श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ
गोव्याच्या दक्षिणेला वसलेल्या काणकोण तालुक्यातील पर्तगाळी गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे एक देखणे हिंदू देवालय आहे. गोमांतक भूमीतील समृद्ध हिंदू मंदिरांच्या शृंखलेत याचा आवर्जून समावेश करावा लागेल.मात्र हे देवालय 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' या नावाने ओळखले जाते.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून समस्त जगतातील गौड सारस्वत ब्राम्हणांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. मठाच्या मध्यवर्ती असलेल्या देवालयात प्रभू रामचंद्र, श्री देव लक्ष्मण, श्री देवी सीता यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यामागील कथा रंजक आहे. या मठाच्या मठाधिपतींनी लगतच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील परमपवित्र अशा श्रीक्षेत्र गोकर्ण या ठिकाणी मिळालेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना निसर्गरम्य शांत पवित्र अशा गोमांतक भूमीतील कुशावती नदीच्या काठावरील पर्तगाळी गावात साधारण इ.स.१५७५च्या आसपास केली असे मठातील पुरोहितांनी सांगितले. मात्र या मठाची स्थापना निश्चित करण्यासंदर्भातील संशोधन आजही सुरू आहे. या मठाचे संचलन दिक्षा परंपरेने चालते. मठाचे २३ वे मठाधिपती श्रीमत विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १९जुलै २०२१ रोजी त्यांनी देहत्याग केल्यावर परमपूज्य विद्याधीशतीर्थ स्वामीजी मठाचे मठाधिपती म्हणून मठानूययांना मार्गदर्शन करीत आहेत. जगद्गुरू मध्वाचार्य यांनी हिमालयात बदिकाश्रम येथे मध्व पंथाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यापुढे गादीवर बसलेल्या सर्वच प.पू.स्वामीनी या मध्व पंथांच्या द्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करित विश्र्वकल्याणाणाचे काम केले.आज या मठाद्वारे या पंथाचा प्रसार विश्र्वभर केला जातो.
या पंथाचे तिसरे मठाधिपती श्रीमत जीवोत्तम तीर्थ स्वामीजींच्या नावाने पर्तगाळी गावातील मठ ओळखला जातो. सद्यस्थितीत या मठात संस्कृत ग्रंथालय, अद्ययावत निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनसभागृह असून भाविकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे तीर्थस्थळ आहे.
मठामागचा कुशावती नदीचा विलोभनीय घाट इथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतो. शांत निवांत कुशावतीच्या स्वर्गीय सुंदर परिसरातील 'गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच दक्षिण गोव्यात काणकोण भागात येणाऱ्या श्रद्धाळू पर्यटकांनी इथे अवश्य यायलाच हवे.
विजय हटकर
८८०६६३५०१७
क्षणचित्रे
कुशावतीच्या विहंगम काठावर स्फुरलेली कविता -
नदीमाय
नितळ निर्मळ
अखंड प्रवाही
जीवन फुलवी
सृजनांचे... ।।१।।
सतत द्यायचे
हाच तिचा धर्म
काठ हिरवेगर्द
बारमाही...।।२।।
तिच्याच काठाशी
श्रीं ची अधिष्ठाने
वैश्र्विक कल्याणा
यज्ञविधी...।।३।।
फळली,फुलली
कृषिक संस्कृती
भूमीपूत्र नांदे,
नदीकाठी...।।४।।
कुशावती, मांडवी
आईचीच रूपे
सर्वांची पयोष्णी,
नदीमाय...।।५।।
वि ज य ह ट क र
No comments:
Post a Comment