Thursday, December 24, 2020

समर्थ नेतृत्व - ' महंमदशेठ रखांगी '

 समर्थ नेतृत्व - ' महंमदशेठ रखांगी '

🔮💎💎💎💎🔮



        महंमद रखांगी! लांजा तालुक्याच्या सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक ,सहकार, साहित्य ,कृषी आदी सर्वच क्षेत्रात सहज वावर असणारे प्रज्ञावंत ,सुसंस्कृत आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्व! लांजा तालुक्याच्या विकासासाठी गत चार दशके शतप्रतिशत कार्यरत असलेले महंमद शेठ रखांगी 25 डिसेंबर 2023 रोजी वयाच्या 65व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा असून नव्या पिढीला प्रेरणादायी असाच आहे .राजकारण- समाजकारण असा भेद ते मानत नाहीत. किंबहुना समाजकारणाला पूर्णपणे वाहून घेऊन त्यांनी राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. 

    

         “ फुलाला सुगंध मातीचा.” अशी एक उक्ती आहे परंतु मातीचं नातं केवळ फुलांशीच असतं असं नाही, तर ते माणसांशीही असतं. माती जसं झाडांचे, फुलांचे पोषण करते. त्यांना रंग - गंध देते तसंच माणसालाही घडवते, त्यांचे पोषण करते. जी माणसं मातीचं हे  ऋण मानतात, मातीशी नातं जपतात, मातीशी इमान राखतात, त्यांना  मातीचा सुगंध मिळतो. त्या गंधाने इतरांची मनं दरवळतात. असा मातीचा सुगंध लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे महंमद रखांगी.

       मला आजही आठवते ती सन 2003 ची गोष्ट.मी  वरिष्ठ महाविद्यालय लांजा येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असताना न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे  तत्कालीन उपाध्यक्ष महंमद शेठ रखांगी  यांचे एका शैक्षणिक कार्यक्रमाकरिता महाविद्यालयात येणे झालेलं... यावेळी निरस,रटाळपणे चाललेला तो कार्यक्रम कधी  एकदाचा संपतो आहे ,अशा विचारात आम्ही सारे विद्यार्थी डुबलेलो... त्याच वेळी महंमदशेठ मार्गदर्शनासाठी उभे राहिले, आणि पुढील पंधरा मिनिटांच्या आपल्या अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी, आटोपशीर वक्तृत्वाने त्यांनी आम्हा साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले.  त्यांच्या या प्रभावी वक्तृत्वाने भारावून मी माझा मित्र अभिजीत राजेशिर्के सह त्यांना जाऊन भेटलो आणि साहेब 'आपल्या सोबत आम्हाला काम करायचे आहे' असे सांगितले. त्यावर या वयात सर्वप्रथम अभ्यासाकडे लक्ष द्या असे सांगत त्यांनी आम्हाला विद्यार्थी म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. व पुढे आम्हा दोघांनाही आपल्या "स्नेहवर्तुळात " सामावून घेतलं आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करीत आमच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देण्याचे काम केले. आज या घटनेला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु ही घटना माझ्या आयुष्यातील 'अनमोल ठेवा' आहे असेच मी मानतो.

       

           महंमद राखांगी यांचे उच्चशिक्षण मुंबईतील रूपारेल कॉलेजमध्ये झाले. मुंबईसारख्या महानगरातील या सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये धनिकांची व राजकीय पुढाऱ्यांची मुले शिक्षण घेत होती. पण या साऱ्यांवर मात करीत ते रुपारेल कॉलेजमध्ये सलग दोन वर्षे जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्यातील नेतृत्वगुणांना झळाळी प्राप्त झाली. पुढील उच्च शिक्षण पूर्ण करून ते मायभूमी लांजा येथे परतले. तरुण वयातच त्यांनी लोकनेते, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर निष्ठा ठेवून आपल्या सहका-यांच्या जोडीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्यातील गुणवत्ता आणि ध्येयनिष्ठा पाहून पवार साहेबांनी 1995 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. समोर रवींद्र मानेंसारखा तुल्यबळ उमेदवार असताना त्यांनी  माघार घेतली नाही व प्रचाराचा झंझावात सुरूच ठेवला, परंतु दुर्दैवाने त्यांना  पराभव पत्करावा लागल्यानंतरही ते खचून गेले नाहीत उलट मोठ्या जिद्दीने ,आत्मविश्‍वासाने त्यांनी आपले राजकीय व सामाजिक कार्य सुरूच ठेवत विधायक कार्यद्वारे आपली बांधिलकी कायम ठेवली.

    सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजपरिवर्तनासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याची परंपरा गुणाकाराने वाढवत नेणाऱ्या महंमद राखांगी  यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही लक्ष घातले. लांजा तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च व दर्जेदार शिक्षणाच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांची सदैव तळमळ असते, न्यू इंग्लिश स्कूल ही प्रशाला तर सीनियर कॉलेज लांजा या शिक्षण संकुलात शिक्षणाच्या सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये यादृष्टीने महंमदशेठ यांचा कटाक्ष असतो. याच दृष्टिकोनातून आपल्या सर्वदूर असलेल्या लोक संपर्काचा उपयोग करीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक निधीचा ओघ लांज्यातील ज्ञानमंदिराच्या उभारणीसाठी वळावा यासाठी विशेष  प्रयत्न केले आहेत.यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असे त्यांचे मित्रवर्य श्री अयुब काझी व आजरा काझी  या दाम्पत्याने रखांगींवरच्या प्रेमा पोटी 25 लाख रुपयांची देणगी टप्प्याटप्प्याने न्यू एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला दिली आहे.

          लांजा तालुक्यात इयत्ता सातवीनंतर असलेली उर्दू शिक्षणाची कमतरता लक्षात घेऊन पैगंबरवासी अजित पन्हळेकर यांच्या साथीने त्यांनी अल अमिन उर्दू हायस्कूल ची स्थापना केली. ज्ञान यज्ञाची ही सुंदर शैक्षणिक संकुले पाहिल्यावर महंमदभाईंच्या कल्पकतेची व शिक्षणप्रेमाची साक्ष पटते.

        समाजात धनिक श्रीमंतांची वणवा नाही.अन्ं नुसत्या कोरड्या सहानुभूतीच्या शब्दांचे बुडबुडे नक्राश्रू ढाळून पोकळ आश्वासनांची खैरात करून स्वस्वार्थाच्या कारणाशिवाय खिशातून दिडकीही बाहेर न काढणाऱ्या राजकीय नेत्यांचीही कमी नाही. परंतु गोरगरिबांना, रंजल्या गांजलेल्यांना, दुखी -पीडितांना ,आकस्मिक आपत्तीचा डोंगर कोसळलेल्या हुशार होतकरू मुलांना कर्तव्य भावनेतून लागेल ती सर्वतोपरी मदत करणारे महंमदशेठ रखांगींसारखे दातृत्व व नेतृत्व आजकाल दुर्मिळच आहे.त्यांच्या  सोबत वावरताना नेहमीच याचा प्रत्यय येतो. अनेक वेळा विविध गरीब रुग्णांना मोठ्या महानगरातील खाजगी रुग्णालयांचे आवाढव्य शुल्क भरणे ही अवघड असते तेव्हा महंमद शेठ त्यांच्यासाठी देवासारखे धावून जातात. या रुग्णांना विविध एनजीओ च्या माध्यमातुन मदतीचा हात मिळावा यासाठी आवश्यक ती त्यांची कागदपत्रे बनवण्याच्या कामी ते स्वतः लक्ष घालून त्या रुग्णांना मदत मिळवुन देताना मी त्यांना जवळून पाहिले आहे .अशा प्रसंगी त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिकच दृढ होतो. त्यांचे दातृत्व व निस्वार्थी भावनेतून व्यक्त होणारा माणुसकीचा गहिवर निश्चितच फार मोठा दुर्मिळ आहे. 

       

           लांजा तालुक्यातील सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. स्वर्गीय डॉक्टर य.दा. लिमये, डॉक्टर अनील पत्की, वालाजीभाई भन्सारी, रवीभाई पटेल, कुमार बेंडखळे , शिवाजी शेठ कोत्रे यांच्या सहकार्याने त्यांनी लांजा नागरी सहकारी पतसंस्थेचे उभारणी केली त्याचप्रमाणे परवेज घारे, हेमंत शेटये ,मंगेश चव्हाण ,अश्रफ रखांगी या सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या दोन्ही संस्था आज  उत्तम रीतीने कार्य करीत आहेत.

           

       त्यांचे खेळाविषयीचे प्रेम सर्वश्रुत आहे. 1990 च्या दशकात लांजा शहरातील "नॅशनल इलेव्हन" क्रिकेट संघाची उभारणी त्यांनी केली होती त्या काळातील नावाजलेल्या संघांपैकी हा एक महत्त्वाचा संघ  होता. युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ,व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी लांजा तालुका कबड्डी असोसिएशन व तालुका हॉलीबॉल असोसिएशनची स्थापना करीत क्रीडा चळवळीला ही दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 


     कोकणात शेती  उत्पन्नाकडे उद्योजकीय मानसिकतेतून पाहिले जात नाही हे लक्षात घेऊन रखांगी यांनी 'स्वयंरोजगार संस्थेच्या' माध्यमातून जरबेरा फुलशेतीचा प्रकल्प मोठ्या हिमतीने उभारत कृषी क्षेत्रात युवकांना वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

     

   यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, युवक मंडळ लांजा व्यापारी संघटना, माजी विद्यार्थी संघ, लायन्स क्लब ,माजी विद्यार्थी असोसिएशन इत्यादी ठिकाणी ही त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा ठसा उमटवलेला आहे ,महंमदशेठ यांचा आणखी एक विशेष गुण म्हणजे त्यांची चौफेर वक्तृत्वशैली! त्यामागे त्यांचे प्रचंड वाचन, अभ्यास, मनन चिंतन आहे, विषय कोणताही असो ,उपस्थित जनसमुदायाला प्रभावित करण्याची त्यांची वक्तृत्वाची हातोटी विलक्षण आहे.        

    

  दुर्दम्य आशावाद अखंड जिद्द यांचं दुसरं नाव महंमद रखांगी आहे असेच म्हणावे लागेल.एखादी गोष्ट मनावर घेतली की ती कशी यशस्वी होईल याचा ध्यास त्यांना लागतो आणि भराभर चक्र फिरू लागतात.कोण व्यक्ती कोणत्या कामाला योग्य आहे याची जंत्री डोक्यात नेहमीच असते त्यामुळे कामाला वेग येतो आणि हा हा म्हणता अनेक लहान-मोठे(बरेचदा मोठेच ) उपक्रम पारही पडून जातात. या उपक्रमांवेळी ते एखाद्या नेत्यापेक्षा  कार्यकर्ता म्हणून अधिक तळमळीने कार्य करतात त्या वेळी त्यांच्यातील " यशस्वी कार्यकर्ता " मनाला भावतो. समाजाच्या प्रत्येक स्तरातील ,सामान्यातील सामान्य माणसाशी आपुलकीने बोलत त्यांचे प्रश्न हाताळणे असो वा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेदाचा कधीच बाऊ न करता विरोधकांसोबत एकत्र येणे असो या त्यांच्या स्वभावामुळे महंमदशेठ अजातशत्रू व शोधक व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 


   एकुणच राजकारण, समाजकारण या बरोबरच शिक्षण,साहित्य ,कला ,क्रीडा , संस्कृती जोपासण्यासाठी सदैव पुढाकार घेणारे महंमदशेठ रखांगी आज वयाची एकसष्टी पूर्ण करित आहेत हा एक विशेष आनंदाचा क्षण आहे.या क्षणांमध्ये मी ही सहभागी आहे त्यात मला सन्मान वाटतो आणि आनंदही!आम्हा सार्‍या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या महंमदशेठ रखांगी यांना वाढदिवसा निमित्त मनापासून आभाळभर शुभेच्छा आणि त्यांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायू वाटचालीसाठी त्यांना आवश्यक ते सर्व बळ देण्याची परमेश्वराकडे विनम्र प्रार्थना।

💐💐💐💐💐

 श्री विजय हटकर.

   लांजा.



Tuesday, December 22, 2020

छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

 छाया फोटो स्टुडिओ -३४ वर्षाची यशस्वी वाटचाल

🎥📹🎞️🎞️📸📷📱

                 २२ डिसेंबर!हाच तो दिवस. साधारण चौतीस वर्षांपूर्वी सन १९८६ साली याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा गावात संजय उर्फ भाई बुटाला यांनी छाया फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवत लांजा वासियांना छायाचित्रणाचे दालन खुले केले. आज३४ वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाही लांजा बाजारपेठेतील मध्यवर्ती इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेला छाया फोटो स्टुडिओ आपला पारंपरिक बाज टिकवून आहे. या स्टुडिओत जाण्यासाठी चढाव्या लागणारे जिने सोबतीने घ्यावा लागणारा दोरखंडाचा आधार सारं फार भारी मजेशीर आहे. पण एकदा का स्टुडिओत प्रवेश केला की त्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण छायाचित्रणाने आपले समाधान होते. ग्राहकांच्या समाधानाला महत्त्व दिल्याने हा स्टुडिओ आज चौतिसावा वर्धापन दिन यशस्वी साजरा करीत आहे.

           तो जमाना होता कृष्ण-धवल कॅमेऱ्यांचा. लांज्यात त्यावेळी कोळेकर आणि भाई बुटाला हेच दोन प्रसिद्ध छायाचित्रकार होते. जे हजार शब्दात सांगता येत नाही ते केवळ छोट्याशा आकारात छापलेल्या छायाचित्रातून सांगता येतं हे छायाचित्रण कलेचे वैशिष्ट्य त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर लांजावासीयांत रुजवलं.या छोट्याश्या शहरातील अनेकांच्या जीवनातील आनंदाचे क्षण अचूक टिपत ते अविस्मरणीय करण्याचं काम केलं. त्यामुळेच ते लोकांच्या आवडीचे छायाचित्रकार बनले. आजही अनेकांच्या घरातल्या आलमारीत असलेले त्याकाळचे कृष्णधवल अल्बम पाहिले  की, अत्तराच्या कुपीचे झाकण उघडल्यानंतर सुगंध दरवळतो व आसमंत भरून जातो तशाच पद्धतीने जुन्या काळातील अल्बम पाहून सुगंधी आठवणीत अनेक जण स्वतःलाच विसरून जातात. या वेळी हमखास सांगितलं जातं - “ अहो हे फोटो की नाही छाया फोटो स्टुडिओ चे भाई बुटाला यांनी काढले आहेत.”

          तो काळ छायाचित्रकारांसाठी  तसा खडतर होता एखाद्याचे छायाचित्र काढल्यानंतर कॅमेऱ्यातील निगेटिव्ह पाण्यात भिजविल्या जायच्या व नंतर फोटोपेपर वर फोटो प्रिंट केले जायचे. भाई बुटालांनी या खडतर काळातील कृष्णधवल छायाचित्रांच्या नाट्यमय छटांपासून ते रंगीत छायाचित्रांच्या सर्वरंगीपणा पर्यंत प्रवास करत स्वतःतील कलाकार नेहमीच जागा ठेवला. प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर छायाचित्रण व्यवसायातील बदलांना संधी मानत ते स्वीकारले. सोबतच कोकणातील आघाडीच्या वर्तमानपत्रांसाठीही त्यांनी छाया पत्रकार म्हणून कामही केले. शब्दात बातमी सांगणा-या काळात त्यांनी आपल्या बोलक्या छायाचित्रांतून लोकांना बातम्या सांगितल्या.  छायाचित्रण व्यवसाय करीत असताना भाई बुटालानी व्यावसायिक नीतिमत्ता कसोशीने जपली. ग्राहकांचे हित जोपासताना आपल्या परखड, बिनधास्त आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांना मोहिनी घातली.

     


भाई बुटालांच्या हाती असलेल्या कॅमेराचे वेड बालपणापासूनच त्यांचा चिरंजीव विनयला लागले होते. आणि म्हणूनच छायाचित्रणाच्या वेडाला व्यवसायिक रूप देत विनयनेही भाईंच्या पाऊलावर पाऊल ठेवत छायाचित्रण व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला व वडिलांचा वारसा समर्थपणे जोपासत आज छाया फोटो स्टुडिओचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. व्यवसाया सोबतच सामाजिक भान जपत कार्यरत असलेला विनय बुटाला आज लांजा वासियांचा लाडका छायाचित्रकार बनला आहे.कॅमेराच्या पाठीमागे उभा राहून सुद्धा मनात घर केलेला हा  अवलीया एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांनाच परिचित आहे.आणि म्हणूनच फोटो तेथे विनय बुटाला हे समीकरणच झाले आहे.

       पंधरा-वीस वर्षांपूर्वी कॅमेर्‍यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन्  छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा... डिजिटल कॅमेरा... ते मोबाईल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदात पाहता हाताळता येऊ लागले. तथापि या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. त्यामुळेच फोटोग्राफीत नवे नवे ट्रेण्ड येतच राहिले लोकांनीही त्या स्वीकारल्याने फोटोग्राफी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी निर्माण झाल्या. भाई बुटालांप्रमाणेच विनयनेही त्या संधीचे सोने केले.  

       असं म्हणतात छायाचित्र प्रथम छायाचित्रकारांच्या मनावर उमटतं.. आणि नंतर ते कॅमेराबद्ध होतं यासाठी छायाचित्रकाराला वेगळं मन असावं लागतं,अचूक आणि चौफेर नजर असावी लागते, तत्परते बरोबरच वेळेचे भान असावं लागतं हे सारं ज्याच्याकडे असते तो यशस्वी छायाचित्रकार बनतो. विनय बुटाला यासंदर्भात परिपूर्ण म्हणायला हवा.

         आज लग्नाला इव्हेंटचे स्वरूप आले आहे लग्न करण्यासोबत ते गाजवण्याची फॅशन आलेली आहे. लग्न समारंभ म्हटला की त्यामध्ये नवरा-नवरी इतकाच महत्त्वाचा असतो तो छायाचित्रकार. लग्नाच्या छायाचित्र व्यवसायाला त्यामुळेच प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सोबत उत्तम पॅकेजही मिळत असल्याने लग्न समारंभातील क्षेत्रात नवीन ट्रेंडना भरते आले आहे. त्यामुळे अनेक परिवार आज "लग्नसोहळा" यादगार करण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट,एरियल फोटोशूट ते रिसेप्शन पर्यंतचे फोटोशूट अशा अनेक प्रकारचे फोटोशूट करून घेत असतात. याचा अभ्यास करीत या क्षेत्रात *विनयने आपल्या सहकाऱ्यांची एक " आॅफबीट टीम" बनविली आहे.आज लांज्याची वेस ओलांडत देशभरात  विविध ठिकाणी  छायाचित्रणासाठी विनयचा प्रवास सुरू असतो. तो जिथे जिथे जातो तिथे "छाया फोटो स्टुडिओ" च्या नावासोबतच लांज्याचे नावही पोहोचत असल्याने त्याच्या विषयीचा 'स्नेहभाव' अधिक दृढ होतो आहे. आज लांजा बाहेरील ग्राहकांना मनपसंत सेवा देतानाच ,लांजावासीयांच्या सेवेत छाया फोटो स्टुडिओ कडून कोणत्याही खंड पडलेला नाही कारण विनयच्या मागे गजानन अर्थात आपल्या सर्वांचा लाडका "गजा" सर्वांना उत्तम छायाचित्रकार म्हणून सेवा पुरवीत असतो.

        एकूणच गेली ३४ वर्षे लांजा बाजारपेठेत छायाचित्रणाची निरंतर सेवा देत "छाया फोटो स्टुडिओ" यशाकडे वाटचाल करीत आहे. या स्टुडिओत जिन्याने जात असताना घ्यावा लागणारा दोरीचा आधार कोणालाही क्लेशदायक न वाटता सुखदायी वाटतो यातच या स्टुडिओच्या यशाचे गमक आहे.आगामी काळातही छाया फोटो स्टुडिओ आपल्या दर्जेदार, सर्जनशील,नावीन्यपूर्ण  सेवेने यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच प्रार्थना धनी केदारलिंग चरणी करतानाच भाई बुटाला -विनय बुटाला या पिता-पुत्रांसोबतच छाया फोटो स्टुडिओच्या यशस्वी वाटचालीत हातभार लावणाऱ्या  सार्‍यांनाच आभाळभर सदिच्छा.

     💐💐💐💐💐💐💐

             आपलाच

          विजय हटकर.