Saturday, May 18, 2019

वाढदिवस अभीष्टचिंतन सुनिल जाधवबुवा.
💐💐💐💐💐

        कोकणातील सुप्रसिद्ध भजनीबुवा व सोहम् संगीत विद्यालय, बदलापुरचे संस्थापक श्री सुनिल जाधवबुवा यांचा १९ मे हा जन्मदिन.दृकश्राव्य माध्यमांमुळे व करमणुकिच्या इतर साधनांमुळे २१ व्या शतकात "भजन" ही संकल्पना लोप पावत असताना कोकणसह मुंबई महानगरात सुरेल व सुरेख भजनाचे कार्यक्रम आयोजित करुन  मनात भजन कलाप्रकाराविषयी अभिरूची निर्माण करणारे लोकप्रिय भजनीबुवा म्हणजेच सुनिल जाधव बुवा.
      बदलापूर येथे सन २००८ मध्ये 'सोहम संगीत विद्यालयाची ' स्थापना करुन आजवर हजारो विद्यार्थ्यांना संगीत व गायनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणारे सुनिल जाधवबुवा मूळचे कोकणातील निसर्गरम्य व ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावचे सुपुत्र. त्यांचे ' जाधव ' घराणे भजन कलेसाठी अखंड कोकणात प्रसिद्ध. त्यांच्या मागील चार पिढ्यांनी भजन कलाप्रकार जोपासण्याचे काम केले.आज हिच परंपरा पुढे जोपासताना सुनिल जाधवबुवा यांनी कोकण व मुंबईत हरिनामाची पताका फडकविली आहे.सुनिल बुवांनी त्यांच्या गाण्याची दिक्षा त्यांचे वडिल सुप्रसिद्ध भजनसम्राट काशिनाथ जाधव उर्फ लालुबुवा यांच्याकडून घेतली.आणि आयुष्यभर भजन परंपरेसाठी स्वत:ला वाहून घेतले.मुंबईत गेल्यानंतर संगीतरत्न विलासबुवा पाटील यांच्याकडेही त्यांनी २३ वर्षे संगीताचे शिक्षण घेतले.
सुनिल बुवांचा आवाज भजनासाठी खुपच पोषक म्हणजे प्रासादिक आहे.तो खुला आणि खडासोबत सुस्पष्ट आहे.कोणत्याही भजनासाठी लागणारं सगळं भागभांडवल त्यांच्या आवाजात आहे आणि त्यामुळेच आज ते लोकप्रिय भजनीबुवा बनले अाहेत.त्यांची भजने वयोस्करांपासून माझ्यासारख्या नव पिढीलाही मनोमन आवडतात हे त्यांच्या गायकीचं खास वैशिष्ट्य.
        भजन कलाप्रकारासोबतच सुनिल जाधव भावगीते, भक्तीगीतांच्या सुंदर संगीत मैफिलींचे कार्यक्रमहि तितक्याच उत्कृष्टपणे सादर करतात.सुनिल जाधवबुवा यांची चारही मुले आज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन वाटचाल करीत आहेत.कु.भैरवी उत्तम गायिका आहे.तिने स्वरबद्ध केलेली अनेक गीते लोकप्रिय झाली असून ती यूट्यूब वर झळकली आहेत.भैरवीच्या आवाजत स्वरमाधुर्य आहे.तिच्या ध्वनिमुद्रकांमधून आपण ते माधुर्य अनुभवी शकतो.दुसरी कन्या कु.भक्ति सुंदर तबलावादन करते.उत्तम रियाजाच्या जोरावर  भविष्यात ती आघाडीची तबलावादक होईल हे नक्की.तर छोटा चिरंजिव सोहम सध्या पखवाज शिकतोय.नुकत्याच त्यांच्या प्रभानवल्ली गावातील ( नांगरफळे) यथे त्यांच्या जाधव कुटंबिंयांचा त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ' चॊथरा ' या नाटकाच्या प्रयोगाला मी माझे मार्गदर्शक श्री सुभाष लाड सर यांच्यासोबत त्यांच्या गावी गेलो होतो.त्या नाटकात छोट्या सोहमने साकारलेला बालकलाकार सर्वांनाच आवडला.सुनिल जाधवबुवा नोकरी संभाळून संगीत क्षेत्रात व भजन परंपरा रुजविण्यासाठि कार्यरत असताना त्यांच्या पत्नी सॊ.नम्रतावहिनींचेहि  त्यांना खुप सहकार्य मिळते.पत्नी नम्रता च्या पाठिंब्यामुळेच मी आजवर यशस्वी वाटचाल पुर्ण  करु शकलो हे ते नम्रपणे सांगतात. 
             अनेकवेळा नोकरी करुन कोकणात असलेल्या भजनाच्या कार्यक्रमासाठी (सुपारी) मुंबईहून गावी येताना त्यांना खुप मोठी कसरत करावी लागते.यावेळी लक्ष्मी महाकाली प्रासादिक भजन मंडळ, प्रभानवल्ली या मंडळाची तोलामोलाची साथ त्यांना लाभते.संगीत क्षेत्रात नावीन्य,सर्जनशीलता असेल तरच पाय रोवून टिकता येईल हा सिद्धांत त्यांना पक्का ठाऊक आहे आणि म्हणूनच सतत नवीन शिकण्याचा वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न जाधवबुवा नेहमी करत असतात.नुकतेच आमचे मार्गदर्शक श्री सुभाष लाड सर निवृत्त झाले.त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त लाड सरांनी लिहिलेल्या कविता स्वरबद्ध करुन सुनिल जाधवबुवांनी "संगीतसुभाष" हि सुंदर मैफिल हिरानंदानी गार्डनच्या हिरवळीवर सादर केली.लाड सरांच्या आशयघन कविता ख-या अर्थाने सुनिल  जाधवबुवांनी लोकापर्यत पोहचविल्या.या मैफिलीला उपस्थित मान्यवरांनीही दाद दिली.सुदैवाने या सुरेल व सुरेख मैफिलीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मलाही मिळाले.
            ३१ वर्षे नोकरी संभाळून संगीत क्षेत्रात यशस्वी वावरणाऱ्या जाधवबुवांनी सामाजिक बांधिलकीतून व्यसनमुक्ती, साक्षरता, पर्यावरण प्रबोधनावर उपक्रमहि त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.सोहम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना रेकाॅर्डिंग कसे गायचे,स्टेजवर गीताचे सादरिकरण कसे करायचे, श्रोत्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने गाणं कसं गावं, सिंगलबारि भजन कसे गायचे याचे प्रशिक्षण देताना मिळणारा आनंद काहि वेगळेच समाधान देतो असे ते नेहमी सांगतात.
 
 नुकत्याच " झी" मराठी या मनोरंजन वाहिनीवर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या लोकप्रिय झिंग झिंग झिंगाट कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली भजनी परंपरा व गायनाची कला सहका-यांसमवेत सादर केली.पार्ले जी प्रस्तुत झिंग झिंग झिंगाट च्या पहिल्या व दुस-या फेरित दमदार कामगिरी करुन जाधव बुवांच्या सोहम संगीत विद्यालयाने अंतिम फेरित धडक मारली आहे.अजून अंतिम फेरि संपन्न व्हायची आहे.मुंबई व कोकणातील प्रेक्षकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.त्याच्या जोरावर नक्कीच ते या स्पर्धेचे विजेतेपद पटकावतील.
       एकूणच २१ व्या शतकात पाश्चिमात्य संगीतावर थिरकण्याला प्राधान्य देणाऱ्या नव्या पिढीसमोर भजनासारखा कलाप्रकार टिकून रहावा यासाठी निरंतर प्रयत्नशील असलेले प्रतिभासंपन्न सुनिल जाधवबुवा ५१ वर्षात आज पदार्पण करित आहेत.यापुढील काळात आपणांस उत्तम आरोग्य ,दीर्घायुष्य, सुख लाभो,  आपल्या कुटुंबाची नित्य प्रगती होत राहो हिच सदिच्छा.
💐💐💐💐💐⛳

    श्री विजय हटकर,
   मुक्तपत्रकार- लांजा.

    दै.महासागर - पालघर ठाणे
दिनांक २३ मे १९

Thursday, May 16, 2019


नाटककार ला.कृ.आयरे जन्मशताब्दी विशेष..
🎭🎭🎭🎭🎭
गिरणगावच्या रंगभूमीचा "मुकुटमणी ".

       मराठी कामगार रंगभूमीचे " शेक्सपिअर" ,गिरणगावच्या रंगभूमीचे " मुकुटमणी " आणि ' ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालु ठेवणारी पहिली व्यक्ती ' असे आचार्य प्र.के. अत्रे यांनी गॊरविलेले कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार म्हणजे श्री लाडकोजीराव कृष्णाजी आयरे  होय.२१ मे १९१८ मध्ये वाटूळ ता.राजापूर येथे जन्मलेल्या लांजा तालुक्यातील रिंगणे गावच्या या महान सुपुत्राचे सन २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष.
      मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कामगार रंगभूमीवर एक अग्रेसर आणि लोकप्रिय नाटककार म्हणून १९३९ ते १९६२ या दोन दशकात आपली नाटके सादर करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरेंसारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ दिवंगत दिग्गजाचे कार्य चिरंजीव व्हावे, वर्तमान पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ला.कृ.आयरे यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी व हितचिंतकांनी स्व.आत्माराम हांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ' नाटककार ला.कृ.आयरे स्मृति ट्रस्ट' ची स्थापना २३ जुलै १९८९ रोजी केली.नाटककार ला.कृ. आयरेंच्या आठवणी सदैव ताज्या ठेवण्यासाठि प्रयत्नशील असणाऱ्या या ट्रस्टने गत तीन दशकात एकांकिका स्पर्धा , एकांकिका लेखन, नाट्यस्पर्धा,नाटयलेखन, एकपात्री स्पर्धा आदि विविध उपक्रम राबवून मराठी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली आहे.यंदा ला.कृ.आयरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे ऒचित्य साधून संस्थेने वर्षभर विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.याचाच एक भाग म्हणून जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा १९ मे रोजी मुलुंड मराठी मंडळ,मुंबई येथे संपन्न होणार असून येथे विविध यशस्वी विजेत्यांच्या गॊरवासोबत विजय हटकर व सुभाष लाड संपादित  "नाटककार ला.कृ.आयरे - गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
        मुंबईच्या लालबाग,परळ, नागपाडा,लोअरपरळ, काळाचॊकी,शिवडि,सातरस्ता, वरळी,आगारबझार अशा विस्तृत मध्य मुंबईतल्या भागावर विस्तारलेल्या कापड गिरण्यांनी रंगभूमीला दिलेली देणगी म्हणजे कामगार रंगभूमी.२० व्या शतकात अडिच लाख कामगारांना या कापड गिरण्या रोजगार पुरवित होत्या.मुंबईच्या व्यापारात या गिरणी कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे.या गिरणीत मास्तर,मुकादम,जाॅबर इ.पदावर कोकणातील चाकरमानी लोक राहू लागले.या कोकणी कामगारांच्या वस्तीने चाळ संस्कृती निर्माण झाली आणि मग कोकणातील तरुणांमध्ये उपजत असलले नाट्यवेड गिरणगावात रूजू लागले.चाळी- चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात, शिवजयंती,गोकुळाष्टमी, सत्यनारायण इ.प्रसंगी नाटके सादर होऊ लागली.गिरणगावात सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून कोकणच्या ग्रामीण जीवनाचा,बोलीचा,मनोवृत्तीचा परिचय महानगरातील लोकांना होऊ लागला.यामध्ये नाटककार आबासाहेब आचरेकर, टी.एस्.कावले,वसंत दुधवडकर, वसंत जाधव,आत्माराम सावंत, मु.गो.शिवलकर,कृ.गो.सुर्यवंशी,बाबुराव मराठे,ना.ल.मोरे,दत्ता साठम,प्रेमानंद तोडणकर, ना.रा. जोशी,इ.नाटककारांसोबत मामासाहेब वरेरकर, मो.ग.रांगणेकर ,आचार्य अत्रे अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर होऊ लागली.या सर्वामध्ये अग्रभागी होते ते कोकणातील नाटककार ला.कृ.आयरे .म्हणूनच त्यांना 'गिरणगावच्या रंगभूमीचा मुकुटमणी ' असे संबोधले जाते.
       नाट्यमहर्षी मामा वरेरकर व नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांना गुरूस्थानी मानणाऱ्या ला.कृ.आयरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी कोर्ट - कचे-यांचे दुष्परिणाम या विषयावर ' फिर्याद ' हे नाटक लिहिल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाहि.१९४९ मध्ये त्यांनी  ' जुलूम' हे नाटक रंगभूमीवर अाणले.या नाटकाचे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन हजारो प्रयोग होऊन संबंध महाराष्ट्रात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे १९४५ ते १९५७ या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी आपल्या ' स्वस्तिक नाट्य मंदिर' या संस्थेतर्फे स्वत:ची १५ नवी नाटके रंगभूमीवर आणून चैतन्य निर्माण केले.बुद्धीभेद,शेतकरिदादा, मायमाऊली,कुल कलंक, ईर्षा, अमरत्याग, कसोटी,मायेचा संसार,स्वराज्यरवि,निर्धार, आदि २३ नाटके, ०४ लोकनाट्ये,०६ एकांकिका व ३०० श्रृतिकांचे त्यांनी लेखन केले.
      कथानकातील विविधता, प्रभावी व्यक्तिमत्त्वे, सुंदर चैतन्यपूर्ण स्वभावरेखाटन,वेधक प्रसंग योजना,वातावरण निर्मिती, खटकेबाज- चटकदार संवाद,उच्च प्रतीची संवाद रचना,आंतरिक संघर्ष, मानवी मनोवृत्तीची विविध रूपे,श्रृंगारप्रचार,विनोदात्मकता,आकर्षक शेवट,कलात्मक दृष्टी,कोकणच्या बोलीवर विविधांगी दर्शन, आदि लेखन वैशिष्ट्यामुळे नाटककार ला.कृ.आयरे यांची नाटके त्या काळी महाराष्ट्र, गुजरात,म्हैसूर राजस्थान, आसाम ,मद्रास पर्यंत तेथील मराठी भाषिकांनी केली.
         प्रा.ना.सी.फडके यांच्या मतानुसार संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो.या संघर्षात गुंतलेल्या व्यक्ती या तुल्यबळ असायला हव्यात आणि नाटककाराने त्यांची स्वभावचित्रे निरपेक्षपातीपणे रंगवायला हवीत.तरच ते नाटक स्वाभाविक उंची गाठते.नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाटकांचा तर संघर्ष हा स्थायीभाव आहे.हा संघर्ष प्रस्थापित खोत,जमीनदार, सावकार विरोधात श्रमजिवी शेतकरि वर्गाचा होता. अन्यायाविरोधात न्यायाचा आहे.आयरेंनी नाट्यलेखनाव्दारे शोषित,वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी,श्रमजीवी वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्याचे कार्य केले आहे.त्यामुळेच समाज प्रबोधनाचे दर्शन घडविणारे श्रेष्ठ नाटककार म्हणून ते प्रसिद्धिस पावले.
         नाट्यलेखना शिवाय ' मराठा सेवक'या मासिकाचे संपादन करताना आयरेंनी आनंदवन ,रसरंग,कोकण दर्शन, ललित,  किर्लोस्कर, मनोहर, नवशिक्षण आदि मासिकं व साप्ताहिकातुन अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले.             
' बायोग्राफी इंडिया १९८०', ' लीडर्स आॅफ इंडिया',साहित्य अकादमी -नवी दिल्ली या ख्यातनाम पुस्तकातुन त्यांच्या दखलपात्र साहित्यिक कार्याचा गॊरव करण्यात आला आहे .    त्यांच्या अनेक नाटकांनी विविध पारितोषिके पटकाविली.महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनासाठी ' राज्यस्तरिय  पुरस्कारासोबत ' अखिल भारतीय नाट्य परिषद,भारत सरकार,कामगार कल्याण मंडळ, आंतरगिरणी कामगार स्पर्धा,नटवर्य चिं.कोल्हटकर नाट्यस्पर्धा, भारतीय साहित्य सभा -पुणे या विविध स्पर्धेत आयरेंच्या नाटकांनी समीक्षकांच्या,प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत अनेक पुरस्कार प्राप्त केले.आयरे एक प्रतिभाशली नाटककार होतेच पण त्याबरोबर एक उत्कृष्ट नट,दिग्दर्शक, निर्माता,प्रकाशक,कथाकारहि होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.सामाजिक कार्यातहि ते सक्रिय होते.त्यांनी त्यांच्या मुळ गावी रिंगणे येथे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाची स्थापना केली.कोकणात दुर्लक्षित राहिलेल्या राजापूर -लांजा तालुक्यातील २२८ गावांच्या विकासासाठी त्यांनी ' राजापूर -लांजा तालुका नागरिक संघा 'ची स्थापना केली.आज या संस्था उल्लेखनीय कार्य करित आहेत.साहित्य संघ मंदिर,शिवाजी मंदिर मुंबई, मराठी  ग्रंथ संग्रहालय, साने गुरुजी कथामाला आदि अनेक संस्थांमध्ये त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले.




      १६ डिसेंबर १९५१ रोजी झालेल्या दक्षिण कोकण नाट्य संमेलनाचे आयरे स्वागताध्यक्ष होते.त्यावेळी त्यांनी स्वागताक्षीय भाषणातून मांडलेले मराठी रंगभूमी व नाट्यचळवळिच्या उर्जितावस्थेसाठीचे अभ्यासपूर्ण विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात.आपल्या नाट्यलेखनाचे कोणतेच मानधन न घेणारे आयरे त्या काळात संप्रेषणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रेमाखातर व नाट्यचळवळीच्या प्रचारार्थ स्वखर्चाने नागपूर,चंद्रपूर,म्हैसूर आदि ठिकाणी आपुलकीने पोहचत असत.साहित्य, समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या नाटककार आयरे यांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन वर्तमान  पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.
       त्यांच्या कार्याबद्दल पुष्कळ लिहिण्यासारखे आहे कधीतरी आणखी सविस्तरपणे लिहूच.एकूणच मराठी नाटक थिटे नसावे ते उंच व्हावे,त्याची मान जगात ताठ रहावी, जागतिक नाट्य साहित्याशी तुलना करताना आपले मराठी साहित्यहि दर्जेदार  असावे यासाठी निरंतर प्रयत्नशील राहिलेल्या कामगार रंगभूमीवरिल प्रथितयश नाटककार कै.ला.कृ.आयरे यांना जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने शतश: विनम्र अभिवादन।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

   श्री विजय हटकर.
   मुक्त पत्रकार,लांजा.

दिनांक २१ मे २०२० रोजी सदर लेख बाईटस् आॅफ इंडिया या आघाडिच्या वेब पोर्टल वर प्रकाशित झाला. सन्मित्र श्री अनिकेत कोनकर यांचे याबाबत मनस्वी आभार.

‘मराठी कामगार रंगभूमीचे शेक्सपिअर, गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी आणि ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजांच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालू ठेवणारी पहिली व्यक्ती,’ अशा शब्दांत आचार्य *प्र. के. अत्रे* यांनी ज्यांचा गौरव केला, ते म्हणजे कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार *लाडकोजीराव कृष्णाजी आयरे.* २१ मे हा त्यांचा जन्मदिन.  त्या निमित्ताने, *कोकणचे सुपुत्र* असलेल्या आयरे यांच्या कार्याचा आढावा घेणारा, *विजय हटकर* यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5702348375217075232
......
_‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख, बातम्या, व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/917447792795 येथे क्लिक करून Hi असा मेसेज पाठवावा. तुम्ही ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या कोणत्याही ग्रुपमध्ये अगोदरच असाल तर पुन्हा हे करण्याची गरज नाही._

Sunday, May 5, 2019

"आभाळाएवढ्या  उत्तुंग कार्याचा गॊरव ".
☘☘☘☘☘☘
'सुभाष लाड-समाजसेवेतील आनंदयात्री ' गॊरवांकाचे प्रकाशन.
📚📚📚📚📚📚
सुभाष लाड यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न.
⛳⛳⛳⛳⛳⛳











मुंबई :-
     मुंबईसह कोकणच्या सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात खडतर जीवनप्रवासातहि समाजसेवेचं अवघड व्रत आयुष्यभर प्रामाणिकपणे संभाळून आभाळाएवढे उत्तुंग कार्य करणा-या 'सुभाष लाड'  यांच्या सेवाव्रतस्थ जीवनाचा विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी (गुरूवारी दिनांक ०२ मे) नुकत्याच सुभाष लाड सेवापूर्ती समिती व माझी मायभूमी प्रतिष्ठान,मुंबई च्या संयुक्त विद्यमाने  संपन्न झालेल्या गॊरव सोहोळ्यात त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा गॊरव केला.सुप्रसिद्ध कवी,साहित्यिक ,राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री सुभाष लाड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील ३६ वर्षाच्या यशस्वी सेवापूर्ती चे ऒचित्य साधून समितीच्या वतीने कृतज्ञता सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
       मुंबईतील पवई उपनगरात हिरानंदानी गार्डन परिसरात वसलेल्या नोरिटा मैदानाच्या हिरवळित ०२ मे च्या सायंकाळी उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्घाटक साने गुरूजींचे शिष्य  यशवंत क्षीरसागर,कार्यक्रमाध्यक्ष लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक  गणपत शिर्के ,बृहन्मुंबई मनपाचे उपशिक्षणाधिकारि  प्रकाश च-हाटे,गुरूवर्य शिवराम फापे गुरुजी, माजी आमदार  बाळ माने, नवी मुंबईचे माजी उपमहापॊर अविनाश लाड      पवईचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पोफळे,नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, उद्योजक प्रसाद पाटोळे,उल्का विश्वासराव, संदेश विद्यालयाचे संस्थापक बाळासाहेब म्हात्रे,लालबागचा राजा मित्रमंडळाचे सचिव सुधीर साळवी, पवई केरला समाजम् चे वेणुगोपाल नायर,शेरली उदयन,गोपाळ पिल्लई, आदि मान्यवरांच्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व शारदा पुजनाने झाला.यानंतर लाड सरांच्या आशयघन कवितांवरिल सुरेल " गीतसुभाष" संगीत मैफिल सादर करण्यात आली.सुनिलबुवा जाधव,भैरवी जाधव व ज्येष्ठ संगीतकार अशोक वायंगणकर यांच्या सुरेल व सुरेख मैफलीने कार्यक्रमाच्या सुरवातीलाच रंगत आणली .उपस्थितांनी या मैफिलीला चांगली दाद दिली. यानंतर श्री सुभाष लाड सेवापूर्ती समितीचे समन्वयक गणेश चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.तर विजय हटकर यांनी या सोहळ्याची भूमिका विशद करित-  आयुष्यभर येत जाणाऱ्या कडु - गोड अनुभवातून शिकत शिकत स्वत:चे अंतरंग समृद्ध करणाऱ्या लाड सरांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा आढावा घेत कोकणातील ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सुभाष लाड वर्तमान पिढिसाठी आदर्शव्रत असल्याचे सांगितले.
          सुरवातीला लाड सरांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देणाऱ्या गुरूवर्य शिवराम फापे गुरुजींचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाल ,श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर समितीच्या वतीने लाड उभयतांचे ऒक्षण करण्यात आले.व यशवंत क्षीरसागर यांच्या  शुभहस्ते शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सुभाष लाड यांना सपत्नीक गॊरविण्यात आले.सत्कारानंतर सुभाष लाड यांची जीवनगाथा उलघडविणारी  चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.यामध्ये त्यांचे  विविध कार्यक्रामातील व्हिडीयो क्लीपस् ,फोटो,त्यांच्या गुरुवर्यांचे त्यांच्याविषयीचे अभिप्राय आदिंचा समावेश होता. यानंतर लाड यांच्या व्यक्तिमत्वाचे सप्तरंग उलगडविणा-या विजय हटकर व प्रकाश हर्चेकर यांनी संपादित केलेल्या " सुभाष लाड- समाजसेवेतील आनंदयात्री " या गॊरवांकाचे कार्यक्रमाध्यक्ष गणपत शिर्के व गुरूवर्य शिवराम फापे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.या अंकाच्या प्रकाशना नंतर समितीच्या वतीने लाड सरांची 'ग्रंथतुला ' करण्यात आली.या ग्रंथतुलेत  जमलेली ८० किलो वजनाची पुस्तके वाचनालयांना भेट दिली जाणार आहेत.
      आयुष्यभर स्काऊटस् गाईड चळचळिसाठी समर्पित होऊन कार्यरत असणाऱ्या लाड सरांचा बृहन्मुंबई मनपा स्काउट गाईड विभागाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी  प्रकाश च-हाटे यांच्या हस्ते शाल ,श्रीफल व मानपत्र देऊन  हृदयस्थ सत्कार करण्यात आला.या मानपत्राचे वाचन सीमा तायडे यांनी केले.यावेळी बोलताना माजी स्काउटस् गाईड ट्रेनर जीवन पाटील यांनी हा गॊरव सोहळा म्हणजे सुभाष लाड यांचा सामाजिक कार्यातील "राज्याभिषेक" असल्याचे मत व्यक्त केले. तर ज्येष्ठ पत्रकार प्रमोदराव पेडणेकर यांनी माणुसकी व मानवतेला आयुष्यात उच्चतम स्थान देणाऱ्या लाड सरांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गॊरवोद्गार काढतानाच त्यांच्या कोकणातील रिंगणे गावातील वाचनालयाची उभारणी, रिंगणे परिसरातील अनेक ज्येष्ठ दिवंगतांचे कार्य चिरंजिव व्हावे व पुढिल पिढिला प्रेरणा मिळावी यासाठी लाड यांनी स्थापिलेल्या विविध संस्थांतील त्यांचे कार्य थक्क करणारे असल्याचे मत व्यक्त केले.
     कार्यक्रामचे उद्घाटक साने गुरूजींचे ८९ वर्षीय शिष्य यशवंत उर्फ अण्णा  क्षीरसागर यांनी पूज्य साने गुरुजींप्रमाणे जीवनदृष्टी देणाऱ्या पुण्यशील मातेच्या प्रेरणेने समाजसेवेत स्वत:ला समर्पित करणाऱ्या सुभाष लाड यांचे भरभरुन कॊतुक करताना लाड यांनी आपल्या कार्यातून कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा मोठा परिवार मुंबईसह कोकणातील ग्रामीण स्तरावर उभा केल्याचे मी जवळून पाहिले असुन त्यांच्या व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातून जीवनभर  सत्कर्म संपन्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाध्यक्ष गणपती शिर्के यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्याकडे जे आहे ते या समाजातून मी घेतले आहे.त्यांना ते योग्य वेळी परत करणे हि माझी जबाबदारी आहे असे जे मानतात तेच या समाजसेवेच्या प्रवाहात सामील होतात व या समाजसेवेतील आनंदयात्री बनतात असे मत व्यक्त करताना सुभाष लाड अशाच समाजसेवेतील अानंदयात्रीपैकि एक असल्याचे सांगितले. निस्वार्थी सेवा व इतरांच्या जीवनात आनंद पसरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लाड सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत निष्कलंक सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या समाजसेवेतील आनंदयात्री लाड सरांना पुढील प्रवास सुखकारक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
       यावेळी प्रकाश च-हाटे, रामचंद्र नलावडे, सीमा तायडे, प्रसाद पाटोळे, उल्का विश्वासराव, स्नेहल आयरे,श्रीनिवास त्रिपाठी, तातोबा हाटले,शांताराम पाटकर, आदि मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन लाड सरांविषयीच्या अनेक घटनांना उजाळा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सत्काराला उत्तर देताना सुभाष लाड यांनी सांगितले की, उभ्या  आयुष्यात मला देणारेच भेटले.त्यांनी दिलेले मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना दिले.पण विद्यार्थीही  मला देणारेच भेटले.कारण त्या त्या विद्यार्थ्यासमोर जाताना मी विद्यार्थी म्हणूनच गेलो.
त्यांच्यासोबत मी चित्र काढली.त्यांच्यासोबत मी गाणी म्हटली.त्यांच्या जवळ गेलो तेव्हाच मला त्यांची परिस्थिती कळली.कुणाला वडिल नाहि, कुणाला घर नाहि,जेवणाचा पत्ता नाही. माझ्या बालपणी मी सुद्धा  तसाच होतो.आज माझी परिस्थिती बदलली. तशी उद्या त्यांचीही बदलेल, मला जसे देणारे भेटले तसेच त्यांनाही भेटायला हवेत.आपल्या जीवनात गरजुंच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करित आजवरच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सहका-यांचे व हा एवढा मोठा गॊरव सोहळा माझ्यासाठी आयोजित करणाऱ्या समितीचे व उपस्थित राहणाऱ्या हितचिंतक ,मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे  बहारदार सूत्रसंचालन विजय हटकर, प्रकाश हर्चेकर यांनी केले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


विजय हटकर
लांजा.

दै.महासागर - पालघर ठाणे आवृत्ती दि.०९ मे २०१९