Thursday, June 15, 2023

सफर काणकोणची

 सफर काणकोणची...



काणकोण

             गोव्याच्या दक्षिण सीमेवर वसलेला,निसर्ग सौंदर्याने मुक्तपणे उधळण केलेला शेवटचा तालुका.  अथांग पसरलेले रमणीय समुद्रकिनारे,गोमांतकीय धाटणीची प्रशस्त देवालये, समृद्ध वनश्री अर्थात पर्यटन स्थळांच्या वैविध्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणारा तालुका.

           गोव्याच्या दक्षिण सीमेवर वसलेले काणकोण कर्नाटकातील कारवार व गोव्यातील मडगांव या शहरांपासून तासाभराच्या अंतरावर आहे. निळ्याशार सुंदर चंद्रकोर आकाराच्या व गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गणल्या जाणाऱ्या पालोलीम बीचमुळे जरी काणकोण लोकप्रिय झाले असले तरी दंतकथा आणि लोककथांनी नटलेला काबा-द-रामा हा गोव्यातील सर्वात जुना किल्ला, गोव्याची दक्षिण हद्द जिथे कर्नाटकाला भिडलेली आहे तिथले हिरवे गर्द कोटिगाव अभयारण्य, कदंब यांची पूर्वीची राजधानी चांदूर व १६ व्या शतकात पोर्तुगीज पद्धतीने बांधलेले भव्य ब्रेगेंझा हाऊस, बामणबुडे धबधबा, अखिल भारतवर्षातील गौड सारस्वत ब्राह्मणांचे श्रद्धास्थान असलेले पर्तगाळी गावातील 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, अगोंदा, पाटणे ,राजबाग, कोळंब यासारखे अस्पर्शीत शांत समुद्रकिनारे,पैंगीण व लोलयेतील गूढ भव्य वेताळ मंदिरे आणि शीर्षारान्नी उत्सवाने प्रसिद्ध झालेला श्रीस्थळ गावातील अर्थातच कानकोणचा अधिपती मल्लिकार्जुन या वैशिष्टयपूर्ण  स्थळांमुळेच काणकोणची डोळस भटकंती मनाला समाधान देते.

काणकोणचा इतिहास :-

               वैदिक काळात ज्ञान ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कण्व ऋषींनी या पवित्र भूमीत तपश्चर्या केली होती म्हणून या भागाला कण्वपूर संबोधले जायचे, याच कण्वपूरचे पुढे काणकोण झाल्याची पौराणिक कथा या भागात ऐकायला मिळते, मात्र उत्तराखंडातील सोनभद्र जिल्ह्यातील कैमूर श्रृंखला शिखरावर असलेली कंडाकोट ही भूमी कण्व ऋषींची तपश्चर्या भूमी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे काणकोणचा पुरातन इतिहास डोळसपणे अभ्यासायला हवा. खरं तर महाराष्ट्र इतकाच गोव्याला देखील शिवइतिहासाचा वारसा लाभला आहे. आदिलशहाचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या सौंधेकर संस्थानाच्या ताब्यात १६६४ पूर्वी गोव्याच्या पेडणे ,डिचोली, साखळी, सत्तरी, फोंडा,कानकोन हा प्रदेश होता. तर बार्देश,सालसेट ,तिसवाडी हे पोर्तुगीजांकडे होते. १६६४ साली खवासखान या  आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत छत्रपती शिवाजी महाराजांनी पेडणे, डिचोली ,साखळी ,सत्तरी हा आदिलशाही मुलखातील भाग स्वराज्यात सामील करून घेतला, मात्र फोंडा,केपे,काणकोण हे सौंधेकर संस्थानाच्या ताब्यातच होते. पुढे राज्यभिषेकानंतर १६७५ मध्ये शिवरायांनी पुन्हा एकदा गोमांतक भूमीवरील मोहीम सुरू करीत ०८ मे १६७५ ला फोंडा किल्ला जिंकून घेतल्याने सांगे,केपे, काणकोण वर आपसूकच हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकला. पुढे शिवरायांनी सध्याच्या कारवार प्रांतातील सिवेश्वर, कडवाड, अंकोला हा  गंगावती नदीपर्यंतचा मुलुख काबीज केला. फोंडा येथे त्यांनी सुभेदाराची नेमणूक केली.तसेच पोर्तुगीजांच्या बंदोबस्तासाठी बाळ्ळीच्या हवालदाराला आज्ञा देत बैतूल येथे किल्ला बांधून घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने बांधला गेलेला बैतुल हा गोव्यातील एकमेव सागरी किल्ला ठरला.

    


  पुढे १६८० मध्ये छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले. यावेळी सदाशिव राजे सौंधेकरांनी जिंजीतील छत्रपती राजाराम महाराजांच्या चरणी निष्ठा दाखविल्याने त्यांनी कारवार, काणकोन, बाळ्ळी, चंद्रवाडी,अंत्रूज (फोंडा)हा प्रदेश सालाना २२ हजार २०० होनास सालाना सौंधेकर राजास भोगवट्यावर दिला. त्यामुळे पुन्हा एकदा सौंधेकर संस्थानाच्या अमलाखाली काणकोण परिसर आला. पुढे १७६३ मध्ये लगतच्या हैदर अलीने सौंधेकरांवर आक्रमण केल्याने हैदरअली समोर आपला निभाव लागणार नाही हे जाणल्याने सोंधेकर राजाने पोर्तुगीजांचा आश्रय घेत हैदर अलीविरुद्ध केलेल्या मदतीच्या बदल्यात बाळ्ळी, चंद्रवाडी, अंत्रूज,,अष्टागार हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला मात्र धोरणी पोर्तुगीजांनी १७९४ मध्ये सोंधेकर राजाकडून काणकोण सह बैतुल व काबा-द-राम किल्ल्यावर नियंत्रण मिळवले.अशा पद्धतीने १७९४पासून गोवा भारतात विलीन होईपर्यंत म्हणजेच १९६१पर्यंत काणकोण पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होते.काणकोणवर राज्य करणारे लिंगायत धर्मीय सौंधेकर घराण्याचे वंशज गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री नागेशी-बांदोडा गावातील शिवतीर्थ पॅलेस मध्ये आजही राहतात.

काणकोण तालुक्यातील महत्वाची मंदिरे

काणकोणचा अधिपती श्रीस्थळीचा मल्लिकार्जुन :-



          मडगांवहून दक्षिणेस जाताना डोळ्याला दिसतात ती हिरवीगार शेते,कल्पवृक्षांच्या बागायती,वळणदार रस्ते आणि घनदाट झाडी.या सा-यांना मनात साठवत आपण येतो करमल घाटापाशी.हा घाट उतरत असताना मनाला वाटतं डोंगर आणि समुद्र यांचा एकमेकांशी जणू लपंडावच चाललाय जणू! हा घाट ओलांडला की पलिकडे दिसते ती काणकोणची भूमी.या काणकोणचा अधिपती आहे श्रीस्थळ गावातील श्री देव मल्लिकार्जुन.

     गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले मल्लिकार्जुन देवस्थान काणकोण शहरापासून अंदाजे १७ कि.मी.अंतरावर असून विजयनगर काळातील मंदिरस्थापत्याचा प्रभाव या मंदिरावर दिसून येतो.श्रीस्थळी गावातील हिरव्यागार समृद्ध डोंगरपठारीत वसलेल्या या  देवस्थानाने 'मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासिनाधिश्र्वर महापती काणकोण ' ही बिरुदावली धारण केलेली आहे.या बिरुदावलीचा अर्थ असा की श्रीस्थळी गावातील मल्लिकार्जुन काणकोण महालाचा अधिपती असून अडवट प्रांताचा तो सिंहासिनाधिश्र्वर आहे. अर्थात या मंदिराचा आवार पाहून ही बिरुदावली सार्थ असल्याची जाणीव होते.हे मंदिर सुमारे सोळाव्या व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.मंदिराचा जीर्णोद्धार सन १७७८मध्ये करण्यात आला होता.

        सध्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून ताम्रकौलारू छप्पर असलेल्या या देवालयाच्या सभामंडपाचे काम अत्यंत रेखीव पद्धतीने करताना तो काष्टशिल्पांनी सजविण्यात आला आहे.मंडपातील खांब ,अंतराळ, वितानावरील (छत) नक्षीकाम सगळंच फार सुंदर आहे.गोमांतकभूमीतील देवळारावळांच्या शिल्पसौंदर्यातून रामायण महाभारत व शिव वैष्णव अवतारांचा ठसा दिसून येतो.त्याचा प्रत्यय आपल्याला मल्लिकार्जुनाच्या मंदिरातही घेता येतो.या मंदिराच्या सभामंडपाच्या चारही भिंतींवर चित्रांचा कल्पकतेने उपयोग करित श्रीशिवमहापुराण कोरण्यात आले आहे,यासोबतच मंदिरातील देवस्थानाच्या उत्सवात संपन्न होणाऱ्या आगळ्यावेगळ्या शीर्षारान्नी परंपरेचीही लक्षवेधी प्रतिमा कोरण्यात आली असून ही प्रतिमा अंतरंगात कुठेतरी खोलवर जाऊन बसते.भिंतीवर सलग असलेली ही चित्रशिल्पे न्याहाळताना भाविक दंग होतो. प्रवेशद्वारावरील काळ्या पाषाणातील देखणे गजपाल, प्रवेशद्वाराच्या बाहेर मध्यभागी असलेली शिवपार्वतीची प्रतिमा व दोन नागमंडळे लक्षवेधक  आहेत.तसेच प्रांगणातील लालश्री व सफेद रंगातील वर्तुळाकृती दीपमाळ, गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले द्वारपाल हे सारेच सुंदर आहे.पण यापेक्षा सुंदर आहे गाभाऱ्यात विराजमान असलेला इथला अधिपती अर्थातच श्री मल्लिकार्जुन! एकूणच मल्लिकार्जुनाचे हे देवालय विचारपूर्वक शिल्पसमृद्ध करण्यात आले आहे.त्यामुळे इथे आलेला श्रीभक्त या पवित्र भूमीत देहभान हरवून जातो.

      मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात अनेक मंदिरे असून यात भूमीपुरुष व अपरांतभूमीचा निर्माता श्री परशुरामाचेही छोटेसे मंदिर आहे.परशुरामाची उभी सुबक मुर्ती आतमध्ये उभी आहे.हे मंदिर नेहमीच भक्तांच्या वर्दळीने गजबजलेले असते.

            तुझ्याचसाठी धाव घेई

            कण्वपुरी इथे श्रीस्थळी

            तुझ्याच भक्तीत लीन होई

            आळवितं तुझीच स्वरभजनं ..

रुद्राभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आवळीभोजन ,वीरामेळा, महाशिवरात्र या आणि अशा अनेक उत्सवांनी हे देवालय दुमदुमलेलं असतं.सोमवारी इथे विशष गर्दी असते.दर सोमवारी इथे शिवोत्सव होतो.श्री मल्लिकार्जुन पालखिमध्ये विराजमान होतात.वाद्यांचा मंगल ध्वनी,दिव्यांचा लखलखाट या सा-यांचा अनुभव घेत घेत सोमसुत्री प्रदक्षिणा संपन्न होते.आणि मग श्री मल्लिकार्जून देवालयात परत स्थानापन्न होतात.

      दक्षिण गोव्यातील काणकोणमध्ये (Canacona) मल्लिकार्जुनाची तीन मंदिरे आहेत. आवे, श्रीस्थळ आणि गावडोंगरी मात्र यातील श्रीस्थळीचे मंदिर प्रसिद्ध असून याठिकाणचा शिमगोत्सव संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे तो इथल्या  'वीरामेळ आणि शीर्षारान्नी' या साज-या केल्या जाणा-या वैशिष्टपुर्ण परंपरेमुळे.शिगम्याच्या या परंपरा आजवर सुरू आहेत आणि दरवर्षी दूरवरचे लोक शिर्षारान्नी परंपरा पाहण्यासाठी याकाळात गोव्यात येत असतात.

      


'शीर्षारान्नी' या प्रथेमध्ये 3 भाविकांचा समावेश असतो. त्यांना तीन दिशांमध्ये झोपवून त्यांची डोके एकमेकांच्या डोक्याला लावून त्याची चूल तयार केली जाते. आणि डोक्यांनी तयार केलेल्या या चुलीवर भात शिजवला जातो. तीनही भाविकांच्या डोक्याला डोके लावून केलेल्या चुलीत अाग पेटवून ज्यावेळी भात शिजतो, त्यावेळी तीनही भाविक सुरक्षितपणे बाहेर येतात.त्यांना कोणतीही इजा होत नाही.ही प्रथा पाहण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी होते.तसेच वीरामेळमध्ये भाविक पारंपरिक शिगम्याच्या वेशात येऊन हातात तलवार घेऊन मिरवणूक काढतात आणि प्रत्येक घरोघरी जातात. या पारंपरिक वेशभूषेतील भाविकांना बघण्यासाठी गावकरी गर्दी करतात.खरं तर हा उत्सव अनुभवण्याजोगा असून यासाठी शिमग्याचा काळात काणकोण गाठायला हवे.

 श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ :-



        काणकोण तालुक्यातील पर्तगाळी गावात प्रभू श्रीरामचंद्रांचे एक देखणे हिंदू देवालय आहे. गोमांतक भूमीतील समृद्ध हिंदू मंदिरांच्या शृंखलेत याचा आवर्जून समावेश करावा लागेल.मात्र हे देवालय 'श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' या नावाने ओळखले जाते.

     श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून समस्त जगतातील गौड सारस्वत ब्राम्हणांसाठी हे ठिकाण पवित्र आहे. मठाच्या मध्यवर्ती असलेल्या देवालयात प्रभू रामचंद्र, श्री देव लक्ष्मण, श्री देवी सीता यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून यामागील कथा रंजक आहे. या मठाचे प्रवर्तक श्री जगद्गुरु मध्वाचार्य स्वामी आहेत. लगतच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील परमपवित्र अशा श्रीक्षेत्र गोकर्ण या ठिकाणी मिळालेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना निसर्गरम्य शांत पवित्र अशा गोमांतक भूमीतील कुशावती नदीच्या काठावरील पर्तगाळी गावात साधारण इ.स.१५७५च्या आसपास केली असे मठातील पुरोहितांनी सांगितले. मात्र या मठाची स्थापना निश्चित करण्यासंदर्भातील संशोधन आजही सुरू आहे. या मठाचे संचलन दिक्षा परंपरेने चालते. मठाचे २३ वे मठाधिपती श्रीमत विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी धार्मिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १९जुलै २०२१ रोजी त्यांनी देहत्याग केल्यावर परमपूज्य विद्याधीशतीर्थ स्वामीजी मठाचे मठाधिपती म्हणून मठानूययांना मार्गदर्शन करीत आहेत. जगद्गुरू मध्वाचार्य यांनी हिमालयात बदिकाश्रम येथे मध्व पंथाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यापुढे गादीवर बसलेल्या सर्वच प.पू.स्वामीनी या मध्व पंथांच्या द्वैत तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करित विश्र्वकल्याणाणाचे काम केले.आज या मठाद्वारे या पंथाचा प्रसार विश्र्वभर केला जातो.

      या पंथाचे तिसरे मठाधिपती श्रीमत जीवोत्तम तीर्थ स्वामीजींच्या नावाने पर्तगाळी गावातील मठ ओळखला जातो. सद्यस्थितीत या मठात संस्कृत ग्रंथालय, अद्ययावत निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनसभागृह असून भाविकांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे तीर्थस्थळ आहे.

मठामागचा कुशावती नदीचा विलोभनीय घाट मनाला येणाऱ्या प्रत्येकाला मोहित करतो. शांत निवांत कुशावतीच्या स्वर्गीय सुंदर परिसरातील 'गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ ' इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. म्हणूनच दक्षिण गोव्यात काणकोण भागात येणाऱ्या श्रद्धाळू पर्यटकांनी इथे अवश्य यायलाच हवे.

यासोबतच तालुक्यातील पैंगीण गावही धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे.काणकोणची प्राकृतिक अपूर्वता काही वेगळीच आहे.निसर्ग व पर्यावरणाच्या कुशीत बालपणापासूनच वार्धक्यापर्यंतचा कालखंड येथील लोकमानसाने पिढ्यानपिढ्या व्यतीत केल्याने त्यांच्यात आपल्या परिसरातल्या वृक्षवल्लींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना रुजल्याची पहावयास मिळते. पैंगीण गावात गणेशचतुर्थीला साजरा होणाऱ्या पत्री गणपती उत्सवात गावातील प्रभूगावकर आडनावाची १३ कुटुंबीय एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात.यावेळी माती व धातूच्या मूर्तीचे पूजन न करता श्रावण-भाद्रपदातील पावसाच्या सरींमुळे तरारून आलेल्या जंगली फुले पाने तृणपाती ते गोळा करतात.सोबत तुळस, चाफा,मोगरा, वड,पिंपळ,केतकी,शमी अशा २१ प्रकारच्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या पत्रींना एकत्रित करून अर्जुनवृक्षाच्या पानात दोऱ्याने व्यवस्थित बांधतात व याच पत्रीची माटोळीने सजवलेल्या चौकात गणपती म्हणून प्रतिष्ठापना करतात.हा गणपती पत्रीगणपती म्हणून गोव्यात प्रसिद्ध आहे.निसर्गाशी  एकरूप झालेला हा अनोखा उत्सव पहायला गणेशचतुर्थीला इथे यायला हवे. गोवा हे परशुरामाने वसवले आहे. पैंगीण गावात परशुरामाच्या खुणा आढळतात.इथले शेकडो वर्षापूर्वी उभारलेले परशुराम मंदिर व तिथली परशुरामाची मूर्ती पाहिली नाही तर नक्की काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. कोकणभूमीचं मंगल दैवत असलेल्या परशुरामाचे इथले मंदिर प्रख्यात आहे. यासोबतच पैंगीण गाव प्रसिद्ध आहे ते इथल्या वेताळ मंदिरामुळे! गावातील आदीपुरुष मंदिराच्या बाजूलाच वेताळ मंदिर आहे. गर्भगृहातील वेताळाची मूर्ती भयप्रद आहे. उभट चेहरा, बटबटीत डोळे, कपाळी मुकुट,मुकुटावर कीर्तीमुख, नागाकृती कर्णभूषण,पिंजरलेल्या मिशा, विक्राळ दाढा व त्यातून बाहेर काढलेली जीप, अस्थीपंजर शरीर,बाहूंना नागबंधनं आणि एका हातात कपाल असलेली मूर्ती भयप्रद असूनही कमालीची देखणी वाटते. मंदिराचा सभामंडप ही नक्षीकामाने, पौराणिक प्रसंगाने कमालीच्या नजाकतीने कोरण्यात आला आहे.वेताळ मंदिरात दर तीन वर्षांनी संपन्न होणारी  गड्यांची जत्रा गोवा ,कर्नाटक महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे.

   


  शेजारी असलेल्या लोलिये गावातही वेताळची भव्य व नेत्रदीपक अशी मूर्ती आहे. ही वेताळमूर्ती सर्वात भव्य, सर्वाधिक रौद्र सुबक व गोव्यातील ज्ञात असलेली सर्वात प्राचीन जुनी मूर्ती आहे.या  गावातील ग्रामदेवता आर्यादुर्गा मंदिराच्या मागे असलेल्या रानात ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मस्तकी प्रभावळ व शिरोभूषण असून त्यावर नागबंधन आहेत. लांबलचक कर्णभूषण परिधान केलेल्या या मूर्तीचे डोळे खोबणीतून आलेले आहेत.अस्थिपंजर अशा या वेताळाने नरमुंडमाला धारण केलेली आहे. एका हातात खडग तर दुस-या हातात कपाल धारण केले आहे.ज्या हातावर कपाल आहे त्याच हाताच्या एका अनामिकेवर बकऱ्याचं मुंडकं अडकवलेलं आहे.नक्षीदार कंबरपट्टा व त्यावर घंट्यांची माला परिधान केलेल्या या वेताळाचे देखणेपण रौद्र आहे. काणकोण जवळच्या पैंगीण व लोलेये गावातील या वेताळ मूर्ती एक अद्भूत अनुभूती देतात. या मूर्ती पाहायला गेल्यावर आपला वेळ सार्थकी लागल्याचा आनंद चेहऱ्यावर जमा होतो. इतिहासाची आवड असणारे व हिंदूंची वैशिष्ट्यपूर्ण देवालय पाहण्याचा छंद असणाऱ्यांनी काणकोणच्या प्रवासात इथली ही वेताळ मंदिरेही अवश्य पहावीत.

@  काणकोण जवळचे समुद्रकिनारे

   पालोलेम बीच (पलोळे) :-



       चंद्रकोर आकाराचा व गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून गणला जाणारा पालोलीम बीच हा काणकोण तालुक्यातीलच नव्हे तर दक्षिण गोव्यातला प्रमुख बीच. गोव्यातील पांढऱ्याशुभ्र मऊशार वाळूचं नंदनवन असलेला हा समुद्रकिनारा मडगाव पासून फक्त ३८ किलोमीटर अंतरावर आहे. हा बीच गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. स्कुबा डायव्हिंग, कायाकिंग,डॉल्फिन स्पॉटिंग ही पालोलेम बीचची प्रमुख वैशिष्ट्य असून दहा-बारा वर्षांपूर्वी शांत निर्जन असलेला हा समुद्र किनारा सोशलमिडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे प्रसिद्ध झाल्याने गोव्यातील मुख्य आकर्षण बनला आहे.समुद्रकिना-याचे चाहते असलेल्या प्रत्येकाला  इथल्या वातावरणात स्वतःला झोकून द्यावसं वाटेल इतकं सुंदर सौंदर्य या ठिकाणाला लाभले आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या समुद्रकिना-यावर अनेक उत्तम रिसॉर्ट्स आहेत. शनिवारी इथल्या किना-यावर बाजार भरतो ,खरेदीची आवड असलेल्यांसाठी ती पर्वणी असते कारण गोमांतकीय संस्कृतीची जाणीव या बाजारात आपल्याला पाहायला मिळते. जोडीदारासोबत डेटवर जाण्यासाठी तसेच मित्रांसाठी धमाल मस्ती पार्टीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा हे परिपूर्ण डेस्टिनेशन आहे कारण पालोलेम स्वच्छ किनाऱ्यासाठी आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. येथील सायलेंट डिस्को खूप लोकप्रिय आहे. मजेची गोष्ट अशी आहे की, लोकांमध्ये शांतता राखण्यासाठी हेडफोन्स घालून पार्टीकेली जाते. पर्यटकांना समुद्र समुद्रकिनाऱ्यावर रहाण्यासाठी येथे रंगीबेरंगी घरे बांधली गेली आहेत, जी खूप सुंदर दिसतात.



अगोंद चा समुद्रकिनारा :- 

        ट्रीप ॲडव्हायझर या संकेतस्थळाने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सुंदर व सुरक्षित समुद्र किनारा म्हणून गौरविलेला अगोंदचा समुद्रकिनाराही काणकोण तालुक्यात येतो. खूप चांगली रिसॉर्ट्स व शाकाहारी रेस्टॉरंट इथे आहेत. इथल्या बीच हट्समधून निळ्याशार अथांग सागराचं दृश्यसौंदर्य भरभरून अनुभवता येतं,तर समुद्राच्या लाटांचा मन नादवून जाईपर्यंत आस्वाद घेता येतो. अगोंद हे समुद्रकिनारी वसलेले छोटेसे टुमदार गाव आहे. या गावात समुद्र किनाऱ्याला समांतर असलेला एकच महत्त्वाचा रस्ता असून रस्त्यालगत छोटी छोटी दुकाने आहेत. हे गाव फार आकर्षक असून देशी परदेशी पर्यटकांमुळे समुद्र किनारा  आजकाल बऱ्यापैकी गर्दीने फुललेला पाहायला मिळतो. मात्र कळंगुट-बागा सारखी गर्दी येथे नसल्याने तसेच हा किनारा भारतातील सर्वात सुरक्षित व स्वच्छ किनारा असल्याने इथे अवश्य भेट द्यायला हवी.

      


           तसेच अगोंद आणि पालोलेम बीच यामध्ये हनिमून आयलँड आणि बटरफ्लाय बीच हे दोन लहान समुद्रकिनारी आहेत. गत काही वर्षात गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे दोन्ही किनारे मुख्य आकर्षणाचा विषय झाले आहेत. याला कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. अगोंद पासून बोटीने साधारण पंधरा-वीस मिनिटात बटरफ्लाय बीचवर पोचता येते.निसर्गसौंदर्याचा आस्वाद ,एकांतपणा अनुभवण्यासाठी हे किनारे सर्वोत्तम ठरु शकतील.

@ काणकोण जवळचा किल्ला

    काबा-द-राम किल्ला :-



        तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला, चार एकर क्षेत्रफळात विस्तारलेला,दंतकथा आणि लोककथांनी नटलेला काबा- द- राम हा गोव्यातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक असून मडगाव पासून २७ किलोमीटर तर कानकोण बाजारापासून २० किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. या किल्ल्याचे नाव ऎकताच थोडेसे कुतुहल जागृत होते, राम या नावाशी काहीतरी याचा संबंध असावा असे प्रथमदर्शनी लगेच मनात येते. एका आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामचंद्र प्रदीर्घ वनवासासाठी आयोध्यातून बाहेर पडले त्यानंतर काही काळ त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण आणि सीतेसह घालवला होता असे म्हणतात. अर्थातच त्यांनाही या ठिकाणाची भुरळ पडली असावी, त्यामुळेच पुढे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या किल्ल्याला काबा-द- राम असे नाव देण्यात आले.
 
     खोलगड परिसरातील हा किल्ला खरोखरच प्रेक्षणीय असून सद्यस्थितीतही उत्तम स्थितीत आहे. किल्ल्याची तटबंदी,बुरुज,खंदक मजबूत असून किल्ल्यावर जवळपास २१ तोफा होत्या अशी नोंद कागदपत्रात आढळते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस तटबंदीमध्ये भव्य असा टेहाळणी बुरुज बांधलेला असून या बुरुजावरून संपूर्ण किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो. या बुरुजावर तोफेला ३६० अंशात फिरविण्यासाठी एका वर्तुळाकृती चर बांधण्यात आली आहे.टेहाळणी बुरुजावरून अथांग अशा समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. किल्ल्याच्या फांजी  चांगल्याच रुंद आहेत त्याचा वापर त्यावेळी गस्त घालण्यासाठी केला जात असावा.  याच्या आवारात एक प्रचंड आकाराची चौकोनी बांधीव विहीर दिसते.सद्यस्थितीत ती वापरात नाही.मात्र तीची बांधणी हिंदू पद्धतीची आहे. यास परिसरात दोन झरे देखील आहेत असे सांगतात की, एका झ-याचे पाणी लोक निव्वळ पिण्यासाठी वापरत असत तर दुसऱ्या झ-यातील पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने त्वचेचे रोग बरे होतात म्हणून ते पाणी आंघोळी करता वापरले जात असे. या किल्ल्याच्या पायथ्याशी शांत सुंदर असा काबा-द-रामा हा समुद्रकिनारा देखील आहे.किल्ल्यावर आलेले पर्यटक बराच वेळ या किनाऱ्यावर वेळ घालवितात.

      खोलगड या नावाने सुद्धा ओळखला जाणार हा किल्ला अनेक वर्ष वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला त्याचा इतिहास देखील रंजक आहे. पण या किल्ल्यावर सर्वात जास्त सत्ता राहिली ती पोर्तुगीजांचीच. सौंधेकर घराण्याकडून हैदरअलीचा उठाव उठवण्याच्या बदल्यात मोठ्या चतुराईने त्यांनी १७९१ ला हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. सौंधेकर संस्थान व पोर्तुगीजांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा ऎतिहासिक किल्ला समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेला दिसतो आणि म्हणूनच या किल्ल्यावरून लांब वर पसरलेल्या सागरी मार्गावर तसेच सागरी मार्गाने होणाऱ्या शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सुलभ जाईल याची जाणीव पोर्तुगीजांना होती. म्हणूनच हा किल्ला ताब्यात येताच या किल्ल्यावर अनेक सुधारणा करून या किल्ल्याला त्यांनी मजबूती दिली.आज किल्ल्यावर आढळणारे सर्वच अवशेष जवळपास पोर्तुगीजांच्या राजवटीतील आहेत. किल्ल्याचे संरक्षणदृष्ट्या महत्त्व कमी झाले तेव्हा म्हणजेच  1935 ते 1995 च्या दरम्यान पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला.पोर्तुगीजांच्या अन्यायी साम्राज्याविरोधात लढणा-या  आवाज उठवणा-या अनेक भूमीपुत्रांना त्यांनी इथे डांबून ठेवले.
      
       या किल्ल्याच्या मध्यभागी पोर्तुगीज शासकांनी सेंट अँथनीला समर्पित असलेले सुंदर चर्च उभारले आहे. हे चर्च आजही वापरात असून जांभ्या दगडांच्या भिंतीच्या सानिध्यात पांढऱ्या शुभ रंगात रंगविलेली चर्चची एकमेव सुस्थितीत असणारी ही भव्य वस्तू खूप उठून दिसते. एकूणच काय तर काबा-द- रामा हा किल्ला आज गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून सकाळी ०९ होते सायंकाळी ०५ या ठराविक वेळेतच हा ऎतिहासिक किल्ला पाहता येतो.
या किल्ल्यापासून जवळच काब द राम रिसाॅर्टस् असून येथील शाकारलेल्या झोपडींमधून शांत सुंदर सागरकिनारा पाहत सुट्टी घालविण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.या रिसाॅर्टच्या बाहेर सजविलेल्या बांबूचा कल्पकतेने उपयोग करीत गोलाकार   पाॅईंट वरून अनेक पर्यटकांनी काढलेले फोटो इन्स्टाग्राम व फेसबुकवर स्वर्गीय सुंदर गोव्याची जाहिरात करण्यात अग्रेसर असून या ठिकाणालाही अवश्य भेट द्यायला हवी. 


@ काणकोण जवळचे अभयारण्य 

खोतीगाव (कोटीगांव)अभयारण्य :-


          गोव्यातल्या हिरव्याकंच निसर्गाच्या कुशीत फिरता फिरता किल्ल्यांवरून निळ्याशार अथांग सागराचे दर्शन घेत असतानाच जर पशुपक्ष्यांचे निरीक्षण अगदी जवळून करायची संधीही सोडायची नसेल तर कानकोण जवळच उत्तम रीतीने जतन केलेल्या खोतीगांव (कोटिगांव) अभयारण्याला भेट देऊन जरूर फेरफटका मारायला हवा.लहानश्या गोवा राज्यात बोंडला, भगवान महावीर अभयारण्य मौले,नेत्रावळी,डाॅ. सलीम अली पक्षी अभयारण्य व खोतीगाव अभयारण्य अशी पाच  अभयारण्य आहेत. काणकोण तालुक्यातील साठ किलोमीटरवर पसरलेलं खोतीगाव अभयारण्य आकाराने तसं लहान आहे मात्र समृद्ध  वन्यसंपदेसाठी ते प्रसिद्ध आहे. 
        गोव्यात सहजासहजी न दिसणारे गरुड, सुतार पक्षासारखे दुर्मिळ पक्षी इथे आवर्जून पाहायला मिळतात. पर्यटक व पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या अभ्यासकांना इथे आरामात बसून पक्षी निरीक्षण करता यावं या हेतूने अनेक ठिकाणी उंचच उंच मचाण तयार करण्यात आले आहेत हे या अभयारण्याचं खास वैशिष्ट्य आहे.एखाद्या शिका-याप्रमाणे  मचानावर बसण्यात एक वेगळाच आनंद असतो तो आनंद इथे उपभोगता येतो. या मचाणावर बसून जंगली प्राणी व पक्षांच्या निरीक्षणाची अपूर्व संधी आपल्याला या ठिकाणी मिळते. हा हिरवा वन्यखजिना सकाळी ०७ ते सायंकाळी ०५:३० पर्यंत पाहता येतो. गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच गोव्याचा वाईल्ड चेहरा पण सुंदर आहे हे इथे आल्यावर पटते, मात्र यासाठी पावसाळ्यापेक्षा दुसरा उत्तम ऋतू नाही. कारण आषाढाच्या धो-धो सरी कोसळून गेल्यानंतर हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या, धबधब्यांचा जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरी सुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरू शकेल.

काणकोणची ही भूमी नररत्नांची खाण आहे.इतिहासाचार्य विनायक शेणवी घुमे ,पंडित गोविंदराव अग्नी,इतिहासाचे गाढे अभ्यासक व कोकणीचे मराठीशी असलेले नाते सांगण्यासाठी २५० पृष्ठांचे संशोधनपुर्ण पुस्तक लिहिणारे जाज्वल्य मराठीभिमानी डाॅ.वि.बा.प्रभुदेसाई, गोवा मुक्ती संग्रामात शौर्य गाजविणारे काणकोणचे नामांकित सर्जन व कर्करोगावर संशोधन करणारे बॅ.पुंडलिक गायतोंडे, स्त्रीयांना देवदासी या अनिष्ठ प्रथेच्या जाळ्यातून मुक्त करणारे सामाजसुधारक राजाराम पैंगीणकर हे काणकोणचे सुपुत्र गोव्याचे भूषण ठरले आहेत.
   
             गोव्याचे 'गोयपण'इथल्या जनजीवनात आपल्याला पहायला मिळते,गोव्याचे पूर्वापार सांस्कृतिक संचित  वीरमेळा, शीर्षारान्नी सारख्या उत्सवातून पुढे येते. या पुण्यभूमीचे शुचित्व अद्यापही टिकून आहे.म्हणुनच गोव्याचे एक वेगळे अनोखे रुप अनुभवण्यासाठी दोन दिवसाच्या काणकोणच्या सहलीचा बेत आखायलाच हवा. कारण त्यातूनच गोयचे वेगळेपण अनुभवता येईल.

वि ज य ह ट क र
दूरभाष - ८८०६६३६०१७
१५/०६/२०२३






No comments:

Post a Comment