Friday, May 19, 2023

मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

 

  मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा... 
                      
    

          लोकसाहित्यातील लोकवाड्मयाचे दालन अनेक बाबींनी संपन्न आहे.या दालनातील दंतकथांना भारतीय लोकजीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय सुंदर कोकण प्रांतही त्याला अपवाद नाही.उलट श्रद्धाळू व निसर्गपूजक असलेल्या कोकणातील गावागावात अनेक वैशिष्ट्यपुर्ण कथा -दंतकथा आढळतात.खरं तर दंतकथेत विविधता,वेगळेपण असते.दंतकथेचा हेतू परंपरेने कल्पना व संचित स्वरूपात चालत आलेली लोकस्मृती जागृत करण्याचा असतो.जेव्हा ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत त्यावेळी इतिहास संशोधकाला अभ्यास करण्यासाठी दंतकथाच उपयोगी पडतात.त्याद्वारे इतिहासाचे आकलन होत असते.कोकणतील देवभोळ्या श्रद्धाळू ,निसर्गपुजक मानवाने इथल्या हजारो वर्षापासून कथा-दंतकथेच्या माध्यमातून परंपरागत चालत आलेल्या प्रथा परंपरा  अाजवर श्रद्धापूर्वक जपलेल्या आपल्याला पहायला मिळतात.

    कोकणातील रत्नागिरी जिह्याच्या दक्षिणेकडे व सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील अनेक गावांत अशाच वैशिष्ट्यपूर्ण कथा-दंतकथा आपल्याला पहायला मिळतात.सह्याद्रीतील डोंगर रांगेत उगम पाऊन लांजा तालुक्याला समृद्ध करणाऱ्या नद्या म्हणजे काजळी व मुचकुंदी होय.यातील मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावात फेरफटका मारताना तिथल्या गावक-यांशी चर्चा केल्यास  रंजक,गूढ,अगम्य अशा कथा -दंतकथा आपल्या पुढे येतात.या दंतकथा आपल्याला चकीत करतात.मानवी श्रद्धेशी घट्ट जोडलेल्या या कथा विचार करायला प्रवृत्त करतात.मुचकुंदीच्या काठावर वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनावर या कथांचा प्रभाव आपल्याला जाणवतो.मुचकुंदी नदिच्या काठावरील अर्थात लांजा तालुक्यातल्या गावा-गावातील अशाच काही महत्वाच्या कथा-दंतकथांचा हा मागोवा...

माचाळची सापड लोककला :- 


                   कोकणातील थंड हवेचे रमणीय गिरीस्थान म्हणजे लांजा तालुक्यातील स्वर्गीयसुंदर माचाळ गाव! समुद्रसपाटीपासून अदमासे ३५०० फूट उंचावर वसलेले ऎतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेले गाव! कोकणात आज मातीची कौलारू कोकणी बाजाची घरे दिसत नाहीत.मात्र माचाळला ती पहायला मिळतात म्हणुनच माचाळ म्हणजे मातीच्या घरांचे गाव! मुचकुंद ऋषी व भगवान श्रीकृष्णाच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेले गाव!लांज्याची जीवनवाहिनी मुचकुंदी नदीचे उगमस्थान याच गावात! थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात गणेशोत्सवाच्या काळात सद्यस्थितीत कोकणात दूर्मीळ होत चाललेले सापड लोकनृत्य सादर केले जाते. ग्रामदेवतेला प्रसन्न करणारी सापडनृत्य परंपरा गावकऱ्यांनी आजवर जपली आहे.मात्र हे नृत्य वर्षभरात अन्य वेळी सादर केले जात नाही हे विशेष!

      पूर्वी कोकणात ८० च्या दशकापर्यंत नाचणीची शेती केली जात असे. त्याच जागेवर पुढील वर्षी वरी,त्याच्या पुढे बरग व त्यानंतर हरिकाचे पीक घेऊन ती जागा सोडली जायची.हरिकाला गोड तांदुळ म्हटले जात असे.हरिकाच्या शेतीवेळी शेत भांगलण्यासाठी अर्थात शेतातले गवत/तण काढण्यासाठी शेतीची कामं झाली की अख्या गावातली गडी माणसं एकत्र येऊन एखाद्या शेतात भांगलण करायचे.शेतात उपड्या मांड्या घालून कमरेत नाचून हातवारे करीत गाणी म्हणत ढोलताश्याच्या गजरात व अन्य वाद्यांच्या ठेक्यावर शेतातले गवत काढीत.चारी बाजूने भांगलण करीत कमी रिंगणात गर्दी होऊ लागली की एकेकाला रेटून हाताच्या कोपराने ढुशी देत गवत बाहेर काढायचे.अगदीच जवळ आले की मध्यभागी छोटा खड्डा करून नारळ ठेवत व समोरासमोर एकमेकाला मुसुंडी मारत,चकवा देत ताकदीने नारळ बाहेर काढण्याचा खेळ करीत.तो खेळ बघण्यासाठी सारा गाव त्या शेताजवळ जमत असे.एका अर्थाने तिथे जत्रेचे स्वरूप यायचे.पारंपारिक वाद्याच्या तालावर शेतातले तण काढायच्या या कलेला सापड लोककला म्हणत असत.आता हरिक शेती संपली आता सापडही लुप्त झाला.माचाळ गावात मात्र हरकाच्या शेतात नाही तर गणपतीच्या दिवसातून ही लोककला पहायला मिळते.

    


    रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली माचाळ गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरे तर उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते, त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे आठ देवांचे एकत्रित मंदिर असून गावच्या दगडी चौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावातील गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य. या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. हे सापडनृत्य माचाळला फक्त गणेशोत्सवात आयोजित केले जाते.या कलेच्या सादरीकरणामुळे ग्रामदेवता प्रसन्न हॊऊन गावकऱ्यांना आशीर्वाद देते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.  अन्यवेळी सापडनृत्य साजरे केल्यास देवाचा कोप होईल अशी भोळी समजूत ग्रामस्थांची आजवर होती मात्र नुकत्याच माचाळ गावात संपन्न झालेल्या सापड लोककला महोत्सवात ही कला गावातील मांडावर गावकऱ्यांनी सादर केली.ज्ञानविज्ञानात्मक जाणीवा विकसित झालेल्या नव्या तरुणाईने  देवाचा कोप तिच्याच लेकरांवर होत नसतो याचा विश्वास गावक-यांना देत वर्षातून एकदाच सादर केल्या जाणा-या सापड नृत्यामागील आख्यायिकेला छेद दिला आहे.

वाघणगावची गावपळण :-

        सन २००५ मध्ये जरी या गावात ही परंपरा बंद पडली असली तरी दर तीन वर्षांनी होत असलेल्या गावपळणीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध पावलेले वाघणगांव हे वाटुळ -साखरपा- कोल्हापूर राज्य महामार्गावरील मुचकुंदी काठी वसलेले एक छोटेसे गाव. या गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरू असलेल्या गावपळण या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेच्या मागची दंतकथा :-
         राजापूर बंदर ते विशाळगड अशी सावकारी टपालची वाहतूक करणारे रेडीज नामक एक वैश्य विशाळगडातून घोड्यावरून राजापूर बंदराकडे येत होते.सध्या जिथे वाघणगांव वसले आहे या ठिकाणी ते आले असता या मार्गावरील लुटारूनी त्यांचा खून करून त्यांचे कलेवर घोड्यावर टांगले.पती शोधार्थ या गृहस्थाची पत्नी या वाघनगांवच्या हद्दीत आली असता तिला आपल्या पतीचे कलेवर घोड्यावर बांधलेल्या स्थितीत पहावयाला मिळाले. या धक्क्यामूळे तिने आजूबाजूला आक्रोश करून हाक मारली असता काही नागवंशीय तिच्या हाकेसरशी धावून आले.पतीचे अंत्यविधी त्या स्त्रीने स्वतःच करण्याचे ठरवले असता पाण्यासाठी तिने स्वतःच्या गुडघ्याने जमीन उरकली.त्या सात्विक स्त्रीच्या सत्वामुळेच त्या जागेवर जल निर्माण झाले व चिता पेटवून सहगमन करण्यापूर्वी तिने नागवंशीयांन गाववस्ता करून या गावाचे सर्वाधिकार दिले. पण जाताना या गावात मनुष्यवर वस्ती टिकत नसल्या कारणास्तव दर तीन वर्षांनी गावाची चतु:सीमा ओलांडून राहण्यात सांगितले. यालाच वाघणगावची गावपळण संबोधतात. सन २००५ पर्यंत ही ऐतिहासिक प्रथा निरंतर चालू होती परंतु सन २००५पासून अंनिस व विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या विचारपरिवर्तनामुळे ग्रामस्थांनी ऐतिहासिक गावपळण प्रथा बंद केली असली तरी या दंतकथेचे अस्तित्व सती मंदिर व सात्विक स्त्रीने खोदलेल्या तळीच्या रूपाने पहावयास मिळते. आजही अनेक तज्ञ मंडळी गावपळणीचा संबंध आध्यात्मिक व निसर्गविज्ञानाच्या पातळीवरचा असल्याचे मानतात.शिवाय या प्रथेसाठी कोणताही पशुबळी दिला जात नाही किंवा कुणाचेही शोषण केले जात नसल्याने याला अंधश्रद्धा का म्हणायचे असा प्रतिप्रश्न विचारून अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करतात.
        

वाकोबा व वाकी नदी :-



        लांजा शहरातुन गोव्याकडे जाताना ०८ कि.मी.अंतरावर वळणावळचा वाकेड घाट लागतो.हा घाट संपताच वाकेड गावचा थांबा लागतो.या थांब्यावरुन आत गेल्यास वैशिष्ट्यपुर्ण वाकेड गावातील एक एक वैशिष्ट्ये आपल्या दृष्टीपथात येतात व आपण इतिहासाच्या एका अनोख्या पानात हरवून जातो.मुंबईच्या तंबाखू मार्केट वर वर्चस्व राखणा-या शेट्येंचे गाव म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदल्या गेलेल्या या गावात ग्रामदैवत धनी केदारलिंंगाचे भव्य व लक्षवेधक मंदिर आहे.मात्र या गावात श्री देव केदारलिंगाला वाकोबा म्हणून संबोधले जाते तर गावाबाहेरून जाणाऱ्या मुचकुंदी नदीला वाकी नदी संबोधले जाते.यामागे एक रंजक कथा आहे.ही कथा गावकरी अभिमानाने सांगतात.-
    
       वाकेड ग्रामाची स्थापना झाल्यानंतर अर्धा गाव मुचकुंदी नदीच्या प्रवाहात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती.तेव्हा गावक-यांनी श्री देव केदारलिंगाचा धावा केला.ग्रामदैवत केदारलिंगाने भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या लथ्थाप्रहाराने गावाच्या मधून वाहणा-या मुचकुंदी नदीला गावाबाहेरून वळविले व वाकेड गावावरील संकटाचे निवारण केले.यावेळी केलेल्या जोरदार लथ्थाप्रहारामुळे धनी केदारलिंगाचा डावा पाय वाकडा झाला त्या क्षणापासून श्री केदरलिंगाला श्री वाकोबा हे नाव पडले.केदारलिंगाचा पाय वाकडा झाला ते स्थान वाकी म्हणून ओळखले जाते.या आख्यायिकेवरूनच या गावाला वाकेड हे नामाभिदान प्राप्त झाले.तर मुचकंदी नदीला या गावाबाहेरून केदारलिंगाने वळविले म्हणून या नदीला वाकेडात वाकी नदी म्हटले जाते.

   


  

          निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या देखण्या सुंदर एकमजली लाकडी सभामंडप असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली श्री देव वाकोबाची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील उभी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती असून तिच्य पाठीमागे सूर्यदेव आहे.या मूर्तीचे निरिक्षण केल्यास श्री देव वाकोबाचा डावा पाय वाकडा असल्याचे दिसते.तसे पाहता लांजा तालुक्यातील लांजा, पन्हळे व वाकेड या गावातील वैश्य शेट्ये घराणे एकाच कुळातील आहे.या कुळातील कर्तृत्ववान पुरूषांनी या तीनही गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री केदारलिंगाची मंदिरे उभारली.ती येणेप्रमाणे   लांज्यातील थोरला केदारलिंग, पन्हळ्यातील मधला केदारलिंग, व वाकेडमधील धाकटा केदारलिंग या नावाने ओळखले जातात. या वाकोबा देवस्थानाचा आडिव-यातील महाकाली देवस्थानाशी संबंध आहे.कारण शेट्यांचे मूळपूरूष आडिव-यातून येथे आले आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते. आडिव-याच्या श्री देवी महाकालीने श्री वाकोबाची सत्वपरिक्षा घेण्यासाठी आपल्या वाघाच्या गळ्यात घाट बांधून त्याला श्री देव वाकोबाकडे पाठविले.हा घाट श्री वाकोबाने सोडविला.व वाघाला परत पाठविले सोबत आपल्या नंदीच्या गळ्यात घाट बांधून त्यास महाकालीकडे पाठविले.पण तो घाट महाकालीस सोडवता न आल्यामुळे तो नंदी आडिव-यातील महादेवाच्या मंदिरात आजही या कथेची साक्ष देत स्थानापन्न आहे.या नंदीचे एक शिंग मोडलेले आहे. एकूणच या श्री वाकोबा मंदिरात कार्तिक वद्य दशमी तर अमावस्येपर्यंत श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ साजरा करतात.

गोळवशीतील नागादेवी - 


           गोळवशी गावाची ग्रामदेवता नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.या मंदिरातील बायंगीदेव खुप प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक श्रद्धाळू स्वतः च्या प्रगतीसाठी, व्यवसायिक भरभराटीसाठी या गावात येतात.व बायंगीदेवाचे प्रतिक म्हणून इथून श्रीफळ किंवा बाहुली घेऊन जातात.बायंगी देवाचे प्रतिक म्हणुन नेलेल्या श्रीफळ व बाहुलीची योग्य पद्धतीने चालणुक केल्यास व्यवसायात थक्क करणारी भरभराट होते,तसेच या देवतेच्या तामसिक शक्तीची चालणूक योग्य पद्धतीने न केल्यास संपूर्ण घराची अधोगती होते अशी आख्यायिका (दंतकथा)  इथे गोळवशी गावात पहावयास मिळते. खरं तर या मागील सत्य असत्यतेच्या वादात पडण्यापेक्षा आपले दारिद्रय निर्मूलन होऊन कमी वेळेत प्रगती होईल या भावनेने अनेकांची पाऊले या गावात वळतात.नागादेवीच्या मंदिराजवळ असणारी देवराई समृद्ध आहे.तर जवळच असलेल्या १०५ सतीशीळा शिल्पेही अभ्यासण्यासारखीच आहेत.

       
भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा :-
                भडे गावामध्ये धगधगत्या निखाऱ्यावर चालण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. गुढी पाडव्याच्या मध्यरात्री आगीवर चालण्याचं अग्निदिव्य सहजतेनं केले जाते. अंगावर काटा आणणाऱ्या प्रथेत निखाऱ्यावर चालणारे कधी जखमी झालेत किंवा भाजलेत असं नाही. गावातील सती गेलेल्या महिलेची आठवण म्हणून सतीचा खेळ या नावाने ओळखली जाते.साधारण सायंकाळी पाच वाजता होम पेटवला जातो. होमातून निखारे आणि जळकी लाकडे वेगळी केली जातात. पेटणारी लाकडे बाहेर काढली जातात. हे काम ग्रामस्थ सहजतेने करतात. सर्वात मोठा ओंडका कोण उचलून आगीत टाकतो याचीही चढाओढ सुरु असते. नमन आटोपल्यानंतर होमाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. मानकरी सर्वातप्रथम निखाऱ्यावरुन चालतात. त्यानंतर सर्वचजणं बिनधास्तपणे हे अग्निदिव्य करतात.या गावात पहिला आलेला मूळ पुरुष मयत झाल्यावर त्याची पत्नी सती गेली. त्या सती गेलेल्या महिलेची आठवण ठेवण्यासाठी गावात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरु आहे, असे ग्रामस्थ सांगतात. सती गेलेल्या महिलेचा गावावर कृपा आर्शीवाद राहतो, अशी गावाची श्रध्दा आहे. लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यत सर्वच बिनधास्तपणे या पेटत्या निखाऱ्यारून अनवाणी धावतात. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथ लोकं येतात. गोवा, कर्नाटक, बिहार राज्यातून सुद्धा हा अनोखी परंपरा पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावत असतात.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने काही वर्षापूर्वी हा प्रकाराचा छडा लावण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थाच्या मनात हा सोहळा एक परंपरा म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलिकडे जावून या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याचं धाडस इथले शेकडो ग्रामस्थ स्वतःहून करतात. ना कोणावर सक्‍ती असते ना कोणाला गळ घातली जाते. 

जगातील सर्व मानवी संस्कृतीचा विकास व उदय नदीच्याच काठावर झाला आहे.आदिम काळापासून माणूस नदीलाच माय मानून तिचे पूजन करित आला आहे.तिच्या काठावरच्या त्याने आपली वसतिस्थाने अर्थात गावे निर्माण केली.आज नद्यांचे सर्वत्र झालेले प्रदूषण लक्षात घेऊन चला जाणूया नदीला ही महत्वाकांक्षी योजना सरकार राबवीत आहे.यात मुचकुंदी नदीचाही समावेश अाहे.माचाळात उगम पाऊन गावखडीजवळ सिंधुसागराला मिळेपर्यंत मुचकुंदीनेही खोरनिनको , प्रभानवल्ली , भांबेड, वेरवली,वाघणगाव, विलवडे,वाकेड,  बोरथडे, इंदवटी,गोळवशी,साठवली,इसवली,बेनी,भडे अशी अनेक गावे समृद्ध केली आहेत.या नदीच्याही संदर्भात विविध गावात कथा,भयकथा, गुढकथा आहेत.तशाच तिच्या काठावर वाढलेल्या माणसाच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनातून कथा दंतकथा आपल्या पुढे उभ्या राहतात.या दंतकथा, आख्यायिका वा परंपरंचा सांभाळ जपणूक इथल्या ग्रामीण समुदायाने आजवर भक्तिभावाने केला आहे.

    आज पर्यटन लोकांच्या गरजेनुसार आकार घेत आहे. निसर्गाशी नाते जोडणारे शाश्वत पर्यटन लोकांना हवे आहे. भेसळमुक्त नैसर्गिक अन्न,शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि त्याचबरोबरच शुद्ध विचारांना साथ घालणारे पोषक वातावरण लोकांना हवे आहे. आजचा पर्यटक सतत नवनवीन स्थळांच्या शोधात असतो.जिथे गेल्यावर सर्व कोलाहालापासून दूर केवळ निसर्गाचे संगीत ऐकण्यात मन रमून जाईल , अश्या ठिकाणी रिमझिमणाऱ्या श्रावणसरी अंगावर घेत ऊन- पावसाचा लपंडावाचा खेळ खेळत डोंगर-कपाऱ्यातून ढगांचा-धुक्याचा पाठशिवणीच्या खेळात सहभागी व्हायला तो आतुर असतो. आधुनिक पर्यटक खूप निराळा आहे.तो पर्यायवरण दक्ष आहे. मानवी जीवनातील निसर्गाचे महत्त्व तो जाणतो.चैन,सुख व सोयीस्कर पर्यटनाबरोबर आज शाश्वत अर्थात इको टुरिझमला जागतिक पर्यटनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.या दृष्टिने कोकणातील लांजा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ दाखविताना माचाळची सापड लोककला दाखवायला हवी,जावडे गावातील पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात जुना ब्राम्हणी लेणीसमुह दाखविताना जवळच्याच गोळवशी गावातील नागदेवता मंदिर इथल्या १०५ सतीशीळा ही दाखवायला हव्यात.मुंबईतील तंबाखु मार्केटचे वर्चस्व गाजविणाऱ्या शेट्येंच्या वाकेड गावातील वाकोबाचे भव्य मंदिर दाखविताना इथल्या रंजक कथा त्यांना सांगायला हव्यात.भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य सहजतेने पूर्ण करणारी इथली ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा,कुवे व लांजा शहरातील जाकादेवीतील लोटांगण,प्रभानवल्लीतील पाच पालखींंची भेट व पालखीनृत्य परंपरा दाखवायला शिमगोत्सवात इथे जाणीवपूर्वक पर्यटक आणावे लागतील.या छोट्या छोट्या गोष्टीतून लांजा तालुक्यातील या प्रथा परंपरा देशभरात पोहचतील.या अगम्य गूढ तितक्याच रंजक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून त्यातून तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळेल.या साठी मुचकुंदीच्या काठावरील गावात पहायला मिळणाऱ्या कथा दंतकथा प्रथा परंपरेची नियोजनबद्ध मांडणी सर्वांसमोर केल्यास देवभोळ्या, श्रद्धाळू कोकणी माणसाच्या कथा दंतकथाही आर्थिक संपन्नतेस हातभार लावतील हे निश्चित!

विजय हटकर.
लांजा.
८८०६६३५०१७

       
       

    

    


No comments:

Post a Comment