Monday, April 4, 2022

काकांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव सोहळा.

 अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव सोहळा.

 



प्रिय भाईकाका,

        वडिलांनंतर आयुष्यातला भक्कम आधारस्तंभ म्हणजे काका ! असाच भक्कम आधार ज्यांचा आम्हांला आहे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आम्हा सर्व कुटुंबाचे लाडके श्री मारुती रघुनाथ हटकर अर्थात भाईकाका .

            आपला जन्म ३ एप्रिल १९४८  रोजी कै.रघुनाथ मानाजी हटकर व कै. लक्ष्‍मीबाई रघुनाथ हटकर या दांपत्याच्या पोटी झाला.आपले बालपण मुंबई येथे सुखात जात असतानाच आपल्या वडिलांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतल्याने आपण तळवडे ,तालुका लांजा येथे आपल्या आजोळी येऊन स्थायिक झालात. येथे आल्यानंतर आपल्या जीवनात संघर्षाचा काळ सुरू झाला. काही दिवस मामाच्या घरी काढल्यानंतर तळवडे फाटा येथे एका गोठ्याचे घरात रूपांतर करून आपण भावंडांनी त्यालाच 'गोकुळ'  समजून आनंदाने त्या परिस्थितीला तोंड दिलात.घरी आई-बाबांसह असलेल्या बेबी,ताई ,माई, बाबी, छबी पाच बहिणी व धाकटा भाऊ बाळा असा मोठा कुटुंबकबिला समर्थपणे चालवण्यासाठी भाऊ अरविंद यांच्यासह आपणही अथक मेहनत केलीत.यासाठी सुरुवातीची दहा वर्ष साखरपा येते खाटिकाच्या  दुकानातही नोकरी केलीत. त्या मालकाचा विश्वास संपादन केलात.त्याने दिलेल्या आगाऊ रकमेतून ज्या गोठ्यात आपल्या आईने पार्वतीचा संसार थाटला होता त्याचे रूपांतर केळंब्याच्या ठिकठाक  घरात केलेत.


      पुढे एक वर्ष आपण आरोग्य विभागात सिंधुदुर्ग येथील दोडामार्ग, सावंतवाडी येथे मलेरिया निर्मूलन अभियानात कर्मचारी म्हणून निष्ठेने काम केलेत.याच काळात आपल्या पुढाकाराने १२/१२/१९७५ रोजी अापला भाऊ अरविंद यांचा शुभविवाह सावंतवाडी येथील श्री लक्ष्मण पाटील यांची कन्या सुधा हिच्याशी झाला. पुढे आपल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीचा कॉल आला आणि आपण साधारण १९७७ मध्ये विजयदुर्ग आगारात मेकॅनिकल विभागात रुजू झालात तेथील आगार प्रमुख श्री राणे यांनी गाड्या दुरुस्ती  करण्याबाबत मूलभूत तंत्र शिकवले. त्याचा खूप उपयोग झाल्याचे आपण सांगता .पुढे कणकवली व नंतर स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत राजापूर आगारात आपण प्रामाणिकपणे तब्बल २६  वर्ष नोकरी केलीत. आपला  हजरजबाबी स्वभाव ,सहकार्य करण्याची वृत्ती यामुळे सहकार्‍यांमध्ये आपण 'एमआर 'या नावाने लोकप्रिय झालात. सन २००३ मध्ये आपण एक आदर्श कर्मचारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलीत.

     


भाईकाकांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मानपत्र प्रदान करताना कुटुंबिय.

           नोकरी करत असताना देवगड मुटाट  येथील कु. कुंदा जगन्नाथ राजपूत हिच्याशी २२ फेब्रुवारी १९७८ मध्ये आपला शुभविवाह झाला.आपली सुविद्य पत्नी म्हणजे आमचे लाडकी कर्तुत्ववान कुंदा काकी. तिच्या आगमनाने आपल्या आनंदी जीवनाला सुरवात झाली.खरं तर काकीने आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. आपल्या जोडीने तिनेही बांगडी व्यवसाय काढून आपला प्रपंच सांभाळला. संसाराला हातभार लावणा-या आपल्या पत्नीला मदत व्हावी म्हणून आपण आठवड्याची सुट्टी मंगळवारी घ्यायचात. या दिवशी लांजाचा आठवडा बाजार असल्याने काकीला मदत करायचात.यावेळी आजही मला आठवतं आपल्या दुकानात आम्ही आपल्याला भेटायला आल्यावर आपण प्रेमाने कुंभारनीकडची दिलेली भजी किंवा बटाटावड्याची चव आजही आमच्या ओठावर तशीच आहे. काकी आणि आपण दोघांनी एकमेकांना आधार देऊन कोकणातील निसर्गरम्य अशा लांजा शहरात स्वतःच्या हक्काचे घर बांधलेत.या गोष्टीचा आम्हाला फारच अभिमान वाटतो. कु.मंगेश,कु. मेघा,कु.मंगल, कु.सचिन या चारही मुलांवर आपण चांगले संस्कार केलेत.आपल्या अथक श्रमाचे ,घामाचे सार्थक आज आपला थोरला सुपुत्र मंगेश याने लांजा तालुक्यातील एक आदर्श प्राथमिक शिक्षक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून केली आहे, हे पाहून अभिमान वाटतो.खरं सांगायचं तर माझ्या प्रत्येक सुख-दु:खात आपण खंबीरपणे उभे राहिला आहात.याची मनोमन जाणीव आम्हाला आहे. आपण लहाणपणी केलेले विनोद आजही आठवले की नकळत हसायला येते.त्यात भैय्या चाय के साथ तुम क्या खाते हो ? --हा तर विसरता म्हणता विसरता येत नाही.

     

    भाई काका आज आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे .भारतीय संस्कृतीत अमृतमहोत्सवी जन्मदिवसाला विशेष महत्त्व आहे. आज हा टप्पा आपण यशस्वीपणे ओलांडलात, त्याचा आनंद असून आगामी काळात आपण शताब्दी साजरी करावी हीच मनी इच्छा आहे .आगामी काळात आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभावे, हीच नाथांचरणी प्रार्थना.


     आपलाच

     विजय हटकर,

     समस्त हटकर कुटुंबीय 

रविवार दि.०३ एप्रिल २०२२







No comments:

Post a Comment