Monday, June 30, 2025

 ध्येयापासून बाजूला न सरकलेली ' साधना '.



  

     एकविसावे शतक हे खऱ्या अर्थाने महिलांचे शतक आहे. ग्रामपंचायत सरपंच पदापासून मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रमुख पदापर्यंत सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने आपली पात्रता सिद्ध केली आहे. शतक भरापूर्वी स्त्रीवादी चळवळीने स्त्री - पुरुष समानतेची ज्योत पटवली.तिच्या प्रकाशात स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. आत्मशोध आणि स्वाभिमानाच्या वाटेवर चालताना त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाला वैभवशाली आकार दिला. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत स्त्रियांभोवती असलेला शोषणाचा पोलादी पडदा त्यांनी आपल्या कर्तुत्वाने किलकिला केला. महानगरांपासून ते गावखेड्यापर्यंतही असंख्य स्त्रिया आत्मनिर्भर होऊन उंच भरारी घेत आहेत. अशाच यशस्वितांच्या यादीतील एक उत्साहवर्धक नाव म्हणजे उर्मिला माने विद्यालय, आसगे, ता. लांजाच्या मुख्याध्यापिका सौ. साधना बावधनकर मॅडम होय.



    समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेल्या कोकणभूमीत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर समाजवादी चळवळीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. बॅरिस्टर नाथ पै, प्राध्या. मधु दंडवते, ना. ग. गोरे, भाई वैद्य, मृणालताई यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने तयार झाला. लांजा तालुक्यातूनही माणसातल्या विवेकशक्तीवर अढळ श्रद्धा असणारे काही कार्यकर्ते पुढे आले, त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे कै. ग. रा. तथा भाई नारकर !स्वातंत्र्योत्तर कालखंडात लांज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विकासाला दिशा देण्यामध्ये भाई नारकरांचा मोठा वाटा होता. साधारण १९८० - ९० च्या दशकात माध्यमिक शिक्षणाची लांजा तालुक्यात असलेली दुरावस्था पाहून ग्रामीण भागाच्या विकासासाठी माध्यमिक विद्यालयांची उभारणी आवश्यक असल्याने समाजवादी विचारसरणीचे पाईक असलेले वि. ल. तथा भाई मयेकर यांनी हर्चे येथे बॅ.नाथ पै विद्यालय तर ग. रा. तथा भाई नारकरांनी आसगे येथे उर्मिला माने विद्यालयाची मुहूर्तमेढ आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने रोवली आणि हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानज्योत प्रज्वलित केली.आज या दोन्ही विद्यालयांनी जिल्हयाच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. भाई नारकरांनी रोवलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून या प्रशालेत २८ वर्ष  शिक्षिका म्हणून आणि ९ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी योगदान देणाऱ्या  सौ. साधना विनायक बावधनकर मॅडम आज दि. ३० जून २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाल्या. त्यानिमित हा प्रपंच...


      बावधनकर मॅडम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आष्टा या गावी ३० जून १९६७  रोजी झाला. त्यांचे  इ. तिसरीपर्यंतचे शिक्षण आष्टा येथेचे झाले. मात्र कोकणातील देवगड तालुक्यात आजोळी शिरगांव येथे वार्धक्यात जगणाऱ्या आजीची जबाबदारी व राजापूर एस.टी. डेपोत वडीलांची कंडक्टर म्हणून असलेली नोकरी या कारणास्तव त्यांच्या आई - वडीलांनी शिरगांव ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नांदगांव - कुणकेश्वर रस्यावर शिरगांव स्टॉपवर असलेल्या कौलारू घरात तीन अपत्यांसह त्यांचे आई वडील संसाराचा गाडा चालवित होते. त्यामुळे बावधनकर मॅडम यांचे ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण शिरगांव हायस्कूल येथे झाले. शाळेतील शिक्षक दिनाला शिक्षिका म्हणून अध्यापन करण्याची संधी मिळाल्यावर पुढे जाऊन शिक्षिका होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या स्वप्नपूर्तीसाठी  १९८२ - १९८८ ही सात वर्षे इ. ११ वी ते पदवी व पुढे बी.एड. चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रोजचा शिरगांव ते देवगड हा ५२ कि.मी. चा प्रवास त्यांना करावा लागला.शिकण्याच्या या काळात घरच्या गरिबीतून वर आलेल्या बावधनकर मॅडमना परिस्थितीने लाचारी शिकविली नाही ; तर संघर्षासाठी ताकद पुरविली. अभ्यासा सोबतच खेळात कुशल असल्याने त्यांनी वालावलकर अध्यापक महाविद्यालयात १२ नोव्हे. १९८८ रोजी धावणे,थाळीफेक व  भालाफेक  या मैदानी खेळात सुयश प्राप्त करून महाविद्यालयाची 'आदर्श खेळाडू ' म्हणून बहुमान पटकाविला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यावेळी देवगड महाविद्यालय कोकणभर प्रसिद्ध होते. प्राचार्य शिर्के मॅडम, पांग्रडकर सर, श्रीराम काळे सर,जोशी मॅडम,एन.पी. पाटील सर,सातारकर मॅडम,सर्जेराव गर्जे सर यांसारख्या तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहवासात साधना बावधनकर यांच्या व्यक्तिमत्वाची जडण - घडण झाली.




    १९८८ ला लांजा तालुक्यातील उर्मिला माने विद्यालय आसगे या समृद्ध वनश्रीच्या कुशीत वसलेल्या प्रशालेत बावधनकर मॅडम इंग्रजी,भूगोल विषय शिक्षिका म्हणून रुजू झाल्या व पुढे ३७ वर्षे त्यांनी या प्रशालेत समर्पित भावनेने सेवा केली. नव्वदच्या दशकात लांजा तालुका हा तसा अविकसित भाग अशी ओळख असलेला आणि म्हणून साधारण सदतीस वर्षांपूर्वी आसगे गाव एका स्त्रीने नोकरीसाठी स्वीकारणे हे एक आव्हानच होते.खेडेगाव असल्याने अपेक्षित सुविधा नव्हत्या त्यात भर म्हणजे विनाअनुदानित शाळा. या प्रतिकूल परिस्थितीत अध्यक्ष ग.रा.नारकर, आर. जी. चव्हाण, नाना मानकर आणि सर्व संचालकांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी आपल्या अध्यापकीय सेवेला प्रारंभ केला.पुढे २७ जून१९९० रोजी साधना मॅडम  विनायक सखाराम बावधनकर या कर्तुत्वान युवकाशी विवाहबद्ध झाल्या.लग्नानंतर सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता, मात्र कर्तृत्ववान पतीची अखंड साथसोबत असल्याने बावधनकर मॅडम आत्मविश्वासाने त्याला सामोऱ्या गेल्या. त्यांचे उद्यमशील पती विनायकरावांनी सुद्धा सुरवातीपासुनच विविध व्यवसाय केले. मात्र अलीकडच्या काळात चिरेखाण व्यवसायात त्यांचा जम बसला. जसा-जसा काळ सरकत गेला तसे - तसे जीवनात 'श्रमप्रतिष्ठेला ' महत्त्व देणाऱ्या या दांपत्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले. त्यांची उच्चशिक्षित कन्या विनंती आणि जर्मनीत अभियंता असलेला वैभव ही दोन्ही मुले आपापल्या जीवनात आज स्थिरस्थावर आहेत आणि म्हणूनच बावधनकर दांपत्यांशी चर्चा करताना पती-पत्नी म्हणून त्यांची एकमेकांप्रती असलेली वचनबद्धता जाणवतेच, सोबतीने जीवनात गाठलेल्या ध्येयपूर्तीचा आणि सर्वांगिण साफल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना पाहून ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमच्यासारख्या तरुणाईला त्यांच्या आजवरच्या वाटचाली विषयी कृतार्थ वाटते.

 


   खरं तर ८०- ९० च्या दशकात कोकणात तळागाळातील समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व बावधनकर मॅडम करतात. बावधनकर मॅडम एक उत्तम निवेदिका आहेत. प्रशालेत रुजू झाल्यापासून अनेक वर्षे शाळेतील उपक्रमांचे निवेदन त्या करीत आल्या आहेत. सभाधीटपणा,कार्यक्रमाची माहिती, विचार प्रकट करणाची कला, निरीक्षणात्मक दृष्टी, आवाजातील चढ - उतार हे कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्या ठायी आहेत. आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, आसगे दरवर्षी संस्थापक ग. रा. नारकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी रत्नभूमीतील विधायक कार्य करणाऱ्या गुरुजनांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करते. कोकणभर ख्याती असलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाची उंची ओघवती वक्तृत्व शैली व व्यासंगाची जोड असलेल्या बावधनकर मॅडमनी निश्चितच वाढवली आहे.  प्रशालेच्या भौतिक विकासासाठी, विद्यार्थांच्या सर्वांगिण विकासासाठी मॅडमनी आपल्या परीने मदतीचा भक्कम हात आजवर दिला आहे. मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता  'निरिच्छ दातृत्वाचा ' भाव कृतीतून जपला आहे. इंग्रजी विषयाच्या तज्ञ मार्गदर्शिका म्हणून स्मार्ट पीटी प्रशिक्षणांतर्गत सलग सहा वर्षे मॅडमनी जिल्हयातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. 


   


बावधनकर मॅडम यांचे आयुष्य म्हणजे एका शिक्षिकेने ध्येयधुंद होऊन केलेली ज्ञानसाधनाच आहे. २८ वर्ष सहाय्यक शिक्षिका म्हणून आदर्शवत अध्यापन केल्यानंतर ०१ जून २०१६ रोजी सेवाज्येष्ठतेनुसार त्या मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्या.स्त्रियांमध्ये एक स्वाभाविक गुण असतो. सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचा. स्वतःतील करुणा आणि ममत्व घेऊनच त्या प्रशासनात उतरतात.मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळात शिक्षण विभाग, संस्थाचालक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांसह अन्य घटकांशीही त्यांनी उत्तम समन्वय राखला. प्रशालेचा परिसर सुंदर आणि आश्वासक राहील याचीही त्यांनी काळजी घेतली.उत्तम प्रशासना बरोबरच उपक्रमशील, क्रियाशील सहकारी शिक्षकांना त्यांच्या आवडीचं विद्यार्थी व प्रशाला हिताचं काम करण्यास स्वातंत्र्य देणे,विरोधी मतं व्यक्त करण्याची मुभा असणं आणि इतरांना त्यांच्या कामात मार्गदर्शनाबरोबरच प्रोत्साहन देणं हे बावधनकरांच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आहे.  मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कर्तुत्वाला झळाळी प्राप्त झाली. त्यांच्या नेतृत्वात प्रशालेत झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

हर घर तिरंगा उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारीनी कौतुक केले. विविध क्रीडास्पर्धातील यशासह आषाढी एकादशी चित्ररथ, कोरोना गुढी, विधवा स्त्रीयांना सामावून घेणारे हळदी कुंकू, वृक्षारोपण, आजी - माजी मुख्याध्यापक मेळावा, माजी विद्यार्थांच्या सहकार्याने संस्था व शाळेच्या मदतीकरीता नाट्यप्रयोग आदी विविधांगी उपक्रम त्यांनी यशस्वी केले.मुख्याध्यापिका पदाच्या या काळात रावसाहेब पोळ,रवींद्र दळवी, उमेश यादव, संतोष चलोदे, जितेंद्र गावडे, प्रसाद माटल या शिक्षकांसह लिपिक संदीप चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप मांडवकर या सर्वांचे त्यांना सहकार्य लाभले.खरं तर, आपण ज्या खूर्चीत बसतो ती खूर्ची वलयांकित असते. मात्र आपण तेव्हाच वलयांकित होतो जेव्हा आपण निष्ठेने काम करतो. बावधनकर मॅडम कामाप्रती असलेला निष्ठेमुळेच आज लोकाभिमुख झाल्या आहेत.


       बावधनकर मॅडम फक्त आदर्श शिक्षिका नाहीत तर समाजाच्या धारणांबद्दल आणि सामाजिक मूल्यांबद्दल जागृत असलेल्या संवेदनशील साहित्यिका देखील आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता,कथा, वैचारिक लेख ओघवते व भावनाप्रधान आहेत. प्रशासनाच्या व्यापामुळे गतकाही वर्षात त्या अधिक लिहू शकल्या नसल्या तरी सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या टप्प्यात अधिक जोमाने आपला छंद जोपासतील याचा विश्वास वाटतो.  शिक्षण क्षेत्रासह साहित्य, संस्कृती क्षेत्रातही त्यांनी सेवाव्रती कार्य केले आहे. बावधनकर मॅडम यांचे आदर्शवत जीवन समाजाला दिशादर्शक ठरणारे आहे. त्यांच्या

आजवरच्या शैक्षणिक सामाजिक साहित्य क्षेत्रातील कामाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आसगे,लांजा तालुका माध्यमिक अध्यापक संघ, लांजा तहसिल हिंदी अध्यापक संघटना आदी विविध संस्थांनी 'आदर्श शिक्षिका ' पुररकाराने त्यांना सन्मानित केले आहे.


   नाही पंढरीसी जाणे । नाही केली कधी वारी ।

   माझी कर्मभूमी हीच । माझी रोजची पंढरी ।।

  जेव्हा येतात लेकरे ।सुख दुःख सांगायला ।

  माझा विठठ्ल ची रोज । येतो मला भेटायला ॥


- या कवितेच्या ओळी खऱ्या अर्थाने बावधनकर मॅडम जगल्या आहेत.जगातील प्रत्येक देशात शाळांना अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीने शाळांना 'ज्ञान मंदिराचा ' दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे धार्मिक मंदिरांइतकेच या ज्ञानमंदिरांना पवित्र अधिष्ठान लाभले आहे. आजच्या बदललेल्या शिक्षक - विद्यार्थी नातेसंबंधात, मराठी माध्यमांच्या शाळांच्या दुरावस्थेत आणि प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पाश्चात्य इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावातही  गुरुला प्रभूसमान मानण्याचे हे अधिष्ठान जपण्याचे कार्य साधना बावधनकर मॅडम सारखी व्रतस्थ व्यक्तिमत्वे करीत आहेत. साधना म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न! साधना म्हणजे तप ! शालेय वयातच शिक्षिका बनून पिढी घडवून राष्ट्रसेवा करण्याचा ध्यास मनी बाळगलेल्या साधना बावधनकर मॅडमनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली. योगी योगसाधना करतात, संगीतोपासक स्वरसाधना करतात तर कर्मयोगी कर्म मार्गाचे आचरण करताना ध्येयापासून बाजूला सरकत नाहीत. त्याप्रमाणेच बावधनकर मॅडमही ज्ञान साधनेच्या वाटेवरून चालताना कधीही मागे हटल्या नाहीत. समर्पित प्रयत्नांनी त्यांनी आपल्या ज्ञानसाधनेतून उद्याची सक्षम पिढी घडविताना स्वतःच्या जीवनालाही सुयोग्य दिशा देत घरातील ज्येष्ठांनी ठेवलेले 'साधना' हे नाव रुढार्थाने सार्थक केले आहे.


    एकुणच सदतीस वर्षाच्या शिक्षण सेवेत कोणतीही कुचराई न करता, निष्कलंक चारित्र्य जपलेल्या बावधनकर मॅडमना भाग्याची सेवानिवृत्ती घेण्याची संधी आज विधात्याने दिली आहे. आदरणीय बावधनकर मॅडम यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य प्रदीर्घ, निरामयी, आनंददायी होवो ही शुभकामना व्यक्त करताना बावधनकर मॅडममधील अव्दितीय ध्येयवेड्या शिक्षिकेला मनःपूर्वक दंडवत !


💐💐💐💐💐

श्री. विजय हटकर
लांजा - रत्नागिरी






No comments:

Post a Comment

  ध्येयापासून बाजूला न सरकलेली ' साधना '.         एकविसावे शतक हे खऱ्या अर्थाने महिलांचे शतक आहे. ग्रामपंचायत सरपंच पदापासून मल्ट...