Thursday, May 16, 2019


नाटककार ला.कृ.आयरे जन्मशताब्दी विशेष..
🎭🎭🎭🎭🎭
गिरणगावच्या रंगभूमीचा "मुकुटमणी ".

       मराठी कामगार रंगभूमीचे " शेक्सपिअर" ,गिरणगावच्या रंगभूमीचे " मुकुटमणी " आणि ' ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालु ठेवणारी पहिली व्यक्ती ' असे आचार्य प्र.के. अत्रे यांनी गॊरविलेले कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार म्हणजे श्री लाडकोजीराव कृष्णाजी आयरे  होय.२१ मे १९१८ मध्ये वाटूळ ता.राजापूर येथे जन्मलेल्या लांजा तालुक्यातील रिंगणे गावच्या या महान सुपुत्राचे सन २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष.
      मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात कामगार रंगभूमीवर एक अग्रेसर आणि लोकप्रिय नाटककार म्हणून १९३९ ते १९६२ या दोन दशकात आपली नाटके सादर करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरेंसारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ दिवंगत दिग्गजाचे कार्य चिरंजीव व्हावे, वर्तमान पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ला.कृ.आयरे यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी व हितचिंतकांनी स्व.आत्माराम हांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ' नाटककार ला.कृ.आयरे स्मृति ट्रस्ट' ची स्थापना २३ जुलै १९८९ रोजी केली.नाटककार ला.कृ. आयरेंच्या आठवणी सदैव ताज्या ठेवण्यासाठि प्रयत्नशील असणाऱ्या या ट्रस्टने गत तीन दशकात एकांकिका स्पर्धा , एकांकिका लेखन, नाट्यस्पर्धा,नाटयलेखन, एकपात्री स्पर्धा आदि विविध उपक्रम राबवून मराठी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली आहे.यंदा ला.कृ.आयरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे ऒचित्य साधून संस्थेने वर्षभर विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे.याचाच एक भाग म्हणून जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा १९ मे रोजी मुलुंड मराठी मंडळ,मुंबई येथे संपन्न होणार असून येथे विविध यशस्वी विजेत्यांच्या गॊरवासोबत विजय हटकर व सुभाष लाड संपादित  "नाटककार ला.कृ.आयरे - गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
        मुंबईच्या लालबाग,परळ, नागपाडा,लोअरपरळ, काळाचॊकी,शिवडि,सातरस्ता, वरळी,आगारबझार अशा विस्तृत मध्य मुंबईतल्या भागावर विस्तारलेल्या कापड गिरण्यांनी रंगभूमीला दिलेली देणगी म्हणजे कामगार रंगभूमी.२० व्या शतकात अडिच लाख कामगारांना या कापड गिरण्या रोजगार पुरवित होत्या.मुंबईच्या व्यापारात या गिरणी कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे.या गिरणीत मास्तर,मुकादम,जाॅबर इ.पदावर कोकणातील चाकरमानी लोक राहू लागले.या कोकणी कामगारांच्या वस्तीने चाळ संस्कृती निर्माण झाली आणि मग कोकणातील तरुणांमध्ये उपजत असलले नाट्यवेड गिरणगावात रूजू लागले.चाळी- चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात, शिवजयंती,गोकुळाष्टमी, सत्यनारायण इ.प्रसंगी नाटके सादर होऊ लागली.गिरणगावात सादर होणाऱ्या या नाटकाच्या कथानकातून कोकणच्या ग्रामीण जीवनाचा,बोलीचा,मनोवृत्तीचा परिचय महानगरातील लोकांना होऊ लागला.यामध्ये नाटककार आबासाहेब आचरेकर, टी.एस्.कावले,वसंत दुधवडकर, वसंत जाधव,आत्माराम सावंत, मु.गो.शिवलकर,कृ.गो.सुर्यवंशी,बाबुराव मराठे,ना.ल.मोरे,दत्ता साठम,प्रेमानंद तोडणकर, ना.रा. जोशी,इ.नाटककारांसोबत मामासाहेब वरेरकर, मो.ग.रांगणेकर ,आचार्य अत्रे अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर होऊ लागली.या सर्वामध्ये अग्रभागी होते ते कोकणातील नाटककार ला.कृ.आयरे .म्हणूनच त्यांना 'गिरणगावच्या रंगभूमीचा मुकुटमणी ' असे संबोधले जाते.
       नाट्यमहर्षी मामा वरेरकर व नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांना गुरूस्थानी मानणाऱ्या ला.कृ.आयरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी कोर्ट - कचे-यांचे दुष्परिणाम या विषयावर ' फिर्याद ' हे नाटक लिहिल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाहि.१९४९ मध्ये त्यांनी  ' जुलूम' हे नाटक रंगभूमीवर अाणले.या नाटकाचे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन हजारो प्रयोग होऊन संबंध महाराष्ट्रात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे १९४५ ते १९५७ या मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी आपल्या ' स्वस्तिक नाट्य मंदिर' या संस्थेतर्फे स्वत:ची १५ नवी नाटके रंगभूमीवर आणून चैतन्य निर्माण केले.बुद्धीभेद,शेतकरिदादा, मायमाऊली,कुल कलंक, ईर्षा, अमरत्याग, कसोटी,मायेचा संसार,स्वराज्यरवि,निर्धार, आदि २३ नाटके, ०४ लोकनाट्ये,०६ एकांकिका व ३०० श्रृतिकांचे त्यांनी लेखन केले.
      कथानकातील विविधता, प्रभावी व्यक्तिमत्त्वे, सुंदर चैतन्यपूर्ण स्वभावरेखाटन,वेधक प्रसंग योजना,वातावरण निर्मिती, खटकेबाज- चटकदार संवाद,उच्च प्रतीची संवाद रचना,आंतरिक संघर्ष, मानवी मनोवृत्तीची विविध रूपे,श्रृंगारप्रचार,विनोदात्मकता,आकर्षक शेवट,कलात्मक दृष्टी,कोकणच्या बोलीवर विविधांगी दर्शन, आदि लेखन वैशिष्ट्यामुळे नाटककार ला.कृ.आयरे यांची नाटके त्या काळी महाराष्ट्र, गुजरात,म्हैसूर राजस्थान, आसाम ,मद्रास पर्यंत तेथील मराठी भाषिकांनी केली.
         प्रा.ना.सी.फडके यांच्या मतानुसार संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो.या संघर्षात गुंतलेल्या व्यक्ती या तुल्यबळ असायला हव्यात आणि नाटककाराने त्यांची स्वभावचित्रे निरपेक्षपातीपणे रंगवायला हवीत.तरच ते नाटक स्वाभाविक उंची गाठते.नाटककार ला.कृ. आयरे यांच्या नाटकांचा तर संघर्ष हा स्थायीभाव आहे.हा संघर्ष प्रस्थापित खोत,जमीनदार, सावकार विरोधात श्रमजिवी शेतकरि वर्गाचा होता. अन्यायाविरोधात न्यायाचा आहे.आयरेंनी नाट्यलेखनाव्दारे शोषित,वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी,श्रमजीवी वर्गामध्ये आत्मभान निर्माण करण्याचे कार्य केले आहे.त्यामुळेच समाज प्रबोधनाचे दर्शन घडविणारे श्रेष्ठ नाटककार म्हणून ते प्रसिद्धिस पावले.
         नाट्यलेखना शिवाय ' मराठा सेवक'या मासिकाचे संपादन करताना आयरेंनी आनंदवन ,रसरंग,कोकण दर्शन, ललित,  किर्लोस्कर, मनोहर, नवशिक्षण आदि मासिकं व साप्ताहिकातुन अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले.             
' बायोग्राफी इंडिया १९८०', ' लीडर्स आॅफ इंडिया',साहित्य अकादमी -नवी दिल्ली या ख्यातनाम पुस्तकातुन त्यांच्या दखलपात्र साहित्यिक कार्याचा गॊरव करण्यात आला आहे .    त्यांच्या अनेक नाटकांनी विविध पारितोषिके पटकाविली.महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनासाठी ' राज्यस्तरिय  पुरस्कारासोबत ' अखिल भारतीय नाट्य परिषद,भारत सरकार,कामगार कल्याण मंडळ, आंतरगिरणी कामगार स्पर्धा,नटवर्य चिं.कोल्हटकर नाट्यस्पर्धा, भारतीय साहित्य सभा -पुणे या विविध स्पर्धेत आयरेंच्या नाटकांनी समीक्षकांच्या,प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत अनेक पुरस्कार प्राप्त केले.आयरे एक प्रतिभाशली नाटककार होतेच पण त्याबरोबर एक उत्कृष्ट नट,दिग्दर्शक, निर्माता,प्रकाशक,कथाकारहि होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.सामाजिक कार्यातहि ते सक्रिय होते.त्यांनी त्यांच्या मुळ गावी रिंगणे येथे अखिल रिंगणे ग्रामस्थ सेवा मंडळाची स्थापना केली.कोकणात दुर्लक्षित राहिलेल्या राजापूर -लांजा तालुक्यातील २२८ गावांच्या विकासासाठी त्यांनी ' राजापूर -लांजा तालुका नागरिक संघा 'ची स्थापना केली.आज या संस्था उल्लेखनीय कार्य करित आहेत.साहित्य संघ मंदिर,शिवाजी मंदिर मुंबई, मराठी  ग्रंथ संग्रहालय, साने गुरुजी कथामाला आदि अनेक संस्थांमध्ये त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले.




      १६ डिसेंबर १९५१ रोजी झालेल्या दक्षिण कोकण नाट्य संमेलनाचे आयरे स्वागताध्यक्ष होते.त्यावेळी त्यांनी स्वागताक्षीय भाषणातून मांडलेले मराठी रंगभूमी व नाट्यचळवळिच्या उर्जितावस्थेसाठीचे अभ्यासपूर्ण विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात.आपल्या नाट्यलेखनाचे कोणतेच मानधन न घेणारे आयरे त्या काळात संप्रेषणाच्या मर्यादित सुविधा असतानाही आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रेमाखातर व नाट्यचळवळीच्या प्रचारार्थ स्वखर्चाने नागपूर,चंद्रपूर,म्हैसूर आदि ठिकाणी आपुलकीने पोहचत असत.साहित्य, समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या नाटककार आयरे यांचं निराळंपण त्यांच्या अशा निस्पृह कार्यातून अधिकच ठळक होऊन वर्तमान  पिढीसमोर प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहे.
       त्यांच्या कार्याबद्दल पुष्कळ लिहिण्यासारखे आहे कधीतरी आणखी सविस्तरपणे लिहूच.एकूणच मराठी नाटक थिटे नसावे ते उंच व्हावे,त्याची मान जगात ताठ रहावी, जागतिक नाट्य साहित्याशी तुलना करताना आपले मराठी साहित्यहि दर्जेदार  असावे यासाठी निरंतर प्रयत्नशील राहिलेल्या कामगार रंगभूमीवरिल प्रथितयश नाटककार कै.ला.कृ.आयरे यांना जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने शतश: विनम्र अभिवादन।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

   श्री विजय हटकर.
   मुक्त पत्रकार,लांजा.

दिनांक २१ मे २०२० रोजी सदर लेख बाईटस् आॅफ इंडिया या आघाडिच्या वेब पोर्टल वर प्रकाशित झाला. सन्मित्र श्री अनिकेत कोनकर यांचे याबाबत मनस्वी आभार.

‘मराठी कामगार रंगभूमीचे शेक्सपिअर, गिरणगावच्या रंगभूमीचे मुकुटमणी आणि ग्रामीण व शहरी या दोन्ही समाजांच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालू ठेवणारी पहिली व्यक्ती,’ अशा शब्दांत आचार्य *प्र. के. अत्रे* यांनी ज्यांचा गौरव केला, ते म्हणजे कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार *लाडकोजीराव कृष्णाजी आयरे.* २१ मे हा त्यांचा जन्मदिन.  त्या निमित्ताने, *कोकणचे सुपुत्र* असलेल्या आयरे यांच्या कार्याचा आढावा घेणारा, *विजय हटकर* यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5702348375217075232
......
_‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख, बातम्या, व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/917447792795 येथे क्लिक करून Hi असा मेसेज पाठवावा. तुम्ही ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या कोणत्याही ग्रुपमध्ये अगोदरच असाल तर पुन्हा हे करण्याची गरज नाही._

4 comments:

  1. खुप छान संकलन
    सुंदर लेख

    ReplyDelete
  2. I am from Ringane, I know him. He was great human being.

    ReplyDelete
  3. Mi pn ringnyatli ahe Ani mla abhiman ahe tyncha Ani mi tyanchy firyad natkat balkalakar mhnun kam kely iam so Lucky ,& proud of her

    ReplyDelete