Tuesday, July 30, 2019


वात्सल्यमुर्ती शिरवटकर आजी तुला त्रिवार नमन.


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

      दि.३० जुलै २०१९
आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान संदिप दादाचा फोन आाला.मि काॅलेजमध्ये नेहमीच्याच कामात व्यस्त असताना दादाने शिरवटकर माऊशी गेल्या हे सांगताच धक्काच बसला. श्रीमती इंदिरा शिरवटकर अर्थात लांजा जुन्या बाजारपेठेत शिरवटकर माऊशी म्हणून लोकप्रिय असलेली माझी लाडकी शिरवटकर आजी आज देवाघरी निघून गेली.
    ममता,वात्सल्य ,स्नेह ,करुणा याचं मुर्तीमत प्रतिक होतीस तु आजी.जन्माला आल्यापासुन पाजवीला पुसलेला संघर्ष लग्नानंतरही काहि कमी झाला नाही उलट तो आणखी तीव्र झाला पण तु आयुष्यभर त्याचा हसत हसतच सामना केलास. आजी तुझे यजमान तुझ्या हवाली सहा लेकरांना आश्वस्त सोडून गेल्यावरही तु घाबरली नाहीस.
    लांज्यासारख्या छोटेखानी गावात जुन्या बाजारपेठेत या मुलांना भाकर मिळावी म्हणून पडेल ते काम केलेस. मुलांना मोठे केलेस. त्यांनीही तु दिलेल्या संस्कार रुपी शिकवणीच्या जोरावर मुंबापरित जाऊन संघर्ष केला. व आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवले.तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठी होताच. दिवस चांगले आल्यावरहि तु मात्र जुने दिवस विसरली नाहीस.सतत काम करत राहण्याचा तुझा स्वभाव मात्र बदलला नाहि.
         तशी आजी तुझी न माझी भेट झाली ती सन २०१५ च्या माघी गणेशोत्सवानंतर.तुझा उत्तरार्ध सुरु झालेला तर माझ्या प्रापंचिक संघर्षाला सुरवात झालेली.मी भाड्याने रहात असलेल्या स्वरुपानंद वसाहतीतील माझ्या घरमालकाने मला घराच्या नुतनीकरणाचे कारण सांगून रुम खाली करण्यास सांगितल्यवर मला खरं तर टेन्शनच आले होते.पंधरा दिवस खोली पहात होतो.पण हवी तशी मिळत नव्हती.त्यातच सॊभाग्यवतीनॆ लांजा शहराच्या महामार्गाच्या पश्चिमेस खोली बघुया हा आग्रह धरलेला.त्यामुळे महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या चांगल्या खोल्या पण सोडल्या होत्या.त्यातच माघी गणेशोत्सव सुरु असल्याने मी सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन येत असताना माझा मित्र राकेश पोटफोडेच्या आईला मला खोली हवी आहे, तुम्हि बाजारपेठ कुठे असल्यास कळवा म्हणून सांगताच
   पोटफोडे काकु म्हणाल्या अरे तुझी समस्या संपली म्हणून समज.आमच्या शेजारच्या शिरवटकरांच्या ईमारतीत दोन खोल्या खालीच आहेत.तु त्या संदीप राणे कडून त्यांच्याशी संपर्क साध.मी लगेचच वैशाली आॅप्टिशियनचे मालक संदीप राणे यांच्याकडून शिरवटकर दादांना फोनवर संपर्क केला. खोली पाहिली .मला बाजारपेठेतील मोक्याच्या जागेवर असलेली हि" गोपीकुंज" ईमारतीतील खोली पसंत पडल्याने व संदीप दादाने ही माझ्याविषयी घरमालकांना सकारात्मक माहिती दिल्याने शिरवटकर दादांनी मला भाडेतत्वावर  खोली देण्यास होकार दिला.व मि शिरवटकर कुटुंबियाच्या "गोपिकुंज " इमारतीत रहायला आलो.काहि दिवसांनी आमच्या घरमालकांच्या आई शिरवटकर आजी  मुंबई हुन गावी आल्या आणि आपली पहिली भेट झाली.या पहिल्या भेटितच आजी तु मला तुझा नातु करुन टाकलास .तुझ्या प्रेमळ स्वभावाने मला एक आजी मिळाल्याचा स्वर्गीय आनंद झाला होता तो शब्दात व्यक्त करणे कठिण.कारण माझ्या लहानपणीच माझी आजी  निर्वतल्याने मला आजीचे प्रेम तसे मिळालेच नव्हते.पण ते आता मिळणार होते.त्यामुळे मीही आनंदित होतो.
         आजी,गत पाच वर्षात तुझी अनेक रूपे मी जवळून पाहिली आहेत. आमच्या या ईमारतीत येणाऱ्या प्रत्येक भाडेकरुचं भलंच झालं आहे,तेव्हा बाळा तुझेहि भलेच होईल हे वाक्य आजही माझ्या कानी घुमते आहे.
         आजी, तसा तुझा स्वभाव खुप धार्मिक. हिंदू धर्मातील सर्व व्रत वैकल्य,सण-उत्सव तु नित्य नियमाने व आनंदाने अगदी कसोशीने करायचीस.कोणत्याही सणाच्या वेळी तुझी चाललेली लगबग इतरांनाही प्रेरणा द्यायची.मग आम्हिच म्हणायचो,अगं मावशी किती करशील, जरा विश्रांती घे .पण तु आपली तो सण साजरा होईपर्यंत झटायचीस.  श्रावणात नागपंचमीला तु केलेल्या पातोळ्या तर काही ऒरच लागायच्या.दहिहंडिला तुझ्या हातच्या दहिकाला हि चवीष्टच लागायची.गुढिपाडवा तुळशीविवाह हे सण साजरे करताना ते नियमातच साजरे झाले पाहिजेत यासाठी तुझा अट्टहास असायचा.तुळशीविवाहाच्या आदल्या रात्री तुळस रंगवली कि तुला अानंद व्हायचा.व तु समाधानाने झोपायचीस.
         गणेशोत्सव जवळ आला की तु महिनाभर अगोदरच तयारीला लागायचीस.मुंबईकर मुले-नातवंडे येणार असल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर अोसंडुन वहायचा.या गणपतीच्या सात दिवसात तु घराबाहेर कोणालाच दिसायची नाहीस कारण विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चा,नैवद्य,मुलांबाळांना ,पाहुण्यांना नाश्ता जेवण यात तु पूर्ण रमुन जायचीस.हे सात आठ दिवस तुझी होणारी धावपळ मी जवळून पाहिली आहे.या धावपळितहि तु केलेले मोदक मला न विसरता आणुन द्यायचीस.आजी हेच तुझं निराळंपण तुझा मोठेपणा सिद्ध करण्यास पुरेसं आहे.गणपती सणानंतर घरातील सर्व चाकरमानी परत निघून गेले कि तुझी अवस्था पाखरं सोडून गेलेल्या त्या अस्वस्थ चिमणीसारखी व्हायची.
         बाजारपेठेतील हनुमान जयंतीच्या वेळीही तु खुप उत्साहाने महाप्रसादाच्या कामात हातभार लावायचीस.तर शुक्रवारच्या संतोषी मातेच्या चणेवाल्यांच्या महाप्रसादावेळिहि तु खुप काम करायचीस.वय झालं तरिहि तू कधीही शांत बसलेली मि तुला कधीच पाहिलेली नाहि.या दोन्ही उत्सवावेळि तु तुझ्यापरिनं मार्गदर्शन करायचीस. तेव्हाच तुला समाधान वाटायचे.तुझं सगळं आयुष्य कुणाचं न कुणाचं करण्यातच गेलं.तुझ्या या कामाळू स्वभावामुळे तु अनेकांना आपलंसं केलेस.
          आजी,तुझा दैनंदिन कार्यक्रम ही ठरलेला.त्यात कधीही फरक पडायचा नाहि.घड्याळाचे काटे जसे वेळेप्रमाणे चालतात तसाच तुझा दिनक्रमहि .सकाळी लवकर उठून देवाला फुले आणने व एक किमी तरि चालणे,देवपूजा करणे, चहापान, दुपारी एकच्या आसपास भोजन ,चार वाजता पुन्हा चालायला जाणे, रात्री आठला भोजन व विश्रांती या काळात तुझी डायबिटिसच्या डोसची इंजेक्शन तु स्वतः च नियमित पणे घ्यायचीस.मि आजारि पडल्यावर डाॅक्टराच्या हातचे इंजेक्शन घ्यायला आजहि घाबरतो मात्र तु रोजच्या रोज अशी इंजेक्शन घ्यायचीस .खरच यावेळी मला तुझी कमालच वाटायची.  तु वेळ जावा म्हणून गोधड्या (वाकळ)  शिवायचीस. त्यात तुझी मायेची ऊब असायची.वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरहि तु गोधड्या शिवायचीस प्रसंगी तुझी दमछाकपण व्हायची पण तरीही तु ते काम कधीच थांबविले नाहीस.तुझे वात्सल्य त्या गोधड्यांमधुन अाज अनेक नातवंडाना मायेची उब देत आहे हे नक्कीच.
   

 नाती रक्ताची असो वा मानलेली,त्यात मायेचा ओलावा असेल तरच ती ऊन पावसात घट्ट टिकून राहतात व वाढतात.आपलेहि नाते असेच होते.माझ्या सॊभाग्यवतीच्या सातुंगुळावेळि, मुलीच्या अर्थात कु.विधीच्या पहिल्या वाढदिवसावेळि तु मला केलेली मदत विसरता येणं शक्य नाहि. आजी ,तुझ्याकडं काय नसायचं? - अगदी डोकं दुखतंय,थांब सुंठ उगळुन देते,म्हणणाऱ्या तुझ्याकडे प्रत्येक छोट्या मोठ्या आजारावर हमखास रामबाण उपाय असायचा.थोडक्यात तू तर घरातली रात्री अपरात्री धावून येणारी डाॅक्टरच होतीस.
      " फूल काही देत नाही,
        फूल काही घेत नाही;
         फूल फक्त फुलत असतं!
या पंक्तिप्रमाणे तु आयुष्यभर फुलतच राहिलीस.व इतरांनाही तुझ्या स्नेहसुगंधीत फुलरुपी व्यक्तिमत्वाने फुलण्याची प्रेरणा दिलीस.आजी ,झाडांवर पाखरे नसतील तर ' झाड'पण राहणार नाही.व घरात तुझ्यासारखी प्रेमळ बुजूर्ग व्यक्तिमत्त्वे नसतील तर 'घर' पण ही राहणार नाही.हे खरेच आहे. तुझी उणीव सर्वांनाच सतत जाणवत राहील.पण माझ्या आयुष्यातही तुझ्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.मि एका प्रेमळ आजीला कायमचा मुकलॊ आहे. आजी ,तुझा स्पषवक्तेपणा,वेळ व्यवस्थापन,कामाप्रती असलेली निष्ठा,प्रेमळ ,वात्सल्यपुर्ण स्वभाव, धार्मिक परंपरा साजरा करण्याचा आग्रह ,नियमित पायी  चालण्याचा संदेश नेहमीच प्रेरणा देत राहतील.
          मुळात "आजी "हे रसायनच वेगळं असतं. 'क्षणाक्षणाला, कणाकणाला इतरांचं जीवन प्रकाशित करणारी,संस्काराचा ऎवज आमच्या स्वाधीन करणारी माऊली म्हणजे आजी.' या आजीच्या परिभाषेत परफेक्ट बसणा-या  तुझ्यासारख्या मातृहृदयी आजीचा सहवास मला लाभला हे माझे भाग्यच.आज न सांगताच तु या जगाचा निरोप घेतलास.आम्ही मात्र पोरके झालो. या भावूक क्षणी देवाकडे एकच मागणे, माझ्या आजीच्या आत्म्याला चिरशांती लाभो.
          शिरवटकर आजी ,तुझ्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
   @@@@@@@@@@@@@@@@@@@
       
       श्री विजय हटकर
       लांजा.

2 comments:

  1. राजू,प्रत्येक शब्द वाचताना अश्रू रोखणे अवघड होतं होते. सलाम तुझ्या लेखणीला. खूप सुंदर लिहिले आहेस. अश्रूंपुढे शब्द सुचत नाहीत. प्रत्यक्ष मावशीचा चेहराच समोर उभा केलास. धन्यवाद. तुझाच रमेशदादा

    ReplyDelete
  2. 🙏🙏🙏🌹
    Aamchi Aajji tumchya lekhanitun hubehub ubhi keli dolyasamor... Kharach.. Aajila kadhich shantpane baslela pahila nahi.. Konakade konatahi karyakram aso.. Aaji padat khochun pudhe asaychi... Kay lihu tichyabaddal.. Tumhi je kahi sangitlay te tanto tant khara aahe...
    Mi Bhai Shirwatkaranchi mulgi... Aajjichi nat

    Sau Sheetal Vivek Pawadkar.

    Tumche aabhar🙏🙏🙏 Aajila parat dolyasamor ubhi kelit🙏

    ReplyDelete