Wednesday, June 28, 2023

साळवली डॅम व बाॅटनिकल गार्डन

 

दक्षिण गोव्यातील  सर्वोत्तम ठिकाण -
"साळवली डॅम व बाॅटनिकल गार्डन"



          गोवा म्हटलं की आपल्यासमोर येतात इथले सुंदर समुद्रकिनारे, चर्च,मंदिरे ,ऎतिहासिक वास्तू, कसिनो आणि इथली पोर्तुगीजांचा प्रभाव असलेली गोवन (गोमांतकीय) संस्कृती! पण गोव्याची व्याप्ती इथपर्यंतच मर्यादित नाहीए, यापलीकडेही जाऊन गोव्यातील सुंदर समुद्गकिना-यां शिवायही खुप काही बघण्यासारखे आहे.जर आपण दक्षिण गोव्याला फिरायचा बेत आखत असाल तर दक्षिण गोव्याची जीवनदायीनी असलेल्या साळवली डॅमला  (जलप्रकल्प) यात प्राधान्यक्रम द्यायलाच हवा!

       निसर्गसंपन्न सांगे तालुक्यामध्ये साकारलेले साळावली धरण हे खरे तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याच्या जनतेला दिलेली फार मोठी देणगी आहे. साहेबांच्या क्रियाशील,सकस मेंदूतून गोव्याच्या समृद्धतेसाठी सुचलेल्या अनेकविध योजनातील ती एक आहे.साळावली जलाशयाच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात कृषी क्रांती घडवण्याचा विचार स्वर्गीय भाऊसाहेबांचा होता, यासाठी सांगे तालुक्यातील अनेक बागायती,कुळागरे,जंगले पाण्याखाली बुडवावी लागली. संपूर्ण कुर्डी गावाला जलसमाधी घ्यावी लागली. या जलप्रकल्पाच्या निर्मितीमुळे हजारो एकर जमीन लागवडीखाली येईल व या परिसरात आर्थिक सुबत्ता येईल हा उदात्त विचार पटल्यानेच परिसरातील जनतेनेही विरोध केला नाही.त्यामुळे बघता बघता गोव्यातील सर्वात सुंदर व मोठे  असे साळवली धरण पूर्णत्वास गेले. या धरणाची आखणी जेव्हा झाली तेव्हा सिंचन हाच हेतू यामागे असल्याने १९७७-७८ पर्यंत या योजनेचे 'साळावली सिंचन योजना' असेच नाव होते. त्यानुसार सांगे,केपे सासष्टी तालुक्यात सिंचनाकरिता पाणी पुरवण्यासाठी कालवे तसेच पाठांची नियोजनबद्ध आखणी करण्यात येऊन ते उभारण्यातही आले मात्र नंतर सरकारचा प्राधान्यक्रम बदलल्याने सांगे, केपे तालुक्याचा भाग सोडला तर या योजनेचा सिंचनाखाली वापर होऊ शकला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे १९८० नंतर गोवा ख-या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात सामील झाल्याने गावांची शहरे व शहरांची महानगरे झाली. त्यामुळे शेती बागायती खालील जमीन कमी होत गेली आणि परराज्यातून गोव्यात रोजगार,उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरस्थावर होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. त्यामुळे घरे, व्यापारी संकुलांची मागणी वाढली. या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज वाढल्याने दक्षिण गोव्यातील मडगाव महानगरासाठी साळवली चे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे सरकारने ठरवले व साळजिणी येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून तेथूनच मडगांव,वास्को पर्यंत जलवाहिनींचे जाळे तयार करण्यात आले.परिणामी सिंचन हा मुख्य उद्देश बाजूला पडला व आज काणकोण वगळता दक्षिण गोव्यात साळावली धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.स्वर्गीय पर्रीकरांच्या कार्यकाळात जलशुद्धीकरणाचा अत्याधुनिक प्लांट तेथे उभारला गेल्याने मडगावसह फोंड्याचाही पाणी प्रश्न जवळपास सुटल्यात जमा आहे.साळावली धरणाला यामुळेच राज्यात महत्त्व आहे.साळावलीच्या मुबलक पाण्यामुळे दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्याचीही काही प्रमाणात तहान भागत असल्याने हा प्रकल्प गोव्यासाठी जीवनदायी ठरला आहे.

       सांगे शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेले साळावली धरण प्रकल्प हा स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक प्रतिभेचे, अविष्काराचे एक उत्तम उदाहरण आहे. सन 2000 साली झुवारी नदीची उपनदी साळावली नदीवर हिरव्यागर्द वनश्रीच्या सोबतीने पर्यटकांसाठी हा जलाशय उभारण्यात आला.यामुळे सांगे तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली. 26 किलोमीटर परिसरात पसरलेला व 41 मीटर उंच असलेल्या धरणाचा आकार अर्धगोलाकार असून धरणाच्या अगदी तोंडाशी आपल्याला उभे राहता येतं. त्यासाठी खास कठडा बांधण्यात आला आहे.धरणाचा बंधारा नागमोडी वळणावळणाचा असून यावरील पक्क्या रस्त्यावरुन चालताना हिरव्या गर्द वनश्रीने नटलेल्या  परिसरातील निळ्याशार जलाशयाचा सुंदर नजारा डोळ्यात साठविता येतो. पर्यटकांना स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणाऱ्या या नितांत सुंदर जलाशयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले की धरणाच्या जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी धरणाच्या मध्यभागी 140 फूट खोल सांडव्याची मोठ्या विहीरीप्रमाणे संरचना तयार करण्यात आली आहे.ज्यावेळी धरण पूर्ण क्षमतेने भरते त्यावेळी या वर्तुळाकृती सांडव्याच्या १४० फुट खोल संरचनेत अतिरिक्त पाण्याचा वेगाने  विसर्ग होत असताना भोवताली उंचच उंच उडणारे पाण्याचे तुषार पाहणे हा एक अद्भूत रोमांच निर्माण करणारा अनुभव असतो. बंधा-यावर थांबलेल्या पर्यटकांनाही या तुषाराचे फवारे चिंब भिजवितात.मात्र यासाठी या ठिकाणी पावसाळ्यात जुलै च्या मध्यानंतर इथे येणे योग्य ठरते.



      साळवली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची बातमी गोव्यात पसरली की गोव्याच्या विविध भागातून हा अद्भुत नजारा पाण्यासाठी पर्यटकांची पावले साळावली डॅमकडे वळतात. धरणाच्या विशाल बंधाऱ्याच्या वरील रस्त्यावर उभे राहून ओवरफ्लोचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वर्तुळाकृती सांडव्यातून खाली वेगाने  पडणा-या शुभ्रधवल जलधारा पाहणे, अंगावर उडणाऱ्या तुषारकणांत चिंब भिजण्याचा आनंद घेणे हे सारे  अवर्णनीय असेच आहे जणू! एकदा का आपण ही आनंददायी जलअनुभूती घेतली की दरवर्षी पावसाळ्यात आपली पाऊले साळावली धरणाकडे वळतात.मनाला प्रफुल्लित करणारा इथला जलजल्लोष,इथले स्वर्गीय सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी देश -विदेशातील लोकं तब्बल नऊ महीने वाट पहातात.व पावसाळ्याचा जोर वाढून दमदार पावसाने गोव्यातील धरणे पूर्ण क्षमतेने  भरली की साळावली धरणाकडे धाव घेतात.

बाॅटनिकल गार्डन :-



     साळवली धरण परिसरात पर्यटकांना पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये मस्त पिकनिकचा आनंद लुटता येईल येतो याचे कारण म्हणजे धरणाजवळ उभारण्यात आलेले बॉटनिकल गार्डन होय. एकीकडे साळवली धरणाचा निळाशार जलाशय तर दुसरीकडे हिरव्यागार गालिचांनी आकृष्ट करणारे गोवा सरकारचे बॉटनिकल गार्डन हे सारे एकाचवेळी पाहाणे स्वर्गसुख आहे.हे बाॅटनिकल उद्यान म्हैसुरच्या वृंदावन गार्डन पासून प्रेरित होऊन उभारण्यात येत आहे. इथे जाण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून चाळीस एक पायऱ्या खाली उतरावे लागते. गार्डन पर्यंत जाणारा एक पक्का डांबरी रस्ता ही आहे तो थेट प्रवेशद्वारापाशी आपल्याला घेऊन जातो.

        गोव्यात वैद्यकीय आणि निसर्ग पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने साळावली धरणावर 130 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत बॉटनिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतल्यानेच एक सुंदर मानवनिर्मित निसर्ग उद्यान पूर्णत्वाच्या वाटेवर असून राज्यातील हा प्रकल्प पर्यटकांना खेचण्यात यशस्वी होईल इतका आखीव रेखीवपणे विकसित केला आहे.गोवा वनविकास महामंडळ(GFDC), जलसंपदा विभाग(WRD)व पर्यटन विभागाच्या संयुक्त सहयोगातून उभारण्यात आलेल्या या बॉटनिकल उद्यानात येत्या काळात गोव्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनू पाहण्याची क्षमता आहे. या ठिकाणी योगा केंद्र, औषधोपचार केंद्र,आयुर्वैदिक उपचार केंद्र ,होमिओपॅथिक उपचार, मसाज केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे, तसेच वीस कॉटेज उभारल्या जाणार आहेत.त्यामुळे गोव्यातील वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार आहे. सोबतच मनोरंजनाच्या विविध क्रियाकालापाने सुखसुविधांनी उद्यान परिपूर्ण बनविण्यावर भर दिला जात आहे .जागतिक बँकेच्या सहकार्यामुळे या उद्यानात टॉय ट्रेन बसवण्यात येणार आहे.


           सद्यस्थितीन या बॉटनिकल गार्डन मधील अनेक बागा पूर्ण विकसित झाल्या आहेत.या बागांमध्ये उभारलेले छोटे छोटे गझिबो,संगीत कारंजे, गालीचे लक्षवेधी असेच आहेत. कुटुंबीयांसमवेत वा  मुलांसोबत एक दिवस धम्माल मस्ती करण्यासाठी,एक दिवस आनंदात घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.इथल्या शांत रमणीय सौंदर्यामुळे अनेक प्रेमी युगूलांची पावले देखील या गार्डनकडे वळत असतात. निसर्ग जाणून घेण्यासाठी, झाडांची पाने फुले वाचण्यासाठी वनस्पतीशास्त्रातील विद्यार्थी प्राध्यापकच नव्हे तर निसर्गाला सोबती मानणा-या निसर्ग अभ्यासकांसाठी, पक्षी निरीक्षणाची आवड असलेल्या लोकांसाठी देखील हे बॉटनिकल गार्डन योग्य पर्याय असल्याने येथील विविध निसर्गरंग अभ्यासण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालये या ठिकाणी सहली घेऊन येत असतात.

      साळावली धरण व बॉटनिकल गार्डन हा परिसर दक्षिण गोव्याची राजधानी मडगांव पासून 24 किलोमीटर अंतरावर व पणजी पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.हा परिसर पाहण्यसाठी पर्यटकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत इथे  यावे.यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये शुल्क आकारले जाते.मात्र अजूनही या परिसरात नाश्ता व भोजनाची व्यवस्था नसल्याने इथे येताना आपण पिण्याच्या पाण्यासह खानपान व्यवस्थेची तयारी करूनच इथे यावे.

     चहुबांजूंनी हिरव्यागर्द समृद्ध वनश्रीने वेढलेल्या या शांत रमणीय स्वर्गीय सुंदर परिसरात निसर्गाचे संगीत तनामनात साठवत इथल्या सप्तरंगात हरवून जाण्यासाठी साळावली धरण व बाॅटनिकल गार्डन परिसर गोव्यात येणा-या पर्यटकांसाठी एक योग्य पर्याय असून येत्या काळात गोव्याच्या वैद्यकीय पर्यटनाला दिशा देण्याची शक्यता असलेला हा परिसर गोव्याचा डोळस भटकंतीत पहायलाच हवा.

विजय हटकर.
8806635017

क्षणचित्रे :-


साळावली जलाशयाच्या निर्मितीमुळे पाण्याखाली गेलेले कुर्डी गावाचे ग्रामदेवत श्री सोमेश्र्वर मंदिराचे एप्रिल अखेर पाणी कमी झाल्यावर होणारे दर्शन.



ग्रामदैवत श्री सोमेश्र्वर मंदिर पाण्याबाहेर आल्यावर उत्सवासाठी आलेल्या भाविकांच्या गाड्यांचा ताफा.


पाण्याखाली गेलेल्या गावातील अवशेष

No comments:

Post a Comment