पाहता श्रीमुख सुखावले सुख..
श्री गणपती ही देवताच ज्ञानाची , सर्व कलांची, विद्येची, प्रतिभेची अन् मानवी जीवनातील शुभंकराची.या वर्षी आमच्या घरी तिचे आगमन काही कारणास्तव लांबले, मात्र आज गौरी अावाहनाच्या दिवशी बाप्पाची मोठ्या प्रेमाने, आस्थेने ,भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली.
कोकणातील संस्कृतीचे भूषण असलेल्या भाद्रपद महिन्यातील घरगुती गणेशोत्सवाचे इथल्या जनमानसात एक आगळे स्थान आहे.कोकणातील प्रत्येक माणूस या काळात एका वेगळ्याच धुंदित जगत असतो. आज बाप्पाच्या आगमनाने खरं तर लहानग्या विधीसह घरातील सारे अबालवृद्ध आनंदित झाले.मूळ गाव तळवडे येथे आजोबांनी सुरु केलेला परंपरागत गौरी विसर्जनापर्यंत स्थानापन्न होणारा बाप्पा लांज्यात मात्र दिड दिवसाचा झाला अाहे.मात्र त्यातील उत्साह, आनंद कमी झालेला नाही.लहानपणी गणपतीची मूर्ती आम्ही भावंडं निरखून -पारखून पहायचो व तेजस्वी, मनोहारी बाप्पाच्या दर्शनातून " पाहता श्रीमुख सुखावले सुख" असे प्रसन्न वाटायचे.आज कन्या कु.विधी जेव्हा बाप्पाकडे तशी पाहते तेव्हा गावातील कळीजकोपरा व्यापलेले ते हृदयस्थ दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.
सुखकर्ता श्रीगणेशाचा उत्सव आणि पुढील काळही आपणा सर्वांना मंगलमय आणि निर्विघ्नतेचा जावो, ही शुभेच्छा.
No comments:
Post a Comment