Thursday, June 29, 2023

सर्जनशील लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी

सर्जनशील लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी 



   संसार आणि व्यवसाय याच्या सा-या जबाबदाऱ्या पार पाडत असताना उत्तमोत्तम साहित्यिक कलाकृतींची निर्मिती करुन कोकणातील साहित्य क्षेत्रात आपल्या सहज सरळ लालित्यपुर्ण लेखनशैलीने ठसा उमटवीणा-या संवेनशील लेखिका म्हणजेच विजयालक्ष्मी देवगोजी होय.

            देवगोजी यांचे मुळ गाव कर्नाटकातील बेळगाव. बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विजयालक्ष्मीना  वडिलांमुळे अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली.यातूनच   पुढे लेखिकानिर्मितीची बीजे रोवली गेली.घरची आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे विजयालक्ष्मी यांचे मोठे भाऊ सत्तरच्या दशकात बी.ई. झाल्याने मोठ्या भावाचा आदर्श घेत त्याच्याच पाऊलावर पाऊल ठेवत  विजयालक्ष्मीही बी.एस्सी.ला विद्यापीठात सतराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.मात्र ८० च्या दशकात मुलींना उच्चशिक्षणासाठी घराबाहेर पाठविले जात नसल्याने एम.एस्सी करायला त्यांना धारवाडला पाठवायला वडिलांनी नकार दिला.मात्र साहित्याची आवड असलेल्या विजयालक्ष्मींनी निराश न होता एम.ए.करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत लग्न लवकर झाल्याने एम.ए.मराठी अर्धवट राहिले.पुढे पतीसोबत१९८८ मध्ये  कोकणातील लांजा येथे आलेल्या विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ल‌ॅब टेक्निशिअन्स चा कोर्स यशस्वी करुन लांज्यातील डाॅ.पत्की यांच्या सहकार्याने स्वतंत्र लॅब सुरु केली.कोकणात पतीच्या साथीने कुटुंब स्थिरस्थावर करताना मराठी भाषेवर नितांत प्रेम असणाऱ्या  देवगोजी यांनी मराठी भाषेत ललितलेखनास सुरवात केली.याच जोडीने कोमसाप व लोकमान्य वाचनालय या साहित्याशी निगडीत संस्थांमध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. हे सर्व करित असताना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती.या इच्छेतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असलेले पी.जी.डी.एम.एल.टी व सत्तावन्नव्या वर्षी  मराठी साहित्यविषयक आवडीतुन मराठी विषयात त्यांनी  एम.ए. ची पदवी यशस्वीपणे संपादन केली.शिक्षण हे निरंतर चालू असते हे जाणणाऱ्या देवगोजी मॅडम सद्यस्थितीत डाॅक्टरेट अर्थात पी.एच.डी.चे अध्ययन करित असून भटक्या विमुक्त जाती जमातीतील वडार समाजाविषयी त्यांचा संशोधनपर प्रबंधाचा अभ्यास सुरु आहे.

     लांजा सारख्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या गावातून आपल्या मुलीला देवगोजी मॅडम यांनी स्पर्धा परीक्षेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण केली.पुढे खडतर परीक्षेसाठी आवश्यक असलेले पाठबळ देत सनदी अधिकारी बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले.हे करत असताना साहित्यविषयक निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही.मराठी भाषेतील विविध साप्ताहिके, दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या सुंदर कथा, ललित, कविता दिग्गजांच्या बरोबरीने प्रसिद्ध होऊ लागल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. पुढे  युरोपातील स्वित्झर्लंड देशात एका नातेवाईकाच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने जाणे झालेल्या देवगोजी मॅडम यांना तेथील स्वर्गीय सौंदर्याने मोहित केले.खरं तर स्वित्झर्लंड या  देशाविषयी आपल्याला काळा पैसा लपवण्याचा देश इतकीच माहिती. मात्र या देशाच्या इंद्रधनुष्यी स्वर्गीय सौंदर्याचे दर्शन घडविणारे ,तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे आपल्या पहिल्याच परदेश वारीचे -  " अजि म्या परदेस पाहिला " हे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक लिहिले.मराठी साहित्यविश्र्वाने या पुस्तकाचे भरभरुन स्वागत केल्याने देवगोजी मॅडम या मराठी साहित्यविश्र्वात नावारुपास आल्या. आपल्या मुलीला सनदी अधिकारी बनविणा-या देवगोजी मॅडम यांचे संस्कारशील पत्रप्रपंचाचा ठेवा असलेले दुसरे पुस्तक  - " अशी घडली राजस्विनी" हे नुकतेच मुचकुंदीच्या काठी वसलेल्या प्रभानवल्ली गावात संपन्न झालेल्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाले.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होणाऱ्या मुलांपेक्षाही त्यांना घडविणा-या पालकांची जबाबदारी नेमकी कोणती आहे ,हे सांगत पालकांना सजग करणारे हे पुस्तकही रसिकांच्या पसंतीस उतरेले आहे.



        कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच हे आपल्या साहित्यातून सिद्ध करणाऱ्या सर्जनशील लेखिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई या संस्थेने अक्षरमित्र पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित केले आहे. याचबरोबर मराठा मंदिर मुंबई साहित्य शाखेचा सर्वोकृष्ठ वाड:मयीन साहित्यकृती २०२२ चा पुरस्कार त्यांच्या अजी म्या परदेस पाहिला या पुस्तकाला मिळाल्याने त्यांच्यातील प्रतिभावंत लेखिकेचा सन्मान झाला आहे.

   आगामी काळातही त्यांच्या हातून अशीच प्रतिभेची साहित्यलेणी निर्मिली जातील हा विश्वास आहे.

वि ज य ह ट क र

८८०६६३५०१७

No comments:

Post a Comment