Friday, April 8, 2022

कातळशिल्प महोत्सवातील सुंदर प्रदर्शन कक्षांतुन कोकणच्या शक्तिस्थळांची ओळख.

 कातळशिल्प महोत्सवातील सुंदर प्रदर्शन कक्षांतुन कोकणच्या शक्तिस्थळांची ओळख.

🏕️🏝️🏜️🏖️🏕️🛕🛤️



रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा पॅलेस येथे गेल्याच आठवड्यात  पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालय, महाराष्‍ट्र शासन आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेला दोन दिवसीय कातळशिल्प पर्यटन महोत्सव उत्साहात संपन्न झाला.या महोत्सवानिमित्त कोकणातील सड्यांवरील अश्मयुगीन मानवाचा कातळशिल्प रुपी अविष्कार प्रदर्शन रुपाने समजुन घेण्याची संधी रत्नागिरीवासीयांना आयोजकांनी करुन दिली.आगामी दशकात कोकणच्या पर्यटनातील महत्वाचा केंद्रबिंदू ठरणा-या कातळशिल्पांचा जागतिक वारसा बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे.त्याचवेळी रत्ननगरीत संपन्न झालेल्या या पहिल्या-वाहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाला महत्व प्राप्त झाले आहे.

             

     खरंतर कोकणातील सड्यांवर आढळणारी कातळशिल्पे हा आतापर्यंत दूर्लक्षित राहिलेला विषय.मात्र निसर्गयात्री संस्थेच्या अविरत मेहनतीतून कोकणचे ऎतिहासिक महत्व अधोरेखित करणारा हा विषय मोठ्या मंचावरून लोकांसमोर येतोय हे आनंददायी चित्र आहे. असे महोत्सव सातत्याने होत राहीले तरच कोकणातील ज्या ७२ गावात १२७ ठिकाणी १६०० हून अधिक कातळशिल्पे प्रकाशात आली आहेत त्यांचे संवर्धन व प्रचार कार्यास गती मिळणार आहे.कारण महोत्सवातून जागरुकता वाढिस लागत असते.आपले गाव पर्यटन स्थळ म्हणुन पुढे आले पाहिजे याविषयीची दृढ भावना निर्माण होण्यास हातभार लागत असतो.त्याचबरोबर महोत्सवातून कोकणचे सौंदर्य,खाद्यसंस्कृती ,कला व सांस्कृतिक वैशिष्ट्ये  मांडण्यासाठी एक प्लॅटफाॅर्म उपलब्ध होत असतो.या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने ही कोकणची खाद्यसंस्कृती , निसर्ग, पर्यटन प्रसारार्थ विविध प्रदर्शन दालनांची सुंदर मांडणी करण्यात आली होती. या लक्षवेधी प्रदर्शन दालनांना महोत्सवात आलेल्या प्रत्येकजण भेट देऊन तेथील माहिती जाणून घेत होता. कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे वेगळेपण जपणा-या  निवडक प्रदर्शन कक्षाविषयी ...


१) निसर्गयात्री संस्थेचे कातळशिल्प प्रदर्शन:--

       कोकणातील महत्वाचा ठेवा असलेल्या कातळशिल्प सर्वेक्षण, डाॅक्यूमेंटेशन व लोकसहभाग या तिन्ही आघाडीवर रत्नागिरीतील निसर्गयात्री ही संस्था आघाडीवर आहे. या संस्थेने आजवर गेल्या दशकभरात सातत्यपुर्ण अभ्यासातुन व कातळशिल्प संवर्धन अभियानातुन ७२ गावात १६०० हून अधिक कातळशिल्पे प्रकाशात आणली आहेत. महोत्सवात आलेल्या जिज्ञासुंना कातळशिल्प हा विषय सोप्या पद्धतीने समजावा त्याचे संरक्षण संवर्धन करणे का आवश्यक आहे ,यातुन कातळशिल्प असलेल्या गावाचा पर्यटनातुन नेमका कसा विकास होऊ शकेल ,रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील या प्रश्नांची उत्तरे मिळावीत या हेतुने निसर्गयात्री रत्नागिरी या संस्थेने विविध गावातील निवडक पण महत्वाची असलेली कातळशिल्पांचे छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते.यामध्ये विविध प्राणी, पक्षी, उकल न झालेल्या भौमितिक आकृतींचित्रांचा समावेश होता. या प्रदर्शनामुळे महोत्सवात आलेल्या रत्नागिरी बाहेरील पर्यटकांना कातळशिल्प विषय समजण्यास चांगलीच मदत झाली.या स्टाॅलवरील निसर्गयात्रीचे कार्यकर्ते अगदी आस्थेने या विषयाची माहिती देत होते. उक्षी, चवे ,बारसू , कोट , देवीहसोळ ,कशेळी ,रुंढे तळी ,देवाचे गोठणे या ठिकाणाच्या कातळशिल्पांची छायाचित्रे लक्ष वेधून घेत होती.


२) माय राजापूर :--

     या महोत्सवात राजापुर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणा-या  माय राजापूर या संस्थेचा स्टाॅलला मोठ्या संख्येने लोकांनी भेट दिली. रत्नागिरीच्या दक्षिणेला वसलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सुंदर राजापुर तालुक्यातील 

विविध पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांची लक्षवेधी मांडणी करण्यात आली होती.राजापुर तालुक्यात पर्यटनाचे वैविध्य आहे. सर्वदूर ख्याती असलेली राजापुरची गंगा, धुतपापेश्र्वर , आडिवरे ,कनकादित्य कशेळी, देवबाग बीच,यशवंतगड,जैतापुर खाडी आदि पर्यटनस्थळांची  सुंदर छायाचित्रे या स्टाॅलमध्ये मांडण्यात आली होती. राजापुर तालुक्याचा पर्यटन प्रसार करण्याचे काम ही संस्था सातत्याने करित असून प्रदिप कोळेकर, जगदिश पवार ठोसर ,राजेश देशपांडे आदि या संस्थेच्या पदाधिका-यांची तळमळ कौतुकास्पद वाटली.



३) ट्रेक डायरी व जिद्दी माऊंटेनियर्स :-

         गेल्या दशकभरात  महाराष्ट्राच्या ट्रेकिंग विश्र्वात सातत्याने गड-किल्ले,गिरीभ्रमंतीच्या साहसी मोहिमा आखुन नावारुपाला आलेल्या जिद्दी माऊंटेनियर्स व ट्रेक डायरी या संस्थेने त्यांच्या साहसी मोहिमांचे प्रतिबिंब दाखविणा-यट छायाचित्रांचे प्रदर्शन आकर्षक पद्धतीने मांडले होते.या स्टाॅलवरील उमेश गोठीवरेकर व अरविंद ही जोडगोळी आलेल्या प्रत्येकाला कोकणातील ट्रेकपाॅ ईंट व विविध मोहिमा त्याठिकाणी आलेले थरारक अनुभव समजावुन सांगत होते.त्यांच्या या स्टाॅलवर दोन्ही दिवस मोठी गर्दी पहायला मिळाली.या स्टाॅलवरील लांजा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ येथील साहसी मोहिमेची मालिका छायाचित्रांतून माचाळ पदभ्रंमतीचे जणु काही निमंत्रणच देत होती.या गावातून वाहणारी मुचकुंदी नदी माचाळ गावाच्या पठारावरुन सह्याद्रिच्या पायथ्याला विसावलेल्या खोरंनिनको गावात झेपावताना भैरमखो-यात निर्माण झालेली १२ अद्भूत रांजणखळग्यांचे फोटो पाहताना 

 ट्रेक डायरी व जिद्दीचे साहसी वीर या अतिदू्र्गम भागात कसे पोहचले असतील हा प्रश्न मनात निर्माण होतो.एक मात्र निश्चीत ,हे प्रदर्शन पाहिल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक साहसी मोहिमांचे ट्रेक येणा-या काळात जगभरातील पर्यटकांना इथे यायला प्रवृत्त करतील यावर यावर विश्वास बसला.

          

४) प्राचीन खेळ संवर्धन (बैठे खेळ)

  प्राचीन काळी मानवाने मनोरंजनासठी खडकांवर काही पटखेळ कोरले . या पटखेळाच्या माध्यमातूम स्वत:चे मनोरंजन केले.पाताळेश्र्वर ,भाजे ,सिंहगड,राजगड, शिवनेरी ,जुन्नर, नाशिक, अशा अनेक ठिकाणी असे पटखेळ अभ्यासकांना सापडले आहेत.या प्राचीन पटखेळांचे अभ्यासक असलेले सोज्वळ साळी व ऋषिकेश राणे या युवकांनी वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट च्या माध्यमातून या खेळांचा वारसा जोण्याचे कार्य केले आहे.या कातळशिल्प पर्यटन महोत्सवात त्यांनी रत्नागिरीकरांना या प्राचीन बैठ्या खेळांची माहिती व्हावी या साठी त्याचे प्रदर्शन लावले होते.या प्रदर्शनातून आठ चल्लस, बाघेरा, मांकळी, फेर - मेर,मंकला, मारुंजी, वाघबकरी आदी प्राचीन बैठे खेळांची माहिती देण्यात आली.प्राचीन काळात भिक्षू ,व्यापारी, प्रवासी डोंगरावर व मंदिरांमध्ये मुक्काम करित.त्यामुळे मुक्कामावेळी मनोरंजनासाठी खडकांवर हे पटखेळ कोरण्यात आले असावते.या पटखेळांचा उल्लेख पौराणिक व बौद्ध कथांमध्येही आढळुन येतो.या महोत्सवामुळे प्राचीन वैभवशाली अशा या पटखेळांचा इतिहास व माहिती समजुन घेण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळाली.


५) प्राचीन कोकण :- 

       कोकणातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे 

हिरव्यागर्द टेकडीवर ३ एकर जागेत उभारण्यात आलेल्या व पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या 'प्राचीन कोकण दालन ' या संस्थेने उभारलेला व प्राचीन कोकणच्या विश्र्वात घेऊन जाणारा प्रदर्शनीय कक्ष देखील आवर्जून पहावा असाच होता.कोकणातील प्राचीन समाजरचना, बारा बलुतेदार,जुनी उपकरणे, हत्यारे, कोकणातील प्रथा परंपरा यांसह कोकणची सफर घडवुन आणणारा हा प्रदर्शन कक्ष गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण या संग्रहालयाला भेट देण्याची सुंदर जाहिरात करत होता.खरं तर कोकणातील विविध पर्यटनक्षेत्र म्हणुन विकासाची क्षमता असलेल्या गावात अशी संग्रहालये रोजगार निर्मिती व पर्यटनवृद्धीसाठि आवश्यक आहेत हे प्राचीन कोकण या संस्थेने सिद्ध केले आहे.




     या सूंदर महोत्सवामागे ध्येयवेड्या निसर्गयात्रीची अविरत मेहनत आहे. एकुणच कमी कालावधीतही निटनेटके, नियोजनबद्ध देखणे व कोकणी संस्कृतीला व्यासपीठ देणा-या कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. एकुणच महोत्सवातील सर्वच स्टाॅल वैशिष्ट्यपुर्ण होते. या महोत्सवातून आपल्या शक्तिस्थळांची ओळख करुन देण्यात संयोजक यशस्वी ठरले असेच म्हणावे लागेल.या कातळशिल्प महोत्सवाला रत्नागिरीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.व कोकणच्या पुरातत्वशास्त्राच्या अध्ययनातील एक महत्वाचा अध्याय असलेल्या कातळशिल्पांचे महत्व समजुन घेण्याचा प्रयत्न केला. कोविडच्या तडाख्यानंतर खरं तर पर्यटनाचे आयाम बदलले आहेत.देशातील पर्यटन  पुन्हा एकदा नव्याने उभे राहते आहे.आगामी काळात देशांतर्गत पर्यटनात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे.याचा फायदा कोकणाला होणार आहे.यासाठी छोट्या छोट्या सहलींची सुंदर पॅकेज तयार करावी लागतील.कारण झटकन बुकिंग व पटकन छोटा ब्रेक घेणे हा ट्रेंड सध्या मूळ धरतो आहे.या छोट्या सहलींमध्ये कोकणातील कातळशिल्पे महत्वाचे 'मानक ' ठरु शकेल सोबतच महोत्सवात प्रदर्शनातून मांडलेला स्वर्गीय सुखाची अनूभूती देणारा कोकण अन्य माध्यमातुनही सशक्तपणे पर्यटकांपर्यंत पोहचवायला हवा.तसं झालं तरच अशा महोत्सवांचे रुपांतर कोकणाला पर्यटनाचे रोल माॅडेल बनविण्यात ख-या अर्थाने हॊईल.

      ☘️☘️☘️☘️☘️ 

    विजय हटकर.






खालील लिंकवर क्लिक करा.

https://prahaarkonkan.com/?p=144355

https://kokanmedia.in/2022/03/26/vijayhatkar/

Monday, April 4, 2022

काकांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव सोहळा.

 अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव सोहळा.

 



प्रिय भाईकाका,

        वडिलांनंतर आयुष्यातला भक्कम आधारस्तंभ म्हणजे काका ! असाच भक्कम आधार ज्यांचा आम्हांला आहे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आम्हा सर्व कुटुंबाचे लाडके श्री मारुती रघुनाथ हटकर अर्थात भाईकाका .

            आपला जन्म ३ एप्रिल १९४८  रोजी कै.रघुनाथ मानाजी हटकर व कै. लक्ष्‍मीबाई रघुनाथ हटकर या दांपत्याच्या पोटी झाला.आपले बालपण मुंबई येथे सुखात जात असतानाच आपल्या वडिलांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतल्याने आपण तळवडे ,तालुका लांजा येथे आपल्या आजोळी येऊन स्थायिक झालात. येथे आल्यानंतर आपल्या जीवनात संघर्षाचा काळ सुरू झाला. काही दिवस मामाच्या घरी काढल्यानंतर तळवडे फाटा येथे एका गोठ्याचे घरात रूपांतर करून आपण भावंडांनी त्यालाच 'गोकुळ'  समजून आनंदाने त्या परिस्थितीला तोंड दिलात.घरी आई-बाबांसह असलेल्या बेबी,ताई ,माई, बाबी, छबी पाच बहिणी व धाकटा भाऊ बाळा असा मोठा कुटुंबकबिला समर्थपणे चालवण्यासाठी भाऊ अरविंद यांच्यासह आपणही अथक मेहनत केलीत.यासाठी सुरुवातीची दहा वर्ष साखरपा येते खाटिकाच्या  दुकानातही नोकरी केलीत. त्या मालकाचा विश्वास संपादन केलात.त्याने दिलेल्या आगाऊ रकमेतून ज्या गोठ्यात आपल्या आईने पार्वतीचा संसार थाटला होता त्याचे रूपांतर केळंब्याच्या ठिकठाक  घरात केलेत.


      पुढे एक वर्ष आपण आरोग्य विभागात सिंधुदुर्ग येथील दोडामार्ग, सावंतवाडी येथे मलेरिया निर्मूलन अभियानात कर्मचारी म्हणून निष्ठेने काम केलेत.याच काळात आपल्या पुढाकाराने १२/१२/१९७५ रोजी अापला भाऊ अरविंद यांचा शुभविवाह सावंतवाडी येथील श्री लक्ष्मण पाटील यांची कन्या सुधा हिच्याशी झाला. पुढे आपल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीचा कॉल आला आणि आपण साधारण १९७७ मध्ये विजयदुर्ग आगारात मेकॅनिकल विभागात रुजू झालात तेथील आगार प्रमुख श्री राणे यांनी गाड्या दुरुस्ती  करण्याबाबत मूलभूत तंत्र शिकवले. त्याचा खूप उपयोग झाल्याचे आपण सांगता .पुढे कणकवली व नंतर स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत राजापूर आगारात आपण प्रामाणिकपणे तब्बल २६  वर्ष नोकरी केलीत. आपला  हजरजबाबी स्वभाव ,सहकार्य करण्याची वृत्ती यामुळे सहकार्‍यांमध्ये आपण 'एमआर 'या नावाने लोकप्रिय झालात. सन २००३ मध्ये आपण एक आदर्श कर्मचारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलीत.

     


भाईकाकांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मानपत्र प्रदान करताना कुटुंबिय.

           नोकरी करत असताना देवगड मुटाट  येथील कु. कुंदा जगन्नाथ राजपूत हिच्याशी २२ फेब्रुवारी १९७८ मध्ये आपला शुभविवाह झाला.आपली सुविद्य पत्नी म्हणजे आमचे लाडकी कर्तुत्ववान कुंदा काकी. तिच्या आगमनाने आपल्या आनंदी जीवनाला सुरवात झाली.खरं तर काकीने आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. आपल्या जोडीने तिनेही बांगडी व्यवसाय काढून आपला प्रपंच सांभाळला. संसाराला हातभार लावणा-या आपल्या पत्नीला मदत व्हावी म्हणून आपण आठवड्याची सुट्टी मंगळवारी घ्यायचात. या दिवशी लांजाचा आठवडा बाजार असल्याने काकीला मदत करायचात.यावेळी आजही मला आठवतं आपल्या दुकानात आम्ही आपल्याला भेटायला आल्यावर आपण प्रेमाने कुंभारनीकडची दिलेली भजी किंवा बटाटावड्याची चव आजही आमच्या ओठावर तशीच आहे. काकी आणि आपण दोघांनी एकमेकांना आधार देऊन कोकणातील निसर्गरम्य अशा लांजा शहरात स्वतःच्या हक्काचे घर बांधलेत.या गोष्टीचा आम्हाला फारच अभिमान वाटतो. कु.मंगेश,कु. मेघा,कु.मंगल, कु.सचिन या चारही मुलांवर आपण चांगले संस्कार केलेत.आपल्या अथक श्रमाचे ,घामाचे सार्थक आज आपला थोरला सुपुत्र मंगेश याने लांजा तालुक्यातील एक आदर्श प्राथमिक शिक्षक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून केली आहे, हे पाहून अभिमान वाटतो.खरं सांगायचं तर माझ्या प्रत्येक सुख-दु:खात आपण खंबीरपणे उभे राहिला आहात.याची मनोमन जाणीव आम्हाला आहे. आपण लहाणपणी केलेले विनोद आजही आठवले की नकळत हसायला येते.त्यात भैय्या चाय के साथ तुम क्या खाते हो ? --हा तर विसरता म्हणता विसरता येत नाही.

     

    भाई काका आज आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे .भारतीय संस्कृतीत अमृतमहोत्सवी जन्मदिवसाला विशेष महत्त्व आहे. आज हा टप्पा आपण यशस्वीपणे ओलांडलात, त्याचा आनंद असून आगामी काळात आपण शताब्दी साजरी करावी हीच मनी इच्छा आहे .आगामी काळात आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभावे, हीच नाथांचरणी प्रार्थना.


     आपलाच

     विजय हटकर,

     समस्त हटकर कुटुंबीय 

रविवार दि.०३ एप्रिल २०२२