Sunday, May 5, 2019

"आभाळाएवढ्या  उत्तुंग कार्याचा गॊरव ".
☘☘☘☘☘☘
'सुभाष लाड-समाजसेवेतील आनंदयात्री ' गॊरवांकाचे प्रकाशन.
📚📚📚📚📚📚
सुभाष लाड यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न.
⛳⛳⛳⛳⛳⛳











मुंबई :-
     मुंबईसह कोकणच्या सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात खडतर जीवनप्रवासातहि समाजसेवेचं अवघड व्रत आयुष्यभर प्रामाणिकपणे संभाळून आभाळाएवढे उत्तुंग कार्य करणा-या 'सुभाष लाड'  यांच्या सेवाव्रतस्थ जीवनाचा विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी (गुरूवारी दिनांक ०२ मे) नुकत्याच सुभाष लाड सेवापूर्ती समिती व माझी मायभूमी प्रतिष्ठान,मुंबई च्या संयुक्त विद्यमाने  संपन्न झालेल्या गॊरव सोहोळ्यात त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा गॊरव केला.सुप्रसिद्ध कवी,साहित्यिक ,राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री सुभाष लाड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील ३६ वर्षाच्या यशस्वी सेवापूर्ती चे ऒचित्य साधून समितीच्या वतीने कृतज्ञता सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
       मुंबईतील पवई उपनगरात हिरानंदानी गार्डन परिसरात वसलेल्या नोरिटा मैदानाच्या हिरवळित ०२ मे च्या सायंकाळी उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर उद्घाटक साने गुरूजींचे शिष्य  यशवंत क्षीरसागर,कार्यक्रमाध्यक्ष लांजा हायस्कूलचे मुख्याध्यापक  गणपत शिर्के ,बृहन्मुंबई मनपाचे उपशिक्षणाधिकारि  प्रकाश च-हाटे,गुरूवर्य शिवराम फापे गुरुजी, माजी आमदार  बाळ माने, नवी मुंबईचे माजी उपमहापॊर अविनाश लाड      पवईचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल पोफळे,नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, उद्योजक प्रसाद पाटोळे,उल्का विश्वासराव, संदेश विद्यालयाचे संस्थापक बाळासाहेब म्हात्रे,लालबागचा राजा मित्रमंडळाचे सचिव सुधीर साळवी, पवई केरला समाजम् चे वेणुगोपाल नायर,शेरली उदयन,गोपाळ पिल्लई, आदि मान्यवरांच्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व शारदा पुजनाने झाला.यानंतर लाड सरांच्या आशयघन कवितांवरिल सुरेल " गीतसुभाष" संगीत मैफिल सादर करण्यात आली.सुनिलबुवा जाधव,भैरवी जाधव व ज्येष्ठ संगीतकार अशोक वायंगणकर यांच्या सुरेल व सुरेख मैफलीने कार्यक्रमाच्या सुरवातीलाच रंगत आणली .उपस्थितांनी या मैफिलीला चांगली दाद दिली. यानंतर श्री सुभाष लाड सेवापूर्ती समितीचे समन्वयक गणेश चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.तर विजय हटकर यांनी या सोहळ्याची भूमिका विशद करित-  आयुष्यभर येत जाणाऱ्या कडु - गोड अनुभवातून शिकत शिकत स्वत:चे अंतरंग समृद्ध करणाऱ्या लाड सरांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा आढावा घेत कोकणातील ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सुभाष लाड वर्तमान पिढिसाठी आदर्शव्रत असल्याचे सांगितले.
          सुरवातीला लाड सरांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देणाऱ्या गुरूवर्य शिवराम फापे गुरुजींचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाल ,श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर समितीच्या वतीने लाड उभयतांचे ऒक्षण करण्यात आले.व यशवंत क्षीरसागर यांच्या  शुभहस्ते शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सुभाष लाड यांना सपत्नीक गॊरविण्यात आले.सत्कारानंतर सुभाष लाड यांची जीवनगाथा उलघडविणारी  चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.यामध्ये त्यांचे  विविध कार्यक्रामातील व्हिडीयो क्लीपस् ,फोटो,त्यांच्या गुरुवर्यांचे त्यांच्याविषयीचे अभिप्राय आदिंचा समावेश होता. यानंतर लाड यांच्या व्यक्तिमत्वाचे सप्तरंग उलगडविणा-या विजय हटकर व प्रकाश हर्चेकर यांनी संपादित केलेल्या " सुभाष लाड- समाजसेवेतील आनंदयात्री " या गॊरवांकाचे कार्यक्रमाध्यक्ष गणपत शिर्के व गुरूवर्य शिवराम फापे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.या अंकाच्या प्रकाशना नंतर समितीच्या वतीने लाड सरांची 'ग्रंथतुला ' करण्यात आली.या ग्रंथतुलेत  जमलेली ८० किलो वजनाची पुस्तके वाचनालयांना भेट दिली जाणार आहेत.
      आयुष्यभर स्काऊटस् गाईड चळचळिसाठी समर्पित होऊन कार्यरत असणाऱ्या लाड सरांचा बृहन्मुंबई मनपा स्काउट गाईड विभागाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी  प्रकाश च-हाटे यांच्या हस्ते शाल ,श्रीफल व मानपत्र देऊन  हृदयस्थ सत्कार करण्यात आला.या मानपत्राचे वाचन सीमा तायडे यांनी केले.यावेळी बोलताना माजी स्काउटस् गाईड ट्रेनर जीवन पाटील यांनी हा गॊरव सोहळा म्हणजे सुभाष लाड यांचा सामाजिक कार्यातील "राज्याभिषेक" असल्याचे मत व्यक्त केले. तर ज्येष्ठ पत्रकार प्रमोदराव पेडणेकर यांनी माणुसकी व मानवतेला आयुष्यात उच्चतम स्थान देणाऱ्या लाड सरांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गॊरवोद्गार काढतानाच त्यांच्या कोकणातील रिंगणे गावातील वाचनालयाची उभारणी, रिंगणे परिसरातील अनेक ज्येष्ठ दिवंगतांचे कार्य चिरंजिव व्हावे व पुढिल पिढिला प्रेरणा मिळावी यासाठी लाड यांनी स्थापिलेल्या विविध संस्थांतील त्यांचे कार्य थक्क करणारे असल्याचे मत व्यक्त केले.
     कार्यक्रामचे उद्घाटक साने गुरूजींचे ८९ वर्षीय शिष्य यशवंत उर्फ अण्णा  क्षीरसागर यांनी पूज्य साने गुरुजींप्रमाणे जीवनदृष्टी देणाऱ्या पुण्यशील मातेच्या प्रेरणेने समाजसेवेत स्वत:ला समर्पित करणाऱ्या सुभाष लाड यांचे भरभरुन कॊतुक करताना लाड यांनी आपल्या कार्यातून कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांचा मोठा परिवार मुंबईसह कोकणातील ग्रामीण स्तरावर उभा केल्याचे मी जवळून पाहिले असुन त्यांच्या व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातून जीवनभर  सत्कर्म संपन्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाध्यक्ष गणपती शिर्के यांनी अध्यक्षीय भाषणात माझ्याकडे जे आहे ते या समाजातून मी घेतले आहे.त्यांना ते योग्य वेळी परत करणे हि माझी जबाबदारी आहे असे जे मानतात तेच या समाजसेवेच्या प्रवाहात सामील होतात व या समाजसेवेतील आनंदयात्री बनतात असे मत व्यक्त करताना सुभाष लाड अशाच समाजसेवेतील अानंदयात्रीपैकि एक असल्याचे सांगितले. निस्वार्थी सेवा व इतरांच्या जीवनात आनंद पसरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लाड सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत निष्कलंक सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या समाजसेवेतील आनंदयात्री लाड सरांना पुढील प्रवास सुखकारक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
       यावेळी प्रकाश च-हाटे, रामचंद्र नलावडे, सीमा तायडे, प्रसाद पाटोळे, उल्का विश्वासराव, स्नेहल आयरे,श्रीनिवास त्रिपाठी, तातोबा हाटले,शांताराम पाटकर, आदि मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन लाड सरांविषयीच्या अनेक घटनांना उजाळा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सत्काराला उत्तर देताना सुभाष लाड यांनी सांगितले की, उभ्या  आयुष्यात मला देणारेच भेटले.त्यांनी दिलेले मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना दिले.पण विद्यार्थीही  मला देणारेच भेटले.कारण त्या त्या विद्यार्थ्यासमोर जाताना मी विद्यार्थी म्हणूनच गेलो.
त्यांच्यासोबत मी चित्र काढली.त्यांच्यासोबत मी गाणी म्हटली.त्यांच्या जवळ गेलो तेव्हाच मला त्यांची परिस्थिती कळली.कुणाला वडिल नाहि, कुणाला घर नाहि,जेवणाचा पत्ता नाही. माझ्या बालपणी मी सुद्धा  तसाच होतो.आज माझी परिस्थिती बदलली. तशी उद्या त्यांचीही बदलेल, मला जसे देणारे भेटले तसेच त्यांनाही भेटायला हवेत.आपल्या जीवनात गरजुंच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करित आजवरच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सहका-यांचे व हा एवढा मोठा गॊरव सोहळा माझ्यासाठी आयोजित करणाऱ्या समितीचे व उपस्थित राहणाऱ्या हितचिंतक ,मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे  बहारदार सूत्रसंचालन विजय हटकर, प्रकाश हर्चेकर यांनी केले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


विजय हटकर
लांजा.

दै.महासागर - पालघर ठाणे आवृत्ती दि.०९ मे २०१९

2 comments:

  1. सुभाष आम्ही तुला आमचा एक चांगला मित्रच समजत होतो. पण तुझ्या उत्तुंग अशा कार्याबद्दल वाचून अभिमानाने ऊर भरून आला.तू आमचा अगदी जवळचा मित्र आहेस याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. श्री.व सौ.महेंद्र आणि रजनी पवार.

    ReplyDelete
  2. माणूस किती जगला त्या पेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यासाठी सुभाष लाड यांनी जे योगदान दिले त्या साठी त्यांच्या कार्य।ला अभिवादन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद

    ReplyDelete