Monday, July 3, 2023

शून्यातुन विश्र्व निर्माण करणारा यशस्वी उद्योजक शशिकांत गुरव

 

शून्यातून विश्र्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक शशिकांत गुरव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

💐💐💐💐💐💐💐



  कोकणात कर्तृत्ववान लोक जन्मास आले.रत्नागिरी हे नाव त्यामुळे सार्थ ठरले आहे. या रत्नांच्या खाणीतील एका रत्नाने इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी सारख्या भारताला प्रगतशील बनवू पाहणाऱ्या क्षेत्रात "टेक्नोवॅल्यू प्रायवेट लिमिटेड " कंपनीची मुहूर्तमेढ रोवत यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावितानाच मायभूमी कोकणच्या विकासालाही हातभार लावला आहे.संघर्षपुर्ण वाटचालीतून आपली यशोगाथा नव्या पिढीसमोर ठेवणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे लांजा तालुक्यातील श्री शशिकांत गुरव होय.

०३ जुलै १९७७ रोजी जन्मलेल्या शशिकांत गुरव यांचे लांजा हे मूळ गाव .लांजा शहरातील रेस्ट हाऊस या प्रभागात त्यांचे घर आहे.घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती त्यातच शशिकांत नऊ वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरविल्याने ती अधिक खडतर झाली.पुढची सारी जीवनवाट त्यामुळे संघर्षदायी बनली.मात्र उपजतच कर्तृत्व व हुशारी अंगी असलेल्या शशिकांत यांनी मेहनतीच्या बळावर त्यावर मात केली.बालपणातच त्यांनी शिक्षणासाठी मुंबईची वाट धरली.इथल्या नातेवाईकाकडे रहताना चाळीतील जिन्यावर व रस्तावरील दिवाबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करित त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आजच जग हे तंत्रज्ञानाचं जग असल्याने इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी या क्षेत्रात एकविसाव्या शतकात मोठी संधी निर्माण होईल हे वेळेतच जाणल्याने शशिकांत गुरव यांनी इन्स्ट्रूमेन्टेशन अभियांत्रिकी या विद्याशाखेतून डिप्लोमा पूर्ण करित Aimil limited या कंपनीतून ख-या अर्थाने नोकरीस सुरवात केली व मेहनती स्वभाव, चिकाटीच्या जोरावर त्यांनी टेक्निकल असिस्टंट ते नॅशनल हेड या पदापर्यंत मजल मारली.

शशिकांत गुरव नोकरीत स्थिरस्थावर झाले होते मात्र इतरांसाठी राबण्यापेक्षा स्वत:चे  स्टार्ट अप करुन कंपनी सुरू करावी हा विचार मूळचा उद्यमशील सवभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. यातच समोरून एक संधी चालून आल्याने सन २०१२ साली त्यांनी "टेक्नोवॅल्यू सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड ' या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.भांडवल उभरण्यासाठी प्रसंगी गावकडील काही जमीनही विकली.मात्र पहिल्याच खरेदिदाराने काही कारणांनी  अचानक माघार घेतल्याने फार मोठा धक्का शशिकांत गुरव यांना बसला.  सारं काही उध्वस्त झाल्याची जाणीव झाल्याने एकवेळ जीवन संपविण्याचा विचार त्यांच्या मनात आला.मात्र,

         सच हम नहीं,सच तुम नहीं
          सच है सतत संघर्ष ही ।।

या उक्तिप्रमाणे त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्विकारला.व आलेल्या संकटांशी दोन हात करित एका भाड्याच्या खोलीत सुरु केलेली या कंपनीचा गत दशकभरात मुंबई सह हैद्राबाद,दिल्ली,चेन्नई,बंगलोर,अहमदाबाद,चंदीगड या देशातील आघाडीच्या शहरात शाखा सुरु करित यशस्वी विस्तार केला आहे व अाजमितीला इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी क्षेत्रातील दर्जेदार कंपनी म्हणून  टेक्नोवॅल्यू सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड ने नावलौकिक मिळविला आहे.या कंपनीच्या माध्यमातून जगभर फिरण्याची संधी त्यांना मिळाली.याचा फायदा उठवीत वैद्यकिय, पर्यावरण, शिक्षण,संशोधन या क्षेत्रातील अग्रेसर इन्स्ट्रुमेन्ट बनविणारी अग्रेसर कंपनी म्हणून पुढे आली आहे.सद्यस्थितीत इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग आणि एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स ( Ishare society)  च्या विविध उपक्रमात या क्षेत्रातील यशस्वी  उद्योजक शशिकांत गुरव क्रियाशीलपणे सहभाग घेत असतात.राष्ट्रीय दर्जाच्या या सोसायटीतून इन्स्ट्रुमेन्टेशन इन्जिनिअरिंग या शाखेतील आॅटोमेशन ,इलेक्ट्रॉनिक्स, संगणक,केमिकल अभियांत्रिकी विद्याशाखेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील शिक्षण भविष्य उज्जवल करु शकतो व यातील काम एकापरीने देशसेवा ठरू शकते याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद,कार्यशाळेच्या माध्यमातून शशिकांत गुरव रचनात्मक काम करित आहेत.या क्षेत्राची मानवाला भेट असलेली डिजिटल थर्मामीटर,आॅक्सिमीटर, डिजिटल स्पायरोमीटर,इ.उपकरणांनी कोरोना काळात आपली उपयुक्तता सिद्ध केली असून कोरोना काळात या क्षेत्रातून शशिकांत गुरव कोरोनाच्या वैश्र्विक संकटातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी  अहोरात्र काम करित होते.

  "कुछ लोग

    भरोसा जीतने के लिए काम करते है।

    अौर कुछ

    भरोसे के साथ काम करते है।"

     या उक्तिप्रमाणे स्वत:ला झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीने, निष्ठा व भक्ती या मूल्यांचे अनुकरण करित त्यांनी अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे.आज त्यांच्या कंपनीच्या विविध शाखेतुन १२० कर्मचारी का करीत असून कंपनीचे संस्थापकीय संचालक म्हणून एक प्रसन्न, चैतन्यशील प्रभावी व्यक्तिमत्व असलेले शशिकांत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांच्याविषयीचा आदरभाव कर्मचाऱ्यांमध्ये पहायला मिळतो.



     शशिकांत गुरव आम्हा लांजावासीयांसाठी बंड्यादादा म्हणून परिचित आहेत.या नावामागे एक आपलेपणा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा शहराच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यात येथील तरुणाईत गेली दोन दशकांहून अधिक काळ रूजलेल्या, जोपासलेल्या व तरुणाईला वेड लावलेल्या नवरात्रोत्सवाचा अर्थात फॅन्सी दांडिया स्पर्धेंचा उल्लेख हा करावाच लागेल.अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या उत्साहात कुठेच फॅन्सी दांडिया स्पर्धा होत नसाव्यात इतका उत्साह लांज्यात पहावयास मिळतो. या स्पर्धांसोबत लांजावासीयांशी काही नावे कायमची जोडली आहेत.या नावांमध्ये काही आयोजक ,काही सहभागी कल्पक कलाकार तर काही सुमधुर आवाजांनी ह्ददयात स्थान मिळविले आहे.या सर्व मंडळीमध्ये एक नाव अगदी सहज प्रत्येकाच्या मुखात येईल ते  नाव म्हणजे शशिकांत उर्फ बंड्या गुरव यांचे.लांज्यात नवरात्र उत्सवात सलग २५ वर्षे आई भगवतीची प्रतिष्ठापना करुन नवरात्रोत्सवाचे उत्साहाने  आयोजन करणारे शिस्तबद्ध  मंडळ म्हणजे संदीप स्मृती मित्रमंडळ होय.या मंडळाचे अध्यक्ष मनोहर बाईत आज लांजा नगरिचा डोलारा सांभाळत आहेत.तर उपनगराध्यक्षा म्हणुन काम केलेल्या सॊ.यामिनी जोईल ही याच मंडळाच्या. या मंडळात असलेल्या नवरत्नांपैकी एक असलेला कोहिनुर म्हणजे आम्हा सर्वांचा लाडका बंड्या दादा अर्थात शशिकांत गुरव
        
      मुंबई सारख्या भारताच्या आर्थिक राजधानीत स्वत:च्या कल्पकतेने,मेहनतीने स्वत:ची कंपनी निर्माण करुन तरुणाईसमोर आदर्श उभा करणारा बंड्या दादा खरं तर लाघवी, नम्र स्वभावाचा. इतकं मोठं यश मिळवुनही त्याचा लवलेश गावात आल्यावर दादाच्या चेहऱ्यावर दिसत नाहि.मुंबईतल्या या व्यस्त नियोजनातुनही बंड्या दादा हा गावी हमखास येतो ते म्हणजे नवरात्र उत्सवात.कोकणात लोकं शिमगा व गणपती उत्सवाला आवर्जून येतात.बंड्या दादा मात्र नवरात्रीच्या आठव्या माळेला हमखास आम्हा सर्वांना वर्षभराने दर्शन द्यायचा.कारण याच दिवशी वर्षभर ज्याची उत्सुकता लागेलेली असायची ती फॅन्सी दांडिया स्पर्धा आयोजित केली जायची.या स्पर्धेतील स्पर्धक म्हणून आम्ही १० वाजले तरि तयारीत गुंतलेली असायचो. आमचा सीन घेऊन येणारा ट्रक रेस्ट हाउसच्या या मंडळा पर्यंत यायचा तेव्हा रसिक लांजावासीयांची तुडुंब गर्दी झालेली असायची.या गर्दीत मध्यवर्ती असलेल्या रिंगणातील सफेद सदरा व फेटा बांधलेला माईकवर तुफान बॅटिंग करत आपल्या नजाकतदार आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा बंड्या दादा आम्हाला कायमच आकर्षित करायचा.निवेदन कसे असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे बंड्या दादा.त्याच्या या निवेदनात रात्र कधी संपून जाऊन पहाट व्हायची हे कळायचे सुद्धा नाही.एवढे वर्षे हि स्पर्धा संदीप स्मृती मित्रमंडळ आयोजित करते. यामध्ये अनेक विकासात्मक बदल झाले.फक्त निवेदन करणारा बंड्या दादा मात्र बदलला नाही.आज या मंडळात वैभव जोईल सारखी निवेदनातील मातब्बर मंडळी आहेत पण नवरात्रीत आठवण येते ती बंड्या दादाच्या मंत्रमुग्ध आवाजाची.

     मागणारे हात खुप असतात.देणारे थोडे असतात.पण असतात.अपेक्षा न ठेवता ते देत राहतात.शशिकांत गुरव याचे प्रतिनिधित्व करतात. दांडिया सोबतच लांज्यातील अनेक सामाजिक उपक्रमात आमचे शशिकांत गुरव  आघाडीवर असतात पण आपण आपले काम प्रसिद्धीचा आव न आणता करायचे हा स्वभावधर्म असलेला बंड्या दादा दरवर्षी पाच निराधार मुलांचे संगोपन व पालन खर्च करतात.अनेक होतकरू युवकांच्या विवाह जमवून त्यांच्या संसार मार्गी लावण्याचे पुण्य कार्यही ते व्यवसाय सांभाळून करित असतात.त्याचबरोबर कोकणातील ज्ञातीबांधवांच्या भाविक गुरव समाज या संस्थेच्या सचिवपद ते अनेक वर्षे सांभाळीत आहेत. कोकणातील तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता चाकोरीबध्द जीवन सोडून व्यवसाय उद्योगात पडत आत्मनिर्भर बनत कोकणच्या विकासात सहयोग दिला पाहिजे असा संदेश देणाऱ्या श्री शशिकांत गुरव यांचा आज वाढदिवस.यानिमित्ताने त्यांचे समाजभान असेच वृद्धिंगत होऊन वर्धमान कर्तृत्वाला बहर येवो हिच धनी केदारलिंगाचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा वाढदिवस अभीष्टचिंतन
💐
💐💐💐💐💐

  विजय हटकर
८८०६६३५०१७

1 comment:

  1. I am immensely thankful for the time, effort, and dedication you put into crafting such a heartfelt piece. Your writing has not only shed light on my story but has also created a ripple effect of positivity and inspiration.

    ReplyDelete