच वाघणगावची गावपळण संबोधतात. सन २००५ पर्यंत ही ऐतिहासिक प्रथा निरंतर चालू होती परंतु सन २००५पासून अंनिस व विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या विचारपरिवर्तनामुळे ग्रामस्थांनी ऐतिहासिक गावपळण प्रथा बंद केली असली तरी या दंतकथेचे अस्तित्व सती मंदिर व सात्विक स्त्रीने खोदलेल्या तळीच्या रूपाने पहावयास मिळते. आजही अनेक तज्ञ मंडळी गावपळणीचा संबंध आध्यात्मिक व निसर्गविज्ञानाच्या पातळीवरचा असल्याचे मानतात.शिवाय या प्रथेसाठी कोणताही पशुबळी दिला जात नाही किंवा कुणाचेही शोषण केले जात नसल्याने याला अंधश्रद्धा का म्हणायचे असा प्रतिप्रश्न विचारून अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करतात.
        

वाकोबा व वाकी नदी :-



        लांजा शहरातुन गोव्याकडे जाताना ०८ कि.मी.अंतरावर वळणावळचा वाकेड घाट लागतो.हा घाट संपताच वाकेड गावचा थांबा लागतो.या थांब्यावरुन आत गेल्यास वैशिष्ट्यपुर्ण वाकेड गावातील एक एक वैशिष्ट्ये आपल्या दृष्टीपथात येतात व आपण इतिहासाच्या एका अनोख्या पानात हरवून जातो.मुंबईच्या तंबाखू मार्केट वर वर्चस्व राखणा-या शेट्येंचे गाव म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदल्या गेलेल्या या गावात ग्रामदैवत धनी केदारलिंंगाचे भव्य व लक्षवेधक मंदिर आहे.मात्र या गावात श्री देव केदारलिंगाला वाकोबा म्हणून संबोधले जाते तर गावाबाहेरून जाणाऱ्या मुचकुंदी नदीला वाकी नदी संबोधले जाते.यामागे एक रंजक कथा आहे.ही कथा गावकरी अभिमानाने सांगतात.-
    
       वाकेड ग्रामाची स्थापना झाल्यानंतर अर्धा गाव मुचकुंदी नदीच्या प्रवाहात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.तेव्हा गावक-यांनी श्री देव केदारलिंगाचा धावा केला.ग्रामदैवत केदारलिंगाने भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या लथ्थाप्रहाराने गावाच्या मधून वाहणा-या मुचकुंदी नदीला गावाबाहेरून वळविले व वाकेड गावावरील संकटाचे निवारण केले.यावेळी केलेल्या जोरदार लथ्थाप्रहारामुळे धनी केदारलिंगाचा डावा पाय वाकडा झाला त्या क्षणापासून श्री केदरलिंगाला श्री वाकोबा हे नाव पडले.केदारलिंगाचा पाय वाकडा झाला ते स्थान वाकी म्हणून ओळखले जाते.या आख्यायिकेवरूनच या गावाला वाकेड हे नामाभिदान प्राप्त झाले.तर मुचकंदी नदीला या गावाबाहेरून केदारलिंगाने वळविले म्हणून या नदीला वाकेडात वाकी नदी म्हटले जाते.

   


  

          निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या देखण्या सुंदर एकमजली लाकडी सभामंडप असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली श्री देव वाकोबाची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील उभी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असून तिच्य पाठीमागे सूर्यदेव आहे.या मूर्तीचे निरिक्षण केल्यास श्री देव वाकोबाचा डावा पाय वाकडा असल्याचे दिसते.तसे पाहता लांजा तालुक्यातील लांजा, पन्हळे व वाकेड या गावातील वैश्य शेट्ये घराणे एकाच कुळातील आहे.या कुळातील कर्तृत्ववान पुरूषांनी या तीनही गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री केदारलिंगाची मंदिरे उभारली.ती येणेप्रमाणे   लांज्यातील थोरला केदारलिंग, पन्हळ्यातील मधला केदारलिंग, व वाकेडमधील धाकटा केदारलिंग या नावाने ओळखले जातात. या वाकोबा देवस्थानाचा आडिव-यातील महाकाली देवस्थानाशी संबंध आहे.कारण शेट्यांचे मूळपूरूष आडिव-यातून येथे आले आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते. आडिव-याच्या श्री देवी महाकालीने श्री वाकोबाची सत्वपरिक्षा घेण्यासाठी आपल्या वाघाच्या गळ्यात घाट बांधून त्याला श्री देव वाकोबाकडे पाठविले.हा घाट श्री वाकोबाने सोडविला.व वाघाला परत पाठविले सोबत आपल्या नंदीच्या गळ्यात घाट बांधून त्यास महाकालीकडे पाठविले.पण तो घाट महाकालीस सोडवता न आल्यामुळे तो नंदी आडिव-यातील महादेवाच्या मंदिरात आजही या कथेची साक्ष देत स्थानापन्न आहे.या नंदीचे एक शिंग मोडलेले आहे. एकूणच या श्री वाकोबा मंदिरात कार्तिक वद्य दशमी तर अमावस्येपर्यंत श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ साजरा करतात.

गोळवशीतील नागादेवी - 


           गोळवशी गावाची ग्रामदेवता नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.या मंदिरातील बायंगीदेव खुप प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक श्रद्धाळू स्वतः च्या प्रगतीसाठी, व्यवसायिक भरभराटीसाठी या गावात येतात.व बायंगीदेवाचे प्रतिक म्हणून इथून श्रीफळ किंवा बाहुली घेऊन जातात.बायंगी देवाचे प्रतिक म्हणुन नेलेल्या श्रीफळ व बाहुलीची योग्य पद्धतीने चालणुक केल्यास व्यवसायात थक्क करणारी भरभराट होते,तसेच या देवतेच्या तामसिक शक्तीची चालणूक योग्य पद्धतीने न केल्यास संपूर्ण घराची अधोगती होते अशी आख्यायिका (दंतकथा)  इथे गोळवशी गावात पहावयास मिळते. खरं तर या मागील सत्य असत्यतेच्या वादात पडण्यापेक्षा आपले दारिद्रय निर्मूलन होऊन कमी वेळेत प्रगती होईल या भावनेने अनेकांची पाऊले या गावात वळतात.नागादेवीच्या मंदिराजवळ असणारी देवराई समृद्ध आहे.तर जवळच असलेल्या १०५ सतीशीळा शिल्पेही अभ्यासण्यासारखीच आहेत.

       
भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा :-
                भडे गावामध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. गुढी पाडव्याच्या मध्यरात्री आगीवर चालण्याचं अग्निदिव्य सहजतेनं केले जाते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रथेत निखाऱ्यावर चालणारे कधी जखमी झालेत किंवा भाजलेत असं नाही. गावातील सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून सतीचा खेळ या नावाने ओळखली जाते.साधारण सायंकाळी पाच वाजता होम पेटवला जातो. होमातून निखारे आणि जळकी लाकडे वेगळी केली जातात. पेटणारी लाकडे बाहेर काढली जातात. हे काम ग्रामस्थ सहजतेने करतात. सर्वात मोठा ओंडका कोण उचलून आगीत टाकतो याचीही चढाओढ सुरु असते. नमन आटोपल्यानंतर होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. मानकरी सर्वातप्रथम निखाऱ्यावरुन चालतात. त्यानंतर सर्वचजणं बिनधास्तपणे हे अग्निदिव्य करतात.या गावात पहिला आलेला मूळ पुरुष मयत झाल्यावर त्याची पत्नी सती गेली. त्या सती गेलेल्या महिलेची आठवण ठेवण्यासाठी गावात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरु आहे, असे ग्रामस्थ सांगतात. सती गेलेल्या महिलेचा गावावर कृपा आर्शीवाद राहतो, अशी गावाची श्रध्दा आहे. लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यत सर्वच बिनधास्तपणे या पेटत्या निखाऱ्यारून अनवाणी धावतात. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथ लोकं येतात. गोवा, कर्नाटक, बिहार राज्यातून सुद्धा हा अनोखी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही वर्षापूर्वी हा प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थाच्या मनात हा सोहळा एक परंपरा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलिकडे जावून या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याचं धाडस इथले शेकडो ग्रामस्थ स्वतःहून करतात. ना कोणावर सक्‍ती असते ना कोणाला गळ घातली जाते. 

जगातील सर्व मानवी संस्कृतीचा विकास व उदय नदीच्याच काठावर झाला आहे.आदिम काळापासून माणूस नदीलाच माय मानून तिचे पूजन करित आला आहे.तिच्या काठावरच्या त्याने आपली वसतिस्थाने अर्थात गावे निर्माण केली.आज नद्यांचे सर्वत्र झालेले प्रदूषण लक्षात घेऊन चला जाणूया नदीला ही महत्वाकांक्षी योजना सरकार राबवीत आहे.यात मुचकुंदी नदीचाही समावेश अाहे.माचाळात उगम पाऊन गावखडीजवळ सिंधुसागराला मिळेपर्यंत मुचकुंदीनेही खोरनिनको , प्रभानवल्ली , भांबेड, वेरवली,वाघणगाव, विलवडे,वाकेड,  बोरथडे, इंदवटी,गोळवशी,साठवली,इसवली,बेनी,भडे अशी अनेक गावे समृद्ध केली आहेत.या नदीच्याही संदर्भात विविध गावात कथा,भयकथा, गुढकथा आहेत.तशाच तिच्या काठावर वाढलेल्या माणसाच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनातून कथा दंतकथा आपल्या पुढे उभ्या राहतात.या दंतकथा, आख्यायिका वा परंपरंचा सांभाळ जपणूक इथल्या ग्रामीण समुदायाने आजवर भक्तिभावाने केला आहे.

    आज पर्यटन लोकांच्या गरजेनुसार आकार घेत आहे. निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न,शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि त्याचबरोबरच शुद्ध विचारांना साथ घालणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. आजचा पर्यटक सतत नवनवीन स्थळांच्या शोधात असतो.जिथे गेल्यावर सर्व कोलाहालापासून दूर केवळ निसर्गाचे संगीत ऐकण्यात मन रमून जाईल , अश्या ठिकाणी रिमझिमणाऱ्या श्रावणसरी अंगावर घेत ऊन- पावसाचा लपंडावाचा खेळ खेळत डोंगर-कपाऱ्यातून ढगांचा-धुक्याचा पाठशिवणीच्या खेळात सहभागी व्हायला तो आतुर असतो. आधुनिक पर्यटक खूप निराळा आहे.तो पर्यायवरण दक्ष आहे. मानवी जीवनातील निसर्गाचे महत्त्व तो जाणतो.चैन,सुख व सोयीस्कर पर्यटनाबरोबर आज शाश्वत अर्थात इको टुरिझमला जागतिक पर्यटनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.या दृष्टिने कोकणातील लांजा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ दाखविताना माचाळची सापड लोककला दाखवायला हवी,जावडे गावातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात जुना ब्राम्हणी लेणीसमुह दाखविताना जवळच्याच गोळवशी गावातील नागदेवता मंदिर इथल्या १०५ सतीशीळा ही दाखवायला हव्यात.मुंबईतील तंबाखु मार्केटचे वर्चस्व गाजविणाऱ्या शेट्येंच्या वाकेड गावातील वाकोबाचे भव्य मंदिर दाखविताना इथल्या रंजक कथा त्यांना सांगायला हव्यात.भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य सहजतेने पूर्ण करणारी इथली ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा,कुवे व लांजा शहरातील जाकादेवीतील लोटांगण,प्रभानवल्लीतील पाच पालखींंची भेट व पालखीनृत्य परंपरा दाखवायला शिमगोत्सवात इथे जाणीवपूर्वक पर्यटक आणावे लागतील.या छोट्या छोट्या गोष्टीतून लांजा तालुक्यातील या प्रथा परंपरा देशभरात पोहचतील.या अगम्य गूढ तितक्याच रंजक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून त्यातून तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळेल.या साठी मुचकुंदीच्या काठावरील गावात पहायला मिळणाऱ्या कथा दंतकथा प्रथा परंपरेची नियोजनबद्ध मांडणी सर्वांसमोर केल्यास देवभोळ्या, श्रद्धाळू कोकणी माणसाच्या कथा दंतकथाही आर्थिक संपन्नतेस हातभार लावतील हे निश्चित!

विजय हटकर.
लांजा.
८८०६६३५०१७

       
       

    

    


भाटे खाडीतील बॅकवाॅटर्स सफारी

     भाटे खाडीतील बॅकवाॅटर्स सफारी


      बॅकवाॅटर्स सफारी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती  देवभूमी केरळ व तिथले सुंदर खाडीकिनारे.तिथल्या बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद घेण्यासाठी केरळात मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करित असतात.आता मात्र कोकणातही ठिकठिकाणी बॅकवाॅटर्स सफरी टुरीझम बहरत असून रत्नागिरीला भेट देणाऱ्या पर्यटकांना भाट्ये खाडीत बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद आता घेता येणार आहे.

          मँगो सिटी रत्नागिरी जवळच्या तोणदे गावातील प्रयोगशील कलाकार संदीप पावसकर यांनी तोणदे गावातून जाणाऱ्या भाट्याच्या खाडित (काजळी नदी)  बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद देण्यासाठी पारंपारिक बोटीला कल्पकतेने सजवित भाटे खाडीत पर्यटन वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने  एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. काल कुटुंबियांसह तोणदे गावातील धक्क्यावरून संदीप पावसकरांच्या सोबतीने भाटे खाडीतील बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद घेतला.भाटे खाडीतील विहंगम नजारा पाहताना  कोकणाला स्वर्ग का म्हणतात हे याचे देही याचे डोळा अनुभवले. रत्नागिरीतील गायक गुरुदत्त नांदगांवकर ही यावेळी सोबत असल्याने ही सफर सांगतिक आनंदाची अनुभूती देणारी ठरली.

     


 सह्याद्री डोंगर रांगेत आंबा घाटाजवळ केव नदीचा उगम होतो.तर विशाळगडाच्या पायथ्याशी उगम पावून गड नदी किरबेट,भोवडे,भडकंबा या गावातून प्रवाह करत थेट कोंडगावात केव नदीला मिळते.केव नदी व गड नदी यांचा संगम झाल्यावर या नदीलाच पुढे काजळी नदी या नावाने ओळखले जाते.काजळी नदी पश्चिम वाहिनी असून  रत्‍नागिरीजवळ  भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.मँगो सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकणातील स्वर्गीय सुंदर रत्नागिरी जवळच्या भाट्ये गावात काजळी नदी सिंधूसागराला मिळते.म्हणून या नदीला भाटे व लगतच्या गावात भाट्याची खाडी असे संबोधतात.या खाडीलगत वसलेली सोमेश्र्वर ,तोणदे ही निसर्गरम्य गावे कोकणचे सौंंदर्य अधोरेखित करतात. सोमेश्र्वर पंचक्रोशीतील तोणदे गावातील संदीप पावसकर या अवलियाने हिरवा निसर्ग सोबतीला असणाऱ्या या खाडीत दोन बोटी कल्पकतेने एकत्रित करित (याला आमच्या कोकणात जुगाड म्हणतात)पर्यटकांना खाडीतुन फिरविण्यासाठी एक उत्तम पारंपारिक फेरिबोट तयार केली आहे.त्याच्या या प्रयोगाला गावातील मित्रांनी, पर्यटन क्षेत्रातील जाणकारांनी प्रोत्साहन दिल्याने आज संदीप पावसकर व्यवसायिक दृष्टिकोनातून फेरीबोटीतून पर्यटकांना भाटे खाडीतील सफारीचा आनंद देतात.या खाडीतून फिरताना निसर्गाचे संगीत ऎकताना आपण स्वतःलाच हरवून जातो.

      

          भाट्ये बॅकवाटर्सचा आनंद घेणारे पर्यटक

        तसेच भाटे खाडीक्षेत्रामध्ये कर्ला येथून सोमेश्र्वर, चिंचखरीपर्यंत बॅकवाॅटर्स टुरीझमला प्रोत्साहन देण्यासाठी राज घाडीगांवकर,प्रशांत परब व सचिन देसाई यांनी एकत्रित येऊन डाॅल्फिन बोटिंग क्लब सुरु केले आहे.नारळ पोफळीच्या सुंदर बागा,खारफुटीची वने व छोटी छोटी बेटे, जुवे व चिंचखरी येथील दत्तमंदिर, शिंपल्यांपासून चुना बनविण्याचा कारखाना यासह अनेकविध पक्षी, किनाऱ्यावरची घरे ,मच्छीमा-यांची किनाऱ्यावरची घरे,जाळे टाकून केली जाणारी मासेमारी ,भरती-आहोटीच्या वेळी खुलून येणारे सौंदर्य आदींची सफर बोटीतून करता येते.भाट्येपासून सोमेश्र्वरपर्यंतच्या बॅकवाॅटर्समध्ये बोटिंग करण्याचा यशस्वी प्रयत्न या गतवर्षी पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने केला होता.त्याला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.एकूणच भाटे खाडी मुखाशी कर्ला येथून  बॅकवाॅटर्स सफर घडवुन अाणणारे राज घाडीगांवकर  व मंडळी तर तोणदे येथे संदीप पावसकर यांसारख्या धाडसी तरुण मंडळींमुळे भाट्याची खाडी कोकणातील 'बॅकवाॅटर्स सफारी'चा उत्तम पर्याय म्हणून नावारूपाला येत आहे.

     खरं तर रत्नागिरी पर्यटकांच्या दृष्टिने कोकणातील हाॅट डेस्टिनेशन आहे.बाराही महिने आपली वेगवेगळी रुपं दाखविणारा इथला समृद्ध निसर्ग ही खरी रत्नागिरीची श्रीमंती आहे.ही श्रीमंती अनुभवायला मॅगो सिटी रत्नागिरी वर्षाचे बाराही महीने येवा कोकण आपलाच असा असे सांगत असते जणू! गणपतीपुळे व इथले आपलं कोकण संग्रहालय ,आरे-वारे बीच, जयगड किल्ला व जेटी, पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिर, गणेशगुळ्याचा स्वच्छ सुंदर किनारा व तिथले गणपतीचे मंदिर ,रत्नागिरी शहरातील अष्टदशभूजा गणेश,पतीतपावन मंदिर,लोकमान्य टिळक जन्मस्थान, वीर सावरकरांना ज्या कोठडीत स्थानबध्द करण्यात आले होते ती कोठडी, थिबा पॅलेस, राजमाता जिजाउसाहेब उद्यान, मत्स्यालय ,त्रिमिती तारांगण,पानवलचा रेल्वे पूल व धबधबा, निवळीतील वाॅटरपार्क , मालगुंडच्या किनाऱ्यावरील एरिक पॅरा मोटरिंग,रत्नदूर्ग किल्याजवळील समुद्रातील अद्भुत दुनिया दाखविणारी स्कूबा सफर,,मांडवी व भाट्ये बीच या सोबतच फळांचा राजा हापूस अांब्याची चविष्ट सोबत पर्यटकांना इथे मिळते.संदीप पावसकर व डाॅल्फिन बोट क्लबच्या राज घाडीगांवकरांमुळे या नव्या बॅकवाॅटर्स सफारीने रत्नागिरीतील या पर्यटनस्थळांच्या यादीत कर्ला व तोणदे गावाचाही आता समावेश करावा लागेल.याच गावात एका पर्यटन प्रेमीने हापूस कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राची निर्मिती केली आहे.या पर्यटन केंद्रात उत्तम व्यवस्था केली जाते.सोबतीला  कोकणी भोजनाचा आनंदही घेता येतो.रत्नागिरी शहरालगत अशी अनेक कृषी व पर्यटन केंद्रे आज आकारास आली आहेत.तसेच दर्जेदार हाॅटेल्सही उपलब्ध असल्याने मनपसंद पर्याय निवडून आपण इथे निवांत राहू शकतो.

   


        रत्नागिरीत येणा-या पर्यटकांना केरळच्या बॅकवाॅटर्सचा आनंद आता भाटे खाडीतील या बॅकवाटर्स सफारीचा माध्यमातून मिळणार असून हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तोणदे गावातील संदीप पावसकरांच्या किंवा कर्ला इथल्या राज घाडीगांवकरांच्या  डाॅल्फिन बोट क्लबच्या फेरीबोटीतून एकदा तरी अवश्य जायलाच हवे! 

    
भाटे बॅकवाॅटर्स सफारीसाठी संपर्क :--

संदीप पावसकर ,तोणदे -9923577239
राज घाडीगांवकर,कर्ला  -9822165165

🛶🛶🛶🛶

विजय हटकर-लांजा



सर्जनशील कलाकार व कोण म्हणतो बेवड्याक मान नाय फेम पावसकर भाटे खाडी सफारीचे निमंत्रण देताना..


डाॅल्फिन बोडिंगमध्ये क्लबच्या राज घाडीगांवकरांसह रम्य सफरीचा आनंद घेताना पर्यटक.




भाटे खाडीत बॅकवाॅटर्स सफारीचा आनंद घेताना  गायक गुरुदत्त नांदगांवकर,दशरथ गोसावी सर ,संदीप पावसकर व अस्मादिक




Thursday, May 18, 2023

बिग फुट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर...

बिग फुट संग्रहालयाची अविस्मरणीय सफर...


            १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून १९७७ सालापासून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल मार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील देशांचा हा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असतो. या कार्यक्रमात अनेक ऐतिहासिक तसेच विचित्र गोष्टींचे सुद्धा प्रदर्शन पाहायला मिळते. भारतात सुद्धा अनेक संग्रहालय आहेत, परंतु त्यातील काही संग्रहालयांची आपल्याला माहिती सुद्धा नसते असेच एक संग्रहालय गोव्यातील मडगाव जवळच्या लोटोली गावात आहे. या बिग फूट संग्रहालयाला संग्रहालय दिनीच भेट देण्याचा योग जुळून आला.

       जुन्या काळातील गोमंतकीय जीवनशैली अर्थात गोव्यातील हिंदू-ख्रिश्चन धर्मियांच्या शेकडो वर्षाच्या सहचारातून निर्माण झालेली इथली ग्रामीण,सामाजिक जीवनशैली दाखवणारे अख्खे गावच पुतळ्याच्या माध्यमातून बिग फूट संग्रहालयात उभे करण्यात आले आहे.गोमांतक भूमीतील खेड्यातील जीवनाचे दर्शन घडवणारी ही लघु घरे आणि दुकाने असलेले 'मॉडेल व्हिलेज' हे देखील पाहण्यासारखे आहे.संग्रहालय फिरताना पर्यटकांना इंग्रजी,हिंदी आणि कोंकणी भाषेत संग्रहालयातील माहिती देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा कल्पकतेने उपयोग करण्यात आला आहे.संग्रहालय रोजगार व पर्यटनवृद्धी कसे करू शकते याचे बिग फूट संग्रहालय उत्तम उदाहरण आहे.येथील व्यवस्थापनही उत्तम असल्याने ठिकठिकाणी स्वच्छता आढळते.

     


        सर्जनशील मनाच्या कलाकारांनी कल्पकतेने उभारलेल्या बिग फूट संग्रहालयामागील कथा रोचक अद्भूत असून स्वार्थी,व स्वतः पुरत्याच आभासी जगात वावरण्या-या आजच्या माणसाला सकारात्मकता व मानवता धर्माची ओळख करून देते. संग्रहालयाच्या मध्यभागी श्रद्धावान पर्यटकांसाटी बिगफुट मंदिराची उभारणी करण्यात आली असून गाभाऱ्यात जाऊन बिगफूटचे दर्शन घेण्याआधी तयार करण्यात आलेल्या सभामंडपात स्क्रीनवर बिगफूट (मोठे पाय) मागील कथा पर्यटकांना दाखविण्यात येते. याची सुंदर मांडणी थक्क करणारी आहे.संत मीराबाईचे १४ मीटर लांबीचे शिल्प या संग्रहालयाचे संस्थापक महेंद्र अल्वारिस यांनी ३० दिवसांत कोरले आहे. कोकणापासून गोव्यापर्यंत मोठ्या प्रमाणात हजारो वर्षापूर्वीच्या मानवाने कातळावर कोरलेली कातळशिल्पे आज पर्यटकांना आकर्षिक करित आहेत.त्याप्रमाणेच अल्वारिस यांनी सुद्धा संत मीराबाईचे हे शिल्प जांभ्या दगडात (लॅट्राईट) कोरले आहे.हे भव्य शिल्प पाहून कातळशिल्पांची आठवण आल्याशिवाय रहात नाही.बिग फूट संग्रहालयाचे हे मुख्य आकर्षण असून भारतातील सर्वात लांब लॅटराइट शिल्प म्हणून या शिल्पाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 


          संत मीराबाईचे जांभ्या दगडातील शिल्प.

          येथील हस्तकला केंद्रावर विविध प्रकारच्या गोव्यातील कलाकृती पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत ज्या आपल्या घराला सुशोभित करु शकतात तसेच गोव्याच्या या अविस्मरणीय सफरीची आठवण म्हणून तुमच्या स्मृती सदैव ताज्या ठेवतील.अभ्यागतांचे मनोरंजन करण्यासाठी येथे बिग फूट डान्स फ्लोर, बिग फूट रेस्टॉरंट, क्रॉस आणि बरेच काही आहे. सोबतच बोका दा वाका नावाचा झरा, पक्ष्यांचे निवासस्थान, मसाल्यांचे आवार, रबर वृक्षारोपण इत्यादींसह ते निसर्गाचा मोहक स्पर्श देते. हे मानवी आत्म्याला ज्ञात असलेल्या सर्व सुखांचे परिपूर्ण मिश्रण सादर करते. हे तुम्हाला निसर्गरम्य सौंदर्याचा आनंददायी स्पर्श तसेच नृत्य आणि पार्टी करण्याचा उत्साह देते.
    
     आपल्या स्वर्गीयसुंदर गोमांतकीय भूमीतील समृद्ध वारसा व संस्कृती संग्रहालयाच्या माध्यमातून उभी करून सा-या जगला अभिमानाने दाखवावी व आपला हा वारसा कटाक्षाने जपून ठेवण्याची तीव्र इच्छा यातून सर्जनशील मनाच्या अल्वारिस यांनी मोठ्या जिद्दीने हे भव्य संग्रहालय उभे केले. गोव्याच्या ग्रामीण जीवनाची झलक दाखविणारे हे संग्रहालय पणजीपासून सुमारे २५ किमी अंतरावर तर मडगांवपासून ०६ किमी अंतरावर आहे.खाजगीरित्या चालविले जाणा-या या संग्रहालयाला सकाळी  ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत आठवडाभरात भेट देता येईल. प्रवेश शुल्क म्हणून किमान १०० रु. शुल्क देखील इथे आकारले जाते.या संग्रहालयाचे प्रवर्तक महेंद्र अल्वारीस यांनी जांभा दगडात बनवलेले देशातील सर्वात मोठे आणि सर्वात जलद बनवलेले संत मीराबाईचे शिल्प,आशियातील एकमेव असे डावखु-यांचे संग्रहालय, गोमांतकीय निसर्ग जीवन,ग्रामीण सामाजिक संस्कृती सर्वच पाहण्यासारखं आहे.एकूणच पैसा वसूल असलेले बिग फूट संग्रहालय पाहणे आनंददायी अनुभव असून दक्षिण गोव्यात आलेल्या पर्यटकांनी इथले सुंदर समुद्रकिनारे, मंदिराना भेट देताना लोटौलिम गावातील बिग फूट संग्रहालयालाही आवर्जून भेट द्यायला हवी तरच खऱ्या अर्थाने गोमांतकीय समृद्ध जीवनशैलीचा अनुभव घेता येईल.

🖼️🖼️🖼️🖼️

 विजय हटकर.

 लांजा












कोकण मिडीया साप्ताहिकाची लिंक-

https://kokanmedia.in/2023/05/18/bigfootmuseum/